Saturday 14 November 2015

“धोक्यात आणि नामशेष , जाणीव कोणाला” ?






















 केवळ एक प्रजाती सुरक्षित ठेवल्यामुळे जग बदलणार नाही; मात्र त्या प्रजातीचे जग  नक्कीच बदलेल”… अज्ञात

शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असेल तर वरील शब्दांमध्ये नक्कीच ती ताकद आहे कारण ते कुणाचे शब्द आहेत हे मला माहिती नाही मात्र नक्कीच अतिशय वाचनीय आहेत. मध्यंतरी  ब-याच  वर्तमानपत्रामध्ये पक्षांच्या नामशेष होत चाललेल्या काही प्रजातीबद्दल लिहून आले होते, त्यासंदर्भात मला हे अवतरण आठवले. याबाबतीत मला काही वेळा माध्यमांचे कौतुकही वाटते व कीवही येते कारण कुणीतरी बिचारा पत्रकार अशा विषयांबद्दल लिहीत असतो व लोकांना मात्र राजकारण किंवा खेळांमध्ये किंवा कुणाचं कुणाशी लफडं आहे अशाच बातम्यांमध्ये रस असतो. असे असूनही माध्यमे त्यांचा वेळ व त्यांची बातम्यांसाठीची मूल्यवान जागा अशा नामशेष होत चाललेल्या पक्षांच्या प्रजातींसाठी देतात! याचा अर्थ माध्यमे मूर्ख आहेत किंवा आजाबाजूला अजून अशी काही मूर्ख माणसे उरली आहेत जी अशा बातम्या वाचतात, मी नक्कीच त्यापैकी आहे! अशा मूर्खांमध्येही वर्गवाऱ्या आहेत, जे नामशेष होत असलेल्या विविध प्रजातींविषयी बातम्या वाचतात मग ते पक्षी असतील किंवा बेडूक किंवा अगदी फुलपाखरे. काही जण वर्तमानपत्रामध्ये छापून आले आहे म्हणून वाचतात, उदाहरणार्थ माझे वडील वर्तमानपत्रात छापून आलेला जाहिरातींसकट प्रत्येक शब्द वाचतात. त्यानंतर काही जण बातमीचा केवळ मथळा वाचतात व छायाचित्र पाहतात. काही जण केवळ अशा बातम्या वाचतात व काही होणार नाही, म्हणजेच आपल्या देशात काहीही बदलणार नाही असे म्हणून सोडून देतात. त्यानंतर काही जण ते वाचतात व मित्र मंडळात त्यावर चढाओढीने चर्चा करतात व दुसऱ्या दिवशी चर्चेसाठी दुसरी एखादी बातमी असते! मात्र अगदी थोडी मंडळी नामशेष होणाऱ्या प्रजातींबद्दल ती बातमी वाचतात व त्यासाठी काय करता येईल याचा बसून विचार करतात व त्यातला एखाद दुसरा आपल्या विचारावर प्रत्यक्ष कृती करतो! मला असे वाटते की वरील अवतरण अशाच एखाद्या आत्म्याने लिहीले असावे!
शहरातील सामान्य नागरिकांची याविषयी काय प्रतिक्रिया आहे हे पाहू, मी कोणत्याही मंचावर नामशेष झालेल्या किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षांविषयी किंवा प्राण्यांविषयी बोलताना, पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे लोकांना नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा नामशेष झालेल्या प्रजाती म्हणजे काय हे समजते मात्र आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा काय परिणाम होईल याची त्यांना जाणीव नसते किंवा त्याची त्यांना काळजी नसते! त्यांना जाणीव नसेल तर ठीक आहे तुम्ही त्यांना जाणीव करुन देऊ शकता मात्र एखादी प्रजाती नामशेष झाली आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे याची त्यांना काळजी वाटत नसेल तर मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे! मी अशा सुशिक्षित तथाकथित बुद्धिवंत लोकांना भेटलोय ज्यांना यावर इतका गदारोळ करण्यासारखं काय आहे असं वाटतं, म्हणजे अगदी जगभरात केवळ तीन हजार वाघ राहिले असले तरीही काय होतं असं ते म्हणतात!जवळपास पन्नास हजार वाघ असतानाही जग तसंच होतं व आज जी संख्या आहे त्यातही तसंच आहे? आपल्या पेट्रोलच्या किमतींपासून ते जीवनावश्यक वस्तुंच्या दरांपर्यंत, पाण्याच्या समस्येपासून ते रहदारी, परवडणारी घरे यासारख्या दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी समस्या आहेत; अशा वेळी एरवी तेरवी जंगलात राहणाऱ्या व शिकार करणाऱ्या या तीन हजार वाघ नामक प्राण्यांविषयी चिंता करण्यापेक्षा प्रत्येक माणसाच्या डोक्यावर छप्पर असणं अधिक महत्वाचं नाही का? या प्रश्नांमध्ये थोडंफार तथ्य आहे मात्र हेच लोक शहरातून चिमण्या का नामशेष झाल्या याचा विचार करतात व त्यावर वैतागतात व ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांना वाटते. त्याशिवाय प्रत्येक बांधकाम व्यावसायिक त्यांच्या प्रकल्पाची जाहिरात निसर्गाच्या सान्निध्यात, गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने नाही तर पक्षांच्या किलबिलाटाने जागे व्हा अशा स्वरुपाची करतात. त्याशिवाय आपली दैनंदिन अनेक उत्पादने  आपल्याला आवाहन करतात की त्यांचा वापर करुन निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जा, टूथ पेस्टपासून ते एअर कंडिशनर ते बाटलीबंद पाण्यापर्यंत प्रत्येक ब्रँड निसर्ग व त्यातील जैवविविधतेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेतो! प्रवासाचा सध्याचा कल पाहिला तर जास्तीत जास्त लोक नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ठिकाणी जाणे पसंत करतात, मग ती कान्हा किंवा ताडोबासारखी जंगले असतील किंवा केरळचे बॅकवॉटर किंवा हिमालय असेल; नेहमीच्या खरेदीच्या सिंगापूर दुबई सारख्या शॉपिंगच्या ठिकाणापेक्षा या सर्व ठिकाणांना जास्त मागणी असते! यातूनच असे स्पष्ट दिसून येते की सामान्य माणसाला त्यांच्याभोवती निसर्ग हवा असतो असे असतानाही आपण दर दिवशी विविध प्रजाती नामशेष होत असल्याचे का पाहतो? याचे उत्तर आपण निसर्ग या शब्दाचा अर्थ नेमका समजून घेतला नाही हे आहे असे मला वाटते!
वाघांचे उदाहरण घ्या, सध्या प्रत्येक राष्ट्रीय अभयारण्यामध्ये जंगल सफारीचे आरक्षण सुरु होताच ते पूर्ण भरते. प्रत्येक पर्यटकालाच वाघ पाहायचा असतो नाहीतर त्याला किंवा तिला फक्त जंगल पाहण्यात पैसे वाया गेल्यासारखे वाटते, याचा अर्थ असा होतो की जंगलामध्ये जिवंत वाघ पाहण्याचे महत्व ते जाणतात मात्र वाघांच्या कमी होणाऱ्या संख्येचे जबाबदारी त्यांना घ्यायची नसते! हेच लोक शहरांमधील चिमण्या, बुलबुल व मैना यासारखे पक्षी कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतात! आपण केवळ चिंता व्यक्त करतो व त्याबद्दल काहीच करत नाही किंवा आपल्या आजूबाजूचा निसर्ग चांगला करण्याची जबाबदारी इतर कुणाची आहे असे आपल्याला वाटते! कारण आपण संपूर्ण घटनाक्रम पाहिला किंवा वागणुकीची पद्धत पाहिली तर आपल्यापैकी बहुतेक जण निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी स्वतःहून काहीही करत नाहीत हे तथ्य आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम निसर्ग समजावून घेतला पाहिजे.

मात्र निसर्ग म्हणजे काय? खरंच हा अवघड प्रश्न आहे, मी काही कुणी महान तत्वज्ञ नाही किंवा या क्षेत्रातील शिक्षणतज्ञही नाही. मात्र माझ्या मते निसर्ग म्हणजे आजूबाजूची जैवविविधता व जैवविविधता म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो की आपल्या आजूबाजूला प्रत्येक स्वरुपात दिसणारी जीवनाची विविधता हा निसर्गच आहे! उदाहरणार्थ फुलपाखरापासून ते चिमणीपर्यंत, तसेच मोठ्या झाडांपासून ते अतिपर्जन्यवृष्टी होणाऱ्या प्रदेशात आढळणाऱ्या वृक्षांपर्यंत ते गिधाडे, बेडूक व वाघांपर्यंत, पक्षी, झाडे, गवत, प्राणी व मासेही जैवविविधतेचाच भाग आहेत व निसर्ग या सर्वांचा बनलेला आहे. आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी काही पायाभूत सुविधा आवश्यक असतात, त्याचप्रमाणे गवतापासून ते अगदी अळीपर्यंत प्रत्येक प्रजातीला जगण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असते! आपण स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्रजाती म्हणवतो म्हणून आपण आपले जीवन आरामदायक बनविण्यासाठी सर्व संभाव्य यंत्रसामग्री तयार केली. मात्र त्याचवेळी इतर प्रजातींनाही पृथ्वीवरील सर्व आराम मिळविण्याचा हक्क आहे, हे आपण सोयीने विसरुन जातो व माणसामुळेच या इतर प्रजातींसाठी अधिक समस्या निर्माण होतात ह्या कडे दुर्लक्ष करतो!

अगदी सुरुवातीच्या काळात अनेक वर्षे जेव्हा माणूस म्हणून आपण सुसंस्कृत नव्हतो तेव्हा पशु व पक्षांप्रमाणे निसर्गाच्या अधिक जवळ होतो, तोपर्यंत निसर्गाला धोका नव्हता, मात्र एका चुइंगमच्या जाहिरातीमध्ये दाखविल्याप्रमाणे, एक आदिमानव गाढवाशी मैत्री करतो व ते दोघे एकत्र अन्नाचा शोध घेतात व एकत्र राहात. मात्र माणूस दिमाग की बत्ती जलानेवाले हे चुइंगम खातो, व त्याला कल्पना सुचते व चाकांच्या स्वरुपात तो यंत्रसामग्री बनवतो व गाढवाला आपला चाकर बनवितो चाकाला जुंपून! ही केवळ एक जाहिरातच असल्याचे मान्य केले तरीही ती मानवी स्वभावाबद्दल बरेच सांगून जाते; आपल्याला आराम मिळविण्याची आपली क्षमता समजताच आपण इतर सर्व प्राण्यांना आपले नोकर मानतो व आपण त्यांचे शासनकर्ते असल्यासारखे वागतो. या गडबडीत आपण विसरतो की आपण इतरांचेच आयुष्य त्रासदायक करतोच मात्र आपण त्यांच्यासाठी एवढा धोका निर्माण करतो की ते नामशेष होत चालले आहेत!
आपल्या अशा कृत्याची अनेक उदाहरणे आहेत, उदा. वीस वर्षापूर्वीपर्यंत गिधाडे अगदी सहजपणे दिसायची, मात्र आपण त्यांच्या घरांवर अतिक्रमण केले, एवढेच नाही तर आपण आपल्या पाळीव प्राण्यांना रासायनिक पदार्थ घाऊ घालायला सुरुवात केली जे गिधाडांसाठी धोकादायक होते, जे खरंतर हे प्राणी मरण पावल्यानंतर त्यांचा मृतदेह खाऊन स्वच्छता कर्मचाऱ्याचे काम करत असत. परिणामी गिधाडांसाठी अन्न किंवा राहण्यासाठी जागा नसल्याने ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत! गिधाडेच कशाला, विविध प्रकारचे बेडूकही नामशेष होऊ लागलेत कारण शहराच्या जवळपासची डबकी व तलाव नष्ट होताहेत, आपल्या इमारतींसाठी त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे किंवा ते इतके प्रदूषित झाले आहेत की त्यांच्यात बेडूक जिवंत राहणे शक्य नाही. माणूस जैवविविधता कशी नष्ट करतो याचे पुण्यातील आपल्या तथाकथित नद्या अतिशय चांगले उदाहरण आहे व राज्यात किंवा देशभरात अशीच परिस्थिती आहे!  त्यानंतर आपली आनंद साजरे करण्याची पद्धत पाहा; आपण त्यासाठी सर्वप्रकारचा कर्शश आवाज, फटाक्यांच्या स्वरुपात धूर व आग वापरतो. त्यामुळे घाबरुन शहरातील पक्षी बाहेर जातात व ते बाहेर कसे जगतील याचा विचार आपण करत नाही. मी फटाक्यांच्या विरुद्ध किंवा बाजूने बोलत नाही मात्र आपण इतक्या प्रदूषित वातावरणात जगत असताना फटक्यांची गरज आहे का?? अमेरिकेसारख्या देशात किंवा युरोपमध्ये वर्षातून केवळ एकदा फटाके वाजवतात व त्यांच्याकडे प्रदूषणासाठी अत्यंत कडक धोरणे आहेत. आपण कोणतेही सण /समारंभ साजरे करताना या सर्व देशांकडून चांगल्या गोष्टी शिकण्याची गरज आहे!! मी आजच वर्तमानपत्रात वाचलं की दान किंवा धर्मदाय कार्यात १४५ देशांमध्ये भारताचा क्रमांक १०५ वा आहे, त्यामुळेच इतर देश फटाक्यांच्या वापर कसा करतात अशी तुलना करण्यापेक्षा या चांगल्या कामांत आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करु! इतरांना आनंद देणे इतर कशाहीपेक्षा अधिक महत्वाचे आहे व त्या इतरांमध्ये पक्ष्यांचाही समावेश होतो!
मित्रांनो, अनेक लोक फटाके वापरणाऱ्या इतर देशांची व ते पर्यावरण कसे प्रदूषित करतात अशा इतर बाबींची उदाहरणे देतात, किंवा आपल्या देशात आपणही अशा गोष्टी करतो व दिवाळीच्या फटाक्यांना हरकत का असे विचारतो? खरंतर, आपण ज्या चुका केल्या त्यांचे समर्थन करण्याऐवजी त्या दुरुस्त करण्यातच शहाणपण आहे, कारण इतर कुणीतरी याहूनही अधिक वाईट करु शकते अशाचप्रकारे मी स्वतःविषयी विचार करतो!! दुर्दैवाने फार थोडे लोक गर्वाने सांगतात की, “मी या दिवाळीत एकही फटाका खरेदी केला नाही, तसेच मी बळजबरी न करताही माझ्या मित्रमंडळींनी किंवा माझ्या शेजाऱ्यांनीही फटाके खरेदी केले नाहीत!!” तसेच आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या कुटुंबासाठी जगणेच इतके महाग झाले आहे की अशा परिस्थितीत फटाके जाळणे म्हणजे आपला घामाचा पैसा जाळण्यासारखे आहे!! बरेच जण असेही म्हणतील की याचा अर्थ असा होतो का की आमच्या मुलांनी फटक्यांचा आनंदच उपभोगूच नये का? होय बरोबर आहे मात्र आपल्या आनंदासाठी आपण इतरांचे आयुष्य पणाला लावू शकत नाही, विशेषतः पक्षांसारख्या प्रजाती हवा व ध्वनी प्रदूषणामुळे नामशेष होत चालल्या आहेत!! आपल्या आजूबाजूला आधीच किती प्रदूषण आहे त्यामुळेच आपण आपल्या प्रयत्नाने जेवढे ते कमी करु शकू त्याचे स्वागतच आहे! आपल्याला इतरही गोष्टींमधून आनंद मिळू शकतो हे आपणच आपल्या मुलांना शिकवू शकतो, उदाहरणार्थ अनाथालयाला भेट देऊन त्या मुलांसोबत थोडा वेळ घालवणे व आपल्याकडे जे आहे ते त्यांना देणे!! करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, हीच काळाची गरज आहे असे आम्हाला वाटते!!
या संदर्भात सरकार किंवा वन विभाग काय करत आहे असे विचारणारेही बरेच जण आहेत? आम्ही कर भरत नाही का, मग हे सरकारचे काम असताना आम्ही नामशेष होत असलेल्या पक्षांची व बेडकांची चिंता कशाला करायची! बरोबर आहे, कर भरणे ही कर्तव्याची एक बाब झाली मात्र सरकार नद्या प्रदूषित करत नाही, झाडे कापत नाही, फटाके उडवत नाही, तर आपल्यापैकी प्रत्येक जण या ना त्याप्रकारे हे सगळे करून प्रदूषणाला हातभार लावतं! सरकारही कुठेतरी कमी पडतंय यात शंका नाही, जैवविविधता वाढविण्यासाठी ते काही चांगले प्रयत्न करत असले तरीही हे कुणा एका विभागाचे काम नाही; त्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे व या कामात सहभागी झाले पाहिजे. मात्र आता परिस्थिती अशी आहे की, सरकार व सामान्य माणसादरम्यान जैवविविधतेचे रक्षण करण्यात प्रचंड मोठी दरी आहे. सर्वप्रथम सरकार लोकांना जीवनाच्या या पैलुचे काय महत्व आहे याची जाणीव करुन देण्यात असमर्थ आहे व दुसरे म्हणजे संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तिला सहभागी करुन घेण्यात ते अपयशी ठरले आहे.
यासाठी आपण सरकार व सामान्य माणसांदरम्यानचा दुवा म्हणून स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्थांची स्वतःचा कार्यक्रम व स्वारस्य असते. माझा अनुभव असा आहे की बऱ्याच स्वयंसेवी संस्था सरकारी अधिकाऱ्यांसमोर त्यांचे महत्व कायम राहावे यासाठी सामान्य माणसाला यंत्रणेपासून दूर ठेवणेच पसंत करतात! म्हणून येथेही डोळसपणे निवड करणे आवश्यक आहे.

