Tuesday, 22 March 2016

जयंत भाऊ, बिल्डरांची भाषा समजली, वेदना कधी समजणार ?माझे आजोबा म्हणायचे हे माझे घर आहे, हे घर चालवण्यासाठी मी पैसे देतोय, माझे वडील म्हणायचे, हे माझे घर आहे, त्याचे कर्ज फेडण्यासाठी मी पैसे भरतोय, माझी पिढी म्हणते, हे माझे घर आहे, मी याच्या भाड्याचे पैसे भरतो आहे ” – साबा गबोर. 

सध्याची परिस्थिती आणि वर्तमानपत्रातील जाहिराती किंवा फलक पाहता, असे दिसत आहे अखेरीस घर खरेदी करणाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत! आपण ग्राहकांना छप्पर फाडके ऑफर देणार आहोत असे सर्व जाहिराती सांगत आहेत आणि व्यवहार पक्का करत आहेत यामध्ये फ्लॅट बुक करा व एक कार मोफत मिळवा किंवा दोन बेडरूमचा फ्लॅट करा व तितक्याच किंमतीत तीन बेडरूमचा फ्लॅट मिळवा अशा सुद्धा ऑफर्स देऊ करत आहेत! वा रे वा, मी एकावर एक फ्री किंवा बारमध्ये हॅपी अवर्सदरम्यान २ ड्रिंक्स विकत घ्या आणि १ मोफत मिळवा अशा जाहिराती पाहिल्या होत्या, पण एक दिवस हा कीडा बांधकाम क्षेत्रालाही चावेल असे कधी वाटले नव्हते! मनोरंजक बाब ही आहे की अजूनही सत्ताधाऱ्यांना किंवा मीडियाला घरे सामान्य माणसाला परवडण्याजोगी झाली आहेत असे मात्र वाटत नाही. मला तर खरं म्हणजे परवडण्याजोगी घरांची आणि सामान्य माणसाची व्याख्या समजत नाही, तरीपण दोन्ही शब्द आपण किती नियमितीपणे वापरतो! 
आणि अशा पार्श्वभूमीवर श्री. जयंत विद्वांस यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला; सामान्य घर खरेदीदाराला बिल्डरबद्दल नाही तर सध्याच्या बांधकाम क्षेत्राबद्दल सजग करण्याच्या उद्देशाने हा लेख आहे आणि श्री जयंत हे आर्थिक सल्लागारही आहेत, शेअर बाजार हा त्यांचा विषय आहे. वास्तविक त्यांनी बांधकाम क्षेत्राच्या कारभारातील काही अगदी प्राथमिक त्रुटींवर अंगुलीनिर्देश केला आहे, पण मुद्दा हा आहे की याबद्दल त्यांनी त्यासाठी बिल्डर्स तसेच बिल्डर्सच्या मार्केटिंग योजनांना दोष दिला आहे, तसेच त्यांनी वाचकांना बिल्डरांबाबत इशारा दिला आहे. सध्या सोशल मीडियामध्ये बिल्डर नामक जमातीला दोष देण्याचा प्रघात असल्याचे दिसत आहे आणि त्याला चांगली प्रसिद्धी मिळते आणि लोकांनाही ते आवडते. फार पूर्वी जेव्हा बिग बी गुंडांची पिटाई करायाच, विशेषतः गाँव का जमीनदार किंवा सेठ यांची, तेव्हा लोक भारावून जायचे कारण आपणही असे करावे असे त्यांना वाटायचे, पण ते स्वतः तसे करू शकत नव्हते आणि ते स्वतःला अँग्री यंग मॅन बच्चनच्या जागी बघत असत, आणि त्यांनी बच्चनसाहेबांना सुपरस्टार करून टाकले! तशाच प्रकारे आता बिल्डरांना ठोकून काढणे ही सोशल मीडियामधील फॅशन झाली आहे, मान्य आहे की काही बिल्डर्सनीच अशी रिअल ईस्टेटची अवस्था करून ठेवली आहे, तरीही ही वस्तुस्थिती उरतेच की सरकार प्रत्येक व्यक्तीला किंवा गरजूंना घरे पुरवण्यात कमी पडले आहे आणि सध्याच्या परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रांच्या यंत्रणेमध्ये लोक एकत्र येऊन घरे बांधतील हेही संभवत नाही आणि यामुळेच बिल्डर नामक जमातीला प्रत्येक शहराच्या क्षितीजावर उगवण्याची संधी मिळाली आहे!
सुमारे ४० लाख लोकसंख्येच्या पुणे शहराचे उदाहरण घ्या आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की कायदेशीर इमारतींमध्ये (अगदीच ताजमहालासारख्या नाही, पण बऱ्यापैकी चांगल्या बांधलेल्या आणि योग्य जमिनीवर उभे असलेल्या) आनंदाने आणि सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे की रस्त्यांच्या पदपथांवर किंवा बेकायदेशीर इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे? इथे झोपडपट्ट्या आहेत व सुमारे ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते पण ते त्यांना बेकायदेशीर घरही घेणे परवडत नाही म्हणून, बिल्डर्सनी त्यांना फसवले आहे म्हणून नाही! तरीही श्री. जयंत असे विधान करतात की बिल्डर्सनी अव्वाच्या सव्वा किंमतींनी, जी एक प्रकारे गरीब ग्राहकांची पिळवणूक असते, मध्यमवर्गीय कुटुंबांना बरबाद केले आहे आणि अनेकांनी प्रकल्प अर्धवट सोडून सामान्य माणसांचे स्वतःच्या घराचे स्वप्न भंग केले आहे! त्यासाठी त्यांनी वास्तुविशारद श्री. शशी प्रभू यांच्या भाषणाचा दाखला दिला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की मुंबईत बिल्डर्सनी पुनर्विकासाच्या नावाखाली साधारण ४,५०० सोसायट्यांचे प्रकल्प अर्धवट सोडले आहेत आणि त्यामुळे त्यातील कुटुंबे बेघर झाली आहेत! पण, पुण्यामध्ये चित्र बरेच चांगले आहे आणि समजा घरे महाग होत असली किंवा इमारती अर्धवट बांधून राहत असतील तर ती आपल्या सरकारच्या बांधकाम क्षेत्राशी संबंधित सतत बदलणाऱ्या नियमांची कृपा आहे! उदा. सध्याचे नवीन टीडीआर मार्गदर्शक तत्त्वेच घ्या, जी अनेक सुरू असलेल्या आणि ज्यांचे भवितव्य पूर्णपणे कोणालाच निश्चित माहिती नसलेल्या टीडीआर धोरणावर अवलंबून आहे, अशा करार होत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना बाधक ठरणार आहेत.
जर एखादा बिल्डर निश्चत एफएसआय आणि त्यावर टीडीआरची परवानगी असल्याचे गृहीत धरून एखादी जमीन विकत घेतो आणि अचानक मध्येच धोरण बदलते तर तो काय करणार, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून बांधकाम करायचे आणि तोटा सहन करायचा? मला असे वाटते की लेखकाची तीच अपेक्षा आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या अस्तित्त्वात असलेल्या सोसायट्यांना स्वतःच्या इमारतींचा स्वतःच पुनर्विकास करायचे सुचवले आहे! बरे, बहुतांश ठिकाणी हे लोक मासिक देखभाल खर्चासारख्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा एकत्र येत नाहीत, मग ते व्यावसायिक लोकांकडे अर्ज करून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवणे,  बांधकाम करून घेणे आणि अतिरिक्त फ्लॅट्स विकणे यांसारख्या गोष्टी कशा करणार आहेत! जरी त्यांनी हे सर्व केले तरी
ते नव्या ग्राहकांना अशा पुनर्विकासाच्या प्रकल्पांमध्ये फ्लॅट विकत घेण्यासाठी योग्य सेवा देतील याची काय खात्री? तेही त्यांना साधे एखादे गॅरेजही बांधण्याचाही अनुभव नसताना! आणि काही कच्च्या आणि अननुभवी लोकांनी बांधलेला ईमारतीत घर नोंदवण्यास लेखक नव्या ग्राहकांना मार्गदर्शन करतील का? अजिबात पूर्वपिठीका नसलेल्या नवख्या विकसकाकडे फ्लॅट बुक करण्यास ते सुचवतील का, कारण नंतर त्यांनीच सुचवले आहे की नव्या किंवा नुकत्याच सुरू झालेल्या प्रकल्पामध्ये फ्लॅट बुक करू नये कारण असे प्रकल्प पूर्ण होण्याची काहीच खात्री नसते. उलट, घर खरेदीदारांसाठी टिप्स, या शीर्षकाखाली शेवटी लेखकाने म्हटले आहे की, बिल्डरचे भूतकाळातील यशापयश आणि पूर्ण झालेले प्रकल्प बघावेत, नंतरच त्याच्याकडे घर घ्यावे त्यामुळे एखाद्या सोसायटीने स्वतःची इमारत उभारणे आणि एखाद्याने अशा प्रकल्पामध्ये फ्लॅट बुक करण्याचा धोका पत्करण्याबद्दल काय?
बरे, टीडीआर खरेदी करण्यासाठी आणि इतर आवश्यक विकास शुल्कांसाठी लागणारे कोट्यवधी रुपये या सोसायट्यांनी कसे उभारायचे याबद्दल लेखकाकडे काही मार्ग आहेत का? त्यांनी काही सहकारी बँक अतिशय कमी व्याजदराने कर्ज देत असल्याचा उल्लेख केला, कृपया पुण्यात असे कर्ज मिळालेल्या एका सोसायटीचे नाव सांगा आणि समजा या सोसायट्यांना सुरुवातीच्या काळामध्ये बुकिंग मिळाले नाही तर त्यांनी कर्जाची फेड कशी करायची? कारण याच लेखकाने वाचकांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीमध्ये फ्लॅट बुक न करण्याचे सुचवले आहे कारण त्यानंतर भाव पडणार आहेत! मग, सोसायटीने बांधलेल्या फ्लॅट्ससाठी खरेदीदार कोण शोधणार, तसेच फ्लॅट ताब्यात मिळाल्यानंतर देखभालीचे काय कारण फक्त एक व्यावसायिक विकसकच हि सेवा देऊ शकतो आणि त्याच्याकडे तसे ट्रॅक रेकॉर्ड असते! या तर्काने कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यावसायिकाची गरज नाही, कारण मग आपल्याला सीए किंवा वकिलाची गरज काय, आपण एखादा किंवा कोणीही कायद्याचा पदवीधारक नेमू शकतो जो करार-मदारांचे ड्राफ्टिंग करेल आणि सर्च टायटल्स देईल, की झालं काम ! कोणत्याही इतर उद्योगक्षेत्राप्रमाणे बांधकाम हेही एक उद्योगक्षेत्र आहे आणि घरे ही व्यावसायिकांकडून बांधली जातात, वाहनांप्रमाणे किंवा इतर कोणत्याही उत्पादनाप्रमाणे. हो, काही वाईट घटक असतील, पण मोठ्या वाहन कंपन्यांनी सदोष रचनेमुळे हजारो कार्स परत घेतल्याचे प्रसंग घडले आहेत आणि अलिकडे फोक्सवॅगनसारख्या कंपनीला प्रदूषणाच्या नियमांचा भंग केल्याबद्दल लाखो डॉलर्सचा दंड आकारण्यात आला आहे, मग लोकांनी कार घेणे थांबवायचे का?  
या लेखामध्ये श्री. जयंत यांनी बांधकाम क्षेत्राच्या अतिशय महत्त्वाच्या पैलूकडे निर्देश केला आहे, एक फ्लॅट किती खरेदीदारांना विकला जातो यावर नोंदणी विभागाचे अजिबात नियंत्रण नसते, ते फक्त व्यवहाराची नोंद करतात आणि महसूल गोळा करतात! हे अगदी खरे आहे, पण हाच नोंदणी विभाग जमिनीच्या व्यवाहाराबाबतही हेच करते आणि पैसे गुंतवून जमीन खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाच्या डोक्यावरही टांगती तलवार असते, बिल्डरला असलेल्या या धोक्यांचे काय? जमीनमालकाने एकच जमीन अनेक बिल्डर्सना विकल्यामुळे व्यवहारात फटका बसल्यावर सरकार, किंवा फ्लॅट खरेदीधारक किंवा एखादी विमा कंपनी बिल्डरच्या मदतीला येते का? श्री लेखकांच्या तर्कानुसार, मग आम्ही जमीन खरेदी करायेचच थांबवले पाहिजे म्हणजे मग त्यावर इमारती बांधण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही! जर बांधकाम क्षेत्राचा कारभार पाहणारी यंत्रणाच सदोष आणि भ्रष्ट असेल तर ती बिल्डर आणि खरेदीदार या दोघांसाठीही चूक आहे आणि अगदी नवीन विधेयक "रेरा" सुद्धा स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहाराची खात्री देऊ शकणार नाही कारण फक्त कायदाच नव्हे तर तो कायदा राबवणार असलेले लोक हीच खरी समस्या आहे आणि दोष दिला जातो बिल्डर्सना कारण हे बिल्डर्स म्हणजे असे लोक असतात जे या यंत्रणेशी लढून बांधकाम करण्याचा प्रयत्न करतात आणि मी हे त्या बिल्डर्सबद्दल बोलत आहे जे सर्व कायदेशीर परवानग्या मागतात कारण या देशामध्ये कायदा फक्त त्यांच्यासाठीच आहे जे त्याचा आदर करतात. 
दुसऱ्या बाजूला बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्याच्या गप्पा करणारे हेच सरकार  प्रत्येक बेकायदेशीर बांधकामाला कायदेशीर करते, तर श्री. लेखक अशा सर्वांना माहित असलेल्या बेकायदेशीर इमारती आणि ते बेकायदा असल्याचे माहित असूनही त्यामध्ये स्वस्त किंवा तथाकथित परवडणाऱ्या किंमतीत मिळतो म्हणून फ्लॅट खरेदी करणाऱ्या लोकांबद्दल काय म्हणतात? अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेची खात्री कोण देतो आणि एखादी दुर्घटना घडली तर कोण जबाबदार असेल? माझ्यासारखे बिल्डर्स नक्कीच नाही, जे सर्व नियम पाळतात आणि त्या प्रक्रियेदरम्यान माझी इमारत पूर्ण व्हायला जास्त वेळ लागेल आणि त्यातील घराची किंमतही वाढेल, जे लेखकाच्या मते सामान्य माणसाचे शोषण आहे!
त्यानंतर एक पायरी पुढे जाऊन, श्री जयंत यांनी बिल्डरच्या जाहिरातींचे डीकोडिंग (विसंकेतन) करणारा एक शब्दकोष दिला आहे; खाली त्यांचे सांगणे, आणि त्यानंतर माझे म्हणणे...
* जर जाहिरत असे म्हणत असेल, “थोडेच फ्लॅट शिल्लक आहेत.... हा बोर्ड गेल्या वर्षीपासून आहे म्हणजेच तिथे विक्री होत नाही... छान, हा बोर्ड चपलांच्या दुकानांपासून अगदी बीएमडब्लूपर्यंत सगळेजण वापरतात, म्हणजे सर्व उद्योगांमध्ये मंदी आहे, नाही का
*”सुंदर नैसर्गिक सभोवताल”... म्हणजे याचा अर्थ अजून आजूबाजूला इमारती झालेल्या नाहीत आणि एके दिवशी तिथे टॉवर उभा राहील... मग एखाद्याने काय लिहावे; तुमच्या इमारतीभोवती इमारती उभ्या राहीपर्यंत वाट बघा? जर तुम्ही विकसित सभोवताल असे लिहिले तर तुम्ही ग्राहकांची दिशाभूल करत असाल, मग जे तथ्य आहे ते लिहिणे हा गुन्हा आहे का?  
* शून्य टक्का व्याज दर... बिल्डर दिवाळखोरीत गेला आहे किंवा तो आर्थिकदृष्ट्या मोडून पडला आहे म्हणून तो तुम्हाला तुमचे पैसे परत देत आहे.... मला लेखकाच्या आर्थिक ज्ञानाबद्दल कीव येते कारण माझ्यासारखा सामान्य माणूस सुद्धा  सांगू शकतो की वाहन उद्योगात अशा प्रकारच्या कर्ज योजना अनेक वर्षांपासून आहेत आणि अगदी गृहकर्ज देणाऱ्या संस्था सुद्धा विकसकाशी यासाठी टाय-अप करतात कारण त्यांनाही धंदा करायचा असतो आणि गृहकर्ज हा व्यवसायामध्ये सर्वात मागणी असलेला आहे, प्रत्येक बँक हा व्यवसाय करते. याचा बिल्डर दिवाळखोरीत गेला आहे असा अर्थ लावणे म्हणजे संपूर्ण गृहकर्ज, गृहवित्त उद्योगावर शंका घेण्यासारखे आहे! अखेरीस ही अशी ऑफर आहे की जिथे तुम्ही थोडी बचत करता, आणखी काही नाही!  
*”तुम्ही आज बुकिंग केले तर दोन लाख रुपयापर्यंत सवलत”… याचा अर्थ आम्ही चार लाखांनी भाव वाढवले आहेत... छान, छान, लेखकाने कालचे भाव तपासले आहेत का? मग अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे काय, जे प्रत्येक पंधरवड्याला पन्नास टक्क्यांचा मेगा सेलची ऑफर देतात? मग, सेंट्रल किंवा फिनिक्स मॉलमध्ये काहीही खरेदी करू नका, कारण श्री. जयंत यांच्या मते सवलत म्हणजे वाढलेले दर! 
*”एक कार किंवा सोन्याचे नाणे मोफत मिळणे”…  याचा अर्थ खरेदीदाराला लहानशी भेटवस्तू देऊन त्यांच्याकडून पैसे घेणे, मराठीमध्ये आवळा देऊन कोहळा काढणे... पुन्हा एकदा सराफांपासून वाहन क्षेत्रापर्यंत सर्वजण भेटवस्तूंची योजना राबवतात, मग अशा उत्पादनांवरही बंदी घाला!  
*” पानभर  जाहिरात, चित्रपट ताऱ्यांना ब्रँड अॅम्बॅसेडर्स म्हणून नेमणे... याचा अर्थ विकासकाला त्याच्या दर्जावर विश्वास नाही... तर मग पुन्हा एकदा रॉलेक्सकेडे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून रॉजर फेडरर आहे आणि टाटाकडे लायनेल मेस्सी आहे, मग आपण आता रॉलेक्स आणि टाटांच्या दर्जावरही शंका घ्यायची का? अगदी भारत सरकारही अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा देशाची आरोग्य सुविधा किंवा पर्यटनाचा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून वापर करते, मग याचा अर्थ आपल्या देशाची सर्व धोरणे कमकुवत किंवा चुकीची आहेत आणि देशाला आपल्या क्षमतांवर विश्वास नाही! मार्केटिंग म्हणजे लोकांना आपल्या उत्पादनाची जाणीव करून देणे आणि त्यासाठी प्रत्येक कंपनीचे स्वतःचे मार्ग असतात, ग्राहकांनी काय बघायचे आणि काय खरेदी करायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे, हा बरोबर मार्ग नाही का? 
* “मोठ्या टाऊनशिपची घोषणा करणे”… म्हणजे बिल्डरला खूप जास्त व्याजदराने कर्ज मिळालेले आहे. तर,  लेखक महोदय किमान इथे तुम्ही काही खरे बोलत आहात, कारण प्राधान्य क्षेत्र म्हणून बांधकाम व्यवसायाला अगदी राष्ट्रीयकृत बँकांमध्येही १६% व्याजदरापर्यंत उच्चदराने कर्ज फेडावे लागते. विनोद असा आहे की, तुम्ही हॉटेल किंवा उद्योग क्षेत्रासाठी जमीन खेरदी करत असाल तर तीच बँक तुम्हाला ७% इतक्या कमी व्याजदराने कर्जपुरवटा करते पण बांधकाम क्षेत्रासाठी कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे अतिशय महत्त्वाचे सत्य श्री. जयंत यांना माहित नसेल यावर माझा विश्वास नाही! सर पुण्यामध्ये मगरपट्टासारख्या टाउनशिप्स आहेत, जिथे जमीनमालकांनी एकत्र येऊन सर्वात मोठी टाऊनशिप विकसित केली आहे आणि येथे सुरू असलेल्या किमान पाच टाऊनशिप्समध्ये विकसकांनी परदेशी गुंतवणूकदार संस्थांबरोबर हातात हात घालून अतिशय कमी व्याजदरामध्ये जमीन विकत घेतली आहे. उलट जितकी जमीन मोठी, तितके जास्त परदेशी गुंतवणुकदार बिल्डरबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात, तुमच्या माहितासाठी फक्त! बांधकाम क्षेत्रामध्ये लहान बिल्डर्सनाच उच्च व्याजदराने कर्ज घ्यावे लागते, मोठ्यांना नाही!
*“सोल सेलिंग एजंट”… म्हणजे तुम्ही बिल्डरला कधीही भेटू शकणार नाही... ओह, तर श्री. रतन टाटा किंव श्री अकियो टोयोदा किंवा श्री. मुंजाल यांनी स्वतः काउंटरवर बसुन कार आणि बाईक्स विकल्या पाहिजेत आणि डीलर्सची नियुक्ती करायला नको! कर्मचाऱ्यांचा पगार आणि डोईजड होणारे खर्च सतत वाढत असताना आणि ऑफिससाठीची जागा महाग होत असताना, एजंट नेमून आपण आपले खर्च कमी करू शकतो, आणि ग्राहक नेहमीच विचारू शकतो की मी बिल्डरला कधी भेटू शकेल आणि तरीही बिल्डर आला नाही तर ग्राहक अशा बिल्डरबरोबर घराचे बुकिंग न करायला मोकळा!
वास्तविक मला श्री. जयंत यांच्या लेखाला उत्तर द्यावेसे का वाटले, तर मी दुखावलो गेलो आहे किंवा त्यांनी बिल्डर्सवर आरोप केल्यामुळे मला अपमानित वाटत आहे म्हणून नाही किंवा लोकांना सजग करण्याच्या त्यांच्या हेतूवरही मला शंका नाही, पण तुम्हाला एखाद्याला मार्गदर्शन करायचे असेल तर तुम्हाला स्वतःला नीट माहिती असेल तरच करावे. जसे की शेवटी त्यांनी आवाहन केले आहे की शक्य असेल तर तीन ते चार वर्षे घर खरेदी करू नये कारण घरांचे भाव कमी होऊ शकतात, फार छान, पण याची खात्री कोण देणार? लोकसंख्येच्या विस्फोटाचा शाप असलेल्या या देशामध्ये जमीन मर्यादित आहे, पाण्यासारखीच ही अशी विक्रेय वस्तू आहे जी रोज दुर्मीळ होत चालली आहे आणि जमिनीचे भाव कमी होतील याला तार्किक स्पष्टीकरण कोणतेही नाही आणि ते गेल्या पन्नास वर्षांमध्ये झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे! तुमच्या बांधकाम क्षेत्राचे कार्य आणि तथ्य यांच्या अनुषंगिक अज्ञानामुळे लोकसत्तासारख्या व्यासपीठावरून असे लेख वाचकांची अप्रत्यक्षपणे दिशाभूल करतात हे मला सांगायचे होते, त्यामुळे मी हे विचार लिहून काढले, त्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नये!  
त्याऐवजी जयंत सर बांधकाम क्षेत्रातील दोष शोधण्याच्या कामात तुमचे नेहमीच स्वागत आहे आणि मी माझ्या सहकाऱ्यांसह तुम्हाला मदत करायला आनंदाने तयार आहे, जेणेकरून हे क्षेत्र अधिक चांगले होईल, जिथे कोणत्याही श्री. जयंत विद्वांस यांना अज्ञानानेही लोकांना घरे घेऊन नका असे मार्गदर्शन करण्याची गरज पडणार नाही, उलट डोळसपणे आणि खुल्या मनाने कधीही घर खरेदी करण्याचा सल्ला द्याल, जे कोणत्याही उत्पादनाला आणि कोणत्याही काळी लागू असते! .

श्री. संजय देशपांडे
 smd156812@gmail.com
श्री. केदार वांजपे

kvanjape@gmail.com

1 comment:

  1. Absolutely True expressions.
    Perfect feelings in mind of all Genuine Builders in Pune.

    ReplyDelete