Saturday 25 April 2015

जिम कॉर्बेट नावाचा स्वर्ग !




















मी जंगलातल्या अनेक रात्री तो खेळ पाहण्यात घालवल्या होत्या, मात्र मी पहिल्यांदाच एखाद्या नर-भक्षकाची रात्रभर वाट पाहत होतो. माझ्या समोरचा लांबलचक रस्ता चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता व दुतर्फा झाडांची गडद सावली त्यावर पडली होती, रात्रीच्या प्रकाशात वारा फांद्यांना हेलकावे देत होता व त्यामुळे सावल्याही हालत होत्या, मी त्याचवेळी डझनभर वाघ माझ्या दिशेने येताना मी पाहिले, मी आवेगाच्या भरात अशा ठिकाणी उभा राहिलो होती की आता मी फक्त त्या नरभक्षकाच्या दयेवरच होतो, याचा मला अतिशय पश्चाताप वाटू लागला. माझ्यात पुन्हा गावात जाऊन मी स्वतःहून ज्या कामाची जबाबदारी घेतली होती ते करायला मी अतिशय घाबरलो आहे हे सांगायचं धाडस नव्हतं, भीतीने तसंच थंडीने कुडकुडणा-या दातांनी, मी रात्रभर बसून होतो. बर्फाळ पर्वतरांगांमध्ये माझ्यासमोर हळूहळू पाहाट होत होती, गुडघे वर घेऊन त्यावर माझे डोके टेकवले, मी अशाच स्थितीत गाढ झोपलेला माझ्या माणसांना सापडलो; वाघाबद्दल मी काही ऐकलेही नाही व पाहिलेही नाही.”                … जिम कॉर्बेट

वरील शब्द महान जिम कॉर्बेट यांच्या पुस्तकातील आहेत जे मी विदर्भासारख्या दुर्गम भागात असताना दहा वर्षांच्या वयात वाचले होते! त्या वयात माझ्यासाठी जिम कॉर्बेट म्हणजे सुपर हिरोच होता, जो वाईट म्हणजे नरभक्षकांचा वाघांचा रात्र-रात्र पाठलाग करत असे (पूर्णपणे आदर बाळगून मला असे म्हणावेसे वाटते की खरतरं वाईट वाघ असा शब्दच नसतो), व आपल्या लेखनातून माझ्यासारख्या अनेकांना जंगलाचे दर्शन घडवत असे! खामगावमधल्या त्या मुलाला कधी स्वप्नातही वाटले नाही की तो त्याच जंगलाला भेट देईल ज्या जंगलात जवळपास सत्तर वर्षांपूर्वी कॉर्बेटने भटकंती केली होती, मात्र काहीवेळा न पाहिलेली स्वप्नेही सत्य होतात व माझेही झाले! मला केवळ एकदाच नाही तर पाच वेळा कॉर्बेटच्या भूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाले! माझ्या सहावर्षांपूर्वीच्या भेटीपासून नुकत्याच दिलेल्या भेटीत बराच बदल झाल्याचे मला जाणवले, दिल्लीपासून कॉर्बेट अभयारण्याजवळच्या रामनगरपर्यंतच्या रस्त्याचे बहुतेक शहरीकरण झाले आहे व रस्ता अतिशय खराब परिस्थितीत आहे विशेषतः उत्तर प्रदेश राज्यातील भाग! आपल्या शासनकर्त्यांना आपल्या देशाला जागतिक नकाशावर न्यायचे आहे मात्र जिम कॉर्बेट अभयारण्यासारख्या ठिकाणी, जेथे जगभरातील पर्यटक येतात तिथे पोहोचण्यासाठी फारशी चांगली सोय नाही. आपल्याकडे विविध प्रकारची जंगले आहेत, आपण या सर्व जंगलांना जोडणारा मार्ग (मास्टर कॉरिडॉर) तयार करु शकतो, व ही जंगले एकमेकांशी रस्ते, विमानमार्ग व रेल्वे मार्गाने व्यवस्थित जोडू शकतो, म्हणजे सर्व महत्वाची वन्यजीवन ठिकाणे एकमेकांना जोडता येतील. कॉर्बेटचे उदाहरण घ्या ते केवळ दिल्लीला विमानमार्गाने जोडलेले आहे व दिल्लीहून रामनगरला पोहोचण्यासाठी आठ ते दहा तास लागतात! हा वेळ नक्कीच कमी करता येऊ शकतो म्हणजे पर्यटकांना अधिक वेळ जंगलांमध्ये घालवता येईल.

 एक वन्यजीव प्रेमी  म्हणून मला आणखी एक चिंतेचा विषय वाटतो तो म्हणजे कॉर्बेटच्या भोवताली वाढलेली रिसॉर्टहॉटेल्स! पर्यटकांना राहण्यासाठी जागा आवश्यक आहे हे मान्य आहे व एका बाबतीत कॉर्बेट अभयारण्य कान्हा, ताडोबा, रणथंबोर किंवा बांधवगडपेक्षा वेगळे आहे, ते म्हणजे अभयारण्याच्या भोवतालीही पर्यटकांना पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. नैनिताल, अलमोडा, बिनसार व रानीखेत ही सर्व पर्यटन स्थळे कॉर्बेटपासून जवळ आहेत, त्यामुळे पर्यटकांना अभयारण्याची सफारी मिळाली नाही तर इतर पर्याय उपलब्ध असतात व म्हणूनच कॉर्बेटच्या भोवताली अशा रिसॉर्टची गरज आहे! मात्र या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारा कचरा तसेच रहदारी वन्यजीवनासाठी अतिशय धोकादायक आहे, आता आपण या आघाडीवर संतुलन राखले पाहिजे नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल!  आपण स्वतंत्रपणे पर्यटन निवास क्षेत्र विकसित करु शकतो जे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच जलप्रक्रिया प्रकल्पांनी सुसज्ज असेल तसेच या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्थित सोय असेल. आपण ते पर्यटन गाव म्हणून विकसित करु शकतो व त्यानंतर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नव्या रिसॉर्टना आळा घालू शकतो किंवा परवाने देणे बंद करु शकतो.

 त्यानंतर मुद्दा येतो जंगल व भोवतालच्या परिसरात पायाभूत सुविधांचा, व या आघाडीवर कॉर्बेट कोणत्याही पार्कच्या पुढे आहे, अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी व आतमध्ये चांगल्या स्वागत कक्षामुळे पर्यटकांचे जीवन सुसह्य होते. मात्र बिजरानी किंवा खिन्नौली व सरपडुली येथील सार्वजनिक शौचालयांची व्यवस्थित देखभाल झाली पाहिजे. या बाबतीत आपण कान्हाची पद्धत अवलंबू शकतो, या शौचालयांपाशी पूर्णवेळ कर्मचारी ठेवून आपण ती वापरण्यासाठी पर्यटकांना शुल्क आकारु शकतो! कॉर्बेटमधील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे पर्यटकांना जंगलात राहता येते, जंगलातील विश्रामगृहे बरीच चांगल्या स्थितीत असल्याबद्दल पूर्ण गुण दिले पाहिजेत. धिकाला वगळता ब-याच ठिकाणी विजेची समस्या आहे व तेथे उच्च शक्तिच्या सौर ऊर्जेवर चालणा-या बॅटरींचा विचार करता येईल, ज्या कॅमे-याच्या बॅटरी प्रभारित करण्यासाठी वापरा येतील. इथली आणखी एक समस्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोलीतली हवा खेळती राहात नाही. आपण सौर/वायू ऊर्जा कंपन्यांना ही विश्रामगृहे दत्तक देण्याचा विचार करु शकतो व त्याबदल्यात त्या विश्रामगृहात त्यांची जाहिरात करु शकतील, नाहीतर इथे राहणा-या व वीज वापरणा-या पर्यटकांना थोडे जास्त शुल्क आकारु शकतो! मात्र वन्य जीव पर्यटनात राहण्यासाठी या मूलभूत गरजा आहेत व थोडा चाकोरीबाहेरचा विचार करुन आपल्याला हे प्रश्न सोडवता येऊ शकतील!
तसेच बहुतेक पर्यटक वाघाला पाहण्याच्या उद्देशानेच येतात; हे ध्यानात घेऊन विशेषतः बिजरानी भागामधील कृत्रिम पाणवठे थोडे मोकळे ठेवले पाहिजेत म्हणजे तिथे वाघ असेल तर पर्यटकांना तो अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. आपण या पाणवठ्यापासून सुरक्षित अंतर ठेवू शकतो म्हणजे पाणवठ्यापाशी येणा-या प्राण्यांना वाहनांच्या वर्दळीचा त्रास होणार नाही, मात्र सध्या बहुतेक जलाशय झुडुपांमध्ये किंवा झाडांमागे लपलेले आहेत त्यामुळे तिथले दृश्य पाहण्यात अडथळा येतो. आणखी एक बाब म्हणजे जंगलामध्ये नवीन मार्ग उघडणे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्बंध घातलेले आहेत हे मान्य आहे मात्र आपण काही जुने मार्ग बंद करुन काही नवीन मार्ग सुरु करु शकतो. यामुळे वारंवार येणा-या पर्यटकांनाही सफारीत रस राहील कारण मला कदाचित त्याच मार्गावरुन फिरायला कंटाळा येईल, त्याशिवाय कॉर्बेटमधील जैवविविधता दाखवणे ही देखील त्यामागची कल्पना आहेत्याशिवाय एकदिवस कॉर्बेटच्या रक्षकांसोबत अशी योजना राबवून पर्यटकांना अभयारण्यातील चौकींवर राहण्याची परवानगी देण्याचाही विचार करता येईल! यामुळे लोकांना वनरक्षकांचे जीवन समजून घेता येईल, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी वन्यजीवनाचे रक्षण करतात व अशा योजनांमुळे प्रत्यक्ष अभयारण्यात काम  करणा-या कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावेल! अशा उपक्रमांमुळे पर्यटक व अभयारण्यांच्या कर्मचा-यांमधील संवाद अधिक सशक्त होईल व सामान्य माणसाला वन्य जीवनातल्या अडचणी समजल्यानंतर त्यासंदर्भातील कर्तव्य समजेल.

कॉर्बेटमध्ये वन्यजीवनाचा भरपूर अनुभव घेता येतो, तरीही मी अनेक मित्रांकडून ऐकले आहे की त्यांना कॉर्बेटमध्ये वाघ दिसला नाही व तेथे काहीही नाही! त्यासाठी आपण आपल्या वन्यजीव पर्यटन मोहिमेला दोष दिला पाहिजे जी केवळ वाघांवर केंद्रित आहे. आपण कॉर्बेट व पाण्याची कमतरता असलेल्या मध्य भारतातील अभयारण्यांमधील फरक समजावून घेतला पाहिजे. पाण्याच्या कमतरतेमुळे या अभयारण्यांमध्ये जलाशयांवर वाघ सहजपणे दिसून येतात, मात्र कॉर्बेटमध्ये तशी परिस्थिती नाही. इथे रामगंगा ही बारमाही नदी आहे व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व कॉर्बेट अतिशय विस्तीर्ण असल्याने वाघ किंवा बिबट्या दिसणे अवघड असते कारण त्यांचे सावज सगळीकडे चितळ, सांबर व लंगुरांच्या स्वरुपात उपलब्ध असते! त्यामुळेच वाघ उघड्यावर म्हणजे अगदी रस्त्यावर आल्याशिवाय सहजपणे दिसत नाहीत व चालत्या जिप्सींमुळे ते बिचकतात हे पण एक कारण आहे ! वाघांचे कान एक किलोमीटरवरुनही जिप्सीच्या टायरचा आवाज टिपू शकतात हे आपण समजून घेतले पाहिजे व तो पुढे चालत असेल तर शांतपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या दाड झुडुपांमध्ये निघून जातो, आपण अगदी दहा पावलांवर असलो तरीही वाघ किती जवळ होता हे आपल्याला कळणारही नाही! त्याचवेळी इथे आढळणा-या पक्षांच्या प्रजातींचा विचार केल्यास, कॉर्बेटमध्ये एकाच ठिकाणी बहुतेक सर्वोत्तम व सर्वाधिक जैवविविधता उपलब्ध आहे हे लक्षात येईल. तसेच तुम्ही अभयारण्याबाहेर राहात असाल व केवळ एका किंवा दोन सफारींसाठी भेट देत असाल तर वाघ दिसण्यासाठी तुमचे नशीबच असले पाहिजे! तुम्ही अभयारण्यातील विश्राम गृहात राहात असाल व किमान चार सफारी करत असाल तर तुम्हाला जंगलाचा राजा दिसण्याची अधिक शक्यता असते! तसेच तुम्ही कॉर्बेटला कोणत्या हंगामात भेट देत आहात हे देखील महत्वाचे असते म्हणजे एप्रिल/मे मध्ये वाघ दिसण्याची शक्यता हिवाळ्यापेक्षा अधिक असते! मला असे वाटते ही सर्व माहिती देण्यासाठी किमान बिजरानी व धिकालाच्या प्रवेशद्वारांपाशी चांगली माहिती केंद्रे असली पाहिजे म्हणजे पर्यटकांना असे तपशील माहिती असतील व वाघ दिसला नाही म्हणून ते नाराज होणार नाहीत!
माझ्या कॉर्बेटच्या सफारीतील माझे काही अनुभव इथे देत आहे, मला कॉर्बेटमध्ये वाघ पाहण्याचे भाग्य मिळाले मात्र वाघापेक्षाही कितीतरी अधिक चित्तवेधक दृश्येही पाहायला मिळाली! या लेखामुळे तुम्हाला कॉर्बेट अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल असे मला वाटते
 एप्रिल महिन्यातला तळपता सूर्य घनदाट जंगलाने वेढलेल्या डोंगरामागून वर येतो व त्याच्या तेजाने सर्वकाही उजळून निघते, आमची जिप्सी धांगडी प्रवेशद्वारातून आत जाते व एका धुळीने माखलेल्या रस्त्यावरुन धिकालाच्या दिशेने जात असते, मी अथांग पसरलेली हिरवळ व डोंगरातून खळाळणारा रामगंगेचा प्रवाह डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत असतो व त्या पार्श्वभुमीवर एक महाकाय हत्ती चालत असतो आपल्याच मस्तीत! कॉर्बेट नावाचे नाट्य सुरु झालेले असते व आता पुढील चार दिवस निसर्ग देवेतेने स्वतः लिहीलेल्या पटकथेत मी स्वतःला झोकून देणार असतो!”

 त्याआधी संध्याकाळी तुम्ही एका ठिकाणी तीन तास वाघाची वाट पाहात घालवलेले असतात व तो कुठेतरी जवळपासच आहे हे तुम्हाला माहिती असते, भांटाच्या झुडुपात शांतपणे वाट पाहतोय, त्याचे हिरवेगार डोळे तुमच्यावर रोखलेले असतात मात्र तुम्ही त्याला पाहू शकत नाही; मोर, सांबर व चितळांनी दिलेल्या इशा-यांमुळे तुम्हाला वातावरणात त्याचे अस्तित्व जाणवते! तुम्ही धुळीने माखलेल्या रस्त्यांवर त्याच्या पावलांचे ठसे पाहिलेले आहेत, तरीही तो समोर येत नाही, तो जणू काही तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहतोय! तुम्ही जंगलातल्या विश्रामगृहावर परत जाता व त्याची स्वप्ने पाहात झोपता, पुन्हा सकाळी उठल्या उठल्या जिप्सीत बसून त्याच्या शोधात जाता, त्याच्या पाउलखुणांचा माग घेत काल संध्याकाळी तुम्ही जिथे तीन तास घालवलेत तिथेच पोहोचता, वाघ येण्याचे इशारे सगळीकडून ऐकू येत असतात व तुम्हाला मनातून जाणवतं की वाघ केवळ काही पावलांवर आहे व आता केवळ काही मिनिटे वाट पाहायची आहे व नशिबाची साथ , आणि तो अचानक रस्त्यावर येतो, एक नर वाघ डरकाळी फोडत तुमच्या दिशेनं चालत येतो; जंगलामध्ये याहून अधिक भाग्य काय असू शकतं, तुम्हाला आनंद होतो कारण यालाच जंगलामध्ये वाघाचा शोध घेणे असं म्हणतात!”

