Friday, 15 May 2015

आनंदाचा निर्देशांक आणि बांधकाम व्यवसाय !


एका विशिष्ट मर्यादेनंतर पैशामुळे नेहमी आनंद मिळेलच असे नाही. दहा दशलक्ष डॉलर कमावलेले लोक हे नऊ दशलक्ष डॉलर कमावलेल्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असायलाच पाहिजे असे नाही  … हॉबर्ट ब्राउन

ब्राउन हा अमेरिकी मूर्तिकार व गतिमान प्रतिमांच्या स्पर्धेचा (कायनेटिक स्कल्पचर रेसिंग) प्रणेता होता. त्याचा असा विश्वास होता की प्रौढांनी आयुष्यात मौज मजा केली पाहिजे म्हणजे लहान मुलांना म्हातारे व्हावेसे वाटेल! त्याचे हे तत्वज्ञान व समाजाने त्यानुसार जगावे यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नामुळेच अमेरिका आज ज्या स्थानावर आहे.त्यात त्याचे मोठे योगदान आहे! जगभरातील लोक अमेरिकेत किंवा पाश्चिमात्य देशात यायला व स्थायिक व्हायला उत्सुक असतात; याचे कारण म्हणजे आनंद नेमका काय आहे हे त्यांना इतरांपेक्षा अधिक चांगले समजले आहे!

जेव्हा आपण आनंदाविषयी बोलतो तेव्हा व्यक्तिपरत्वे त्याविषयीची मतं बदलत असतात. मात्र अलिकडेच मी बहुतेक सर्व वृत्तपत्रांमधून अतिशय रोचक बातमी वाचली, ती म्हणजे आनंदाच्या निर्देशांकाविषयी! ब-याच जणांना हे पाश्चिमात्य देशांचं विशेषतः अमेरिकेचं खूळ वाटेल कारण ते प्रत्येक गोष्ट कुठल्यातरी परिमाणाने मोजण्याचा प्रयत्न करत असतात, मग ती संपत्ती असो किंवा स्वयंचलित वाहने किंवा अगदी रोज किती आईसक्रिम खाल्लं याचं मोजमाप असो! मात्र भावना किंवा आनंदासारखी भावना सर्वसामान्य निकषांवर कशी मोजता येईल तसंच त्याचा निर्देशांक कसा तयार करता येईल? आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये आपण आनंदापेक्षा मन:शांतीचा अधिक विचार करतो मात्र आपला आजचा चर्चेचा विषय हा नाही, त्याविषयी आपण पुढील एखाद्या लेखात चर्चा करु व या लेखात आनंदाच्या निर्देशांकावर बोलू. हा निर्देशांक एखाद्या देशाचे नागरिक म्हणजेच आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आम आदमी किती आनंदी आहेत हे ठरवतो. या निर्देशांकात भारत ब-याच खालच्या पायरीवर होता हे सांगायची गरज नाही. आनंद निर्देशांकावरील १५८ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा होता! बांग्लादेश आणि पाकिस्तान सारख्या शेजारी देशातील नागरीक सुद्धा आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. या क्रमवारीमध्ये आपल्या देशातील नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात दुःखी आहेत हे काही चांगले लक्षण नाही! यातही पुन्हा बरेच जण म्हणतील की त्यात काय नवीन? आपण एक  विकसनशील देश आहोत व आपल्याकडे ब-याच समस्या आहेत, त्यामुळे लाखो लोक दारिद्र्यरेषाखाली असताना आपण कसे आनंदी राहू शकतो? अवतरणात म्हटल्याप्रमाणे संपत्ती हा या निर्देशांकाचा एक निकष असला तरीही इतरही बरेच घटक आहेत, ज्यावर समाजाचा आनंद मोजला जातो व हे घटक आपण राहत असलेल्या परिसराशी संबंधित आहेत. आनंद निर्देशांकाच्या बातमीचा आपल्या उद्योगाशी जवळचा संबंध आहे ज्याचा मी भाग आहे, रिअल इस्टेट उद्योग तसेच आपण ज्याला घर म्हणतो त्याचाही आपल्या जीवनातील आनंदाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आपण याविषयी पुढे बोलूच, उत्सुकतेने मी निर्देशांक तयार करण्यासाठी कोणते निषक वापरण्यात आले हे वाचू लागलो! हे निकष अतिशय सोपे होते, त्यामध्ये स्वाभाविकपणे दरडोई उत्पन्नाचा समावेश होता, तसंच दयाळुपण, स्वातंत्र्य, सरासरी वय व भ्रष्टाचार यासारख्या घटकाचाही समावेश होता! मी हा निर्देशांक तयार करण्यासाठी नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक घटकाचा विचार करु लागलो.
सर्वप्रथम आपण दरडोई उत्पन्नाचा विचार करु; आपला देश विकसनशील आहे हे आपण सर्वजण जाणतो जेथे लाखो लोकांना प्यायचे पाणी किंवा पोषक आहार किंवा राहण्यासाठी स्वतःचे घर यासारख्या पायभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. आण्विक ऊर्जा निर्मितीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आपण पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहोत व एवढेच काय आपली संरक्षण व्यवस्थाही या विकसित देशांच्या कृपेवरच अवलंबून आहे. अनेक शहरांना किंवा गावांना जोडणारे रस्त्यांचे जाळे आपल्याकडे नाही किंवा आपल्या देशात सर्वत्र समान वीज वितरण जाळे नाही, त्यामुळे अनेक कुटुंबे विजेपासून वंचित आहेत हे तथ्य आहे. सार्वजनिक आरोग्य स्थितीही अतिशय वाईट आहे व कोट्यवधी लोकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. आपल्या हिंदू तत्वज्ञानात भौतिक सुखांना त्याज्य मानण्यात आले असले तरीही मूलभूत गरजा खरेदी करण्यासाठी पैसाही महत्वाचा घटक आहे, म्हणूनच त्याचा कोठेतरी संबंध आनंदाशी आहे. हे दरडोई उत्पन्न तसंच, स्वतःचे पडवडण्यासारखे घर हे घटक थेट आपल्या लोकसंख्येशी निगडित आहेत! आनंद निर्देशांक काढताना रिअल इस्टेट उद्योगाचा इथेच संबंध येतो. स्वतःचे घर नसलेल्या व्यक्तिचा किंवा कुटुंबाचा विचार करा, त्यांच्या मनामध्ये सर्वात पहिला विचार येतो तो भाड्याने सदनिका घेण्याचा, मालकाने घर सोडायला सांगितले तर काय ही चिंता त्यांना नेहमी सतावते! दुसरीकडे स्वतःचे घर असलेल्या कुटुंबाचा विचार करा, ते कितीही गैरसोयीचे असले तरीही कर्जमुक्त घरामुळे त्यांना विश्वास असतो की त्यांना कुणीही त्यांच्या घरातून बाहेर जायला सांगणार नाही. मी जेव्हा त्यांना कुणीही बाहेर जायला सांगणार नाही असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ संपूर्ण मालकीहक्क असलेले घर, म्हणजे अगदी सरकारही त्यांना ते खाली करायला सांगणार नाही. जेव्हा घरासारखी मूलभूत गरज पूर्ण होते तेव्हा कुटुंबांतील व्यक्ती आनंद निर्देशांकावर एक पायरी वर जातात कारण त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळालेले असते, त्यांच्याकडे हक्काचे घर असते. जीवनात एखाद्या उद्दिष्टाचा किंवा हेतूचा अभाव हे दुःखाचे मुख्य कारण आहे. कुणीही व्यक्ती भोवतालच्या व्यक्ती आनंदी असल्याशिवाय आनंदी होऊ शकणार नाही व एकत्र राहणा-या लोकांच्या आनंदाचा एक महत्वाचा घटक म्हणजे स्वतःचे घर कारण त्यामुळे आपल्याला अतिशय आरामदायक वाटते!
तुमच्याकडे एकदा तुमचे घर असल्यावर तुम्ही दयाळूपणाविषयी विचार करु शकता म्हणजे वाटून घेण्याची किंवा देण्याची सवय! स्वतःच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे आनंदी असलेले एक मनच इतरांच्या गरजांचा विचार करु शकते व समाजासाठी उदारपणे काही करु शकते! एखादी व्यक्ती सतत स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करतेय व त्यासाठी पै-पै गोळा करण्यामागे लागतील आहे तिचा विचार करा; एखाद्या व्यक्तिला स्वतःच पैशांची गरज असताना ती संत असल्याशिवाय इतरांना देऊ शकेल का आणि हा काही साधुसंतांचा जमाना नाही हे वास्तव आहे! तसेच आपल्याला उदारपणा हा काही शाळा कॉलेजातून शिकवला जात नाही, तर आपल्या बालपणी घरीच त्याचं बाळकडू मिळतं. इतरांना देणे म्हणजेच उदारपणा व त्याचा पहिला धडा आपल्याला घरी मिळतो, मात्र त्यासाठी आपल्या घरातले वातावरण आनंदी हवे. इथेही रिअल इस्टेट उद्योगाची भूमिका अतिशय महत्वाची असते कारण आपण केवळ सदनिका विकण्यासाठी बांधकाम करत नाही तर त्या सदनिकांमध्ये राहणा-या नागरिकाचे जीवन आरामदायक करण्यासाठी बांधकाम करतो जो आनंदाचाच मार्ग आहे. मुलांच्या पालकांना बांधकाम व्यावसायिकाने दिलेले घर आरामदायक वाटत नसेल; त्यांच्या मेहनतीच्या पैशाच्या मोबादल्यात त्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नसेल तर असे पालक त्यांच्या मुलांना दातृत्व व उदारपणा यासारख्या गोष्टी कशा शिकवू शकतील? त्याचवेळी यामध्ये सरकारची भूमिकाही अतिशय महत्वाची असते कारण घर चार भिंती व छपरांचे बनत असले तरीही त्याचा परिसर व त्या परिसरातील अनेक घटक महत्वाचे असतात जे बांधकाम व्यावसायिक देऊ शकत नाही तर सरकारने ते देणे अपेक्षित असते. यामध्ये रस्ते, सांडपाणी, रुग्णालये, क्रीडागंणे यांचा समावेश असतो; अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये या सुविधाही देण्यात आलेल्या असतात मात्र एका इमारतीसारख्या प्रकल्पांचे काय? ते देखील कर भरतात व त्यांचाही जीवनातील या सर्व सुविधांवर तेवढाच अधिकार आहे, ज्या केवळ काही सुदैवी लोकांसाठीच्या आरामदायक सुविधा नाहीत!
त्यानंतर मुद्दा येतो स्वातंत्र्याचा; आता पुन्हा बरेच जण म्हणतील की आपण स्वतंत्र देश आहोत तर मग आनंदामध्ये स्वातंत्र्याची काय भूमिका आहे? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आपण खरोखरच आनंदी आहोत का? स्वतःला भारतीय, स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणवणे म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ होतो का?  स्वातंत्र्याचा नेमका अर्थ आपण समजून घेतलेला नाही व तेच आपल्या दुःखाचे मुख्य कारण आहे. स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करणे असा अर्थ होत नाही तर आपल्या जबाबदा-या समजून घेणे व त्यांचे पालन करणे यातच खरे स्वातंत्र्य आहे! उदाहरणार्थ मी सकाळी खेळायला जाण्यासाठी कारने जात आहे व लाल सिग्नल असल्यामुळे थांबलो आहे, मात्र वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून अनेक गाड्या माझ्यापुढे सटकतात व माझ्या मागील गाड्या हॉर्न वाजवत राहतात व लाल सिग्नल असूनही माझ्यावर पुढे जाण्यासाठी ओरडतात! यामुळे मला खरोखर वाईट वाटते कारण इथे लोकांना लाल सिग्नल तोडणे म्हणजे स्वातंत्र्य असे वाटते! रस्त्यावर कचरा टाकण्यापासून ते पदपथावर थुंकण्यापर्यंत अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील, असे करुन एखादी व्यक्ती तिचा व्यक्तिगतआनंद उपभोगत असेल तर ती त्यावेळी इतर शेकडो व्यक्तिंना दुःखी करत असते हे तथ्य आहे! म्हणूनच आपण स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे आधी शिकून घेतले पाहिजे व स्वतःचे घर निवडण्यापासून त्याचे पालन केले पाहिजे. इथे बरेच जण विचार करतील की स्वतःचे घर निवडण्याशी याचा काय संबंध आहे? आजूबाजूला सर्व प्रकारचे बांधकाम व्यावसायिक आहेत, मात्र आपल्याला स्वतःचे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेले घर हवे असेल तर अवैध घरांमध्ये राहणा-या लोकांकडे पाहून आपण दुःखी होता कामा नये, त्यासाठी कदाचित कमी पैसे लागले असतील मात्र ते ख-या अर्थाने स्वातंत्र्य देणारे घर नाही! याच कारणाने सरकारने अवैध बांधकामांना आळा घातला पाहिजे व कायदेशीरपणे घरे बांधणा-या प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाने अवैध बांधकामांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे कारण कायद्याचे पालन करण्यातच आनंदाची बिजे आहेत त्याचे उल्लंघन करण्यात नाहीत, हा संदेश इथे स्पष्टपणे दिला पाहिजे!

सरासरी वय या घटकाबाबत आपण अतिशय सुदैवी आहोत, वैद्यकीय सुविधांमुळे सरासरी वय निश्चितच वाढले आहे व समाज सुदृढ असल्याचे हे एक लक्षण आहे व जो आनंदी असण्याचा परिणाम आहे! रिअल इस्टेटने याची दखल घेतली पाहिजे की त्यांचा ग्राहक पन्नाशीतला नाही तर विशीतला आहे! या वयोगटातील ग्राहक अतिशय आग्रही असतात व आधीच्या ग्राहकांच्या तुलनेत ते या घरांमध्ये त्यांच्या आयुष्याचा जास्त कालावधी घालवणार असतात. म्हणूनच या वर्गाच्या गरजांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे व त्या पूर्ण केल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांना त्यांच्या गरजांनुसार परिसर मिळेल व त्यांना शांतपणे म्हणजेच पर्यायाने आनंदाने जगता येईल!   

शेवटचा मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार जो आनंदाशी निगडित आहे! अमेरिका व युरोपसारख्या देशातही भ्रष्टाचार आहे मात्र सामान्य माणसाला क्वचितच त्याला तोंड द्यावे लागते. रिअल इस्टेटमध्ये सदनिका धारकाला सदनिकेचा ताबा घेतल्यानंतरही ब-याच आघाड्यांवर भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागू शकते, उदाहरणार्थ विजेच्या मीटरवर त्याचे नाव लावणे, मालमत्ता करावर नाव बदलणे किंवा अगदी नव्या मालमत्ता कार्डासारखे अगदी मूलभूत दस्तऐवज मिळवणे किंवा नव्या घराच्या पत्त्यासह नवीन शिधापत्रक मिळवणे, रिअल इस्टेटमध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक वाटा असतात हे कटू सत्य आहे! केवळ पैसेच द्यावे लागतात असे नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया इतकी दमछाक करणारी असते की त्यामुळे माणूस वैतागतो व स्वाभाविकपणे अशा परिस्थितीत कुणी आनंदी असेल अशी अपेक्षा करता येत नाही! एक बांधकाम व्यावसायिक म्हणून आपल्याला शिधापत्रिका मिळवून देता येणार नाही मात्र व्यक्तिच्या घराशी संबंधित औपचारिकता आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला तर तिला आनंद मिळवून देण्यात नक्कीच आपला हातभार असेल! अनेकदा आपण ऐकतो की विजेच्या मीटरसारख्या औपचारिकता पूर्ण न करताच बांधकाम व्यावसायिक घराचा ताबा देतात व त्यामुळे सोसायटीची स्थापना लांबणीवर पडते त्यामुळे आपल्यावर अवलंबून असलेल्या या कुटुंबांच्या दुःखात भर पडते.

मित्रांनो एखाद्या व्यक्तिला कशामुळे दुःख होईल हे जाणून घेणे अतिशय सोपे आहे, मात्र एखाद्या व्यक्तिला कशामुळे आनंद होईल हे समजून घेणे अतिशय अवघड आहे; म्हणूनच आपण दुःखाची कारणे शक्य तितकी कमी करु शकतो, आनंद मिळविण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. आपल्याला या निकषांवरुन समजेल की आनंद बराचसा व्यक्तिच्या किंवा समूहाच्या परिसरावर अवलंबून असतो व आपण लोकांना अजिबात त्रास होणार नाही असा परिसर दिल्यास त्यांना शांतपणे राहता येईल त्यामुळे त्यांचे जीवन आनंदी होईल! शेवटी एक विकासक म्हणून आपल्या प्रकल्पांमधून किती पैसे मिळाले हे मोजण्यापेक्षा, आपल्या प्रकल्पांद्वारे किती लोकांचे जीवन आपण आनंदी केले यातच आपले व्यावसायिक यश मोजायला शिकले पाहिजे !  केंद्र सरकाराने देशभरात स्मार्ट शहरे विकसित करण्यावर भर दिला आहे व त्याच अनुषंगाने राज्य सरकारही हरित शहरे विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे मात्र त्याऐवजी आनंदी शहरे बांधणे किंवा नियोजित करणे ही खरी काळाची गरज आहे. आपण बांधत असलेल्या कोणत्याही शहराचे उद्दिष्ट हेच असले पाहिजे व त्यासाठी केवळ मानवी जीवनासाठी थोडीशी काळजी असली पाहिजे तसेच ज्या हेतूने आपण ही शहरे बांधत आहोत त्याविषयी थोडी बांधिलकी असली पाहिजे! याचप्रकारे आनंदी देशाची निर्मिती करता येईल व ज्या दिवशी प्रत्येक विकासकाला व सरकारला हे कळेल, तेव्हा किमान आनंद निर्देशकांच्या बाबतीत आपल्या देशाचे नाव तळाशी असणार नाही!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment