Friday, 20 May 2016

जागतिक पर्यावरण दिन व हरित ईमारती !
हवा, पाणी, जंगल  आणि वन्यजीवन सुरक्षित ठेवणे म्हणजे खरंतर आपलेच भवितव्य सुरक्षित ठेवणेस्ट्युअर्ट उडॉल

स्ट्युअर्ट ली उडॉल हे अमेरिकी राजकीय नेते होते व नंतर फेडरल सरकारचे अधिकारी होते. अरिझोनातून ते तीनवेळा काँग्रेसवर निवडून आले होते, तसंच त्यांनी १९६१ ते १९६९ अंतर्गत सुरक्षा व न्याय मंत्री म्हणूनही काम केलं. त्यांना बांधकाम उद्योग किंवा रिअल इस्टेट उद्योग अगदी शिशु स्वरुपात होता तेव्हाच निसर्गपूरक इमारतींचं महत्व समजलेलं होतं! उद्या ५ जुन, जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर तर या विधानच महत्व फारच आहे आणि लक्षात घ्या उडॉल साहेबांना पर्यावरण रक्षणाचं महत्व तेव्हासुद्धा कळलं होत जेव्हा  जागतिक पर्यावरण दिन ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती कारण जागतिक पर्यावरण दिन अस्तित्वातच आला १९७२ मध्ये ! म्हणूनच अमेरिका संपूर्ण जगापेक्षा अनेक बाबतीत पुढे आहे, विचारांची अंमलबाजवणी करायच्या बाबतीत नाही तर किमान तो करण्याच्या बाबतीत तरी; यातला उपहासाचा भाग सोडून द्या कारण ते पुणेकरांच्या स्वभावातच आहे, मी मूळचा नागपुरकर असलो तरीही आता पुण्याचे काही गुणधर्म माझ्यातही आले आहेत! या पार्श्वभूमीवर आपल्या प्रिय मनपाने म्हणजेच पुणे महानगरपालिकेने "गृहा"  या हरित इमारत मानांकन यंत्रणा स्वीकारली आहे व त्याला मान्यता दिली आहे, मला असं वाटतं वरील अवतरण यासंदर्भात अतिशय योग्य आहे! "गृहा" म्हणजे काय व ती हरित इमारतींचं मानांकन कसं करेल याविषयी आपण पुढे लेखाच्या ओघात चर्चा करुच; या लेखाच्या शीर्षकामुळे हा विषय अधिक रोचक झाला आहे कारण "गृहा" मनपाच्या चमूने संयुक्तपणे आयोजित केलेल्या जागरुकता कार्यक्रमामध्ये मला अभियंता म्हणून बोलावण्यात आलं होतं व मला हिरव्या इमारती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील का? असा विषय देण्यात आला होता. व्यासपीठावर बोलण्यासाठी उभं राहिल्यानंतर मी सुरवातीला आपण नेमकं कोणत्या भूमिकेतून बोललं पाहिजे या विचाराने थोडासा गोंधळलो होतो. कारण मी पर्यावरणवादी म्हणून बोललो तर माझ्या सहकारी विकासकांना ते आवडणार नाही तसंच माझ्या मनपामधल्या मित्रांनाही आवडणार नाही, मी समजा मनपामधल्या अधिकाऱ्यांच्या बाजूनं बोललो तर पर्यावरणवादी दुखावले जातील, मी बांधकाम व्यावसायिक म्हणून बोललो तर या शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक होणं हा  एक मोठा अपराध मानला जातो, त्याचशिवाय तुम्ही काही हरित विषयांवर बोलायला लागलात तर मग तुमचं काही खरं नसतं! मात्र सुदैवाने माझी ओळख अभियंता म्हणून करुन देण्यात आल्याने माझं काम जरा सोपं झालं कारण तो माझा व्यवसाय आहे म्हणून मी त्याच्याशीच बांधील राहून विषय मांडावा एवढंच मला वाटलं!

हरित इमारती किंवा ज्याला इको हाउसिंग (पर्यावरणाला पूरक घरे) म्हणूनही ओळखतात तो आता खूप सुपरिचित शब्द आहे, मात्र मला शंका वाटते की खरोखरच किती जणांना त्याविषयी माहिती असतं. "गृहा" या संस्थेविषयी किंवा हरित इमारतींविषयी आणखी जाणून घेण्यापूर्वी आपल्याला अचानक आजूबाजूला हरित इमारती असण्याची गरज का वाटू लागली हे समजून घेतलं पाहिजे. या शहरामध्ये साधारणत: १९७० साली जेव्हा रिअल इस्टेटची सुरुवात झाली तेव्हा इमारतींचं नियोजन अधिक मोकळं ढाकळं असायचं व त्यांची उंची कमी असायची, फार फार तर त्या चार मजली असायच्या. पार्किंगची समस्या नव्हती व इमारतीच्या आजूबाजूला मोकळी जागा असायची. जाण्या-येण्याच्या रस्त्यावर शहाबादी फरशा घातलेल्या असायच्या त्या फरशांमध्ये जागा सोडलेली असायची त्यामुळे पावसाचं पाणी जमीनीत मुरायचं. बहुतेक ठिकाणी मुरमाचा कच्चा रस्ता असायचा त्यामुळे पावसाचं पाणी जमीनीत झिरपायचं, आजच्यासारखं इमारतींच्याभोवती काँक्रिटीकरण केलं जायचं नाही. इमारतीच्या बाह्य भागाला काचेची तावदानं किंवा ऍल्युकोबाँडचं आवरण नसायचं. पॅसेज व पायऱ्यांची जागाही खुली ठेवली जायची त्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश मिळायचा व हवा खेळती राहायची, त्यामुळे सामाईक जागेत कृत्रिम प्रकाश व वायुविजनाची गरजच नव्हती. बेसमेंटमध्ये पार्किंग हा प्रकारच नव्हता, तसंच लँडस्केप आर्किटेक्चरही प्रचलित नव्हतं. लोक केवळ आंबा, फणस, जांभुळ यासारखी मोठमोठी होणारी फळ फुलंझाडे लावायचे, त्यामुळे भरपूर सावली मिळायची तसंच पक्षांच्या विविध प्रजातींना राहण्यासाठी घर मिळायचं! सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसंख्या कमी होती व तेव्हाची सार्वजनिक वाहतूक शहरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी होती. तेव्हा रस्त्यांवर भरपूर सायकली होत्या त्यामुळे दुचाकी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या गंभीर नव्हती! लोकसंख्या कमी होती त्यामुळे शहराची पाण्याची गरजही कमी होती. ईमारत प्रकल्पातील रहिवासी भरपूर पाणी लागणाऱ्या जकुझी किंवा सोना बाथ किंवा तरण तलाव यासारख्या सुविधा मागत नसत; घरांमध्ये वॉशिंग मशिनसारखी यंत्रं नव्हती! विसाव्या शतकात प्रवेश करताना आपण वेगवेगळ्या प्रकारे वाळू, माती, पाणी यासारख्या नैसर्सिग संसाधनांचा अतिरेकी वापर करुन निसर्गाचा ऱ्हास केला, यानंतरच ग्लोबल वॉर्मिंग व अर्बन हीट आयलंड यासारखे शब्द अस्तित्वात आले, त्यामुळे आपणच केलेलं निसर्गाच नुकसान भरून काढण्याची गरज निर्माण झाली! इथेच पर्यावरणपूरक घरे किंवा हरित इमारती यासारखे शब्द अस्तित्वात आले. अर्थातच आपण पर्यावरणपूरक इमारत कशाला म्हणणार आहोत हे आपण नेमकेपणाने ठरवले पाहिजे, म्हणूनच हरित इमारतींचे गुणांकन करणारी यंत्रणा आवश्यक आहे जे काम "गृहा "करणार आहे !

आधी पर्यावरणपूरक घरे म्हणजे एका लोककथेमध्ये अंध व्यक्ती हत्तीचं वर्णन करतात त्याप्रमाणे होती, म्हणजेच ज्या माणसाने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला त्याला तो दोरखंडासारखा वाटला, ज्याने त्याच्या पायांना स्पर्श केला त्यांना तो खांबांसारखा वाटला, ज्याने सोंडेला स्पर्श केला त्यांनी त्याचे वर्णन केळीच्या झाडाच्या खोडाप्रमाणे असे केले व ज्यांनी त्याच्या कानाला स्पर्श केला त्यांनी त्याचे वर्णन सुपासारखे केले, मात्र कुणीही हत्तीचे संपूर्ण वर्णन करु शकले नाही कारण ते हत्तीला पूर्णपणे पाहू शकत नव्हते! म्हणूनच आपल्याला एखाद्या वस्तुचे वर्णन करण्यासाठी आपल्याला ती वस्तू पूर्णपणे समजून घेता आली पाहिजे. टेरी व नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचीच शाखा असलेली "गृहा"  ही मानांकन संस्था हरित इमारतींसाठी हे काम करते. ही हरीत गुणांकन यंत्रणा आहे जी सर्वप्रथम इमारत पर्यावरणपूरक होण्यासाठीचे विविध पैलू निश्चित करते व त्यानंतर ती किती परिणामकारक आहे हे मोजते! थोडक्यात सांगायचं झालं तर, कुठल्याही तंत्रज्ञानाचे यश निश्चित करण्यासाठी, सर्वप्रथम आपल्याला ते कोणत्यातरी मापावर मोजावे लागते, "गृहा" ही संस्था हरित इमारतींसाठी हेच काम करते. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या नळामुळे पाणी कमी वापरले जाते, तर त्याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेणे. त्यासाठी आपल्याला कुठल्याही कामासाठी किती पाणी आवश्यक आहे हे ठरवावे लागेल, उदाहरणार्थ हात धुणे. त्यामुळे प्रत्येक वेळी हात धुण्यासाठी त्या नळातून किती प्रवाह आला पाहिजे हे पाहावे लागते, त्यानंतर नळातून प्रति सेकंद किती पाणी वाहते हे तपासावे लागते, त्यानंतर एखाद्या नळामुळे पाणी कमी खर्च होते किंवा नाही हे आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या विशिष्ट इमारतीला वीज कमी लागते तेव्हा त्या इमारतीला किती योग्य वीज आवश्यक आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्यानंतर आपण त्या इमारतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेच्या उपकरणांचं विश्लेषण करु शकतो, त्यांचे कार्य मोजल्यानंतरच आपण त्या इमारतीमध्ये किती कमी वीज लागते याचा गुणांक काढू शकतो! म्हणूनच आपण जेव्हा एखादी इमारत हरित इमारत आहे असे म्हणतो तेव्हा तिचे हे सर्व पैलू अभ्यासल्यानंतरच आपण ते यशस्वी ठरले आहेत का याचा निर्णय घेऊ शकतो, यामध्येही जशा हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात तसेच ईमारतीच्या नैसर्गिक स्त्रोत वापराच्या यशाचे प्रमाणही वेगवेगळे असते! मी सामान्य माणसाला हरित इमारतींचे गुणांकन कसे असते हे समजावे म्हणून हा शब्द वापरतोय कारण ते केवळ काळे-पांढरे असे दाखवता येत नाही. एखादी इमारत हरित आहे किंवा नाही असे सरसकट सांगता येत नाही; इमारतीचे वेगवेगळ्या निकषांनुसार गुणांकन केले जाते व ती खरोखरच किती निसर्गपूरक आहे ठरवले जाते!

कोणत्याही इमारतीचे हरित गुणांकन करताना सहा ते सात निकष वापरले जातात, ज्यामध्ये वीजेचा कमीत कमी वापर, जल संवर्धन, हिरवळ व जैवविविधता, जमीनीचा वापर, बांधकाम साहित्य, सुरक्षितता व बांधकाम मजुरांचे कल्याण यासारख्या बाबींचा समावेश होतो. या सर्व निकषांचे आणखी विभागवार विभाजन केले जाते उदाहरणार्थ तंत्रज्ञानाचा वापर, व त्या विशिष्ट तंत्रज्ञानामुळे बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्षात वीजेची किती बचत किंवा संवर्धन होत आहे. म्हणजे जर बांधकामाच्या ठिकाणी झाडे असतील तर ती कापण्याची गरज आहे का किंवा ती झाडे तशीच ठेवून नियोजन करण्यात आले का हे पाहिले जाते. झाडे कापायची गरज असेल तर त्यांना इतरत्र हलविण्याचे किंवा त्यांची पुन्हा लागवड करण्याचे प्रयत्न करण्यात आले का? या सर्व बाबींसाठी वेगवेगळे गुण दिले जातात. त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी झाडेच नसतील तर एकूण गुणांमध्ये हे गुण वाढविलेही जात नाहीत किंवा वजाही केले जात नाहीत. प्रत्येक पैलुला असे ठराविक गुण दिलेले असतात व प्रत्येक प्रकल्पाला अशा प्रत्येक पैलुसाठी किती गुण मिळाले आहेत त्यानुसार इमारतीचे अंतिम गुणांकन ठरते. ते पन्नास गुणांपासून सुरु होते ज्याला एक तारा ही वर्गवारी देण्यात आली आहे व प्रकल्पाला नव्वदहून अधिक गुण मिळाले तर तो पंचतारांकित पातळीपर्यंत पोहोचतो. सर्व पैलुंमध्ये महत्वाचे म्हणजे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी किंवा भागधारकांना हरित इमारती व त्यांचे उद्दिष्ट याविषयी जागरुक करण्यासाठी विशेष गुण दिले जातात.

आजकाल नवीन इमारतीमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना ते ज्या घरात राहणार आहेत त्या घरांच्या हिरव्या पैलुविषयी जाणीव असते. मात्र जाणीव असणे ही पहिली पायरी आहे व तुम्ही ज्या घरात राहात आहात ते खरोखरच हरित आहेत का व त्याची पातळी किती आहे याचे सर्व बारीक सारिक तपशील प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत. म्हणूनच जोपर्यंत केवळ बांधकाम व्यावसायिक किंवा आर्किटेक्टच नाही तर सामान्य माणसालाही याविषयी माहिती झाली व तो देखील हरित घरांची मागणी करु लागल्यावरच व्यावसायिकदृष्ट्या हरित इमारती व्यवहार्य होतील! यासाठी विकासकांपासून ते मनपा अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक घटकाने हरित गुणांकन यंत्रणेचा प्रचार केला पाहिजे व आणखीही बरंच काही करता येईल. आपण लोकांना त्यांच्या घरांच्या पैलुबद्दल अनेक प्रकारे जागरुक करु शकतो, याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे मालमत्ता कराच्या देयकांवर त्याविषयीची घोषवाक्य छापणे, कारण शहरातल्या प्रत्येक मालमत्तेला हे देयक दिले जातेमनपाने पंचतारांकित गुणांकन असलेल्या प्रकल्पातल्या रहिवाशांना मालमत्ता करात जवळपास पंधरा टक्के सवलत दिली आहे तसेच अशा प्रकल्पांच्या विकासकांनाही मनपा विविध करात काही टक्के सवलत देते, मात्र त्यातून हरित इमारती बांधण्यासाठी होणारा खर्च भरून निघत नाही. त्यामुळेच विकासकांना तसंच ग्राहकांना नेमकी किती सवलत दिली जाऊ शकते याचा समतोल साधणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हरित इमारती हे सातत्यानं बदलणारं विज्ञान आहे व आपली सगळी धोरणं हरित केंद्रित असतील अशाप्रकारे तयार केली पाहिजेत. ती केवळ एफएसआय किंवा पार्किंग केंद्रित नसावीत, असं झालं तरंच आपल्याला अधिकाधिक हरित इमारती तयार करता येतील. त्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये एक  हरित  मानांकन विभाग सुरु केला जावा ज्यामध्ये संबंधित भागधारकांचे प्रतिनिधी असतील. हा विभाग सदर मानांकन राबविताना येणाऱ्या समस्यांची दखल घेईल व त्या सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवेल!

मनपाने "गृहासोबतच आयजीबीसी म्हणजेच इंडियन ग्रीन बिल्डिंग कोड या हरित इमारतींचे गुणांकन करणाऱ्या यंत्रणेशी हातमिळवणी केली आहे, म्हणूनच विकासक त्यांच्या हरित इमारतींचे गुणांकन करण्यासाठी दोन्हीपैकी कोणतीही एक यंत्रणा निवडू शकतात. त्याचवेळी विकसक व आर्किटेक्टनीही हरित इमारती हा पर्याय स्वीकारला पाहिजे. म्हणजेच नफा कमावण्यासोबतच या इमारतींचे गुणांकन करुन घेणे ही त्यांची नैतिक व सामाजिक जबाबदारीही आहे! तुम्ही अभियंते असाल, बांधकाम व्यावसायिक असाल, आर्किटेक्ट किंवा घराचे ग्राहकपण  असाल मात्र त्याआधी तुम्ही या शहराचे नागरिक आहात. आपण ज्या शहरात राहातो त्याविषयी आपल्यापैकी प्रत्येकाचे काहीतरी कर्तव्य आहे. वर्षानुवर्षे या शहराच्या निसर्गाचे कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान करण्यात आपणही हातभार लावला आहे, मग ते प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे. अधिकाधिक हरित इमारती बांधून आपण ते नुकसान कमी करायचा थोडाफार प्रयत्न करु शकतो! यातंच आपल्या भावीपिढीचं भविष्य आहे, नाहीतर आपण त्यांच्यासाठी केवळ काँक्रिटचं जंगल मागे ठेवू व जो इतिहास आपल्या नावापुढे  लिहीला जाईल त्यामुळे आपल्याला शरमेनी मान खाली घालावी लागेल!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सNo comments:

Post a Comment