Tuesday 23 October 2012

आपला वारसा आपली संस्कृती



 
 
 
 
 
 

आपण आपल्या तरुण पिढीला आर्थिक सुबत्ता व संपन्न समाजाचा वारसा लाभलेला समृद्ध व सुरक्षित भारत दिला तरच आपण लक्षात राहू... डॉ. अब्दुल कलाम

आपले माजी राष्ट्रपती हे अत्यंत बुद्धिमान व्यक्ती आहेत, व त्यांनी ज्याप्रकारे आपल्या देशाच्या वारशाचे महत्व विशद केले आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. पुण्यामध्ये मनपा वारसा पदभ्रमण (हेरिटेज वॉक) सुरु करणार असल्याच्या बातमीकडे कुणाचं विशेष लक्षं गेलं नाही, कारण बरेच म्हणतील की त्यात विशेष काय आहे? अतिशय जीर्ण शीर्ण झालेल्या इमारती ज्यांना आपण वाडे म्हणतो, काही अरुंद गजबजलेले रस्ते व शनिवार वाडा ज्यामध्ये केवळ दरवाजा व तटबंदीशिवाय आत फारसे काही उरलेले नाही! आपण असा विचार करत असू तर दुर्दैवाने डॉ. कलामांना वारसा या शब्दातून जो अर्थ अभिप्रेत होता तो आपल्याला समजलेलाच नाही. या शहराला अतिशय जुना इतिहास व संस्कृती लाभलेली आहे हे आपलं भाग्य आहे. या शहराने शिवाजीमहाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत अतिशय प्रसिद्ध राज्यकर्ते पाहिले आहेत व ही निःसंशय राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. वारसा हा केवळ काही जुन्या इमारती व रस्त्यांपुरता मर्यादित नसतो, तर त्या कालखंडाची संपूर्ण संस्कृती आपण जतन करायला हवी. जतन करणे म्हणजे केवळ काही वाडे आहे त्याच परिस्थितीत ठेवणे नव्हे तर ते वाडे पूर्वी होते त्याप्रमाणे त्यांची देखभाल करणे. त्याचवेळी या पिढीच्या लोकांनाही समजायला हवं की ते कोणता वारसा पुढे चालवत आहेत.
अमेरिकेसारख्या फारसा जुना इतिहास नसलेल्या देशांनीही त्यांचा वारसा संग्रहालये व ग्रंथालयांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे जतन केला आहे. वारसा जतन करण्यासाठी युरोप सर्वात प्रसिद्ध आहे, प्रत्येक देश वेगळी संस्कृती, सामाजिक संपन्नता दाखवतो व ब-याच ठिकाणी त्यांनी ती आहे तशी जपून ठेवली आहे. अलिकडच्या काळात चीन, सिंगापूरने आपला वारसा जतन करण्यात पुढाकार घेतला आहे व त्या ठिकाणांना पर्यटन केंद्र बनवून त्यातून ते भरपूर उत्पन्नही मिळवत आहेत. सिंगापूरमध्ये वारसा पदभ्रमणामध्ये ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत, त्यावर प्रत्येक चौक व महत्वाच्या इमारतीची माहिती देण्यात आली आहे. शहरात येणारी कुणी नवखी व्यक्तिही याद्वारे कोणत्याही मार्गदर्शकाशिवाय फेरफटका मारु शकते. या सर्व मार्गांची देखभाल त्यांनी कशी केली आहे हे खरोखर पाहण्यासारखे आहे. अशा गोष्टींमुळे शहराच्या नागरिकांमध्ये त्याविषयी आपलेपणाची भावना निर्माण होते, अशा वारशाचा ते एक भाग आहेत याची जाणीव त्यांना होते, व पर्यटकांना शहराची व त्याच्या संस्कृतीची एका वेगळ्या दृष्टीकोनातून माहिती मिळते.
शहराचे मोजमाप त्यामध्ये उपलब्ध रोजगार किंवा मनोरंजनाच्या जागा यावरुन होऊ शकत नाही.  एक शहर त्यातील लोकांचा वारसा व त्यांच्या संस्कृतीद्वारे ओळखले जाते. जगभरात सगळीकडे ज्या शहरांनी त्यांचा वारसा जपला आहे ती राहण्यासाठी सर्वोत्तम मानली गेली आहेत कारण तिथे तुमच्या जीवनात शांती व आनंद भरुन जातो, व कोणत्याही व्यक्तिला तो जिथे राहतो तिथून हेच अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर विचार केला तर आपल्याला आपल्या लाडक्या शहरात आजूबाजूला किंवा आपल्या देशातील यासारख्याच इतर कोणत्याही शहरांमध्ये काय दिसते. अहमदाबादसारखे काही अपवाद वगळले कारण तिथे शासनकर्त्यांनी शहराचा वारसा जपण्यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत, बाकी ठिकाणी या आघाडीवर अज्ञान आहे किंवा एकूणच सावळा गोंधळ आहे. पुण्यामध्ये पीएमसीने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने वारसा पदभ्रमण सुरु केले असले तरीही या आघाडीवर अजूनही पूर्णपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांना केवळ आजूबाजूचा परिसर दाखवणे हेच नाही तर आपण जे दाखवणार आहोत त्याची परिस्थिती कशी आहे हे देखील महत्वाचे आहे. या मार्गावर स्वच्छ सार्वजनिक शौचालयांसारख्या सुविधांचाही विचार होणे आवश्यक आहे, ज्याचा आपण विचार करत नाही. शनिवार वाडा ही आपल्या शहराच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करणारी ऐतिहासिक वास्तू आहे मात्र ती पाहायला गेल्यास आत पाहण्यासारखे काहीच नाही ही वस्तूस्थिती आहे. त्याप्रमाणे हे शहर मराठा तसंच पेशव्यांची राजधानी होती, त्यामुळे त्यांचे अधिकारी, सरदार व इतर दरबारी यांचे वास्तव्य झालेल्या अनेक इमारती इथे आहेत मात्र शहरीकरणाच्या प्रक्रियेत आपण त्यापैकी ब-याचशा हरवून बसलो आहोत. पेठांच्या (समाजाच्या विविध वर्गातील घरे असलेला भाग) रचनेसोबतच शहराचे नियोजनाचेही जतन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ तांबट अळी म्हणजे तांब्याच्या कारागिरांचे राहण्याचे तसेच कामाचे ठिकाण, त्याचप्रमाणे लोहार अळी लोहारांसाठी व कुंभारवाडा म्हणजे तिथे राहणारे बहुतांश लोक कुंभार होते. त्यानंतर शनिवारवाड्याच्या सर्व बाजूंनी पेठा आहेत, त्यामध्ये राजघराण्याशी असलेल्या जवळीकीनुसार विविध अधिका-यांची घरे होती.

या सर्व भागांमध्ये फेरफटका मारताना तुम्हाला समजेल की शहरीकरणाच्या प्रक्रियेत आपण काय गमावून बसलो आहोत. वारसा हा शब्द केवळ नावापुरताच उरला आहे आपण जुन्या इमारती व त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचेही रक्षण करु शकलो नाही, त्यामुळे संस्कृतीचे रक्षण करणे तर दूरच राहीले. अनेक नामवंत व्यक्तिंचे निवासस्थान असलेल्या व अनेक ऐतिहासिक तसेच सामाजिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या अनेक इमारतीही आहेत. मनपा आधी अशा इमारतींना निळा फलक लावायची व त्यावर त्याठिकाणी कोणाचे वास्तव्य होते याची माहिती लिहीलेली असायची, मात्र ही पद्धत केवळ एक विनोदाचा विषय झाली आहे. इमारतींबाहेर त्यात ज्यांचं वास्तव्य होतं त्या नामवंत व्यक्तिंच्या नावाचा फलक लावून आपली जबाबदारी संपत नाही, आपण त्या इमारतीची देखभाल करु शकत नसू तर किमान तिचा इतिहास फलकावर लिहू शकतो ज्यामुळे त्या इमारतीला भेट देणा-या लोकांना त्याविषयी व तिथे जी व्यक्ती राहात होती तिच्या कामाविषयी माहिती मिळेल. दुर्दैवाची बाब म्हणजे ब-याच ठिकाणी मनपा या फलकांची देखभालही करत नाही, एकदा ते लावले की त्याविषयी विसरुन जाते, त्यामुळे ज्या हेतूने लावण्यात आले आहेत तो एक थट्टेचा विषय होते.

या इमारतींचे जतन करण्यासाठी एक योजना हवी कारण सध्या या इमारतींमध्ये राहणारे अनेकजण त्यांची देखभाल करण्याच्या स्थितीत नाहीत. पुण्यातल्या अशा अनेक जुन्या इमारतींमध्ये मातीचे व लाकडी काम आहे व काळाच्या ओघात बदलत्या ऋतुमानामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत व त्यांची तातडीने देखभाल करणे आवश्यक आहे. त्याशिवाय रस्ते व परिसरांचेही वारसा म्हणून जतन झाले पाहिजे, पूर्वीचे वैभव कायम ठेवण्यासाठी पुनर्विकासाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे.
त्यानंतर शहराच्या आजूबाजूला सिंहगड व पुरंदर यासारखे किल्ले तसेच मस्तानीच्या महालासारख्या इमारतींचे केवळ भग्नावशेष उरले आहेत. पुण्याचा वारसा केवळ पेठा व वाड्यांपुरताच मर्यादित राहू नये तर आपण शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील तशा इतर इमारती शोधून सामान्य जनतेला त्यांची ओळख करुन द्यायला हवी. आपल्याला वारशासंदर्भात पुढील गोष्टींचा विचार करता येईल...

'वारसा पुण्याचा' या मोहिमेचा कार्यक्रम

१. वारसा लाभलेल्या सर्व इमारती शोधून त्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करावे
२. शहरातील नामवंत, विचारवंत, राजकारणी व उद्योजक अशा व्यक्तिंचा समावेश असलेल्या 'हेरिटेज सेल' (वारसा मंच) स्थापन करा. या मंचाला सार्वजनिक संस्थेकडून पुरेशा पायाभूत सुविधा, कर्मचारी व निधी द्या. सर्वाधिक प्राधान्य असलेल्या इमारती कोणत्या ते ठरवा व प्रत्येक इमारत जतन करण्यासाठी सर्वोत्तम उपाययोजना करा. काही इमारती मनपाच्या ताब्यात आहेत तर काही खाजगी मालकांच्या तर काही भाडेकरुंच्या ताब्यात आहेत. या मालमत्ता ताब्यात घेण्यास प्राधान्य दिले जावे ज्यामुळे त्यांचे शक्य तितक्या चांगल्या प्रकारे जतन करता येईल.
. मालमत्ता भाडेकरुंच्या ताब्यात असल्यास त्यांना इडब्ल्यूएस प्रकल्पांतर्गत किंवा उच्च घनता आरक्षणांद्वारे (हाय डेन्सिटी रिझर्व्हेशन्सद्वारे) उपलब्ध असलेल्या जागांमध्ये निवासासाठी पर्यायी जागा देऊ करा. आपल्याकडे शहराच्या सर्व भागांमध्ये अशाप्रकारची निवासव्यवस्था उपलब्ध पाहिजे म्हणजे भाडेकरुंना स्थलांतर करण्यास मदत करता येईल. अशा इमारती मालकांच्याच ताब्यात असल्यास आपण त्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार करु शकतो, म्हणजे ते या इमारतींची देखभाल करु शकतील. आपण यासाठी वेगळ्या निधीचीही शिफारस करु शकतो ज्यामध्ये मनपाचेही योगदान असू शकते. हा निधी उभारण्यासाठी आपण गावठाण भागातील इमारतींवर काही अधिभार (उपकर) लावू शकतो. या इमारती अधिग्रहित करायच्या असल्यास आपण टीडीआर देण्याचाही विचार करु शकतो.
४. त्याशिवाय, वारसा लाभलेल्या इमारतींमध्ये भाडेकरु तसेच मालकांचा समावेश करणे शक्य असल्यास आपण आसपासच्या काही इमारतींना अतिरिक्त एफएसआय देण्याचा विचार करु शकतो.
. आपल्या शहरातील वारसा लाभलेल्या ठिकाणांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच पर्यटकांना मदत व्हावी म्हणून आपण शहराचा वारसा नकाशा तयार करणे आवश्यक आहे. आजकाल अगदी अस्सल पुणेकरांनाही वारसा लाभलेल्या इमारती कोणकोणत्या आहेत याविषयी फारशी माहिती नसते. सध्याच्या या अशा परिस्थितीमुळे वारसा पदभ्रमण सुरु करणे अशक्य आहे. आपण पुणे व उपनगरातील महत्वाच्या इमारतींचे दर्शन घडवणारी वारसा सफर सुरु करु शकतो.
६. शहरामध्ये वारसा संग्रहालय व बाग असणे आवश्यक आहे ज्यामध्ये आपण आपल्या शहरातील जुन्या काळच्या तसंच इतिहासातील वस्तू अतिशय गौरवाने प्रदर्शित करु शकू.
७. आपल्या ताब्यात असलेल्या अशा इमारतींच्या आजूबाजूच्या जाहिरातींचे हक्क विकून आपण 'देखभाल करा व कमवा' अशा स्वरुपाची योजना सुरु करु शकतो. अभियांत्रिकी महाविद्यालयाशेजारील घड्याळ्याच्या मनो-यासारख्या सार्वजनिक इमारतींचाही या योजनेमध्येही समावेश करता येईल.
८. आपल्याला शहराची जीवन-शैली प्रदर्शित करता येईल अशी एक जागा असली पाहिजे.
९. पुरातत्व विज्ञानाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर आपण अशा पुढाकारांमध्ये डेक्कन महाविद्यालयासारख्या संस्थांची मदत घेतली पाहिजे. एखाद्या ठिकाणचे पुरातत्वीय संशोधन जतन करण्यासाठी एक धोरण तयार केले पाहिजे.
१०. विशेषतः वारसा लाभलेल्या इमारतींमध्ये व आजूबाजूला राहणा-या जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मोहिम हाती घेतली पाहिजे.
११. सौंदर्यशास्त्राच्या पातळीवर विचार केला तर आपण शहरात व आसपासच्या भागात नवीन ठिकाणे तयार करण्यासाठी प्रयत्न करु. त्यामधील आणखी एक कल्पना म्हणजे मुळा-मुठा नदीमध्ये लहान तलाव तयार करु शकतो. त्याशिवाय एक कला ग्राम बांधण्याचाही विचार करता येईल. खडकवासला धरणाच्या भग्नावशेषांचेही सौंदर्यीकरण करता येईल.
१२. भविष्यात कोणत्या इमारती या वारसा लाभलेल्या इमारती ठरु शकतील हे शोधणे. कारण आज नवी असलेली इमारत उद्या ऐतिहासिक होणार आहे.
१३.     वारसा लाभलेल्या इमारतींच्या भोवतालच्या इमारतींची उंची मर्यादित ठेवायला हवी. शहरात हा पर्याय कदाचित व्यवहार्य होऊ शकणार नाही मात्र आपण त्याविषयी किमान विचार करायला सुरुवात करु शकतो.
वर सुचवलेल्या उपाययोजनांशिवाय आपण इतरही ब-याच गोष्टी करु शकतो केवळ आपली करायची इच्छा हवी. लक्षात ठेवा कुठलाही समाज आपला वारसा विसरुन जगू शकत नाही. आपला वारसा जतन करणे हे या शहरात राहणा-या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, तर आपण गर्वाने या शहराचे नागरिक आहोत असे म्हणू शकू, आपल्यावर आपल्यानंतरच्या पिढ्यांसाठी  ही जबाबदारी आहे!

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

No comments:

Post a Comment