Monday, 13 October 2014

मतदान , सामाजिक जबाबदारी आणि दिपावली !
माझ्याकडे साधने असतील तर ती वापरण्याची जबाबदारी पण माझी आहे.” …टेरी ब्रूक्स

टेरेंस डीन "टेरी" ब्रुक्स हा वैज्ञानिक कादंब-या लिहीणारा अमेरिकी लेखक आहे. तो अतिशय काल्पनिक कादंब-या लिहीत असला तरीही, त्याचे वरील विधान आयुष्याविषयीचे तत्वज्ञान आपल्याला सांगते! या आठवड्यामध्ये तीन अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मी या लेखासाठी सामाजिक जबाबदारी हा विषय घेण्याचा विचार केला! सर्वप्रथम आम्ही मतदान जागरुकता अभियानाचा भाग होतो, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांच्या अतिशय प्रामाणिक व सचोटीच्या प्रयत्नांमुळे ही संधी मिळाल्याचे मला सांगावेसे वाटते, दुसरी घटना म्हणजे मला बिझनेस मंत्रा या उद्योजकांच्या लहानशा गटामध्ये माझी व्यवसायाविषयीची मते व्यक्त करण्यासाठी वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते व तिसरी म्हणजे दिवाळी तोंडावर आलीय, मला माझ्या चमूसाठी बोनससोबत देण्यासाठी एक पत्र लिहायचे होते!
सकृतदर्शनी या तिन्ही गोष्टींचा एकमेकींशी काहीही संबंध वाटणार नाही मात्र कुठेतरी त्यात एक समान धागा आहे तो म्हणजे समाजाविषयीची जबाबदारी! आमच्या ग्राहकांना मतदानाविषयी जागरुक करण्यासाठी पत्र पाठवण्यापासून सुरुवात झाली, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या मताचे महत्व व मत देण्याच्या त्यांच्या जबाबदारीविषयी समजावून सांगण्यात आले होते! बर्गे ma^मवर खडकवासला मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी होती. शहरासारख्या दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना मतदानाविषयी जागरुक करण्यासाठी त्यांच्या चमूने कसे प्रयत्न केले हे त्यांच्याशी बोलताना समजले. तिथे बहुतेक रोजंदारीवर काम करणा-या मजुरांना संपर्क करणे व त्यांना त्यांच्या मताचे महत्व समजावून देणे हे खरे आव्हान होते. अनेक मजूर रोजगार हमी योजनेवर, शेतात किंवा एखाद्या बांधकामावर काम करतात, त्यांना टीव्ही किंवा रेडिओसारखी प्रसारमाध्यमे, वॉट्सऍप किंवा फेसबुकसारखे सोशल मीडिया उपलब्ध नसतात! त्यामुळे आम्ही एक लहानसे पत्रक तयार करायचा विचार केला ज्यामध्ये शाळेच्या मुलांद्वारे पालकांसाठी संदेश असेल की त्यांनी मतदान का करावे, बर्गे ma^ यांनी त्यांच्या मतदारसंघातील जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये ती पत्रके वाटण्यास लगेच संमती दिली. ही पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटली जातील व त्यानंतर त्यांना ती घरी घेऊन जाण्याची व पालकांना देण्याची विनंती केली जाईल अशी संकल्पना होती. ही संकल्पना अतिशय यशस्वी झाली व बर्गे ma^ यांनी आम्ही तयार केलेली जवळपास दहा हजार पत्रके वाटली, व मुलांनाही आनंद झाला, कारण त्यांना आपण पण मतदानाच्या कामाला जबाबदार असल्याची व या मोहिमेचा एक भाग असल्याची जाणीव झाली. खरी गोष्ट तर पुढे आहे, मला अनेक शाळांनी पत्रके वाटल्याची छायाचित्रे पाठवली, ही पत्रके शाळेतही लावण्यात आली. त्यातील एका छायाचित्राने माझे लक्ष विशेष वेधून घेतले ज्यामध्ये काही विद्यार्थी पत्रके हातात घेऊन त्यांच्या मैदानावर उभे होते व त्या मुलांच्या पायामध्ये चपलाही नव्हत्या! त्यावेळी मला माझ्या मुलांचे शू रॅक आठवले ज्यामध्ये सर्व ब्रँडचे शूज/सँडल/चपला खचाखच भरलेल्या होत्या, तर दुसरीकडे आपल्या देशाचे भविष्य ऑक्टोबरच्या तळपत्या उन्हात अनवाणी पायाने उभे होते ज्यांच्याद्वारे आम्ही मतदान जागरुकतेविषयी संदेश पाठवणार होतोआपल्याला स्वातंत्र्य मिळून ६८ हून अधिक वर्षे झाली आहेत व पुणे शहरासारख्या एका शाळेच्या एका छायाचित्रातील दिसते की जवळपास निम्म्या मुलांची चपलांसारखी मूलभूत गरजही पूर्ण होत नाही! आपल्याला स्वतःला प्रगतीशील, विकसनशील व २०००च्या शतकातील भविष्याचे शहर म्हणवून घेण्याचा काय अधिकार आहे! दुसरीकडे दिवाळीच्या निमित्ताने शू विक्रीच्या शेकडो जाहिराती मी वाचतो, ज्यामध्ये जगातील सर्व नामवंत ब्रँड्स दाखवलेले असतात. हे ब्रँड खरेदी करणारे नागरिकही मतदारच आहेत हे नक्की; तर मग केवळ मतदान करुन आपली जबाबदारी संपते का? केवळ विचार करा आपल्या मुलांसाठी असे ब्रँडेड शू खरेदी करणा-या प्रत्येक व्यक्तिने आणखी जोड खरेदी केला व अशा गरजू मुलांना दिला तर त्यातूनही एक जबाबदार नागरिक दिसणार नाही का?
वर उल्लेख केल्याप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे मला एका बिझनेस क्लबने व्याख्यानासाठी बोलावले होते. हे आमंत्रण माझा जवळचा मित्र विक्रांत याने दिले होते व आतापर्यंत मला व्याख्याने द्यायची सवय झाली असली तरीही एक व्यावसायिक म्हणून व्याख्यान देण्यासाठी मला आत्तापर्यंत कुणीही बोलावले नव्हते! मात्र तरीही मी ते स्वीकारले कारण मला केवळ मी माझ्या व्यवसायात काय करतोय हे सांगायचे होते. सुदैवाने व्याख्यान व विचारांची देवाणघेवाण अतिशय चांगली झाली, मुक्त चर्चा सत्रात एका महिलेने मला प्रश्न विचारला की उलाढाल किंवा नफ्यातील २% वाटा सीएसआर उपक्रमांसाठी देण्याच्या केंद्र सरकारच्या अलिकडच्या धोरणाविषयी तुमचे काय मत आहे! ज्यांना सीएसआर म्हणजे काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सीबीलीटी  म्हणजेच सामाजिक जबाबदारी; सोप्या शब्दात मोठ्या व्यावसायिक समूहांनी त्यांच्यासारख्या सोयीसुविधा नसलेल्या किंवा सुदैवी नसलेल्या समाजातील घटकांना त्यांच्या संपत्तीचा काही भाग देण्यासाठी केलेले प्रयत्न! यामध्ये पर्यावरण संवर्धन, शहरी किंवा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी काम करणे व ब-याच गोष्टींचा समावेश होतो. मी म्हटले की मला असे कोणतेही धोरण माहिती नाही पण केवळ कायदा केल्याने गुन्हे कमी होत नाहीत असे माझे मत आहे!  देशातील सर्व व्यावसायिकांविषयी आदर बाळगून मला असे सांगावेसे वाटते की त्यांना ज्या धोरणाचे किंवा कायद्याचे पालन करायचे नाही त्याला बगल देण्याची पुरेशी साधने त्यांच्याकडे आहेत. कोणतेही धोरण किंवा नियम केल्यामुळे सीएसआर टिकणार नाही तर सीएसआरविषयी प्रत्येक व्यक्तिला काय वाटते त्यावरुन त्याचे अस्तित्व ठरेल! सर्वप्रथम आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तिला मदत करण्यासाठी, मदत करण्याची आपली क्षमता असेल तर कोणत्याही कायद्याची काय गरज आहे! केवळ कॉर्पोरेटच का, प्रत्येक व्यक्तिचीच समाजाविषयी काही जबाबदारी नाही का? आपल्यासारख्या सुदैवी नसलेल्या आपल्याच देशाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी आपल्याला धोरण तयार करावे लागते ही खरी शरमेची बाब आहे! मात्र ज्या देशात आपण केवळ वाहतूक पोलीस असेल तरच रहदारीमध्ये सिग्नलचे पालन करतो, अशावेळी आपल्याकडून आणखी काय अपेक्षा करता येईल! मला असे वाटते की सीएसआरच्या पातळीवरही एक व्यक्ती म्हणून मला काय करता येईल हे अधिक महत्वाचे आहे. सीएसआरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणे आवश्यक नाही, गरजू मुलासाठी एक जोडी पादत्राणे खरेदी करणे ही देखील एखाद्या व्यक्तिची सीएसआर असू शकते; यासाठी केवळ इतर लोकांच्या गरजांचा विचार केला पाहिजे ज्यांच्याकडे त्या पूर्ण करण्यासाठी साधने नाहीत! मी त्या महिलेला असे उत्तर दिले.
तिसरी घटना म्हणजे दिवाळी तोंडावर आलीय त्यामुळे अर्थातच आपल्या चमूला बोनस द्यायची वेळ आहे. सध्याचे वातावरण व्यवसायासाठी फारसे उत्सवी नाही मात्र आपल्याकडे जे काही आहे ते स्वतःच्याच चमूला वाटणे हा देखील सीएसआर उपक्रमाचाच एक भाग आहे; कारण जर मला माझ्या चमूला आनंदी ठेवता येत नसेल तर मला जीवनातील ऐषाराम उपभोगण्याचा काय हक्क आहे! शेवटी आपण सगळे जगण्यासाठी पैसे मिळवतो मात्र आपण मिळालेल्या पैशांचे काय करतो यावर आपण कोण झालो आहोत ते ठरते! प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये मी माझ्या चमूला एक लहानसे पत्र लिहीतो व माझ्या शुभेच्छांसह माझे तत्वज्ञान त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमच्या चमूला तुम्हाला व्यवसायातून नेमके काय हवे आहे हे कळले नाही तर तुम्हाला जे हवे आहे ते एकट्याने साध्य करणे शक्य होणार नाही! माझ्या चमूसाठी मी जे काही लिहीले ते इथे देणे प्रस्तुत ठरेल म्हणून मी त्यांना लिहीलेले पत्र तुम्हाला सर्वांना वाचण्यासाठी देत आहे
प्रिय चमू,

नेहमी लक्षात ठेवा की सुविधेसोबतच जबाबदारीही येते." ...सँड्रा रॉड्रिग्ज बॅरन.

सँड्रा रॉड्रिग्ज बॅरन यांच्या पहिल्याच कादंबरीला आंतरराष्ट्रीय लॅटीनो पुस्तक पुरस्कार मिळाला! खरच आपल्या जगाविषयीच्या जबाबदा-या त्यांनी किती साध्या शब्दात मांडल्या आहेत! मित्रांनो, दिवाळी जवळ आली आहे, सगळे जण उत्साहात असतील व असलेच पाहिजे. मात्र त्याचवेळी भोवताली काय घडतंय याकडे दुर्लक्ष करु नका; अर्थव्यवस्था अतिशय अवघड टप्प्यातून जातेय व कुणालाही आपल्या भविष्याची खात्री नाही. देशाने नेतृत्व व राजकीय आघाडीवर ऐतिहासिक बदल पाहिला आहे व आपल्याला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे; मात्र लक्षात ठेवा कोणत्याही जहाजाला शांत पाण्यातून प्रवास करण्याआधी वादळात टिकावे लागते!
विविध उद्योगांमधील परिस्थिती पाहता आपल्याला एका अवघड टप्प्याला तोंड द्यावे लागणार आहे, घर ही मूलभूत गरज आहे हे मान्य असले तरीही रिअल इस्टेट उद्योग इतर उद्योगांच्या कामगिरीवर टिकतो या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपण अशा वेळी बरीच चांगली कामगिरी केली आहे मात्र आपले लक्ष विचलित होऊ न देणेही अतिशय महत्वाचे आहे. आपण हसतमुखाने दिवाळीचे स्वागत करु तेव्हा याची आठवण ठेवा की समाजातील अनेक घटक आपल्यासारखे सुदैवी नाहीत. आपण आपल्या आप्तेष्टांसह उत्सव साजरा करत असताना कुठेतरी कुणाकडे आनंदी होण्याचे एकही कारण नसेल!
तुम्ही तुमचा आनंद उपभोगत असताना अशा एखाद्या व्यक्तिलाही आनंद द्या, त्यामुळे निश्चितच तुमचा दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल व आपली संजीवनीची खरी संस्कृती जपली जाईल!

माझ्या तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना अनेक शुभेच्छा! ही साथ देण्यासाठी आपले आभार!
शुभ दीपावली!!

सर्वात शेवटी लक्षात ठेवा, मतदान यंत्रावरील बटण दाबणे ही सामाजिक जबाबदारीच्या मार्गाची केवळ सुरुवात आहे, आनंदी व सुदृढ समाज हे त्या मार्गांचे अंतिम स्थानक आहे!


·        हे जास्तीत जास्त लोकांना सांगा Jसंजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment