Thursday 17 March 2016

जंगल म्हणजेच मन:शांती !























विश्वाचे अंतरंग समजावुन घ्यायचे असेल तर त्यासाठीचा मार्ग दाट जंगलांमधून जातो.”  जॉन मुईर

जॉन मुईर हे स्कॉटिश-अमेरिकी निसर्गप्रेमी, लेखक, पर्यवरणवादी होते. त्यांनी फार

पूर्वीच अमेरिकेतील वन्यप्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घेतली. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वत्र वने मोठा असतानाही मुईर यांना जंगलांचे व वन्यप्रदेशाचे महत्व जाणवले व त्यांच्या वरील अवतरणातून आपल्याला दिसून येते की ते काळाच्या किती पुढे होते! मी प्रत्येक वेळी जेव्हा जंगलाला भेट देतो तेव्हा, त्यांच्या अवतरणाचा अनुभव घेतो; व त्यांनी मांडलेला विचार अधिक सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी वॉट्स-अपवर एका मित्राशी गप्पा मारताना एक प्रश्न समोर आला, तुम्ही मनःशांतीची व्याख्या कशी कराल?” हा प्रश्न त्यानंतर सातत्यानं माझ्या मनात घुटमळत होता. काही वेळा तुम्हाला विचारण्यात आलेले प्रश्न तुम्ही विसरता कारण तुमच्याकडे तेव्हा त्याचे उत्तर नसते किंवा तुमच्यामध्ये त्याचे उत्तर शोधण्याएवढा संयम नसतो. मात्र तो प्रश्न मनातच कुठेतरी दडलेला असतो व तो विशेषतः तुम्ही एकटेच असताना तो पुन्हा अवतरतो येतो. अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी व स्वतःशीच संवाद साधण्यासाठी जंगलाशिवाय दुसरी कोणती चांगली जागा असू शकते! आणि मला जंगलातच जाणवलं की तुम्हाला मनःशांतीची व्याख्या करता येणार नाही कारण तुम्ही सगळ्या गोष्टींची व्याख्या शब्दात करु शकत नाही, काही गोष्टी तुम्हाला स्वतःच अनुभवाव्या लागतात; मनःशांती  देखील अशा गोष्टींपैकी एक आहे!

यासाठीच मी जंगलात पुन्हा पुन्हा जातो व माझ्या मित्रांना तसंच अगदी माझ्या 

घरच्यांनाही हा प्रश्न पडतो की मी वारंवार जंगलात का जातो? अनेकदा तर मी एकाच ठिकाणी किंवा एकाच जंगलात वारंवार जातो! अर्थात मला एक सांगावसं वाटतं की जंगल कधीच एकसारखं दिसत नाही, अनेक महिने किंवा वर्ष तर सोडाच एक पूर्ण दिवसही जंगल एकसारखे नसते व ते कधीच कंटाळवाणे किंवा निरस वाटत नाही तर नेहमी चैतन्याने सळसळत असते. तुम्ही कधी एखाद्या सकाळी शहरापासून दूर जंगलात गेला आहात का जिथे क्षितिजावर तुम्हाला इमारती किंवा आपल्या प्रिय नेत्यांच्या किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या जाहिरातींचे फलक नाही तर स्वच्छ निळे आकाश दिसेल? तुमच्यापैकी बहुतेकांचे उत्तर नाही असे असेल हे मला माहिती आहे, जंगलात गेल्यानंतर तुम्ही स्वच्छ, मोकळ्या आणि ताज्या हवेत श्वास घेता! खरतरं आपल्या शहरी शरीराला व मनाला याची सवयच राहिली नाहीये व ताजी हवा घेण्यापूर्वी तुम्हाला प्रथम जाणीव होते की इथे मोबाईलचं नेटवर्क नाही! मात्र याचा अर्थ असाही होतो की, तुम्ही निसर्गामध्ये पहिले पाऊल टाकले आहे कारण इथे मोबईलचं नेटवर्क नसतं म्हणजे तुम्ही समाज माध्यमांपासून (सोशल मीडिया) दूर असता व जगाशी तथाकथित पद्धतीने जोडलेले नाही. या जगात सगळं काही आहे मात्र मनःशांती  नाही व अशा जगापासून दूर गेल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थांनी आजूबाजूला पाहायला सुरुवात करता, तुमच्या शरीराला व मनाला वेढून टाकणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेऊ लागता! ३जी किंवा ४जी नेटवर्कद्वारे जगाशी जोडले जाण्यात गैर काही नाही मात्र या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आपण स्वतःपासून दूर जात आहोत व जंगलामध्ये मात्र तुम्ही स्वतःच्या आणखी जवळ जाता! तुम्ही जशी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांची बॅटरी चार्ज करता तसं जंगलात गेल्याने तुम्ही मानसिकरित्या चार्ज होता व एक नवीन उत्साह व चैतन्य अनुभवता! अर्थात हा माझा अनुभव  आहे कारण मला असे लोकही माहीत आहेत ज्यांना जंगले कंटाळवाणे  होतात !

 इथे तुम्ही पहाटे ४.३० वाजता उठता, बाहेर अजूनही अंधार असतो, आकाशात तारे लुकलुकत असतात, तरी तुम्हाला जड किंवा अपुरी झाल्यासारखे वाटत नाही. एक कप गरमागरम चहा घेतल्यानंतर तुम्ही जिप्सित बसता, जिप्सी जंगलाच्या दरवाजातून प्रवेश करते व तुमच्यासमोर जंगलाचे समृद्ध निसर्गसौंदर्य उलगडत जाते. तुम्ही सूर्योदयाच्या वेळी निळ्याशार आकातून बाहेर येणारं लालबुंद सूर्यबिंब कधी पाहिलं आहे का, सूर्योदयाच्या या लालसर छटांमध्ये संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. त्यानंतर तुम्हाला जाणवतं की गर्द झाडी असलेल्या डोंगराच्या वर येणारा सूर्य फक्त पाहिल्यानंही किती ताजंतवानं आणि जिवंत वाटतं! सूर्योदयाच्या वेळी होणारी रंगांची उधळण त्यावेळी आकाशात दिसणारे ढगांचे आकार दररोज वेगळे असतात. त्यानंतर तुम्हाला झाडांचा व फुलांचा गंध जाणवतो, इथे आजूबाजूला कितीतरी झाडं आणि वेली असतात, यापैकी प्रत्येकीच्या उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. तुम्हाला दररोज वेगळा गंध अनुभवायला मिळतो जो बाटलीत अत्तरासारखा बंद करता येणार नाही व जतन करता येणार नाही तर तो अनुभवण्यासाठी तुम्हाला जंगलातच यावे लागेल. इथे तुम्हाला प्रत्येक झाडावर हिरवा, पिवळा व लाल या रंगांच्या असंख्य छटा दिसतात. कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडचे नेलपेंट किंवा लिपस्टिक या छटांचे अनुकरण करु शकणार नाही. आकाशात सूर्य वर येतो तसे तापमानही वाढते व जंगल जरा शांत झाल्यासारखे वाटते मात्र नैसर्गिक व मनुष्यनिर्मित जलाशयांवर कायम वर्दळ असते! जंगलातील संपूर्ण जीवन चक्र पाण्यावर अवलंबून असते, मध्य भारतामध्ये भर उन्हाळ्याच्या दिवसात पारा चढलेला असतो, त्यामुळे प्रत्येक प्राणी किंवा पक्षी कोणत्या ना कोणत्या जलाशयाचा आसरा घेतो त्यामुळे हा भाग अधिकच जिवंत होतो. जंगलात कोणत्याही पाणवठ्यावर जाऊन पाहायला नेहमीच मजा येते कारण पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नसते. मी नुकतीच ताडोबा अभयारण्याला भेट दिली तिथल्या अनुभवांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे अगदी उन्हाळ्यातल्या गरम वातावरणातही तिथे विविध गोष्टींचं निरीक्षण करत वाट पाहाणं किती रोचक असू शकतं याची तुम्हाला कल्पना येईल.

 ताडोबामध्ये अशाच एका उष्ण दुपारी, पांढरपवनी (बहुतेक पाणवठ्यांना एखाद्या नदीचं किंवा स्थानिक ठिकाणाचं नाव देण्यात आलं आहे) इथल्या एका पाणवठ्यावर आम्ही माया नावाच्या वाघिणीची व तिच्या बछड्यांची वाट पाहात होतो; अचानक दोन जंगली कावळे (हे कावळे आपल्या शहरातल्या कावळ्यांपेक्षा अतिशय वेगळे असतात, शहरी कावळ्यांच्या मानेभोवती करड्या रंगाचा पट्टा असतो तर जंगली कावळे पूर्णपणे काळे असतात व शहरी कावळ्यांपेक्षा त्यांची चोच व पंजे अतिशय मजबूत असतात व ते अतिशय आक्रमकही असतात) जवळपासच्या उंच झाडावरुन उडताना व पाणवठ्याच्या दिशेने येताना पाहिले. पहिल्यांदा मला वाटले ते घरट्यातून अन्नाच्या शोधार्थ निघाले आहेत मात्र काळजीपूर्वक पाहिल्यावर लक्षात आलं की कावळीच्या चोचीत एक अंडे होते त्यानंतर एक फिश ईगल (गरुडाची एक प्रजाती) त्या घरट्याभोवती घेऱ्या मारताना दिसला, त्यानंतर मला लक्षात आले की कावळ्याच्या जोडप्यानं गरुडाचं अंडं पळवलं होतं. कावळे इतर पक्षांच्या घरट्यांमधून अंडी चोरतात हे ऐकलं होतं मात्र प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं, त्यानंतर कावळीनं चोचीतलं अंडं दाबलं आणि एका घासात गट्टम करुन टाकलं! हा संपूर्ण खेळ काही मिनिटे चालला होता व मी तेवढा वेळ वाघिणीविषयी विसरलो. जंगलाचा अनुभव किती रोमांचक असतो व वाट पाहिल्यानं कसा फायदा झाला हे पुन्हा एकदा दिसून आलं! जंगलात भटकंती करताना तुम्हाला संयमाने वाट पाहावी लागते, तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, एक म्हणजे येथे लहान मधमाश्यांच्या भुणभुणीचा अतिशय त्रास होतो त्यांचा डंख फार भयंकर नसला तरी तुम्ही ज्या प्राण्याची वाट पाहात असता त्यावरुन तुमचे लक्ष विचलित होते. म्हणूनच पूर्ण बाह्यांचा शर्ट घातला तसंच बी रिपेलंट क्रीम लावलं तर उत्तम. तसेच हनी बझर्डने (मधमाशांच्या पोळ्यातून मध पिणारा व खाणारा पक्षी) हल्ला केल्यामुळे पर्यटक ज्या झाडापाशी वाट पाहात होते त्यावरील आग्या माशांचे पोळे उठल्याची एक घटना ताडोबाला घडली. त्यामुळेच तुम्ही जंगलात कुठे वाट पाहता याकडे लक्ष देणे आवश्यक असते व आजूबाजूच्या पक्ष्यांची व प्राण्यांची हालचाल काळजीपूर्वक पाहावी लागते, कारण एखादे माकड किंवा अगदी एखादे अस्वलही मधमाशांना उठवू शकतं व तुम्ही सहजपणे मधमाश्यांचे लक्ष्य ठरता त्यामुळे तुम्हालाच त्रास होतो!

प्रत्येक प्राण्याची किंवा पक्षाची पाणवठ्यावर यायची विशिष्ट वेळ असते तसेच कुठं न उभे राहुन पाणी प्यायचे हे देखील ठरलेले असते, हे सगळे पाहणे अतिशय रोचक असते. जंगलात तुमचे जीवन  हे तुमच्या सवयींवर अवलंबून असते व तुम्ही तुमची सवय बदलली तर तुम्ही धोक्यात येऊ शकता. उदा. वाघ एका ठराविक ठिकाणी पाणी पितो व त्याचा पाणवठ्यावर येणारा मार्गही ठरलेला असतो, एक प्राणी म्हणून तुम्ही त्या मार्गात आडवे आलात  तर त्याचा अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो व तुम्ही त्याचे सावज होऊ शकता! मात्र हे माहिती असल्यावर तुम्हाला अतिशय संयमाने राहावे लागते व वाट पाहायला शिकावे लागते व हे शिकण्यासाठी पाणवठा हे अतिशय उत्तम ठिकाण आहे! तुम्ही इथे तासन् तास घालवू शकता व जंगली कुत्री पाण्यात किती आरामात डुंबत असतात हे पाहताना हरवून जाऊ शकता, वाघाच्या बछड्यांची पाण्यातली मस्ती आणि गव्यासारख्या  अवाढव्य जनावर पाण्यात व चिखलात कसा आरामात पहुडलेला असतो हे पाहू शकता!

सकाळचा व दुपारचा वेळ पक्ष्यांसाठी असेल तर दुपार ओसरु लागते, सूर्य माळवतीकडे झुकू लागतो तशी जंगलाला जाग येते, कारण बहुतेक प्राणी हे निशाचर असतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला वाघ व बिबट्यांची शिकारीसाठीची हालचाल जाणवते. पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात, हरिणासारखे शाकाहारी प्राणी पाणवठ्याकडून परतत असतात व रात्र घालविण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागतात. मावळतीच्या सूर्य प्रकाशात आकाशात पिवळा ते केशरी अशा विविध रंगांची उधळण होते; या प्रकाशात ताडोबा तलावही न्हाऊन निघतो व तुम्ही त्या केशरी संधीप्रकाशात अंघोळ करणारे व पाणी पिणारे सांबर हरिण पाहून तुम्ही सगळे काही विसरता! संध्याकाळी घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने विविध प्राण्यांच्या हाकाट्यांनी (वाघ किंवा बिबट्या यासारखे हिंस्त्र प्राणी आजूबाजूला आल्याची जाणीव झाल्यास हरिण व माकडे काढतात तो विशिष्ट आवाज) संपूर्ण परिसर भरुन जातो व या सगळ्यात मावळतीच्या संधीप्रकाशामुळे संपूर्ण वातावरणाला एक गूढ वलय लाभते!

आता मला सांगा जीवनात एवढं वैविध्य आपल्याला कुठे पाहायला मिळेल किंवा आपल्या शहरी जीवनात इतका जिवंतपणा आपल्याला अनुभवता येईल का? इथे तुम्ही सर्व ताणतणावातून मुक्त असता, ऑफिसला जायचंय हा विचार नसतो किंवा कामाची उद्दिष्टे गाठायची नसतात किंवा वॉट्स ऍपवर सतत पाठवलेले निरर्थक फॉरवर्ड्स वाचत वेळ घालवायचा नसतो; व इथे मला जाणवतं निसर्ग म्हणजेच मनःशांती !

मात्र जंगलातील भटकंतीचा अनुभव अधिक संस्मरणीय व्हावा यासाठी काही सूचना द्याव्याशा वाटतात उदा. ताडोबामध्ये वन विभागाने नवीन मार्ग खुले केले पाहिजेत म्हणजे पर्यटकांना जंगलाचा न पाहिलेला भाग पाहता येईल, किंवा नवीन मार्ग खुले करता आले नाही तरी मार्ग बदलत राहिले पाहिजे! त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत हे मान्य असले तरीही मला असे वाटते की जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्बंध घातले आहे हे मान्य असले तरीही आपल्या सर्वांना हा अमूल्य ठेवा पाहता आला पाहिजे. हा ठेवा जेव्हा जास्तीत जास्त लोक पाहतील तेव्हाच ते त्याचे संरक्षण करतील! 

मार्गाशिवायच, आणखीही काही साध्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ गाईडचा गणवेश

जाड्या-भरड्या सुती कापडाचा आहे जो त्या भागातल्या उष्ण वातावरणासाठी अनुकूल नाही, यामुळे गाईड अतिशय अस्वस्थ व घामाघूम होतात! जंगलाबाबतच्या अशा बाबींचा निर्णय तज्ञांशी चर्चा करुन घेतला जावा व यासंदर्भात कॉर्पोरेट कंपन्या किंवा व्यक्ती आपले योगदान देऊ शकतात. त्याचवेळी जंगलात व त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांचे आयुष्य किती खडतर आहे हे विसरुन चालणार नाही त्यांना शहरासारख्या सुखसोयी मिळत नाहीत व रोजचे जेवणही मिळवणे अवघड काम असते. म्हणूनच आपण सगळे खुल्या मनाने विचार करु व या लोकांचे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी कशाप्रकारे योगदान देता येईल याचा विचार करु. असे झाले तरच आपल्याला जंगलातली ही मनःशांती  अनुभवण्याचा हक्क आहे, एवढेच मला म्हणावेसे वाटते!

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif
संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment