Tuesday, 5 November 2013

बांधकाम या व्यवसायातील दिवाळी


विशेषाधिकार असलेला माणूस म्हणून आपल्या ज्या संधी मिळाल्या आहेत त्यांची समाजाला परतफेड करणे ही आपली जबाबदारी आहेकॅथरीन ऍनास्टॉस

कॅथरीन ऍनास्टॉस, एमडी या एक डॉक्टर, कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय चिकित्सक व वैद्यकीय संशोधक आहेत. त्या दक्षिण ब्राँक्स येथे २० वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय देखभाल व शल्यचिकित्सा व वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर आहेत. कृष्णवर्णीयांमधील गरीब समुदायांना उच्च दर्जाची, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील देखभाल सहज उपलब्ध होण्यासाठी, नाविन्यपूर्ण मोठे कार्यक्रम विकसित करण्याचा प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, वैद्यकीय व आर्थिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरातील लोकांपर्यंत त्यांनी सेवा पोहोचवल्या आहेत. मला पाश्चात्य जगाचे कौतुक वाटते की ते त्यांच्या उपजीविकेतून पैसे कमावताना नेहमी समाजाच्या उपकारांची परतफेड कशा प्रकारे करता येईल याचा विचार करत असतात. ब-याच जणांना हे फारसे आवडणार नाही कारण आपल्याकडे अझीम प्रेमजी, नारायण मूर्ती, टाटा, बिर्ला यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दाते आहेत, मग असा प्रश्न पडतो की त्यांनी समाजासाठी पुरेसे काम केलेले नाही का? त्यांनी केले आहे, मात्र १०० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अशी किती नावे आपण घेऊ शकतो व समाजाचे पांग फेडण्याच्या बाबतीत त्यांना आदर्श मानू शकतो? सामाजिक जबाबदारी ही केवळ अब्जाधीश किंवा अतिशय श्रीमंत लोकांसाठी नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तिची जबाबदारी आहे; अगदी पदपथावर भीक मागणा-या भिका-याचीही पदपथ व आजूबाजूचा भाग स्वच्छ ठेवण्याची सामाजिक जबाबदारी आहे, कारण तिथेच तो त्याची उपजीविका कमावतो! मात्र आपल्या आजूबाजूला आपल्याला काय दिसते हे पाहा व आपण समाजाबद्दलच्या आपल्या जबाबदारीविषयी किती जागरुक आहोत हे सांगा?
विशेषतः रियल इस्टेटच्या बाबतीत या व्यवसायातील बडी प्रस्थे कसा खर्च करतात, त्यांची जीवनशैली किती श्रीमंती आहे याविषयी गोष्टी कायम ऐकू येत असतात व चविष्टपणे वाचल्यापण जातात बरेचसे लोक केवळ रियल इस्टेट उद्योगातील थोड्या काळात मिळणारा प्रचंड पैसा बघून या व्यावसायात येतात. ब-याच जणांना असे वाटते की विकासकाला थोडेसे कष्ट करुन खूप पैसा मिळतो व सर्वात महत्वाचे म्हणजे कुणीही बांधकाम व्यावसायिक बनू शकतो कारण त्यासाठी शिक्षणाचा किंवा पात्रतेचा कोणताही निकष नसतो. पण मग हॉटेल व्यावसायिक किंवा उद्योजकांसाठीही असा काही निकष नाही, आपल्याकडे श्री. धिरुभाई अंबानी व इतर अनेकांची उदाहरणे आहेत ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती मात्र तरीही त्यांनी स्वतःच एक साम्राज्य उभे केले! आपण कदाचित बांधकाम व्यावसायिकांना किती कष्ट पडतात याऐवजी त्यांच्या श्रीमंती जिवनाविषयी अधिक गोष्टी वाचतो त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन असा आहे. पण कुठेतरी बांधकाम व्यावसायिक स्वतः देखील अशी प्रतिमा तयार होण्यासाठी जबाबदार आहेत. किंबहुना ब-याच बांधकाम व्यावसायिकांना श्रीमंती दाखवायला आवडते, आपल्या मोठ-मोठ्या गाड्या, आलिशान घरे व झगमगत्या पार्ट्यांद्वारे तिचे प्रदर्शन मांडले जाते. दुर्दैवाने समाज रियल इस्टेटमध्ये नाव कमावण्यासाठी, आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कराव्या लागणा-या मेहनतीकडे दुर्लक्ष करतो व बांधकाम व्यावसायिकांवर आधुनिक समाजाचे कॅसानोव्हा (खुशालचेंडू व्यक्ती) असा शिक्का मारतो!
या उद्योगामध्ये अनेक चांगली माणसे सुद्धा आहेत, जी भरपूर सामाजिक कामे करत आहेत, मात्र कदाचित त्यांची संख्या पुरेशी नाही किंवा कदाचित ते करत असलेले काम योग्यप्रकारे प्रदर्शित केले जात नाही. उदाहरणार्थ आपण नुकत्याच साज-या केलेल्या दिवाळीमध्ये कशाप्रकारे बदल करु शकतो हे पाहू; हा सण आपल्या सर्वांसाठी आनंद व मजेचा असतो. म्हणूनच आपण भरपूर खरेदी करतो, महागड्या घड्याळांपासून ते कारपर्यंत खरेदी होते, मात्र ही खरेदी स्वतःसाठी किंवा आप्तेष्ठांना भेट म्हणून किंवा व्यावसायिक हितसंबंधांसाठीच केली जाते! एवढेच पुरेसे आहे का? आपण सध्या ज्या स्थानावर आहोत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या ना त्या मार्गाने मदत करणा-या अनेक लोकांचे काय? उदाहरणार्थ बांधकाम मजूर, त्यातल्या ब-याच जणांसाठी दिवाळी हा मजेचा किंवा सुट्टीचा दिवस नसतो, तर त्यादिवशीचे वेतन त्यांना मिळत नाही कारण ते रोजंदारीवर काम करतात व त्या दिवशी सुटी असते. ते ज्या पत्र्याच्या झोपड्यांमध्ये राहतात, त्यांच्या मुलांना तशाच परिस्थितीत राहावे लागते, त्यांच्यासाठी दिवाळीची खरेदी तसेच फटाके केवळ एक स्वप्नच असते. ब-याच प्रकारे यावेळची दिवाळी विशेष होती, एकीकडे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झालेले दिसले, मात्र त्याच वेळी जिवनावश्यक वस्तुंचे दर वाढल्याने महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले होते, त्यामुळे त्यांची दिवाळी एक दुःस्वप्नच होती! बांधकाम मजुरांचे सोडा किरकोळ कंत्राटदारांसाठीही जिवनावश्यक वस्तुंच्या महागाईमुळे दिवाळी साजरी करणे अवघड होते, कारण, गोडधोड बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंचे दर भरमसाठ वाढले होते, व काही तरी गोडधोड बनविल्याशिवाय दिवाळी कशी साजरी होणार.
रियल इस्टेटच्या ब-याच कार्यालयांमध्ये केलेल्या कामाच्या किंवा दिलेल्या सामानाची बिले दिवाळीच्या महिन्यात न स्वीकारण्याची किंवा दिवाळीच्या आठवड्यात कोणतेही धनादेश न देण्याची पद्धत आहे, त्यामुळेच सर्व पैसे दिवाळीनंतर दिले जातात. एका दृष्टीने वित्त विभागावर दिवाळीच्या दिवसात येणारा ताण कमी करण्यासाठी हे योग्य आहे, कारण आधीच कर्मचा-यांना बोनस वगैरे द्यायचा भार असतोच. मात्र अशावेळी लहान कंत्राटदार किंवा त्यांच्या कामगारांचे काय? किंबहुना त्यांना या पैशांची अशा सणासुदीच्या काळातच अधिक गरज नसते का? आपण आपल्या सर्व विक्रेत्यांना आगाऊ रक्कम जरी नाही पण जर सर्व देय पैसे दिवाळीपूर्वी दिले तर त्यांची दिवाळी थोडी अधिक आनंददायक होणार नाही का? तसेच आपले लहान विक्रेत्यांसह सुरक्षा रक्षक वगैरे लोकांना केवळ पैसे देण्याऐवजी, त्यांना वापरता येईल अशी एखादी वस्तू द्यायला काय हरकत आहे. आपण कामगारांना रेनकोट, गरम कपडे इत्यादी देऊ शकतो, तसेच त्यांच्या मुलांना डबा, दप्तर, बूट अशा भेटवस्तू देण्याचाही विचार करा, कारण बांधकाम मजुरांची ही मुले अनवाणीच फिरत असतात, यामुळे ते इकडे तिकडे फिरत असताना अपघात होतात. आपण दिवाळीच्या निमित्ताने आपल्या कार्यालयावर तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी रोषणाई करतो, मात्र त्याचवेळी ब-याच कामगारांच्या घरात एक दिवाही नसतो ही वस्तुस्थिती आहे, म्हणूनच आपण बांधकाम मजुरांच्या घरावरही रोषणाई करु शकतो. या एका लहानशा कृतीनेही मजूर आनंदी होतील व सणासुदीला त्यांचा आनंद द्विगुणित होईल.
चाणक्याने म्हटले आहे, माणूस त्याची कमाई कशी खर्च करतो यावरुन ओळखला जातो”. रियल इस्टेटमधील वरिष्ठांनी या विधानातून शिकले पाहिजे, कारण आपण दिवाळीला कसा खर्च करतो यावरुन आपण ज्या समाजात राहतो त्याबाबतचा आपला दृष्टीकोन निश्चित होणार आहे. आपण अनेक मार्गांनी समाजासाठी योगदान देऊ शकतो व या उद्योगामध्ये येणा-या नवोदितांना चांगला मार्ग दाखवू शकतो. यामुळे केवळ व्यवसायालाच लाभ होईल असे नाही तर संपूर्ण उद्योगाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. म्हणूनच आपल्याला ज्या क्षेत्राद्वारे पैसा व संधी मिळाल्या आहेत ज्याविषयी आपली जबाबदारी दाखविण्यासाठी दिवाळीपेक्षा दुसरी चांगली वेळ कोणती असू शकते. आपल्या दृष्टीकोनातूनच आपण कोण आहोत व आपण कशास पात्र आहोत हे ठरणार आहे, आपण ज्यासाठी पात्र आहोत तेच आपल्यासोबत राहते हा निसर्गाचा नियम आहे! आणि रियल इस्टेट या निसर्ग नियमाला अपवाद नाही! म्हणूनच या दिवाळीत, आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण या शहराला आणि समाजाला काय भेट दिली आहे? मला असे वाटते त्याचे उत्तरच शहराचे व त्यातील रियल इस्टेट क्षेत्राचे भवितव्य निश्चित करेल!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment