Saturday, 5 September 2015

तेल अविव ते पुणे ,स्मार्टनेस हाच फरक !

“केवळ आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असणे म्हणजे स्मार्टनेस नाही तर आपल्या आजूबाजूचा परिसर अधिक चांगला बनविण्यासाठी त्याचा वापर करून घेणे म्हणजे स्मार्टनेस” ………. श्री. जोहर शेरॉन

ज्यांना श्री. जोहर म्हणजे कोण हे माहिती नाही, त्यांच्यासाठी सांगतो, श्री. जोहर शेरॉन, हे तेल अविव महापालिकेचे चीफ नॉलेज ऑफिसर  (पीएमसीच काय आपल्या शहरातील कोणत्याही कंपनीमध्ये सुद्धा हे पद असल्याचे ऐकिवात नाही) आहेत. मी त्यांना व्यक्तिगत ओळखत नाही मात्र त्यांनी तेल अविवला जगातले सर्वोत्तम स्मार्ट शहर कसे बनवले हे त्यांच्या तोंडून ऐकायची संधी मला मिळाली! सकाळ वृत्तपत्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले होतो, जो त्यांच्या विविध सामाजिक कार्यक्रमांपैकी एक होता; असे कार्यक्रम कोणत्याही स्मार्ट शहराचा महत्वाचा पैलू असतात. या कार्यक्रमाचा उद्देश हे शहर अधिक चांगले बनविण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा करणे हा होता व त्यासाठी जगभरातल्या प्रयत्नांची माहिती घेणे महत्वाचे आहे! सध्या माध्यमांपासून ते शहराच्या प्रशासनापर्यंत ते राजकारण्यांपर्यंत, सगळ्यांच्या चर्चेचा एकच विषय आहे तो म्हणजे स्मार्ट शहर. हे नक्कीच या संकल्पनेचे यश म्हटले पाहिजे, कारण प्रत्येकालाच त्याची माहिती असेल तर हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकेल. किमान वर उल्लेख केलेल्या सादरीकरणातून तरी असेच वाटत होते, कार्यक्रमाला या विषयाशी संबंधित सर्व मान्यवर उपस्थित होते. स्वयंसेवी संस्थांपासून ते नोकरशहा, राजकारणी, समाजातील सामान्य व्यक्ती ते अगदी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण हजर होते! हा खऱ्या अर्थाने सार्वजनिक मंच होता व लोकांना स्मार्ट शहराविषयी जाणून घ्यायची उत्सुकता होती हे चांगले लक्षण आहे. सध्या तरी स्मार्ट शहर हत्ती व आंधळ्या माणसांच्या गोष्टीसारखे वाटते म्हणजे प्रत्येक माणूस हत्तीच्या ज्या अवयवला स्पर्श करतो त्याप्रमाणे त्याचे वर्णन करतो. मी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये एक श्रोता म्हणून गेलो होतो व मी आत्तापर्यंत केलेला थोडाफार प्रवास, नगर नियोजनातील काही तज्ञ व्यक्तिंशी केलेली चर्चा यामुळे या विषयावर माझी स्वतःची काही मते आहेत!

सर्वप्रथम मला सादरीकरणामध्ये काय पहायला मिळाले ते सांगतो; सादरीकरण अतिशय साधे व मुद्देसूद होते. ज्यांना तेल अविवविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की, ईस्रायलची राजधानी असलेले हे शहर आकाराने व लोकसंख्येने पुण्यापेक्षा खूपच लहान आहे. या शहराची लोकसंख्या जेमतेम ४ ते ५ लाख आहे, जी पुण्याच्या एक दशमांश आहे. तेथील लोकसंख्येची घनता अधिक आहे व त्यांनी त्यांची संसाधने व तंत्रज्ञानाच्या मदतीने शहराचे स्मार्ट शहरात रुपांतर केले आहे. श्री. जोहर यांनी हा प्रवास कसा सुरु झाला हे समजावून सांगितले व त्यांनी स्पेनमधले स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्सिलोनासारख्या इतर शहरांचा अभ्यास केला. त्यांनी प्रामुख्याने तीन आघाड्या निश्चित केल्या व त्यांच्या लक्षात आले कि सर्वकाही नागरिक ते नागरिक, सरकार ते नागरिक व सरकार ते सरकार या घटकांमधील परस्पर नातेसंबंधांवर किंवा संवादावर किंवा संगणकाच्या भाषेत सांगायचं तर इंटरफेसवर सर्वकाही अवलंबून आहे! त्यानंतर नागरिकांच्या दररोजच्या जगण्यासाठीचा खर्च व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवले ज्यामुळे आपोआपच प्रत्येक इंटरफेसमधील वेळ वाचला. उदाहरणार्थ एखाद्याला जन्माची किंवा नवजात बालकाची नोंदणी करायची असेल तर त्याला ते ऑनलाईन किंवा कमीत कमी दस्तऐवजात करता येईल. त्यानंतर ही माहिती संबंधित सर्व विभागांना दिली जाईल म्हणजे कुणालाही माहितीसाठी एकमेकांच्या मागे लागावे लागणार नाही, जे आपल्याकडे होताना दिसते. दुसरे म्हणजे त्यांनी डेटाचं महत्व जाणलं, यात सर्व प्रकारचा डेटा आला म्हणजे शहरातील सायकलींच्या संख्येपासून ते किशोरवयीन मुलांची संख्या किती आहे इथपर्यंत सर्वप्रकारचा डेटा त्यांना गोळा केला व त्यानंतर शहरातील जागेच्या उपयोगापासून ते रहदारी व्यवस्थापनापर्यंत विविध प्रकारची शहराविषयीक नागरी धोरणे तयार करण्यासाठी त्याचा वापर केला !

त्यानंतर तेल अविवच्या प्रत्येक नागरिकाला स्मार्ट शहर या संकल्पनेची माहिती करुन देणे, नेमक्या समस्या कुठे येत आहेत हे ओळखणे व महानगरपालिका सर्व समस्या सोडवु शकणार नाही हे स्वीकारणे हा भाग आला. त्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या कामकाजात जास्तीत जास्त सहभागी करुन घेणे आवश्यक होते, म्हणजे अगदी अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते जागांचा वापर करण्यापर्यंत! आणि हो हे सर्व काही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात आले, म्हणजेच इथे निवडून आलेल्या सदस्यांनी वैयक्तिक हितापेक्षाही शहराच्या हिताला प्राधान्य दिले, पुढील निवडणुकांमध्ये खात्रीशीरपणे निवडून येण्याचा हाच एकमेव मार्ग होता हे त्यांना  लक्षात आले! म्हणजेच शहराची जबाबदारी प्रत्येकावर आहे व अधिक महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने हे समजून घेतले व प्रतिसाद दिला! त्यानंतर महानगरपालिकेने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत कारण ते अप्रत्यक्षपणे सेवा पुरवठादार आहेत त्यांनी केवळ नागरिकांच्या सूचना किंवा तक्रारी किंवा अपेक्षांनुसार प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे! या पार्श्वभूमीवर पुण्यातली परिस्थिती काय आहे हे पाहू! कोणत्याही शब्दकोशामध्ये ज्याप्रमाणे शहाण्याला मूर्ख, बुद्धिमानला निर्बुद्ध असे विरुद्धार्थी शब्द असतात त्याप्रमाणे स्मार्टनेसला कोणताही विरुद्धार्थी शब्द नाही! या शब्दाची वर्गवारी करता येऊ शकते म्हणजे जास्त स्मार्ट, कमी स्मार्ट किंवा अतिशय जास्त स्मार्ट वगैरे! एखादी व्यक्ती किती स्मार्ट आहे याचे वर्णन करताना ती कमी किंवा अधिक स्मार्ट आहे असं आपण म्हणतो त्यासाठी इंग्रजीमध्ये अनस्मार्ट किंवा नो स्मार्ट सारखे शब्द वापरले जात नाहीत! शहराच्या बाबतीतही हेच लागू होते!

हे समजावून घेण्यासाठी आपण एका शहरामध्ये रस्त्यावर गाडीखाली मरण पावलेल्या कुत्र्याचे उदाहरण घेऊ, सामान्यपणे प्रत्येक शहरामध्ये असे अपघात होतात, कुत्र्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आपण पाहिला असेल. पहिल्या उदाहरणामध्ये, शहरात कुणीतरी आपोआप याची दखल घेईल व एक जबाबदार चमू घटनास्थळी पोहोचेल व कुत्र्याचा मृतदेह तातडीने उचलून नेईल व रस्ता लगेच स्वच्छ केला जाईल, रस्त्यावरील वाहतूक लगेच सुरळीत होईल व नागरिकांना त्याचा काहीही त्रास होणार नाही. दुसऱ्या उदाहरणामध्ये, कुणीतरी दखल घेईल व जबाबदार चमूला कळवेल व तो चमू वेळेत घटनास्थळी पोहोचेल व योग्य ती कारवाई करेल. तिसऱ्या उदाहरणामध्ये चमूला कळविले जाईल मात्र ते वेळेत प्रतिसाद देणार नाहीत, ज्या व्यक्तिने दखल घेतली आहे तिला कुत्र्याचा मृतदेह हलविला जाईपर्यंत वारंवार चमूकडे पाठपुरावा करावा लागेल. चौथ्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तिने दखल घेतली आहे त्याला आपण मृत कुत्र्याविषयी कुणाला कळविले पाहिजे हे देखील माहिती नसेल व तो यंत्रणेतील सर्वांना संपर्क करत राहील व प्रत्येकजण ही आपली जबाबदारी नाही अशी टाळाटाळ करत राहील! पाचव्या उदाहरणात कुत्र्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असताना कुणीही दखल घेणार नाही व कुणीही कुणालाही कळविणार नाही किंवा काही करायचा प्रयत्न करणार नाही, कुत्र्याचा मृतदेह रस्त्यावर कुजत पडेल व येणारे-जाणारे बाजूने जातील व यंत्रणेला दोष देत राहतील!
 हे कोणत्याही शहरात होऊ शकते, आता इथे स्मार्टनेसचा काय संबंध असा प्रश्न कुणीही विचारेल! कुत्र्याचा वाहनामुळे मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावर परिस्थितीची पाच उदाहरणे आपण पाहिली. पहिल्या उदाहरणारमध्ये ते शहर सर्वात स्मार्ट होते कारण कुणीही कुणालाही संपर्क करावा लागला नाही, यंत्रणेने स्वतःच दखल घेतली व जबाबदार चमुने स्वतः आपली जबाबदारी पार पाडली. त्यानंतरच्या उदाहरणांमध्ये स्मार्टनेसचा निर्देशांक कमी झाल्याचे दिसते कारण कुणीही काहीही पाऊल उचलण्याची तसदी घेत नाही, तर एकमेकांवर आरोप करतात मात्र ते देखील याच व्यवस्थेचा भाग आहेत हे विसरतात! आपले शहर स्मार्टनेसच्या निर्देशकाच्या बाबतीत तळाशी आहे असे मला या सादरीकरणातून समजले, शहराकडे महानगरपालिका किंवा त्यासारखी यंत्रणा असली पाहिजे; तिने केवळ प्रतिसाद  देऊ नयेत तर पुढाकार घ्यावा, यालाच स्मार्टनेस म्हणता येईल! काही वेळा व्यवस्थेच्या मागे लागावे लागते हे मान्य केले तरीही तिने प्रतिसाद दिला पाहिजे, नागरिकांशी संपर्क येणारी व्यवस्था अशीच असली पाहिजे! पाचव्या उदाहरणात जे झाले ते आपण आपल्या शहरामध्ये कितीतरी वेळा अनुभवले आहे त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली आहे. उदाहरणार्थ रस्ता खणलेला असतो व तो अनेक दिवस तसाच असतो किंवा सांडपाण्याची वाहिनी फुटते व सांडपाणी वाहत असते व त्यामुळे अनेक दिवस नदी किंवा आजूबाजूचे क्षेत्र दूषित होते. दररोज एकाच ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो व आपल्यासाठी ती नेहमीची बाब होते, अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात व आपल्याला असे वाटते आपण त्यासाठी जबाबदार नाही तर दुसरे कुणीतरी त्यासाठी जबाबदार आहे!

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये स्मार्ट शहराविषयी विविध क्षेत्रातील अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या व त्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी एकमेकांवर ढकलली होती म्हणजे, “हे त्यांनी केले पाहिजे वगैरेसारखी विधाने करण्यात आली होती! उदाहरणार्थ एका व्यावसायिकाने टिप्पणी केली होती की पुणे महानगरपालिकेने तसेच राजकारण्यांनी स्मार्ट शहर हा त्यांचा कार्यक्रम आहे असा विचार करुन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे! एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे म्हणणे होते की इथे विविध उद्योग येणे महत्वाचे आहे म्हणूनच येथे आयटी उद्योग आले पाहिजेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याचे म्हणणे होते की नागरिकांनी हे शक्य केले पाहिजे. एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचे म्हणणे होते की सरकारने सार्वजनिक वाहतूक सशक्त बनविली पाहिजे. एका लोकनियुक्त प्रतिनिधीचे असे म्हणणे होते की पीएमसीच्या कर्मचाऱ्यांना जनतेला योग्य प्रकारे सेवा देण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याचे असे म्हणणे होते की पीएमसीने शहर नियंत्रित करण्यासाठी आरटीओकडे असलेला डेटा वापरावा कारण त्यांच्याकडे सर्व वाहनांची नोंदणी केलेली असते! डॉक्टरांचे असे म्हणणे होते की सरकारने प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारी सार्वजनिक आरोग्य सेवा उभारली पाहिजे. 

वास्तुविद्याविशारदांनी निसर्गपूरक इमारती उभारणे व पर्यावरण संवेदनशील नियोजन करणे आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातल्या एका व्यक्तिने शिक्षण संस्थांसाठी  निसर्गपूरक व ज्ञानकेंद्रित परिसर आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. एका विद्यार्थ्याने टिप्पणी केली की शहरातील झोपडपट्ट्या विकसित केल्या पाहिजेत कारण स्मार्ट शहरातील त्या मोठ्या अडथळा आहेत. अनेक जणांचे असे मत होते की स्मार्ट शहरासाठी राजकीय इच्छाशक्तिची गरज आहे, अशाप्रकारे ही यादी वाढतच होती! मला आश्चर्य वाटले की काही मोजकेच सन्माननीय अपवाद वगळता सादरीकरणासाठी हजर असलेल्या कुणीही, होय मला माझी जबाबदारी समजली आहे व हे शहर स्मार्ट व्हावे यासाठी मी माझ्यापासून सुरुवात करेन असे म्हटले नाही! श्री. जोहर वारंवार हेच सांगत होते की तेल अविवला एक स्मार्ट शहर बनविण्यात कुणा एका व्यक्तिची किंवा विभागाची किंवा संघटनेची भूमिका नव्हती, तर संपूर्ण शहराने ते एक स्वप्न पाहिले, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली व ते साध्य केले! स्मार्टनेस उपजत नसतो तर, त्यासाठी प्रत्येकाने या प्रक्रियेतील आपली भूमिका समजावून घेतली पाहिजे. आपल्याला एका क्लिकवर सर्व डेटा उपलब्ध होऊ शकतो मात्र तो डेटा मिळविण्यासाठी व त्याचा वापर करण्यासाठी कुणालातरी क्लिक करावे लागते! कुणीही बाहेरची व्यक्ती येऊन आपल्यासाठी हे करणार नाही. आपल्यापैकी किती जणांना आपले घर महानगरपालिकेच्या कोणत्या क्रमांकाच्या प्रभागात येते व आपल्या दैनंदिन कामांसाठी कोण जबाबदार आहे हे माहिती आहे? पीएमसीच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे मात्र आपल्यापैकी किती जणांनी तिचा वापर केला आहे व आपल्या सेलफोनमध्ये तो साठवून ठेवला आहे? ज्यांनी वापरुन पाहिला आहे त्यांचे म्हणणे असते की कुणीही उत्तर देत नाही, ठीक आहे मात्र निवडणुकीच्या वेळी तुमच्या घरी मते मागायला येणाऱ्या उमेदवारांकडे तुम्ही या समस्या मांडता का?
मला असे वाटते की सर्वप्रथम आपण स्मार्टनेस म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. मला असे वाटते की स्मार्टनेस म्हणजे आपली जबाबदारी समजून घेणे व त्यानुसार कृती करणे व मला असे वाटते की मला माझे शहर स्मार्ट शहर बनवायचे असेल तर मी सुरुवात माझ्या घरापासून तसेच कार्यालयापासून केली पाहिजे! स्मार्टनेस हा एक दृष्टिकोन आहे; एखादी व्यक्ती स्मार्ट असेल तर तिच्या प्रत्येक घटकातून ते दिसून येते ज्यामध्ये कपडे घालण्यापासून ते इतर व्यक्तिंशी ती कसा संवाद साधते याचा समावेश असतो. कोणतेही शहर अत्याधुनिक साधनांनी, मोबाईल्सनी किंवा संकेतस्थळांनी स्मार्ट होत नाही तर प्रत्येक नागरिकांच्या वर्तनाने होते, मला असे वाटते तेल अविव व पुण्यातला मुख्य फरक हाच आहे, त्यांना स्मार्टनेस म्हणजे काय हे नेमके समजले आहे व आपण अजूनही विचार करतोय की कुणीतरी स्मार्ट होईल व त्यानंतर हे शहर स्मार्ट बनेल! हे सत्य स्वीकारण्याची वेळ आता आली आहे व त्यासाठी आपल्याला कोणतीही स्पर्धा करायची गरज नाही, कारण या दिशेने काम करत राहिल्यास कुठलेही शहर स्मार्ट शहर होऊ शकते. केवळ निधी मिळविण्यासाठी नाही किंवा स्मार्ट शहराची ओळख मिळावी म्हणून नाही तर प्रत्येकाच्या मनात स्मार्टनेसची भावना असेल तरच हे स्मार्ट शहर होऊ शकते. ते व्हावे हीच सदिच्छा!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment