Saturday, 1 March 2014

शेड्स ऑफ ग्रे & ग्रीन
लेखक का लिहीतात? कारण ते लिहीलेलं नसतं...थॉमस बर्गर.

या अगोदर कधीच लिहिताना शब्द सुचत नाहीत असं झालं नव्हतं पण आज खरोखर माझं स्वतःचं पुस्तक प्रकाशित व्हायची वेळ आलीय तेव्हा शब्दच सुचत नाहीत, मात्र अमेरिकन विनोदी लेखकाच्या वरील विधानानं माझ्या शब्दांना मोकळी वाट करुन दिली. अर्थात माझा असा अजिबात दावा नाही की मी जे काही लिहीलं आहे व प्रकाशित करत आहे ते आधी कुणी लिहीलेलं नाही. आपण विज्ञानात अभ्यासलंय की काही शोधणं आणि कशाचा तरी शोध लावणं यात फरक असतो! म्हणजे कोलंबसनं अमेरिका शोधली, ती आधीपासूनच तिथे होती त्यानं केवळ अधिक लोकांना व बाहेरच्या जगाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केलं. मात्र जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला जे अस्तित्वात नव्हतं, इतर वैज्ञानिकांनीही अशाच प्रकारे शोध लावला! तर मग लेखक व इतरांमध्ये काय फरक आहे? माझ्या मते लेखक आपल्या मनातल्या भाव-भावनांना किंवा विचारांना शब्दात व्यक्त करु  शकतात, आपल्या मनातही ते असतात मात्र त्यांना काही एक निश्चित स्वरुप नसतं व लेखकाप्रमाणे आपण ते व्यक्त करु शकत नाही. मला लेखन एखाद्या चित्राप्रमाणे वाटतं, माझे शब्द म्हणजे रंग व विषय म्हणजे वस्तू, असं हे चित्र पूर्ण करण्यासाठी पुस्तकापेक्षा दुसरा उत्तम कॅनव्हास कोणता असू शकेल!

माझा अजूनही विश्वास बसत नाही की माझ्या लेखांचं पुस्तक छापलं जातंय व प्रकाशित होतंय, कारण मी लेखक होण्याच्या उद्देशानं कधीच लिहीलं नाही. हा प्रवास जवळपास दहा वर्षांपूर्वी सुरु झाला, जेव्हा मी डीएसके समूहात काम करत होतो व अभियांत्रिकी व थोडीफार विपणनाची जबाबदारीही सांभाळत होतो. फेमिनामधल्या एका जाहिरात मोहिमेचं काम सुरु होतं. त्यात आम्हाला आमच्या एका प्रकल्पाची जाहिरात द्यायची होती व त्याबदल्यात आम्हाला आमची कंपनी किंवा आमच्या प्रकल्पाविषयी लिहीण्यासाठी एक पान मिळणार होतं. नेहमीप्रमाणे जाहिरात संस्थेच्या जाहिरात लेखकानं तो लेख लिहायचा होता व मला त्यासाठी प्रकल्पाची माहिती त्याला सांगायची होती. मी त्याची कच्ची प्रत वाचल्यानंतर माझ्या शब्दात दुरुस्त्या लिहून दिल्या. त्या पाहून जाहिरात लेखकानं मला सुचवलं, की मी तो प्रकल्प हाताळत असल्यानं त्याविषयी अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकेन. मला देखील ते पटलं व मी त्या प्रकल्पाविषयी मला जे वाटतं ते  लिहून काढलं. तो एक टाउनशिप प्रकल्प होता व तेव्हा तशाप्रकारचा पहिलाच होता, त्यामुळे मी केवळ त्याविषयीच नाही तर त्याचा सामाजिक परिणाम किंवा त्या पैलूविषयी लिहीलं. ते सगळ्यांना भावलं व ती जाहिरात मोहीम संपल्यानंतरही मी तो स्तंभ लिहीत राहिलो.

ती सुरुवात होती. नंतर सुदैवानं मित्रमंडळ विविध वृत्तपत्रांमध्ये विशेषतः लोकसत्ता व सकाळमध्ये असल्यानं, मी रिअल इस्टेट उद्योग तसंच पर्यावरणाविषयी जे लिहीलं ते छापलं गेलं, कारण हे दोन्ही विषय एकमेकांनी निगडित आहेत. त्यामध्ये माझ्या वन्य जीव संरक्षण सहली व इतर शहरांमध्ये काय परिस्थिती आहे यावरील लिखाणाची भर पडली व त्यानंतर मला जे विषय समोर दिसतील त्यावर लिहायचं जणू व्यसनच लागलं.

नंतर नव्या तंत्रज्ञानाच्या जाणाकार मित्रांनी मी स्वतःचा ब्लॉग सुरु करावा असा सल्ला दिला. हा ब्लॉग २००९ मध्ये सुरु केला व त्यात कोणत्याही विषयाचं बंधन नव्हतं कारण तो माझ्या विचार प्रक्रियेचं प्रतिबिंब होता. जे विषय मी माध्यमांशी बोलू शकत नाही त्यावरही मला इथे लिहीता येऊ लागलं व अशा प्रकारे लिखाण सुरु होतं. या प्रक्रियेत मला जाणवू लागलं की मी स्वतःच्या विचारानं लेखक झालेलो नाही, किंबहुना मी केवळ प्रतिक्रिया देतोय व आपणहून एखादा विचार व्यक्त करत नाही किंवा मांडत नाहीय. मी जे काही लिहीत आहे ते माझ्या आजूबाजूला घडणा-या घटनांचं प्रतिबिंब आहे, त्याचं चित्र मी माझ्या शब्दांमधून रंगवतोय. लोकांना ते आवडतंय असं वाटलं व त्यामुळे मी त्यांच्यासाठी लिहीत गेलो. अशा अनेक वाचकांनी मी पुस्तक लिहावं असं सुचवलं, यातले अनेक लेख वृत्तपत्रांमधून छापून आले होते. पण प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. या पुस्तकाच्या बाबतीत ही वेळ भानूबेन नानावटी आर्किटेक कॉलेजचे प्राचार्य श्री. अनुराग कश्यप यांच्यामुळे आली. त्यांनी केवळ हे लेख पुस्तक स्वरुपात छापावेत असा सल्लाच दिला नाही तर  रितू शर्मासारख्या आपल्या चमूसह त्यात पुढाकारही घेतला. आपल्या संस्थेतर्फे प्रकाशित करायचा प्रस्ताव दिला व प्रत्यक्ष त्या कामासाठी चमूही नेमला!
तर या पुस्तकामागची गोष्ट अशी आहे. याशिवाय अनेक मित्रांनी तसंच इतरांनीही पाठिंबा दिला त्यामध्ये नरेंद्र जोशी, ध्रुव कुलकर्णी, शुमिता महाजन व विशेषतः सकाळ चमूचा समावेश आहे. त्यांनी केवळ या लेखांचं कौतुकच केलं नाही तर ते प्रकाशितही केले. मुकुंद संगोरामांसारख्या व्यक्तिनं, ज्यांच्या लेखनातून मला स्वतःला अतिशय प्रेरणा मिळाली त्यांनी मला स्वतःच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी व त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित केलं,
त्यामुळे मला, मी जे लिहीतो ते वाचनीय आहे व लोकांना आवडत असल्याचा आत्मविश्वास मिळाला. अगदी अनोळखी व्यक्तिंकडूनसुद्धा लेखांविषयी व मी ते ज्या प्रकारे लिहीले आहेत त्याविषयी टिप्पणी, प्रतिक्रीया मिळतात. जेव्हा अरे वा तुम्हीच ते लेखक संजय देशपांडे का, आम्ही वर्तमानपत्रातला तुमचा लेख वाचला व आम्हाला तो आवडला अशी प्रतिक्रिया जेव्हा मिळते तेव्हा भरुन येतं किंवा त्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत!

या संपूर्ण प्रक्रियेत मला उमजलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे लिखाणामुळे आपल्याच मनावरचा ताण अतिशय कमी होतो, मी जेव्हा माझ्या मनातल्या विषयावरचा लेख पूर्ण करतो तेव्हा मला खूप मोकळं वाटतं. आपल्यापैकी ब-याचजणांनी अनुभव घेतला असेल की आपण रेडिओवर एखादं गाणं ऐकतो व ते कोणत्या चित्रपटातलं आहे हे आठवण्याचा प्रयत्न करतो. ते गाणं आठवेपर्यंत तुम्ही बेचैन असता, लिखाणाच्या वेळची भावनाही काहीशी तशीच असते. लेखनाविषयीची आणखी एक बाब म्हणजे त्यामुळे मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. मी विदर्भाच्या लहानश्या गावातून आलेला, मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा होतो, त्यामुळे स्वतःच्या भाषेत विचार करुन ते इंग्रजीत मांडणं माझ्यासाठी अतिशय मोठी गोष्ट होती. मी एक चांगला वाचक असलो तरीही माझी शब्दसंपदा मर्यादित होती, इतरांचे शब्द वाचणं व तुमचे विचार मांडण्यासाठी ते शब्द जोडणं या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत. मला त्या करता आल्यानं माझा हुरुप वाढला. यामुळे माझ्या लोकांसोबतच्या वागण्यात तसंच इतर कामांमध्येही फरक पडला. मला अधिक थेट व पारदर्शकपणे संवाद साधता येऊ लागला. संजीवनी या नावानं स्वतःची कंपनी चालवताना किंवा एक वडील, एक पती व एक मित्र म्हणून मला यापेक्षा अधिक काय हवं! मी सर्वांचा शतः ऋणी आहे कारण माझं कुटुंब व मित्रांच्या सतत प्रोत्साहनामुळेच मी एक चांगला निरीक्षक होऊ शकलो व ते लिहू शकलो. माझे आईवडील शिक्षक आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मी एखादं पुस्तक लिहीलंय यापेक्षा अभिमानाची दुसरी बाब कोणती असेल? हे पुस्तक केवळ वास्तुरचनेच्याच नाही तर इतर शाखांच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडले कारण त्यामध्ये आपल्या सभोवतालचा परिसर अधिक चांगला व्हावा याविषयची निरीक्षणं नोंदवली आहेत. अगदी एखाद्याच विद्यार्थ्यानं जरी हे वाचलं व त्यावर विचार केला तरी मला अतिशय आनंद होईल! त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही मुलांना एक दिवस जाणीव होईल की त्यांचे वडील त्यांना रात्री उशीरापर्यंत लेख लिहून वाचायचा त्रास का द्यायचे, कारण माझे बहुतेक लेख मी त्याचवेळी लिहीले आहेत. यामध्ये माझ्या पत्नीची भूमिकाही अतिशय महत्वाची आहे तिनं प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली. इथे काही नावं न घेणं अन्यायकारक होईल, ज्यांनी मला एक चंचल अस्थिर तरुण मनाचा ते एक आजूबाजूचं आयुष्य समजावून घेऊ शकणारी, थोडीफार परिपक्व व्यक्ती होण्याच्या प्रवासात मदत केली. ही माणसं आहे नितीन व पूनम महाजन व विजय बोंडाळे. कुणीही व्यक्ती चांगल्या मित्रांशिवाय शून्य आहे व या आणि अशा अनेक मित्रांनीच मला शून्य होण्यापासून वाचवलं. आणि मग माझ्या संजीवनीच्या संपूर्ण टिममुळे मला जो थोडाफार वेळ मिळू शकला, त्यामुळेच मी लक्ष केंद्रित करुन इथे जे लिहीलं आहे ते संग्रहित करु शकलो!

सर्वात शेवटी या पुस्तकातल्या लेखांविषयी, यात वेगळं असं काही नाही आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांविषयीच लिहीलं आहे व आपणा सर्वांची त्याविषयी मतं आहेत. हे लेख काही विशिष्ट वर्गाला किंवा वयोगटाला उद्देशून लिहीलेले नाहीत, हे सर्वांचं पुस्तक आहे. माझ्यासमोर या लेखांमधले विषय आल्यानंतर ज्याप्रमाणे मी त्यावर प्रतिक्रिया दिली त्याचप्रमाणे वाचकांनाही त्यावर प्रतिक्रिया देण्यास उद्युक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी घडत असतात, मात्र आपण त्या सोडून देतो व अगदी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींवरच प्रतिक्रिया देतो. आपली प्रतिक्रियात्मकता एवढी मर्यादित असल्यामुळेच आपल्या समाजाची एवढी दयनीय अवस्था आहे, असं मला वाटतं. मी काही कुणी समाजसेवक किंवा नेता नाही जो लोकांना बदलासाठी किंवा क्रांतीसाठी वाचायला लावेल, कारण ती एक खूप मोठी गोष्ट आहे. मात्र मी एक आवाहन करु शकतो की तुमच्या दैनंदिन जीवनातल्या अगदी लहान गोष्टींचा विचार करा. मग तो पादपथावर अनवाणी पायानं चालणारा एखादा गरीब मुलगा असेल किंवा रस्तावर ओसंडून वाहणारी कचराकुंडी असेल किंवा लिफ्टमध्ये तुम्हाला स्मित देणारी अज्ञात व्यक्ती असेल. या गोष्टींचा विचार करुन तुम्ही बदल घडवू शकता, मग ती कितीही लहान गोष्ट असेल. आणि अशा लहान-लहान वैयक्तिक बदलांमधूनच मोठा सामाजिक बदल घडतो,हा तर इतिहासच आहे ना !
http://mail.google.com/mail/images/cleardot.gif


चला तर मग माझ्या शब्दांमधून स्वतःला शोधा, हीच माझ्या वाचकांना शुभेच्छा आहे....

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सNo comments:

Post a Comment