Thursday, 26 March 2015

स्मार्ट शहर का मृत शहर ?खरोखरच निरुत्साही, निष्क्रिय शहरांमध्ये स्वतःच्याच विध्वंसाची बिजे असतात व दुसरे फारसे काहीही नसते. मात्र उत्साही, वैविध्यपूर्ण, जोशपूर्ण शहरांमध्ये त्यांच्या स्वतःच्या पुनर्निमाणाची बिजे असतात, स्वतःशिवाय इतर समस्या व गरजांना समोरे जाण्याची ऊर्जा असते.”… जेना जेकब

जेना जेकब ही अमेरिकी-कॅनडियन पत्रकार, लेखिका व कार्यकर्ती होती व ती शहरांच्या अभ्यासावरील तिच्या प्रभावासाठी सर्वाधिक ओळखली जाते. द डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज या तिच्या अतिशय प्रभावी पुस्तकामध्ये नागरी नूतनीकरणाने शहरातील बहुतेक नागरिकांच्या गरजा विचारात घेतल्या नाही असे मत मांडण्यात आले आहे. हे पुस्तक नागरी नियोजनाशी संबंधित प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचे पुस्तक आहे. वरील विधान हे तिच्या अनेक विधानांपैकी एक आहे जे शहरी जीवनाचे सखोल व वास्तववादी तसेच तात्विक वर्णन करते!

माझी एक पत्रकार मैत्रिण बर्नाली पुणे येथील एका पाक्षिकासाठी काम करते, त्यात त्यांनी एक स्तंभ सुरु केला आहे ज्यामध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या भोवताली ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याविषयी लिहीले जाईल. तिने मला विचारले की त्या स्तंभासाठी मला काही लिहीता येईल का. माझ्यातल्या लेखकासाठी ही संधी म्हणजे नेकी और पूँछ पूँछ या हिंदीतल्या म्हणीसारखी होती, म्हणजेच मला स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगली संधी कोणती असू शकते, कारण आपण पुणेकरांना (निम्म आयुष्य पुण्यात काढल्यानंतर मला स्वतःला पुणेकर म्हणवून घ्यायला आवडतं, मात्र अजून मी एक दशमांशही पुणेकर नाही) आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीत समस्या शोधायला आवडतेच! आपले बरेचदा बरोबर असते हे मान्य केले तरीही कट्टर पुणेकर अगदी परिपूर्ण गोष्टीतही चुका काढू शकतात! इथे तर मला आपणहून  कुणीतरी माझ्या भोवतालच्या समस्यांविषयी विचारत होतं. ज्या शहरामध्ये लाखो लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा बेकायदा बांधकामांमध्ये राहात आहेत, ज्यांना कोणतीही सार्वजनिक आरोग्य सुविधा नाही किंवा व्यवस्थित शिक्षण उपलब्ध नाही, सार्वजनिक वाहतूक वगैरेंसारख्या चैनीच्या बाबी तर त्यांच्यापासून अतिशय दूर असताना, माझी परिस्थिती नक्कीच चांगली आहे. माझं ब-यापैकी चांगल्या वस्तीत घर आहे, माझं स्वतःचं वाहन आहे त्यामुळे मला सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहायची गरज नाही. माझे उत्पन्न चांगले असल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत व माझी मुले चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत मी एक आनंदी नागरिक आहे का, सामान्य व्याख्यानुसार विचार केला तर मी असायला पाहिजे, मात्र एवढेच पुरेसे आहे का? एक नागरिक म्हणून मी नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारतो की पुण्यासारख्या शहरातील माझ्या शहरी जीवनातील अनेक अदृश्य अडथळ्यांचे काय! मला मान्य आहे की अनेक लहान गावांपेक्षा व शहरांपेक्षा आपली परिस्थिती नक्कीच चांगली आहे, मात्र आपण जेवढे कर भरतो त्या तुलनेत त्याचे परिणाम फारसे चांगले नाहीत! एक नागरिक म्हणून मी व माझे कुटुंब आनंदी झाले की माझी जबाबदारी संपत नाही, तर माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही एक चांगले आयुष्य मिळाले पाहिजे जी केवळ महापालिकेचीच नाही तर माझीही जबाबदारी आहे! अनेक गोष्टींची अतिशय सहजपणे काळजी घेता येईल, मात्र कुणीही काळजी घेत नाही म्हणून कुणीही काही करत नाही अशी परिस्थिती आहे! यातील बहुतेक समस्या संपूर्ण शहराच्या आहेत, केवळ एखाद्या परिसराच्या नाहीत!

मी ज्या भागात राहतो त्याचे उदाहरण घ्या, हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे कर्वे रस्ता, हा भाग नदीपासून जवळ असल्यामुळे शांत आहे व येथे नदीलगत हरीत पट्टा आहे! मात्र हा हरीत पट्टा सर्व प्रकारच्या व्यावसायिक हेतूने वापरला जात आहे उदाहरणार्थ लग्नसमारंभांसाठी, प्रदर्शनांसाठी व हॉटेलसाठी ज्यामुळे हा हरित पट्टा ठेवण्याचा मूळ उद्देशच अपयशी ठरतो! या ठिकाणी लोकांची सतत वर्दळ असल्यामुळे लावली जाणारी वाहने व, डिजेंसह मोठ मोठे स्पिकर लावून काढल्या जाणा-या मिरवणुकींमुळे वाहतुकीची कोंडी होते! हा हरित पट्टा ज्या कारणासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता त्यासाठीच वापरला जावा याची महापालिका खात्री का करु शकत नाही? तशी खात्री करता येत नसेल तर मग हा व्यावसायिक विभाग म्हणून रुपांतरित करा व वाहनतळाचे व इतर अनेक नियमांचे पालन करुन अशाप्रकारे वापर करण्यास परवानगी द्या! आजूबाजूच्या नागरिकांनी वारंवार सर्व माहितीतल्या अधिका-यांकडे तक्रार केली आहे मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही! ध्वनीप्रदूषणाच्या जोडीलाच फटाक्यांमुळे वायूप्रदूषणही होत असते! ही केवळ माझ्या भागातलीच नाही तर संपूर्ण शहराची समस्या आहे कारण हजारो हॉटेल्स व व्यावसायिक आस्थापनांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागाच नाही व जी काही जागा आहे त्यावर इतर कारणांनी अतिक्रमण झाले आहे व अशा ठिकाणी येणारे सर्वजण रस्त्यावर वाहने लावतात जिथे लाखो वाहनांची आधीच गर्दी आहे!

त्यानंतर म्हात्रे पुलापासून ते राजाराम पुलापासूनचा पट्टा फॉर्म्युला वनचा ट्रॅक असावा अशीच बहुतेक त्यावर वाहने चालवणा-या लोकांची समजूत असावी! रस्त्याची स्थिती चांगली आहे मात्र वाहनचालकांचे व त्यांच्या वाहन चालविण्याच्या नागरी संवेदनेचे काय! वाहतूक पोलीस असतात मात्र ते हेल्मेट किंवा परवाना तपासतात, वेगाची मर्यादा तोडण्यासंदर्भात कोणतेही गुन्हे नोंदवले जात नाहीत! तेथे गतिरोधक व विभाजक का बसवले जात नाहीत असा प्रश्न मला पडतो. या पट्ट्यामध्ये गेल्या सात वर्षात सत्तर एक अपघात झाले असतील मात्र हा वाहतूक पोलीसांचा विषय आहे असे पीएमसीचे म्हणणे आहे व वाहतूक पोलीस म्हणतात की हे पीएमसीचे काम आहेगतिरोधक हा तर एक विनोदाचाच विषय आहे कारण तुम्हाला पुण्यात विविध प्रकारचे गतिरोधक दिसतील! काही असे बांधलेले असतात की ते शोधावे लागतात तर काही अशा प्रकारे बांधलेले असतात की चालकाला त्यांच्या वाहनाची गतीच नाही तर वाहनच तुटेल अशी भीती वाटतेतसेच पुढे गतिरोधक आहे अशी सूचना देणारा फलक क्वचितच असतो त्यामुळे चालकाला गतिरोधकावर लक्ष ठेवावे लागते व ब-याच जणांना त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे गतिरोधकांमुळेच अपघात होऊ शकतो! होय एक नागरिक म्हणून हा विषय माझाच वाटतो, जे रस्त्यांवर वाहने चालवतात त्या सर्वांसाठी ही एक मोठी समस्या आहे!

माझ्या घराच्या मागेच एक नाला आहे जो पूर्वी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी वापरला जात असे व त्याच्या काठावर विविध प्रकारची दाट झाडी होती, जेथे खंड्या पक्षी (किंगफिशर) व मैनेसारखे अनेक पक्षी येत असत. मात्र आता त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे ज्यामुळे आजूबाजूची जैवविविधता नष्ट झाली आहे, आता त्या नाल्यातून सांडपाणी वाहते, कचरा टाकलेला असतो व आजूबाजूला डुकरे व भटकी कुत्री फिरत असतात! नदीचीही अशीच परिस्थिती आहे जी माझ्या परिसराचा एक भाग आहे व हीच नदी आपल्या शहरातील बहुतेक भागातून वाहते! नदीचे पाणी अतिशय प्रदूषित आहे ज्यावर केवळ पतंग व कावळे व डास घोंगावतात! आपली नदी स्वच्छ व सुंदर का असू शकत नाही कारण पुण्याला शहरातून वाहणा-या सर्वात लांब नदीचे वरदान लाभले आहे मात्र तोच या परिसरासाठी शाप ठरला आहे! मला ही केवळ माझीच नाही तर संपूर्ण शहराची समस्या असल्याचे वाटते!

त्यानंतर आजूबाजूला ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या हे दृश्य नकोसे वाटते. वेळेवर कचरा उचलला जात नाही. तुम्ही शहराच्या कोणत्याही भागात जा, तुम्हाला रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याला लागू असलेल्या मोकळ्या जागेत कच-याचे ढीग साठलेले दिसतील! प्रत्येक सोसायटीने त्यांच्या आवारातच गांडुळ खत तयार करुन ओल्या कच-यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे व पीएमसी केवळ कोरडा कचराच नेईल. तरीही आपल्यासारखे नागरिक ओला कचरा कचराकुंडीतच टाकतात किंवा रस्त्यावर उघड्यावर टाकतात व आपल्या महानगरपालिकेकडे यासाठीही काहीही तोडगा नाही! ही माझ्या शहराची समस्या आहे व मी त्यासाठी जबाबदार आहे!

गाय व म्हशींसारख्या पाळीव प्राण्यांची वेगळीच कथा आहे, ते पदपथावर इकडे तिकडे फिरत असतात, रस्त्यावर ठिकठिकाणी शेण पडलेले असते, कुणीही या प्राण्यांच्या मालकांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, कारण त्यांनी आपल्या प्राण्यांसाठी पदपथाचा वापर केला तर तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहेआपल्या शासनकर्त्यांच्या कृपेने रस्त्याच्या, पदपथाच्या प्रत्येक इंचाचे काँक्रिटीकरण केले जात आहे ज्यामुळे मातीच उरलेली नाही ज्यात एकेकाळी शेण मिसळून जात असे व नैसर्गिकपणे त्याचा विल्हेवाट लावली जाई! आता ते अनेक दिवस तसेच राहते व त्याची दुर्गंधी येऊ लागते ज्यामुळे आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होतो. पावसाळ्यामध्ये तर आणखीनच वाईट परिस्थिती असते गाईच्या शेणामुळे पादपथ इतके निसरडे होतात की कुणीही त्यावर चालायची हिंमत करणार नाही व बिचा-या पादचा-यांना रस्त्यावरुनच चालावे लागत असल्यामुळे अधिक अपघात होतात. या समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही व मला असे वाटते आपल्या शहराच्या स्वच्छतेला तसेच सौंदर्याला लागलेले हे गालबोट आहे व ही माझ्या भोवतालची समस्या आहे! भटक्या कुत्र्यांचीही समस्या अशीच आहे जवळ नदी असल्यामुळे ते दिवसा नदीकाठी आसरा घेतात व रात्री उशीरा व पहाटे डीपी रस्त्यावर भटकत असतात त्यामुळे डीपी रस्त्यावरुन येणा-या जाणा-यांचे अतिशय हाल होतात! या भटक्या कुत्र्यांची दहशत संपूर्ण शहरात आहे व कुणाकडेही त्यावर तोडगा नाही हे सत्य आहे. रात्री ही कुत्री प्रत्येक दुचाकी वाहनाचा पाठलाग करतात व बिचा-या दुचाकीस्वारांना पाठलाग करणा-या कुत्र्यांना टाळताना अपघाताला सामोरे जावे लागते. शहरामध्ये नेमकी किती भटकी कुत्री आहेत व त्यांना आळा घालण्यासाठी कोणते उपाय केले जात आहेत याची नेमकी कोणतीही आकडेवारी नाही.

खणून ठेवलेले रस्ते हा आपल्या शहरी जीवनाचा एक भाग झालाय. एखादे दिवशी रस्त्याचे डांबरीकरण केले जाते; डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करताना तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या बाजूने अजिबात जागा सोडली जात नाही त्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या मूळांपर्यंत झिरपायला काही वावच नसतो, जे अतिशय चुकीचे आहे. त्यानंतर दुस-याच दिवशी तोच रस्ता खणायला सुरुवात होते, कधी तो गॅस पाईपलाईनसाठी खणला जातो तर कधी ऑप्टिकल फायबर लाईनसाठी खणला जातो तर कधी एमएसईबीच्या विजेच्या तारांसाठी खणला जातो. या शहरातील प्रत्येक नागरिकाला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की डांबरीकरण करण्यापूर्वीच ही सगळी कामे का केली जात नाहीत? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नसते व आपला पैसाही खड्ड्यात जातो हे वेगळे सांगायची गरज नाहीखणून झाल्यानंतर पुन्हा रस्ते बुजवून त्यावर डांबरीकरण करण्याचे काम असे काही केले जाते की भीक नको पण कुत्रे आवर किंवा औषध आजाराहून जास्त त्रासदायक असे म्हणायची वेळ येते. रस्ता एका दिवसात खणला जातो मात्र दुरुस्तीचे काम कितीतरी महिने चालते, त्यामुळे धूळ किंवा खणलेले साहित्य रस्त्यावर उघडेच ठेवले असल्याने वाहने घसरुन अनेकवेळा अपघात व्हायची शक्यता असते!

सार्वजनिक मुता-या किंवा शौचालये ही आणखी एक समस्या आहे ज्याकडे सर्वजण कानाडोळा करतात! एकतर ठराविक अंतराने अशा सुविधा नाहीत व त्या असल्या तरी त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की अगदी अंध, बहिरा व संवेदनाहीन व्यक्तिही त्या वापरण्याची हिंमत करणार नाही. किंबहुना या शौचालयांच्या देखभालीवर कुणाचे नियंत्रण आहे या प्रश्नाचे उत्तर कुणीच देत नाही! मला असे वाटते स्थानिक नगरसेवक तसेच पीएमसीच्या अधिका-यांना त्यांच्या प्रभागातील तसेच अधिकारक्षेत्रातील शौचालये किंवा मुता-या किमान दररोज किमान एकदा तरी वापरणे बंधनकारक केले पाहिजे, म्हणजे त्यांची किती दयनीय अवस्था आहे याची त्यांना जाणीव होईलही सार्वजनिक शौचालये कुठे आहेत हे दाखवणारा फलक कुठल्याही परिसरात नाही, ज्यामुळे लोक पादपथ किंवा रस्त्याच्याकडेला लघुशंका करतात, ज्यामुळे शहर आणखी घाण होते! या सार्वजनिक शौचालयांच्या आजूबाजूला राहणा-या नागरिकांचाही तितकाच दोष आहे कारण त्यांच्यापैकी ती वापरण्यायोग्य स्थितीत ठेवण्यासाठी कुणीही यंत्रणेवर दबाव आणलेला नाही, किंवा त्यांच्यापैकी कुणीही पुढे येऊन थोडे पैसे गोळा करुन त्यांची देखभाल करण्याचा प्रयत्न केला नाही!

माझी मुले कधीच मोकळ्या मैदानात खेळू शकलेली नाहीत कारण माझ्या परिसरात मैदानच नाही; म्हणजेच डेक्कन ते कोथरुड या परिसरात सार्वजनिक मैदान नाही असे मला म्हणायचे आहे. ते केवळ रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या गर्दीत खेळू शकतात किंवा रस्त्यांवर खेळून त्यांचा जीव धोक्यात घालू शकतात. आपल्याकडे एखाद्या परिसरातील नागरिकांना खेळण्यासाठी पुरेशी मोठी सार्वजनिक मैदाने का नाहीत? याचे उत्तरही कुणी देत नाही!

शहरातल्या दैनंदिन समस्यांची यादी अमर्याद आहे, आपल्या तोंड द्याव्या लागणा-या समस्यांचा विचार करुन माझा मेंदू थकून जातो तरीही आपण अभिमानाने पुणेकर म्हणून मिरवत असतो! डीपी म्हणजेच विकास योजना तयार केल्या जातात, त्यांची मुदत चुकते त्या रद्द होतात व आपण पुन्हा नवीन डीपी तयार करतो मात्र या दैनंदिन समस्यांचं काय? मात्र या शहरातील नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये देण्यासाठी आपल्याला एखाद्या धोरणाची किंवा डीपीची गरज का लागते? आपण सध्याच्या रस्त्यांची देखभाल करु शकत नाही व तरीही नवी रस्त्यांची योजना आखतो किंवा सध्याचे रस्ते रुंद करण्याचा विचार करतो! आपण सध्या असलेल्या हिरव्या पट्ट्यांचा हिरवाईसाठी वापर करु शकत नाही व आपण जैवविविधतेसाठी नवीन आरक्षण करतो जे कालांतराने विविध प्रकारच्या झोपड्यांमध्ये रुपांतरित होईल! ही केवळ एखाद्या प्रभागाची किंवा शहरातील एखाद्या भागाची समस्या नाही, संपूर्ण शहराला याचा त्रास होतोय किंबहुना ही जखम भळभळतेय असंच म्हणावं लागेल. मात्र प्रत्येकजण त्यासाठी एकमेकांना दोष देताहेत किंवा तो त्यांचा विषय नाहीच अशाप्रकारे त्या भळभळणा-या जखमेकडे दुर्लक्ष करतात!

माध्यमे या समस्यांविषयी ओरड करतात मात्र त्यामध्ये सातत्य नसते किंवा काही कारवाई करण्यात आली तर त्यांच्या बातमीचा परिणाम कसा झाला हे दाखवण्याचाच प्रयत्न अधिक असतो! यासाठीच संबंधित यंत्रणेवर दबावगट म्हणून काम करण्यासाठी एक मंच तयार करणे ही काळाची गरज आहे, ज्याद्वारे यंत्रणेला काम करावे लागेल नाहीतर शिक्षा भोगावी लागेल!

एकीकडे आपण हुशार शहर बनण्याविषयी चर्चा करत आहोत मात्र नागरिकांना सेवा देण्याचा विचार केल्यास आपण मठ्ठ शहर आहोत हे सत्य आहे. कुठेतरी या मठ्ठपणाची मोठी किंमती या शहरातल्या प्रत्येक उद्योगाला भरावी लागणार आहे, प्रामुख्याने रिअल इस्टेटला! पुणे हे राहण्यासाठी अतिशय चांगले शहर आहे असे समजून लोक इथे येत असत ते दिवस आता गेले. अनेक समस्या असलेले शहर असा याचा नावलौकिक आता झाला, आपण जोपर्यंत सत्य स्वीकारुन त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण मठ्ठ शहरावरुन मृत शहर झालेले असू! मात्र नागरिकांचा दृष्टिकोन पाहता असे जाणवते की आपले हृदय धडधडत आहे म्हणून आपण जिवंत आहोत मात्र शहराप्रती आपल्या संवेदना व मन मृत झाले आहे! आपण स्वतःला पूर्वेचे ऑक्स्फर्ड म्हणवतो मात्र शहराची जवळपास निम्मी लोकसंख्या मतदानाचा त्यांचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी घराबाहेरही पडत नाही; म्हणूनच आपले शहर लवकरच एक शवागार होईल यात काहीही आश्चर्य नाही, कारण मृतदेहांची तीच तर जागा आहे !


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स
No comments:

Post a Comment