Tuesday 28 January 2014

पाहिजे एक स्थापत्य अभियंता, रिअल ईस्टेटची गरज !



















जो कसे शिकायचे आहे व बदलायचे आहे हे शिकला आहे त्यालाच ख-या अर्थाने शिक्षित म्हणता येईलकार्ल रॉजर्स

कार्ल रॅनसम रॉजर्स हा एक अतिशय प्रभावी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता व मानसशास्त्राच्या मानववादी दृष्टिकोनाच्या जनकांपैकी एक होता. ही अशी महान माणसे अतिशय किचकट गुंतागुंतीच्या संकल्पना किती साध्या व सोप्या पद्धतीने समजावून सांगतात हे पाहता मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. इथे कार्लने शिक्षण व त्याचे आपल्या जीवनातील स्थान काय आहे याची व्याख्या केली आहे! मी अलिकडेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांपैकी एक होतो, त्यावेळी शिक्षण व अध्ययनाविषयी मला हे शब्द आठवले. ब-याच जणांना नेहमीप्रमाणे प्रश्न पडेल, याचा आपल्या मुख्य विषयाशी काय संबंध आहे तो म्हणजे रिअल इस्टेट किंवा बांधकाम उद्योग. त्यासाठी आपल्याला उद्योगाच्या सध्याच्या स्थितीवर एक नजर टाकायला हवी.
बांधकाम उद्योग हा देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करणा-या उद्योगांपैकी एक आहे व आपल्या सारख्या विकसनशील देशात पायाभूत सुविधा निर्माण करणारा उद्योग आहे. मग घरांचे बांधकाम असो किंवा रस्ते, धरणे किंवा कारखाने बांधायचे असोत आपल्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व यांत्रिक बळ लागते. त्याशिवाय या लोकांवर यंत्रांवर देखरेख करण्यासाठी आपल्या प्रशिक्षित किंवा तांत्रिकदृष्ट्या कुशल लोक लागतात. या संदर्भातील चित्र कसे आहे? एका बाजूला आपल्याकडे शेकडो अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत ज्यांच्या जागा रिक्त आहेत व दुसरीकडे उद्योगामध्ये तांत्रिकदृष्ट्या पात्र मनुष्यबळाचा नेहमीच तुटवडा जाणवतो!

शिक्षण क्षेत्र हा देखील एक व्यवसायच झाला आहे, त्याने बांधकाम उद्योगाची गरज जाणून घेऊन त्यानुसार त्यांचे उत्पादन म्हणजेच कुशल पात्र अभियंते तयार करण्याची वेळ आता आली आहे! पदविका अभ्याक्रमाची रचना करण्यासाठीच्या बैठकीमध्ये बांधकाम उद्योगातील तसेच शिक्षण क्षेत्रातील लोक सहभागी होते व आपण अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणते बदल करायला हवेत म्हणजे त्यातून तयार झालेल्या अभियंत्यांचा उद्योगाला खरोखर उपयोग होऊ शकेल या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. महाविद्यालयातून नुकत्याच बाहेर पडलेल्या व्यक्तिस मग ती कितीही चांगली असली तरी बांधकामाच्या ठिकाणची कामाची सर्व तंत्रे माहिती असतील अशी अपेक्षा कुणीच करत नाही. हे काम प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणीच शिकावे लागते मात्र तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित व्यक्तिकडून किमान अपेक्षा असते की बांधकामाच्या ठिकाणी या गोष्टी शिकण्यासाठी त्याला कमीत कमी वेळ लागेल. कुठेतरी बांधकाम उद्योगाच्या तरुण अभियंत्यांकडून असलेल्या अपेक्षा व त्यांचे उत्पादन यातील दरी वाढत चालली आहे व त्यामुळे लोक नवीन उमेदवारांना घ्यायला कचरतात; जे शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच चांगले लक्षण नाही! जर कुणीच नव्या उमेदवारांना घ्यायला तयार नसेल तर मग त्यांना चांगला अनुभव कसा मिळेल? तसेच अनुभव वर्षांमध्ये मोजता येत नाही, खरा अनुभव म्हणजे तुम्ही जे शिकता व चांगले परिणाम दाखविण्यासाठी त्याचा प्रत्यक्ष वापर करता! माझ्यासाठी अनुभव म्हणजे बदल स्वीकारणे व आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तो वापरणे ज्याचा फायदा सरतेशेवटी उत्पादनाला होईल!
इथे स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये बांधकाम उद्योगातील व्यवसायिकांची भूमिका महत्वाची ठरते. उद्योगातील तज्ञांनी महाविद्यालयातून नुकत्याच बाहेर पडणा-या तरुणांच्या दृष्टिकोनाविषयी चिंता व्यक्त केली. त्यांची नव्या संकल्पना स्वीकारण्याची तयारी नसते तसेच हातातील काम किंवा त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडताना ते स्वतःचे डोके वापरत नाहीत. सध्याचे बहुतेक स्थापत्य अभियंते यंत्रमानवाप्रमाणे आहेत जे केवळ आदेशांचे पालन करतात व कोणतेही विश्लेषण न करता ते अमलात आणतात. मी आधीच नमूद केल्याप्रमाणे बांधकाम उद्योगामध्ये अजूनही काँक्रिटीकरण, प्लास्टरिंग, टाईल्स बसविणे व इतर ब-याच कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जाते. या सर्व कामांचा दर्जा नियंत्रित करण्यासाठी मानवी देखरेख अतिशय आवश्यक आहे. इथे पर्यवेक्षक किंवा आपण त्याला अभियंता म्हणू शकतो, त्याच्यावर मोठी जबाबदारी असते कारण बांधकामाच्या परिस्थितीशी जुळवून घेत त्याला त्याची वैयक्तिक कौशल्ये वापरायची असतात. याला ज्ञानाचा वापर करणे असे म्हणतात व इथे हे तरुण अभियंते अतिशय कमी पडतात व यातील खरी समस्या त्यांच्या दृष्टिकोनाची आहे त्याच्या पदवीची किंवा ज्ञानाची नाही.

दुसरी मोठी समस्या म्हणजे संवाद कौशल्ये, केवळ तांत्रिकदृष्ट्या पात्र असल्याने तुम्ही यशस्वी अभियंता होणार नाही, चांगले काम करुन दाखविण्यासाठी तुम्हाला केवळ वरिष्ठांनाच नाही तर तुमच्या हाताखाली काम करणा-या चमूलाही तुम्हाला पटवून देता आले पाहिजे. यासाठी व्यक्तिने चर्चेसाठी नेहमी तयार राहिले पाहिजे, त्याला किंवा तिला त्यांच्या संकल्पनांविषयी जे वाटते ते समजावून सांगण्यासाठी त्यांच्याकडे तार्किक बैठक हवी, व त्याविषयी आत्मविश्वास वाटला पाहिजे. केवळ तांत्रिकदृष्ट्या अचूक असून चालणार नाही तुम्हाला स्वतःच्या क्षमतेविषयी पटवून देता आले नाही तर तुम्हाला लवकरच नैराश्य येईल. या पैलुविषयीदेखील चर्चा झाली व इतर अभियंत्यांशी संवाद साधण्याचा दृष्टिकोन रुजविण्याची अतिशय गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

नव्या अभियंत्यांविषयीची आणखी एक समस्या मांडण्यात आली, ती म्हणजे ज्ञानाचा तार्किक वापर. ब-याच जणांच्या लक्षात येत नाही की इमारत किंवा रस्ता किंवा एखादा प्रकल्प बांधताना, माणसे व यंत्रे काम करत असताना ब-याच गोष्टी अनपेक्षितपणे होतात. उदाहरणार्थ काँक्रिटीकरण सुरु असताना अचानक पावसाला सुरुवात होते; त्यावेळी जो प्रभारी अभियंता असेल त्याला तर्कसंगत विचार करुन त्या परिस्थितीत योग्य तो प्रतिसाद द्यावा लागतो, तिथे केवळ पुस्तकी ज्ञानाचा उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत काम थांबवणे ही कुणाही सामान्य व्यक्तिची प्रतिक्रिया असेल, मात्र पावसासाठी तयार राहणे व दर्जाशी तडजोड न करता काम सुरु ठेवणे हे अभियंत्याकडून अपेक्षित आहे! पुस्तकांमध्ये शिकलेले नक्कीच महत्वाचे आहे मात्र ते कट-पेस्ट केल्यासारखे वापरता येणार नाही. त्यासाठी विचार करावा लागेल व पुस्तकांमधून शिकलेल्यापैकी काय घेता येईल व परिस्थितीच्या गरजेनुसार बांधकामच्या ठिकाणी वापरता येईल यालाच तर्कशुद्ध विचार म्हणतात! दुर्दैवाने आजच्या पिढीविषयीची सर्वात मोठी चिंता आहे की ती तर्काचा वापर करत नाही. यासाठी कुठेतरी गुणांवर आधारित शिक्षण पद्धती जबाबदार आहे हे सगळ्यांनीच मान्य केले. कारण विद्यार्थ्याच्या मेंदूला केवळ उत्तरे पाठ करायची व प्रश्न विचारल्यानंतर ती द्यायची सवय झालेली असते व त्या उत्तरांमागील तर्क ग्रहण करण्यात तो अपयशी ठरतो.

त्यानंतर येते नेतृत्व कौशल्य, अभियंत्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्व कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. एक अभियंता बांधकाम स्थळाच्या राजासारखा असतो व त्याने त्याचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे व ते त्याच्या वर्तनातून दिसून आले पाहिजे. त्यासाठी त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून त्याला प्रशिक्षण दिले पाहिजे, कारण एखाद्या ठिकाणी प्रभारी असणे याचा संबंध केवळ पदाशी नाही तर जीवनशैलीशी आहे जी तुम्हाला स्वीकारावी लागते व त्या पदासोबत  येणा-या जबाबदा-या समजून घ्याव्या लागतात!

आणखीन एक दुर्लक्षित घटक म्हणजे प्रामाणिकपणा व हातातील कामाशी एकनिष्ठता; कामावर न कळविताच रजा घेणे किंवा थोड्याशा पगारवाढीसाठी नोकरी बदलणे ही आजकालच्या अभियंत्यांचा कल कसा असतो याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामाचे अतोनात नुकसान होते तसेच जर एखाद्या चमुचा प्रमुख असलेला अभियंता अचानक सोडून गेल्यास संपूर्ण चमूचे खच्चीकरण होते. अधिक चांगल्या भविष्याची अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही मात्र त्याच वेळी आपल्या हातातील काम पूर्ण करण्याची आपली जबाबदारी समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. अधिक चांगले भविष्य म्हणजे अधिक चांगला पगार असे होत नाही; किंबहुना विविध प्रकारच्या कामांचा अनुभव तसेच जबाबदा-या हाताळायला मिळणे यातून ते घडू शकते. तरुण पिढीने हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या शैक्षणिक दिवसातच एक चांगला अभियंता चांगला माणूसही असणे आवश्यक आहे ज्याच्यावर केवळ त्याच्या कामाचीच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांचीही जबाबदारी आहे हे त्याच्या मनात रुजवणे आवश्यक आहे!

सर्वात शेवटचा व अतिशय महत्वाचा घटक आहे पर्यावरण! मी एक अतिशय चांगले अवतरण वाचले होते ज्यात म्हटले होतेआपण आज जर पुरेशा चांगल्या शाळा बांधल्या तर आपल्याला भविष्यात फारसे तुरुंग उभारावे लागणार नाहीत”! हे अवतरण कुणाचे आहे आठवत नसले तरीही सध्याच्या परिस्थितीत त्याचा विचार केल्यास असे म्हणावे लागेल की आपण शाळांमध्ये पर्यावरणाविषयी योग्य ती शिकवण दिली तर आपल्याला पर्यावरणविषयक (हरित) लवादांवर एवढा खर्च करावा लागणार नाही! अगदी पाचव्या इयत्तेपासून पर्यावरणशास्त्र हा विषय आहे व स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये त्याचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे, याच क्षेत्रामध्ये विशेष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. मात्र मला असे वाटते की कुठेतरी तरुण मनांमध्ये पर्यावरण ही संकल्पना रुजवण्यात आपण अपयशी ठरतोय. या विषयाचा अभ्यास केवळ काही शाखांपुरताच मर्यादित नसावा तर माहिती तंत्रज्ञान तसेच संगणक शास्त्राच्या अभ्यासात त्याचा समावेश केला जावा. पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ काही विशेष शाखेच्या पदवी धारकांचे काम नाही तर ती प्रत्येक व्यक्तिची जबाबदारी आहे. हेच निसर्ग व जैवविविधतेलाही लागू होते; किती विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कालावधीत जंगलांना भेट दिली आहे व त्यांनी दिली असल्यास या भेटींमधून ते काय शिकले? या पृथ्वीवर केवळ आपणच नाही तर अनेक प्रजाती आहेत व आजूबाजूच्या जैवविविधतेमुळेच जीवन सुंदर आहे हे तरुण पिढीला शिकवले पाहिजे, याशिवाय पर्यावरण शास्त्र दुसरे काय असू शकते? या विषयाचा अभ्यास म्हणजे लाजाळू सारखी लहानशी वनस्पती असो, फुलपाखरे तसेच पक्ष्यांच्या विविध प्रजाती असोत किंवा वाघासारखा प्राणी असो, आपल्या भोवतालच्या परिसराविषयी किंवा पर्यावरणाविषयी जाणून घेणे! शैक्षणिक व्यवस्थेने विद्यार्थ्यांना अधिक संवेदनशील, एक चांगली व्यक्ती बनवले पाहिजे, केवळ पैसे कमावणारे यंत्र नाही व त्यासाठी त्यांची निसर्गाशी मैत्री घडवणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही निसर्गाला वाचायला लागल्यावर, समजून घ्यायला लागल्यावर तुम्ही स्वार्थी होऊच शकत नाही कारण निसर्गामध्ये सगळे काही गरजेवर आधारित असते हव्यासावर नाही! केवळ मनुष्यप्राणी सोडला तर जीवनाचे हे मर्म बाकी सर्व प्रजातींना समजते.

बांधकाम उद्योगाला चांगल्या अभियंत्यांची गरज आहे व ते एका दिवसात तयार होत नाहीत, तरुणांमधून चांगले अनुभवी अभियंते घडवण्यासाठी त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी उद्योगातील लोकांनी शिक्षण क्षेत्राला त्यांच्या कौशल्याचे योगदान दिले पाहिजे, जे दुर्दैवाने होताना दिसत नाही. त्यासोबत शैक्षणिक संस्थांनीही नव्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत व ज्या उद्योगासाठी त्या अभियंते तयार करत आहेत त्याची नस ओळखली पाहिजे. विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रास कुशल लोक केवळ पर्यवेक्षक म्हणून नाही तर या क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी, उद्योजक म्हणूनही हवे आहेत, कारण हेच लोक देशातील लाखो गरजू लोकांसाठी घरे उभारणार आहेत. जर ते एक चांगला अभियंता असतील तर ते काहीही चांगलेच उभारतील व अधिकाधिक लोकांनी या क्षेत्रात यायला हवे जे त्यांनी केलेल्या बांधकामाची जबाबदारी घेतील, रिअल इस्टेट उद्योगालाही यापेक्षा आणखी काय वेगळे हवे आहे!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment