Tuesday, 20 January 2015

पक्षी, पक्षीमित्र आणि बिल्डर्स !


आपलं आयुष्य सुंदर क्राँकिटच्या भिंती नाहीत तर उडणा-या पंखांचे रंग बनवितात संजय.

 मी इतकी वर्षं लिहीत असूनही आज पहिल्यांदाच एखाद्या विषयाची सुरुवात करण्यासाठी स्वतःचंच अवतरण वापरण्याचं धाडस करतोय. मी अर्थातच त्यासाठी माफी मागतो कारण मी कुणी महान तत्वज्ञ, प्रसिद्ध व्यक्ती किंवा विचारवंत नाही की माझ्या अवतरणांची मोठी यादी असावी. मात्र माझे उत्साही निसर्ग मित्र अनुज खरे यांनी जेव्हा मला १८व्या राज्य पक्षी मित्र संमेलनात व्याख्यान व सादरीकरणासाठी बोलावलं तेव्हा माझ्या सादरीकरणाची सुरुवात करताना माझ्या तोंडात हेच शब्द आले. मला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षांशी संबंधित दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळालं; त्यातला बर्ड फेस्ट हा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाला व राज्य पक्षी मित्र संमेलन जानेवारीच्या दुस-या आठवड्यात होतं. आता अनेक जणांना आश्चर्य वाटेल की त्यात काय तितकसं मोठं, जसे आकाश किंवा तारे निरीक्षक असतात, तसेच पक्षी निरीक्षक, त्यामुळे बर्ड फेस्टसारख्या कार्यक्रमांचं काय वेगळेपण आहे? दोन्हीही कार्यक्रमांमध्ये पक्षी संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणा-या अधिका-यांशी चर्चा तसंच पक्ष्यांविषयीच्या छायाचित्रांचाही समावेश होता. तर या छायाचित्र प्रदर्शनामधल्या प्रवेशद्वारापाशीच  असलेल्या  एका साध्याशा चिमणीच्या मोठ्या छायाचित्राने माझं लक्ष वेधून घेतलं. अनेक पाहुणे त्या चिमणीच्या छायाचित्रापाशी थांबत होते व खरंच चिमण्या आजकाल दिसतच नाहीत अशा अर्थाचं त्यांचं बोलणं मला ऐकू येत होतं! पुण्याच्या सामाजिक जीवनातले दिग्गज यावेळी उपस्थित होते त्यांनीही चिमण्यांसारखे सामान्य पक्षी दुर्मिळ होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पीएमसीच्या आयुक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, ते देखील शहरातून चिमण्या का नाहिशा होताहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते! यातुनच माझं विचार चक्र सुरु झालं, समाजाचं सौंदर्य तुमच्या आजूबाजूला आढळणा-या विविध प्रकारच्या जीवांमुळे समृद्ध होतं ज्याला आपण जैव विविधता म्हणतो! आपलं शहर मात्र याच्या उलट्या दिशेनं प्रवास करतंय हे सत्य आहे.

या पार्श्वभूमीवर मी जेव्हा सादरीकरण करायला गेलो, तेही पक्षी व बांधकाम व्यावसायिक यासारख्या विषयावर तेव्हा श्रोते माझ्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यासाठी तयार होते, त्यातले बरेच जण माझ्याकडे पक्ष्यांवर अत्याचार करणारा तो हाच अशा नजरेने पाहात होते! मी वरील अवतरणाने माझ्या सादरीकरणाला सुरुवात केली. मी सुरुवातीलाच हे मान्य केलं की पक्षी संवर्धनाच्या बाबतीत बांधकाम व्यवसायिकांची जी भूमिका आहे त्यामुळेच आपल्याला ही अशाप्रकारची संमेलनं भरवावी लागतात! कुठेही काहीही चुकीचं होत असेल तर कुणावरतरी दोषारोप करणं सोपं असतं आणि विशेषतः समोर लक्ष्य बांधकाम व्यावसायिक किंवा विकासक असतील तर काम आणखी सोपं होतं! मात्र आपण जेव्हा वाघांच्या अस्तित्वाला धोका आहे असं म्हणतो तेव्हा आपण केवळ एका वर्गाला म्हणजे उदाहरणार्थ फक्त शिका-यांना दोष देतो का? याचं उत्तर अर्थातच नाही असे येईल, कारण वाघांच्या अस्तित्वासाठी जबाबदार असलेली संपूर्ण यंत्रणा त्यासाठी दोषी आहे व त्यामध्ये वन विभागाचा तसंच जंगलांच्या आजूबाजूला राहणा-या लोकांचा, वाघांच्या अभयारण्याभोवतीच्या विकासाशी संबंधित धोरणे व अशा शेकडो घटकांचा समावेश होतो जी वाघांचं भविष्य ठरवतात!
याचप्रमाणे चिमण्या किंवा बुलबुल किंवा मैना किंवा खंड्या यासारख्या पक्षांच्या सर्वत्र   आढळणा-या कोणत्याही प्रजाती घ्या त्या संपूर्ण यंत्रणेवर किंवा मग शहर किंवा गावाभोवताच्या वातावरणावर अवलंबून असतात. ज्याप्रमाणे शिकारी वाघांचे आयुष्य कठीण करतात, त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायिकही पक्षांचे आयुष्य अवघड करणारा केवळ एक दुवा आहे! मात्र हेच शिकारी बहुतेक जंगलाच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक असतात व त्यांनी ठरवले तर ते वाघांचे संरक्षणही करु शकतात, याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकही पक्षांचे संरक्षक होऊ शकतात! कारण बांधकाम व्यावसायिक कुणासाठी घर बांधतात? अर्थातच सामान्य माणसासाठी. आता हा सामान्य माणूस बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या इमारतीभोवती पक्षांसाठी काय सोय केली आहे हे विचारतो का? मला माझ्या पंचवीस वर्षांच्या काळात असे विचारणारा एकही ग्राहक भेटला नाही! त्यासाठी केवळ एखाद दुसरी इमारत नाही तर संपूर्ण शहराच्या पर्यावरणाचा ज्याला आपण नागरी विकास म्हणतो, पक्षांना डोळ्यामोर ठेवून विचार केला पाहिजे. कारण आपण जेव्हा म्हणतो हिरव्या किंवा निसर्गपूरक इमारती तेव्हा त्याचा अर्थ केवळ माणसांसाठी नाही तर त्यामध्ये आजूबाजूच्या संपूर्ण जैवविविधतेचा समावेश होतो, ज्याचा पक्षी एक अतिशय महत्वाचा भाग आहेत. आता पुन्हा अनेकजण म्हणतील की आजूबाजूला कितीतरी झाडे आहेत, यापेक्षा अधिक ते पक्षांसाठी काय करु शकतात? झाडे लावल्याने पक्षांची केवळ एक गरज पूर्ण होईल. पक्षांसाठी एक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला पक्षांचे पूर्ण जीवन चक्र समजून घ्यावे लागेल. उदाहरणार्थ चिमणी किंवा बया यासारखे पक्षी स्वतःचे घरटे बांधू शकत नाही. चिमणी किंवा बुलबुलला मंगलोरी खापरांचे छप्पर किंवा वाड्यातील मातीच्या भिंतीमधील लहानशा फटीसारखी सुरक्षित जागा मिळाली तरच घरटे बांधता येते.  हे पक्षी अशा ठिकाणी वाळलेले गवत, गळलेली पाने किंवा तत्सम साहित्याने घरटे तयार करु शकतात केवळ त्यांच्या घरट्यासाठी त्यांना सुरक्षित आधार हवा असतो. तसंच त्यांना जवळपास पाण्याचा स्त्रोत व नवजात पिल्लांना भरविण्यासाठी अन्न हवे असते.

आता आपल्या आजूबाजूला पाहा, आपल्याला काय दिसतं? सगळीकडे क्राँकिटच्या भिंती, काचेची तावदाने, laa^न्स शोभेची सुंदर झाडे ज्यांना फळे नाहीत किंवा जवळपास धान्यांची शेते नाहीत विचार करा अशा परिस्थितीत ती बिचारी चिमणी कशी जगेल? तसेच पक्षांना मातीत अंग घुसळण्यासाठी माती हवी असते, आपल्या काँक्रिटच्या जंगलामध्ये आजाबाजूला अशा प्रकारची माती अतिशय कमी असते वा नसतेच त्यामुळे याबाबतीतही त्यांची गरज पूर्ण होत नाही. तसेच वाढते ध्वनी व वायू प्रदूषण हे देखील पक्षी शहरातून बाहेर जाण्याचे एक प्रमुख कारण आहे. पुण्यातल्या जवळपास चाळीस लाख वाहनांमधून निघणा-या आवाजाची उच्च पातळी, त्यातून निघणारा धूर चिमण्यांसारखे लहान पक्षी सहन करु शकत नाही. यात भरीस भर म्हणून वर्षभर आपल्याकडे लग्नसमारंभ किंवा कुणाच्या तरी जयंती नाहीतर पुण्यतिथीच्या मिरवणुका असतात त्यात डीजे व डॉल्बी यंत्रणा लावल्या जातात! अशा प्रसंगी त्यातून होणा-या गोंगाटामुळे पक्षीच काय माणसेही शहरातून दूर पळतील! त्याशिवाय अत्याधुनिक सौंदर्यदृष्टिने बांधलेल्या इमारतींमध्ये पक्षांना घरटे बांधण्यासाठी जागाच नसते; किंबहुना आपल्याला पक्षांच्या काड्या-चिंध्यांनी बांधलेल्या घरट्यांनी, त्यांच्या घाणीने किंवा सांडलेल्या अन्नाने आपल्या उंच इमारतींचे सौंदर्य बिघडवायचे नसते!  आपल्या शहरात दोन नद्या आहेत व अनेक नैसर्गिक ओढे आहेत मात्र सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे? नद्यांचे मोठे नाले झाले आहेत; ओढ्यांवर समाजाच्या प्रत्येक घटकाने अतिक्रमण केले आहे किंवा त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे, त्यामुळे त्यावरील झाडे-झुडुपे नष्ट झाली आहेत! आता आपल्याला फक्त घार, कावळे व कबुतरे एवढेच काय ते पक्षी आपल्या तथाकथित विकसित शहरात पाहायला मिळतात! पुण्यामध्ये आपल्याकडे नाईक बेट किंवा आजूबाजूचा डोंगराळ परिसर आहे (त्याला सलीम अली पक्षी अभयारण्य असेही म्हणतात) मात्र वनविभाग किंवा स्थानिक संस्था दोघांकडेही तिथल्या झाडाझुडुपांचे संरक्षण करण्यासाठी पैसे नाहीत किंवा किमान या संस्था तसा दावा तरी करतात! त्यामुळे पक्षांसाठी कोणतेही हक्काचे ठिकाण नाही किंवा संपूर्ण शहरात पक्षांची काळजी कुणी करत नाही व आपण याला प्रगती किंवा विकास म्हणतो! त्यानंतर आपल्यासाठी पीएमसी, नागरी विकास विभाग, वास्तुरचनातज्ञ व रचनाकार असतात तसेच आपले घर आरामदायक बनविण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा असतात, मात्र बिचा-या पक्षांच्या घराविषयी कुणीही विचार करत नाही! आपल्याकडे उद्यान विभाग आहे मात्र तेवढेच पुरेसे आहे का कारण आजूबाजूला एवढी झाडे असूनही पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल व आपण काय करत आहोत हे दोन प्रश्न आहेत जे आपण पक्षांच्या बाबतीत स्वतःला विचारले पाहिजेत! दुर्दैवाने राज्यभरात, प्रत्येक गावात किंवा महानगरात पक्षांची अशीच परिस्थिती आहे.

खरंतर पक्षांच्या गरजा वर नमूद केल्याप्रमाणे अतिशय कमी असतात व आपल्या इमारतींची रचना करताना पक्षांचाही थोडासा विचार व काळजी केली पाहिजे.आपण ईमारती भोवतालच्या काही खुल्या जागांचे नियोजन करु शकतो जिथे घनदाट झाडी असेल, वेली व झुडुपे असतील म्हणजे पक्षांना घरटी बांधायला जागा मिळेल व कृमी तसेच कीटकांच्या स्वरुपात अन्न मिळेल. त्याशिवाय फळे धारण करणारी झाडे लावण्याचा तसेच काही पट्ट्यात माती उघडी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. मळे व शेत जमीनींची जागा झपाट्याने इमारती घेत आहेत. म्हणूनच आपल्या घराला लागून असलेल्या गच्चीत आपण पक्षांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करु शकतो, सदनिकाधारकांनी रोज तिथे एका वाटीत थोडेसे धान्य व दुस-या वाटीत पाणी ठेवावे. यामुळे लहान पक्षांना अन्न व पाणी मिळेल, याचा नक्की उपयोग होतो हे मी माझ्या घराच्या तसंच कार्यालयाच्या गच्चीवर पक्षांसाठी ठेवलेल्या दाणा-पाण्यावरुन सांगू शकतो. दररोज किमान दहा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे दाणा-पाण्यासाठी येतात त्यामध्ये चिमण्या व बुलबुलचाही समावेश असतो! त्याशिवाय घराला लागून असलेल्या गच्चीमध्ये आपण जमीनीपासून सुरक्षित अंतरावर खेळती हवा असलेली कृत्रिम घरटी ठेवू शकतो; मात्र अशा ठिकाणी पक्षांना गोंगाट जाणवणार नाही, त्यांना सुरक्षित वाटेल याची काळजी घ्यावी. या ठिकाणी आजूबाजूला आपण लहान झुडुपे, फुलांचे वाफे किंवा अगदी कुंड्यांमध्येही झाडे लावू शकतो! आपण आपल्या इमारतींचे नियोजन करताना पक्षांवर संशोधन करणा-या पक्षिवैज्ञानिकांनाही सहभागी करुन त्यांच्या सूचना घेऊ शकतो. डॉ. सतिश पांडे यांनी यासंदर्भात आपल्याला काही सूचना दिल्या आहेत, उदाहरणार्थ सर्वात वरच्या मजल्यावरील गच्चीच्या सुरक्षा भिंतींमध्ये काही छिद्र ठेवता येतील ज्यामध्ये पोपट तत्सम पक्षी त्यांचे घरटे बांधू शकतात. आम्ही ते केले आहे व अशा छिद्रांमध्ये पोपटाने घरटे बांधल्याचे दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तरुण पिढीला जागरुकता मोहिमेमध्ये सहभागी करुन घ्या त्यामुळे तिची ताकद वाढेल. गेल्या दिवाळीमध्ये आपण फटाकेविरोधी मोहीम शाळांमध्ये राबवली त्यामुळे फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले, फटाक्यांमुळे पक्ष्यांना सर्वात जास्त त्रास होतो. आपण शाळकरी मुलांना आपल्या आयुष्यात पक्षांचं किती महत्व आहे याविषयी जागरुक करु शकतो व पक्षांचं संवर्धन करण्याच्या कामात त्यांनाही सहभागी करुन घेऊ शकतो.

 शहराचा विचार करता जलाशय, हरित पट्टे, जैवविविधता उद्याने ही केवळ विकास योजनेमध्ये कागदावरच नाही तर प्रत्यक्षात असली पाहिजेत. अशी ठिकाणांमुळे हे शहर मोकळा श्वास घेऊ शकतं तसंच विविध प्रकारच्या पक्षांना राहण्यासाठी जागा मिळते.प्रत्येक नागरिकाने अशा जागा जिवंत करण्यासाठी झटलं पाहिजे, विविध प्रकारच्या पक्षांची संख्या वाढणं हे शहरातल्या सुदृढ जैवविविधतेचं लक्षण आहेमाध्यमांनीही या बाबतीत अधिक सजग राहिलं पाहिजे कारण कोणताही पक्षी मेळावा किंवा पक्षी संमेलन एखाद्या वृत्तपत्राचा मथळा होऊ शकत नाहीत कारण पक्षी किंवा त्यांचं निरीक्षण करणा-यांभोवती प्रसिद्धीचं वलय नसतं हे समाजातलं एक दुःखद सत्य आहे!

बहुतेक व्यावसायिक संस्था फक्त विपणनासाठी पक्षी व हिरवळीची सुंदर छायाचित्रे वापरतात, मात्र हे चित्र प्रत्यक्षात साकारण्यासाठी व त्याचं रक्षण करण्यासाठी आपण काय करतो हे महत्वाचं आहे. मी अलिकडेच एका एफएम रेडिओ चॅनलवर कुठल्यातरी बांधकाम प्रकल्पाची जाहिरात ऐकली. त्यामध्ये सुरुवातीला वाहनांचा व यंत्रांचा गोंगाट ऐकू येतो व त्यानंतर पक्षांचा किलबिलाट ऐकवला जातो, या पार्श्वभूमीवर निवेदक तुम्हाला विचारतो, “सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कोणता आवाज ऐकायला आवडेल?“ आपल्या शहरी जीवनामध्ये पक्षांचं महत्व समजून सांगण्यासाठी तसंच सदनिका विकण्यासाठीही हा संदेश अतिशय परिणामकारक होता 

पण मित्रांनो आपण ज्या आकाशाखाली राहतो त्यात पक्षी निरनिराळे रंग भरतात, आपल्या कानांना त्यांच्या किलबिलाटाचं सुमधूरसंगीत ऐकता येतं; मात्र त्यासाठी त्यांना फक्त स्वतःची थोडीशी जागा हवी असते, ते आपल्यावर केवळ त्या जागेसाठी अवलंबून असतात. आपण आपल्या हव्यासापोटी त्यांच्या छोट्याशा जागेवरही अतिक्रमण करत आहोत, आपल्या तथाकथित ताकदीच्या जोरावर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय; मात्र लक्षात ठेवा चिमण्यांसारखे पक्षी नामशेष झाल्यानंतर आपण कितीही सशक्त व बुद्धिमान असलो तरीही आपल्याला त्यांना परत आणता येणार नाही! केवळ जाहिरातींमधला आवाज त्या बिचा-या पक्षांसाठी पुरेसा नाही, नाहीतर एक दिवस आपल्यासाठी फक्त पक्षांचे ध्वनीमुद्रित केलेले आवाजच उरतील, त्यादिवशी आपल्या आयुष्यातून सौंदर्य नाहीसं होईल, व या परिस्थितीसाठी केवळ आपणच जबाबदार असू!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्सNo comments:

Post a Comment