Friday, 25 September 2015

पाऊस त्यांचा आणि आपला !

काही लोक पावसात चालतात, काही केवळ ओले होतात “…रॉजर मिलर

रॉजर डीन मिलर, सिनियर हे अमेरिकी गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता होते, ते त्यांच्या हाँकी-टाँकने-प्रभावित नाविन्यपूर्ण गाण्यांसाठी सर्वाधिक ओळखले जात. त्यांनी पावसाचे इतके सहज-सुंदर वर्णन केले आहे यात काही विशेष नाही! माझा पत्रकार मित्र अभिजीत घोरपडे त्याच्या वैयक्तिक कामासाठी माझ्याकडे आला होता व आमची पाऊस या विषयावर व त्याच्या लोकांवरील परिणामाविषयी चर्चा सुरु झाली. याची दोन कारणे होती, एक म्हणजे मुसळधार पावसामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मी व अभिजीत आम्हाला दोघांनाही निसर्गाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत अतिशय रस आहे. विशेष म्हणजे अभिजीत एका मासिकासाठी पाण्याविषयी लिहीत होता, प्रामुख्याने पावसाच्या पाण्याविषयी लिहायचे होते. मी आजपर्यंत कुठल्याही विषयावर सहज म्हणून लिहीलेले नाही, तरीही मी त्याला म्हणलो की मला पावसाविषयी माझे मत व्यक्त करावेसे वाटते, तो देखील मला म्हणाला का नाही, प्रयत्न करुन बघ! खरंतर रॉजर यांच्या म्हणण्याप्रमाणे, पावसाचा विचार करायचा झाला तर मी केवळ जे ओले होतात त्यांच्यापैकी एक आहे; ती सोमवारची सकाळ होती, म्हणजे आठवड्याची सुरुवात जी बऱ्याच जणांसाठी विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या लोकांसाठी फारशी आनंददायक नसते! पुण्यातील पावसाने आपल्या ख्यातीप्रमाणे कामकाजाच्या वेळी आकाशातून बरसायला सुरुवात केली. मी माझ्या कार्यालयाच्या इमारतीजवळच राहतो, मात्र माझे बहुतेक कर्मचारी कार्यालयात येताना ओल्या कपड्यांनिशी, पावसावर चडफडत येत होते. त्याच दिवशी सकाळी मी बॅडमिंटन खेळून जेव्हा वैशालीमध्ये एक कप चहा पिण्यासाठी गेलो होतो तेव्हाही दृश्य फारसे वेगळे नव्हते, व वेटरची पाण्याच्या थारोळ्यातून वाट काढत लगबग चालली होती, अर्थातच त्यांच्या तोंडी वरुण देवतेसाठी फार काही चांगले शब्द नव्हते! मला माझे तरुणपणाचे दिवस आठवले, माझ्याकडे तेव्हा दुचाकी होती, त्यामुळे मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजू शकतो कारण पावसात भिजून व दिवसभर ओल्या कपड्यांनी काम करणे फार काही चांगली कल्पना नाही. दुचाकीवर कोणत्याही प्रकारचा रेनकोट घातला तरीही तुमचा चेहरा व तुमचे शूज ओले होतातच व ती अतिशय त्रासदायक भावना असते! मी वैशालीतून गाडीने माझ्या कार्यालयात चाललो होतो, रस्त्यात पाऊस सुरुच होता, मी माझ्या एसी कारच्या खिडकीतून रिक्षावाले, दुचाकी चालक, रस्त्यावरील फेरीवाले व पादचाऱ्यांचे चेहरे पाहत होतो; पाऊस तोच मात्र त्याचा वेगवेगळ्या लोकांवर कसा वेगवेगळा परिणाम होतो हे पाहणे रोचक होते. या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर पावसामुळे नक्कीच आनंदाची भावना नव्हती तर पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वैतागल्याची भावना होती, चेहऱ्यावरुन ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांसोबत इच्छित ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्याचा ताणही होता! मला खात्री आहे पावसाची कितीही गरज असली तरीही यापैकी कोणत्याही चेहऱ्यांवर पावसाच्या स्वागताचे भाव नव्हते! त्यानंतर काही शाळकरी मुले पाहिली, ती पावसात हसत, खिदळत चालली होती, त्यानंतर काही महाविद्यालयीन मुले पावसात बाईक चालविण्याचा आनंद उपभोगत होती; त्यांच्यासाठी तो चित्तथरारक अनुभव होता! त्यांना पाहून मलाही माझे महाविद्यालयीन दिवस आठवले, तेव्हा पाऊस अतिशय आवडायचा, अर्थात मला स्वतःला पावसात भिजण्याची फारशी हौस नाही मात्र मित्रांचा आग्रह मान्य करावाच लागतो! मला सकाळी फेरफटका मारायला जाता येत नाही म्हणून मला पाऊस फारसा आवडत नाही, अर्थात जिममध्ये जायचा, ट्रेड-मिल वापरायचा पर्याय उपलब्ध असतो, मी तो वापरतोही, मात्र मला पाऊस नसताना स्वच्छ आकाशाखाली फेरफटका मारायला आवडते, हे मान्य केलेच पाहिजे. निसरड्या पदपथांवर (बांधलेले असतील तर), आजूबाजूला वाहनांमुळे उडणारा चिखल चुकवत, एखाद्या उघड्या खड्ड्यात आपण पडणार तर नाही ना असा विचार करत चालणे म्हणजे आपल्या शहरामध्ये एक शिक्षाच असते.

त्यानंतर मला वॉट्स ऍपवरील सर्व संदेश तसेच प्रसार माध्यमांमध्ये दुष्काळ व पाण्याच्या कमतरतेविषयी व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याच्या कमतरतेविषयी मथळे आठवले. राज्याच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे कारण यावर्षी अगदी थोडा किंवा अजिबात पाऊस झालेला नाही! एकीकडे लोक पावसासाठी प्रार्थना करत असताना शहरातील लोक पावसाला कशा प्रतिक्रिया देतात हे पाहून जरा मजा वाटते! मला माहिती आहे की एसी कारमध्ये बसून फिरताना, कार्यालय व घर अगदी जवळ असताना, माझ्यासाठी अशी टिप्पणी करणे सोपे आहे, मात्र माझ्या बांधकामाच्या ठिकाणीही पावसामुळे त्रासच होतो! एका बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम सुरु होते पावसामुळे खोदून कडेला रचलेली माती खाली आली त्यामुळे कुंपणाच्या भिंतीचा पाया उघडा पडला व त्याचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने तिथे कुणीही राहात नव्हते किंवा काम करत नव्हते म्हणून आर्थिक वगळता इतर कोणतेही नुकसान झाले नाही, मात्र बांधकामावरील लोकांना तसेच मजुरांना पाऊसाचा अतिशय तिटकारा वाटतो! पत्र्याच्या झोपडीत, काँक्रीट किंवा तात्पुरत्या सारवलेल्या जमीनीवर राहणे काही सोपे नाही. जास्त पाऊस पडला की जमीनीतली ओल संपूर्ण झोपडीत पसरते, अशा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अनेक कुटुंबाचे आंथरुणापासून कपड्यांपर्यंत सर्वकाही ओले होते. त्यांना कपडे कुठे सुकवायचे हा देखील प्रश्न असतो, कारण त्यांच्याकडे काही ड्रायरसोबत वॉशिंग मशीन सेवेला हजर नसते!

झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांचीही अशीच स्थिती असते, या झोपड्यांना आपण शहराला जडलेला कर्करोग म्हणतो, मात्र कुणीही स्वेच्छेने झोपडीत राहात नाही. इथे तर परिस्थिती आणखी वाईट असते कारण केवळ जमीन व छपरालाच ओल लागत नाही तर सांडपाण्याच्या वाहिन्याही तुंबतात व त्यावर कचरा तरंगू लागतो, हे पाणी झोपडपट्टीवासियांच्या पत्र्यांच्या झोपड्यांमध्ये शिरते, त्यामुळे तिथे सर्वप्रकारची रोगराई पसरते. तसेच शॉर्ट सर्किटमुळे अपघाताचा धोका असतो कारण इथे विजेची जोडणी देताना सुरक्षेचा काहीही विचार केला जात नाही, त्यामुळे अपघात होऊन जीव जाण्याचा अतिशय धोका असतो! वाड्यात व चाळीत राहाणाऱ्यांचीही अशीच परिस्थिती असते, झोपडपट्टीवासियांपेक्षा ते थोडेसे बऱ्या स्थितीत असले तरीही प्रत्येक मोसमी पावसात हजारो जुन्यापुराण्या वाड्यांचे माती व लाकडाचे बांधकाम अधिक सडते किंवा त्याची पडझड होते. हे अस्वच्छ तर आहेत मात्र हे जीवासाठी धोकादायकही आहे कारण प्रत्येक पावसात दोन/तीन जुने वाडे कोसळतात, त्यात जीवित हानी तर होतेच तसेच अनेक कुटुंबांचा निवारा गेल्याने ते रस्त्यावर येतात!

मात्र हाच पाऊस अनेक लोकांसाठी थेट व लाखो किंबहुना कोट्यवधी लोकांसाठी अप्रत्यक्षपणे वरदान आहे. त्यांना थेट फायदा होतो त्यामध्ये शेतकरी, तसेच जलसिंचन विभाग तसेच पीएमसीसारख्या प्रशासकीय संस्थांचा समावेश होतो, हातात पाणी असल्याने ते लोकांना अधिक सहजपणे तोंड देऊ शकतात. पावसामुळे राजकारणीही खुश होतात कारण त्यामुळे त्यांना चिडलेल्या मतदारांना तोंड द्यावे लागत नाही, अर्थात दैनंदिन जीवनाविषयी इतर प्रश्न असतातच. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो, मात्र प्रत्येक पावसामुळे होतोच असे नाही; मी काही शेतकरी नाही मात्र थोड्याशा सामान्य ज्ञानाच्याआधारे सांगू शकते की पिकाच्या चक्रानुसारच पाऊस आला तर त्याचा उपयोग होतो. पेरणी व पीक वाढण्याच्या काळात पाऊस आवश्यक असतो, पिके तयार झाल्यावर कापणीच्या वेळी तो आला तर हाती आलेले पीक वाया जाते व प्रचंड नुकसान होते! ग्रामीण भागातल्या पावसाची वेगळीच तऱ्हा असते; सांडपाणी व रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा चांगल्या नसतात त्यामुळे गावात जगणे अतिशय अवघड होते. तरीही पाणी ही जीवनरेखा आहे कारण आपल्या राज्यात आजही अनेक गावांमध्ये पाऊस हाच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. मी विदर्भातील अतिशय दुष्काळी भागातला आहे व जवळपास तीस वर्षांपूर्वी उन्हाळ्यामध्ये पाणी बादलीवर विकले जायचे! कुणीही त्याचा दर्जा विचारत नसे कारण जे काही मिळेल ते नशीबच अशी परिस्थिती होती, त्या काळात बिसलेरी वगैरे बाटलीबंद पाणी उपलब्ध नव्हते व मला शंका वाटते आजही किती लोकांना तो पर्याय परवडेल! गावांमध्ये पावसाळ्यात पुण्यापेक्षा वेगळी परिस्थिती असते, खुल्या शेतांमुळे मुसळधार पाऊस जेव्हा होतो तेव्हा सगळीकडे पाणी भरते व सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गुरुत्वाकर्षणानुसार जिकडे ओढले जाईल त्या दिशेने पाणी वाहत जाते. रस्ते वाहून जातात व अनेक दिवस गावाचा शेजारील गावांशी संपर्क तुटतो, त्यामुळे अन्न व भाज्यांसारख्या जीवनावश्यक गोष्टींचीही कमतरता भासते. मात्र इथे तुम्हाला पावसामुळे वैतागलेले चेहरे दिसणार नाही कारण शहरातील लोकांपेक्षा हे लोक पावसावर अधिक अवलंबून असतात व पाऊस पडला तरच आपल्याला दीर्घ काळ तग घरता येईल हे त्यांना माहिती असते.

तुम्हाला पाऊस खरच अनुभवायाचा असेल तर जंगलात जा, तिथे तो वेगळेच रुप धारण करतो. जंगलामध्ये झाडे, गवत, प्राणी व कीटक असे सर्वजण पावसाचे आनंदाने स्वागत करतात कारण ते त्यांचे जीवन असते. एका पावसाने संपूर्ण जंगलाचा चेहरा मोहराच पालटतो व जंगल हिरवाईच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघते.
यावरुन मला एक टीव्हीवरील सुंदर जाहिरात आठवली, माझ्यामते ती टाईडची होती. एक माणूस पांढराशुभ्र शर्ट घालून कार्यालयात चालला असतो, जोरदार पाऊस पडून गेलेला असतो व पावसातची भुरभूर सुरु असल्यामुळे तो हातात छत्री धरुन चाललेला असतो, जेणेकरुन त्याचा पांढरा शर्ट कोणत्याही डागापासून वाचावा. अचानक एक लहान मुलगा पळत येतो व त्याच्याशेजारी पाण्याच्या डबक्यात उडी मारतो, एका क्षणात त्या माणसाचा पांढरा शर्ट चिखलाच्या पाण्याने माखतो! त्या माणसाच्या व शाळकरी मुलाच्या चेहऱ्यावरील भाव एवढे नेमके होते की तुम्हाला तुमचे शाळकरी दिवस आठवत राहतात जेव्हा तुम्ही रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यात उड्या मारल्या असतील! पावसाची अशी गंमत आहे; तो पडला नाही तर तुम्ही अडचणीत येता, तुम्हाला तो हवा असतो मात्र त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला तुम्हाला नको असतो! मला असे वाटते हेच आपल्या शहरी जीवनाचं दुर्दैव आहे कारण आपण प्रत्येक गोष्ट नफा व फायद्याच्या भाषेत मोजतो. इथे आपल्याला आपले लक्ष्य गाठताना पाऊस नेहमीच अडथळा वाटको, मग एखाद्या बैठकीला जायचं असेल किंवा बांधकामाच्या ठिकाणी सतत सुरु असलेलं काही काम असेल किंवा आपली उत्पादनं विकायची असतील. आपल्याला गरज लागेल तेव्हा पाणी हवं असतं, ते देखील आपल्याला सोयीच्या स्वरुपात, म्हणजे काही वेळा बिसलेरीच्या बाटलीत, काही वेळा टँकरनी किंवा अगदी बर्फाच्या तुकड्यांच्या रुपातही; आपल्याला अंघोळीच्या वेळी शॉवर हवा असतो, तो देखील आपल्याला आराम देणाऱ्या तापमानाप्रमाणेच. मात्र या सगळ्यात आपण विसरतो की पाणी हे निसर्गाचे एक रुप आहे व जेव्हा निसर्ग ज्या रुपात तुमच्याकडे येतो त्याच रुपात त्याचा आनंद घेतला पाहिजे. तो विनाश घेऊन आला तरी तो त्याचा दोष नाही तर ते आपलं अपयश आहे कारण आपण त्याचा योग्यप्रकारे वापर करु शकत नाही.

मला असे वाटते, त्या टीव्हीवरील जाहिरातीतल्या कार्यालयात जाणाऱ्या माणसाप्रमाणे आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात पावसाचा आनंद घेणे विसरुन गेलो आहोत, विचार करा बरं तुम्ही दोन्ही हातांनी खुल्या दिलानं पावसाचं शेवटचं स्वागत कधी केलं होतं, त्याचे पहिले काही थेंब चेहऱ्यावर झेलले, हळूच त्यातलं थोडेसं प्यायलं हे आठवतंय का! आठवायचा प्रयत्न करा तुम्ही आकाशामध्ये शेवटचं इंद्रधनुष्य कधी पाहिलं होतं, व हातातलं काम बाजूला ठेवून त्याचं सौंदर्य न्याहाळलं होतं! माझ्या बालपणी पहिल्या पावसात लाल रंगाचे मखमखी अंगाचे किडे असायचे व आम्ही त्यांच्या मखमली त्वचेला स्पर्श करायचो, ती मज्जा मला अजूनही आठवते. पहिल्या पावसानंतर येणारा जमीनीचा वास, आपल्यापैकी कितीतरी जणांच्या मनात अजूनही दरवळतोय? आपल्या शहरी जीवनामध्ये आपला जमीनीच्या प्रत्येक इंचावर डोळा आहे व याप्रक्रियेमध्ये तो सुगंधच हरवलाय! आता आपण पावसासोबत जगायला शिकलं पाहिजे व देवाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक थेंबाचा वापर करायचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे पाण्याचा योग्यप्रकारे वापर होईलच, पण जीवनाचा खरा अर्थ कळेल मग ते केवळ पावसात भिजणे राहणार नाही!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


No comments:

Post a Comment