Friday, 23 September 2016

वास्तुविशारद आणि वास्तु!

"तुम्ही फक्त इमारतीचं बाह्य सौंदर्य पाहू नका; ईमारतीच्या पायाचं बांधकाम किती मजबूत आहे यावरूनच काळाच्या ओघात ईमारतीची खरी परीक्षा घेतली जाईल"... डेव्हिड ऍलन को.

या अमेरिकी गायकाच्या अतिशय समर्पक शब्दांनी, मी सिंहगड वास्तुविशारद महाविद्यालयात माझ्या भाषणाला सुरुवात केली. निमित्त होतं बांधकाम तंत्रज्ञान कार्यशाळेचं व बहुतेक विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी होते. मला जेव्हा माझी मैत्रीण व तिथे काम करणारी प्राध्यापिका शिल्पा पांडे हिचं आमंत्रण मिळालं, मी एक अभियंता या भावी वास्तुविशारदांना काय सांगणार आहे असा विचार एक क्षणभर मनात आला. मी अनेकवेळा स्थापत्य अभियांत्रीकी विद्यार्थ्यांसमोर नियोजनामध्ये पर्यावरणाच्या घटकांचा कसा विचार करायचा याविषयी बोलतो, मात्र ते बहुतेक वेळा शेवटच्या वर्षातील विद्यार्थी असतात. मी कधीही वास्तुविशारदच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसमोर बोललो नव्हतो ज्यांचे अजून रचना किंवा नियोजन हे विषय शिकून झालेले नसतात. तरीही मला या वयाच्या मुलांशी बोलायला आवडतं. स्वतःचं डोकं तरतरित ठेवायची ती एक उत्तम संधी असते असं मला वाटतं कारण त्यांच्याशी बोलताना तुम्हाला त्यांच्या एक पाऊल पुढे राहावं लागतं व त्यांच्याइतकीच नात्याने ताजा विचार करावा लागतो! त्यामुळे मला पूर्ण कल्पना होती की मला फार तांत्रिक बोलायचं नाही किंवा अभ्यासक्रमाच्या रचनेविषयी बोलायचं नाही. मला त्यांना महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यावर भविष्यात वास्तुविशारद म्हणून काम करताना कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल, व कोणत्याही बांधकामात वास्तुविशारदाची भूमिका कशी महत्वाची असते हे समजून द्यायचं होतं. त्याचवेळी मला महाविद्यालयाने घेतलेल्या पुढाकाराचंही कौतुक वाटलं कारण ते विद्यार्थ्यांना बांधकामाच्या नव्या तंत्रांची तोंडओळख करून देत होते. इमारत म्हणजे एक नाणं असं मानलं तर वास्तुविशारद व अभियंता या नाण्याच्या दोन बाजू असतात! वास्तुविशारद फक्त कागदावर इमारतीचा आराखडा तयार करण्यात समाधान मानतो व त्या आराखड्यातून प्रत्यक्षात इमारत कशी उभी राहते याचा विचार तो क्वचितच करतो. त्याचवेळी अभियंताही त्याला वास्तुविशारदाकडून मिळालेल्या आराखड्याचे डोळे झाकून तंतोतंत पालन करतो, बांधकामाच्या नियोजनात तो स्वतःचं डोकं घालत नाही. या पार्श्वभूमीवर वास्तुविशारदांना इमारत कशी बांधली जाणार आहे याचं ज्ञान सुरुवातीलाच देणे हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे व अर्थातच मला त्यांच्या भविष्यातल्या कारकिर्दीसाठी याचे महत्व त्यांना समजून सांगायचे होते.

म्हणूनच मी असे एक अवतरण निवडले जे बांधकामाच्या केवळ सौंदर्यापेक्षा त्याच्या पायाचे महत्व अधोरेखित करते. मी सुरुवातीलाच मान्य केलं की मी एका क्षणात हे आमंत्रण स्वीकारलं कारण मला वास्तुविशारदांसमोर बोलायची संधी मिळणार होती, एका अभियंत्याला वास्तुविशारदाला बोलायची संधी क्वचितच मिळते व मला ही संधी नक्कीच दवडायची नव्हती. कारण प्रत्यक्ष काम करताना वास्तुविशारदाचाच वरचष्मा असतो ज्याच्या सूचनांचे पालन अभियंत्याला करावे लागते. माझ्या बोलण्याने पिकलेला हशा शांत झाल्यावर, मी त्यांना जगातल्या काही अत्याधुनिक प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे दाखवली. यामागे दोन हेतू होते. तरुण श्रोते असतील तर त्यांचं लक्ष्य तुम्ही काय बोलताय याकडे राहावं यासाठी छायाचित्रे अतिशय महत्वाची कामगिरी बजावतात, त्याचप्रमाणे छायाचित्रांची जोड असल्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ते त्यांना चटकन समजतं. म्हणूनच मी त्यांना क्वालालंपूरमधला पेट्रोनाचा दुहेरी टॉवर दाखवला, स्पेनमधलं गुगनहाएम दाखवलं, दुबईतल्या बुर्ल खलिफा व बुर्ज अल् अरब या इमारतींची तसंच दिल्लीतल्या लोटस टेंपलची छायाचित्रे दाखवली. या जगातल्या अत्याधुनिक इमारती मानल्या जातात, आता ही छायाचित्रं पाहून आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण तुम्ही गुगल करून अशी हजारो छायाचित्रे मिळवू शकता. मात्र लक्षात घ्या तुम्ही या इमारतींविषयी अधिक माहिती गुगल करता तेव्हा सर्वप्रथम त्याच्या वास्तुविशारदाचे नाव दिलेले असते. सिझर पेली याने पेट्रोनाज टॉवरची रचना केली, फ्रँक घेरी यांनी गुगनहाएमची कल्पना केली, ऍड्रेन स्मिथ यांनी जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलिफा या इमारतीचं स्वप्न पाहिलं व ते साकार केलं, टॉम राईट यांनी बुर्ज अरबच्या रुपानं जगातलं सर्वात उंच हॉटेल रेखाटलं व फरीबोर्झ साबा यांनी दिल्लीमधल्या लोटस टेंपलद्वारे भारताला अभिमान वाटेल अशी रचना दिली! तुम्ही गुगलवर शोध घेताना तुम्हाला जाणवेल की मानवी सृजनशीलतेचा विकास डौलाने मिरविणाऱ्या या इमारतींच्या बाबतीत सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते वास्तुविशारदाचं! वास्तुविशारद व ही इमारत बांधण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकामध्ये हाच नेमका फरक आहे. इतर जण त्या निर्मितीचा महत्वाचा घटक असतीलही मात्र केवळ कुणीतरी एकच व्यक्ती ते स्वप्न पाहते व कागदावर प्रत्यक्ष उतरवते म्हणजे इतरांनाही ते पाहता येतं आणि ती व्यक्ती म्हणजे ईमारतीचा वास्तुविशारद असतो
इमारत बांधण्यासाठी अभियंता लागतोच हे मान्य असलं तरीही एका व्यक्तिने त्या इमारतीची कल्पना करावी लागते व म्हणूनच वास्तुविशारद हे अतिशय महत्वाचे असतात! म्हणूनच एखादी इमारत वास्तुविशारदाच्या नावाने ओळखली जाते व अभियंत्याच्या नावाने ओळखली जात नाही. वास्तुविशारद हा इमारतीचा निर्माता व अभियंता ही निर्मिती प्रत्यक्ष साकार करणारा असतो. कोणतीही इमारत नाण्यासारखी असते व अभियंता व वास्तुविशारद या नाण्याच्या दोन बाजू आहेत असा विचार करा, म्हणूनच कोणतेही नाणे त्याच्या दोन्ही बाजू असल्याशिवाय पूर्ण होत नाही. एक वास्तुविशारद म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जे अस्तित्वात नाही त्याची कल्पना करणे व निर्मिती करणे ही एक कला आहे म्हणून वास्तुविशारद हा तुमच्यात असला पाहिजे. मी त्यांना सांगितले की अभियांत्रिकी हे विज्ञान आहे व ज्याचं डोकं चांगलं आहे तो कुणीही ते शिकू शकतो कारण शेवटी तो सगळा सूत्रांचा खेळ असतो. मात्र या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कुणीही वास्तुविशारद बनविणार नाही, तर तुमचे प्राध्यापक तुम्हाला वास्तुविशारद कसे व्हायचे याचा केवळ मार्ग दाखवू शकतील, ज्यावरून तुम्हाला मार्गक्रमण करावे लागेल. मात्र त्याचवेळी वास्तुविशारदाने लक्षात ठेवले पाहिजे की त्याने किंवा तिने ज्या स्वरुपाचा विचार केला आहे त्याला अभियांत्रिकीची सूत्रे व सर्व भौतिक ज्ञानाच्या मर्यादा असतात. म्हणूनच त्यांनी अभियांत्रिकीची तंत्रे ज्यांना आपण बांधकामाच्या पद्धती म्हणतो ती शिकून घेतली तर नक्कीच मदत होईल. वास्तुविशारदाला त्याच्या मर्यादा माहिती असतील तसंच त्याची निर्मिती कशी साकार होणार आहे हे सुद्धा माहिती असेल तर याहून अधिक चांगले काय असू शकते? किंबहुना बांधकाम उद्योग वर्षानुवर्षे विशिष्ट तंत्रज्ञानाच्या विळख्यात अडकून पडला होता, याचे कारण म्हणजे विशेषतः आपल्या देशात या क्षेत्रात संशोधन व विकासाकडे फारसे कधीच लक्ष देण्यात आले नाही. म्हणूनच एखाद्या वास्तुविशारदाकडे काँक्रिट व पोलादापेक्षा इमारत बांधण्यासाठी काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील, तर ते उद्योगासाठी सर्वोत्तम योगदान होऊ शकते. वास्तुविशारदाला स्थानिक भूगोल, भोवताली उपलब्ध असलेले बांधकामाचे साहित्य माहिती असणे आवश्यक आहे. राजस्थानात वालुकाश्म सहज उपलब्ध असताना तिथे काँक्रिटचे बांधकाम केले तर काय होईल किंवा कोकणात लाल जांभा भरपूर मिळतो अशा वेळी तिथे संगमरवर वापरला तर काय होईल; ती इमारत भयंकर दिसेल व वातावरणाशी विजोड वाटेल. मला व्यक्तिशः असं वाटतं की सर्वोत्तम इमारत इतर इमारतींपेक्षा वेगळीच दिसली पाहिजे असं नाही तर ती सभोवतालच्या परिसरात मिसळून गेली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक ठिकाणी काय साहित्य उपलब्ध आहे याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. आणखी एक पैलू म्हणजे बांधकाम खर्च, कुणाही ग्राहकाला तुमच्या रचनेमुळे स्वतःचे खिसे कापून घ्यायला आवडणार नाही!
आता प्रश्न येतो की, वास्तुविशारदाचं काम काय? आता बरेच जण म्हणतील हा काय प्रश्न आहे! मी स्पष्टच सांगितलं नाही का वास्तुविशारदाचं काम इमारतींची किंवा बांधकामांची निर्मिती व रचना करणे? अर्थातच मात्र यात एक अट आहे, वास्तुविशारदाला इमारतीची रचना त्याला किंवा तिला हवी तशी करण्याची मोकळीक नसते, त्याला ती ग्राहकाच्या गरजांनुसारच तयार करावी लागते. त्यामुळे ही सीमारेषा स्पष्टपणे समजून घ्यावी लागते, ग्राहकाला रुग्णालय हवे असेल तर तुम्ही हॉटेलची रचना करून चालणार नाही, मग ते कितीही उत्तम का असेना. त्यामुळे वास्तुविशारदाचे मुख्य काम म्हणजे ग्राहकाच्या मनातले जाणून घेणे व ग्राहकाला काय हवे आहे व त्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेणे. लक्षात ठेवा ग्राहकाला काय हवं आहे व त्याच्या गरजा काय आहेत यात फरक असतो. इथेच थोडंसं तत्वज्ञान किंवा मानशास्त्राचा आधार घ्यावा लागतो कारण अनेकदा अगदी प्रौढ माणसालाही त्याला नेमकं काय हवं आहे व त्याच्या गरजा काय आहेत यातला फरक कळत नाही. उदाहरणार्थ मी तुमचा ग्राहक आहे व मला माझ्या कुटुंबासाठी एक घर बांधायचं आहे मात्र माझ्या घरात मला नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे व ते घर माझ्या गरजा जास्तीत जास्त पूर्ण कसं करेल हे मला माहिती नाही. यामध्ये ग्राहकाच्या कुटुंबाला जाणून घेणे, त्यांची जीवनशैली, आवडीनिवडी, प्रत्येक सदस्याला आवडणारे रंग, ते त्या घरामध्ये एकत्रितपणे व स्वतंत्रपणे कसा वेळ घालवतात हे समजून घ्यायची गरज आहे! इथे वास्तुविशारदाची भूमिका ग्राहकांच्या कुटुंबाशी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांप्रमाणे बोलणे, त्यांच्या जीवनशैलीचे विश्लेषण करणे व त्यांना घराची कल्पना तयार करताना ते कुठे कमी पडताहेत हे समजून सांगणे व त्यानंतर त्यांच्यासाठी सर्वोत्तम घराची रचना करणे अशी असते; कारण बहुतेक लोकांना त्यांच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे माहिती नसते. हे प्रत्येक बांधकामाला लागू होते कारण तुम्ही रचना केलेले प्रत्येक बांधकाम, प्रत्येक ग्राहक व त्यांच्या गरजा वेगळ्या असतील.

तुम्ही सर्वजण जेव्हा या महाविद्यालयातून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हा सर्व प्रकारच्या इमारतींची किंवा बांधकामांची रचना करायची संधी मिळेल, मग तो एखादा पूल असेल किंवा शाळा किंवा प्रदर्शन केंद्र किंवा प्रयोगशाळा; कोणत्याही रचनेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ते बांधकाम कोणते लोक वापरणार आहेत. तुमच्या बांधकामाचं व त्याच्या रचनेचं यश हे तुम्ही नाही तर वापरकर्ता ठरविणार आहे. आजकाल आधुनिक स्थापत्यशास्त्र किंवा नागरी नियोजनामध्ये शाश्वतपणा हा शब्द त्याचा नेमका अर्थ जाणून न घेता सर्रास वापरला जातो. वास्तुविशारदाला तो त्याच्या निर्मितीमधून पर्यावरणाशिवाय आणखी कोणत्या गोष्टी टिकवणार आहे हे माहिती असले पाहिजे, सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ते बांधकाम जी व्यक्ती वापरणार आहे तिची मानसिक शांतता टिकवता आली पाहिजे. चुकीची रचना वापरकर्त्याची किंवा त्या इमारतीमध्ये राहणाऱ्याची मनःशांती म्हणा किंवा आनंद हिरावून घेऊ शकते व वास्तुविशारदासाठी हे सर्वात मोठे आव्हान असते. ते सार्वजनिक उद्यान असेल तर लोकांना त्या उद्यानामध्ये आरामादायक कसे वाटेल हे समजून घेण्याचा व त्यानुसार जागा तयार करण्याचा प्रयत्न करा. ती जर एखादी शाळा असेल तर शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना वर्गांपासून ते मार्गिकेपर्यंत प्रत्येक कोपरा वापरण्यास अतिशय सहज आहे असे वाटले पाहिजे. यासाठीच वास्तुविशारदाला तो इमारतीची रचना का करतो आहे हे माहिती असले पाहिजे; म्हणजेच तुम्ही कुणासाठी या इमारतीची रचना करताय हे तुम्हाला माहिती असले पाहिजे!

आजच्या युगात हे सगळं करताना तुमच्या समोर असलेलं सगळ्यात मोठ्ठ आव्हान म्हणजे तुमच्या ग्राहकासोबतच निसर्गाच्या शांततेचा समतोल राखणे. एक लक्षात ठेवा, इको-फ्रेंडली किंवा निसर्ग-पूरक असं काहीच नसतं मनुष्य-निर्मित कोणतंही बांधकाम ज्या जागेवर बांधलं जातं ती ओसाड जागा असली तरी तिथे गांडुळासारखे किटक किंवा मुंग्या आनंदाने राहातच असतात. माणूस सोडला तर दुसऱ्या कोणत्याच प्रजातीला स्वतःसाठी घर बांधायला वास्तुविशारदाची सेवा घ्यायचं स्वातंत्र्य नसतं. म्हणूनच स्थापत्यशास्त्राचे ज्ञान घेताना तुमचे मानवाशिवाय इतर प्रजातींबद्दलची आपली जबाबदारी काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या स्वप्नातला प्रकल्प साकार करता तेव्हा नैसर्गिक भूरचनेची किंवा पशु-पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाची कमीत कमी हानी होईल याचा विचार करा. त्यामध्ये पक्षांसाठी, फुलपाखरांसाठी, इतकंच काय गाडुंळांनाही आपल्यासोबत वाढायला जागा ठेवा. पृथ्वीवर राहायचा अधिकार फक्त माणसालाच नाही तर प्रत्येक सजीवाचा जमीनीच्या लहानात लहान तुकड्यावर तितकाच हक्क आहे. तुम्ही तुमच्या रचनांमधून त्यांना हा हक्क मिळवून देऊ शकता. आपली जीवनशैली जपण्याच्या हव्यासापायी आपण अनेक प्रजातींच्या निवासस्थानावर अतिक्रमण करून त्यांना नामशेष करतो, आपण काही पुरातन काळात परत जाऊ शकत नाही व गुहांमध्ये तसंच झाडांवर राहायला सुरुवात करू शकत नाही. मात्र तुम्ही जेव्हा रचना करता तेव्हा या पैलूचा नेहमी विचार करा, बाकीचं आपोआप सुचत जाईल!

सर्वात शेवटी यशस्वी वास्तुविशारद होण्यासाठी मला काही सूचना द्याव्याशा वाटतात, त्या अगदी सोप्या आहेत; वाचा, पाहा, प्रवास करा, लिहा, जास्तीत जास्त ग्रहण करा व इतरांना सांगा! तुम्हाला जेवढं जास्त शक्य होईल तेवढं वाचा कारण त्यामुळे तुम्ही लोकांविषयी व त्यांच्या गरजांविषयी विचार करू शकाल. कार्टुनपट, सुपर हिरो ते अगदी प्रेमपटापर्यंत सगळे चित्रपट पाहा यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करा कारण त्यामुळे तुम्हाला विविध ठिकाणे पाहता येतील व जगभरातल्या निवासस्थानांविषयी व पृथ्वीवरच्या विविधतेविषयी जाणून घेता येईल. लिहा कारण तुम्हाला जे काही वाटतं ते व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे, एक लक्षात ठेवा एक वास्तुविशारद म्हणून तुमची रेखाटने, आराखडे ही तुमची भाषा आहे. म्हणूनच तुम्ही जे शिकला आहात ते तुमच्या रचनांमधून दिसून येईल. तुम्ही जे पाहिले आहे व ऐकले आहे ते ग्रहण करा, कारण पाहणे व निरीक्षण करणे तसेच ऐकणे व श्रवण करणे यात फरक आहे! तुम्हाला जे समजले आहे ते तुमच्या कुटुंबाला, मित्रांना व शिक्षकांना सांगा कारण तरच तुमच्यामध्ये आणखी ज्ञान ग्रहण करण्यासाठी जागा तयार होईल.

सर्वात शेवटी मी इतकच म्हणेन की एक यशस्वी वास्तुविशारद म्हणजे लठ्ठ शुल्क आकारणारा, अतिश्रीमंत ग्राहक असलेला नाही तर जो त्याच्या इमारतीतल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो तो खरा यशस्वी वास्तुविशारद. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत अनेक इमारतींची रचना कराल मात्र जेव्हा तुम्ही रचना केलेल्या इमारतीसमोर उभे राहाल तेव्हा तुम्हाला तिचा अभिमान व जिव्हाळा वाटला पाहिजे, तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने निर्माता म्हणता येईल! चला तर मग, तुमच्या विविध निर्मितींमधून एका अधिक चांगलं जग तयार करा, माझ्या तुम्हा सर्वांना याच शुभेच्छा आहेत.


संजय देशपांडे


Mobile: 09822037109
No comments:

Post a Comment