Wednesday 8 February 2012

शहरात हिरवाई जपताना!



 
 
 
 
 
आपण संपूर्ण जैववैविध्याची काळजी घेतली पाहिजे – संपूर्ण – फक्त एक किंवा दोन तारांकित गोष्टींची नाही....डेव्हिड ऍटनबरो

आजकाल आपल्याकडे आपल्या फ्लॅटमध्ये गच्ची किंवा बाल्कनी असते. काही सुदैवी लोकांकडे त्यांच्या घराला किंवा फ्लॅटला बागही असते. आपण ती जागा कशी वापरतो ते महत्त्वाचे आहे. अनेकदा गच्चीची जागी नुसतीच घरातील ज्यादाचे सामान टाकण्यासाठी वापरली जाते, खरे तर तिथे आपण काही रोपे लावू शकतो, ज्यामुळे छान तर दिसतेच, परंतु आजूबाजूच्या अनेक प्राण्यांच्या जातींना तिथे आसराही मिळू शकतो. आजूबाजूला इतके शहरीकरण होत असताना एक महत्त्वाचा पैलू विसरत चाललो आहोत आणि ते म्हणजे, इतर प्राणीजातींसाठी जागा.
काही वर्षापूर्वीच शहरात भारद्वाज आणि बामणी मैना यासारख्या पक्ष्यांपासून ते अनेक पक्षी दिसत असत, अगदी संध्याकाळच्या वेळी वटवाघुळेसुद्धा दिसत असत आणि आता भारद्वाज तर सोडाच, साधी चिमणीसुद्धा दिसायला मिळत नाही! आपल्याला फार तर कबुतरे दिसतात आणि तीही काही रस्त्यावरच्या माणसांनी त्यांना खायला घालून पाळलेली. याचे कारण म्हणजे झाडांच्या जागी इमारती झाल्या आहेत, आणि नवीन झाडे लावली जात असली तरी ती पूर्ण वाढायला वेळ लागतोच आणि लावलेली सर्व झाडे आजूबाजूच्या पक्ष्यांच्या जातींना वास्तव्यासाठी योग्य नाहीत. जसे की चाफ्याचे झाड दिसते सुंदर आणि त्याला फुलेही येतात पण त्याची पानांची आणि फांद्यांची रचना अशी असते की त्यावर कोणताही पक्षी आपले घरटे बांधू शकत नाही! नवीन इमारतींपाशी नवीन झाडे लावली जातात पण ती झाडे वाढून मोठी होईपर्यंत जीवनचक्र बिघडते आणि तुटते. ते पुन्हा पूर्ववत व्हायला आणि पक्षी पुन्हा शहरात यायला खूप वर्षे लागतील आणि समाजाच्या सर्व घटकांकडून त्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेसारखी स्थानिक मंडळे बागा वगैरे तयार करून काही गोष्टी करत आहेत आणि बांधकाम व्यावसायिकांना ८० चौरस मीटर प्लॉट क्षेत्रासाठी एक मोठे झाड लावणे सक्तीचे आहे पण एखाद्या स्वतंत्र व्यक्तीची यामध्ये काय भूमिका आहे? आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारे झाडे लावण्याला प्रोत्साहन देण्याचा आणि जैववैविध्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एवढे तरी प्रत्येकजण करू शकतो.

नुकतेच मी सिंगापूरला जाऊन आलो आणि जसे मी नेहमीच नमूद करत आलो आहे, ते शहर निसर्गाची जपणूक करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे कधीच थांबवत नाही. एका अशाच प्रयत्नामध्ये, त्यांनी जुराँग बर्ड पार्क नावाचे एक सर्वात मोठे बंदिस्त पक्षी उद्यान तयार केले आहे.

तेथे त्यांनी पक्ष्यांना खाऊ घालण्याचे खास ट्रे बनवून घेतले आहेत जेणेकरून पक्ष्यांना भेटीला येणाऱ्या माणसांच्या हातून खाता आणि पाणी पिता येते. त्यामुळे सामान्य माणसाला विविध जाती प्रजातींची माहिती होते आणि पक्ष्यांना त्या जागेविषयी आपलेपणा निर्माण होतो. मी सिंगापूरच्या अनेक घरांमध्ये बाल्कनीमध्ये त्यासारखेच ट्रे रोपांच्या मध्ये ठेवलेले पाहिले आहेत. यात महत्त्वाचे हे आहे की त्यांना काँक्रीटच्या जंगलामध्ये जैववैविध्य जपण्याची गरज समजली आहे आणि ते त्यांचा खारीचा वाटा उचलत आहेत आणि म्हणूनच सिंगापूरसारख्या शहरांमध्ये तुम्हाला तुम्ही इमारतींच्या करड्या रंगात हरवून गेल्यासारखे वाटत नाही. म्हणजेच पक्ष्यांचा निवारा असलेली झाडे आणि माणसांचा निवारा असलेल्या इमारती दोन्ही एकमेकांबरोबर जगत आहेत.


माझ्या त्या ट्रिपवरून परत आल्यानंतर मी पहिले काम काय केले असेल तर फॅब्रिकेटरला बोलावून घेतले आणि पाण्याचा वाडगा, धान्याचा वाडगा बनवून घेतला आणि माझ्या ऑफिसच्या गच्चीला ते बसवून घेतले आणि त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला. आम्ही पक्ष्यांच्या आंघोळीसाठीही काही वाडगे करून घेतले त्यामुळे खाण्यासाठी तसेच आंघोळीसाठी खूप पक्षी यायला लागले. फक्त अशा ठिकाणी गच्चीवर काही रोपेसुद्धा असायला हवीत म्हणजे पक्ष्यांना खायला येताना सोपे वाटते. मला खूप माणसे माहीत आहेत जे त्यांच्या गच्चीवर पाण्याच्या वाट्या किंवा धान्याचे डबे ठेवतात किंवा बागांमध्ये कृत्रिम घरटी ठेवतात, पण त्यांची तक्रार असते की पक्षी येतच नाहीत
! आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की पक्ष्यांसारख्या जमाती कोणत्याही नवीन जागेला भेट देताना खूप काळजी घेतात कारण तिथे त्यांचा खाजगीपणा तसेच सुरक्षितता जपली जाईल याची त्यांना खात्री करून घ्यायची असते. जर आपण ते एकदम खुल्यामध्ये ठेवले तर ते कदाचित येणार नाहीत, तसेच मी सांगिजले तसे आधी काही झाडे असायला हवीत, म्हणजे हिरवाईमुळे त्यांना तिथे आरामशीर वाटेल आणि मग ते तिथे हळूहळू यायला लागतील. अशा घरट्यांचे किंवा झाडांचेही रंग फार चकचकीत नकोत कारण पक्ष्यांना मग ते आवडत नाहीत. निळा किंवा लाल यापेक्षा गडद हिरवा किंवा मातीचा रंग वापरा जे पक्ष्यांना ओळखीचे वाटतील.

पुण्यासारख्या शहरात स्वतंत्र व्यक्तींनी झाडे आणि पक्ष्यांच्या जपणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या अशा अनेक कहाण्या आहेत, अनेक नागरिक त्यांच्या परीने यासाठी काही करण्यामध्ये त्यांचा वाटा उचलत आहेत. पण संवर्धनाची संकल्पना समजून घेणे आणि मग कृती करणे आवश्यक आहे. अनेकांना असेही वाटेल की एवढी कशाला काळजी करायची? नाही दिसले कावळे आणि चिमण्या तर बिघडले कुठे? त्यांच्यासाठी कितीतरी बागा आणि झाडे आहेतच की. मग प्रत्येक व्यक्तीने ते कशाला करायला पाहिजे आणि घरांच्या किंमती एवढ्या वाढलेल्या असताना गच्चीवरील किंवा बाल्कनीतील जागा कशाला वाया घालवायची? लक्षात ठेवा, जेव्हा एखादी जागा रिकामी असते, तिथे कोणतीही इमारत नसते तेव्हा तिथे अनेक जाती प्रजाती राहत असतात, गांडुळे, वाळवी पासून ते घुशी आणि मुंग्यांपर्यंत आणि अर्थातच काही पक्षी तिथे निवांत विहार करू शकतात आणि या प्राण्यांना खाऊन राहू शकतात. पण एकदा का इमारत झाली की संपूर्ण जीवनाचा ऱ्हास होतो आणि माणसांसाठी घरे बनवताना या प्रजाती जमिनीवर इतस्ततः होतात. आणि ही हानी कुठेतरी इतरत्र बागा करून भरून काढता येत नाही. आपण फक्त आपल्या कृतीचे परिमार्जन प्रत्येक घरात जैववैविध्याचा एक छोटा कोपरा तयार करूनच करू शकतो. तोच हे करण्याचा योग्य मार्ग आहे.


कमी होणारे जैववैविध्य हे शहरी विकासातील एक चिंतेचे कारण आहे आणि ऍटनबरो यांच्या वरील उद्गारांनुसार फक्त दाखवण्यासाठी किंवा कुठल्या मूल्यांकनासाठी नाही तर त्याच्या खऱ्या कारणासाठी आपण सर्वांनी या आघाडीवर काम केले पाहिजे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या छोट्याशा गच्चीवर पक्ष्यांना येताना आणि किलबिलताना पाहणे हा एक खूप मोठा विरंगुळा सुद्धा आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही शहरी जीवनात काय हरवून बसला होता आणि तेव्हा तुम्हाला तुम्ही एवढे पैसे देऊन घेतलेल्या घराचे पूर्ण मूल्य मिळाल्याचे समाधान मिळेल
!
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!


No comments:

Post a Comment