Sunday, 22 May 2016

माझे पंखवाले पाहुणे!पक्षी म्हणजे एक निसर्गाचा चमत्कार आहे कारण आपण अधिक चांगल्याप्रकारे, अधिक साधेपणाने कसे राहू शकतो हे ते आपल्याला दाखवुन देतात.”………… डग्लस कोपलँड

डग्लस कोपलँड हे कॅनडियन ग्रंथकार व कलाकार आहेत. त्यांच्या कांदबऱ्यांना रचना व दृश्य कला क्षेत्रातील मान्यताप्राप्त कलाकृतींची जोड असते, या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं होतं. डग्लस हे काल्पनीक कथाचे लेखक असले तरीही त्यांच्या वरील अवतरणात कोणतीही कल्पना नाही तर एका कलाकाराचे साधे सरळ निरीक्षण आहे. कोणत्याही कलेचा आधार साधेपणा असतो, म्हणूनच आपण जेव्हा कलेविषयी बोलतो तेव्हा पक्ष्यांशिवाय दुसरं चांगलं उदाहरण काय असू शकतं! एकप्रकारे पृथ्वीवरची प्रत्येक प्रजाती ही देव, येशू किंवा अल्ला नावाच्या कलाकाराने तयार केलेली कलाकृती आहे. मात्र या सर्व कलाकृतींमध्येही रुप व सौंदर्याच्या बाबतीत पक्षी काकणभर सरसच असतात! बहुतेक पक्षी निरीक्षक माझ्याशी याबाबतीत सहमत होतील! आजकाल सोशल मिडीयावर पक्षी निरीक्षणाविषयी भरपूर चर्चा होताना दिसते, त्याची फॅशनच आली आहे म्हणा ना! अनेक जणांना फॅशन हा शब्द कदाचित आवडणार नाही मात्र मी जेव्हा एफबीवरच्या किंवा वॉट्सऍपवरच्या बहुतेकवेळा फॉरवर्ड केलेल्या पोस्ट वाचतो किंवा चित्रे पाहतो तेव्हा मला हे जाणवते. त्यानंतर असेही लोक आहेत की जे स्वतःला पक्षीप्रेमी समजतात व उन्हाळा आहे म्हणून तुमच्या गच्चीत पक्षांसाठी वाडग्यात पाणी भरुन ठेवा वगैरेसारख्या पोस्ट टाकतात, अर्थात खरंच किती जण तसं करतात हा प्रश्नच आहे. हे सगळे फॉरवर्ड केलेले संदेशच असतात, फार क्वचित कुणीतरी घरी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये पक्षांसाठी काय केलं आहे हे टाकलेलं असतं! काही जण आपापल्या परीनं प्रयत्न करत सुद्धा असतील मात्र अशा लोकांची संख्या, पक्षांविषयी फक्त पोस्ट शेअर व पोस्ट करणाऱ्या विशेषतः शहरी लोकांच्या तुलनेत हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे!

ग्रामीण भागांमध्ये किंवा अगदी गावांमध्ये अजूनही बऱ्याच मोकळ्या जागा, शेते, माळराने तसेच पक्षांना जगण्यासाठी भरपूर झाडं आहेत; पुण्यासारख्या शहरांमध्येच ही समस्या अतिशय गंभीर आहे. झाडे तोडून त्याजागी इमारती बांधल्या जात आहेत, त्यामुळे पक्षांना अन्न उपलब्ध होण्याची ठिकाणेही कमी होत चालली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष्यासाठी संवर्धनाच्या प्रयत्नाचं स्वागतच केलं पाहिजे व आम्हीही यात आमचा खारीचा वाटा उचलला आहे. आम्ही जी घरं बांधतो तिथे अगदी नाविन्यपूर्ण म्हणता येणार नाही मात्र तरीही थोडा वेगळा प्रयत्न करत आहोत. आम्ही प्रत्येक सदनिकेला जोडून असलेल्या गच्चीत पक्षाचं घरटं, पाण्याचा तसंच धान्याचा वाडगा देतो. सगळ्या सदनिकाधारकांनी फक्त त्या वाडग्यांमध्ये पाणी व धान्य भरून ठेवायचं असतं तसंच घरट्यात थोडासा कोरडा चारा ठेवायचा असतो. घरटीही पक्षांचा आकार लक्षात घेऊनच तयार करण्यात आली आहेत, जे ती वापरु शकतील उदाहरणार्थ, बुलबुल किंवा चिमणी, या पक्षांच्या घरट्यांना लहान फीडर जोडली आहेत. आम्ही सदनिकाधारकांना सल्ला देतो की घरट्याच्या आसपास थोडीशी झाडी असू द्या म्हणजे पक्षांना तिथे वावरणे सहज वाटतं हा माझा अनुभव आहे. अनेक लोकांनी सुरुवातीला पक्षी घरट्यांचा वापर करत नसल्याची तक्रार केली, मात्र याचं खरं कारण म्हणजे सदनिकेला जोडुन असलेल्या गच्चीवर माणसांची ये-जा कमी असली पाहिजे. तुम्ही आपल्या गच्चीचा वापर थांबवू शकत नाही हे खरं असलं तरीही तुम्ही कमी आवाज करण्याचा, गच्चीचा अनावश्यक वापर टाळण्याचा किंवा वारंवार घरट्यात डोकावून न बघण्याचा प्रयत्न करू शकता म्हणजे पक्षांना मोकळेपणा मिळेल. त्याचप्रमाणे इमारत नवी असताना पक्षांना आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडासा वेळ लागतो, तसंच ईमारतीच्या आजूबाजूला कोणत्याप्रकारची झाडं आहेत यावरही बरंचसं अवलंबून असतं व ती नव्यानेच लावण्यात आली असतील तर त्याची पण सवय व्हावी लागते. मात्र थोड्या काळातच बहुतेक सदनिकाधारकांच्या गच्चीत पक्षांची ये-जा सुरु झाली आहे व त्यांनी त्यांचे अनुभव मला सांगितले; मला असं वाटतं की मी माझ्या ग्राहकांसाठी तसंच पक्षांसाठीही ही सर्वोत्तम गोष्ट करु शकलो आहोत!

मी माझ्या ऑफिसला लागून असलेल्या गच्चीमध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. ही गच्ची जेमतेम ६० चौरस फुटांची आहे, तिथे मी घरटं तयार केलं व पाण्याचा वाडगा ठेवू लागलो. माझ्या नशीबानं माझ्या इमारतीला लागून लहानसा ओढा आहे व थोडीफार झाडी आहेत. माझ्या पहिल्या मजल्यावरच्या गच्चीसमोर सोसायटीची मोकळी जागा आहे. या जागेत मी आंबा, फणस यासारखी झाडं लावली आहेत व एका मोठ्या शिरीषाची सावली सर्वत्र पसरलेली आहे. इमारतीच्या आजूबाजूला बुलबुल, मैना, चिमण्या आणि हो दयाळ यासारखे पक्षी यायचे. मी माझ्या गच्चीच्या रेलिंगच्याभोवती फुलझाडं लावली तसंच वेली लावल्या. तसंच तिथे पाणी व धान्यही ठेवायला लागलो व तिथल्या झाडांवर दोन घरटी टांगून ठेवली, त्यानंतरच लगेच पक्षी यायला सुरुवात झाली, विशेषतः उन्हाळ्यात दुपारी खुप पक्षी यायला लागले. आश्चर्य म्हणजे फक्त वर उल्लेख केलेले पक्षीच नाही तर जंगली कबुतरं, खवलेदार मैना, व्हाईट आय, कोकिळा तसंच खारुताई नियमितपणे येतात. देशी कबुतरं व कावळ्यांचा थोडा त्रास होतो, कारण त्यांचा आकार मोठा असतो व ते आक्रमक असतात त्यामुळे इतर पक्षांना हुसकावून लावतात. मात्र लवकरच माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे येणाऱ्या या पाहुण्यांच्या वेळा ठराविक आहेत, त्यांना कबुतरं व कावळे कधी येतात हे माहिती असतं व ते या वेळा टाळून येतात. माझ्याकडे येणाऱ्या या पंखवाल्या पाहुण्यांना पाहणं हा माझ्यासाठी विरंगुळा झाला आहे, एखाद्या जंगलात पाणवठ्यापाशी निवांतपणे बसल्यावर कसं वाटेल तसं मला वाटतं! यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकलो आजूबाजूला वाळलेलं गवत नसल्यामुळे चिमण्यांसारख्या पक्षांना घरट्यात गवताची गादी तयार करायला अडचण यायची. म्हणूनच मी घरट्यात थोडे कागदांचे कपटे, वाळलेली पानं व कापूस ठेवू लागलो व त्याचा खरोखर अतिशय फायदा झाला. आणखी एक निरीक्षण म्हणजे घरट्याची उंची अगदी कमी असेल तर पक्षी तिथे राहायला येत नाहीत कारण त्यांना तिथे राहाणं असुरक्षित वाटतं, म्हणूनच ते किमान ६ ते ७ फूट उंचीवर ठेवलं पाहिजे व त्याच्या आजूबाजूला वेली असतील तर उत्तम. आणखी एक निरीक्षण म्हणजे दयाळ किंवा बुलबुल यासारखे पक्षी धान्य खात नाहीत, ते स्वतः मारलेले किडे वगैरे खातात उदाहरणार्थ लहान कीटक, लहान पाली किंवा अळ्या वगैरे. हा अतिशय महत्वाचा पैलू आहे कारण या पक्षांना हवं असलेलं अन्न आजूबाजूला मिळालं नाही तर ते तुमच्या गच्चीत राहायला येणार नाहीत. कीटक, अळ्या, पाली यांना जगता यावं यासाठी आजूबाजूला खुली जागा, मोकळी जमीन व भरपूर झाडं झुडपं असली पाहिजेत, हे सगळ्या आर्किटेक्टनी तसंच विकासकांनी आपले प्रकल्प बांधतांना लक्षात ठेवलं पाहिजे!

मी ही सगळी तयारी केल्यानंतर आनंदाची बाब म्हणजे दोन्ही घरट्यांमध्ये लगेच चिमण्या राहायला आल्या. मी या घरट्यांचं नेहमी निरीक्षण करायचो, चिमण्या त्यांच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यातच घरट्यातली रचना बदलताना पाहिलं आहे, एकदा त्यांचा प्रजननाचा कालावधी संपल्यानंतर घरटं रिकामं होतं. एक दिवस अचानक मी एका नर दयाळ पक्षाला मोठ्या घरट्याचं निरीक्षण करताना पाहिलं. माझी उत्सुकता वाढली कारण मला आधी वाटायचं की विशेषतः लहान पक्षी इतर पक्षांच्या घरट्यांवर अतिक्रमण करत नाहीत, तसंच इतर पक्षी ज्यात राहून गेले आहेत त्या घरट्यात राहत नाहीत, पण असं काही नसतं हे मला कळलं ! त्यानंतर मादी दयाळ आली व ते दोघेही घरट्यापाशी  काही दिवस येत होते. त्यानंतर हळूहळू त्यांनी त्या घरट्यात थोडं गवत तसंच पानं ठेवली व नंतर काही दिवसांनी त्या दयाळ जोडप्यानं घरट्याचा पूर्णपणे ताबा घेतला. माझा असा अंदाज होता की मादी दयाळ गरोदर होती कारण ती हळूहळू घरट्यातून बाहेर पडेनाशी झाली. नर दयाळ दिवसभर अन्न गोळा करत असे व ते घरट्याच्या तोंडाशी नेऊन टाकत असे. मादी हे आयतं अन्न खात असल्याचं मला दिसत होतं. त्यानंतर हे दयाळ जोडपं एकमेकांशी विविध आवाज काढून बोलत असतांना पाहणं, त्यांचे विविध आवाज ऐकणं व आता ते पुढे काय करणार आहेत याचा अंदाज बांधणं हा माझ्यासाठी एक उत्तम विरंगुळा झाला. त्यानंतर बहुतेक मादीनं अंडी घातली असावीत कारण ती पुन्हा घरट्याबाहेर पडू लागली. अंड्यातून पक्षी बाहेर पडल्यानंतर दयाळ जोडप्याचं काम वाढलं, त्यांना सारख्या खेपा मारुन अन्न गोळा करावं लागायचं. शहरात जास्त अन्न गोळा करणं खरंच अडचणीचं आहे. त्यांनी धान्याच्या वाडग्याला एकदाही स्पर्श केला नाही व ते पिल्लांसाठी जे किडे व कीटक पकडून आणत असत त्यावरुन आजूबाजूला किती सजीव अस्तित्वात आहेत हे मला जाणवलं. त्यामध्ये लहान पाली, झुरळं, अळ्या किंवा अगदी मी कधीही न पाहिलेल्या कीटकांचाही समावेश होता!

त्यांची अन्न आणायची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती, आधी नर किंवा मादी जे कुणी अन्न आणत असत ते गच्चीच्या रेलिंगवर बसत त्यानंतर आजूबाजूला तपासून माझ्या खिडकीच्या ग्रिलवर बसत व तिथून घरट्यात जात! मला असं वाटतं ही त्यांची जंगलातली सवय असावी की कोणताही किडा किंवा कीटक थेट घरट्यात न्यायचा नाही कारण तिथे पिल्लं असतात, त्यांना हे करताना पाहायला खूप मजा यायची. त्यानंतर एखादा कावळा किंवा कबुतर पाण्याच्या वाडग्याजवळ आलं की हे दयाळ जोडपं मोठमोठ्यानी आवाज करुन त्यांना हुसकावून लावत असे. एकदा सकाळी मला दयाळ पक्षाचा मोठमोठ्यानी व सतत ओरडताना आवाज आला, म्हणून मी कुतुहलाने कायं झालं पाहू लागलो; त्याचं एक पिल्लू घरट्याखालच्या झुडुपात पडलं होतं व तिथून ओरडत होतं, दोन्ही दयाळ पक्षी हताश होऊन भोवती उड्या मारत होते. मी माझ्या ऑफीस बॉयला त्या पिल्लाला हळूच टॉवेलमध्ये गुंडाळून उचलायला व पुन्हा घरट्यात ठेवायला सांगितलं; सुदैवानी त्या पिल्लाला फारसं लागलं नव्हतं. लहानपणी माझा असा समज होता की आपण एखाद्या पक्षाच्या पिल्लाला हात लावला तर इतर पक्षी त्याला परत आपल्यात किंवा घरट्यात घेत नाहीत. माझा हा गैरसमज दूर झाला कारण दयाळ जोडप्यानं त्या पिल्लाला आनंदानं घरट्यात स्वीकारलं व त्याला लगेच खाऊ-पिऊ घालायला सुरुवात केली! आता ती पिल्लं मोठी झाली आहेत व आता काही दिवसातच ती उडू लागतील!

आता हा संपूर्ण प्रसंग वाचल्यावर एखाद्याला हसू येईल की त्यात काय मोठसं, दयाळ पक्षांचं दैनंदिन जीवन पाहण्यापेक्षा मला स्वतःचं काही महत्वाचं काम नाही का! मात्र मित्रांनो आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या या अशा गोष्टींमुळेच आयुष्य किती रंजक होतं. दयाळ पक्षांना पाहताना मला पक्षांच्या वर्तनाबद्दल कितीतरी गोष्टी समजल्या! त्याच प्रमाणे मला आनंद वाटतो की चिमण्यांसारखे पक्षी एकीकडे शहरात दुर्मिळ होत असताना मला दयाळासारख्या पक्षाचं जीवनचक्र पाहायला मिळालं. मी त्यांना वाढण्यासाठी जागा देऊ शकलो तसंच त्यांना हवं असलेलं स्वातंत्र्यही देऊ शकलो; म्हणूनच माझी इमारत मला परिपूर्ण वाटते! एक विकासक म्हणून केवळ काँक्रीटच्या चार भिंती उभारणं, त्या चार भिंतीमध्ये माणसांनी राहायला येणं व त्यातून पैसे कमावणं एवढ्यातच मला माझं यश वाटत नाही तर आपण आपल्या आजूबाजूला जैवविविधतेनं समृद्ध पर्यावरण निर्माण करु शकलो, त्यामध्ये दयाळासारख्या प्रत्येक प्रजातीसाठी जागा असेल व ते सगळे एकत्र राहू शकले व वाढू शकले तर त्यातच विकासकाचं खरं यश दडलेलं आहे! आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात डग्लसनं वरील अवतरणात उल्लेख केलेला साधेपणा विसरलो आहोत. आपण उंच व वेगानं उडायला शिकलो मात्र उडण्याचा, निळं आकाश, हिरवळ न्याहाळण्याचा आनंद हरवून बसलो. आपल्याला उंच व वेगानं कसं उडायचं हे माहिती आहे मात्र या प्रक्रियेमध्ये आकाशात उडण्यातली मजाच आपण विसरलो त्यामुळे विमानासारख्या या यंत्रात व तथाकथित माणसांमध्ये काय फरक राहिला! आपण जेव्हा दयाळासारख्या पक्षांसाठी जागा तयार करतो व त्यांचं संवर्धन करतो, त्यांचा वावर अनुभवतो तेव्हा आपण काय हरवलं आहे याची आपल्याला जाणीव होते, त्यानंतर आपण आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला लागतो! थोडासा वेळ काढून दयाळ पक्षी आपल्या पिल्लांना चारा भरवताना पाहण्यातला आनंद तुम्ही जोपर्यंत ते दृश्य स्वतः पाहात नाही तोपर्यंत तुम्हाला समजायचा नाही! मला त्या दयाळ पक्षांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात, कारण असे पाहुणे माझ्याकडे आल्यामुळे माझं आयुष्य अधिक मनोरंजक झालं!

दयाळ पक्षांच्या जीवनातले विविध क्षण मी छायाचित्रांमध्ये टिपले आहेत, खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला ती पाहता येतील


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment