Monday 12 December 2011

चेअरमनकडून सोसायटी साठी पत्र - प्रिय मित्रांनो


प्रिय मित्रांनो,

पाणी हा कायमच एक चिंतेचा विषय राहिला आहे आणि अजूनही आहे. मात्र आपल्याला जेव्हा पाणी कपातीला तोंड द्यावे लागते फक्त तेव्हाच त्याचा चिमटा बसतो ही वस्तुस्थिती आहे. माझ्या सोसायटीचा चेअरमन या नात्याने मी माझ्या सोसायटीतल्या रहिवाशांसाठी काही गोष्टी लिहिल्या होत्या, त्या तुमच्याबरोबरही शेअर करायला मला आवडेल.

संजय देशपांडे


विषय: इमारतीतील पाण्याच्या कमतरतेबाबत

प्रिय,

     मी खाली जे लिहिले आहे ते कृपया काळजीपूर्वक वाचा, कारण आता आपण विचार करण्याची आणि त्यानुसार कृतीसुद्धा करण्याची वेळ आली आहे. आपल्याला सगळ्यांनाच पुण्यामध्या आणि आसपासच्या परिसरात पावसाची स्थिती काय आहे त्याबद्दल आणि आपल्या शहराला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये किती कमी पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्याबद्दल माहिती आहे. मागच्या १० दिवसांपासून शहरामध्ये पाण्याची तीव्र कमतरता भासत आहे आणि आपला भाग त्याला अपवाद नाही.
  
     मुख्य लाईनमधल्या पाण्याचा दाबच खूप कमी झाला आहे, आणि त्यामुळे पाणीपुरवठ्याचा वेळही. पाण्याचे टॅंकरसुद्धा उपलब्ध नाहीत आणि १०,००० लिटर पिण्याच्या पाण्याच्या एका टॅंकरला 1,००० रुपये लागतात. म्हणजेच प्रतिलिटर 1० पैसे! आणि आपल्याला खनिज पाणी मिळते १० रुपये प्रतिलिटर दराने. आता आपल्याला एकूण परिस्थितीचा अंदाज आला असेल, दरवेळी जेव्हा आपण कोणत्याही कारणासाठी पाणी वापरतो, अगदी फ्लशिंगसाठी किंवा कपडे धुण्यासाठीही, तेव्हा आपण ते अत्यंत महाग दराने विकत घेत असतो, ज्याला बाकी बहुतांश देश चैन समजतो!
  
     जेव्हा अनेकांना नगरपालिकांच्या नळाचे पाणी मिळत नाही, आणि टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुद्धा शक्य नाही अशा वेळी आपल्याला निदान टॅंकरचे पाणी मिळते, त्यामुळे आपण स्वतःला नशीबवानच समजले पाहिजे. त्या लोकांबद्दल विचार करा, ते कसे जगत असतील! सोपे आहे, ते कमीतकमी आवश्यक तेवढेच पाणी वापरतात. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवूनच ते पाणी वापरतात. आंघोळच करू नका किंवा तुमचे कपडे धुवू नका असे मी म्हणत नाही, पण त्यासाठी एक योग्य व्यवस्था असू द्या. शक्यतो बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा, विशेषतः पाणी संकटाच्या काळात. त्यामुळे पाण्याचा वापर निश्चित प्रमाणाइतकाच होतो, आणि १० लिटरच्या २ बादल्या एखा चांगल्या आंघोळासाठी पुरेशा होतात. तेच जर तुम्ही शॉवर वापरलात, तर तुम्ही किती पाणी वापरत आहात तुम्हालाच समजत नाही आणि तुम्ही ३० लिटरपेक्षा अधिक पाणी वाया घालवता, जे आपण सहजपणे वाचवू शकलो असतो, तेही ज्या कामासाठी ते वापरायचे, ते व्यवस्थित साध्य करून. जर तुम्हाला शॉवरच वापरायचा असेल, तर एक गजराचे घड्याळ वापरा आणि ८ मिनिटांचा गजर लावा. तुम्हाला याचे हसू येईल, पण तेवढ्या वेळात तुमच्या शॉवरमधून साधारणपणे २०-२२ लिटर पाणी बाहेर पडते, जे चांगली आंघोळ करण्यासाठी पुरेसे असते.

     वॉशिंग मशीनसाठीही अशाच काही गोष्टी ठरवता येतील, कारण तीही अशी गोष्ट आहे, जी अक्षरशः पाणी पिते! ते संपूर्ण दिवस चालू ठेवून एखाद्या ऑनलाईन लॉंड्रीसारखे वापरण्याऐवजी, आपण ते चालवण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवू शकतो, दिवसभरातले सगळे कपडे गोळा करून ते त्या वेळेत धुवू शकतो. आपण एक व्यावसायिक पद्धतीचे वॉशिंग मशिन खरेदी करून ते पार्किंगमध्ये ठेवून एकत्रितपणे वापरू शकतो. पाश्चात्य देशांमधल्या अनेक कॉलनींमध्ये अशी पद्धत असते आणि त्यामुळे पाणी तसेच वीज यांची खूपच बचत होते. दुसरे खूप पाणी वापरले जाते अशी गोष्ट म्हणजे कमोड/डब्ल्यूसी यांचे फ्लशिंग. आपल्याला प्रत्येक वेळी मूत्रविसर्जनानंतर फ्लशच्या टाकीतील सगळेच्या सगळे १५ लिटर पाणी फ्लश करण्याची गरज नसते. आपण दुहेरी पद्धतीची फ्लश टाकी वापरू शकतो, ज्यामध्ये मूत्रविसर्जनानंतर फक्त अर्धी टाकी फ्लश केली जाईल हे निश्चित होते. किंवा आपण छोट्या बादलीतून पाणी ओतू शकतो. दुहेरी फ्लशला फिटिंगसकट ९०० रुपये लागतात आणि ते एका तासात बसवता येते. आमच्या बहुतेक प्रकल्पांमध्ये अशा पद्धतीचे दुहेरी फ्लश बसवलेले आहेत आणि जिथे ते नाहीत, तिथे आपण ते बदलून घ्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. यासाठी काहीही मदत हवी असेल तर आपण मला माझ्या कार्यालयामध्ये संपर्क करू शकता. माझा अनुभव असा आहे की यामुळे खूपशा पाण्याची बचत होते.
   
     दात घासताना किंवा दाढी करताना नळ बंद ठेवणे यासारख्या छोट्या गोष्टींचा सुद्धा खूप उपयोग होतो आणि आता या गोष्टी शाळेमध्ये आपल्या मुलांना शिकवल्या जात आहेत. आता आपली मुलेसुद्धा जे करतात, त्या गोष्टींची आपल्याला आठवण करून द्यावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे!

     आपल्या कॉम्प्लेक्सला बोअरवेल चा पुरवठा आहे, आपण असे ठरवूया की आपण ते फक्त आपल्या कार धुण्यासाठी वापरू आणि त्यासाठीसुद्धा आपण आपल्यामध्ये एक वेळ ठरवून घेऊ, म्हणजे विजेचा अतिरिक्त वापर टळेल. आपण तशीच पद्धत बागकामासाठी वापरत आहोत.

     विजेप्रमाणेच, आपल्याला आपल्या कॉम्प्लेक्समध्ये डाऊन टेक लाईन्सवर मीटर बसवून घेतले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला आपण खरंच किती पाणी वापरतो ते कळेल आणि आपण किती बचत केली पाहिजे याचा आपल्याला माग राखता येईल.

     जागतिक परिस्थितीबाबत आपल्याला जागरूक करण्यासाठी ही काही तथ्ये – डब्ल्यूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अनुसार, (एका सरासरी चांगल्या परिस्थितीतील शहरी भागामध्ये) एका व्यक्तीला रोज १३५ लिटर पाणी लागते. त्यामुळे पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी ते आहे रोज ६७५ लिटर, जे पीएमसी पुरवते. पण हे लक्षात घ्या, की मुंबईसारख्या शहरातसुद्धा प्रतिव्यक्ती फक्त ९० लिटर पाणीच पुरवता येते, आणि या पार्श्वभूमीवर आपण किती भाग्यवान आहोत. आपला स्वतःचा खर्च कमी करण्यासाठी तसेच जे पाणी आपण वाचवू ते दुसऱ्या कुणा गरजूला पुरवण्यासाठी वापरले जाऊ शकेल यासाठीही पाणी वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. पाणी वाचवणे ही आपण आपली सवय बनवू, फक्त संकटसमयी करण्याची कृती नव्हे.


      पाणीपुरवठा पुन्हा नीट होईपर्यंत तुम्ही डाऊन टेक वॉल्व्हवर नियंत्रण ठेवू शकता आणि त्याची वेळ अशी असेल...

सकाळी ५.३० – १०.३०

आणि

संध्याकाळी ५ – १०

वरच्या पाण्याच्या टाकीपासून पाणी खाली नेणारी पाण्याची लाईन फक्त याच काळात चालू असेल आणि बाकी वेळ जमिनीखालच्या आणि वरच्या टाक्या भरण्यासाठी वापरला जाऊ शकेल.

कृपया ही माहिती आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच मित्रांनाही सांगा.

संजय देशपांडे

संजीवनी देव

चेअरमन, एन्व्हो-पॉवर कमिटी, पीबीएपी

--
हरित विचार, जीवन विचार



No comments:

Post a Comment