आपण शाळांना विशेषतः पर्यावरण विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांना सहभागी करुन घेऊ शकतो व प्रत्येक शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या पातळीवर निसर्ग क्लब तयार करु शकतो, ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक कुटुंबापर्यंत जैवविविधतेचे महत्व पोहोचवता येईल व शहराच्या किंवा गावाच्या पातळीवर हे अतिशय महत्वाचे आहे. गावांमध्ये बहुतेक कुटुंबे निसर्गाच्या जवळ राहतात किंबहुना त्यांच्यावर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना त्याचे महत्व माहिती असते. इथे गावकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याची गरज आहे म्हणजे त्यांना त्यासाठी निसर्गावर अतिक्रमण करावे लागणार नाही. मात्र मी नमूद केल्याप्रमाणे शहरांमध्ये सामान्य माणसांच्या निसर्गाव्यतिरिक्त इतरही अनेक समस्या आहेत. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठीच्या त्याच्या भूमिकेबद्दल जागरुक करणे हे अवघड काम आहे व त्यासाठीच आपल्याला सरकार, खासगी उद्योग समुह व स्वयंसेवी संस्थांमधील बुद्धिमान लोकांची गरज आहे जे एकत्रितपणे हे उद्दिष्ट साध्य करतील. प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवरील वन विभागाच्या प्रभारींना हे काम दिले पाहिजे किंवा मी आधी सुचविल्याप्रमाणे आयएएस किंवा आयपीएससारखा पर्यावरण संवर्ग तयार करता येऊ शकतो; कारण हे तज्ञ माणसांचेच काम आहे!

पर्यावरणाचे किंवा निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सर्व पातळ्यांवर जोरदार पाठिंबा मिळाला पाहिजे. नाहीतर ज्या वेगाने अधिकाधिक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत ते पाहता भविष्यात वाचविण्यासारखे काहीही उरणार नाही अशी भीती मला वाटते! त्यानंतर केवळ माणूसच सर्वात बुद्धिमान जीवित प्रजाती असेल; मात्र ८० च्या दशकातील अमिताब बच्चनच्या नटवरलाल या प्रसिद्ध चित्रपटातल्या हिरो व मुलांमधील संवादाप्रमाणे ये जीना भी कोई जीना है लल्लू म्हणजेच असे आयुष्य जगण्याला काही अर्थ आहे का? असं विचारावं लागेल. वाघ नसतील किंवा पक्षांचा किलबिलाट नसेल किंवा जंगली फुलांवर उडणारी फुलपाखरे नसतील; मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल देणारे बेडकांचे आवाज नसतील तर आपले आयुष्य कसे असेल याचा विचार करा; असा दिवस पाहण्यासाठी मला तरी जगायचे नाही व भविष्यातला हा अंधःकार बदलणे माझ्याच हातात आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजावून घेतली तर आपण नक्कीच भविष्य अंधःकारमय होणे थांबवू शकू व त्यानंतरच आपल्याला माणूस असण्याचा अभिमान असेल. नाहीतर आपण इतर प्रजातींच्या बाबतीत जे केले आहे त्याची आपल्याला अत्यंत लाज वाटेल व आपल्या नशीबी भविष्यात केवळ अंधःकारच असेल, हे लक्षात ठेवा मित्रांनो!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




No comments:

Post a Comment