Sunday, 19 October 2014

पुणे शहराच्या रक्षकांनो !प्रति,

पुणे शहराच्या रक्षकानों

पुणे शहरातून राज्य विधानसभेवर निवडून गेलेल्या सर्व उमेदवारांसाठी मी जेव्हा काहीतरी लिहीण्याचा विचार केला तेव्हा तुम्हाला संबोधित करण्यासाठी माझ्या मनात पहिल्यांदा याच ओळी आल्या! ब-याच जणांना कदाचितमोदी ब्रिगेड’, हा शब्द वापरायला आवडणार नाही, मात्र ज्याप्रकारे प्रचार मोहीम राबविण्यात आली त्यातून याला एक निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणा-या माणसाची ब्रिगेड किंवा सैन्य असेच म्हणावे लागेल! विद्यमान आमदार तसेच नगरसेवकाच्या भूमिकेतून तुम्ही तुमच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांसाठी तुमचे अभिनंदन. इथे मला तुमच्याकडे अतिशय आशेने पाहणारा या शहराचा एक नागरिक म्हणून काहीतरी सांगावेसे वाटते व त्याच भावना खालील शब्दात लिहित आहे …….
काहीवेळा अतिशय सुंदर गोष्टी अचानक आपल्या आयुष्यात येतात. आपल्याला त्या नेहमी समजतातच असे नाही, मात्र आम्हाला त्यावर विश्वास असला पाहिजे. मला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न विचारावेसे वाटतात, मात्र काहीवेळा अगदी थोडासा विश्वास ठेवल्यानेही फायदा होतो....लॉरेन केट.

लॉरेन केट या तरुण वर्गासाठी  लेखन करणा-या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक विक्री होणा-या कादंबरीकारांपैकी एक आहेत. त्यांच्या पुस्तकांचा जवळपास तीस भाषांमध्ये अनुवाद झाला असून ती जगभरात वाचली जातात. नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पुणे शहरात आपण जे पाहिले त्यावरुन मला त्यांचे हे प्रसिद्ध विधान आठवले. सत्तेत कोण येईल, आघाडी स्थापन होईल किंवा नाही यासारख्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील, मात्र पुणे शहराने इतिहास घडवला! विधानसभेच्या शहरातील सर्व आठही जागा एकाच पक्षाने जिंकल्या, ते देखील केंद्रात सत्तेत असलेल्याच पक्षाने व याच पक्षाची भूमिका महाराष्ट्रात सरकार स्थापनेमध्ये महत्वाची असणार आहे हे तथ्य आहे! मी नेहमीच म्हटलंय की मी कुणी राजकीय तज्ञ नाही व हा लेख राजकीय समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी नाही; तर मग तर मग या निकालांचे शहराच्या दृष्टीने काय वैशिष्ट्य आहे?
या निकालाचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल, १९९५ साली राज्यात सेना-भाजपाचे सरकार होते व केंद्रात भाजपाचे आघाडी सरकार होते. तेव्हाही शहरातील सर्व आमदार एकाच पक्षाचे नव्हते व नंतर राज्यामध्ये तसेच केंद्रात आघाड्यांचे सरकार होते, जोडतोडीचे राजकारण सुरु होते व शहराच्या राजकारणातही असेच चित्र होते. यावेळी शहराचे चित्रच पालटले आहे, कारण यापूर्वी कधीही आठ मतदारसंघांपैकी दोन किंवा तीनपेक्षा अधिक आमदार एकाच पक्षाचे नसायचे. बरेच जण म्हणतील त्यात काय मोठेसे, ही लोकशाही आहे व आपण आपल्याला हवे ते निवडण्यास स्वतंत्र आहोत! मात्र आपण तसे करण्याचा परिणाम पाहिला आहे; लोकशाहीतून शहराच्या विकासासाठी प्रत्येकवेळी योग्य परिणाम दिसेलच असे नाही व यापूर्वी आपण हे सिद्ध केले आहे! विविध पक्षांचे आमदार व सत्ताधारी पक्ष काहीतरी एक स्वतःचाच कार्यक्रम राबवत असल्याने, शहरातील आमदार कधीही शहराच्या समस्यांविषयी संघटित नव्हते व गेली जवळपास पंधरा वर्षे एकत्र येऊन कोणतीही समस्या सोडविण्यात अपयशी ठरले! ऐक्य ही यशाची किल्ली आहे व पुण्यामध्ये ही किल्लीच हरवली होती, मात्र योग्य उमेदवार न निवडण्यासाठी नागरिकच जबाबदार होते.याचा परिणाम असा झाला की आमदार कधीही शहराच्या विविध समस्यांवर एकजूट झाले नाहीत, विविध समस्यांविषयी त्यांच्या विविध भूमिका होत्या, याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे डोंगर माथा, डोंगर उतार किंवा बीडीपी म्हणजेच जैव विविधता उद्यान, ज्यामुळे शहराची संपूर्ण विकास योजना अनेक वर्षे रखडली आहे. याचे काय कारण आहे? बीडीपी आरक्षणाचे समर्थन किंवा विरोध करण्यासंदर्भात प्रत्येक पक्षाची स्वतःची कारणे होती किंबहुना हित किंवा अहंभाव होता व पक्षाचे आमदार या हिताचे किंवा अहंभावाचे प्रतिनिधित्व करत होते ज्यामुळे शहराच्या विकास योजनेचा म्हणजेच डीपीचा पूर्णपणे सावळा गोंधळ झाला! पक्षांच्या परस्परविरोधी हिताची कितीतरी उदाहरणे आहेत, उदाहरणार्थ एका पक्षाला बीआरटी हवी असते तर दुस-या पक्षाला नको असते. त्यानंतर कचरा डेपोच्या ठिकाणाविषयी तसेच कचरा टाकण्याच्या सुविधेविषयी समस्या आहे, सध्याचा कचरा डेपो फुरसुंगी गावात आहे, मात्र त्या भागातील आमदाराचे तिथे कचरा टाकू देण्याविषयी वेगळे मत आहे. खरेतर कोणत्याही आमदाराला कचरा डेपोसाठी त्याच्या मतदारसंघात जागा द्यायची इच्छा नाही कारण त्यामुळे दुस-या आमदाराला फायदा होईल मात्र तो स्वतः अडचणीत येऊ शकतो! आणखी एक प्रसिद्ध व तितकीच महत्वाची समस्या आहे पीएमसीच्या आधीच विस्तारलेल्या हद्दीत आणखी नवीन गावांचा समावेश करण्याची. इथेही राजकीय हिताचाच संघर्ष होता व ही समस्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यानंतर सर्वात प्रसिद्ध किंवा खरतर कुप्रसिद्ध मुद्दा आहे पीएमआरडीएचा म्हणजेच पुणे महानगर प्रादेशिक नियोजन प्राधिकरणाचा, ज्याच्या हाती संपूर्ण पुणे प्रदेशाचे भवितव्य आहे, मात्र निवडून आलेल्या आमदारांमध्ये एकजूट नसल्यामुळे व या महत्वाच्या विषयावरील विविध पक्षांच्या परस्परविरोधी हितामुळे सर्वच पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा महत्वाचा मुद्दा अगदी पिछाडीवर गेला आहे! कुणे एके काळी हे शहर संपूर्ण देशातील सर्वात सुरक्षित शहर मानले जायचे, मात्र जर्मन बेकरी बाँबस्फोट व जंगली महाराज मार्गावरील स्फोटांच्या मालिकेनंतर आपण तो दर्जाही गमावून बसलो आहोत. मात्र इथेही शहरातील पोलीस दलाचे सशक्तीकरण किंवा सीसी टीव्ही यासारख्या विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे व विविध पक्ष त्यावरुन केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात हे आपण पाहिले! मेट्रो व सार्वजनिक वाहतूक ते धरणातून पुरेसा  पाणी पुरवठा, असे असंख्य विषय आहेत ज्यावर आपल्या आमदारांनी संघटितपणे कृती केली पाहिजे, मात्र तसे झालेले नाही हे तथ्य आहे! या सर्व विषयांचा एक समान घटक आहे तो म्हणजे आमदारांमध्ये एकजूट नाही त्यामुळे राज्याच्या धोरणाच्या आघाडीवर हे शहर एखाद्या अनाथालयासारखे वाढले आहे!
गेल्या काही वर्षांमध्ये असे दिसून आले आहे की आमदारांनी शहरापेक्षाही त्यांच्या पक्षाला प्राधान्य दिले व तरीही ते चालून गेले कारण शहरातील परिस्थितीतच तशी होती असे या आमदारांच्या चांगल्या हेतूविषयी पूर्णपणे आदर बाळगून सांगावेसे वाटते. शहरातील सर्व आठ  आमदारांनी एक चमू म्हणून काम करणे अपेक्षित आहे जो लढवय्येंच्या टोळीसारखे असेल, व सत्तेत जे सरकार येईल त्यांच्याशी शहरांच्या समस्यांसाठी प्राणपणाने लढा देईल व नागरिकांच्या समस्या सोडवेल कारण ते शहराचे रक्षकच आहेत! किमान सामान्य माणसाची तरी अशीच अपेक्षा आहे, मात्र ही चमू आपापसातच भांडत असल्याचे आपण आत्तापर्यंत पाहिले आहे. आत्तापर्यंत तसे करण्यासाठी त्यांच्याकडे विविध कारणे होती, जसे की ,पक्षांच्या धोरणांमुळे मी अगतिक आहे किंवा माझा त्यास पाठिंबा आहे मात्र इतर आमदार त्यांच्या पक्षासाठी त्याला विरोध करताहेत!” नागरिकांनाही वैयक्तिक आमदारांची ही कारणे स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नव्हता कारण ब-याच प्रकरणांमध्ये ती वस्तुस्थिती होती.
वरीलपैकी सर्व मुद्दे या शहरातील रिअल इस्टेटचे भविष्य निश्चित करण्यासाठी अतिशय महत्वाचे होते व महत्वाचे आहेत. शेवटी रिअल इस्टेट म्हणजे तरी काय तर या शहरातील लाखो नागरिकांना एक व्यवस्थित, साधे व परवडण्यासारखे घर उपलब्ध करुन देणे, ज्यांनी स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या आशेने एकाच चमूला निवडून आणले आहे!
यामुळे नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल केवळ विशेषच नाहीत तर अतिशय विशेष आहेत! कारण पहिल्यांदाच आपल्याकडे ख-या अर्थाने एक चमू आहे जो शहराच्या समस्यांसाठी एकजूट होऊन लढा देऊ शकत नसल्याची कारणे देऊ शकत नाही. आपण पुण्याच्या नागरिकांनी अतिशय शहाणपणाने मतदान केले आहे व हे सर्व आमदार राज्य सरकारमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक आहेत, ते एकाच पक्षाचे असल्यामुळे शहराच्या समस्या सोडविताना पक्षाचा कार्यक्रम व हित यासारख्या गोष्टी अडथळा ठरणार नाहीत. किंबहुना त्यांचा मनात आता केवळविकास, विकास आणि विकास हाच कार्यक्रम असला पाहिजे. स्पायडरमॅन या प्रसिद्ध चित्रपटातील संवादाप्रमाणेमोठ्या शक्तिसोबतच मोठ्या जबाबदा-याही येतात”, या शहराने एकाच चमूला लाखो मतांच्या स्वरुपात अतिशय मोठी ताकद दिली आहे. आता ही ताकद वापरुन जबाबदा-या पार पाडाव्यात अशी या शहराची अपेक्षा आहे व या अपेक्षा अतिशय कमी आहेत. कुणालाही मोफत घरे किंवा मोफत बस सेवा किंवा मोफत शिक्षण किंवा तत्सम सुविधा नको आहेत. तसेच कुणीही रात्रभर खुली राहणारी उद्याने किंवा उड्डाणपूल किंवा कचरारहित रस्ते व नळाला चोवीस तास पाणी अशी मागणी करत नाही. तर केवळ या निवडून आलेल्या चमूने शहराला भेडसावणा-या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा व त्या सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत एवढीच या शहराची गरज आहे! म्हणतात ना आप एक कदम आगे बढो हम दस कदम आगे बढने को तय्यार है म्हणजेच तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेने केवळ एक पाउल टाका, यामुळे लाखो लोकांना खात्री वाटेल की त्यांनी योग्य व्यक्तिवर विश्वास ठेवला आहे! मला असे वाटते की शहराची हीच अपेक्षा आहे व विश्वास अतिशय नाजूक असतो एकदा तो तुटला की भरुन न येणारे नुकसान होते! वर्षानुवर्षे या शहराला अनेक खोट्या आशा दाखवण्यात आल्या आणि या खोट्या आशांनी यंत्रणेवरील आपला विश्वास नष्ट झाला आहे; या शहराने भारताला एक अधिक चांगले राष्ट्र बनविण्याचे स्वप्न दाखविणा-या, विकासाची हाक देणा-या एका माणसाला उरलासुरला विश्वास एकवटून प्रतिसाद दिला आहे! लक्षात ठेवा एखाद्याचा विश्वास ही कुणाकडचीही सर्वात मोठी शक्ती असू शकते व आता तुमच्याकडे शक्ती असल्यामुळे; लोकांचा हा विश्वास तलवारीसारखा वापरणे व या शहराच्या विकासाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तसे झाले तर तो

ख-या अर्थाने विश्वास या शब्दाचा आदर व गौरव असेल! या लढाईमध्ये आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी आहेत!मला मतदान करणा-या एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून एवढेच सांगायचे होते, कारण पाच वर्षातून एकदा मत देणे हेच त्याच्या हाती असते! चला तर मग केवळ राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील सर्वोत्तम चमू होऊन शहराचा मान वाढवू व शहराचा अशाप्रकारे विकास करु की, आपल्याला कुठल्याही शहराशी तुलना करण्याची गरजच नाही झाली पाहिजे तर, लोक आपल्याशी तुलना करतील!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स


(०९८२२० ३७१०९)


No comments:

Post a Comment