Tuesday 28 July 2015

सुरक्षित बांधकाम करताना !






















सुरक्षेची इच्छा ही प्रत्येक महान व चांगल्या उद्योगांचा जणु पायाच आहे.” … टॅसिटस.

रोमन सिनेटर व इतिहासतज्ञ असलेल्या या वरील ग्रीक लेखकाचे हे शब्द आपल्या देशातील सर्व उद्योगांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत, जेथे मानवी जीवनाचे मोल इतर अनेक वस्तुंपेक्षाही कमी आहे हे कटू वास्तव आहे ! कोणतेही वर्तमानपत्राचे पान वाचा  तुम्हाला सर्व पानांवर मृत्यू व विनाशाच्या बातम्या दिसून येतील, मग ते रस्त्यावरील अपघात असतील किंवा दरड कोसळली असेल किंवा एखाद्या कारखान्यामध्ये बॉयलर फुटले असेल किंवा एखादा मजूर उंचावरुन पडला असेल; इथे दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडतात किंवा आयुष्यभरासाठी अपंग होतात! विशेषतः बांधकाम उद्योगामध्ये सुरक्षेचे नियम आहेत मात्र त्यांचे पालन क्वचितच होते, त्यामुळेच अपघातांची टक्केवारी बरीच अधिक आहे. माझ्या स्वतःच्या बांधकामस्थळी झालेल्या एका अपघातामुळे मी आज माझे सुरक्षाविषयीचे विचार मांडायला प्रवृत्त झालो आहे. माझ्या एका अभियंत्याने अकुशल मजुरांना एका शेडवरुन छपराचे काही पत्रे काढून टाकायला सांगितले. त्यापैकी एक मजूर काम करत असताना खाली पडला व त्याच्या पायाचे हाड मोडले. सुदैवाने फारसे नुकसान झाले नाही, छोट्याशा शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पायाला प्लॅस्टर घातले गेले. तो लवकरच चालू शकेल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र यातून धडा घेऊन नेमके काय झाले याचा तपास करण्यासाठी मी संबंधित अभियंत्याला बोलवून घेतले. आपल्या व्यवस्थेचे नेमके हेच अपयश आहे, की आपण चुका झाकायचा प्रयत्न करतो, परंतु भविष्यात चुका टाळायच्या असतील तर प्रत्येक चुकीचे विश्लेषण झाले पाहिजे, असे मला वाटते!

मी जेव्हा संबंधित अभियंत्याला कार्यालयात बोलावले व विचारले तेव्हा त्यातून काही आश्चकारक बाबी समोर आल्या! सर्वप्रथम त्याने ज्या मजुराला काम सांगितले होते तो कुशल नव्हता म्हणजे तो  खोद काम करणारा मजूर होता. तो खणणे व साहित्य हलविणे वगैरेंसारखी कामे करायचा. त्याला छपरावर चढायची सवय नव्हती अर्थात ती शेड फक्त दहा फूट उंच होती! दुसरे, म्हणजे त्यांना सेफ्टी बेल्ट बांधायची सवय नसल्याने त्यांनी बांधला नाही, व उंची फारशी नसल्याने अभियंत्यानेही सेफ्टी बेल्ट बांधायचा आग्रह केला नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सबेसटॉसचे पत्रे कधीही वरुन नाही तर खालच्या बाजुने काढायचे असतात ही बाब अभियंता विसरला. कारण ते कोणतेही वजन सहन करु शकत नाहीत व एखाद्या व्यक्तिचे वजन तर नक्कीच नाही! चौथी बाब म्हणजे त्याने फॅब्रिकेटर कंत्राटदाराच्या माणसांना हे काम करायला सांगायला पाहिजे होते ज्यांना अशा प्रकारची कामे करायची सवय असते, ज्यामुळे अपघात टाळता आला असता, सुदैवाने तो जीवघेणा नव्हता!

मी या घटनेमुळे आपल्या उद्योगातील परिस्थितीचा विचार करु लागलो. एका छोट्याश्या निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढवू शकतो व त्यामुळे होणाऱ्या अप्रिय घटना होऊ शकतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना त्याची जाणीव होत नाही, जणु आपण सगळे काही दैवावर सोडलेले आहे! एखादा जीवघेणा किंवा कायमचे अपंगत्व आणणाऱ्या अपघातामुळे त्यातील व्यक्तिचे नुकसान होतेच, मात्र त्यामुळे त्याच्या कुटुंबासाठीही तो आघात असतो. यामुळे प्रकल्पाचा तोटा होतो, आर्थिक नुकसान होते व कामाचा वेळ वाया जातो. प्रकल्पाची बदनामी होते, पोलीस, कामगार कल्याण संघटना तसेच स्वघोषित कामगार संघटनांचा ससेमिरा बांधकाम व्यावसायिकाच्या मागे लागतो, त्यामागचा हेतू व त्याची निष्पत्ती आपण जाणतोच. म्हणूनच प्रकल्पाच्या मालकांनी किंवा बांधकाम व्यावसायिकांनी वेळीच जागे होऊन अपघात गांभिर्याने घ्यायची गरज आहे. त्यासाठी आपण साधारणपणे कोणत्या प्रकारचे अपघात होतात व त्यामागची कारणे कोणती असतात हे समजून घेणे आवश्यक आहे!

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्व अपघातांची माहिती नोंदवली पाहिजे, अपघातामध्ये सहभागी पक्ष घटनास्थळी सारवासारव करायचा प्रयत्न करतात. मी अशाप्रकारे सारवासारव करण्यामागचे कारण समजू शकतो. असे असले तरीही जी तथ्ये समोर येतील ती नोंदवणे व त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विकासकांच्या क्रेडाई  व एमबीव्हीएसारख्या संघटना सरकारी संस्थांसोबत अशा प्रकारची माहिती संकलित करु शकतात, मात्र या माहितीचा गैरवापर होऊ नयेबहुतेकवेळा अपघात निष्काळजीपणामुळे किंवा निरीक्षक कर्मचाऱ्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे होतात. म्हणूनच बांधकाम स्थळावरील सर्व तांत्रिक तसेच अभियंत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. माझ्या बाबतीत घडले त्याप्रमाणे अभियंते किंवा पर्यवेक्षकांनी विशिष्ट कामासाठी कुशल कामगार वापरण्याची गरज ओळखली पाहिजे व सुरक्षा म्हणजे काय हे त्यांनीच समजावून घेतले पाहिजे! सुरक्षा म्हणजे केवेळ हेल्मेट घालणे किंवा सेफ्टी बेल्ट वापरणे नाही; तर सुरक्षा म्हणजे एखादे काम योग्य कारागिरीने कशाप्रकारे करायचे हे समजावून घेणे! यातली पहिली पायरी आहे प्रत्येक कामासाठी योग्य कामगार व साधनांचा वापर करणे, ज्यामुळे अकुशल कामगारांमुळे होणारे अपघात टाळले जातील. खोदकाम करणाऱ्या कामगाराला उंचावर काम करण्याची सवय नसते त्यामुळे तो काम करताना वरुन खाली पडला तर तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही! त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या सुताराला सांडपाण्यासाठी किंवा पायासाठी खणायला सांगितले तर त्याला ते करता येणार नाही व तो स्वतः खड्ड्यात पडेल किंवा खोदकामाचे साहित्य वापरताना आजूबाजूला उभ्या असलेल्या कुणाला तरी इजा पोहोचवेल! त्याशिवाय अपघात होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी टाईल कटरपासून, तात्पुरत्या लिफ्टपासून ते क्रेनपर्यंतच्या विविध साधनांची व्यवस्थित देखभाल केली जात नाही. प्रत्येक साधनाच्या देखभालीचे कंत्राट दिले पाहिजे व विजेच्या सर्व जोडण्यांची नियमितपणे तपासणी केली पाहिजे!

अपघाताचे आणखी एक कारण म्हणजे प्लॅस्टर करण्यासाठी बाहेरुन चुकीच्या पद्धतीने मचाण बांधले जाते किंवा स्लॅब घालताना त्याला मजबूत आधार दिला जात नाही. हे प्रशिक्षित लोकांनी व योग्य त्या देखरेखीखालीच केले पाहिजे. इथे सुरक्षा नियमांची भूमिका अतिशय महत्वाची असते, कारण कामावर देखरेख करणारी माणसे बदलू शकतात मात्र नियम पाळणारी व्यवस्था कायम पाहिजे !
त्यानंतर कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तिला प्रशिक्षण दिले पाहिजे. सुरक्षा हे केवळ एका व्यक्तिचे काम नाही तर सगळ्यांनी एकजूटपणे काम केले तर ती साध्य होईल याची जाणीव कर्मचाऱ्यांना करुन दिली पाहिजे! कोणीही व्यक्ती हेल्मेटशिवाय नसावी व मानवी उंचीपेक्षा म्हणजे ७ फूटांपेक्षा अधिक उंचावरील कोणत्याही कामासाठी सेफ्टी बेल्ट वापरणे बंधनकारक आहे! या गोष्टी बांधकामाच्या ठिकाणी पर्यवेक्षकाने सांगणे आवश्यक नाही तर दररोज काम सुरु करण्यापूर्वी तुम्हीच बांधकामाच्या ठिकाणी या गोष्टींची मागणी केली पाहिजे, अशा प्रकारचे प्रशिक्षण असले पाहिजे! सुरक्षेसाठी केवळ हेल्मेट व सेफ्टी बेल्टशिवायच सुरक्षा शूजपासून ते योग्य कपड्यांपर्यंत सर्व काही महत्वाचे आहे. कामगारांनी घातलेले सैल कपडेही अपघाताला कारणीभूत ठरतात, त्यांना आग लागू शकते किंवा बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही यंत्राच्या फिरत्या भागात ते अडकू शकतात. तसेच जे मचाणावर काम करणाऱ्या कामगारांनी सुरक्षा शूज घालू नयेत, कारण पाईप किंवा लाकडी आधारावरुन हे शूज घसरण्याची शक्यता असते व या गोष्टी बांधकाम स्थळी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिच्या मनावर बिंबवल्या पाहिजेतबांधकामाच्या ठिकाणी अपघाताचे आणखी एक कारण म्हणजे कामाच्या ठिकाणी मद्यपान करणे, मद्यपान केलेल्या व्यक्तिचे आपल्या हालचालींवर नियंत्रण नसल्याने हमखास अपघात होऊ शकतोम्हणूनच पर्यवेक्षकांनी कुणीही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी मद्यपान करुन किंवा कोणत्याही प्रकारच्या मादकपदार्थांचे सेवन करुन येणार नाही याची खात्री करावी. आम्ही आमच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला शिकवून ठेवले आहे, तो आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला तपासून त्याच्याकडून तंबाखू किंवा तत्सम कोणतेही पदार्थ काढून घेतो, असे साहित्य प्रवेशाद्वारापाशीच ठेवले जाते, कामगार बांधकामावरुन परत जाताना ते घेऊन जाऊ शकतात. वरच्या मजल्यांवर काम करताना बाहेरील कडांना अडथळे लावणे तसेच योग्य ठिकाणी सुरक्षा जाळी लावणे आवश्यक आहे.

बांधकामाच्या ठिकाणी कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्यांच्या बाबतीतही वारंवार अपघात घडतात, त्या बांधताना काही बाबी तपासल्या पाहिजेत. त्या कुंपणाच्या भिंतीला लागून उभारल्या जाऊ नयेत, कारण भिंत झोपड्यांवर पडल्याने कामगारांचा जीव गेल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. दुसरे म्हणजे झोपड्या कोणत्याही नैसर्गिक जल प्रवाहाजवळ किंवा सखल भागात असू नयेत म्हणजे पावसाळ्यात पुरामुळे जीवितहानी किंवा नुकसान होणार नाही. तसेच बहुतेक वेळा झोपड्या पत्र्यांपासून बनविलेल्या असतात त्यामुळे त्यामध्ये वीज पुरवठा योग्य प्रकारे दिला पाहिजे, नाहीतर या पत्र्यांमधून वीज प्रवाह जाऊ शकतो त्यामुळे आग लागू शकते किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते. तसेच लहान मुलांना बांधकामाच्या ठिकाणापासून लांब ठेवले पाहिजे व बांधकाम कितीही लहान असले तरीही तिथे एखादे पाळणाघर असले पाहिजे. लहान मुलांना बांधकामाच्या ठिकाणी अपघात होण्याचा अतिशय जास्त धोका असतो, उदाहणार्थ ती उंचावरुन पडू शकतात किंवा एखादी वस्तू अंगावर पाडून घेऊ शकतात. कामगार पालकांना आपली मुले कामाच्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री पटली तर ते जास्त निर्धास्तपणे काम करु शकतात! प्रथमोपचाराचे साहित्य तसेच अग्निशामक साधने कामगारांच्या छावणीजवळ स्वतंत्र शेडमध्ये ठेवले पाहिजे व त्यावर आणीबाणीच्या वेळी आवश्यक असलेले सर्व क्रमांक दिलेला एखादा फलक लावला पाहिजे, म्हणजे काहीही अपघात झाला तर कुणाला संपर्क करायचा हे लोकांना माहिती असेल!

आणखी एक दुर्लक्षित पैलू म्हणजे कामगारांसाठीची शौचालये व त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की याचा सुरक्षेशी काय संबंध, मात्र सुरक्षा म्हणजे केवळ बांधकामावरील कर्मचाऱ्यांना अपघातापासून वाचवणे असा होत नाही तर व्यवस्थित स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे, कारण बहुतेक आजार किंवा साथीचे रोग पाण्यातूनच पसरतात. म्हणूनच या संदर्भात बांधकामावरील कामगारांना स्वच्छ व आरोग्यदायी पाण्याचा पुरवठा होणे अतिशय महत्वाचे आहे. आपण बांधकामावरील कामगारांची नियमितपणे आरोग्य तपासणीही करुन घेऊ शकतो व बांधकामाचे ठिकाण लहान असेल तर आपण त्यासाठी परिसरात सुरु असलेल्या प्रकल्पाच्या विकासकाची मदत घेऊ शकतो. दुबईमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती, त्यांना देण्यात आलेल्या सोयी तपासण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण केले जाते व कुणी दोषी आढळ्यास त्यांना मोठा दंड आकारला जातो! स्थानिक प्राधिकरणांनीही विकासकांच्या मदतीने एक यादी बनवावी व त्यानुसार सोयी उपलब्ध आहेत का हे वेळोवेळी तपासून पाहावे ! साईट वरील कामगारांचा तसाच अभियंत्यांचा समूह विमा घेण्याचा पर्यायही प्रत्येकांनी अमलात आणायलाच  पाहिजे, म्हणजे काही दुर्घटना घडल्यास विम्याद्वारे आर्थिक मदत मिळू शकते.

याशिवाय, बांधकामाच्या ठिकाणी वेळोवेळी सुरक्षेचे लेखापरीक्षण झाले पाहिजे. सामान्यपणे सर्व खबरदारी घेऊनही लोक अति आत्मविश्वास बाळगतात व ज्याचा परिणाम निष्काळणजीपणात होतो; म्हणूनच अचानकपणे कुणी तिसऱ्या व्यक्तिने सुरक्षा यंत्रणेची तपासणी केल्याने मदत होऊ शकते! शेवटचे मात्र महत्वाचे म्हणजे तुमचे संभाव्य ग्राहक या प्रयत्नांची दखल घेतात असा माझा अनुभव आहे व याचा उपयोग तुम्हाला तुमच्या विपणनासाठी करता येऊ शकतोकारण, जो विकासक त्याच्या कामगारांची चांगली काळजी घेतो, विचार करा तो त्याच्या ग्राहकासाठी काय करेल; ग्राहकाच्या भूमिकेतून विचार केला तर या चांगल्या कामांचा असा हुशारीने वापर करता येईल. कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणामुळे परिमाणही चांगलाच होतो हे वेगळे सांगायची गरज नाही कारण कामगार आपल्या सुरक्षेची चिंता न करता मोकळ्या मनाने काम करतील! या सर्व बाबी वरपासून खालपर्यंत सर्वांना समजल्या पाहिजेत, फक्त कामगारच नाही तर साईटशी संबंधीत प्रत्येक गोष्टीच्या सुरक्षेचा विचार झाला पाहिजे, कारण लक्षात ठेवा सुरक्षा ही केवळ कृती नाही तर तो एक दृष्टिकोन आहे


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment