Tuesday 3 January 2012

वैशिष्ट्यपूर्ण सिंगापूर


 

 

 

 

 

मी जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा सिंगापूरला गतिमान ठेवणे ही माझी मुख्य मोहीम होती आणि मी ते साध्य केले आहे. म्हणूनच सिंगापूरसाठी मी जे केले आहे त्याबाबत मी समाधानी आहे…. गोह चॉक चँग

मी सिंगापूरला एवढ्यात दिलेल्या भेटीत मला हे शब्द आठवले! या वैशिष्ट्यपूर्ण शहराच्या काही पैलूंबद्दल मी आधीही लिहीले आहे. मात्र दर वेळी मी जेव्हा या शहराला भेट देतो तेव्हा शहराने अनेक नव्या गोष्टी आत्मसात केल्याचे दिसून येते आणि त्या गोष्टीचे मला निश्चितच आश्चर्य वाटते! सिंगापूरचा उल्लेख बहुतेक वेळा पर्यटनाच्या बाबतीतच होतो. मौज-मजा, खाणे-पिणे आणि खरेदी यासाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ तर आहेच मात्र त्याचसोबत इथे बरेच काही पाहण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे.
जेव्हा आपण जंगलात वाघ पाहण्याचा उल्लेख करतो तेव्हा आपण विसरतो की जैवविविधतेच्या चक्रात वाघ हा केवळ एक महत्वाचा दुवा आहे! त्याचप्रमाणे सिंगापूर शहराचा खरेदी हा केवळ एक पैलू आहे जो इथले रहिवासी आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. मात्र इतर पैलूंचे संतुलन इतके चांगले आहे की त्यामुळे खरेदीचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येतो!
दर वेळी इथे विविध पातळ्यांवर बदल दिसून येतो मग ती कचरा संकलन व्यवस्था असेल, पार्किंग यंत्रणा असेल किंवा एमआरटी म्हणजे मेट्रो रेल्वे किंवा एसबीएस म्हणजे सिंगापूर बस सेवा. जसेजसे पर्यावरण विज्ञान विकसित होत आहे तशीतशी सिंगापूरच्या शासनकर्त्यांची शहराला अधिक चांगले बनवण्याची इच्छा वाढत आहे आणि शहराच्या प्रत्येक घटकात हे दिसून येते.
मला इथे तुम्हाला काही अनुभव सांगायचे आहेत ज्याविषयी आपण नंतर सविस्तर चर्चा करु.
दृश्य एक: विमानतळावर उतरल्यानंतर सिंगापूरची माहिती देणारी ४ विविध भाषांमधील माहितीपत्रके उपलब्ध आहेत ज्यामध्ये शहरात काय करावे आणि करु नये, प्रेक्षणीय स्थळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दरांसहित माहिती देण्यात आली आहेही सर्व माहितीपत्रके निःशुल्क आहेत! दृश्य दोन: तुम्ही सिंगापूरमध्ये गर्दीच्या वेळी अतिशय रहदारीतून जात आहात आणि तुम्हाला रस्त्यावर एकही वाहतूक हवालदार दिसत नाही तरीही कर्कश्श हॉर्नचा गोंगाट ऐकू येत नाही! दृश्य तीन: कचरा वाहून नेणारा ट्रक तुमच्या वाहना जवळून जातो आणि ट्रक चालकाच्या चेहऱ्यावर हास्य असते, कचऱ्याच्या दुर्गंधीकडे तुमचे लक्षही जात नाही! दृश्य चार: इथे डिसेंबरमध्ये पाऊस पडतो आणि या काळात इथे बहुतेक दररोज दुपारी उशीरा पाऊस पडतो. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा लगेच निचरा होतो आणि तुम्हाला कुठेही पाणी साचलेले दिसत नाही!
दृश्य पाच: एमआरटी स्थानकावर तुम्ही तिकीट यंत्रामध्ये पैसे टाकूनही तिकीट मिळत नाही, तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरील लेखनिकेला हे सांगता आणि ती हसून माफी मागते आणि तुम्ही यंत्रात पैसे टाकले होते का हे देखील न विचारता तुम्हाला दुसरे तिकीट देते! दृश्य सहा: टॅक्सी स्थानकावर तुमचा टॅक्सीसाठी क्रमांक येतो आणि तुम्हाला जिथे जायचे आहे त्या दिशेने टॅक्सी चालक जात नसेल तर तो माफी मागतो आणि कुणाही प्रवाशाला न घेता जातो आणि त्यामागच्या टॅक्सीचालकाला क्रमांक दिला जातो, तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाणारी टॅक्सी मिळेपर्यंत हे सुरु राहते!
विविध सार्वजनिक ठिकाणी अशी अनेक दृश्ये आपण बघतो आणि यातच सिंगापूरच्या यशाचे आणि वेगळेपणाचे गमक आहे! इथल्या विकासात एकसंधपणा आणि सुसूत्रता आहे त्यामुळे शहरातून फिरताना अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की शहर नियोजन करुन एकाचवेळी विकसित करण्यात आले आहे का! इथे काहीही अप्रमाणबद्ध वाटत नाही किंवा पर्यावरणापासून वेगळे वाटत नाही आणि हेच योग्य नियोजनाचे यश आहे जे आपल्या शहरांमध्ये दिसत नाही! नियोजन करणे ही पहिली पायरी आहे आणि केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करणे ही दुसरी पायरी आहे! इतर कुठल्याही विकसनशील महानगराप्रमाणे त्यांच्याही लोकसंख्या, वाहने, कचरा, सिमेंटच्या जंगलांमुळे हरितपट्ट्यासाठी फारशी जागा नसणे अशा समस्या आहेत. मात्र त्यांनी या सर्वाचा समतोल साधला आहे आणि त्यासाठी धोरणे बनवली आहेत आणि त्यांचा अवलंब केला आहे!
त्यांनी सर्व सार्वजनिक ठिकाणी चार प्रकारच्या कचरा पेटया ठेवून कचऱ्याचे वर्गीकरण करायला सुरुवात केली आहे आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने हे करत आहेत! मला त्यावेळी आपल्याकडच्या ओसंडून वाहणाऱ्या कचरा पेट्यांची आठवण आल्याशिवाय राहावलं नाही, यामध्ये सर्व प्रकारचा कचरा एकत्रित स्वरुपात कोंबला जातो त्यामुळे त्याचे वर्गीकरण करणे हे सार्वजनिक संस्थांसाठी डोकेदुखी होते.
इथे प्रत्येक बाबतीत नावीन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अगदी कचरा गोळा करतानाही त्याचा विचार करण्यात आला आहे. आपल्याकडे कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकची दुर्गंधी सुटलेली असते, या ट्रकच्या चालकाचे आणि त्यावर काम करणाऱ्या कामगारांचे चेहरे नेहमी दुर्मुखलेले असतात ते कधीही हसरे नसतात. याचे कारण म्हणजे ते काम करतात ती परिस्थिती. मात्र इथे उलट चित्र आहे, कचरा व्यवस्थित झाकून नेला जातो त्यामुळे त्याची दुर्गंधी येत नाही त्यामुळे तो वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाच्या चेहऱ्यावर हसू दिसते!
मेट्रो रेल्वे, बस सेवा यांचे मिश्रण असलेली उत्तम सार्वजनिक वाहतूक यंत्रणा असूनही सिंगापूरमध्ये खाजगी वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
तरीही तुम्हाला रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस दिसणार नाही, रस्त्यावर आणि चौकात कॅमेऱ्याद्वारे गस्त घातली जाते. इथे भरभक्कम दंड आकारला जातो! प्रत्येक नव्या व्यावसायिक इमारतीमध्ये पार्किंगसाठी जागा बनवण्यात आली आहे आणि इमारतीला लागून असलेल्या पार्किंगची माहिती विद्युत फलकांवर प्रत्येक चौकात दाखवली जाते, त्यामुळे प्रवाशांना सहजपणे पार्किंगसाठी जागा सापडते, त्यांना रस्त्यावर वाट पाहत बसावे लागत नाही आणि वाहतुकीची कोंडी होत नाही!
शहरातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अधिकाधिक चांगली बनवणे हे शहराचे उद्दिष्ट असल्यासारखे वाटते आणि त्या जोशात ते अनेक नाविन्यपूर्ण बदल करत आहेत! सिंगापूरमधील बस स्थानक हा एक अभ्यासाचा विषय आहे, प्रत्येक वेळी ते प्रवाशांच्या सोयीसाठी त्यामध्ये ते सतत बदल करत असतात.
 बसचे सर्व मार्ग, स्थानक, बसची वेळ आणि प्रत्येक स्थानकासाठीचे दर बस स्थानकावर लावलेले असतात. या स्थानकांवरील काटेकोर स्वच्छता, बसण्याची व्यवस्था तसेच जाहिरात फलक वगैरे वापरुन केलेल्या जाहिराती हे घटकही विसरता येणार नाहीत! मेट्रो रेल्वे यंत्रणेमध्ये मार्गाचे सूचना फलक अशा प्रकारे लावलेले असतात की शहरात एखाद्या नवख्या व्यक्तिलाही फारशी मदत न घेता सहज इच्छित ठिकाण सापडेल. प्रत्येक डब्यात स्थानकांची नावे दर्शवली जातात तसेच प्रत्येक स्थानकावर कुठल्या दिशेने दरवाजा उघडेल हे देखील दर्शवले जाते त्यामुळे प्रवाशांना रेल्वेतून उतरणे सोपे जाते. वृद्ध, गरोदर महिला आणि अपंग लोकांसाठी प्रत्येक डब्यात वेगळ्या जागा असतात आणि त्यांना सहजपणे वापरता याव्यात यासाठी दरवाजाजवळ बसवलेल्या असतात.
प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशापाशी आणि फलाटावर देखरेख करणारे कॅमेरे बसवलेले असतात आणि त्यावर चोवीस तास नजर ठेवली जाते.

त्याचवेळी इथल्या लोकांच्या नागरी जाणीवेचाही आदर करायला हवा, जेव्हा वाहनांसाठी लाल सिग्नल असतो आणि पादचाऱ्यांसाठी हिरवा असतो तेव्हा एकही वाहन एक इंचही हालत नाही किंवा झेब्रा क्रॉसिंगवर जात नाही! आपल्या देशात एखाद्या सिग्नलला पोलीस नसेल तर काय होईल याचा विचार करुन पाहा मग तुम्हाला नागरी जाणीवेचे महत्व लक्षात येईल!
शहरीकरणामुळे कमी होणारी हिरवळ जैवविविधतेला असलेला सर्वात मोठा धोका आहे, इथे वन्य जीव तसेच जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याला खरोखरच सलाम केला पाहिजे! ज्यूराँग पक्षी उद्यानासारख्या केंद्रांवर त्यांनी या संकल्पनेला व्यावसायिकता आणि मनोरंजन यांची जोड दिली आहे, त्यामुळे पर्यटकांना हसत खेळत शिकताना या दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण केले नाही तर त्या नष्ट होतील हा संदेशही मिळतो! ही संकल्पना आपण सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वीकारली पाहिजे, आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात ती राबवली जाते मात्र ज्यूराँग पक्षी उद्यानामध्ये विविध कार्यक्रम केले जातात ज्यामध्ये पर्यटक आणि पक्ष्यांना एकत्र येण्याची संधी मिळते, त्यामुळे जागरुकता वाढते! अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सामान्य माणसांना प्राणी आणि पक्षांच्या दुर्मिळ जाती पाहायला मिळतील आणि या जाती नष्ट झाल्या तर ते कशास मुकतील याची जाणीवही होईल!
मी आणखी काही छायाचित्रे दाखवेन. दोन्ही बाजूला एका रेषेत मोठमोठी झाडे लावलेली आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर फुलांचे ताटवे आहेत त्यामुळे मुख्य रस्ता आणि पादचारी पथ तसेच सायकलींचा मार्ग यांचे विभाजन होते.
 शहरात सगळीकडे हे दृश्य दिसते अगदी पूलही बोगनवेलींसारख्या वेलींनी सुशोभित करण्यात आले आहेत. सायकलस्वारांसाठी वेगळे मार्ग आहेत त्यावर तुम्ही कुठल्याही अडथळ्याविना सायकल चालवू शकता!

आजकाल इथे गच्चीवर शेती केली जाते. बहुतेक बहुमजली इमारतींची गच्ची शेती आणि एअर कंडिशनिंग प्रकल्पांसाठी वापरली जाते आणि त्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरतात. या तोडग्यामुळे कमीत कमी जागेत शहरातील लोकसंख्येची भाजीपाल्याची गरज पूर्ण व्हायला मदत होत आहे.
सरकारने केवळ पायाभूत सुविधांचाच विचार केलेला नाही तर संपत्तीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणेही आखली आहेत. गरजू लोकांना परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करुन देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे आणि यासाठी त्यांच्याकडे गृहनिर्माण विकास मंडळ आहे जे शहरातील जवळपास ६०% घरे बांधते आणि रहिवाशांना शक्य तेवढ्या कमी किमतीत उपलब्ध करुन देते.
इथला अनुभव घेतल्यानंतर आपल्याला समजते की हे शहर प्रत्येकाचे एवढे प्रिय ठिकाण का आहे आणि इथल्या वास्तव्यातील प्रत्येक दिवसागणिक तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता. मात्र तुम्ही विसरता कामा नये की हे एका दिवसात मिळवलेले नाही, अनेक वर्षांपासून परिश्रमपूर्वक केलेले नियोजन आणि त्या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी केलेले प्रयत्न यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळेच तिथून काही स्मृतीचिन्हे आणि वस्तू खरेदी करुन ते शहर आणि त्याच्या निर्मात्यांविषयी खऱ्या अर्थाने आदर दाखवल्यासारखे होणार नाही. आपल्याला खरोखरच आदर दाखवायचा असेल तर सिंगापूरच्या प्रत्येक नागरिकाचा त्याच्या शहराबद्दल असलेला दृष्टीकोन अंगी बाणवला पाहिजे आणि आपल्या शहरात त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपली त्या महान शहराची भेट सफल झाली असे खरोखरच म्हणता येईल!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157627904681345/


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा



No comments:

Post a Comment