 मी या अभयारण्याला सहा वर्षांनी भेट देत होतो व इथे सगळं काही मी आधी आलो होतो तसंच किंवा त्यापेक्षा अधिक चांगलं होतं; सूर्य क्षितीजाला स्पर्श करतो तेव्हा हा परिसर केशरी रंगात न्हाऊन निघतो, रामगंगा जलाशय उन्हामुळे झळाळत असतो, या पार्श्वभूमीवर हत्तींच्या छायाकृती हलत असतात त्यांच्या चित्कारांनी वातावरण भरलेलं असतं! हे संपूर्ण दृश्य एखाद्या स्वप्नासारखं असतं जे मी दररोज दिवसं-रात्र पाहात असतो, ते पुन्हा साकार होतं!! मी कॉर्बेटला यापूर्वी, पाच वेळा भेट दिली आहे व प्रत्येक वेळी मी त्याच्या अधिकाधिक प्रेमात पडतो!”
 जंगलातल्या विश्रामगृहांची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला इथे काळामिट्ट अंधार म्हणजे काय याची जाणीव होते! बिजरानीतल्या विश्रामगृहात मी रात्री उशीरा आकाश न्याहाळत होतो, स्वच्छ आकाशावर चांदण्यांची चादर अंथरलेली होती, अचानक विश्रामगृहाच्या सौर तारांच्या कुंपणाजवळ एका सांबराचा चित्कार आला व त्यानंतर चितळांनी इशारे दिले, म्हणजेच वाघ नक्कीच जवळपास होता! जंगलातल्या अंधारात तुम्ही किती असहाय्य असता याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का कारण प्रत्येक प्राणी तुम्हाला पाहू शकतो मात्र तुम्ही कुणालाच पाहू शकत नाही! अशा वेळी केवळ आपल्या श्रवणेंद्रियांनी जंगलाचा अनुभव घेण्यातही मजा असते. आम्ही वाघ पाहू शकलो नाही मात्र त्याचं अस्तित्व निश्चितच अनुभवलं व तो एक अविस्मरणीय अनुभव होता!”

 तुम्ही बिजरानीच्या विश्रामगृहातून बाहेर पडून जंगलाच्या बाहेर जात आहात, वाघाची डरकाळी फोडणारी प्रतिमा तुमच्या मनात व कानात रेंगाळत आहे व अचानक थोड्या अंतरावर एका झाडावर तुम्हाला एक मोठा पक्षी अचानक दिसतो, तो महा धनेश पक्षी असतो, या आकाराच्या पक्षांमध्ये हा बहुधा सर्वात सुंदर पक्षी आहे, जवळपास ५०० मीटरच्या अंतरावर माझ्या ६०० मिमीच्या k^ मेरा लेन्सनी टिपण्यासाठी ते खूपच दूरचं दृश्य होतं मात्र एखाद्या नेमबाजाप्रमाणे मी ते टिपलं! मला त्याचं छायाचित्रं घेतल्याचा फार आनंद झाला कारण मी त्याला आधी कधीच पाहिलं नव्हतं व मी बरीच किंमत मोजून आणखी एक धडा शिकलो होतो त्याचा इथे उपयोग झाला, तो म्हणजे जंगलातून बाहेर पडेपर्यंत कॅमेरा बंद करुन ठेवायचा नाही!”

गहिरालपासून ते धिकालापर्यंत रामगंगा नदी रस्त्याला समांतर वाहते, ब-याच वळणांवर अनेक प्रवाह नदीला येऊन मिळतात ज्यामुळे पावसाळ्यात भरपूर पाणी रामगंगेला येऊन मिळते! प्रवाह नदीला मिळतो अशा एका ठिकाणी माझी नजर एका गरुडावर गेली त्याची कशावर तरी नजर होती, त्याच वेळी तिथे एक कोल्हा आला. आम्ही लेन्सने पाहात असताना आमची उत्सुकता वाढली, बहुतेक तेथे वाघाने टाकून दिलेली शिकार होती, मात्र शिकार करताना भरपूर कष्ट पडल्याने वाघ थोडावेळ खोल पाण्यात गेला होता व शिकार तशीच उघड्यावर पडलेली होती! गरुड व कोल्हा दोघांचाही त्या शिकारीवर डोळा होता, शिकार आपणच घेऊन जावी या विचारात दोघेही एकमेकांचा अंदाज घेत होते. मात्र लवकरच त्यांना जाणवलं की शिकार दोघांसाठीही पुरेशी आहे व त्यांच्यातला संघर्ष तिथेच संपला, त्यांनी शिकारीचा आपापला वाटा घेतला व तिथून निघून गेले! हे संपूर्ण नाट्य पंधरा मिनिटात घडलं, मात्र आम्ही आमच्या भोवतालचं सगळं काही विसरुन गेलो होतो, अगदी वाघालाही, जो दुपारी उशीरा तिथे आला! कॉर्बेटच्या जंगलाची ही अशी मजा आहे!”

 कॉर्बेटचं जंगल म्हणजे काय चिज आहे हे समजावं यासाठी मी केवळ माझे काही अनुभव इथे दिले आहेत. वाघांना पाहाणं हे कॉर्बेटमधलं सर्वोत्तम दृश्य असतं हे मान्य असलं तरीही आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला वाघ दिसला नाही तेव्हा तो कॉर्बेट अभयारण्याचा दोष नसतो. तुमच्या आजूबाजूला वाघाचं अस्तित्व अनुभवायला शिका, त्याच्या पावलांचे ठसे पाहा, त्याची डरकाळी ऐका, जंगलातल्या प्राण्यांचे व पक्षांचे इशारे समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला जंगलाचा अधिक चांगल्या प्रकारे व ख-या अर्थाने आनंद घेता येईल! आपल्याला जे मिळालं नाही त्याबद्दल आपण उघडपणे नाराजी व्यक्त करतो मात्र आपल्याला जे मिळालं त्याविषयी आपण आनंद व्यक्त करायला सोयीस्करपणे विसरतो! तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा धिकालाच्या विस्तीर्ण कुरणांवर चरणारे हरिणांचे कळप पाहाताना तुम्ही मंत्रमुग्ध झाला नाहीत का? रामगंगा जलाशयावरील सूर्यास्ताच्या वेळचा नारंगी सूर्य व त्या पार्श्वभूमीवर हालणा-या हत्तींच्या छायाकृती पाहताना तुम्हाला भुरळ पडली नाही का? तुम्ही त्या चित्तवेधक धनेश पक्षाचे रंग किंवा लांब शेपटीच्या निखार पक्षाचे सौंदर्य न्याहाळले नाही का? तुम्ही स्वर्गीय नर्तक पक्ष्याला आकाशात भरारी घेताना पाहिलं नाही का जो निळ्याशार आकाशात पांढ-या लाटेप्रमाणे वाटतो? रात्री तुम्ही निरभ्र चांदण्यांनी भरलेले आकाश पाहिले नाही का व तुमच्या विश्रामगृहाच्या व-हांड्यातून त्या मोजण्याचा प्रयत्न केला नाही का? कॉर्बेटने अनेक प्रकारे उत्तमोत्तम दृश्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, जी आपल्याला आपल्या काँक्रिटच्या जंगलात पाहायला मिळणार नाहीत व तरीही आपण आपल्याला काहीही पाहायला मिळालं नाही अशी तक्रार करतो! माझ्या मते हा पूर्णपणे स्वार्थीपणा आहे!
मी अशा सफरींवरुन माझ्या काँक्रिटच्या जंगलात परत आल्यानंतर, सकाळी मॉर्निंग वॉकला चालताना माझे कान शेजारच्या झाडावरील पक्षांचा किलबिलाट टिपतात व मी अपेक्षेने आजूबाजूला पाहतो, मला अतिशय आनंद होतो कारण फांद्यांवर मला दयाळ पक्षांची जोडी नाचताना दिसते! जंगलाने मला माझ्या भोवताली असलेल्या वन्यजीवनाकडे पाहायला शिकवलं आहे, परिसर कोणताही असला तरीही तेथे पक्षांच्या, झाडांच्या, गवताच्या कितीतरी प्रजाती असतात व त्या पाहताना मी पुन्हा एकदा माझ्या शहरातले ताणतणाव विसरुन जंगलात जातो! मित्रांनो तुम्हा जेव्हा पुढच्या वेळेस कॉर्बेटला भेट द्याल तेव्हा जंगलाचा जास्तीत जास्त अनुभव घेण्याचा प्रयत्न करा, भांटसारख्या कलोरोडेण्ड्रोनच्या झुडुपांचा सुवास व पक्षांचा आवाज सोबत न्या, त्यानंतर तुम्हाला कॉर्बेटने वाघ दाखवला नाही अशी जाणीव कधीच होणार नाही, कारण लक्षात ठेवा वाघाने तुम्हाला नक्की पाहिले आहे

खाली दिलेल्या लिंकवर कृपया अधिक छायाचित्रे पाहा...

https://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157649824312524/

https://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157649783844074/ 


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif







No comments:

Post a Comment