Monday 14 January 2013

चांगला बिल्डर !





 
 
 

खरोखर वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिक नव्हते तो आनंदी काळ होता... सेनेका

मी वरील अवतरण अनेकदा वापरलं आहे, ते खरंच किती समर्पक आहे व ज्याप्रकारे त्या विद्वान माणसाने ते केले आहे त्याचे मला नेहमी आश्चर्य वाटते! अर्थात तेव्हा बांधकाम व्यावसायिक हा शब्द आजच्या इतका प्रचलित नसला तरी त्या जमातीविषयीची सर्वसाधारण भावना आजच्यासारखीच होती! इथे माझे बरेच सहकारी दुखावले जातील, मात्र हे माझे नाही तर सेनेका सारख्या  प्रसिद्ध व्यक्तीचे विधान आहे! माझे मित्र रवी करंदीकर अलिकडेच माझ्याशी चर्चा करत होते, ते स्वतःपण रिअल इस्टेट उद्योगाचे सन्माननीय समीक्षक टिकाकार आहेत. त्यांनी मला सहजपणे प्रश्न विचारला की एक चांगला बांधकाम व्यावसायिक कसा ओळखायचा? क्षणभर मी जरा बुचकळ्यात पडलो कारण चांगला बांधकाम व्यावसायिक तुमच्यासमोर उभा आहे असं म्हणणं जरा आगाऊपणाचं ठरलं असतं! विनोदाचा भाग सोडला, तर मी उत्तर दिलं, की एक चांगला बांधकाम व्यावसायिक सर्वप्रथम एक चांगली व्यक्ती असला पाहिजे! हे उत्तर गृहित धरलेलं असलं तरीही, मला स्वतःला जाणीव झाली की हा तर्क तर प्रत्येक व्यवसायाला लागू होतो, त्यामुळे मूळ प्रश्न तसाच राहतो; चांगल्या बांधकाम व्यावसायिकाची वैशिष्ट्ये काय? येथे  मला आठवतंय एकदा माझ्या शाळकरी मुलानं मला एक विनोद सांगीतला "दोन सरदार बुद्धिबळ खेळत होते!" मी म्हणालो यात काय विनोद आहे? त्याने उत्तर दिले, तोच तर खरा विनोद आहे! इथे मला कोणत्याही संप्रदायाला दुखवायचं नाही, वा त्यांची थट्टा करायची नाही मात्र याच प्रकारे ब-याच लोकांना चांगला बांधकाम व्यावसायिक शोधणं हा प्रश्नच एक विनोद वाटतो! कारण  ब-याच जणांसाठी चांगला बांधकाम व्यावसायिक अशी संकल्पनाच अस्तित्वात नाही!

माझ्या उद्योगासाठी ही दुर्दैवी बाब आहे, आपण कितीही नकार दिला तरी सामान्य माणसाचं रिअल इस्टेट विषयीचं मत कधीच चांगलं नव्हतं व चांगलं नाही, ही बाब बांधकाम व्यावसायिकही मान्य करतील. ही भावना केवळ गेल्या काही वर्षातली किंवा केवळ आपल्या देशापुरती मर्यादित नाही तर ही बांधकाम व्यावसायिकांचं नाव घेताच निर्माण होणारी सार्वत्रिक भावना आहे. तुम्ही अमेरिका किंवा कोणताही विकसित देश घ्या तिथेही बांधकाम व्यावसायिक सर्वात प्रामाणिक असल्याचं मानलं जात नाही. आपल्या सर्व चित्रपटांमधूनही बांधकाम व्यावसायिकांचं वाईट माणूस असंच चित्र रेखाटलं जातं, जो नेहमी कायद्याविरुद्ध वागतो! मग अशा वेळी चांगला बांधकाम व्यावसायिक कसा ओळखायचा? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या व्यवसायाची आजच्यासारखी प्रतिमा का निर्माण झाली हे आपण समजून घेण्याची गरज आहे. चांगली व्यक्ती शोधण्यासाठी आधी वाईट गुण कोणते आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. आर्य चाणक्य, या इतिहासातील अतिशय महान प्रशासकाने, "कौटिल्य अर्थ शास्त्र " हा ग्रंथ लिहीला, ज्यामध्ये त्याने सोनारापासून ते घोड्यांच्या व्यापा-यांपर्यंत अनेक व्यावसायिक कसे ओळखायचे हे सांगीतले आहे. त्याने सांगीतलेले निकष आजही लागू होतात एवढे त्याचं व्यक्तिंचं व त्यांच्या व्यवसायाविषयीच्या दृष्टीकोनाबाबत विश्लेषण अचूक होतं. दुर्दैवानं त्याच्या काळी बांधकाम व्यावसायिक नावाची जमात नव्हती, असती तर रवीच्या प्रश्नाचं उत्तर मला सहजपणे देता आलं असतं, कारण उत्तरादाखल मी त्याला केवळ त्या ग्रंथाची एक प्रत दिली असती!

वेळोवेळी बांधकाम व्यावसायिकांच्या समुदायावर आरोप केला जातो की ते पैशांच्या मागे लागलेले असतात पण मग आजच्या जगात कोण पैशांच्या मागे लागत नाही? बांधकाम व्यवसायिक गर्विष्ठ असतात व ग्राहकांच्या समाधानाची त्यांना अजिबात चिंता नसते अशी आणखी एक तक्रार असते. पण आपल्या देशात बांधकाम व्यावसायिकच कशाला अनेक कंपन्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा देत नाहीत? तुम्हाला आठवतंय पूर्वी जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, अतिरिक्त पैसे देऊन कशा प्रकारच्या स्कूटर किंवा चार चाकी वाहने मिळायची? कंपन्यांना उत्पादनाचे संशोधन व विकास व ग्राहकाच्या उत्पादनाकडून असलेल्या मागण्या यांची कधीच चिंता नसायची; या कंपन्यांना विदेशी ब्रँड्सकडून जोरदार स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यानंतर हे चित्र बदललं! जेव्हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा आपल्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांची उत्पादनं सुधारण्यास सुरुवात केली, ग्राहक सेवेविषयीचा त्यांचा दृष्टीकोन कसा आहे हे सर्वांना माहिती आहेच, त्यामुळे अशा प्रकारच्या दृष्टीकोनासाठी केवळ बांधकाम व्यावसायिकांनाच का दोष द्यायचा? आणखी एक आरोप म्हणजे ते ग्राहकांसाठी सहजपणे उपलब्ध होत नाहीत; अर्थात आपल्या देशातील एक टाटा सोडले तर कोणतेही उद्योजक किंवा व्यावसायिक यासाठी प्रसिद्ध नव्हते, त्यामुळेच प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसे टाटा या बाबतीतले अपवाद म्हणावे लागतील!  त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांची, नेते व समाजातील गुंडांशी हातमिळवणी असते असा आरोप होतो; इथेही ब-याच उद्योगांचे सत्ताधा-यांशी संबंध असतात व ते त्याचा वापर करुन त्यांना अनुकूल धोरणे बनवून घेतात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. ज्या देशात सर्वोच्च राजकीय नेते त्यांच्या देशापेक्षा वैयक्तिक हिताला महत्व देतात तिथे हे नवीन नाही! यासाठी केवळ बांधकाम व्यावसायिकांनाच का दोषी मानायचे?  अजून एक आरोप म्हणजे आपल्या देशात घरासारख्या अतिशय संवेदनशील उत्पादना संदर्भात, बांधकाम व्यावसायिक आश्वासन पाळत नाहीत, आणि हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्यामुळेच विकासकांची प्रतिमा डागाळली आहे. तुम्ही ग्राहकाच्या त्याच्या बांधकाम व्यावसायिकाविरुद्धच्या एकूणच तक्रारी पाहिल्या तर त्यातल्या ९०% या दिलेले आश्वासन पूर्ण न करण्यासंदर्भातल्याच असतील. या वर्गवारीमध्ये ताबा देण्याच्या तारखेची आश्वासने न पाळणं, विशिष्ट बाबी, सुविधा पुरवण्या संदर्भातली आश्वासनं पूर्ण न करणं, परवानगी देणा-या अधिका-यांसमोर मान्य केलेल्या अटी व नियमांचे पालन न करणं इत्यादी व ही यादी वाढतच जाते. तक्रारीचे स्वरुप काहीही असेल मात्र तिचा गाभा एकच असतो की आश्वासनांचं पालन न करणं व विकासकाला त्याचं अपयश नजरेल आणून दिल्यानंतर तो त्याविषयी दिलगिरीही व्यक्त करत नाही!

तर मग दिलेल्या आश्वासनांचं पालन करणा-या बांधकाम व्यावसायिकाला चांगला  म्हणायचं का? खरं सांगायचं तर चांगला म्हणजे नेमकं काय याचं एकच वैशिष्ट्य सांगता येणार नाही, चांगला म्हणजे अनेक वैशिष्ट्यांचं मिश्रण, मात्र माझ्या मते त्याचा मुख्य निकष म्हणजे त्याची बांधीलकी! याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या व्यवसायाचे इतर पैलू म्हणजे त्याचे गुंतवणूकदार, त्याचा ग्राहकांविषयीचा दृष्टीकोन हे महत्वाचे नाहीत असं नाही, मात्र जर एखादी व्यक्ती विशिष्ट उद्दिष्टास बांधील असेल तर तो चुकीच्या गोष्टी करण्याची शक्यता कमी असते. ब-याच दिवसांपूर्वी माझ्या एका सिनीयर मित्राने मला गंमतशीर प्रश्न विचारला होता, "एका गावाला शाळेची गरज आहे, त्यासाठी ते देणग्या मागत आहेत, मूळचा त्या गावातला असलेला एक गुंड महानगरात खंडणी मागणं, तस्करी असे उद्योग करतो. तो शाळेच्या इमारतीसाठी मोठी देणगी द्यायचा निर्णय घेतो, गावक-यांनी ती स्वीकारावी का?"  इथे प्रश्नाचं उत्तर अतिशय अवघड होतं, या ठिकाणी काय अधिक महत्वाचं होतं हेतू का तो ज्याद्वारे पूर्ण होत आहे तो स्रोत? मला असं वाटतं जेव्हा बांधीलकीला महत्व दिलं जातं तेव्हा बांधकाम व्यावसायिकाची कंपनी, त्याचा ग्राहक सेवा व उत्पादनातील सुधारणा याविषयीचा दृष्टीकोन या बाबी प्रकाशझोतात येतात. बांधकाम व्यावसायिक वेळेत चांगल्या दर्जाची घरे देत आहे, मात्र त्याला गुन्हेगारी जगताकडून किंवा भ्रष्ट लोकांकडून अर्थपुरवठा होत असेल तर काय? अनेक जण म्हणतील ग्राहकांना त्याची चिंता करायची काय गरज आहे; त्याला जे आश्वासन देण्यात आले आहे ते त्याला मिळत आहे? इथे मी म्हणेन की तो ज्या चार भिंतींना घर म्हणतो त्या इतर कुणाच्या रक्तावर व घामावर उभारल्या आहेत हे माहिती असूनही त्यात झोपायचं आहे का याचा अंतिम निर्णय ग्राहकालाच घ्यायचा आहे!

आणखी एक बाब म्हणजे माझे बहुतेक ग्राहक बांधकाम व्यावसायिकाचा समूह, वा व्यक्ती म्हणून सामाजिक योगदान, तसंच त्याचा जीवनाविषयक दृष्टीकोन अशा वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतात. पैसे कमावणे हा कोणत्याही व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे, आणि असावा मात्र तो कशाप्रकारे खर्च केला जातो हे देखील तेवढेच महत्वाचे आहे, कारण त्यातूनच समूह किंवा व्यक्तीचे चारित्र्य दिसते. कोणतीही वाईट व्यक्ती समाजातील गरजू लोकांचा विचार करणार नाही, त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करणार नाही किंवा पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षण, गरीब वर्ग  किंवा कोणत्याही सुदृढ समाजाचा कणा असलेल्या संस्कृतीचे जतन यासारख्या हेतूसाठी खर्च करणार नाही. यामागचा साधा तर्क असा आहे की तुम्ही इतरांचा विचार करु शकत असाल तर तुम्ही ज्यांना आश्वासन दिले आहे त्यांची नक्की काळजी घ्याल. त्यामुळे चांगला बांधकाम व्यावसायिक शोधताना तो किंवा त्याचा समूह समाजासाठी काय करत आहेत हे मी पाहीन.

बांधकाम व्यावसायिकाची जातकुळी तपासणंही तितकंच महत्वाचं आहे, कारण तुमचा भूतकाळ हा तुमच्या वर्तमानकाळाचा आरसा असतो असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे.  एखाद्याचं मूल्यांकन केवळ माध्यमांमधील बातम्या, मोठ्या जाहिराती किंवा एखादा प्रसिद्ध ब्रँड प्रतिनिधी याद्वारे करण्याऐवजी; मी केवळ त्या बांधकाम व्यावसायिकानं याआधी बांधलेल्या प्रकल्पांमधील त्याच्या सध्याच्या ग्राहकांना जाऊन भेटेन व त्यांचे सदनिका आरक्षित करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतचे अनुभव कसे होते हे जाणून घेईन, त्यातून दिसून येणारं सत्य हे आरशासारखं लख्ख असेल! प्रकल्पाचं नियोजन, बांधणी व विक्रीनंतरची सेवा याद्वारे रहिवाशांचं जीवन अधिक आरामदायक होण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले आहेत हे पाहा! कंपनी नवीन असल्यास, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांना भेट द्या व त्यांच्या कर्मचा-यांशी बोला व ते कशाप्रकारे संवाद साधत आहेत त्यावरुन जोखा म्हणजे तुमच्या प्रश्नांची ते किती झटपट उत्तरे देत आहेत तसंच त्यामधील पारदर्शकता इत्यादी. हे कर्मचारी, बांधकाम व्यावसायिक किंवा संस्थेचा चेहरा असतात, त्यांचे वरिष्ठ त्यांना जशी वागणूक देतात ते तसेच वागतील व त्याद्वारे तुम्हाला मुख्य व्यक्तिविषयी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल.

त्यामुळे एक असा चांगला बांधकाम व्यावसायित शोधण्यास सुरुवात करा व तुम्हाला बरेच चांगले बांधकाम व्यावसायिक सापडतील हे मला तुम्हाला सांगायचंय. त्यापूर्वी सर्वात शेवटची व महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की चांगला बांधकाम व्यावसायिक शोधण्यासाठी तुम्ही एक चांगला ग्राहक असणं आवश्यक आहे! कारण तुम्ही चांगले असाल तरच तुम्हाला चांगुलपणा ओळखता येईल व एक चांगला बांधकाम व्यावसायिक शोधण्याच्या आपल्या प्रवासात आपण याची स्वतःला आठवण करुन देणं आवश्यक आहे


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा



No comments:

Post a Comment