Monday 21 May 2012

घराचा ताबा घेताना



 
  


एका नात्यामध्ये एकनिष्ठता व मेहनत आवश्यक असतेग्रेटा स्काकी.

जेव्हा मी एखादी इमारत पूर्ण होताना पाहतो व लोक सांगतात की आम्हाला ताबा मिळाला व आम्ही लवकरच आमच्या नवीन घरात राहायला जाणार आहोत, तेव्हा मला या विचारवंत महिलेचे अवतरण आठवते! आम्ही नुकताच आमच्या एक प्रकल्पाचा ताबा दिला, त्या निमित्ताने एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात सर्व सदनिकाधारक व प्रकल्पाशी संबंधित सर्व लोकांचा समावेश होता. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी अनेक वर्षांपासून ताबा देणं पाहात आलोय पण आजही केवळ सदनिकाधारकच नाही तर त्या प्रकल्पाशी संबंधित सर्वांच्या चेहे-यावरील आनंद पाहिला की समाधान वाटतं किंवा अधिक अचूक शब्दात सांगायचं झालं तर हा अनुभव रोमांचक असतो. ब-याचदा मी लोकांना बांधकाम व्यवसायाला नावं ठेवताना ऐकतो, कारण तो केवळ पैसे कमावण्याचा एक धंदा मानला जातो, ज्यामध्ये भावनांचा ओलावा नसतो. बातम्यांमध्ये बांधकाम व्यावसायिक किंवा रिअल इस्टेट उद्योगाबद्दलचे मथळे पाहिले की या व्यवसायात अजिबात सृजनशीलता नाही, भावना नाहीत, तो केवळ एक रखरखीत व भावनाशून्य काँक्रिटचं जंगल बनवतो असं वाटतं! मात्र हे खरे नाही किंबहुना माझ्यासाठी हा जगातला सर्वात सृजनशील व्यवसाय आहे व मी केवळ बांधकाम व्यावसायिक आहे म्हणून हे म्हणत नाही, तर मी जेव्हा लोकांना व तयार झालेल्या इमारतीला पाहतो तेव्हा मला असं वाटतं!
विचार करा एका ओसाड जमीनीच्या तुकड्यावर जिथे कुणीही राहत नाही, त्यावर कामाला सुरुवात होते. काही वर्षात त्यावर अनेकांसाठी घर बनवलं जातं, ताबा मिळाल्यानंतर ही जागा जिवंत होते, लोकांची वर्दळ सुरु होते, इमारतींच्या आजूबाजूला असलेल्या जागेत मुलं खेळायला लागतात, आपण लावलेली झाडं बहरु लागतात, ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळीना भेटायला येतात, म्हणजे एकदा जागेचा ताबा घेतला की त्यावर अनेक गोष्टी घडत असतात. धूळ व सिमेंटमुळे मळकट वाटणा-या इमारतीला रंग दिला जातो, ती एखाद्या नववधूसारखी दिसू लागते व येणा-या पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज होते! यामध्ये काहीच निर्मिती नाही असे कोण म्हणेल! थोडंस पुढे जाऊन मी तर म्हणेन हे देवाच्या कामासारखं आहे! इथे बरेच जण मला आपली देवाशी तुलना केल्यामुळे वेडा ठरवतील, मात्र हे शून्यातून संपूर्ण नवं जग उभारण्यासारखं नाही का? मला देवाच्या शक्तिशी तुलना करायची नाही, मात्र एका ओसाड जमीनीवर घर बनवून त्याचा ताबा मालकाला देणं हे देव ज्याप्रमाणे जगाची निर्मिती करतो त्यासारखंच नाही का!
दुर्दैवानं ब-याच जणांना या संपूर्ण प्रक्रियेतली जादू किंवा रोमांच कधीच कळत नाही व ताबा देणं केवळ एक औपचारिकता होऊन बसते. सर्वसाधारणपणे ग्राहकाला बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात बोलावलं जातं, त्याचे पैसे पूर्ण मिळाले आहेत याची खात्री केल्यानंतर घराच्या किल्ल्या हातात दिल्या जातात, बस एवढंच! केवळ घर हेच असं उत्पादन आहे ज्यामध्ये खरेदीदाराला उत्पादनाकडे जाऊन त्याचा ताबा घ्यावा लागतो, उत्पादन आपल्याकडे येत नाही, आपल्याला उत्पादनाकडे जावं लागतं व त्याच्यासोबत राहावं लागतं! आपण एखादं जहाज किंवा जेट खरेदी करत असाल तरीही ते तुमच्या घरी पोहोचवलं जाऊ शकतं मात्र घराचं तसं नाही. आपण जेव्हा ताबा देण्याचा कार्यक्रम आयोजित करता तेव्हा कितीतरी गोष्टी घडतात, खरंतर या घराशी संबंधित असलेल्यांचा तो एक मेळावाच असतो. घर बनवण्याची प्रक्रिया २-३ वर्षे सुरु असते व त्यामध्ये ब-याच घटकांचा समावेश असतो. प्लॉटचे मोजमाप घेणारा सर्वेक्षण करणारा चमू, इमारतीचा आराखडा तयार करणारा वास्तुविशारद, त्यानंतर बांधकामाशी या ना त्या मार्गाने संबंधित असलेल्या विविध संस्था असे अनेक घटक असतात. या सर्व संस्थांमध्ये काम करणारी माणसेच असतात व माझ्याप्रमाणेच ते इमारतीचं काम करत असताना तिच्याशी जोडले जातात. त्यामुळेच ज्या व्यक्तिंनी या इमारतीच्या बांधकामासाठी एक किंवा दोन वर्षं दिली आहेत त्यांच्यासाठी हा नक्कीच भावनिक क्षण असतो. इतके दिवस आम्ही इमारत बांधली जात असताना तिथे ये-जा करत असतो व एकेदिवशी अचानक तिच्या मालकाला ताबा दिल्यानंतर आम्हाला जाणीव होते की आमची भूमिका संपली आहे, उद्यापासून आपण इथे यायचं काहीच कारण नाही. किंबहुना आपणच बांधलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी बसलेल्या वॉचमनला आम्हाला उत्तरं द्यावी लागतील! हे एखाद्या अनाथालयात काम करण्यासारखं आहे, काही दिवस किंवा महिने आपण त्या मुलाची काळजी घेता, त्याचा तुम्हाला लळा लागतो व अचानक तुम्हाला कळतं की ते दत्तक घेतलं जाणार आहे व तुम्हाला आता ते मूल पुन्हा कधीच पाहता येणार नाही! ब-याच जणांना ही कल्पना किंवा माझा विचार पटणार नाही मात्र खरंच मी अगदी कामगारसुद्धा भावनिकदृष्ट्या त्या इमारतीमध्ये गुंतलेले पाहिले आहेत. बरेच कामगार बांधकाम सुरु असताना तिथे राहात असतात, त्यांच्यासाठी काही काळ ते त्यांचं घर असतं त्यामुळेच कदाचित ते त्या इमारतीमध्ये गुंतत असतील. 
आपण बांधत असलेली इमारत पूर्ण होताना व ताबा देण्यास तयार होताना पाहण्यासारखा समाधानकारक अनुभव नाही, हे लहान मूल मोठं होताना पाहण्यासारखं आहे कारण प्रत्येक दिवशी काहीतरी प्रगती होत असते. मी नेहमी साईटची प्रत्येक अवस्थेतली छायाचित्रं काढून ठेवतो व नंतर त्यांचा एक अल्बम बनवतो, व प्रत्येक सदनिकाधारकाला घराचा ताबा देताना तो देतो, आपले स्वतःचे घर बांधतानाच्या त्या सर्वोत्तम आठवणी असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी इमारत बांधली जात असताना वेळोवेळी तिला भेट द्यावी व छायाचित्रं घेण्याचा प्रयत्न करावा, डिजिटल कॅमे-यानं तर हे अगदी सोपं झालं आहे. घराचा ताबा देण्याशी पूजा किंवा झाडं लावणे अशा ब-याच गोष्टी निगडित असतात, ही झाडं आपण तिथे राहात असताना मोठी होतात, आपल्यासोबत त्यांनाही आपण मोठं होताना पाहू शकतो. काही सादर करताना अगदी लहानशी गोष्टही अतिशय परिणामकारक ठरते. आजकाल अगदी दुचाकी वाहनाची किल्लीही छोटीशी पूजा व ऑटोमोबाईल शोरुममध्ये छोटा कार्यक्रम करुन दिली जाते व तिथले कर्मचारी ग्राहकांच्या आनंदात सहभागी होतात. बांधकाम व्यवसाय अशा चांगल्या प्रथा इतर उद्योगांकडून का घेऊ शकत नाही? काही बांधकाम व्यावसायिक अशा प्रथा पाळतात मात्र त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याऐवढी आहे.
एखाद्यासाठी घर बांधणे ही एक सेवाच असते, खरंतर सर्वोतत्म सेवा असते, कारण बरेच लोक आयुष्यात एकदाच घर खरेदी करतात. तसंच ते केवळ एक ग्राहकोपयोगी उत्पादन नाही तर आपल्या देशात घराला सर्वाधिक भावनिक मूल्यही आहे व हे लक्षात ठेवून आपण तशी सेवा दिली पाहिजे. ताबा देणं म्हणजे केवळ कायदेशीर कागदपत्रांची व रकमेची पूर्तता करणं नाही तर घराचं बांधकाम व्यवस्थितपणे पूर्ण करुन दिलं पाहिजे.  सर्व काम पूर्ण झालं पाहिजे, सर्व घटक त्यातून बाहेर पडले पाहिजेत, विकासकाने बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र (ऑक्यूपन्सी/कम्प्लीशन सर्टिफिकेट) घेणे वगैरे सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या पाहिजेत.
ताबा घेणा-याचीही जबाबदारी आहे की त्यानं एक यादी बनवावी व या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत का हे पाहावं, त्यामुळे विकासकाशी भविष्यात वाद होणार नाही. सदनिकेच्या आतील बांधकाम, तसंच सार्वजनिक भागातील रंगरंगोटी, सांडपाणी व्यवस्था व स्वच्छता इत्यादी बाबी पाहून घेतल्या पाहिजेत. आपण इतरही
ब-याच गोष्टी देऊ शकतो उदाहरणार्थ सर्व सदनिकाधारकांची माहिती असलेली छोटीशी मार्गदर्शिका, ज्यामुळे ते सर्वजण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील. आपण एक छोटेखानी कार्यक्रम किंवा मेळावा आयोजित करु शकतो, ते सर्वजण एखाद्या लग्नसोहळ्याला आल्याप्रमाणे येवून आपल्या घराचा ताबा घेतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अभिमान पाहून मला अतिशय आनंद व समाधान मिळतं, मला परिपूर्ण वाटतं. ग्राहकांचं घर बांधताना हे नातं जपण्यासाठी माझ्या चमूनं जी मेहनत व एकनिष्ठता दाखवलेली असते ती यावेळी दिसते! सरतेशेवटी नातं म्हणजे तरी काय? नातं म्हणजे विकासक व ग्राहक यांच्यादरम्यानचा विश्वास व जिव्हाळा, जे दोघंही अनुभवतात. हे नातं निर्माण होण्याचं कारण म्हणजे घर व हे नातं दृढ करण्यासाठी घराचा दाबा देण्यासारखा दुसरं चांगलं निमित्त कुठलं असू शकेल!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

No comments:

Post a Comment