Sunday 22 March 2015

वाघांच्या पलीकडले ताडोबा !



















जंगलातल्या वाघाला तुम्ही कॅमे-यात कशा प्रकारे  बंदीस्त करता त्यापेक्षा त्या क्षणांचा आनंद तुम्ही घेतला आहे ना हे जास्त महत्वाचे आहे...संजय

मार्च महिन्याच्या मध्यावरची ती एक सकाळ होती आणि ताडोबामधील तो प्रसिद्ध उन्हाळा अजून सुरू व्हायचा होता.मोहार्ली गेटमधून माझ्या जिप्सीनं प्रवेश करताच आम्हाला जामुनझारीच्या बाजूने भेकर (बार्कींग डीअर ) विशिष्ट प्रकारे ओरडण्याचा  आवाज आला. त्यामुळे बांबूच्या झाडांमधून असलेल्या वळणदार रस्त्यावर आमच्या गाडीचा प्रवास सुरू झाला. आमच्या नजरा त्या घनदाट झाडीत अपेक्षित पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांचा शोध घेऊ लागल्या कारण या रंगामुळे जंगलात  वाघ कोणाच्या दृष्टीस पडणं कठीण असतं. अचानक आमच्या गाडीपुढे आम्हाला एक मोठा काळा प्राणी चालतां ना दिसला. जिप्सीच्या चाकांचा आवाज येताच तो थांबला आणि मागे वळला. क्षणभरासाठी माझा श्वासही थांबला. ते पूर्ण वाढ झालेले नर अस्वल होते. अस्वलांच्या विक्षिप्त सवयीप्रमाणे पुढील दिशेला चालत जाण्याऐवजी १८० अंशांचे वळण घेत ते थेट आमच्या दिशेने चालत येऊ लागले. नर अस्वलाला समोरा-समोर पाहणे माझ्या स्वप्नापलिकडले होते, मी माझा कॅमेरा काढला आणि माझ्या वाढलेल्या श्वासांच्या वेगाने त्याचे फोटो काढू लागलो. तुम्ही ज्याची कधी कल्पनाही केली नसेल तेच समोर आले तर....त्यामुळे माझी ताडोबाची सफर अशा अनोख्या पद्धतीने सुरू झाली. ताडोबाच्या जंगलात दरवेळी फक्त मलाच नाही तर प्रत्येकाला काहीतरी पहिल्यांदाच बघायला मिळते, फक्त त्यासाठी आपल्यात संयम असावा लागतो आणि जेव्हा ते येतं तेव्हा ते अनुभवण्याची समयसूचकता हवी.

 मित्रांनो मी गेल्या अनेक वर्षापासून जंगलांची सफर करत आहे आणि दरवेळी ही जंगले मला काहीतरी नवीन देत आहेत. पुढे ताडोबातील पांढरपौनी इथे आम्ही वाघीण बघायला मिळेल याची वाट पाहत होतो. पण एका कर्णकर्कश आवाजाकडे आमचे लक्ष वेधले गेले. आमच्या मागे असलेल्या गवतातून तो आवाज येत होता, दोन जंगली कावळे एका छोटयाशा वस्तूवरुन भांडत होता. कॅमे-याच्या माध्यमातून जेव्हा मी जवळून पाहिले तेव्हा मला जाणवले की हे एक दुर्मिळ नाट्य घडते आहे आणि आम्ही त्या कावळ्यांवर आमचे सारे लक्ष केंद्रीत केले. एका वटवाघूळाला कावळे जिवंत खात असल्याचे ते दृश्य होते. त्या वटवाघुळाची जात मला ओळखता आली नाही. ते बिचारे वटवाघुळ जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, पण आपल्या तीक्ष्ण चोचीने ते कावळे त्या वटवाघुळावर तुटून पडले. आमच्यासोबत असलेल्या मार्गदर्शकानेही गेल्या १५ वर्षाच्या काळात आपण कावळ्यांनी जिवंत वटवाघुळ खाल्ल्याची घटना पहिल्यांदाच पाहिली असल्याचे सांगितले.
वरील घटना हे क्रौर्य असले तरी निसर्गाचा भाग आहे, आपण फक्त त्याचे कौतुक करु शकतो. हे कमी होते की काय म्हणून जंगलाने आम्हाला आणखी एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला. आमची जिप्सी मोहार्ली रेंजमधून कोल्सा रेंजमध्ये निघाली असताना चालकाने अचानक गाडीचा वेग कमी केला, समोर रस्त्यावर एक पूर्ण वाढ झालेला गवा पडला होता, त्याला कोणी मारले आहे हे समजण्यास आम्हाला एक सेकंदही लागला नाही. आमच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या एकमेव जिप्सीने लाईट चमकवून शिकारी जवळपास असल्याचा इशारा आम्हाला दिला. तेवढ्यात झाडीतुन एक वाघीण तिथे आली आणि ती आपल्या भक्ष्यावर तुटून पडली. एवढेच नाही तर ईतर भक्षकांच्या भीतीने तो मेलेला गवा रस्त्याच्या पलिकडे दाट झाडीत खेचून नेण्याचा प्रयत्न ती करु लागली, पण तिला ते शक्य झाले नाही. हा सारा घटनाक्रम आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी मी  स्तब्ध होऊन क्लिक करत राहिलो. एखाद्या वन्यप्रेमी व्यक्तीसाठी हा सारा अनुभव स्वप्नवत होता, पण तो बिचारा गवा  मात्र निष्प्राण  डोळ्यांनी तिथे मरुन पडला होता. वन्यप्रेमींसाठी आपली स्वप्न पूर्ण करणारे असे हे ताडोबा अरण्य... फक्त ती स्वप्न सत्यात उतरताना पाहण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

विक्रम पोतदार हा माझा मित्र आणि एक कुशल वन्यजीव छायाचित्रकार माझ्या सोबत होता. माझ्यापेक्षा खुपच चांगला छायाचित्रकार असलेला विक्रम ते संपूर्ण दृश्य पाहून आनंदून गेला होता. आमच्या विरुद्ध दिशेला तीन जिप्सी उभ्या होत्या. माझ्या छायाचित्रांमधून त्या जिप्सी वगळणे मला शक्य होते, पण त्यातील काही जिप्सी मी छायाचित्रांमध्ये जाणीवपूर्वक येऊ दिल्या कारण फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांनाच नाही तर जंगल सफरीसाठी पहिल्यांदाच आलेल्या सामान्य पर्यटकांनाही असा अनुभव मिळू शकतो हे मला दाखवून द्यायचे होते कारण जंगल हे फक्त काही मोजक्या लोकांचे नाही तर प्रत्येकाचे आहे.आपल्यासमोर घडणा-या घटनेत आपण दंग होऊन जातो, ते क्षण असे असतात की जणू काळ तिथेच थांबतोया जादूलाच जंगल म्हणतात. जंगलातील हे अनुभव कोणत्याही कॅमे-यात बंद करता येत नाहीत म्हणूनच हे अनुभव कथन करण्यासाठी मी स्वत: माझी उदाहरणे द्यायला सुरूवात केली.  जंगलातील प्रत्येक सहलीत अशा अनेक घटना घडतात आणि जंगल सफर करणा-यांचे अनुभव सारखेच असतात पण त्यात काहीतरी वेगळेपणाही असतो. जेव्हा फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर मी काढलेली छायाचित्रे टाकतो तेव्हा मी किती भाग्यवान आहे किंवा त्यांना अशी दृश्य बघता आली नाहीत अशा कॉमेंट्स येतात, पण जंगलात कोणीही कमनशिबी नसतो.मी असे म्हणेन की काही जण थोडे जास्त भाग्यवान असतात आणि प्रत्येक क्षण हा वेगळा आणि एकमेवाद्वितीय असतो. एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जंगल म्हणजे फक्त वाघ नाही तर त्यापेक्षा खूप काही आहे आणि ताडोबा आपल्याला तेच शिकवत असते. माझे पुढील अनुभव सांगण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. ताडोबा अरण्याबाबत पर्यटकांना माहिती व्हावी या विशेष हेतुने माझा जागतिक दर्जाचा छायाचित्रकार मित्र विक्रम पोतदार याच्या सोबत मी ताडोबामध्ये होतो.

ताडोबा हे प्रसिद्ध आहे मी मान्य करतो पण बहुतांश पर्यटक हे ताडोबामध्ये फक्त  वाघ बघण्यासाठी येतात, छायाचित्र काढतात आणि वाघाचे दर्शन झाल्याने सेलिब्रेट करतात आणि निघून जातात, बस्स एवढंच! पण ताडोबाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिका-यांशी झालेल्या चर्चेतून आम्हाला जाणवले की पर्यटकांना ताडोबा काय आहे आणि समाजासाठी जंगलाचे महत्व त्यांना आधी समजावून घेऊ द्या, तसेच ताडोबासारख्या जंगलाबाबत प्रत्येकाची जबाबदारी काय आहे याची जाणीव त्यांना होऊ द्या. त्यामुळेच ताडोबा नेमके काय आहे ते त्यांच्यापुढे मांडणे महत्त्वाचे आहे. हा विचार माझ्या मनात माझ्या गेल्यावेळच्या ताडोबा भेटीतून आला.एक तरुण अधिकारी गजेंद्र नरवणे यांनी आम्हाला अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका सुरक्षा रक्षकाची गोष्ट सांगितली. या हल्ल्यात तो सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या उपचाराचा खर्चही खूप होता. तेव्हा मी असा मुद्दा मांडला की ही घटना ताडोबाला भेट देणा-या पर्यटकांपुढे का मांडली गेली नाही, या कारणासाठी ते नक्कीच मदत करतील. हीच संकल्पना मग पुढे आली कारण आज ताडोबाच काय पण राज्यातील कोणतेही जंगल आणि पर्यटकांमध्ये कोणता दुवाच अस्तित्वात नाही. एकदा पर्यटक जंगलाच्या दरवाजातून बाहेर पडून सिमेंच्या जगात पोहोचले की या जंगलाने आपल्याला दिलेला आनंद ते विसरुन जातात. आपण जर कोणत्या तरी मार्गाने प्रत्येक पर्यटकाच्या संपर्कात राहिलो तर जंगलाबाबतच्या समस्यांवर त्यांची मदत घेता येईल तसेच त्यांच्या भोवतालच्या जंगलाचे रक्षण करण्याचे प्रयत्नही ते त्यांच्या परिने करतील. आमच्या चर्चेचा हा सारांश होता. त्यामुळे आम्ही हे मुद्दे क्षेत्र संचालक श्री. गरड, एपीसीसीएफ श्री. कळसकर आणि श्री. मोई पोक्कीम या पूर्व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्हाला या संकल्पनेवर काम करण्यास सांगितले. या चर्चेमुळे आमच्या या ताडोबा  भेटीची सुरूवात झाली.चार दिवस ताडोबा जंगलाच्या विविध विभागांमधून आम्ही फिरत होतो. जंगलातील वनसंपदा, भौगोलिक रचना, प्राण्याची ठिकाणे, ताडोबाशी संबंधित लोक या सगळ्यांची छायाचित्र आम्ही घेतली. ताडोबाशी कोणत्याही प्रकारे संबंध असलेल्या प्रत्येकाशी आम्ही संवाद साधला. ताडोबासारख्या मोठ्या आकाराच्या जंगलाचा व्याप सांभाळणे जिकीरीचे काम आहे आणि त्यासाठी बऱ्याच मूलभूत सुविधांची गरज असते. यात पर्यटकांसाठी रस्ते बांधणीपासून ते वनकर्मचा-यांसाठी कल्याणकारी कामांचा समावेश होतो. उदा. जंगलाच्या आतमध्ये वनसंरक्षक आणि कामगारांसाठी राहण्याची सोय करणे व  ईतर अनेक आणि या सर्वांसाठी पैशाची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी सरकारतर्फे निधीची तरतूद केली जाते हे मान्य, पण तो निधी योग्यवेळेस योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. जंगलातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की प्रत्यक्षात जंगलात काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ यांच्यात संवादाचा अभाव आहे. तसा प्रत्येक संस्थेत वरपासून खालपर्यंत संवादाचा थोडाफार अभाव असतो. पण वनविभागात मात्र अधिकारी वर्ग आणि जंगलातील गार्ड किंवा fa^रेस्टर यांच्या राहण्याच्या परिस्थितीत बरीच  तफावत असते. जसे मी नेहमी म्हणतो सुरक्षित अशा जिप्सीतून जंगलाची सफर करणे, फोटो काढणे आणि त्यानंतर तुमच्या आरामदायी अशा निवा-यात आराम करण्यासाठी परतणे हे खूप सोपे आहे. पण त्याच जंगलात जेव्हा तुम्हाला दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस ४८ डिग्री सेल्सिअस तापमान, मुसळधार पाऊस आणि थंडीमध्येही रहावे लागते तेव्हा त्याच जंगलाचा तुम्हाला तिटकारा यायला लागतो. त्यामुळेच ताडोबाच्या आतील भागात कनिष्ठ पातळीवर होणारी नेमणूक ही शिक्षा समजली जाते अशी भावना त्या कर्मचा-यांनी आमच्यापाशी व्यक्त केली. परिणामी प्रत्यक्ष जंगलात काम करणारे कर्मचारी सतत बदलत असतात. यावरुन व्यवस्थेमधील पोकळी दिसून येते. जर आपल्याला ताडोबा जागतिक पातळीवर न्यायचे असेल तर या गोष्टी सुधाराव्या लागतील. त्यानंतर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाची कथेप्रमाणे बाहेरील समाज अनेक मार्गांनी आपल्या जंगलाचे रक्षण करणा-या या लोकांच्या मदतीसाठी एकत्र येऊ शकतो. अनेकजण जंगलाशी संबंधित समस्यांवर काम आणि सहकार्य करायला तयार आहेत. पण त्यांनी सरकारला थेट पैसा द्यावा अशी अपेक्षा करता येणार नाही कारण सामान्यांचा सरकारवर विश्वास नाही हे कटु सत्य आहे. पण आपण जर त्यांना जंगलामधल्या सेवा सुविधांसाठी थेट पैसे देण्यास सांगितले तर आपण दिलेल्या पैशांचा होणारा चांगला उपयोग पाहून ते तयार होतात. उदा. कोलसा भागात सौरपंपांसह कूपनलिकेची गरज आहे मग आपण एखाद्या एजन्सीकडे काम देऊन लोकांनी त्या कंत्राटदाराला थेट पैसे देऊन वनविभागाच्या देखरेखीखाली काम पूर्ण करुन घेऊ शकतो. अशाप्रकारच्या देणग्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या कूपनलिकांवर देणगीदारांची नावे लिहिण्याचा पर्यायही आपण देऊ शकतो.नुकतेच कान्हा जंगलात आम्ही जंगलातील मजुरांसाठी जंगलात वापरता येणा-या बुटांचे वाटप केले, अशाप्रकारे उपक्रम समाजाच्या निधीतून राबवले जाऊ शकतात. पर्यटकांसमोर ताडोबाचे योग्य विपणन करण्यामागे हे आणखी एक कारण आहे.

खरेतर विपणन हा योग्य शब्द नाही पण ताडोबाचे वैभव लोकांपर्यंत पोहोचवणे असा त्याचा मतितार्थ आहे. सध्या ताडोबा हे वाघांचे राज्य आहे पण हे तेवढ्यापुरतच मर्यादित आहे का? दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात, वाघांचे फोटो काढतात, त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात आनंदाने परत जातात आणि थोड्याच दिवसात ताडोबाला विसरतात. पर्यटकांनी ताडोबाला पुन्हा भेट देण्याबरोबरच त्यांनी ताडोबाच्या कायम संपर्कात रहावे यासाठी आपल्याला काही करायची गरज आहे.ज्यांनी ताडोबाला भेट दिली आहे त्यांच्यासाठी हे आहे... आणि ज्यांनी आतापर्यंत भेट दिली नाही, त्यांच्या पर्यटनाच्या यादीमध्ये ताडोबाचे नाव सर्वात आधी असेल यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण ताडोबाला प्रायोगिक प्रकल्प बनवला पाहिजे आणि त्यानंतर हाच उपक्रम भोर, पेंच, मेळघाट आणि राज्यातील इतर जंगलांमध्येही राबवता येऊ शकतो.प्राथमिक स्तरावर आम्ही खालील गोष्टी सुचवल्या आहेत-
सगळ्यांत आधी इंटरनेटचे ज्ञान असलेल्या आणि संगणक तज्ज्ञ अशा दोन व्यक्तींचा एक गट तयार करावा. महत्त्वाचे म्हणजे गरड सर आणि पोकिम सर यांच्यासारख्या उच्चस्तरीय अधिका-यांचा त्या गटावर दबाव असणे. दुसरे म्हणजे नियोजनपूर्वक आणि वेगाने कृती करणे. यासाठी मी काही उपयुक्त सूचना तुम्हाला सांगत आहे-
१.      ताडोबाची एक सचित्र माहिती पुस्तिका आणि लेख तयार करा. यातून ताडोबा हे केवळ वाघांसाठीच नाही तर आपल्या जगासाठीही किती महत्त्वाचे आहे ते समजेल. ताडोबासारखी ठिकाणे ही माणसासाठी निसर्गाची भेट आहे हे त्यांना समजू द्या. पण या दैवी देणगीचं संवर्धन करण्यासाठी पगारी लोकांव्यतिरिक्त आणखीही बरंच काही करण्याची आवश्यकता आहे.या माहितीपुस्तिकेत वरिष्ठ वनाधिका-यांचे संदेश असतील, तसेच ताडोबाला आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आणि प्रत्येक सदस्याचे योगदान याचा समावेश असेल. हे अत्यंत सोप्या भाषेत असेल तेच त्यात उदाहरणे आणि विक्रमने काढलेली छायाचित्रे असतील. ही माहितीपुस्तिका पर्यटक ताडोबामधून परत जाताना स्मरणिका म्हणून सोबत नेतील. आपण शुल्कामध्येच या माहितीपुस्तिकेच्या किंमतीचा समावेश करू तसेच तीन किंवा त्यापेक्षा जास्त सफारींवर माहितीपुस्तिका मोफत अशी योजनाही राबवू. त्याशिवाय एक खास माहितीपुस्तिका बनवून प्रवेशद्वारावर विक्रीला ठावता येईल. यातून ताडोबाला उत्पन्न मिळू शकेल.
२.    ताडोबाला भेट देणा-या सर्वांचे इ-मेल आपल्याकडे आहेत. जी-मेलवर एक ग्रूप बनवून आपण एक इ-कॅलेंडरही बनवू शकतो. हे इ-कॅलेंडर सर्व सदस्यांना दर महिन्याला पाठवले जाईल, त्यात ताडोबामधील त्या महिन्याचे सर्वोत्कृष्ट छायाचित्र आणि घडामोडी यांचा समावेश असेल. या कॅलेंडरसोबतच ताडोबाचे बातमीपत्रही असेल. आपण राबवत असलेल्या कल्याणकारी उपक्रमांमध्ये संचालक आणि इतर लोकही योगदान देऊ शकतात. आपल्याला येणा-या अडचणी आणि आपण ताडोबाचे संवर्धन करण्यासाठी त्यातून कसा मार्ग काढतो, हेही त्यात असेल. हे छोटं असलं तरी मुद्देसूद असेल. यामुळे पर्यटकांच्या संपर्कात राहणे शक्य होईल. कारण सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो आणि त्यावर ई-मेल उपलब्ध असते. अशाच एका स्वंयसेवी संघटनेच्या इ-कॅलेंडरची लिंक पाठवित आहे.
3. या महिन्यात ताडोबामध्ये सामाजिक स्तरावर काय घडले याची माहिती आपण या माध्यमातून देऊ शकतो. तसेच ताडोबासाठी लोक कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याबाबत आवाहन करू शकतो. अनेक लोक मदत करायला उत्सुक असतात, पण आपल्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होईल की नाही याबद्दल ते साशंक असतात. आपल्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहिल्यास, त्यांचा पैसा योग्य हातांमध्ये असल्याचा विश्वास त्यांना वाटेल.
४. ताडोबाचे राज्य, राष्ट्र आणि जगासाठी असलेलं महत्त्व, ताडोबाची वैशिष्ट्ये आणि ताडोबाची कार्यपद्धती याबद्दलचे ४० मिनिटांचे सादरीकरण आपण तयार करू. ताडोबात काम करणा-या सदस्यांचे संदेश, भरपूर दृश्यं, तसंच ताडोबामधील वनस्पतींबाबतची माहिती तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ताडोबापुढे असलेली आव्हाने यांची सामग्र माहिती देणारे ते एक कलात्मक सादरीकरण असावे. दोन जणांचा एक गट मोठ्या शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सादरीकरणासाठी आपण पाठवूया. त्यामुळे लोकांना विशेषत: तरुणांना ताडोबाच्या आत नेमके काय आहे याची माहिती होईल. आपण याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर पुण्यापासून तयार करू. आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील वन्यप्रेमी आणि सँक्च्युरी एशियाज नेटवर्क आणि किर्लोस्कर फाऊंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून देशातील मोठ्या शहरांपर्यंत पोहोचता येईल.
५. केसरी आणि वीणा वर्ल्डसारख्या पर्यटन संस्थांपुढे आपण सादरीकरण करु. या संस्थांचे पर्यटक आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे या माध्यमातून ताडोबाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरात करु शकतो.  आपल्याला खूप ही करता येऊ शकते, पण त्यासाठी आपल्याकडे चांगली दृश्य माहिती आणि लिखित माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हे सर्व पर्यटकांना उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. ताडोबा हे आधीच प्रसिद्ध आहे. आता फक्त यामागील लोकांच्या प्रयत्नांची माहिती पर्यटकांना करुन देणे आणि त्याही पुढे जाऊन आधी राज्यातील आणि नंतर देशातील प्रत्येक पर्यटकाच्या तसेच नागरिकाच्या मनात हे रुजवावे लागेल हा पुढचा टप्पा असेल.
६. ताडोबाचे फेसबुक पेज बनवल्यास त्यावर लोक आपले अनुभव,छायाचित्र आणि ताडोबासाठी योगदान देऊ शकतील.
७. ताडोबामध्ये मार्गदर्शकांच्या दोन श्रेणी आपल्या तयार करता येतील. मार्गदर्शक हे जंगल आणि पर्यटकांमधील दुवा असतात.तसेच ताडोबामध्ये परदेशी त्याचप्रमाणे अहिंदी भाषक राज्यांमधीलपर्यटकही भेट देतात. त्यांच्याशी उत्तम इंग्रजी बोलणारे मार्गदर्शक नेमण्याची हीच वेळ आहे. आपण या मार्गदर्शकांना अधिक चांगले मानधन देऊ शकतो आणि ते ग्राहकांकडून वसूल करु शकतो. जगभरात जिथे जास्त पर्यटक भेट देतात आणि भाषा ही एक अडचण असते तिथे विशिष्ट भाषा बोलणारे मार्गदर्शक नेमण्याची पद्धत आहे. यामळे स्थानिक मुलांनासुद्धा शिक्षण आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळून चांगला रोजगार मिळू शकतो.
८. आपण मोहार्ली गेटपासून ते ताडोबा तलावापर्यंत आणि परत तेलियापर्यंत मुख्य रस्त्या दाखवणारा दीड तासाच्या छोट्या सहलींचा विचार करु शकतो. बसमधून होणा-या सहली शाळकरी विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी शुल्कात असतील आणि दुपारच्यावेळी ताडोबा जेव्हा बंद असते ती वेळ सोडून अशा सहली आयोजित करता येऊ शकतात. यामुळे जास्तीत जास्त मुले ताडोबा बघू शकतील आणि ते भविष्यात हीच मुले जंगलाचे रक्षक बनतील.
९. प्रवेशद्वारावर उत्तम स्वच्छतागृहाच्या सोयीसह माहिती देण्यासाठी संवाद केंद्र असणे आवश्यक आहे. या केंद्रात पर्यटक तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांची छायाचित्रे लावलेली असतील. स्थानिक खेड्यांमधील जीवनाचे दर्शन घडवणारी माहिती छायाचित्रांसह तिथे लावलेली असेल. ताडोबाशी संबंधित चलचित्र बघता येतील असे खुले प्रेक्षागृह असणे आवश्यक आहे.

१०. ताडोबाबाबत दुर्लक्षिला जाणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहार्ली गावाची स्वच्छता. येथील लोक सकाळचे सर्व नैसर्गिक विधी उघड्यावर ताडोबाकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर करतात.ताडोबासारख्या आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेल्यापर्यटनस्थळासाठी ही बाब नक्कीच चांगली नाही. हाच प्रकार ताडोबाच्या परिसरातील कच-याचा आहे. हा सगळा कचरा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर टाकला जातो आणि हा प्रकार ताडोबामधील जैवविविधतेच्यादृष्टीनं अत्यंत घातक आहे. या अत्यंत मूलभूत गोष्टी आहेत आणि एकदा आपण यावर काम करायला लागलो की नंतर या प्रक्रियेत समावेश असलेल्या इतर गोष्टींवरही मार्ग काढू शकतो. लोकांपर्यंत जंगल पोहोचणे महत्त्वाचे आहे. समाजात  दोनप्रकारचे लोक असतात एक म्हणजे ताडोबासारख्या विशेष राखीव जंगलांना भेट देणारे आणि दुसरे ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही जंगल बघितलेले नाही. परत पहिल्या प्रकारात जंगलात वाघ बघितलेले आणि न बघितलेले लोकही मोडतात. ज्यांनी वाघ बघितलेला आहे त्यांना त्यांची जबाबदारी समजावून देण्याची ताकद वाघातच असते. पण आपले उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांनी जंगलाला भेट देणे आणि वनसंरक्षणाच्या जबाबदाराची जाणीव निर्माण करणे हे आहे.

मान्य आहे की वाघ हा ताडोबाचा राजदुतच आहे मात्र ताडोबामध्ये वाघाशिवायही बरंच काही आहे. अगदी लहानशा पक्षांपासून ते फुलपाखरांपर्यंत ते रंग बदलणा-या रबराच्या झाडापर्यंत, जंगल चैतन्यानं ओथंबलेलं असतं व जंगलाची ही बाजू समजून घेतली की आपला आजूबाजूला बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो! ताडोबाने पर्यटकांना वाघ पाहण्याचा आनंद देण्यासोबतच आपण निसर्गाचं देणं लागतो ही जाणीव रुजवली पाहिजे. ही जाणीव रुजल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येक जण जंगलाचा दूत होईल व ताडोबातल्या वाघांसाठी यापेक्षा अधिक चांगली गोष्ट कोणती असू शकते!

शेवटी माझ्या ताडोबा भेटीतला थोडासा व्यक्तिगत अनुभव सांगतो जी माझी व्यक्तिगत कमाईच  आहे, प्रवेशद्वारापाशी एक कँटर म्हणजे खुली बस उभी होती जी पर्यटकांना जंगलाची सफर घडवते, त्या बसवर एका डरकाळणा-या वाघीणीचं चित्र होतं! ते छायाचित्र अगदी ओळखीचं वाटलं व नंतर मला जाणीव झाली की ते मीच काढलेलं होतं! आता हा आनंद शब्दात कसा व्यक्त करता येईल! ही भावना व्यक्त करण्यासारखी नाही तर स्वतः अनुभवण्यासारखी आहे! मी काढलेलं वाघीणीचं चित्र ताडोबामध्ये पर्यटकांसाठीच्या बसवर प्रदर्शित करण्यात आलं होतं हे पाहून मला अतिशय आनंद झाला! अशा लहान गोष्टी आपल्या ला  जो अवर्णनीय आनंद देतात त्या कितीही बालीशपणाच्या वाटल्या तरीही आपण त्या करत राहिलं पाहिजे व आपल्याला जे आवडतं ते जोपासलं पाहिजे कारण त्यातूनच तुम्हाला निखळ आनंद मिळतो! मला असं वाटतं ताडोबासारख्या ठिकाणांहून मिळणारा हा आनंद अनमोल आहे आणि तो अनुभवण्यासाठी तरी तेथे जायलाच हवं !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स





No comments:

Post a Comment