Wednesday 6 August 2014

माझी पीएमटी माझे शहर ?





















एखाद्या शहराच्या सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केल्याशिवाय तुम्ही ते शहर समजाऊन घेऊ शकत नाही. … एरॉल ओझान

एरॉल ओझान हे ईस्ट कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान यंत्रणा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी सार्वजनिक परिवहन यंत्रणेविषयी जे लिहीले आहे त्यातून त्यांना यंत्रणांची विशेषतः सार्वजनिक परिवहन यंत्रणेची किती चांगली जाण आहे हे दिसून येते. कधी काळी आपल्या पुण्यात वाहतुकीसाठी टांगा वापरला जात असे, पण ते दिवस केव्हाच सरले आहेत. आता शहरातल्या सार्वजनिक परिवहनाची जबाबदारी महान पीएमपीएमएल म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडवर आहे जिला लोक पीएमटी अर्थात पुणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखतात, आणि पीएमटी  ही बहुतेकवेळा चांगल्या कारणांऐवजी चुकीच्या कारणांसाठीच प्रसिद्धीच्या झोतात असते.  पुणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट (पीएमटी) व पिंपरी-चिंचवड म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट (पीसीएमटी) या दोन्हींच्या विलीनीकरणानंतर पीएमपीएमएलची निर्मिती करण्यात आली. पूर्वी पीएमटीवर केवळ पुणे शहराच्या हद्दीत बस सेवा देण्याची जबाबदारी होती व पीसीएमटी शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहरात बससेवा देत असे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने फेब्रुवारी २००८ साली पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी ६५० सार्वजनिक परिवहन बस खरेदी करण्यासाठी निधी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हा निधी जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नगर नूतनीकरण मोहिमेंतर्गत (जेएनएनयूआरएम) देण्यात आला. एकूण बसपैकी, २०० सेमी-लो फ्लोअर (चढण्यास सोप्या) बस असतील अशी अपेक्षा होती. पुण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या बसची संख्या ५०० आहे व पिंपरी चिंचवडसाठी १५० बस मंजूर करण्यात आल्या.सध्या, पीएमपीएमएलचा जवळपास २००० बसचा ताफा आहे पण त्यातल्या दररोज साधारण फक्त १२०० ते १३०० च बसेस रस्त्यावर असतात व त्या साधारणतः ८० हजार प्रवाशांची वाहतूक करतात. ही संघटना पुणे महापालिकेच्या हद्दीतील ३७६ मार्गांवर बस चालवते व तिचे १० बस डेपो व २० महत्वाची बस स्थानके आहेत. पीएमपीएमएलकडे ८६१० कर्मचारी वर्ग आहे

मी येथे पीएमटी हे नाव केवळ अधिक प्रचलित असल्याने प्रस्तुत लेखात वापरणार आहे. पुणेकरांना पीएमटीविषयी दररोज काहीतरी बातमी नसेल तर वृत्तपत्रात काही कमी राहून गेल्यासारखे वाटते इतकी पीएमटी ची सवय आपल्याला झालीये! हे शहर गेल्या वीस वर्षांमध्ये एखाद्या महानगरासारखे वाढले आहे, मात्र कोणत्याही शहराकडे चिरस्थायी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा असल्याशिवाय ते ख-या अर्थाने परिपूर्ण होऊ शकत नाही किंवा विकसित होऊ शकत नाही. अलिकडच्या ताज्या सांख्यिकीप्रमाणे पुणे व पिंपरी ची मिळुन अंदाजे ३९ लाख वाहने आहे, ज्यापैकी जवळपास २८ लाख दुचाकी आहेत व इतर ११ लाख चारचाकी आहेत.
ज्या शहराची लोकसंख्या जवळपास साठ लाख आहे (पुणे व पिंपरी चिंचवड एकत्र करुन), तिथे लोकसंख्येच्या दोन तृतीयांश संख्येने वाहने आहे हे एक भयंकर सत्य आहे! वाहन चालवता न येणा-या १६ वर्षाखालील व्यक्तिंना वगळले तर असा अर्थ होतो की, या शहरातील प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन आहे व ते सार्वजनिक परिवहनापेक्षा खाजगी परिवहनावर अवलंबून आहेत. या तुलनेत खाजगी बस केवळ २००० हजार आहेत, म्हणजे जवळपास ३००० लोकांसाठी केवळ एक बस आहे! मी काही परिवहन तंत्रज्ञानातील तज्ञ नाही, मात्र एक सामान्य नागरिक म्हणून व एक अभियंता म्हणून हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे मला वाटते!

आता रस्त्यावरील परिस्थिती कशी आहे याचा आपण विचार करु, पुण्यातील नागरिकांसाठी पीएमटी एकमेव अधिकृत सार्वजनिक परिवहन पुरवठादार आहे. मध्यंतरी पीएमटीने अधिकाधिक लोकांनी पीएमटीने प्रवास करावा यासाठी एक मोहीम सुरु केली होती, कुणा वरिष्ठांनी या मोहिमेसाठी एक मजेशीर घोषवाक्य तयार केले होते 'वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन"! कोणत्याही संघटनेने इतक्या पारदर्शकपणे जाहिरात केल्याचे मी तरी पाहिलेले नाही, कारण ते स्वतःच स्वीकारताहेत की तुम्हाला जर पीएमटीने प्रवास करायचा असेल तर अनिश्चित काळ वाट पाहावी लागेल! मी बिचा-या पीएमटीवर टीका करत नाही ते काम करण्यासाठी या शहरात पुरेसे वक्ते व लेखक आहेत. मी केवळ सामान्य माणसाच्या नजरेतून पीएमटीच्या स्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे व मला पीएमटीला दोष देण्याचा नैतिक अधिकार नाही कारण मी स्वतःपण क्वचितच पीएमटीने प्रवास करतो. मी माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये पीएमटीने भरपूर प्रवास केला आहे, बस थांब्यांवर उन्हा-पावसासाठी आडोसा नसताना बसची वाट पाहण्यात घालवलेल्या तासांचा आदर राखत मला असे सांगावेसे वाटते की मला शहरात ये-जा करण्यासाठी केवळ पीएमटी हा एकमेव परवडण्यासारखा पर्याय होता; व शहरातल्या लाखो लोकांसाठी अजूनही आहे. जे लोक पीएमटीवर टीका करतात त्यापैकी प्रत्यक्ष किती जण तिचा नियमितपणे वापर करतात हे मला जाणून घ्यायला आवडेल.
मला असे वाटते पीएमटी तीन आघाड्यांवर अपयशी ठरली आहे, किंवा त्यात सुधारणा आवश्यक आहे असं म्हणुया! पहिली म्हणजे तीचे मार्ग, दुसरी म्हणजे प्रवाशांच्या पायाभूत सुविधांची निकृष्ट देखभाल आणि तिसरी व सर्वात महत्वाची म्हणजे तिचा कुणीही वाली उरलेला नाही!

पहिल्या दोन आघाड्यांविषयी बरेच लिहीण्यात आले आहे कारण पीएमटीसाठी मार्गांची आखणी कशी केले जाते व ते एकमेकांना कसे जोडले जातात हे फारसे कुणाला माहिती नसते. उदाहरणार्थ माझे स्वतःचे उदाहरण पाहा, मी पटवर्धन बागेत राहतो व मला माझी बांधकामाची अनेक कामे जिथे सुरु असलेल्या बाणेर परिसरात जायचे असेल तर मला तिथे जाण्यासाठी एकच मार्ग नाही. शहर जवळपास ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असल्याने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी एकसंध मार्ग असू शकत नाही हे मी समजू शकतो मात्र एकमेकांना जोडणा-या मार्गांचे काय? माझी बस बदलायलाही काही हरकत नाही मात्र त्यांच्या फे-या व वेळांचे काय, ज्याद्वारे इच्छित ठिकाणी सहजपणे वेळेत जाता येईल. हे अवघड काम आहे हे मान्य आहे कारण पाश्चिमात्य किंवा अगदी सिंगापूर किंवा सेउलसारख्या पौर्वात्य शहरांमध्ये कार्यालयीन क्षेत्र व निवासी क्षेत्र वेगवेगळे आहेत त्यामुळे तेथे सार्वजनिक परिवहनासाठी मार्गाची आखणी योग्यप्रकारे करता येते. मात्र पुणे शहराची वाढ विविध भागांमध्ये झाली आहे, ज्यात निश्चित कार्यालयीन जिल्हे किंवा व्यवसायिक क्षेत्र (डाउन डाउन) अशी संकल्पना नाही, त्यामुळे घरुन कामाला ये-जा करणा-या प्रवाशांची संख्या व मार्ग ठरवणे हे खरोखर अवघड काम आहे. मात्र त्याचवेळी इच्छित ठिकाणी जाण्यासाठी विविध मार्गांना जोडणा-या परिवहन सेवा नसल्यामुळे अनेक लोकांना शहरात खाजगी वाहने वापरणे भाग पडते! आपण परिसराच्या आधारे वर्तुळाकार रिंग रोडसारखे (मेखला पथ) उपाय शोधले पाहिजेत व ते शहराच्या केंद्राशी जोडले पाहिजेत व यासाठी आपण शहरामध्ये अशी तीन किंवा चार केंद्रे तयार केली पाहिजेत! आणखी एक आघाडी आहे ती पीएमटीच्या पायाभूत सुविधांची; इथे आपण दोन प्रकारच्या पायाभूत सुविधांविषयी बोलत आहोत, एक म्हणजे प्रवाशांसाठीच्या व दुस-या म्हणजे यंत्रणेच्या स्वतःच्या सुविधा! खरेतर प्रवाशांसाठी बरेच काही करता येऊ शकते व केले पाहिजे, याविषयी प्रत्येक स्वयंसेवी संस्था तसेच परिवहन तज्ञ माध्यमांद्वारे ओरडून सांगत आहेत. त्यामुळे मी त्याविषयी फारसे बोलणार नाही, बस थांब्यांपासून ते मार्गांच्या नकाशापर्यंत, भाड्याच्या तपशीलांपासून ते बसच्या स्थितीपर्यंत बरेच काही बदलले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांना सेवेविषयी माहिती देणे व याबाबतीत आपण अतिशय कमी पडतो. मी सिंगापूरसारख्या नवख्या किंवा इंग्रजीचा वापर फारसा न होणा-या पॅरीसमध्ये कुणाला काहीही विचारायची गरज न पडता सार्वजनिक परिवहन यंत्रणेद्वारे सहज प्रवास करु शकतो, मात्र माझ्याच शहरात मला एखादी बस कधी येणार आहे व कुठे जाणार आहे याविषयी माहिती नसते? मला तंत्रज्ञानामुळे पुण्यात थाई किंवा इटालियन जेवण कुठे चांगले मिळते याची लगेच माहिती मिळू शकते, व अशा हॉटेलमध्ये माझी एखादी जागा सेलफोनवर किंवा लॅपटॉपच्या एका क्लिकवर आरक्षित करता येते, एवढी माहिती तंत्रज्ञानाची ताकद आहे! असे असताना मार्ग, नकाशे, पीएमटीच्या तिकीटांचे दर याविषयी सर्व माहिती देणारे ऍप का असू शकत नाही, म्हणजे कुणीही प्रवासी विशेषतः समाजातील उच्च वर्गदेखील ही सेवा वापरु शकतात! किंबहुना असे करण्याचा प्रयत्न पण कधी झालेला जाणवत नाही.त्याचप्रमाणे कर्मचा-यांसाठीच्या पायाभूत सुविधा अतिशय निकृष्ट असल्याचे दिसते, त्यांच्यासाठी व्यवस्थित डेपो नाहीत किंवा चांगले कक्ष नाहीत तसेच सर्व बस स्थानकांवर जीपीएससारख्या तंत्रज्ञानाची सुविधाही उपलब्ध नाही. तुम्ही कधी पीएमटी कर्मचा-यांचे चेहरे पाहिले आहेत का वा  कधी एखाद्या बस चालकाचा किंवा वाहकाचा हसरा चेहरा पाहिला आहे का? नाही ना कारण ते नेहमीच तणावाखाली व वैतागल्यासारखे वाटतात; याचे कारण म्हणजे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा प्रचंड असतात व यंत्रणेकडून मात्र फारशी मदत मिळत नाही! अशा कर्मचा-यांकडून आपण प्रवाशांना अनुकूल वागणुकीची अपेक्षा कशी करु शकतो? बहुतेक कर्मचा-यांना सातत्याने प्रशिक्षण तसेच समुपदेशन देण्याची गरज आहे कारण बसची स्थिती व रस्त्यावरील रहदारीची स्थिती पाहता कोणत्याही चालकासाठी त्या चालवणे एक दुःस्वप्नच आहे! यंत्रणा यशस्वी होण्यासाठी या कर्मचा-यांचे मनोबल उंचावणे आवश्यक आहे, कारण आपण पैसे देऊन यंत्रे खरेदी करु शकतो मात्र चांगली माणसे नाही, जी कोणत्याही यंत्रणेमागचा खरा स्रोत असतात!

पीएमटीच्या बाबतीत वरील दोन आघाड्यांशिवाय मला आणखी एका आघाडीवर प्रकाश टाकायचाय जिच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. कोणतीही सार्वजनिक परिवहन यंत्रणा जनतेची मालमत्ता असते म्हणजेच अप्रत्यक्षपणे लोक प्रतिनिधींची ज्यांना आपण निवडून दिले आहे व ज्यांच्या ताब्यात ही यंत्रणा आहे. पीएमटीविषयी म्हणजेच पीएमपीएमएलविषयी बोलायचे झाल्यास, पीएमसी व पीसीएमसीचे सर्व निवडून आलेले सदस्य तसेच आमदार व खासदार सार्वजनिक बस सेवेच्या पालकांसारखे आहेत, ज्यांना शहराने त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळेच पीएमटीसंबंधी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे मात्र आपल्याला प्रत्यक्षात काय दिसते? जनतेचे हे प्रतिनिधी आपल्याला बीआरटीएस, मोनोरेल किंवा मेट्रोसारखी स्वप्ने दाखवत आहेत मात्र पीएमटीविषयी विचारही करत नाहीत, जी खरे पाहता शहराच्या वाहतूक समस्येवर सर्वोत्तम तोडगा ठरु शकते!

एकीकडे मुख्यमंत्र्यांसह राज्याचे महत्वाचे मंत्री मेट्रोसारख्या प्रकल्पांची घाई करण्यात गुंग आहेत जो शहरासाठी एक पांढरा हत्ती ठरु शकतो, मात्र पीएमटीसाठी थोडा सुद्धा वेळ देण्यात त्यांना रस नाही! मेट्रो महत्वाची आहेच मात्र मेट्रोच्या केवळ एका किंवा दोन मार्गांनी, ६०० चौरस किमीच्या परिसरात विस्तारलेल्या शहराची वाहतूक समस्या सुटणार नाही! केवळ पीएमटीच ते काम करु शकते. थोडक्यात बिचा-या पीएमटीचा कुणीही वाली नाही, जो तिची चांगली वाढ व्हावी यासाठी तिला पाठिंबा देईल, चालना देईल व तिच्या गरजा पूर्ण करेल! राज्यकर्त्यांपैकी कुणीही पुढे येऊन पीएमटीला त्यांचे आपत्य म्हणून स्वीकारत नाहीत व तिची जबाबदारी घेत नाहीत, हेच पीएमटीच्या सध्याच्या खालावलेल्या स्थितीचे मुख्य कारण आहे. पीएमसी व पीसीएमसी या दोन्ही महापालिका पीएमटीला सशक्त करण्यातील त्यांची भूमिका सरळ नाकारतात, एवढेच काय पीएमटी कर्मचा-यांचे पगार देण्यासही अनुत्सुक असतात! लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यापैकी किती जण दिवसातून किमान एकदा पीएमटीने प्रवास करतात असा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे! ते त्यांच्या प्रभागातील रहिवाशांना प्रवासासाठी पीएमटी वापरण्याचे आवाहन का करु शकत नाहीत व त्यांच्या प्रभागातील पीएमटीसाठीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न का करु शकत नाहीत? उदाहरणार्थ नागरिकांनी बस थांबा किंवा पीएमटी बस दत्तक घेणे यासारख्या मोहिमा चालवता येतील!

आता रिअल इस्टेटचा पीएमटीशी काय संबंध आहे असा प्रश्न लोक विचारतील! शहरातील कोणतेही चांगले शहर पाहा, त्याच्या पाठिशी चांगली सार्वजनिक परिवहन यंत्रणा आहे, खाजगी वाहनांमुळे केवळ जीवनाचा खर्चच वाढत नाही तर ती शहरातील रस्त्यांवरील ताण वाढवतात म्हणजेच वाहतुकीची कोंडी, प्रदूषण तसेच अपघात वाढतात म्हणजेच जीवन असुरक्षित होते!  म्हणूनच नागरिकांना शांतपणे जगता यावे असे आपल्याला वाटत असेल किंवा अधिकाधिक लोकांनी आपल्या शहरात स्थलांतर करावे असे वाटत असेल तर शहरासाठी चांगली परिवहन यंत्रणा अत्यावश्यक आहे, आणि  तोच तर रिअल इस्टेट उद्योगाचा कणा आहे. कुणाही निवडून आलेल्या सदस्यांनी पीएमटीची जबाबदारी घेतली नाही, तर ती शहरातील विकसकांनी तसेच प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे, नाहीतर वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे आज पीएमटीची अवस्था मरणासन्न आहे, उद्या संपूर्ण शहर लाखो वाहनांच्या ओझ्याखाली दबलेले असेल व तेव्हा आपला सुद्धा वाली कुणीही नसेल!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment