Thursday, 12 February 2015

जैवविविधता ; जबाबदारी माझी, तुमची, प्रत्येकाची !
मित्रांनो, पुण्यातल्या जैवविविधतेविषयी थोडंसं, याबाबतची परिस्थिती सगळीकडे सारखीच असली, तरी कृपया वाचा व इतरांनाही सांगा...

काही दिवसांनी आपल्याकडे कोक विरुद्ध पेप्सी एवढीच जैवविविधता उरेल. आपण एकाच वेळी संपूर्ण जगाची भूरचना एखाद्या बिनडोक चुकीप्रमाणे करत आहोत.”... चक पालनिक 

चार्ल्स मायकल चक हा अमेरिकी कादंबरीकार व मुक्त पत्रकार आहे, तो त्याचे लेखन रुढी, परंपरा, कायदे, नियम इत्यादींचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगतो. तो फाईट क्लब या पुरस्कारप्राप्त कादंबरीचा लेखक आहे, ज्यावर एक चित्रपटही तयार झाला. मात्र त्याचे वरील विधान काल्पनिक नाही, आपण दररोज वाचतो की एखादा प्राणी, पक्षी किंवा झाडाची प्रजाती नामशेष होत चालली आहे, त्यामुळे आज ना उद्या त्याचे शब्द खरे ठरणार आहेत! जैवविविधता हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे व पुणेही त्याला अपवाद नाही! यातली सकारात्मक बाब म्हणजे या शहरात ब-याच जणांना त्याची जाणीव आहे व जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणा-या अनेक स्वयंसेवी संस्था आपल्याकडे आहेत; मात्र यातली खेदाची बाब म्हणजे या प्रयत्नांना सरकार, सामान्य माणूस व माध्यमांची साथ मिळत नाही! सर्वजण सोयीस्करपणे बांधकाम व्यावसायिक नावाच्या प्राण्याच्या माथ्यावर खापर फोडतात जो सामान्य माणसांसाठी घरे बांधण्याचे काम करतो!

मी नमूद केल्याप्रमाणे आपल्या शहरात अनेक स्वयंसेवी संस्था प्रामाणिकपणे काम करत आहेत व लोकांना शहरातील व आजूबाजूच्या जैवविविधतेच्या महत्वाविषयी जागरुक करत आहेत. आपल्यापैकी ब-याच जणांना जैवविविधता म्हणजे काय हे माहिती असेल मात्र आपल्या शहरी जीवनामध्ये त्याचे काय महत्व आहे याची जाणीव नसेल. ब-याचजणांना त्याविषयी काहीच माहिती नसेल केवळ वृत्तपत्रातून किंवा त्यांच्या मुलांचा अभ्यास घेताना हा शब्द गेला असेल, सुदैवाने पर्यावरणशास्त्र हा विषय शाळेमध्येच सक्तिचा करण्यात आला आहे! किंवा हा शब्द अजिबात न ऐकलेल्या सुदैवी व्यक्तिंसाठी म्हणून सांगतो, जैवविविधता हा शब्द एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपल्याला मिळणा-या विविध प्रजातींचे समृद्ध वैविध्य स्पष्ट करतो किंवा दर्शवतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा पुण्याच्या जैववैविध्याविषयी बोलत असतो तेव्हा आपण पुणे व आजूबाजूच्या परिसरातील पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, कीटकांच्या, माशांच्या व झाडांच्या प्रकारांविषयी व संख्येविषयी सांगत असतो. इथे प्राणी म्हणजे खारीपासून ते कुत्र्यांपर्यंत व झाडांमध्ये वडापासून ते अगदी काँग्रेस गवतापर्यंत, पक्षांमध्ये स्थानिक कबुतरांपासून नेहमीच्या चिमण्यांपर्यंत व मासे म्हणजे नदीमध्ये रहाणा-या सजीवांपैकी जे काही मिळते ते सर्व; अर्थात इथे आपल्या  नदीला नदी म्हणायचं का असा प्रश्न पडतो पण तो मुद्दा नंतर! मित्रांनो हा खरोखरच काळजीचा विषय आहे व अलिकडेच मला बायोस्फिअर नावाच्या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या एका परिसंवादात सहभागी होण्याची संधी मिळाली, या परिसंवादाचा विषय होतापुणे जैव विविधता, दशा आणि दिशा. पुण्याचं खरोखर भाग्य आहे की पुण्यामध्ये काही व्यक्ती झपाटल्याप्रमाणे नद्या, वृक्ष, डोंगर इत्यादींचे संवर्धन करत आहेत, अशी माणसे हीच पुण्याचा सांस्कृतिक कणा आहेत. याच ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीमधील सेलिब्रिटी व्यक्ती आहेत, सचिन पुणेकर, हेमा साने मॅडम, निनाद घाटे सर, राजगुरु सर व महाजन सर ही यापैकीच काही नावे आहेत; या सर्वांनी जैवविविधतेच्या विविध पैलुंचा अभ्यास केला आहे व पुण्याच्या पर्यावरणाचा ते चालता बोलता विश्वकोश आहेत! परिसंवादात सहभागी झालेले पाहुणे पुण्याच्या जैवविविधता क्षेत्रात काम करणारे दिग्गज होते व मी एकटा वगळून सगळे वयाने सत्तरीच्या पुढचे होते! या विषयातील त्यांचा अधिकार सांगायचा तर त्यापैकी एका वक्त्याने पुण्यातील नद्यांवर १९६० साली पीएचडी केली होती जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता! हे सर्वजण पुण्यातल्या नद्या, डोंगर व आजूबाजूच्या परिसराचा गेली ६० वर्षे अभ्यास करत आहेत व हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या तुलनेत माझा पुण्याशी संबंध बराच नंतरचा म्हणजे १९८६ सालापासूनचा आहे व मी नदी केवळ प्रदूषित स्वरुपातच पाहिली आहे! त्यामुळे मी सर्वप्रथम या सगळ्या दिग्गजांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याचा त्यानंतर या विषयावर स्वतःची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला!

ज्या व्यक्ती इथे ७० वर्षांहूनही अधिक काळ राहात आहेत त्यांच्याकडून शहराच्या जैवविविधतेविषयी जाणून घेणं अतिशय रोचक होतं; शहराच्या गतकाळात गेल्यासारखं वाटत होतं! यातून काही रोचक तथ्ये मला समजली की, १९४० साली नदीचे पाणी गाळलेल्या पाण्याइतके स्वच्छ होते व लोक थेट नदीतील पाणी पीत असत, १९६० साली नदीतील सजीवांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा नदीत माशांच्या जवळपास ७० प्रजाती होत्या. सध्या नदीमध्ये माशांच्या जेमतेम २ प्रजाती उरल्या आहेत, ज्यापैकी बहुतेक तिलापिया हे आफ्रिकी प्रकारचे मासे आहेत जे स्थानिक नाहीत व त्यांनी इतर सर्व माशांच्या प्रजातींना मारुन टाकले आहे. नदीच्या काठाने ऑर्किडची झाडी होती व जैवविविधता इतकी समृद्ध होती की शहरापासून ते विठ्ठलवाडी म्हणजे सिंहगड रोडपर्यंत जवळपास २०० विविध प्रकारची रोपे, वेली, झाडे होती; आता नदीकाठी सगळीकडे जलपर्णीची वाढ झालेली दिसते, क्वचितच कुठेतरी झाडेझुडुपे आढळतात, ऑर्किड तर कुठेच दिसत नाहीत! सर्वात वाईट बाब म्हणजे नदीवर कुणाचे नियंत्रण आहे हे कुणालाच माहिती नाही, तिची देखभाल करणे हे जलसिंचन विभागाचे काम आहे असे महापालिका म्हणते तर जलसिंचन विभाग ते महापालिकेचे काम असल्याचा दावा करतो! खवले मांजर (मुंगी भक्षक), मुंगूस, घोरपड, विविध प्रकारचे साप, मोर, ससे व हरिणे असे प्राणी किंवा पक्षी शहरात सगळीकडे भरपूर दिसत. माकडांच्या टोळ्या दिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात फिरत असत व संध्याकाळी कात्रज किंवा सिंहगडसारख्या जंगली भागात परत जात असत. त्यांचे वास्तव्य असलेले शहरातील तसेच शहराबाहेरील भागांना जोडणा-या  रस्त्यांलगतचे मोठ्या झाडांचे लांबलचक पट्टे तोडून टाकण्यात आले, त्यामुळे त्यांच्या शहरातील खेपाही संपल्या ! पुण्यात व आजूबाजूच्या परिसरात जवळपास ४० प्रकारचे बेडूक होते आता तुम्हाला फारफार तर ३ किंवा ४ प्रकारचे पाहायला मिळतात ते देखील पावसाळ्यामध्ये कारण त्यांना प्रजननासाठी जागाच उरलेली नाही! नदीला नियमितपणे पूर येत असे व आजच्या मॉर्डन कॉलेजपर्यंत पाण्याची पातळी वाढत असे! रात्रीचे आकाश स्वच्छ असायचे व उघड्या डोळ्यांनी हजारो तारे पाहता यायचे व आता आपल्याला केवळ धुरकट व अंधूक चंद्र दिसतो! वरील वर्णन वाचले की आपण एखाद्या पुरातन शहराविषयी विस्मरणात गेलेल्या साम्राज्याप्रमाणे बोलतोय असं वाटेल; हे साम्राज्य आहे जैवविविधतेचं! वक्त्यांपैकी एक, वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या,त्या त्यांच्या विद्यार्थ्यांना नदीकाठी भटकंती करायला घेऊन जात व निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा विषय शिकवत असत हे आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, आता मात्र  या सर्व विविध प्रकारच्या वनस्पती नष्ट झाल्या आहेत! मी जेव्हा शहरातली जैवविविधता नष्ट झाल्याचे नमूद केले तेव्हा त्यावर सर्वजण सहमत झाले! हे अतिशय गंभीर नुकसान आहे व दुर्दैवाची बाब अशी की आजच्या पिढीला त्यांनी काय गमावले आहे हेच समजत नाही! किंबहुना बरेच जण प्रश्न विचारतात की त्यात काय मोठेसे, आपण प्रगती केलेली नाही का, काही वेली व फुलझाडांपेक्षा विकास अधिक महत्वाचा नाही का, आपल्या आजूबाजूला साप व माकडे दिसली नाही तर काय मोठासा फरक पडतो, आपल्यासमोर यापेक्षा अधिक चांगले विषय नाहीत का ज्याविषयी आपण वादविवाद करु शकू! ज्या व्यक्तिने निसर्ग अनुभवलेला नाही किंवा ती निसर्गासोबत राहिलेली नाही तिला जैवविविधतेचे महत्व पटवून देणे अतिशय अवघड आहे हे खरे आहे! कारण आजकालची गरज किंबहुना हाव वेगळी आहे, आपण केवळ आपल्या घरामध्ये कोणत्या सोयी सुविधा आहेत, आपल्या इमारतीची उंची व आपल्या कार्यालयातील वातावरणाचा विचार करतो. आपल्या कार व त्यासाठी पुरेसे इंधन हवे असते, अर्थात कार लावायला जागा व चालवायला रस्ते हवे असतात. आपल्याला आपल्या नळांना पाणी हवे असते, ते जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत ते कुठून येतंय याची आपल्याला चिंता नसते! आपले रस्ते नदी काठांवर अतिक्रम करताहेत, तिथली हिरवाई नष्ट करताहेत, नदीत आपण फेकत असलेल्या कच-यामुळे शेकडो पक्षी व माशांचे वसतीस्थान नष्ट होत आहे याची आपल्याला काळजी नसते. आपण स्वतःला शहाणे व हुशार म्हणतो व त्याचवेळी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आपलाच हक्क आहे असे आपल्याला वाटते! आपण आपल्या हव्यासापोटी इतके आंधळे झालो आहोत की विकास म्हणजे इतर प्रजाती नष्ट करणे नाही हे आपण विसरलो आहोत! जेव्हा आपण केलेल्या नुकसानाची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा आपण एकमेकांकडे बोटे दाखवतो! अर्थात या परिसंवाद काही चांगली तथ्येही सांगण्यात आली, की पुणे व आसपासच्या परिसरात मोठ्या झाडांच्या सर्वाधिक म्हणजे जवळपास ५०० प्रजाती आढळतात त्यामुळे या जैवविविधतेच्या बाबतीत पुणे देशातील बहुतेक सर्वात समृद्ध शहर आहे! १९४० साली शहरात केवळ १४ उद्याने होती ही संख्या आता ११४ वर गेली आहे! मात्र हे पुरेसे नाही, जोपर्यंत आपण काही ठोस सकारात्मक पावले उचलत नाही तोपर्यंत जैवविविधतेच्या बाबतीत भविष्यात काळोखच आहे हे कटू सत्य आहे व त्यासाठी कुणीतरी पुढे येऊन जैवविविधतेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे! तो कुणीतरी एखादा सरकारी विभाग किंवा स्वयंसेवी संस्था नाही तर आपल्या सर्वांमध्येच आहे!

हे शहर आधी काय होते व आता काय झाले आहे हे ऐकल्यानंतर, क्षणभर मी निःशब्द झालो; अर्थात मी देखील या शहरात आलो तेव्हा थोडीफार जैवविविधता पाहिली आहे, जवळपास तीस वर्षांपूर्वी ते राहण्यासाठी नक्कीच अधिक चांगले होते. मात्र आपल्या या शहराला लोकसंख्या, प्रदूषण व नियोजनातील अपयश हे शाप मिळालेले आहेत, त्यामुळे शहरातील जैवविविधता पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या, तेव्हा मी फक्त एवढेच म्हणू शकलो, कीहोय, जैवविविधतेच्या पातळीवर शहराचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी मी सुद्धा जबाबदार आहे व एक बांधकाम व्यावसायिक म्हणून ती पूर्ववत व्हावी म्हणून मी माझी भूमिका पार पाडली पाहिजे!” आपले निसर्गावर कितीही प्रेम असले, आपण पर्यावरणाचा कितीही आदर करत असलो तरीही आपण झाडावर किंवा उघड्यावर राहू शकत नाही. मात्र आपण आजूबाजूच्या जैवविविधतेचे किती नुकसान केले आहे व आपण त्याची भरपाई कशी करु शकतो हे विचारात घेऊन आपल्या इमारती बांधू शकतो. निसर्गामध्ये संगणकासारखी परत मागे अशी काही आज्ञा नसते, आपण जे काही नष्ट केले ते हजारो इथे होते, आपण मात्र काही वर्षातच ते नष्ट केले! आपण ज्या भल्या मोठ्या नाल्याला नदी म्हणतो तिचा प्रवाह सामान्य होण्यासाठी व लोकांनी थेट तिचे पाणी पिण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतील त्यानंतर नदीत व तिच्या काठाने जीवन निर्माण होईल; मात्र आपण किमान ही प्रक्रिया आज व माझ्यापासून सुरु करु शकतो! मी माझ्या इमारती बांधताना जास्तीत जास्त झाडे लावू शकतो व ती जगवू शकतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजो लोकांना जैवविविधतेचे रक्षण करण्यात त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करुन देणे, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी नक्कीच माझ्या ग्राहकांना ती करुन देऊ शकतो. मी ब-याचदा जेव्हा माझ्या घराजवळ नदीवरील पुलावरुन चालत जातो तेव्हा तिथे नदीत कचरा विशेषतः घरातील निर्माल्य टाकू नये असे लोकांना आवाहन करणारा फलक दिसतो. मात्र दररोज कुणीतरी त्या फलकाखाली उभा राहून नदीत कचरा फेकताना मी पाहतो. हे कचरा  टाकणारे काही बांधकाम व्यावसायिक नाहीत, ते तुमच्या-आमच्यासारखेच सामान्य नागरिक आहेत व साध्याशा कृतीने अनेक प्रजातींचे घर असलेल्या जलाशयाचे नुकसान करत आहेत. मात्र त्यांना त्यांच्या लहानशा कृतीचा परिणाम जाणवत नाही व त्यांना हे कुणी सांगायला जात नाही! मला असे वाटते एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मी केवळ माझ्या इमारतींचाच नाही तर निसर्गाचे संवर्धन करण्याचाही प्रसार केला पाहिजे व हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माझी स्वतःची कृती!
हे शक्य व्हावे यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाधिक लोकाभिमुख व्हायला पाहिजे व कोणत्याही प्रकल्पाचे नियोजन करतानाच साने मॅडम किंवा महाजन सरांसारख्या व्यक्तिचा सल्ला घेतला पाहिजे. पर्यायवरणवाद्यांनीही बांधकाम व्यावसायिकांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कारण शेवटी बांधकाम व्यावसायिकच घरे बांधणार आहेत, त्यामुळेच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा बदल शक्य होणार नाही! बांधकाम व्यावसायिक व पर्यावरणवादी एकत्र येऊ शकतील अशा एखाद्या सामाईक मंचाशी नितांत गरज आहे कारण त्यातच जैवविविधतेचे भविष्य आहे. यामध्ये माध्यामांनीही आपली भूमिका पार पाडली पाहिजे अशा प्रयत्नांना किंवा परिसंवादांना पहिल्या पानावर कधीच प्रसिद्धी मिळत नाही, असे असेल तर मग सामान्य माणूस या समस्यांविषयी कसा जागरुक होईल? प्रत्येक वृत्तपत्रामध्ये क्रीडा किंवा अर्थविषयक पानांसारखे हरित पान का नसावे, ज्यामध्ये विविध व्यक्तिंनी हिरवाईसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती देता येईल, प्रसिद्धी देता येईल! जैवविविधतेचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण कुठेतरी जबाबदार आहे, मग ते प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे. बरेच जण म्हणतील मी कसा काय जबाबदार आहे कारण मी कधीच नदीत कचरा फेकत नाही, मी कधीही झाड तोडलेले नाही किंवा एखादी चिमणी मारलेली नाही! मात्र काहीही न करुन आपली जबाबदारी संपते का, मी जैवविविधचे नुकसान होऊ नये म्हणून काय केलेले नाही याच्या बढाया मारण्यापेक्षा तिचे रक्षण करण्यासाठी मी काय केले आहे हे स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे! स्वतःला प्रश्न विचारा की मी किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केला आहे का. तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला विचारा तो त्याच्या इमारती बांधताना जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी काय करतो. तुमच्या लोकप्रतिनिधींना विचारा नाल्याचे काँक्रिटीकरण करण्याऐवजी त्याच्या बाजूने झाडे व रोपे का लावण्यात आली नाहीत. महापालिकेच्या क्षेत्र अभियंत्यांना विचारा रस्त्यांच्या दुतर्फा अजिबात माती मोकळी न सोडता संपूर्ण फरसबंदी का करण्यात आली आहे, ही माती पावसाचे पाणी शोषण्यासाठी तसेच चिमण्यांना धुलीस्नान करण्यासाठी वापरता आली असती. तुम्हाला आजूबाजूच्या निसर्गाविषयी काय वाटते याविषयी फेसबुकसह सर्व माध्यमांवर लिहा व त्याविषयी आपल्या काय जबाबदा-या आहेत याची जाणीव प्रत्येक व्यक्तिला करुन द्या. निसर्गाच्या संवर्धानासाठी ज्या गोष्टी करायला हव्या होते असे तुम्हाला वाटते, मात्र ते करण्यात आलेले नाही त्याविषयी किमान आवाज उठवायला सुरुवात करा!

मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या जैवविविधतेमुळे आपले आयुष्य रंगीत व जगण्यासाठी योग्य होते; ते शब्दांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण त्यासह जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे म्हणतात की प्रत्येक प्रजातीचे सत्तर लाख वर्षांचे जीवनचक्र असते, व मानव जातीने वीस लाख वर्षे आधीच पूर्ण केलेली आहेत, मात्र आपण ज्याप्रकारे इतर प्रजातींची जीवन चक्रे नष्ट केलेली आहेत त्यानुसार ही वीस लाख वर्षे सत्तर लाख वर्षांएवढी किंवा त्यापेक्षा अधिक आहेत व या प्रक्रियेमध्ये आपण स्वतःचे जीवनचक्रही नष्ट करत आहोत! त्यामुळेच आता आपल्या हातात पन्नास लाख वर्षे नाहीत, म्हणूनच आपण निसर्गाचे संवर्धन आजच केले पाहिजे; आपल्याला हे मूलभूत सत्य समजले तरच आपण स्वतःला माणूस म्हणवून घेऊ शकू नाहीतर डायनासॉरना जितकी वर्षे जगता आले तितकी वर्षे जगण्याची संधीही आपल्याला मिळणार नाही! शेवट आपल्या कल्पनेपेक्षाही वाईट असेल सगळीकडे कोणताही रंग किंवा सुवास नसेल, फक्त काळे पांढरे रंग आणि धूर असेल! आपण जगलो तरीही जगण्यासाठी योग्य काहीही शिल्लक नसेल!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सNo comments:

Post a Comment