Tuesday, 17 September 2013

प्रिय रोहित , तुझी पहिली बाईक घेताना !

तुम्ही बाईकवरुन पडाल याची काळजी केली तर तुम्ही त्यावर कधीही चढणार नाही..लांस आर्मस्ट्राँग

प्रिय रोहित, त्या महान व दुर्दैवी खेळाडूचे वरील विधान सायकल संदर्भात असले तरीही तुम्ही चालवता त्या प्रत्येक दुचाकीसाठी ते लागू होते! आज तुला तुझी स्वतःची पहिली बाईक मिळाली, तू नक्कीच त्याविषयी अतिशय उत्साही, आनंदी असशील व का नसावे! तू तुझ्या चकचकीत काळ्या  रंगाच्या सीबीआर २५० कडे पाहात होतास तेव्हा माझ्या बालपणीची काही दृश्ये मला आठवली…. त्यातील पहिले म्हणजे खामगाव नावाच्या छोट्याशा गावात मी १३ वर्षांचा असताना कुटुंबाने लुना खरेदी करायचे ठरविले तेव्हा वडिलांसोबत शोरुममध्ये गेलो होतो! तेव्हा लुना अतिशय लोकप्रिय होती व वडिलांना परवडेल अशी कदाचित एकमेव गाडी होती, ते डबल सीट चालवायला शिकले नसल्यामुळे ते शोरुममधून लुना चालवत आणत होते व त्यांच्यासोबत मी घरापर्यंत पळत आलो! मला ते पळणे अजूनही आठवत आहे, तुझ्या अब्बूंना म्हणजे आजोबांना कदाचित तो प्रसंग आता आठवतही नसेल! त्यानंतर अनेक वर्षे मी ती लुना साफ करत असे, ती स्टँडवर लावलेली असताना, बाबा आजूबाजूला नसल्यावर हळूच तिच्यावर बसत असे! मी १६ वर्षांचा असताना अभियांत्रिकीला प्रवेश घेतला व पुण्याला आलो, तेव्हा चालक परवान्याचे वय १८ वर्षे होते, त्यामुळे तेव्हा जुन्याच लेडीज सायकलने सगळीकडे फिरायचो व एक दिवस स्वतःची बाईक मिळेल अशी वाट पाहायचो. त्यानंतर १८ वर्षांचा झाल्यावर तीच घरातील जुनी लुना पुण्याला पाठवण्यात आली, तेव्हा मी अभियांत्रिकीच्या  तिस-या वर्षाला होतो. मला अजूनही आठवते आहे, माझी लुना महाराष्ट्र एक्सप्रेसने येणार होती व तिला आणण्यासाठी मी पावसाळ्यातील सकाळी पुणे रेल्वेस्थानकावर गेलो होतो. ती आली तेव्हा तिची टाकी रिकामी होती त्यामुळे सायकलिंग करत तिला जवळच्या पेट्रोल पंपावर नेले व तेव्हा पहिल्यांदा स्वतःच्या लुनामध्ये पेट्रोल भरण्याचा आनंद अवर्णनीय होता व आजही मला आठवते , सात रुपये पेट्रोल होते तेव्हा!

ते यामाहा, टीव्हीएस सुझुकी, हिरो होंडा व कावासाकी बजाज यांच्या पहिल्या पिढीतील बाईकचे युग होते; आमचे कॉलेज म्हणजे एमआयटी नव्या बाईकने फुलून गेलेले असायचे, व माझ्याकडेही एकदिवस अशी बाईक असेल असे स्वप्न मी दररोज बघायचो. ब-याचदा मी आणि मिलिंद हेडाऊ काका आम्ही कर्वेरोडच्या वा जे. एम. रोडच्या शोरुमच्या बाहेर उभे राहून नव्या बाईक न्याहाळत असू, पण मी माझ्या आईवडिलांकडे मला एखादी बाईक घेऊन द्या म्हणून कधीही हट्ट केला नाही कारण ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे याची मला कल्पना होती! माझ्या साथीदाराकडे कायनेटिक होंडा होती, मी ती देखील कधी चालवली नाही कारण चुकूनही माझ्यामुळे तिला अपघात झाला तर मी ती दुरुस्त करु शकणार नाही हे मला माहिती होते. यातली सर्वात चांगली बाब म्हणजे मला कोणत्याही किशोरवयीन मुलाप्रमाणे बाईकचे वेड होते मात्र माझ्याकडे एखादी नाही म्हणून मला कधीही वाईट वाटले नाही! पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेव्हाही  वाईट होती व बससाठी तासंतास वाट पाहावी लागायची, कारण घरुन मर्यादितच पैसे यायचे अशावेळी मित्रांसोबत चित्रपट पाहायचा असेल व बाहेर खायचे असेल तर ब-याचदा पेट्रोलला भरण्याला दुय्यम प्राधान्य दिले जायचे!

मला नोकरी लागली तेव्हा प्रिया स्कूटरच्या रुपाने मला पहिली व शेवटची बाईक मिळाली, व त्यावेळी सुद्धा माझ्याकडेही ती घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते व माझे आईवडिलही मला तेवढे पैसे पाठवू शकत नव्हते. त्यावेळी केदारच्या आईने म्हणजे शशी मावशीने मला माझी स्कूटर घेण्यासाठी कर्ज दिले व मला शेवटी माझी स्कूटर घेता आली, जी मिरवू शकत होतो! घरी ती स्कूटर असतांनाच माझे लग्नही झाले व ती स्कूटर आईच्या व माझ्या सुरुवातीच्या दिवसातील भटकंतीची साक्षीदार आहे! त्यानंतर मग मी कार घेतली, कामाचा ताण वाढल्यामुळे मग ड्रायव्हरही आला व अशा प्रकारे माझे बाईक चालविण्याचे स्वप्न व दिवस दोन्ही संपले!  
तू बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये येण्यापूर्वी तिथे ठेवलेल्या बाईक पाहताना आज ती सगळी दृश्ये माझ्या डोळ्यासमोर पुन्हा उभी राहिली. मला माहिती होते की तुला काळ्या रंगाची बाईक हवी होती, त्यामुळे सागरसारख्या चांगल्या मित्राच्या मदतीने मी तशी सोय करु शकलो व तुम्ही जी मैत्री व नातेसंबंध जपता ती अशा वेळी लाख मोलाची ठरतात हे मला जाणवले. जीवनाच्या या टप्प्यावर मी असे म्हणत नाही की मी सगळे काही शिकलो आहे मात्र मी ब-याच गोष्टी पाहिल्या आहेत, चांगल्या व वाईट व त्या तुम्हाला सांगत आलोय आणि रोहन तुला कदाचित त्यांचे महत्व आता समजणार नाही मात्र कधीतरी नक्की समजेल.

लक्षात ठेव आज तुला मिळालेली बाईक एक जबाबदारीही आहे, तिच्यामुळे तू अशा थोडक्या भाग्यवान किशोरांच्या गटात समील झाला आहेस ज्यांना ज्या वयात जे हवे आहे ते त्याच वयात मिळाले आहे! तू कदाचित म्हणशील, त्यात काय एवढे, अनेक किशोरांकडे तुझ्यापेक्षाही चांगल्या बाईक आहेत, अगदी हार्ले डेव्हिडसनही आहे! मात्र  त्याच वेळेस लाखो मुलांकडे साधी सायकलही नाही, हे देखील सत्य आहे! त्यामुळे तू जेव्हा तुझी बाईक चालविण्याचा आनंद उपभोगत असशील तेव्हा जे तुझ्याएवढे भाग्यवान नाहीत त्यांची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे हे नेहमी लक्षात ठेव.

मी तुझा वडील आहे व चाळीशीच्या मध्यावर आहे म्हणून तुला सांगतो की वेग चांगला असतो मात्र धोकादायकही असतो, म्हणूनच काळजीपूर्वक बाईक चालव व इतरांच्या जिवाचीही काळजी घे. या शहरातील वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे व आम्हाला तुझी काळजी वाटते एवढेच मला सांगायचे आहे!

लांस आर्मस्ट्राँगने म्हटल्याप्रमाणे, कधीही कोणतेही आव्हान अथवा जबाबदारी स्वीकारायला घाबरु नकोस, तरच त्यास सामोरे जाता येईल किंवा ते स्वीकारता येईल! सर्वात शेवटी तुझ्यासाठी अभिमानाची बाब असलेल्या बाईकचे स्वप्न मला पूर्ण करण्याची संधी दिलीस म्हणून मी तुझा आभारी आहे, खरेतर तुझ्या डोळ्यांनी मी माझेच स्वप्न पूर्ण होताना पाहात होतो! मजा कर आणि काळजी घे

बाबासंजय देशपांडे


No comments:

Post a Comment