Friday 15 April 2016

एक दिवस स्वच्छतेसाठी !



















तुमची घरे व आजूबाजूचा परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.” …लैला गिफ्टी अकिता

लैला गिफ्टी अकिता या आफ्रिकेतील घाना देशाच्या नागरिक असून स्मार्ट युथ व्हॉलंटियर्स फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. त्यांनी क्वामी नेक्रूमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेन्कॉलॉजी, कुमासी-घाना येथून रिन्यूएबल नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट (नूतनीकरणीय नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन) या विषयात बीएससी केले. त्यानंतर त्यांनी घाना विद्यापीठातून ओशियनोग्राफी (समुद्रविज्ञान) या विषयातून एमफिल केले. त्यानंतर त्यांनी सायकल्स-फेड्रिक शिलर युनिव्हर्सिटी ऑफ जेना, जर्मनी येथून जिओसायन्सेस (भूविज्ञान) या विषयातून डॉक्टरेट मिळवली (जून २०११ ते मार्च २०१६). लैला या जगात बदल घडवून आणण्यासाठी तरुणांना प्रेरित करणाऱ्या, त्यांचे सबलीकरण करणाऱ्या अतिशय प्रभावी महिला आहेत. त्या सर्वांसाठीच अतिशय प्रेरणादायी असलेल्या थिंक ग्रेट या पुस्तकाच्या लेखिका आहेत! त्यांचे वरील अवतरण आपणा सर्वांच्याच विशेषतः तथाकथित स्मार्ट पुणेकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे!

नेहमीप्रमाणे सकाळ वृत्तपत्राने शहरातील मरणप्राय नद्यांविषयी बातमी छापल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी तसेच आपल्या स्थानिक संस्थांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली, त्याचवेळी थुंकण्यास प्रतिबंध करणारी मोहीम, किंबहुना थुंकण्यास प्रतिबंध करणारा दिवसही जाहीर करण्यात आला! हे खरंच अति होतंय, कारण आता जर का आपल्याला लोकांना रस्त्यावर किंवा सार्वजनीक ठिकाणी थुंकू नका सांगावे लागत असेल तर पुढे काय काय शिकवावे लागेल? इकडे-तिकडे लघवी करु नका किंवा प्रातर्विधींसाठी स्वतःच्या घरच्या शौचालयांचाच वापर करा, हे सुद्धा का रस्त्यांवर दाढी  करू नका ? यातली अतिशयोक्ती सोडली  तर हे शहर व इथल्या नागरिकांच्या दुटप्पीपणाचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. स्वतःच्या घरांच्या बाबतीत आपण इतके जागरुक असतो की कुठल्याही गृहनिर्माण सोसायटीला त्यांच्या इमारतीसमोर किंवा जवळपासही सार्वजनिक शौचालय किंवा कचरापेटी नको असते. मात्र हेच नागरिक तंबाखुच पान किंवा गुटखा खाऊन थुंकताना किंवा बियरचे कॅन रस्तावर इतस्ततः फेकताना अजिबात फिकीर करत नाहीत! माझ्या इमारतीमध्ये श्री. आनंद सोनटक्के नावाचे आयटी क्षेत्रात काम करणारे साधेसरळ गृहस्थ राहतात. दुर्दैवानं त्याचं घर पहिल्या मजल्यावर आहे, त्यांनी सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या नावे एक पत्र लिहीलं की, वरच्या फ्लॅटमधून रात्री कुणीतरी सिगरेटची थोटकं फेकतं, त्याचशिवाय सांडपाण्याच्या वाहिन्यांसाठी व हवा खेळती राहण्यासाठी असलेल्या डक्ट्स मध्ये लोक शँपूच्या रिकाम्या बाटल्या, दाढीची वापरेली ब्लेड यासारखा काहीबाही कचरा टाकत असतात! आमच्या इमारतीत तथाकथित उच्चभ्रू माणसं राहतात, मात्र येथीलच एका सदनिकाधारकाला त्याच्या शेजाऱ्यांना स्वच्छतेविषयी पत्र लिहावं लागतं, अस असताना आपण स्वतःला सुशिक्षित कसे म्हणवू शकतो? हेच नागरिक वृत्तपत्रांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या कचरापेट्यांविषयी जागरुक नागरिक या नावाखाली पत्र लिहीत असतात! व वॉट्स A^ पत्रीकारीतेसाठी फोटो पाठवीत असतात
दररोज सकाळी मनपाचा कचरा उचलून नेणारा ट्रक आमच्या सोसायटीत येतो व त्या ट्रकवर काम करणारा माणूस माझ्याकडे पाहून छान स्मित हास्य करतो, कचरा उपसणे हे खरंतर किती भयंकर काम आहे! दिवसभर प्रचंड दुर्गंधी येत असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर बसावे लागते, त्यामुळे त्यांना कोणताही आजार होण्याची शक्यता असते, आपल्यापैकी कितीजण हे करु शकतील व त्यानंतरही हसतमुख राहू शकतील, त्यामुळे या माणसाचं मला मनापासून कौतुक वाटतं! मी कोरडा आणि ओला कचरा स्वतः वेगळा करण्याचा व कचरा शक्य तितका व्यवस्थित झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो व तशाच सूचना कुटुंबातल्या इतर सदस्यांना तसंच आमच्या घरातल्या कामवाल्या बाईलाही दिल्या आहेत, मात्र तरीही सोसायटीच्या दारापाशी सगळा कचरा एकत्र होतोच व ट्रकवर काम करणाऱ्या बिचाऱ्या माणसाला हा कचरा उघड्या हाताने वेगळा करावा लागतो!

त्यानंतर मला आमच्या परिसरातील पदपथ स्वच्छ करणारा माणूस रोज दिसतो, या पदपथावर कुत्र्याची विष्ठा, गाईचे शेण, कचरा तसंच धुळीचा थर असतो त्यामुळे आपल्याला यावरुन पादत्राणे घाण न होता चालणे अशक्य असते. मात्र तरीही बिचारा सफाई कर्मचारी शांतपणे एखाद्या निर्जीव माणसाप्रमाणे जी काही साधने उपलब्ध असतील त्याने, कधीकधी उघड्या हातांनीही स्वच्छता करत असतो, त्याच्याकडे हातात घालायला रबरी हातमोजे नसतात (या दोघांसाठीही स्वतःच्या खर्चाने हातमोजे घेतले पाहिजेत ही आठवण मला तेव्हा होते)! माझ्या घरापासून पुढे काही मीटरवर ओळीने उपहारगृहे आहेत व त्यामुळे तिथे काही पानपट्ट्या व सिगरेटची दुकाने आहेत. इथे लोक सतत धूम्रपान करत असतात व तंबाखू खाऊन, पदपथांना फुकटात रंगवत असतात. मला असं वाटतं तंबाखू व पान खाण्याचे व्यसन या देशाला लागलेला एक मोठा शाप आहे. मला आठवतंय ह्यूएन त्सँग नावाच्या एका चिनी प्रवाशाने भारताचे प्रवासवर्णन शंभर एक वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते व त्यामध्ये त्याने लिहीले होते की भारतीय पुरुष कुठल्यातरी प्रकारची झाडाची पाने खातात व रक्त थुंकतात! मी हे वाचलं तेव्हा अगदी लहान होतो व त्सँगला भारताविषयी किती अत्यल्प माहिती होती म्हणून मला कीव आली. मात्र त्याचं म्हणणं खरं होतं कारण लोक जे करतात ते रक्तापेक्षाही वाईट असते, त्यामुळे परिसराचे सौंदर्य नष्ट होतेच मात्र ते विष खाऊन तुम्ही स्वतःच्या शरीराचेही नुकसान करता. आयुर्वेदामध्ये विशिष्ट प्रकारचे पान खाणे पचनासाठी व शरारीचे तापमान कमी करण्यासाठी चांगले असते असे म्हणतात. मात्र आयुर्वेदामध्ये काही तंबाखूचे पान खा किंवा खाऊन सगळीकडे थुंका असे सांगितलेले नाही!

आपल्या माननीय महापौरांनी अवैधपणे लावलेली मोठ मोठाली चित्रे/फलक किंवा जाहीरात फलक हटविण्यासाठी पीएमसी प्रशासनाला अंतिम मुदत दिली आहे त्यामुळे आता भरपूर मनोरंजन होणार आहे; मात्र प्रश्न जेव्हा राजकीय नेत्यांच्या फलकांचा येतो तेव्हा कायदेशीर नावाचा शब्द अस्तित्वात तरी आहे का असा प्रश्न मला पडतो! महापौरांचे स्वतःचे कार्यकर्तेही ते गंभीरपणे घेणार नाहीत, मात्र सामान्य माणूस म्हणून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की अवैध फलक हटविण्यासाठी तुम्हाला मुदत द्यायची काय गरज आहे. त्याचशिवाय एखादा निष्पाप माणूस या फलकांचा स्वच्छ पुणे मोहिमेशी काय संबंध आहे असा प्रश्न विचारु शकेल! मला असं वाटतं त्यासाठी आपण स्वच्छ व सुंदर शहराची व्याख्या समजून घेतली पाहिजे. तुम्ही शहराच्या कोणत्याही भागात जा तुम्हाला काय दिसतं सगळीकडे कचरापेट्या ओसंडून वाहत असतात, उरलेलं अन्न, बियरचे कॅन, सिगरेटची थोटकं असा काहीही कचरा इस्ततः फेकलेला असतो, पदपथ पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले असतात, सार्वजनिक शौचालयांना अतिशय दुर्गंधी येत असतो, गाईचे शेणही रस्त्यावरच पसरलेले असते! ही झाली जमीनीवरील परिस्थिती, तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर भाऊ, अण्णा, साहेब किंवा महाराज अशा नावांचे अत्यंत कुरुप चेहरे आकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून तुमच्याकडे पाहात असतात! मला नेहमी असं वाटतं की यातील काही चेहरे पोलीस ठाण्यात वाँटेडच्या यादीत अधिक चांगले शोभून दिसतील, मात्र त्यांना तिथे इतके चाहते मिळणार नाहीत! यासाठीच स्वच्छ शहर हे फलक किंवा भित्तीपत्रकरहित शहर असलं पाहिजे कारण अशा फलकांमुळे आपण आपले क्षितीज विद्रुप करतो!

मी ज्या अनेक देशांना भेट दिली आहे व विशेषतः सिंगापूर तसंच अमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याविषयी ते लोक अतिशय जागरुक आहेत. न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या परिसराला सर्वाधिक पर्यटक भेट देतात, तिथे किंवा समुद्रात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या किंवा कॅन फेकणाऱ्याला २५,००० अमेरिकन डॉलरचा दंड केला जाईल असं तिथे स्पष्ट शब्दात लिहीलेलं आहे! आपल्या चलनात सांगायचं तर १८ लाख रुपयांचा दंड केला जाईल, तुम्ही एवढ्या प्रचंड दंडाचा विचार करु शकता का, आपल्या देशात मृत्यूसाठी दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईपेक्षाही ही रक्कम अधिक आहे! माझी खात्री आहे की तिथे कुणी चुकूनही पाण्याची बाटली फेटण्याची हिंमत करणार नाही. पोलीस किंवा स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी किंवा अशा गुन्ह्यासाठी व्यक्तिला तुरुंगात टाकलण्यासाठी तैनात असतात! या पार्श्वभूमीवर माहिती अधिकारांतर्गत मला एक अर्ज करायचा मोह होतोय, ते म्हणजे पुणे शहरात गेल्या एका वर्षात रस्त्यावर थुंकणाऱ्या किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या किती जणांना दंड करण्यात आला? या गोष्टींच्या बाबतीत आपण इतके निर्ढावलेले आहोत की आपले शहर घाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे आपण विसरलो आहोत! आपली स्वच्छतेची व्याख्या आपल्या चार भिंतींपुरतीच मर्यादित आहे ज्याला आपण घर म्हणतो, आपल्या घराबाहेरच्या कोणत्याही कचऱ्याकडे आपण कानाडोळा करतो!

मला असे वाटते यावर दोन उपाय आहेत, एक म्हणजे लोकांना जागरुक करणे, केवळ वृत्तपत्रातील जाहिराती किंवा फलकांनी नाही तर रस्त्यावर मोर्चे काढून. यासाठी स्वयंसेवी संस्थांची, कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची, शाळकरी मुलांची, महाविद्यालयीन मुलांची मदत घ्या. रस्त्यावर ठिकठिकाणी असे मोर्चे निघाले पाहिजेत व नागरिकांना कचरा फेकून किंवा थुंकून शहराचा परिसर घाण करु नका असे आवाहन केले पाहिजेत्याचवेळी ज्या पक्षांच्या तथाकथित नेत्यांचे कमीत कमी फलक किंवा जाहिरात फलक असतील त्याच पक्षाच्या उमेदवारांना मत देण्याची आपण शपथ घेऊ, हा संदेश आपण सार्वजनिक पातळीवर सगळीकडे पोहोचवू व त्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपल्या राजकीय नेत्यांना केवळ एकाच गोष्टीची भीती वाटते ती म्हणजे निवडणूक. आपणही त्यांना निक्षून सांगू की आम्हालाही तुमचे व तुमच्या कार्यकर्त्यांचे चेहरे सतत जाहिरात फलकांमध्ये पाहायला आवडत नाहीत! प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकाला तिथल्या अवैध फलकांसाठी तसंच सार्वजनिक शौचालयांच्या वाईट परिस्थितीसाठी व त्याच्या किंवा तिच्या प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी जबाबदार मानलं पाहिजे! प्रभागात एखाद्या पदपथाचे किंवा सायकल मार्गाचे किंवा भुयारी मार्गाचे उद्घाटन असो, हेच सदस्य कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे नाव घेतले नाही तर लगेच हस्तक्षेप करतात कारण तो त्यांचा प्रभाग असल्याने त्यांचा ह्क्क असतो. मग त्यांच्या प्रभागात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींची जबाबदारी त्यांनी घ्यायला काय हरकत आहे? शहरातल्या सर्वोत्तम प्रभागाची स्पर्धा घ्या व अर्थसंकल्पामध्ये सर्वात स्वच्छ व नीटनेटक्या प्रभागासाठी अधिक तरतूद करा!

त्यानंतर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे प्रशासनाचा शहराविषयीचा दृष्टीकोन, स्वच्छता हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. प्रशासनाला एकतर अजिबात काळजी नाही किंवा त्यांना राजकीय पक्षांशी किंवा जनतेशी पंगा घ्यायचा नसतो. शहराच्या सुशोभीकरणाविषयी कुणाला चिंता आहे का याचा विचार करा! पोलीसांपासून ते प्रभाग अधिकाऱ्यांपर्यंत किंवा स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी घाण करताना कुणी दिसल्यास त्यांना थांबविण्याचा व दंड करण्याचा अधिकार द्या व त्यांना इतका प्रचंड दंड करा की कुणीही पुन्हा असे करायचा प्रयत्न करणार नाही! त्याचशिवाय जे लोक रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करतात त्यांना ते काम करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा व चांगला पगार द्या. रस्त्याच्या कडेला लावल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गाड्या तसेच पान/सिगरेटच्या दुकानांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक करा किंवा त्यांना भरमसाठ दंड आकारा व त्यांचे ग्राहक त्यानंतरही परिसर घाण करत राहिले तर ते दुकान बंद करा! त्यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जाणीव झाली पाहिजे की हे शहर स्वच्छ ठेवणे हा त्यांचा कर्तव्याचाच एक भाग आहे

आपल्याला थुंकण्यास प्रतिबंध करणारा दिवस साजरा करावा लागतो ही खरोखर शरमेची बाब आहे. नागरिकांनी तसंच स्वयंसेवी संस्थांनी शहरातल्या नद्या व रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात यासारखे दुर्दैव नाही शहराचे! आपल्यात काही स्वाभिमान उरला असेल तर कृती करण्याची हीच वेळ आहे. झटपट पावले उचलली नाहीत तर एक दिवस संपूर्ण शहर कचऱ्याचा व घाणीचा ढिगारा झाले असेल व आपले भविष्य नष्ट करण्यासाठी आपणच जबाबदार असू! मला एवढंच म्हणावसं वाटतं की खरी समस्या कचरा किंवा थुंकणे नाही तर आपला शहरप्रति असलेला घाणेरडा दृष्टीकोन आहे.


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




No comments:

Post a Comment