Sunday 29 November 2015

“स्मार्ट शहरातला पाऊस”!






















मला खळखळत्या पाण्याचा आवाज आणि उत्साह अतिशय आवडतो, मग तो लाटांचा असेल किंवा धबधब्याचा”…माईक मे

मायकेल जी "माईक" हे एक अमेरिकी व्यावसायिक, स्कीपटू व इतर खेळांचे हौशी खेळाडू आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी एका रासयनिक स्फोटात त्यांना अंधत्व आले, मात्र २००० साली वयाच्या ४६व्या वर्षी अंशतः दृष्टी परत आली. म्हणूनच ते दृष्टीपेक्षाही कानांवर जास्त अवलंबून असतात, त्यामुळेच वरील अवतरणात ते पाण्याच्या आवाजाविषयी बोलतात! असं म्हणतात की तुमच्या एखाद्या ज्ञानेंद्रियाची क्षमता कमी झाल्यावर बाकीच्या ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढते. म्हणूनच ज्यांची दृष्टी कमजोर आहे ते अधिक चांगल्याप्रकारे आवाज ऐकु शकतात! माईक गेल्या काही दिवसांत म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर पुण्यात आला असता तर त्याला शहरातील सर्व रस्त्यांवर पाण्याचा आवाज ऐकू आला असता व तो एखाद्या दुथडीभरुन वाहणाऱ्या नदीत किंवा काठोकाठ भरुन वाहणाऱ्या तलावापाशी आहे असे त्याला वाटले असते अशीच परिस्थिती सगळीकडे होती. हे शहर मला नेहमी आश्चर्यचकीत करते . पंधरवड्यापूर्वी मी पाण्याच्या तुटवड्याविषयी व आपण पाण्याचा प्रत्येक थेंब कसा साठवला पाहिजे याविषयी बोलत होतो. आता केवळ एका दिवसाच्या पावसानंतर संपूर्ण शहरात पावसामुळे कसा प्रलय आला व त्याची काय कारणे आहेत याविषयी बोलत आहे!

पावसाच्या बाबतीत हे वर्ष अगदी कोरडं गेलं व माझ्या विधानाला दुजोरा देण्यासाठी मी कोणतीही सांख्यिकी देत नाही, तर गेल्या तीस वर्षात मला शहराचा जो काही अनुभव आल आहे त्यातून हे सांगतोय! प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जेव्हा एखाद्या महिन्यात पाऊस पडत नाही, तेव्हा सगळीकडून पाणी वाचवा पुणे वाचवाच्या घोषणा दिल्या जातात व त्यानंतर वरुण देवतेची कृपा होते व सर्वकाही सामान्य होते! असा खेळ आपण अनेक वर्षांपासून खेळत आहोत, मात्र यावर्षी वरुण देवतेच्या मनात काही वेगळ्या योजना होत्या. संपूर्ण मॉन्सूनमध्ये पाऊस पडला नाही व आता आपल्याला आत्तापर्यंतची सर्वात तीव्र पाणी टंचाई जाणवतेय, मात्र आपल्यापैकी बहुतेकांना याची जाणीव झाली आहे किंवा नाही असा प्रश्न मला पडतो! मात्र आता सगळेजण थंडीची वाट पाहात असताना अचानक आकाशात ढग दाटून आले व नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पावसाळा सुरु झाल्यासारखा वाटतोय. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला, या अवेळी आलेल्या पावसाला तोंड द्यायला प्रशासनाच्या कोणत्याही विभागाची अजिबात तयारी नव्हती! सगळीकडे पाण्याचे पाट वाहात होते व जिथे पाण्याला वाहातला जागा नव्हती तिथे पाण्याची तळी साचली होती. सखल भागातील अनेक इमारती याला बळी पडल्या. पाण्याची पातळी तळमजल्याच्या पायापर्यंत व दुकानांपर्यंत पोहोचली होती, वाहन तळावरील गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या. अनेक ठिकाणी पाणी वीजेच्या मीटर बोर्डमध्ये शिरले, त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता. मलाशय पाण्याने भरुन गेले होते जे होण्याची खरंतर अपेक्षा नव्हती, त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहात होते, ज्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली होती. रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहात होते, ज्यांना काही ठिकाणी ओढ्याचे किंवा नाल्याचे किंवा काही ठिकाणी तर नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी कुंपणाच्या भिंती कोसळल्या ज्यामुळे वाहनांचे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यानंतर नेहमीप्रमाणे झाडे पडल्याप्रमाणे वाहतुकीचा खोळंबा झाला त्याचसोबत पाणी तुंबल्यामुळे रस्ते बंद झाले! शॉर्ट सर्किटमुळे वाहतूक सिग्नल बंद झाले (किमान वाहतूक विभागाचा तरी असा दावा आहे) व संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. ही परिस्थिती हॉलिवुडच्या वॉटर वर्ल्डसारख्या सिनेमाप्रमाणे झाली होती, ज्यात सगळीकडे पाणीच पाणी होते!
काही एखाद्याला असं वाटेल की चेन्नईमध्ये गेल्या आठवड्यात जो प्रचंड पाऊस पडला त्यासारखा पाऊस पडल्यामुळे पुण्यात अशी परिस्थिती झाली असेल, मात्र अशी परिस्थिती नाही. केवळ दिवसभर झालेल्या तीन इंच पावसामुळे अशी परिस्थिती झाली! एकीकडे प्रत्येक व्यक्ती, विभाग, निर्वाचित सदस्य, शहराचे शासनकर्ते स्मार्ट सिटी उभारण्यात सहभागी आहे किंवा त्या स्पर्धेत आहेत. या पार्श्वभूमी एका जोरदार पावसाने स्मार्ट सिटी होण्याच्या आपल्या दाव्यातली हवा निघून जाते, हा खरोखर गंभीर इशारा आहे असं मला वाटतं! एकीकडे आपण नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याविषयी प्रत्येक नागरिकाला जागरुक करत आहोत व त्याचवेळी पाणी वाया जातेय तसेच त्यामुळे नागरिकांचेही नुकसान होतेय!

सगळे पक्ष नेहमीप्रमाणे नंतर आरडाओरड करतात व प्रशासनाला दोष देतात, त्यानंतर प्रशासनाचे ज्येष्ठ अधिकारी पाणी तुंबल्यामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांची पाहाणी करतात व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे काम सुधारण्यासाठी सूचना देतात, त्यानंतर काही काळाने पाणी ओसरते व कृती योजना राबविण्याचा उत्साहदेखील ओसरतो!  महापालिका आयुक्तांनी मोठ्या मनाने हे स्वीकारले की रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण झाल्यामुळे, मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाली आहे व त्यामुळेच पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते! हे अगदी शेंबड्या पोरालाही समजू शकते मात्र आपल्याकडे धडाक्याने सुरु असलेले रस्त्यांचे काँक्रिटीकरण थांबविण्यासाठी पूर परिस्थिती निर्माण व्हावी लागली? मी अलिकडे पडद्यांची एक जाहिरात पाहिली होती ज्यामध्ये एक महिला घराचे पडदे बदलताना दाखवली आहे व सगळ्या घराचे बदलून टाकेन असे त्या जाहिरातीचे घोषवाक्य आहे, म्हणजेच ती तिच्या घरातील पडते विशिष्ट ब्रँडच्या पडद्यांनी बदलेल. इथे आपल्या शहराच्या शासनकर्त्यांनी सगळ्या शहराचे बदलून टाकू या घोषवाक्याचे पालन करायचे ठरवले आहे, म्हणजेच रस्ते, गल्ल्या, वाटा असे शहरातील प्रत्येक उघड्या कानाकोपऱ्याचे काँक्रिटीकरण करु! रस्त्याच्या कडेला असलेल्या चेंबरचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आता मनपाचे पुन्हा बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या संकुलांमध्ये पावसाळी पाण्याच्या जलसंवर्धनासाठी एनओसी घ्यायला सांगते म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकेल. याचाच अर्थ असा होतो की संकुलामध्ये पावसाचे पाणी जमीनीत झिरपण्यासाठी ठराविक टक्के जमीन उघडी हवी. मात्र नेहमीप्रमाणे नियम हे सामान्य जनतेसाठी असतात कायदे तयार करणाऱ्यांसाठी नाही व पावसाच्या पाण्याचे संवर्धनही त्याला अपवाद नाही! याचा आणखी एक पैलू आहे की आधीच खालावलेली पातळी आणखी खालावेल कारण आपण पाणी जमीनीत झिरपू दिल नाही तर भूजल पातळी कशी वाढेल? आपल्या शासनकर्त्यांसाठी पाणी वाचवा केवळ घोषणेपुरते आहे कारण कुणीही निर्वाचित नेता रस्त्यांचे काँक्रिटीकरण किंवा संपूर्ण शहरात फरसबंदी थांबविण्याचे आवाहन करत नाही, याची कारणे सगळे जाणतातच! काँक्रिटीकरणामुळे शहराच्या दुतर्फा असलेल्या झाडांचा कोंडमारा होतो, त्यांना वाढण्यासाठी जागा राहात नाही, तसेच जमीनीत पाणीही अजिबात झिरपत नसल्यामुळे झाडांना पाणी मिळविण्यासाठी झगडावे लागते व ती कालांतराने कमजोर होतात. यामुळे संपूर्ण शहरात झाडे कोसळण्याचे प्रकार वाढतात ज्यामुळे मालमत्ता व जीवितहानीचे प्रमाण वाढते! मी काही वनस्पतीतज्ञ नाही मात्र तर्कसंगत विचार केला तर हीच कारणे असतील असे वाटते म्हणून ती सांगितली!
पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे हा म्हणजे अभियांत्रिकीच्यादृष्टीने एक विनोदच म्हणावा लागेल कारण प्रत्येक मोसमात पुन्हा तोच अनुभव येतो, ही पावसाळी गटारे सोडून पाणी इतरत्र वाहत असते! पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची संपूर्ण व्यवस्था अभ्यासण्याची व त्या दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आपण बांधलेली गटारे व्यवस्थित कार्य करत नाहीत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला असे आणखी किती पूर आवश्यक आहेत. चेंबर चुकीच्या ठिकाणी आहेत, पृष्ठभागाच्या पातळीवर नाहीत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्याच चुकीच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या पाणी वाहून नेण्याऐवजी त्यात पाणी तुंबते.  सांडपाणी वाहून नेणारे चेंबर पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारांच्या चेंबरपेक्षा खालच्या पातळीवर आहेत त्यामुळे पावसाचे पाणी सांडपाण्याच्या गटारांमध्ये वाहात जाते व बाहेर वाहू लागते, जोराचा पाऊस झाल्यास सर्व सांडपाणी रस्त्यावर वाहायला लागते. सर्वप्रथम संपूर्ण शहरातील रस्त्यांचे व नाल्यांचे रुपरेखा सर्वेक्षण करुन घ्या, म्हणजे आपल्याला पावसाचे पाणी कुठे संकलित करायचे व कुठे त्याचा निचरा करायचा हे समजेल. जे शहर सर्वोच्च स्मार्ट सिटी व्हायचा प्रयत्न करते त्यात डेटाची भूमिका अतिशय महत्वाची असते व आपल्याकडील डेटा अतिशय निकृष्ट आहे. एकदा आपल्याला सर्व पातळ्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर पावसाच्या पाण्याची गटारे व पृष्ठभागावरील गटारे कुठे वापरायची हे आपल्याला समजेल. त्यांचा प्रभागनिहाय नकाशा तयार करा व संपूर्ण शहरासाठी मुख्य योजना तयार करा व त्यानंतर एक लक्ष्य निश्चित करुन राबवायला सुरुवात करा.
आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे पावसाळी पाण्याच्या गटारांचा व चेंबरचा दर्जा; आपण प्रत्येक प्रभागामध्ये एक पर्यवेक्षक व दोन गवंड्यांचा चमू तयार करु शकतो व त्यांचे काम पावसाचे पाणी साठवणाऱ्या चेंबरची पातळी तपासणे व पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची स्थिती तपासणे व त्यात काही समस्या असल्यास त्या दुरुस्त करणे हे असेल. पावसाचे पाणी साठविणाऱ्या चेंबरची पातळी तपासणे हे कदाचित सर्वात सोपे काम असेल, प्रशिक्षित अभियंता उघड्या डोळ्यांनीही हे सांगू शकतो मात्र आपण ज्याप्रमाणे शौचालयातील फरशांचा उतार तपासतो त्याचप्रमाणे आपण चेंबरच्या आजूबाजूला पाणी टाकायचे व पाणी चेंबरच्या दिशेने वाहतेय की इतर कोणत्या दिशेने हे तपासायचे! हे काम केवळ पावसाळ्यापूर्वी दिखाव्यापुरते नाही तर वर्षभर करत राहिले पाहिजे. यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या मोकळ्या राहतील याची खात्री केली जाईल, मात्र तुम्ही कधीही वर्तमानपत्रात पाहिले तर तुम्हाला जास्तीत जास्त अपघात सांडपाणी/पावसाचे पाणी साठविणाऱ्या चेंबरच्या झाकणाचे काम व्यवस्थित केले नसल्याने होतात हे दिसून येईल. म्हणूनच सर्व चेंबरचे झाकण पातळीत ठेवल्याने रस्त्याच्या सुरक्षेला मदत होईल. आपण मनपा मध्ये दर्जा नियंत्रण चमू सुरु करण्याविषयीही विचार करु शकतो. हा चमू संपूर्ण शहरात फिरुन शांतपणे कामची प्रगती नोंदवेल तसेच गटारांशी व पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांशी संबंधित कामाचा काय परिणाम झाला याची नोंद करेल. त्याचशिवाय हा चमू पदपथाच्या फरसबंदीपासून ते रस्त्याच्या दुभाजकापर्यंत प्रत्येक काम तपासू शकतो, म्हणजे शेवटी रस्ता वापरणाऱ्या सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल! हा चमू पावसामध्ये पाणी नेमके कुठे तुंबते हे पाहून त्यावर उपाययोजना करु शकतो. हाच चमू पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये सांडपाणी मिसळत आहे का किंवा सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये पावसाचे पाणी जाते आहे का हे तपासेल!
झालेल्या नुकसानाचे मुख्य कारण म्हणजे पूर व पाणी, सर्व माध्यमे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले आहे किंवा त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे याविषयी टिपेच्या आवाजात आरडाओरड करत आहेत! म्हणूनच प्रत्येक प्रवाह/नाला/ओढ्याचे व्हीडिओ चित्रण करुन ठेवा व ही डिजिटल नोंद आपल्याला संदर्भ म्हणून पाहता यावी यासाठी ठेवा. जे भूखंड उतारांवर असतील त्यांना, पूर्वी जे उघडे भूखंड होते त्या शेजारील मालमत्तेमधून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्यासाठी जागा सोडणे बंधनकारक करा; हे पृष्ठभागावरही करता येईल! जेव्हा एखादा रस्ता नैसर्गिक जलप्रवाहातून जात असेल तेव्हा पूल किंवा बांधाची रचना प्रमाणभूत ठेवा व तिचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, यामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मुक्तपणे वाहू शकतील व पूर येणार नाही.

पावसाची गरज आपल्या सगळ्यांनाच आहे कारण ते जीवन आहे, मात्र थोड्या तांत्रिक नियंत्रणामुळे हा पाऊस विनाशाचे कारण होणार नाही. माईक मे यांनी म्हटल्याप्रमाणे खळखळत्या पाण्याचा आवाज आपल्या कानांना सुखावणारा असावा, तो ऐकणाऱ्यांच्या तोंडून त्याच्यासाठी शिव्या-शाप निघू नयेत, असे झाले तरच आपण स्मार्ट सिटी म्हणून यशस्वी होऊ!



संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment