Thursday, 15 May 2014

साने सर नावाच्या महान व्यक्तिस सलाम !
सल्लागार म्हणून माझी सर्वात मोठी ताकद म्हणजे अज्ञानी होणे व काही प्रश्न विचारणे ….पीटर ड्रकर

सल्लागार म्हणून या नावाची ओळख करुन देण्याची गरज नाही, आज आपण एका सल्लागारांविषयीच बोलणार आहोत पण जे एक स्ट्रक्चरल डिझायनिंग सल्लागार होते. वृत्तपत्रांमध्ये अलिकडेच एक लहानशी बातमी आली होती की श्री. वाय एस साने यांचे निधन, शहरातील अनेक सामान्य नागरिकांनी या बातमीकडे कदाचित दुर्लक्ष केले असेल! यशवंत शंकर साने, लोक त्यांना वाय एस साने म्हणून ओळखायचे तर माझ्या वयाचे अभियंते त्यांना केवळ साने सर म्हणून ओळखत! ७०च्या दशकात जेव्हा या शहरामध्ये रिअल इस्टेट क्षेत्र बाल्यावस्थेत होते तेव्हा हा माणूस कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, पुणे येथे  नेटाने स्ट्रक्चरल डिझायनिंग विषय शिकवत होते व त्यानंतर एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे शहरातील रिअल इस्टेट उद्योगाच्या तांत्रिक बाजूविषयी फारशी माहिती नसलेल्या बांधकाम व्यवसायिकांसाठी रचनाशास्त्राविषयी सल्लासेवा सुरु केली. त्यानंतर
वाय एस साने अँड असोसिएट्सने कधीही मागे वळून पाहिले नाही, ८०च्या दशकात पुण्यातला  जवळपास ९०% प्रकल्पांच्या स्ट्रक्चरल डिझायनिंग सरांनी केले, एवढा त्यांचा दबदबा होता.

तोपर्यंत स्थापत्य अभियंता झालेल्या प्रत्येक मुलाचे मध्यपूर्वेत जाऊन नोकरी करणे व सरकारी सेवेत जाणे हेच स्वप्न असे, मात्र वाय एस साने अँड असोसिएट्सच्या स्थापनेनंतर रचनात्मक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. स्थापत्य अभियंता म्हणून महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर वाय एस सानेमध्ये रुजू होणे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जायचे, असे सरांचे वलय होते. त्यावेळची रिअल इस्टेट क्षेत्रातील परिस्थिती विचारात घेता, सरांच्या कामगिरीचा हा अतिशय महत्वाचा पैलू आहे. सर्वसाधारणपणे चांगला शिक्षणतज्ञ क्वचित चांगला व्यवसायिक किंवा सल्लागार म्हणून यशस्वी होऊ शकतो अशी एक धारणा आहे; कारण शिक्षणतज्ञ म्हणून तुमचा भर थेअरिवर असतो जे सल्लागार म्हणून तुमच्या दूरदृष्टीस मारक ठरते! मात्र सरांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रभुत्वाचा वापर स्वतःला सल्लागार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी अतिशय नेमकेपणाने केला. ते केवळ सिद्धांताचेच जाणकार नव्हते तर चांगली इमारत बांधण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा आहे हे त्यांना माहिती होते.

महान सल्लागार ड्रकर यांनी म्हटल्याप्रमाणे सल्लागाराचे यश तो त्याच्या ग्राहकास आर्थिक बाबतीत तसेच कामाच्या दर्जाच्या बाबतीत कशाप्रकारे आनंदी व समाधानी ठेवतो यावर अवलंबून असते! साने सरांनी जणु ड्रकरचे तत्व अंगी बाणवले होते, आधि सांगितल्या प्रमाणे तेव्हाचा रिअल इस्टेट उद्योग बाल्यावस्थेत होता त्यामुळे तांत्रिक सल्लागारच महत्व बांधकाम व्यवसायिकांना पटवून देणे हे एक मोठे काम होते. हे काम अजिबात सोपे नव्हते कारण तेव्हा रिअल इस्टेट उद्योगातील लोकांनी ज्ञानाचा किंवा ज्ञानी माणसाचे आदर करणे तर दूरच पण अगदी प्राथमिक सल्लागार/वास्तुविशारद यासारख्या व्यवसायिकांचाही आदर केला जायचा नाही, अशा काळात त्यांना स्ट्रक्चरल डिझायनिंग सारख्या विषयाचे महत्व पटवून देणे प्रचंड मोठे काम होते !
साने सर केवळ तांत्रिक सल्लागारच झाले नाहीत तर अनेक मोठ्या रिअल इस्टेट उद्योगसमूहांचे कौटुंबिक सल्लागार झाले व या उद्योग समूहांच्या अनेक पिढ्यांना बांधकाम विषयक सल्ला देत राहिले. मला आठवते आहे की ते प्रत्येक कामावर जातीने लक्ष ठेवत, स्लॅब तपासण्यासाठी बांधकामाच्या ठिकाण जात, इमारतीचा सर्वात वरचा मजला असलेल्या लिफ्ट रुमच्या वरच्या स्लॅबपर्यंत स्वतः जात !

साने सरांची आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या ग्राहकाने केलेल्या कोणत्याही मागणीसाठी मग ती कितीही विचित्र मागणी असली तरी ते कधीच नाही म्हणत नसत.
केवळ ग्राहकांना खूश करण्यासाठी नाही तर त्यांच्या मागण्या ते रचनेच्या सुरक्षा पैलूस हात न लावता, रचनाशास्त्रातील एक आव्हान म्हणून स्वीकारत. मी वास्तुविशारदांशी नियोजनाविषयी अनेकदा चर्चा करताना, आपण आपल्या गरजेप्रमाणे रचना करु, रचनाशास्त्रानुसार प्रत्यक्षात कसे उतरवायचे ते सर बघून घेतील अशा विधानांनी आमच्या चर्चेची सांगता होत असे ! अलिकडच्य काळात मी एका सिमेंट कंपनीची जाहिरात पाहिली त्यामध्ये लोक एका उंच इमारतीत शांतपणे झोपल्याचे दाखवले जाते व पार्श्वनिवेदन सुरु असते कीलाखो लोग चैन की निंद लेते है हमारी सुरक्षा कवच में व त्यानंतर सिमेंटचे नाव झळकते ! म्हणजेच त्या इमारतींच्या बांधकामात ते विशिष्ट सिमेंट वापरल्यामुळे अनेक लोक शांतपणे झोपू शकतात ! ही अतिशय प्रभावी जाहीरात आहे, अनेक बांधकाम व्यवसायिकांनीही याचप्रमाणे साने सरांच्या हातात इमारतीची रचनात्मक आखणी सोपवून हाच अनुभव घेतल्याचे मी पाहिले आहेसाने सरांनी रचलेल्या व देखरेख केलेल्या सदनिकांमध्ये राहणा-या लाखो लोकांसाठीही हे तितकेच खरे आहे.

मला असे वाटते की साने सरांची अनेक ग्राहक असलेला सर्वात यशस्वी रचनाशास्त्रविषयक सल्लागार होणे ही सर्वात मोठी कामगिरी नाही, तर त्यांनी इमारतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तिच्या मनात विश्वास, सहजता निर्माण केली ती सर्वात महत्वाची आहे. मग स्वतः बांधकाम व्यवसायिक असो, वास्तुविशारद, बांधकामावरील अभियंता किंवा फिटर जो बांधकामाच्या साखळीतील सर्वात शेवटचा घटक असतो, जो मजबूत करण्याचे काम करतो! बांधकामाच्या ठिकाणी काहीही समस्या आली तरी साने सर आहेत असा विश्वास प्रत्येकाला वाटत असे व सर्वजण आरामात असत !
दुसरा एक महत्वाचा पैलू म्हणजे उपलब्धता, व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी सल्लागाराच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात त्याच्यापर्यंत पोहोचणे ही कोणत्याही व्यवसायिकासाठी डोकेदुखी असते. मात्र जेव्हा सेलफोन नव्हते त्या काळामध्येही सानेसरांच्या सर्व ग्राहकांना माहिती असायचे की सायंकाळी चार वाजता साने सर त्यांच्या कार्यालयात हजर आहेत व भेटीसाठी कोणतीही वेळ न घेता बांधकामाशी संबंधित कोणतीही समस्या घेऊन त्यांच्याकडे कुणीही जाऊ शके !

ते सल्लागार म्हणून एक आदर्श व्यक्ती होतेच मात्र एक चांगला माणूसही होते. नेमके हेच आजकालचे तथाकथिक यशस्वी लोक विसरत आहेत. साने सर मोठी कॉर्पोरेट रिअल इस्टेट फर्म असो किंवा एका इमारतीपुरता लहान उभरता बांधकाम व्यवसायिक असो ते दोघांनाही त्याच प्रेमाने व प्रामाणिकपणे सेवा देत असत; आजकालचे जग पाहता असा दृष्टिकोन अतिशय दुर्मिळ आहे.
ते कधीही अगदी लहानशाही कामाला नकार देत नसत किंवा बांधकामावरील अभियंत्याची बांधकामाच्या ठिकाणी भेट देण्याची व रचनात्मक समस्येविषयी त्याला मार्गदर्शन करण्याची विनंती कधीही फेटाळत नसत. त्यांचे मार्गदर्शन स्लॅब व खांबांपुरतेच मर्यादित नसे, बांधकामाशी संबंधित कोणतीही समस्या असो मग ती वॉटर प्रूफिंगसंदर्भातील असली तरीही ते त्यावर विचार करण्यास उत्सुक असत!


केवळ बांधकाम व्यवसायिकच त्यांचे ग्राहक नव्हते तर रचनात्मक लेखा व सुरक्षा याविषयावरील अनेक सरकारी संघटनांच्या सल्लागार मंडळावर होते व शहराच्या अनेक सामाजिक समस्यांवर योगदान देत होते. एक सल्लागार व माणूस म्हणून ते परिपूर्ण होते व तेच त्यांचे सर्वात मोठे यश होते असे मला वाटते! पुणे आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते व शहराला ही ओळख मिळवून देणा-या आधारास्तंभांपैकी एक साने सर होते व त्यांनी तयार केलेल्या मार्गावर चालून आपण त्यांना सर्वोत्तम आदरांजली देऊ शकतो. दूर्दवाने रिअल इस्टेट क्षेत्र कधीही प्रामाणिकपणा व सचोठीसाठी ओळखले जात नव्हते व जात नाही मात्र आपण साने सरांसारख्या व्यक्तिस आपला आदर्श मानले तरच या उद्योगासाठी काही आशा आहे असेच मी म्हणेन. मला त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य मिळाले व मी जे काही पाहिले त्या आधारेच मी हे लिहीत आहे व हीच माझी त्यांना श्रद्धांजली आहे! त्यांनी एका लहानशा सल्लागार संस्थेला एका कॉर्पोरेट (स्ट्रक्चरल डिझायनिंग) समूहात रुपांतरित केले व त्यांचे वारस हे ही जबाबदारी समर्थपणे संभाळत आहेत. मात्र यापुढे पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग साने सरांच्या पितृतुल्य सल्ल्यास मुकेल हे निश्चित

सरते शेवटी सांगावेसे वाटते कि तुम्ही किती प्रकल्प पूर्ण केले आहेत किंवा तुम्ही किती पैसे कमावले यावरुन तुम्ही किती महान आहात हे ठरत नाही, तर तुम्ही गेल्यानंतर लोक तुम्हाला कसे लक्षात ठेवतात यावरुन तुम्ही किती महान आहात हे ठरते व या निकषानुसार साने सरांचे स्थान त्यांनी रचना केलेल्या व निरीक्षण केलेल्या गगनचुंबी इमारतींपेक्षाही फार उंच आहे !

संजय देशपांडेसंजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment