Saturday 5 July 2014

घर नावाची व्यक्ती !





















एखादे घर फक्त एक ठिकाण नाही तर एक व्यक्ती बनू शकेल का कधी ?” … स्फेफनी पर्किन्स

स्फेफनी पर्किन्स ही एक अमेरिकी लेखिका आहे, तिची अनेक पुस्तके सर्वाधिक खपाची ठरली आहेत व वरील केवळ एक लहानसे वाक्य तिच्या लेखनाची ताकद किती आहे याची ओळख करुन देण्यासाठी पुरेसे आहे! मी घराविषयी अनेक अवतरणे पाहिली आहेत, किंबहुना घराविषयी विविध अवतरणे गोळा करणे हा माझा छंद आहे. याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे ते माझ्या व्यवसायाशी  निगडीत आहे, व दुसरे म्हणजे घर हे इतर बाजारू उत्पादनांसारखे नाही. बहुतेक लोक घराकडे केवळ एक वस्तू म्हणून पाहात नाहीत तर त्या चार भिंतीमध्ये त्यांना राहायचे असते. माझे स्वतःचेही मत आहे की घर म्हणजे केवळ दगड विटांनी बनलेली निर्जीव इमारत नसते. तर घराचा आराखडा तयार करण्यापासून ते बांधकामापर्यंत त्यात भावना गुंतलेल्या असतात व ज्यामध्ये भावना असतात मग घर निर्जीव कसे असू शकते! म्हणूनच मला स्टेफनीचे अवतरण फार भावले, कारण त्यामध्ये घराचा विचार जिवंत व्यक्ती म्हणून करण्यात आला आहे, केवळ काँक्रीटची इमारत किंवा आपण ज्याला अंतर्गत सजावट म्हणतो त्याचा सुशोभित संग्रह नाही!

इथे आपल्या आजच्या विषयाची सुरुवात होते, आपण जेव्हा घर ही एक व्यक्ती असल्याचे म्हणतो तेव्हा आपल्याला या व्यक्तिविषयी किती माहिती असते? अनेकदा घराचा ताबा घेतल्यानंतर, त्यात राहायला सुरुवात केल्यानंतर आपण या व्यक्तिला अधिक जवळून समजून घेऊ लागतो. मात्र ते बांधले जात असताना आपण त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच करत नाही, म्हणूनच एखाद्या नात्यामध्ये गैरसमजुतीमुळे जसा संघर्ष होतो तसाच इथेही होतो.
आता बरेच जण प्रश्न विचारतील की घराला समजून कसे घ्यायचे? घराला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्यास सजीव म्हणून स्वीकारा, म्हणजे तुम्ही त्याच्या किती गोष्टींकडे दुर्लक्ष करता हे जाणवेल. एखाद्या व्यक्तिप्रमाणे घराची उभारणी कशी झाली, त्याच्या शारीरिक मर्यादा कोणत्या आहेत, हे माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे व त्यासाठी तुम्ही त्याच्या निर्मात्याशी म्हणजे बांधकाम व्यवसायिकाशी बोलायला हवे! ज्याप्रमाणे मूल वाढत असताना त्याची योग्य निगा राखावी लागते, त्याचप्रमाणे घर बांधतानाही खूप लक्ष द्यावे लागते. एखाद्या चांगल्या शिक्षकाच्या हातात विद्यार्थाचे सोने होते, त्याचप्रमाणे इथेही साहित्य व कारागिरी अतिशय महत्वाची असते. लक्षात ठेवा ही घर नावाची व्यक्ती किमान ५०-६० वर्षे तुमच्या कुटुंबाचा एक भाग होणार असते, त्यामुळे इतकी वर्षे आजारी न पडता तुमच्यासोबत राहण्यासाठी ती पुरेशी सशक्त असली पाहिजे. असे झाले तरच तुम्हाला तिच्या साथीचा आनंद अधिक चांगल्याप्रकारे उपभोगता येईल. त्याचसाठी तुम्ही तिची निर्मिती व अंतर्गत बाबी समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येकाने घराच्या कोणत्या आजारपणांना तोंड द्यावे लागणार आहे हे, किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर घराच्या देखभालीविषयी समजून घेतले पाहिजे!
पुण्यामध्ये अलिकडच्या काळात देखभालीचे नेहमी आढळणारे मेन्टेनन्सचे काम म्हणजे घरातील भिंतींना पडलेल्या भेगा. ब-याचदा या भेगा ताबा मिळाल्यानंतर वर्षभरात दिसून येतात व लोक त्यामुळे काळजीत पडतात कारण त्या अतिशय वाईट दिसतात व दुसरे म्हणजे त्यामुळे घराच्या तब्येतीविषयी आपल्या चिंता वाटू लागते. अशाप्रकारे भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम आपण या भेगांचे स्वरुप पाहिले पाहिजे. पुण्यामधील बांधकामामध्ये वापरलेल्या पद्धती व कारागिरीनुसार साधारणपणे तीन प्रकारच्या भेगा पडतात. पहिल्या प्रकारच्या भेगा भिंतीच्या पृष्ठभागावर कुठेही पडतात. त्या खोलवर नसतात तर केवळ रंग व प्लास्टर अशा पृष्ठभागावरच असतात. या भेगा प्रामुख्याने वाळूमध्ये मातीची टक्केवारी अधिक असल्यामुळे तसेच औष्णिक ताणामुळे (थर्मल स्ट्रेस) पडतात. पुण्यामध्ये मिळणारी बहुतेक वाळू ही नदीतील असते व त्यामध्ये चिकणमातीचे कण असतात व ही चिकणमाती कोरडी झाल्यानंतर आकुंचन पावते व त्यामुळे भेगा पडतात. आणखी एक कारण म्हणजे उन्हाळ्यात रात्री १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते तर दुपारी ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, त्यामुळेच बांधकामाच्या आकुंचन-प्रसरणामुळे अशाप्रकारच्या भेगा पडतात. या भेगा धोकादायक नसतात व बांधकामाच्या वेळी योग्य तंत्र वापरुन त्यांचे प्रमाण कमी करता येते. वाळू धुवून व चाळणीद्वारे गाळून घेतली पाहिजे म्हणजे प्लास्टर करण्यापूर्वी त्यामध्ये कमीत कमी माती असेल. प्लास्टर केल्यानंतर पाणी मारणेही महत्वाचे आहे. आजकाल बरीच रसायने मिळतात जी आपण मसाल्यात (मॉर्टर) अधिमिश्रण म्हणून घालू शकतो व त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होतो व मसाला अधिक लवचिक होतो. अशी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही अशा भेगा पडण्याची शक्यता असते, याचे कारण म्हणजे आपण बांधकामासाठी सध्या वापरत असलेली चौकटीची रचना. आपण आरसीसी चौकट उभारतो म्हणजे सर्वप्रथम स्तंभ (कॉलम), तुळई (बीम) व स्लॅब उभारतो व त्यानंतर त्यामध्ये विटा/ठोकळे घालून भिंत बांधतो. यामुळे तुळई किंचित वाकते, खालील भिंतीमुळे या वाकण्यास प्रतिबंध केला जातो व भिंतीवर ताण निर्माण होतो. तुळई व भिंतींच्या जोडापाशी एक विशेष थर देऊन हे सर्व कमी करता येते. हा थर गादीसारखे काम करतो व तुळई वाकत असताना तिला आधार देतो, मानवी डोळ्याला हे दिसत नाही मात्र हे सतत घडत असते.
दुस-याप्रकारच्या भेगांमध्ये एक साम्य असते व सर्वसाधारणपणे त्या स्तंभ व भिंती किंवा तुळई व भितींच्या सांध्यापाशी पडतात. या भेगा प्रामुख्याने घर बांधताना दोन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य जोडल्यामुळे पडतात म्हणजेच आरसीसी व विटा/ठोकळे (ब्लॉक्स). इथेही योग्य कारागिरीद्वारे या भेगा कमी करता येतात, उदाहरणार्थ प्लॅस्टर करताना सांध्याच्या लांबीएवढी चिकन मेश (पोलादी बारीक तारांची जाळी) बांधणे. या जाळीमुळे स्तंभ व भिंतींदरम्यानचा जोड व्यवस्थित सांधला जातो व त्यावरील भेगा कमी होण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे रंग देण्यापूर्वी या भेगा खरवडून त्यात पुट्टी किंवा प्लास्टिक साहित्य भरावे लागते. या दोन्ही प्रकारच्या भेगा दोन वा तीन वर्षांनी घर आतुन रंगल्यावर सहसा परत येत नाहीत.तिस-या प्रकारच्या भेगा गंभीर स्वरुपाच्या असतात कारण त्या भिंतीतून आरपार जाणा-या असतात, भिंतीमधील जोड व्यवस्थित नसेल किंवा विटा निकृष्ट दर्जाच्या असतील किंवा बांधकाम मजबूत नसेल तर अशा भेगा पडतात. या भेगांमध्ये कोणतीही दुरुस्ती करायची असल्यास तज्ञांना दाखवले पाहिजे. पहिल्या दोन प्रकारच्या भेगांमुळे बांधकामाला अजिबात धोका नसतो. आपण तीन-चार वर्षांनी घराला रंग देताना या भेगा खरवडून त्यात पुट्टी भरली तर पुढील वर्षांमध्ये त्या पडत नाहीत. मात्र तिस-या प्रकारच्या भेगा काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत, त्यांच्या कारणाचे विश्लेषण करुन सल्लागाराच्या देखरेखीखाली त्यावर उपाययोजना केली पाहिजे. एखाद्या व्यक्तिप्रमाणे घरालाही आजार होतात व या भेगा अगदी नेहमी आढळणा-या आजारांपैकी एक आहेत.
अशाचप्रकारे आढळणारा आणखी एक आजार म्हणजे भिंतींना ओल येणे व गळणे यात फरक आहे. वरील किंवा शेजारच्या सदनिकेच्या Ta^यलेट मधील प्लंबिंगमध्ये काही दोष असल्यास स्लॅबद्वारे पाणी गळते वा भिंतीतुन पण पाणी झिरपते, त्याशिवाय गच्चीवरुन किंवा छतावरुन सुद्धा पावसाळ्यात गळते. मात्र ओल लागणे म्हणजे बाहेरील भिंतीचा ओलसरपणा, जो आतून जाणवतो व दिसतो. हे केवळ बाहेरील भिंतींवर पाऊस पडल्यामुळे होते, भिंतींच्या व तुळईच्या किंवा स्तंभांच्या सांध्यांमधून हे पाणी झिरपत सदनिकेमध्ये येते. ब-याचदा भिंती बाहेरील बाजूने पृष्ठभागावर पडलेल्या भेगांद्वारे पाणी शोषतात, पाणी शोषण्याची क्षमता संपल्यानंतर ते साचते व भिंतींच्या आतमध्ये पसरते. याठिकाणीही कारागिरी अतिशय महत्वाची आहे. बाहेरील प्लास्टरचे दोन थर (डबल कोट) असतील व वर नमूद केलेल्या अधिमिश्रणाचा त्यात वापर केला असेल तर बाह्य पृष्ठभागावर कमीत कमी भेगा पडतील व ओल कमी होईल. त्याशिवाय चांगल्या दर्जाच्या रंगामुळे पावसाचे पाणी शोषले जात नाही व ओल कमी येते. आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे किमान पाच वर्षांनी संपूर्ण इमारतीच्या बाह्य भागास रंग दिला पाहिजे, कारण रंगाचेही आयुष्य असते व हवामानाच्या परिणामामुळे तो निघून जातो. आपण बहुतेकवेळा सदनिकेच्या आतील भागाला रंग देतो, मात्र क्वचितच सर्व सदनिकाधारक एकत्र येवून ठराविक वर्षांनी इमारतीला बाहेरुन रंग देतात!

लक्षात ठेवा कोणत्याही भिंती वॉटरप्रूफ (जलप्रतिबंधक) करता येत नाहीत मात्र चांगल्या कारागिरीने त्या चांगल्या जलप्रतिरोधक बनविता येतात. आपल्या शहरात पाऊस सुरु झाला की सलग काही दिवस पडतो व अशाच वेळी कामाच्या दर्जाची खरी कसोटी असते!
कोणत्याही घरासाठी पाणी गळणे ही अतिशय वाईट समस्या आहे; माणसांशी तुलना केल्यास ती कर्करोगाप्रमाणे आहेमात्र मी एक अभियंता म्हणून सांगू शकतो की पाणी गळणे सहजपणे हाताळता येऊ शकते किंवा ते पूर्णपणे टाळताही येऊ शकते. भेगा किंवा ओल लागण्यावर तुमचे नियंत्रण नसते, मात्र योग्य तंत्र वापरुन व काळजीपूर्वक काम करुन पाणी गळणार नाही याची तुम्ही खबरदारी घेऊ शकता. गळण्याचेही दोन प्रकार आहेत, एक चुकीच्या प्लंबिंगमुळे (नळजोडणी) लागते व दुसरी सदोष वॉटर प्रूफिंगमुळे (जल प्रतिबंधन) लागते. पाणी गळती रोखण्याचे पहिले व अतिशय मूलभूत तत्व म्हणजे पाणी एका ठिकाणी साचू न देणे व योग्य उताराद्वारे त्याचा निचरा करणे. साचलेल्या पाण्यामुळे निश्चितपणे पाणी गळती होते कारण ते बाहेर पडण्यासाठी जागा शोधते मग खालील सदनिकेमध्ये किंवा भिंतीमधून शेजारच्या खोलीत पाणी गळते! बहुतेकवेळा लोक सर्वात वरच्या मजल्यावरील सदनिका खरेदी करायला घाबरतात कारण छतावरुन पाणी गळण्याची शक्यता असते, मात्र योग्य क्राँक्रिटीकरण, काळजीपूर्वक वॉटर प्रूफिंग व छताच्या स्लॅबला योग्य उतार दिल्यास पाणी अजिबात गळत नाही असा माझा अनुभव आहे. ब-याचदा शौचालय किंवा मोरी यासारख्या ओल्या भागांमध्ये जमीनीचा उतार व्यवस्थित नसतो व पाणी जमीनीवर राहिल्याने ते गळते. त्याशिवाय सर्व जलवाहिन्यांची विशेषतः भिंतीच्या आतील (कन्सील्ड) वाहिन्यांची दाब चाचणी करणे आवश्यक आहे ज्यामुळे या वाहिन्यांमधून भविष्यात गळती टाळता येईल.

घराविषयीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत व थोडेसे कुतुहल असेल तर तुम्ही तुमचे घर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकताकेवळ माहितीपत्रक व जाहिरातीवर न जाता विकासकाच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांना भेट द्या, त्या घरांशी व त्यातील रहिवाशांशी चर्चा करा. यामुळे तुम्हाला तुम्ही शोध घेत असलेल्या तुमच्या घराची जडणघडण कशी झाली आहे याची व्यवस्थित कल्पना येईल. आपण लग्नाच्या वेळी नवीन नाते जोडताना ज्याप्रमाणे नवरा किंवा नवरीचे नातेवाईक किंवा मित्रांशी चर्चा करतो; तो किंवा ती कशा वातावरणात वाढले आहेत हे जाणून घेतो, घराचे देखील तसेच असते! एकदा आपण घराला व्यक्ती मानल्यानंतर पुढील प्रक्रिया सारखीच असते.
तुमचे स्वतःचे घर कसे तयार झाले आहे व त्याचे निर्माते कोण आहेत हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहेघर तुमच्या कुटुंबाचा एक भाग झाल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करु नका;तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच त्यालाही तुमच्या काळजीची व आपुलकीची गरज आहेम्हणूनच तुम्ही ज्या घरात राहताय त्यासाठी थोडा वेळ व पैसे खर्च करा, तरच ते तुमचे साथीदार बनेल व आपल्या भावना तुम्हाला सांगेलमला असे वाटते त्यानंतर ते तुमचे खरे घर होईल, एका चालत्या-बोलत्या सजीव व्यक्तिप्रमाणे, मग त्या केवळ तुम्हाला बाह्य जगापासून स्वतंत्र करणा-या चार भिंती राहणार नाहीत तर ते तुमच्या सुख दु:खात सहभागी होणारे एक व्यक्तिमत्व होईल !

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




No comments:

Post a Comment