Wednesday, 31 August 2016

माळढोकच्या अस्तित्वाचा लढा !

कुणीतरी अतिशय काळजी केल्याखेरीज काहीही बदलणार नाही, खरच नाही बदलणार ... द लॉरेक्स (या कार्टुनपटातून)

मला लॉरेक्ससारखे कॉर्टूनपट फार आवडतात व हे चित्रपट मनोरंजनासोबतच निसर्ग वाचवा यासारखा अतिशय उत्तम संदेशही देतात. मी जेव्हा डॉ. प्रमोद पाटलांना भेटलो तेव्हा मला लॉरेक्स या कार्टून पात्राचा वरील संवाद आठवला. मला असे वाटले की ते शब्द खरे झाले आहेत! केवळ एकोणतीस वयाचा हा तरुण डॉक्टर इतरांप्रमाणे आपल्या व्यवसायात जम बसविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी माळढोक नावाच्या पक्ष्याच्या संवर्धनाची काळजी करण्याचे काम करतोय! याचं इंग्रजी नाव आहे द ग्रेट इंडियन बस्टर्ड, अशा नावाचा एखादा पक्षी असेल हे कुणाच्या गावीही नाही, अर्थात या नावाशी साधर्म्य असलेली एक  इंग्रजी शिवी मात्र सगळ्यांना माहिती आहे! आता बरेच जण म्हणतील त्यात काय विशेष? आपल्याला आयुष्यात एखाद्या पक्षाच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा इतर महत्वाची कामे नाहीत का, कारण तो पक्षी काळा का गोरा हे माहिती नाही व तो कुठे राहतो याचीही माहिती नाही! त्याचवेळी अनेक जण कदाचित डॉ. प्रमोद यांच्या वेडेपणावर हसतील कारण त्यांनी त्यांची वैद्यकीय पदवी मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी वापरली पाहिजे जे माळरानावर राहणाऱ्या कुणा तपकिरी व पांढऱ्या रंगाच्या पक्षाला वाचविण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. अर्थात, डॉ. प्रमोद यांच्यासंदर्भात आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे पक्षांच्या संवर्धनासोबतच त्यांचे संशोधनकार्यही सुरु आहे जे आधुनिक जीवनात माणसासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या मधुमेहाविषयी आहे. डॉ. प्रमोद यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांच्याविषयी तुम्हाला सांगावसं वाटलं, म्हणूनच आधी ते अतिशय तळमळीनं ज्या माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत त्याविषयी जाणून घेऊ. द ग्रेट इंडियन बस्टार्ड या पक्ष्याला मराठीत माळढोक असं म्हणतात.

प्रगती, विकास व शहरीकरणाविषयीच्या आपल्या तथाकथित जिव्हाळ्यामुळे माळढोकसारख्या अजुन किती प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होणार आहेत देवालाच माहीत. नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या यादीमध्ये माळढोक पक्ष्याचं नाव अग्रस्थानी आहे. तपकिरी व पांढरट करड्या रंगाचा आकारानं बराच मोठा माळढोक  पक्षी फक्त भारतातच आढळतो व आता जवळपास असे दोनशे ऐंशी पक्षीच शिल्लक राहीले आहेत. यात आणखी दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या तथाकथित वन्यप्रेमी महाराष्ट्र राज्यात फक्त पंधरा माळढोक पक्षी उरले आहेत. यातले काही नागपूरजवळ वरोरा येथे आहेत तर काही सोलापूरजवळ नानज येथे आहेत. कधीकाही हे पक्षी माळरान असलेल्या ठिकाणी सर्वत्र दिसायचे  पण आता भारतातल्या केवळ काही पट्ट्यांमध्ये ते अखेरचा श्वास घेताहेत. या एका पक्ष्यासाठी देशभरात जवळपास आठ अभयारण्ये आहेत मात्र त्यापैकी केवळ चार ते पाच अभयारण्यांमध्येच त्याचे अस्तित्व उरले आहे.

आता माळढोकचं काय वैशिष्ट्य आहे असे प्रश्न बरेचजण विचारतील, कारण आपल्या देशात पक्षांच्या हजारो प्रजाती आहेत. त्यातले अनेक पक्षी माळढोकपेक्षाही दिसायला सुंदर आणि आकर्षक आहेत. माळढोकपेक्षाही सुंदर व दुर्मिळ पक्षी असले तरीही माळढोकचं निवासस्थान हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. या पक्ष्यांना साधं गवत असलेलं खुलं माळरान हवं असतं जिथे फारशी झाडी नसते म्हणूनच त्यापैकी बरेच पक्षी राजस्थानात पाकिस्तानच्या सीमेला लागू असलेल्या जैसलमेरसारख्या रखरखीत भागात पण टिकून आहेत. या पक्ष्यांना शुष्क गवत असलेल्या माळरानासोबतच थोडासा एकांत हवा असतो जो आपण त्यांना देत नाही. माळढोक नामशेष होत चालले आहेत हे माणूस आपल्या भोवतालच्या पशू-पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानावर अतिक्रमण करत असल्याचच एक  लक्षण आहे! आपण आपल्या भोवताली असलेल्या सर्व  सजीवांच्या प्रजातींना त्यांच्या गरजा फार काही मोठ्या नसतानाही, किती वेगाने नामशेष करत आहोत याचा हा एक ईशाराच आहे.  पूर्वी प्रत्येक गावाबाहेर किंवा शहराबाहेर गवताळ झुडपी माळरानं दिसायची; त्यावर माळढोकशिवाय ससा, मुंगूस,तरस,रानमांजर यासारखे प्राणीही दिसायचे. मात्र आता माळढोकसोबतच हे प्राणीही हळूहळू नामशेष होत चालले आहेत व त्याचं मुख्य मुख्य कारण आहे माणूस! माळढोक पक्षी प्रामुख्याने जमीनीवर राहतो व उघड्यावर अंडी देतो त्यामुळे त्याचे साप, कोल्हा, पाली असे बरेच शत्रू असतात. ही अंडी एखाद्या दगडासारखी असतात व तपकिरी खडकाळ पार्श्वभूमीत सहज लपून जातात. मात्र या नैसर्गिक शत्रूंशिवाय माणसाच्या रुपातल्या शत्रूपासून माळढोकला  वाचवणं अवघड आहे. आपण माळढोकची खाण्यासाठी शिकार करतो त्याचशिवाय इतर कारणांनीही ही प्रजाती नामशेष होत चालली आहे. सुरुवातीला आपण त्यांच्या घरावर शेकडो कारणांसाठी अतिक्रमण केले, रस्ते बांधले, कालवे खणले, घराच्या बांधकामांसाठी माळरानाचे भूखंड पाडले, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या मारल्या ज्यामुळे माळढोकच नाही तर इतरही अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. आपली जनावरं माळढोकांचे निवासस्थान असलेल्या माळरानावर तसंच त्यांना एकांत मिळणाऱ्या जागी चरतात, जमीनीवर घातलेल्या त्यांच्या अंड्यांचे नुकसान करतात. यात महत्वाचे म्हणजे, माळढोकाची मादी वर्षातून केवळ एकदाच गरोदर राहू शकतो व एकावेळी एकच अंडे देऊ शकते, यामुळे हा पक्षी नामशेष होण्याची अधिक भीती आहे! आपण माळढोकासाठी झुडपी गवताच्या माळरानांचं संवर्धन करू शकत नसू तर आपण हिरव्यागार जंगलांचं व त्यात राहणाऱ्या वाघांचं संवर्धन कसे करणार आहोत?
 या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद यांच्यासारखी माणसं माळढोकाचं रक्षण करताहेत, काँक्रिटच्या जंगलात पक्षी टिकून राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत! ते माळढोक पक्ष्याचं निवासस्थान असलेल्या भागाभोवतीच्या गावांमध्ये जातात व गावकऱ्यांना या पक्ष्याचं महत्व समजावून सांगतात. ते या भागातल्या शाळकरी मुलांना भेटतात व त्यांची माळढोकशी मैत्री व्हावी यासाठी प्रयत्न करतात. ते त्यांना पक्ष्यांवर व त्यांच्या शत्रूंवर विशेषतः शिकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगतात. ते वनविभागासोबत काम करतात व त्यांच्यापरीने जी काही मदत करता येईल ती करतात. दुर्बिणींपासून ते जॅकेटपर्यंत मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देतात तसंच त्यांना या पक्ष्यांच्या निवासस्थानाचं संवर्धन करणं कसं आवश्यक आहे व माळढोक जगावा यासाठी काय काय करता येईल याची जाणीव करून देतात. ते माध्यमांमध्ये लेख लिहीतात व लोकांना पक्षांबाबतची त्यांची काय जबाबदारी आहे याची जाणीव करून देतात. ते शाळा/कॉलेजातील मुलांना पक्षांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी थोडा वेळ द्यायला सांगतात. आपण माळढोक पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवून जगवू शकत नाही तर आपण त्यांना मुक्त वातावरणात जगवलं पाहिजे. म्हणजेच भोवतालची गवताळ झुडपी माळरानं आपण टिकवून ठेवली पाहिजेत, तरच आपण वर नमूद केलेल्या काही प्रजाती टिकून राहतील.

 भारतातल्या सहा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे जिथे माळढोक अजूनही दिसतात. पुण्यापासून २०० किलोमीटरवर उत्तर सोलापूरजवळ नानज येथे माळढोक अभयारण्य आहे. हे १९७९ साली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले, म्हणजे इथे माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनाला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. मात्र याच्या हद्दीपासून ते सीमेच्या रक्षणापर्यंत सर्वच बाबतीत वाद आहेत. इथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत ज्या बिचाऱ्या पक्षांना उडताना दिसत नाहीत व या तारांना धडकून त्यांचा मृत्यू होतो. या अभयारण्यातून रस्ते जातात, तसेच कालवेही आहेत. सतत काहीना काही खोदकाम सुरु असतं त्यामुळे कुरणांची हानी होते व जनावरांना चरताही येत नाही तसंच या भागात माणसांची वर्दळ असते! परिणामी हा भाग अभयारण्य म्हणून घोषित असूनही इथे केवळ तीन माळढोक आहेत, ते सुद्धा क्वचितच दिसतात! कधीकधी मला खरंच प्रश्न पडतो की वन्यजीवन संवर्धनाच्या बाबतीत माणूस म्हणून आपली जबाबदारी आपल्याला समजली आहे का. आपल्याकडे सगळ्याप्रकारची क्षमता आहे यंत्रसामग्री आहे, पैसा आहे, मनुष्यबळ आहे, धोरणे तयार करण्यासाठी सत्ता आहे, तरीही आपण माळढोकसारख्या पक्षांना जगण्याचा व आनंदाने विहार करण्याचा हक्क देऊ शकत नाही! राजस्थान व महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे, मात्र तरीही राजस्थानात माळढोक पक्ष्यांची संख्या जास्त असल्याने तिथून अंडी महाराष्ट्रात आणून ती उबवून इथे पक्ष्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही. लक्षात ठेवा केवळ एखाद्या भागाला अभयारण्य म्हणून घोषित केल्यामुळे एखाद्या प्रजातीची संख्या वाढणार नाही. आपल्याकडे माळढोक पक्ष्याचं जेमतेम एकच जोडपं उरलं असेल व ते वर्षातून केवळ एकच अंडं घालू शकत असेल तर त्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा आपण कशी करू शकू? म्हणूनच आपल्या शासनकर्त्यांनी केवळ लोकप्रिय घोषणा न करता काहीतरी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

 अशा वेळी डॉ. प्रमोद यांच्या प्रयत्नांचा व समर्पणाचा आदर्श केवळ सरकारनेच नाही तर सर्वांनीच घेण्यासारखा आहे. कारण इतर लोक केवळ समाज माध्यमांवर माळढोक व इतर प्रजातींना वाचविण्यात सरकार कसं अपयशी ठरतंय याविषयी टीका करतात व आपलं काम संपलं आहे असं त्यांना वाटतं! जेव्हा आपल्याला काहीतरी करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे कारणं ठरलेली असतात, आपल्याला आपली नोकरी असते, आपला व्यवसाय असतो, मग एक नेहमीचा प्रश्न विचारला जातो की सरकार काय करतंय? डॉ. पाटलांनी मात्र वैद्यकीय क्षेत्रात असूनही स्वतःहून ही जबाबदारी घेतली आहे व पैसे कमावण्याचा मागे न लागता त्यांच्या अभ्यासाचा भाग नसलेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी स्वतःचा वेळ देत आहेत. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी करायला सुरुवात करू शकतो, आणि खरंतर आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे. तुम्ही डॉ. पाटलांसारख्या माळढोक पक्ष्याचे संवर्धन करणाऱ्या माणसांना आर्थिक मदत देऊ शकता, तुम्ही माळढोक अभयारण्यांना भेट देऊ शकता व तिथे काम करणाऱ्या वन कर्मचारी किंवा गावकऱ्यांसारख्या माणसांना मदत करू शकता, तुम्ही समाजमाध्यमांवर लेख लिहून सरकारला किंवा तुमच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तिला माळढोक जगावेत व त्यांचं निवासस्थान टिकून राहावं यासाठी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊ शकता, अशा कितीतरी गोष्टी आहेत! भारताची लोकसंख्या एकशेवीस कोटींहून अधिक आहे, विचार करा डॉ. प्रमोद यांच्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाने आजूबाजूच्या केवळ एका प्रजातीचे संवर्धन करायचे ठरवले व त्यासाठी प्रयत्न केले तर काय होईल! हा विचार म्हणजे दिवास्वप्न आहे असं तुम्ही म्हणाल, मात्र आपण अशी स्वप्न पाहिली नाहीत व माळढोक जगावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले नाहीत तर बिचारे माळढोक ही अस्तित्वाची लढाई हरतील व नामशेष होतील. अशाप्रकारे एक एक प्रजाती नष्ट होत राहिल्या तर पृथ्वीवर फक्त काँक्रिटच्या जंगलांमध्ये राहणारी मानवी शरीरंच उरतील, मग आपल्याला कोण    वाचवेल?


संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स
No comments:

Post a Comment