Saturday 23 July 2011

सुरक्षित शहर, ही कोणाची जबाबदारी आहे?



 
माझा लोकांवर ठाम विश्वास आहे. जर त्यांना सत्य समजले, तर कोणत्याही राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहता येते. त्यांच्यापर्यंत खरी वस्तुस्थिती पोचवणे ही महत्त्वाची बाब आहे...अब्राहम लिंकन.

सुरक्षित शहर, ही कोणाची जबाबदारी आहे?

रोज, जेव्हा आपण बॉम्बस्फोट किंवा त्यासारख्या गोष्टींबद्दलच्या बातम्या वाचतो, तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनात एकच प्रश्न येतो, आता पुढचा कोण? आणि कुठे? मला वाटते, हा प्रश्न निर्माण होणे हाच अशा घटनांमागच्या ताकदींचा विजय असतो. आपल्या मनःस्थितीमध्ये काहीच चुकीचे नाही, पण अशा गोष्टी घडू न देणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे काम आहे, हे महत्त्वाचे आहे.

मला अकबर-बिरबलची एक गोष्ट आठवते...
एकदा नेहमीप्रमाणे शहरात वेष बदलून फिरत असताना, बादशहाने बिरबलाला विचारले, सर्वात चांगले शस्त्र कोणते? बिरबल म्हणाला, संकटाच्या वेळी जे हातात येईल ते. बादशहाचे या उत्तराने समाधान झाले नाही, आणि त्यांनी त्यांचा फेरफटका पुढे चालू ठेवला. अचानक एक हत्ती पिसाळल्याने वर्दळीच्या बाजारातील रस्त्यावर जे समोर येईल ते उद्ध्वस्त करत धावू लागल्याने लहानशी दंगलच उसळली. अनेक लोक त्याला शस्त्रांचा वापर करून नियंत्रणाखाली आणायचा प्रयत्न करत होते, पण ते सारे प्रयत्न निष्फळ ठरत होते. तो हत्ती काही कोणत्याच शस्त्राला जुमानत नव्हता. तो हत्ती या दोघांकडेच चाल करून येऊ लागला, पळायला रस्ताच नसल्याने बादशहा आता कशाचा उपयोग करावा हे शोधू लागला, तेवढ्यात अचानक बिरबलाने जवळून पळत जाणाऱ्या एका भटक्या कुत्र्याला उचललं आणि हत्तीकडे फेकलं. ते हत्तीच्या थेट डोक्यावर जाऊन आदळलं आणि हत्ती कावराबावरा झाला आणि शांत झाला! बिरबलाने बादशहाकडे पाहून स्मित केलं. बादशहाला धडा मिळाला होता!

अच्छा, तर ही तर एक गोष्ट होती, पण जेव्हा आपण संकटाच्या व्यवस्थापनाबद्दल विचार करतो, तेव्हा तिला फार मोठा अर्थ आहे. जेव्हा आपण अशा घटनांचा विचार करतो, तेव्हा संकटाच्या व्यवस्थापनामध्ये दोन कृतीयोजना येतात, एक तर आपण अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी काय करत आहोत, आणि दुसरे म्हणजे अशा गोष्टी झाल्यानंतर आपल्याकडे काय व्यवस्था आहे. बिरबल म्हणाला तसे, हाताशी जे असेल, तेच शस्त्र सर्वोत्तम, हे मान्य, पण आपल्या हाताशी काय असेल, आणि आपण ते कसे वापरू, याची योजना करण्याने मदतच होते, कारण सगळे काही त्या महान, हुशार बिरबलासारखे चाणाक्ष नसतात. या पार्श्वभूमीवर आता आपण आपल्या आजूबाजूला काय घडते आहे, ते पाहू.

प्रत्येक वेळी बॉम्बस्फोटच असायला हवा असं नाही, भूकंप असेल, खूप पाऊस पडल्यामुळे पूर आले असतील, आग असेल, कोणतेही नैसर्गिक संकट आपल्यावर येऊ शकते! चांगले शहर म्हणजे फक्त आयटी पार्क आणि बागा आणि स्मारके नव्हेत, तर चांगले शहर ते असते, जे त्याच्या नागरिकांना एका सुरक्षित आयुष्याची खात्री देते, आणि आपल्या प्रिय पुण्यानेसुद्धा हे लक्षात घेण्याची आणि या निकषांवर आपले स्वतःचे मूल्यमापन करण्याची वेळ आता आली आहे. आपण पोलिसांद्वारे ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या मॉक ड्रिल्सबद्दल वाचतो, पण त्याच्या निष्पत्तीचे खरेच मूल्यमापन होते का आणि पोस्ट मार्टेमनंतर त्यातून समोर येणाऱ्या कमतरतांची पूर्ती केली जाते का? हे कधीच लोकांसमोर येत नाही. मला वाटते प्राधिकरणांनी या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. जपानसारख्या प्रगत देशाला सुद्धा किती जोरदार फटका बसू शकतो हे आपण अलिकडेच पाहिले आहे पण जे ठळकपणे पुढे आले नाही किंवा ज्याचा अभ्यास झाला नाही ते म्हणजे त्यांनी या फटक्याला कसे तोंड दिले. जर आपल्या प्राधिकरणांनी भूकंपानंतर तिकडे अधिकारी पाठवून ते लोक कसे त्यातून सावरत आहेत आणि कसा प्रतिसाद दिला आहे, याच्यावर तपशीलवार अहवाल बनवला तर त्याचा उपयोग होणार नाही का? आणि लक्षात ठेवा, यामध्ये फक्त सरकारी नव्हे तर खाजगी क्षेत्रांचीही भूमिका असायला हवी, कारण तुम्ही खाजगी आहात की सरकारी हे काही भूकंप पाहत नाही. या पार्श्वभूमीवर, खाजगी क्षेत्रांनी अशा प्रकारच्या अरिष्टाला तोंड द्यायला काय तयारी केली आहे आणि त्यांनी त्याला कसे तोंड दिले हे पाहण्यासाठी ज्यांना परवडते अशा किती कॉर्पोरेट क्षेत्रांनी कुणाला पाठवले किंवा त्याचा विचार केला? मला वाटत नाही, किमान माहिती तरी नाही की कुणी त्याचा विचार केला आहे. आपण आनंदासाठी परदेशी जातो, पण या दृष्टिकोनातून कधीच नाही. आपल्या दृष्टिकोनात याचीच उणीव आहे. साध्या गोष्टी, जसे की आपल्या रोजच्या आयुष्यात आपण काय खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत याबद्दल आपण एक प्रश्नावली तयार केली आणि आपल्या परीघामधील लोकांना दिली, तर मला खात्री आहे त्याच्यातून निघणाऱ्या गोष्टी अनेकांना भावतील, कारण आपण खरोखरच त्या आघाडीवर फार निष्काळजी असतो, आणि मग आपण सरकारपासून राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना दोष देत राहतो.

शहरामध्ये अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपण पाहिले आहे की आगीचे बंब जाऊच शकत नाहीत, आणि जिथे संकटाच्या काळात टॅंकर जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे माणसांनी जीव गमावले आहेत अशा वस्त्यांच्या आसपास आगीसाठी पाण्याचे एक स्वतंत्र जाळे का असू नये, जे आगीच्या वेळी वापरता येईल? माझ्या माहितीप्रमाणे आपण अजून अशा जागा कोणत्या त्याचीही यादी केलेली नाही, आणि जर केली असेलच तर ती कधीही प्रकाशित झालेली नाही. आपण जर जिथे संकटे येऊ शकतात अशा जागांची यादी सुद्धा करत नसू, तर लोकांना आपण त्याबाबतीत कसे जागृत करणार आहोत, किंवा अशा वेळी काय करायचे याची कृतीयोजना कशी बनवणार आहोत?  मान्य की काही भागांचा जसा विकास झाला आहे, तसा तो व्हायलाच नको होता, पण आता आपण ती वस्तुस्थिती स्वीकारली आहे, तर आपल्या हातात जे आहे त्याचे आपण काय करतो, एवढाच प्रश्न उरतो नाही का? नवीन डीपी तसेच बनत असलेला अस्तित्वात असलेला डीपी यांच्यामध्ये अशा वस्त्यांना वेगळ्या रंगात दाखवले गेले पाहिजे आणि संकटाच्या वेळांसाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधांची तरतूद असली पाहिजे. विशेषतः झोपडपट्ट्या आणि गावठाणांचा काळजीपूर्वक अभ्यास केला गेला पाहिजे आणि आगीसाठी पाण्याच्या लाईन, आणीबाणीच्या काळात बाहेर पडण्यासाठी मार्ग चिन्हित करणे, वैद्यकीय मदत यांच्यासाठीच्या व्यवस्था केल्या पाहिजेत आणि त्यांच्या आसपास मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्या नेहमी मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. तसेच ब्लॅंकेटांपासून ते कपड्यांपर्यंत राखीव साठा नेहमी तयार ठेवला पाहिजे आणि शहराच्या सर्व भागांमध्ये, किमान काही मूलभूत गोष्टी, ज्या नैसर्गिक संकटाच्या वेळचा पहिला कृतीकार्यक्रम असू शकतात असल्या पाहिजेत.

अगदी नवीन प्रकल्पांमध्ये, आता ते १५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींमध्ये दोन जिने सक्तीचे करत आहेत (खरे तर हा एक विनोद आहे, कारण आपण ज्या पद्धतीचे बांधकाम रहिवासी इमारतींसाठी करतो, त्यात आग पसरण्याची शक्यता फारच कमी असते) पण त्याच वेळी मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये आणि व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये आगीसाठी जिनाच नव्हे तर आगीचे मार्गसुद्धा चिन्हित केले पाहिजेत जे भूकंपासारख्या आपत्तींमध्ये सुद्धा वापरता येतील. नशिबाने आपल्याला भोपाळसारख्या रासायनिक दुर्घटनेची चिंता करण्याची गरज अजून तरी नाही, पण तरीही एचईएमआरएल आणि ईआरडीएल सारख्या जड स्फोटक सामग्रींचा कारभार करणाऱ्या संस्था आपण विसरता कामा नये. खूप पूर्वी त्या शहरापासून दूर होत्या, पण आता पश्चिम उपनगरे वाढत गेली तसतशा या संस्थांना आता रहिवासी जागांनी वेढले आहे किंवा त्या जवळजवळ त्या मार्गावर आहेत. त्यामुळे अजून जे झाले नाही अशा कशाहीसाठी तयार असावेच लागते.

सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध खात्यांमधील समन्वय. काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की जेव्हा खडकवासल्यामधून सोडले जाणारे पाणी वाढले, तेव्हा भिडे पूल पाण्याखाली गेला आणि जलसिंचन खात्याकडून सगळ्या सावधगिरीच्या सूचना आधी दिल्या गेल्या असूनही कितीतरी कार पाण्यात गेल्या. किती मोठी विडंबना. शहरात या आघाडीवर आपल्याला किती सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे सिद्ध करायला यापेक्षा अधिक काय पाहिजे! आणि लक्षात ठेवा, हा नियंत्रित, ज्ञात असलेला पूर होता. कल्पना करा, अचानक काहीतरी झाले तर आपण फक्त एकमेकांची तोंडं पाहत राहू. पोलिस बॉम्ब आणि दहशतवादी हल्ल्यासाठी मॉक ड्रिल करतात, पण नैसर्गिक आपत्तींसाठीच्या मॉक ड्रिलचे काय, आणि त्याच्या निष्पत्तीचा हिशेब काय? किती सामान्य नागरिकांना अशा वेळांसाठी प्रशिक्षित केले आहे, किंवा त्याचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला आहे? दुर्दैवाने आपला अनुभव हा इंटरनेट आणि टीव्हीपुरता मर्यादित असतो, जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष कशाला तोंड द्यावे लागेल, तेव्हा काय होईल देव जाणे. आणि सर्वात वाईट गोष्ट अशी की कोणालाही हे माहीत नाही, की ही जबाबदारी नक्की कोणाची आहे.

एक चांगले शहर ते असते, ज्याने पुरवलेल्या पायाभूत सुविधा आणि सत्ताधाऱ्यांचा अशा प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे नागरिकांना शांतता लाभते, कारण या जमान्यात संकटातून सोडवायला बिरबल येणार नाही. महान नेता लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे, आज लोकांसमोर सत्य मांडण्याची वेळ आली आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांमध्ये जो बिरबल आहे, त्याला जागे करू या आणि त्याचा आधीच उपयोग करून घेऊ या, तरच आपण आपली स्वतःची आणि शहराची खरी काळजी घेऊ शकू.



--
 
संजय देशपांडे

संजीवनी देव.

एन्व्हो-पॉवर कमिटी, क्रेडाई, पुणे

संजीवनीमधील आमचे तत्त्वज्ञान आणखी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

http://visonoflife.blogspot.com/

संजीवनीची सामाजिक बाजू!

http://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157625491480779/

www.sanjeevanideve.com

हरित विचार, जीवन विचार

No comments:

Post a Comment