Sunday 21 August 2016

ऑलिम्पिकस,पदक आणि खूप काही !






















मी खाली पडलो तेव्हा, मला असं वाटलं, ओह. क्षणभर, माझी  स्पर्धा संपली होती, माझं स्वप्न संपलं होतं; मात्र मी निकरानं प्रयत्न करू लागलो. मी माझी मोठी मुलगी ऱ्हिआना हिला वचन दिलं होतं, की मी तिला पदक आणून देईन. माझ्या मनात विचार येत होते, नाही, मी तिला नाराज करू शकत नाही... मो फराह.

खरं सांगायचं तर मी इथे (रिओ) फक्त सुवर्ण पदक जिंकण्यासाठीच आलो होतो! आमचा देश पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे व पहिल्या प्रयत्नातच आम्हाला सुवर्ण पदक मिळाले आहे व मला खूप छान वाटतंय; आमचा देश लहान व गरीब असेल मात्र तुमचा निर्धार ठाम असेल तर तुम्ही महाभयंकर युद्धानंतरही या क्रीडामहाकुंभामध्ये सहभागी होऊ शकता व पदकही जिंकू शकता”... मजिंदा केलमेंडी.
मो फराह या ब्रिटीश धावपटूने ऑलिम्पिकमध्ये १०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या. रिओ ऑलिम्पिकमध्ये धावपट्टीवर धावत असताना तो मध्येच  घसरून पडला त्यानंतरही त्याने परत  उभं राहत मोठा रोमहर्षक विजय मिळवला. अशाच भावना ज्युदोमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कोसोव्होच्या मजिंदाने व्यक्त केल्या. या शब्दांमधून कोणत्याही खेळाडूसाठी या क्रीडामहामेळ्यात पदक जिंकण्याचं काय महत्वं आहे हे समजतं! मी जेव्हा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेव्हा भारताने दोन पदके जिंकली होती व ती दोन्ही महिलांनी जिंकली होती. या दोन्ही महिलांनी आपापल्या परीने इतिहास रचला, साक्षी मलिक ही भारताला कुस्तीसाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी पहिली महिला ठरली व त्याच दिवशी सिंधूनं रौप्य पदक नक्की केलं व देशाला रौप्य पदक मिळवून देणारी पहिली महिला ठरली! या बॅडमिंटनपटूला रौप्यवर समाधान मानावं लागलं असलं तरी तिनं जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या खेळाडूला अखेरपर्यंत कडवी झुंज दिली, मात्र शेवटी ती सुवर्णपदकासाठीची लढत हरली! ती ज्या निकरानं लढली त्यानं सगळ्यांची मान अभिमानानं ताठ झाली, आकडेवारीनं सामन्याचा निकाल लागतो मात्र आपण घरी ज्या आठवणी घेऊन जातो त्यातून खरा विजेता ठरत असतो. माझ्यासारख्या १२० कोटी भारतीयांसाठी विशेषतः जे बॅडमिंटनचे केवळ चाहते नाहीत तर स्वतः खेळतात, ते सिंधू ज्याप्रकारे रिओमध्ये अंतिम सामन्यात खेळली त्याबद्दल नेहमी  तीचे ऋणी राहतील!
ऑलिम्पिक ही कोणत्याही प्रकारच्या खेळासाठी सर्वात महत्वाची क्रीडास्पर्धा आहे, मग मैदानी खेळ असोत किंवा पोहणे, अनेक खेळांविषयी आपल्याला केवळ ऑलिम्पिकमध्येच समजतं. प्रत्येक ऑलिम्पिकला विवादांचीही परंपरा आहे, मग क्रीडानगरीमधल्या सोयीसुविधा असोत किंवा यजमान देशावर आर्थिक परिणाम असोत किंवा सहभागी खेळाडुंचे डोपिंग घोटाळे असोत. हे सगळं असलं तरीही खेळाडुंच्या मनात, तसंच खेळाशी संबंधित प्रशिक्षक, भौतिक चिकित्सक, सहाय्यक कर्मचारी, स्वयंसेवक व जगभरातील चाहत्यांच्या मनात एका गोष्टीबद्दल अत्यंत आदर असतो, सगळ्यांना केवळ एकच ध्यास असतो, ते म्हणजे ऑलिम्पिक पदक! ग्रीकमध्येसायटियस, अल्टीयस, फोर्टियसम्हणजे, अधिक वेगाने, अधिक उत्तुंग अधिक सशक्त हे या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यामुळे आपल्याला प्रत्येकवेळी केवळ प्रतिस्पर्ध्यांहूनच नाही तर स्वतःहूनही अधिक चांगली कामगिरी करायची आहे याची जाणीव होते!
या विवादांमध्ये आपल्या देशाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट नेहमी होते ती म्हणजे, आपल्या चमूच्या अपयशाबाबत टीका! यावेळीही तसंच झालं कारण पहिले अकरा दिवस कोणतंही पदक मिळालं नाही व नेमबाज बिंद्रा व जिमनॅस्ट दीपा यांच्याशिवाय कुणाची फारशी चांगली कामगिरी झाली नाही. परिणामी, आपल्याकडे पेज३ तज्ञांपासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या खेळाडूंच्या पदक जिंकण्याच्या क्षमतेबाबत, अगदी रिओमध्ये जाण्याच्या त्यांच्या हेतूबाबतच शंका घ्यायला सुरुवात केली! अर्थात आपल्या खेळाडुंचे समर्थकही होते ज्यांनी श्रीमती पेज३ना खरमरित उत्तर दिलं. मात्र आपल्या खेळाडुंना झालंय तरी काय असं बऱ्याच जणांना वाटत होतं; कारण शंभराहून जास्त खेळाडू असलेल्या आपल्या पथकातून आपल्याला तोपर्यंत एकही पदक मिळालं नव्हतं? आता दोन मुलींनी पदक मिळविल्यामुळे टीकाकारांची तोंडं बंद झाली असली तरीही तेवढं पुरेसं आहे का हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्या देशामध्ये यशाचं कुणीही विश्लेषण करत नाही, मात्र अपयशावर टीका करायला हजारो जण असतात हे दुर्दैवी तथ्य आहे. तसंच विजयामध्ये मुलगा किंवा मुलगी असा फरक का असावा असा प्रश्न आहे मात्र आपल्या देशामध्ये जिथे मुलगी वाचवा असा संदेश द्यावा लागतो तिथे असं होणं स्वाभाविक आहे! आता खरी गरज आहे ती साक्षी व सिंधू यांच्या यशाचं विश्लेषण करून त्यांच्यासारखे आणखी खेळाडू घडवण्याची. आपण क्रिकेट वगळता इतर खेळांचा इतिहास पाहिल्यास आपण कधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही व ही चिंतेची बाब आहे. सिंधू व सायना जागतिक पातळीवर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत त्यांच्यापुढे काय? आपल्याकडे बॉक्सिंगमध्ये मेरी कोम आहे मात्र नंतर कोण? ब्रिंदाला नेमबाजीत सुवर्णपदक मिळालं होतं मात्र त्या क्षमतेचा आणखी कोण आहे? मी केवळ ऑलिम्पिकविषयीच बोलत नाही तर जागतिक पातळीवरील यशाचं प्रमाण काय आहे याचा विचार करतोय, जेथे वैयक्तिक कामगिरी विचारात घेतली जाते. वर्षानुवर्षे अशा स्पर्धांमध्ये इथिओपिया किंवा केनिया किंवा जमैकासारख्या लहान देशांमधून अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करतात, आपण मात्र थोडक्यावरच समाधान मानतो! मी काही अमेरिका, जर्मनी, इंग्लंड किंवा रशिया यासारख्या विकसित देशांशी तुलना करत नाही. अगदी चीननेही जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये उशीरा प्रवेश करून चमकदार कामगिरी केली आहे, आपणही मग केवळ एखाद्याच सिंधू किंवा सानिया किंवा सुशीलकुमारवर का समाधानी राहायचं, ते सुद्धा केवळ एका स्पर्धेपुरतेच चमकतात!
क्रिकेट दुर्दैवाने ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नाही मात्र आपली आणखी एका खेळावर मक्तेदारी होती तो म्हणजे हॉकी. आपल्याला या खेळात एकेकाळी सलग सात किंवा आठ सुवर्ण पदके मिळाली आहेत, अनेक वर्षं आपला या खेळात आपलं वर्चस्व होतं मात्र ते सुद्धा आता आपण पाश्चिमात्य देशांना देऊन टाकलंय, जे या खेळाची बाराखडी आपल्याकडूनच शिकलेत्यानंतर आपल्या अलिकडे कुस्तीत पदकं मिळू लागली होती मात्र निवडीवरून झालेला वादंग व त्यानंतर डोपिंगचा घोटाळा यामुळे तेही निसटलं. कुस्तीमध्ये आपल्याला नरसिंग यादवकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्याच्यावर चार वर्षांचे निर्बंध लागल्याने त्याची कारकीर्द संपल्यात जमा आहे. त्याचसोबत डोपिंग प्रतिबंधक प्राधिकरणानं भारतातील संपूर्ण यंत्रणेविषयीच गंभीर प्रश्न उपस्थित केले, की जेथे खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते तिथे कोणीही कसे प्रवेश करू शकते व प्रतिबंधित औषधे खेळाडूंच्या अन्नात घालू शकते! नाडा या आपल्या राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक प्राधिकरणाने अशाप्रकारचा दावा केला होता त्यामुळे आपल्या क्रीडा व्यवस्थेतील त्रुटीच उघड झाल्या! त्यानंतर गोपीचंद यांनी सिंधूची तयारी कशी करून घेतली व तिला पदक कसं मिळालं हे सगळ्यांना समजलं हे अतिशय चांगलं झालं, कारण ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी किती प्रयत्न व किती तयारी करावी लागते याची दखल सगळ्यांनी घेतली! आपण १२व्या दिवशी मिळालेल्या दोन पदकांचा उत्सव साजरा करतोय मात्र आपण पाठवलेल्या खेळाडुंच्या तुलनेत आपल्याला मिळालेल्या यशाचा अनुपात पाहिल्यास तो जेमतेम २% आहे असंच म्हणावं लागेल! यातली वाईट बाब म्हणजे ही कामगिरी गेल्या ऑलिम्पिकपेक्षाही वाईट आहे ज्यात आपल्याला सात पदकं मिळाली होती! म्हणजे हा उतरता आलेख आहे ज्याचा आपण गांभीर्यानं अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच आंतराराष्ट्रीय पातळीवरील खेळांमधला आपला सातत्याचा अभाव मला ठळकपणे नमूद करावसा वाटतो! अमेरिका किंवा जमैका किंवा आपला शेजारी चीन यांच्यातला आणि आपल्याला एक फरक आपल्याला मिटवावा लागेल, तो म्हणजे या देशांमध्ये खेळाडुंची पुढची फळी लगेच तयार होत असते. एक लीन डॅन सुवर्णपदक पटकावत असताना चेन लाँग पुढील वर्षी सुवर्ण मिळविण्यासाठी तयार होत असतो व त्यानंतर आणखी कुणीतरी कनिष्ट पातळीवरील खेळाडू ऑलिम्पिकसाठी तयारी करत असतो, अशी यंत्रणा तिथे विकसित करण्यात आली आहे. या तुलनेत आपल्याकडे एका खाशाबा जाधवांना कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळालं, त्यानंतर जवळपास तीस वर्षांनी आणखी वैयक्तिक पदक मिळालं. आपल्याकडे एक पीटी उषा ऍथलेटिक्समध्ये अंतिम फेरीत पोहोचली मात्र ललिता बाबरच्या रुपानं ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आपल्याला आणखी वीस वर्षं लागली! मला असं वाटतं ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी आपण आपल्या यंत्रणेतील या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. मी कुणाही खेळाडूच्या प्रयत्नांवर शंका घेत नाही जो या स्पर्धेसाठी पात्र ठरला, मात्र ऑलिम्पिक खेळातील ताण व दर्जा यासमोर टिकून राहणारे खेळाडू घडविण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेवर बोट ठेवतोय! जनुकीयदृष्ट्या विचार केला तर आपण वेस्टइंडियन किंवा जर्मन लोकांसारखे बळकट नाही, त्यामुळे त्यांना लढत द्यायची असेल तर आपण स्वतःला सशक्त केलं पाहिजे, हेच पहिलं आव्हान आहे!
यासाठी आपण आपल्या देशातली सामाजिक परिस्थिती कशी आहे याचा विचार केला पाहिजे, आपण आपल्या कुटुंबापासून किंवा पालकांपासून सुरुवात करू. मुलातील खेळाडू लहानपणीच ओळखणे व त्याला किंवा तिला उत्तम खेळाडू होण्याची संधी उपलब्ध करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे! याबाबतीत विचार केला तर किती पालकांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळाचा खेळाडू म्हणून कारकीर्द घडवू देणं परवडू शकतं? ज्यांना परवडू शकतं त्यातले किती पालक त्यांच्या मुलांना अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा एमबीए किंवा सरकारी सेवा यासारखे चाकोरीबद्ध मार्ग सोडून खेळात कारकिर्द करू देतात? आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे फारसे खेळाडू तयार न होण्यामागचं कारण हेच आहे, कारण आपल्या मुलांसाठी खेळ हे करिअर असू शकतं असा आपल्याला विश्वासच नसतो! तळमळ, गुणवत्ता व या सर्व गोष्टी मान्य आहेत मात्र उत्तम पगार, आयुष्यात स्थिरस्थावर होणं यापुढे या सर्वांना मूठमाती दिली जाते कारण खेळात हे सगळं मिळेलच याची खात्री नसते! उदाहरणार्थ दत्तू भोकनाळ किंवा गिता फोगुत किंवा ललिता बाबर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी त्यांची नावं कुणाला माहिती होती का व या स्पर्धांमधून कोणत्याही पदकांशिवाय आल्यानंतर त्यांची काय स्थिती असेल याची कुणी शाश्वती देऊ शकतं का? ज्यांनी पदक जिंकलं आहे त्यांचं सरकार कौतुक करेल, त्यांना पैसे व नोकरी देईल मान्य आहे मात्र त्यानंतर काय?
खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला तरूण मुलगा किंवा मुलगी ऑलिम्पिकमधल्या पदाची आशा कशी करणार? मुलं नऊ ते दहा वर्षांची असतानाच आपण त्यांच्यातली गुणवत्ता ओळखून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे म्हणजे आपण त्यांच्याकडून अठरा वर्षं किंवा त्यापुढे सुवर्ण पदकाची आशा करू शकतो. वाहन उद्योगामध्ये ज्याप्रमाणे उत्पादन साळखी असते तसं हे खेळाडूंचं उत्पादन सातत्यानं सुरु राहिलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या आपण क्रीडा अकादमी उभारल्या पाहिजेत व तिच्यातून दर्जेदार खेळाडू तयार होतील याची खात्री केली पाहिजे व त्यांना उज्जल भवितव्याचा भरवसा दिला पाहिजे! या संस्थांमधून चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिल्या जाव्यात तसंच तरुण खेळाडू विद्यार्थ्यांना काही दुखापत झाली तर विमा संरक्षणासारख्या सुविधाही दिल्या जाव्यात. खेळांच्या प्रशिक्षणासोबतच, क्रीडा संस्थांनी खेळाडूंना अंमली पदार्थांपासून लांब राहण्यासाठी व अतिशय तंदुरुस्त राहण्यासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे; कारण आधुनिक युगातील खेळाडुंचे इजा व डोपिंग सर्वात वाईट शत्रू आहेत! युसेन बोल्टला सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांमध्ये नऊ सुवर्ण पदकं मिळाली म्हणून नाही तर त्यासाठी तो पंधरा वर्षं अंमली पदार्थांपासून दूर व अतिशय तंदुरुस्त राहू शकला म्हणून तो अतिशय महान आहे! आपल्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञ बनविण्यासाठी आयआयटी आहेत, सर्वोत्तम व्यवस्थापक घडविण्यासाठी आयआयएम आहेत, सर्वोत्तम डॉक्टर घडविण्यासाठी एम्स आहेत, याचप्रकारे स्थापत्यशास्त्र, विज्ञान, वाणिज्य अशा सर्व विषयांमध्ये विद्यार्थी घडविणाऱ्या उत्तमोत्तम संस्था आहेत, मात्र दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या संस्था कुठे आहेत व असतील तर नेमकं काय चुकतंय व त्यांच्या कामगिरीचं विश्लेषण कोण करणार? समाजाचा तसंच खेळाडूंचा दृष्टिकोनही तसाच आहे त्यांचे स्वतःचे खिसे भरले आहेत (अर्थात यामध्ये क्रिकेटपटूंशिवाय इतरांची संख्या कमी आहे), मात्र ज्याप्रमाणे आयआयटीमधल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना आपल्या महाविद्यालयासाठी मोठं योगदान देते तसं या खेळाडूंचं काय योगदान आहे? ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे असे कितीजण राज्यपातळीवरील तरुण खेळाडूंना नियमितपणे वेळ देतात, मार्गदर्शन करतात त्यांना खेळाविषयीची आपली तळमळ सांगतात? सर्वात महत्वाचं म्हणजे, समाज म्हणून एकत्रितपणे आपण आपल्या देशात खेळासाठी काय करत आहोत? किती कॉर्पोरेट संस्थांनी क्रिकेटव्यतिरिक्त फारशा प्रसिद्ध नसलेल्या खेळाडूंना प्रायोजित केलं आहे? आपण व्यवसाय करतो त्यामुळे स्पर्धा जिंकू शकेल अशाच घोड्यावर आपण पैसे लावतो मात्र इतर घोड्यांना गाढव म्हणायचा आपल्याला काय अधिकार आहे? त्याचवेळी प्रत्येक खेळात आयपीएलसारख्या स्पर्धा आवश्यक आहेत ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला खेळायची संधी मिळेल तसेच पैसेही मिळतील. त्याचप्रमाणे चांगले प्रशिक्षक घडविणाऱ्या संस्थाही अतिशय आवश्यक आहेत, कारण चांगले खेळाडू घडविण्यासाठी आपल्याला उत्तम दर्जाचे प्रशिक्षक आवश्यक आहेत!
समाज माध्यमांमध्ये सध्या खेळाडू व त्यांच्या कामगिरीविषयीच्या सकारात्मक व नकारात्मक टीका-टिप्पण्यांना पूर आलाय, मात्र कुणी प्रत्यक्ष जीवनात स्वतःहून खेळासाठी किंवा खेळाडूंसाठी काही करायचा प्रयत्न केला आहे का? आपल्या देशाच्या ऑलिम्पिकमधल्या कामगिरीविषयी बोलायचा आपल्याला काय अधिकार आहे? मला असे वाटते रिओ ऑलिम्पिकमुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आपले माननीय पंतप्रधान आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा ठसा उमटवण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत व त्यासाठी खेळाचा अतिशय उत्तमप्रकारे वापर करण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी आशा करू. त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मन की बात मधून ऑलिम्पिक पदकाची आशा करता येईल, मात्र ते प्रत्यक्ष जिंकण्यासाठी केवळ इच्छा, तळमळ व गुणवत्ता असून भागणार नाही. आपल्याकडे सुसंघटित पायाभूत सुविधा व प्रतिभावान खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेची कमतरता आहे. आता, मला व्यक्तिशः ऑलिम्पिकमधून काय मिळालं? मला खेळाचा प्रत्येक क्षण अनुभवताना अतिशय मजा आली. मला अतिशय तंदुरुस्त राहण्याची व मी माझ्या कामामध्ये तसंच माझ्या परिसरासाठी सध्या जे करतोय त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं करायची प्रेरणा मिळाली. आणखी एक गोष्ट, मी कोणत्या तरी खेळाला माझ्या परीने शक्य ती सर्व मदत करेन व आपल्या देशाला केवळ ऑलिम्पिकमध्येच नाही तर प्रत्येक स्पर्धेत पदक मिळाले यासाठी योगदान देईन; ऑलिम्पिकमधून मी हाच धडा घेतला. आपल्यापैकी प्रत्येकानं असाच निर्धार केला तर आपल्याला सायटीयस, अल्टीयस व फोर्टीयसचामतितार्थ कळला असं म्हणता येईल!

संजय देशपांडे


Mobile:09822037109




No comments:

Post a Comment