Tuesday, 30 July 2013

रस्त्यांची दुर्दशा आणि शहर

सर्व महान रस्त्यांवरचा प्रवास हा दु:खद आठवणींनी बनलेला असतो .” ...मी नेफ्ट्झगर 


या महान अमेरिकी लेखक व संशोधकाचे अवतरण वाचून, आपल्या प्रिय शहरातले सगळे रस्ते महान आहेत असेच मला वाटले! जवळपास चार ते पाच वर्षांनी शहराला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे व याचा सर्वप्रथम फटका बसला तो शहरातील रस्त्यांना. नेहमीप्रमाणे सर्व वृत्तपत्रांमध्ये रस्त्यांच्या परिस्थितीविषयी अनेक बातम्या येत आहेत व त्यामध्ये तज्ञांची मते दिली जात आहेत; प्रत्येक राजकीय पक्ष विविध प्रकारांनी निषेध व्यक्त करुन त्यांना रस्त्यांच्या स्थितीविषयी किती चीड आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी स्थानिक रेडिओ स्टेशनही सर्वात वाईट खड्डा स्पर्धा घेत आहेत! जणु काही संपूर्ण शहराला सध्या एकच समस्या भेडसावतेय ती म्हणजे रस्त्यांची परिस्थिती व त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास! आपलं एक चांगलं आहे , मौसम बदलला की आपल्या समस्या पण बदलतात आणि मागच आपण विसरून जातो !  रस्त्यांची दुर्दशा ही एक गंभीर समस्या आहे यात वादच नाही कारण त्यामुळे केवळ अपघातच होत नाहीत, तर रहदारी अडल्यामुळे वाहतूक मंदावते व प्रचंड वेळ वाया जातो. त्याशिवाय अशा रस्त्यांवरुन प्रवास करताना प्रवाशांवर येणारा मानसिक ताणही आपण लक्षात घेतला पाहिजे. रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे विविध प्रकारे नुकसान होते, सर्वप्रथम त्यामुळे वाहनाचे म्हणजेच संपत्तीचे नुकसान होते. दुसरे म्हणजे अपघात किंवा शारीरिक इजेमुळे होणारा वैद्यकीय खर्च व वेळेचा अपव्यय यामुळे माणसाचे नुकसान होते. तिसरे म्हणजे रस्त्यांवरुन जाणा-या प्रवाशांचा ताण वाढतो कारण धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचायचे असते. अशावेळी रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, लोक वैतागतात, सतत हॉर्न वाजवतात, चुकीच्या प्रकारे  दुस-या वाहनाच्या पुढे जाण्याच्या नादात रस्त्यावर भांडणे होतात, वाढत्या तणावाची ही काही लक्षणे आहेत. चौथे नुकसान म्हणजे खराब रस्ते दुरुस्त करण्यासाठी लागणारा पैसा, जो प्रत्यक्षात सार्वजनिक पैसा आहे.
एका वृत्तसंस्थेच्या मते पुण्यातल्या रस्त्यांची लांबी जवळपास ६०० किमी आहे, यामध्ये बहुतेक केवळ मुख्य रस्त्यांचा समावेश आहे, लहान व जोडरस्त्यांचा नाही. आश्चर्याची बाब म्हणजे जंगली महाराज रस्त्यासारखे काही अपवादात्मक  रस्ते वगळता इतर सर्व रस्त्यांची स्थिती खराब आहे. केवळ मनपाच्या हद्दीतीलच नाही तर आता एकप्रकारे उपनगरे झालेल्या आजूबाजूच्या गावातील रस्त्यांची स्थितीही वाईट आहे. शहराला लागून असलेले विविध महामार्ग व त्यांच्या उपरस्त्यांचीही (बायपास) स्थिती वाईट आहे. याबाबतीत विविध सरकारी संस्थांमधल्या समन्वयाचे मला कौतुक वाटते. इथे माध्यमांना किंवा सामान्य माणसाला कोणतीही तुलनाच करताच येणार नाही कारण पावसामुळे एकाचवेळी सगळ्या रस्त्यांची परिस्थिती सारखीच वाईट झाली आहे असते, किमान यातील सातत्य लक्षणीय आहे! पुण्याला जोडणारा कोणताही रस्ता पाहा किंवा महामार्गाला लागून असलेले रस्ते किंवा पीएमसीच्या हद्दीतील ग्रामीण भागातील रस्ते पाहा, प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत व हे रस्ते वापरण्यासारखे नाहीत.
रस्त्यांच्या अशा परिस्थितीसाठी विविध अधिका-यांनी दिलेली उत्तरे काही वेळा अक्षरशः विनोदी तर काही वेळा दयनीय असतात उदाहरणार्थ, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सांडपाण्याच्या पुरेशा वाहिन्या नाहीत, किंवा आम्ही सामान्यपणे रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मे ते जून महिन्याच्या   मध्यावर हाती घेतो मात्र यंदा पाऊस लवकर आला”! दरवर्षी आपल्याला पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त करायची गरज का पडते हा प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून मला नेहमी भेडसावतो? त्यामुळे या समस्येचा सखोल अभ्यास करुन, एकदाच कायमस्वरुपी कृती करण्याची वेळ आली आहे, कारण प्रत्येक वेळेस  जोरदार पाऊस पडल्यावर रस्त्यांवर भीषण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे इमानदारपणे कर   देणा-या नागरिकांना कधीपर्यंत आणि का या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे असा प्रश्न आहे?
म्हणूनच रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ज्या सरकारी संस्थांवर आहे त्यांच्या सध्याची स्थितीचे विश्लेषण करु. पीएमसी, पीसीएमसी व जिल्हाधिकारी कार्यालय या प्रशासकीय संस्था सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे रस्ते बांधणी व दुरुस्तीचे काम करुन घेतात तर शहरालगतच्या महामार्गांची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करते. आता पीएमसीच्या हद्दीतील म्हणजे पुणे शहरातील रस्ते पाहू. इथे जेएनएनयूआरएमही आहे ज्याअंतर्गत सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, बाणेर रस्ता व नगर रस्त्यांसारखे  मुख्य रस्ते तयार केले जात आहेत त्याशिवाय रस्ते विभागही आहे जो इतर सर्व रस्त्यांसाठी जबाबदार आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या भाषेत रस्ता ही पायाभूत रचना आहे व शहराच्या सपाट पृष्ठभागावर रस्ते बांधण्यासाठी अभियांत्रिकीचे फार मोठे ज्ञान किंवा कौशल्य आवश्यक नाही. मग हे रस्ते कसे खराब होतात असे आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यावर वाटते? किमान दहा वर्षे चांगल्या स्थितीत राहील असा रस्ता बांधणे खरोखरच इतके अवघड काम आहे का? तर  कोणताही अभियंता याचे उत्तर नाहीअसेच  देईल, कारण त्यासाठी आपल्याला फक्त  थोडे मूलभूत नियोजन व उघड्या डोळ्यांनी व मनाने व्यवस्थितपणे देखरेख करण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ताचे प्रमाणभूत विभाजन (बेसिक ड्राइंग) आवश्यक आहे व ते प्रत्येक रस्ते विभागाकडे असायला हवे व त्यानुसारच कामे झाली पाहिजेत. आपण पाहिले आहे की आपले बहुतेक रस्ते डांबरी आहेत व पाणी हा डांबराचा शत्रू आहे. म्हणूनच रस्त्याची आखणी करताना आपण पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थित सोय केली तर रस्ते खराब होण्याच्या बहुतेक समस्या कमी होतील, कारण ती एक अगदी प्राथमिक व अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी दरवेळी आपल्याला वादळी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधल्या जाणा-या जमीनीखालील सांडपाण्याच्या महागड्या वाहिन्यांची गरज नाही. त्यासाठी केवळ रस्ता कुठून कुठे जाणार आहे याचा अभ्यास करुन थोडेसे योग्य नियोजन करायची गरज आहे. पुण्याच्या भोवताली डोंगर आहेत व शहरातून दोन नद्या वाहतात, त्यामुळे बहुतेक उतार या दोन्ही नद्यांच्या दिशेने आहेत. आपल्याकडे या नद्यांच्या दिशेने वाहणारे शेकडो ओढे व नाले आहेत. आपण रस्त्याच्या मध्यभागी व्यवस्थित उतार तयार केले जातील याकडे लक्ष द्यायला हवे म्हणजे पाणी कडेला वाहत जाईल व तिथून ते पहिल्या नाल्यात किंवा ओढ्यात जाईल व तिथून पुढे जाईल. हे कदाचित सर्व ठिकाणी शक्य होणार नाही मात्र बहुतेक ठिकाणी रस्त्यावरील चढउतारांचा व्यवस्थित अभ्यास केल्यास हे शक्य आहे व हे रस्त्यांचे काम सुरु करण्यापूर्वीच केले पाहिजे. याशिवाय सध्या जेथे पाणी तुंबते तेथील 

चित्रफीत चित्रण करून ठेवले तर वर्षभरात या चित्रफितींचा अभ्यास करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय करता येइल.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रस्त्याच्या पृष्ठभागाखालील थर (सब ग्रेड) तयार करणे, जी मूलभूत बाब आहे. बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की रस्त्याचा पाया व्यवस्थित नसल्याने, त्यावर वाहनांचा भार पडतो तेव्हा ते खराब होतात त्यामुळे या भारामुळे रस्त्याच्या पृष्ठभागाखालील थर आणखी खचतो. अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचते व शेवटी खड्डे पडतात. इथे मला खरोखर प्रश्न पडतो की आपले लोकप्रतिनिधी रस्ते खराब झाल्यानंतर निदर्शने करतात, मात्र रस्त्यांचे काम प्रत्यक्ष सुरु असताना ते देखरेख का करु शकत नाहीत? यामध्ये अभियंते किंवा कंत्राटदाराची चूक आहे हे मान्य आहे, मात्र आपल्या प्रभागात रस्त्याचे काम सुरु असताना त्याची व्यवस्थित देखरेख होत आहे का व त्याचे प्रमाणीकरण झाले आहे का हे पाहण्याची जबाबदारी प्रभागाच्या प्रतिनिधीची नाही का? त्या भागात राहणा-या लोकांचीही तितकीच चूक आहे, त्यांनी संबंधित अधिका-यांना जाब विचारला पाहिजे, मात्र आपल्याला नेहमी आग लागल्यावरच जाग येते हेच सत्य आहे.
त्यानंतर वीजेच्या तारा, टेलिफोनच्या तारा, गॅस वाहिन्या, जलवाहिन्या अशा अंसंख्य कारणांसाठी रस्ते खणले जातात. एकमेकांना जोडणारे रस्ते बांधताना या पायाभूत सुविधांकडे आपण दुर्लक्ष करतो व भविष्यात अशा सेवांसाठी खड्डे किंवा जागा ठेवत नाही. कोणताही रस्ता खणण्यासाठी पीएमसी भरपूर म्हणजे ४००० रुपये/मीटर पैसे आकारते जे कोणत्याही रस्तेबांधणी शुल्कापेक्षा अधिक आहे. यातील समस्या अशी आहे की रस्ते खणले जातात, पैसे दिले जातात मात्र ज्यासाठी पैसे देण्यात आले आहेत ते कारण तसेच राहते. माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार ९९% खणलेल्या भागाची दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही व रस्ते खराब होण्याचे हेच मुख्य कारण आहे. दुरुस्त केलेल्या भागाचे बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे किंवा पृष्ठभाग व्यवस्थित सपाट नसल्याने तो पुन्हा खचतो, व या भागातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही व या ठिकाणांहूनच कर्करोगाप्रमाणे रस्त्याची हानी सुरु होते. सर्वप्रथम असा रस्ता तयार करा जो खणावा लागणार नाही व खणावा लागलाच तर तो पुन्हा दुरुस्त करण्यासाठी एक प्रमाणभूत प्रक्रिया अवलंबली जाईल व तिचे काटेकोरपणे पालन केले जाईल हे पाहणे आवश्यक आहे. गतिरोधकासारख्या बाबींमुळे सुद्धा पावसाच्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा येतो व ते एखाद्या ठिकाणी साचून राहते, त्यामुळे पुन्हा रस्त्याच्या पृष्ठभागाची हानी होते. रस्त्याच्या खणलेल्या भागाच्या दुरुस्तीचे प्रमाणीकरण करताना संबंधित अधिका-याने कामाच्या दर्जाविषयी या परिसरातील रहिवाशांची मतेही विचारात घेणे आवश्यक आहे, कारण शेवटी त्यांच्या भागातील रस्त्यांचे ते सर्वोत्तम परीक्षण करु शकतात!
ही अतिशय दुखःद गोष्ट आहे की एकीकडे आपण ज्ञान, उद्योग, शिक्षण इत्यादी बाबतीत पुण्याची जगातील आघाडीच्या शहरांशी तुलना करत आहोत व दुसरीकडे आपण शहरामध्ये रस्त्यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा देऊ शकत नाही. माझ्या मते इथे थोडीशी सामान्य माणसाचीही चूक आहे, आपण एखादी वस्तू खरेदी केल्यास योग्य सेवा मिळाली नाही तर लगेच सेवा देणा-यावर टीका करतो. त्या बाबतीत पुणेकर अगदी जागरुक ग्राहक आहेत, मग चांगल्या रस्त्यांसाठी एकजूट होऊन संबंधित अधिका-यांकडे आपला हक्क का मागत नाहीत. आपण करदाते आहोत त्यामुळे आपण ग्राहक पंचायत किंवा ग्राहक न्यायालयासारख्या लवादांकडे दाद मागू शकतो. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवांचे ग्राहक आहोत व ते आपल्याला व्यवस्थित सेवा देत नसतील तर आपण तसे करु शकतो! इथेही आपण समस्या चिघळेपर्यंत शांत राहतो व त्यामुळे आपल्याला त्रास होतो व वेळ हातातून निघून गेलेली असते.
यामध्ये माध्यमांची भूमिकाही प्रतिक्रियात्मक असते; त्यांनी केवळ पावसाळ्यातच नाही तर वर्षभर या समस्येचा पाठपुरावा केला पाहिजे. कोणतेही वृत्तपत्र किंवा माध्यमे जाब विचारत नाहीत की स्थानिक संस्था रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम एप्रिलमध्येच का सुरु करत नाहीत, जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून सुरु होतो तर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मेपर्यंत थांबण्याची काय गरज आहे? तसेच रस्त्यांची कोणत्या प्रकारची दुरुस्ती करण्याची गरज आहे? केवळ रस्त्यांवर डांबर टाकल्याने समस्या सुटणार नाही. यासाठी कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे व त्यासाठी स्थानिक संस्थेकडे काय कृती योजना आहे? हे प्रश्न हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यातच का विचारले जात नाहीत, म्हणजे आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात पुन्हा पुन्हा शिक्षा भोगावी लागणार नाही.
इथे समाजाच्या प्रत्येक घटकाने, अगदी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनेही पुढाकार घ्यायला हवा कारण शहरात चांगल्या पायाभूत सुविधा असतील तरच ते राहण्यायोग्य होईल व रस्ते कोणत्याही शहराचा चेहरा असतात. एकीकडे आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय वाईट आहे त्यामुळे अधिकाधिक नागरिक रोजच्या प्रवासासाठी खाजगी वाहनांवर अवलंबून राहात आहेत. जर त्यांना प्रवासासाठी आपण चांगले रस्तेही देऊ शकणार नसू तर आपल्याला आदर्श शहर म्हणवून घेण्याचा काय अधिकार आहे? स्वतःला पुणेकर म्हणवणा-या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. दुर्दैवाने संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे, प्रत्येक गावातील किंवा शहरातील रस्त्यांची परिस्थिती दयनीय आहे, त्यामुळे लाखो लोकांचे जीवन त्रासदायक व असुरक्षित झाले आहे. आता आपण त्यावर चांगल्या किंवा वाईट आठवणींसह प्रवास करायचा किंवा नाही हे आपल्यावर अवलंबून आहे!

                      
                                                    
संजय देशपांडे

Smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment