Friday 30 September 2016

शाऊट्स ऑफ सायलेंस !
























"मौन" धारण करणा-या व्यक्तीवर वादविवादात विजय मिळवणे अशक्य आहे जोश बिलिंग्ज.

जोश बिलिंग्ज हे १९व्या शतकातला अमेरिकी विनोदी लेखक व्हीलर शॉ याचं टोपण नाव होतं. ते अमेरिकेतील अतिशय लोकप्रिय विनोदी लेखक व व्याख्याता होते. मार्क ट्वेन नंतर १९व्या शतकात शॉ याच्याइतका लोकप्रिय विनोदी लेखक दुसरा नसावा. मला नेहमी असं वाटतं की ज्या व्यक्तित तुम्हाला हसवण्याची क्षमता असते तो तुम्हाला गंभीर विचारपण  करायला लावु शकतो. जोश बिलिंग्ज यांचे वरील शब्द वाचल्यानंतर माझा तर्क चुकीचा नाही हे जाणवतं. बिलिंग्ज यांचे साहित्य विनोदी असले तरी त्यांनी मौनाची व्याख्या किती चपखल केलीय हे पाहा.

या मौनाविषयी विचार करायचं कारण म्हणजे नुकतेच राज्यभर निघालेले मराठा मोर्चे, हे सगळे एका अर्थाने मूक मोर्चे होते. आजकाल असं अपवादानंच पाहायला मिळतं कारण जेवढा आवाज जास्त तेवढं तुमचं म्हणणं जास्त ऐकलं जातं असंच समीकरण झालंय! महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना पार्श्वभूमी समजावी म्हणून सांगतो, मराठा ही हिंदू धर्मात आढळणाऱ्या अठरापगड जातींपैकी एक जात आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळखले जाणारे हे क्षत्रिय राज्याच्या राजकारणाचा कणा आहेत. महाराष्ट्रात मराठा बहुसंख्य आहेत व प्रामुख्याने ते शेती तसेच राजकारणात आहेत, हे क्षत्रिय जरी असले तरी आता पूर्वीसारख्या लढाया होत नाहीत. परंतु ग्रामीण भागामध्ये गावचा कारभार बहुतांश वेळा मराठा कुटुंबाच्या हातात असतो, अर्थात त्यातल्या अनेकांची परिस्थिती शेतीतून मिळणारं तुटपुंजं उत्पन्न तसंच शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने फारशी चांगली नसते. आरक्षणाच्या बाबतीत ते खुल्या वर्गवारीत येतात, त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या सहजासहजी मिळत नाहीत. यामुळे मराठा समाजातल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, किमान या समाजातल्या नेत्यांचं तरी असंच म्हणणं आहे, तसंच आकडेवारीही तसंच सांगते. त्यात आणखी भर म्हणजे अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये मागास वर्गातल्या किंवा जातीतल्या कुणालाही त्रास देणाऱ्या किंवा शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित उच्च वर्गातल्या कुणाविरुद्धही कारवाई करण्याची तरतूद आहे. या कायद्याचा मराठा समाजाविरुद्धच जास्त गैरवापर होत असल्याचा मराठा जनसमुदायाचा समज आहे, आपल्या माध्यमांमधून तर असाच सूर आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समुदायातले सामान्य लोक वर्षानुवर्षे मूग गिळून गप्प होते राजकीय नेते जातीचं राजकारण करत राज्य करत होते, मात्र कुठेतरी हा लाव्हा आत खोलवर खदखदत होता व जनमनात एक अस्वस्थता होती! अचानक हा मराठा समुदाय एकजूट होऊ लागला व मूक मोर्चांमधून एकत्र आला. आपल्याला बोचणाऱ्या विषयांबाबतची चीड, नैराश्य किंवा अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगला मार्ग कोणता असू शकतो? परभणीतल्या एका मोर्चानं याची सुरुवात झाली व हळूहळू मुक मोर्चाच हे लोण राज्यातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये पसरलं. कुणालाही वैयक्तिक आमंत्रण न देता लाखो लोक एकत्र येऊ लागले व आपल्या मागण्या मांडण्यासाठी शांतपणे चालू लागले, हे असं दृश्य अनेक वर्षांमध्ये कधीही पाहायला मिळालं नव्हतं! महात्मा गांधीची दांडी यात्राच जणू परत अनुभवल्यासारखं हे दृश्य होतं, मात्र इथे जमावाला रोखण्यासाठी पोलीस बळाची गरज नव्हती, कारण सुदैवाने आपल्याकडे अजूनतरी मुक्त लोकशाही आहे त्यामुळे कुणीही सार्वजनिक ठिकाणी निदर्शनं करू शकतं तसंच मोर्चा काढू शकतं. सुरुवातीला माध्यमांना तसंच नेत्यांना या मोर्चांना किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हे जाणवलं नाही. मात्र प्रत्येक शहरात जसा याला अधिकाधिक पाठिंबा मिळू लागला तशी समाज माध्यमांवर याविषयी अधिक चर्चा होऊ लागली व या मोर्चांना होणारी गर्दीही वाढू लागली.

मी कुणी राजकीय विश्लेषक नाही व मी माझ्या लेखनातून कधीही राजकीय टिप्पणी करत नाही. मात्र हे राजकारण नाही; एका जातीचे किंवा समुदायाचे लाखो लोक एकत्र येताहेत व निदर्शनं करण्यासाठी शांतपणे अनेक मैल चालताहेत व पुन्हा शांतपणे परत जाताहेत की अशाप्रकारे लोक एकत्र आले होते याच्या काही खाणाखुणाही राहू नयेत. हे सुद्धा अशा समुदायाच्या बाबतीत घडतंय जो आक्रमकपणासाठी ओळखला जातो व त्यांना फक्त बळाची भाषा समजते असं म्हणतात. कुणीही या मोर्चाचे नेतृत्व करत नाही किंवा कुणीही राजकीय पक्ष याचं श्रेय घेत नाही, किंबहुना मोठ्या राजकीय नेत्यांना मागे राहण्यास भाग पाडलं जातंय व समाजातील सामान्य माणसं विशेषतः महिला या मोर्चांमध्ये आघाडीवर आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्यासमोर काहीतरी विलक्षण घडतंय असं वाटत नाही का व म्हणूनच मला हा लेख लिहावासा वाटला; मी काही एका विशिष्ट जातीचा व्यक्ती आहे म्हणजेच ब्राह्मण आहे म्हणून हे लिहीत नाही. ब्राह्मणांचं आणि मराठ्यांचं पटत नाही असंच चित्र माध्यमांमधून रंगवलं जातं तसंच सर्वसामान्य माणुसपण तसाच विचार करतो. माझ्या सर्व जाती व धर्मातल्या मित्रांनो मला मोकळेपणानी सांगवसं वाटतं की मी ब्राह्मण आहे व मला त्याचा अभिमानही नाही किंवा लाजही वाटत नाही, कारण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणं हे माझ्या हातात नाही म्हणुनच त्यासाठी मला श्रेय घेण्याचं कारण नाही. आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कुटुंबात जन्म घेतो, म्हणूनच आपण जन्माने काय आहोत याचा फार उदोउदो करायची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे व माझ्या या मताशी माझे अनेक मराठा मित्रंही सहमत असतील याची मला खात्री वाटते. आपण कोण आहोत हे आपल्या आडनावावरून किंवा जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतं तर आपण काय करतो यावरून ते ठरतं, माझा आवडता चित्रपट बॅटमॅन बिगिन्समधून मी हे माझं तत्वज्ञान घेतलंय. मात्र आपल्या देशात आपल्याला सर्वप्रथम आपल्या पोटजातीने, त्यानंतर जातीने व त्यानंतर धर्माने ओळखले जाते. खरं म्हणजे समाज माध्यमांवर तर फक्त १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला आपली ओळख भारतीय अशी असते हे कटू सत्य आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वप्रथम माणूस आहोत हे आपण पूर्णपणे विसरतो, खरतर जगाला आपली ओळख अशीच व्हायला पाहिजे.

आपलं बालवाडीत नाव घालतानाच आपल्यावर हा जातीचा शिक्का बसतो व तिथूनच सुरुवात होते, वर्षागणिक आपल्या डोक्यात व मनात ही जात व धर्म पक्का भिनवला जातो व आपल्याला जातीचा अभिमान असला पाहिजे किंवा काही प्रकरणांमध्ये लाज वाटली पाहिजे असं बिंबवलं जातं. मी आरक्षण किंवा अत्याचार प्रतिबंधक कायदा याविषयी टिप्पणी करण्यास कुणी अधिकारी व्यक्ती नाही. मात्र तुम्ही एखाद्या जातीला टिकून राहण्यासाठी काही सोयीसुविधा देणार असाल तर इतर जातीही त्या मागणारच, हा निसर्ग नियम आहे. आपण एखाद्या समुदायाच्या रक्षणासाठी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसारखे कायदे वापरणार असू तर त्याच कायद्यापासून संरक्षण मिळावं अशी मागणी इतर समुदाय करणार हे सुद्धा तितकच खरं आहे. त्यामुळेच काळजीपूर्वक अभ्यास केला तर या मोर्चांविषयी आश्चर्य वाटणार नाही; मात्र ते ज्या पद्धतीने होताहेत त्याबाबत मात्र आश्चर्य वाटतंय व या संपूर्ण विषयाबद्दल असूया म्हणा किंवा भीती किंवा अस्वस्थता किंवा शंका म्हणा जे काही म्हणायचं असेल ते म्हणा मात्र इतर समुदायांच्या मनात या भावना आहेत व त्याचं लक्ष्य मराठा समाज आहे हे सत्य आहे. याचं एकमेव कारण म्हणजे आपले शासनकर्ते तसंच विरोधी पक्ष (दोघांनी एकत्रितपणे सरकार चालवणं अपेक्षित आहे मात्र विरोधक हे नेहमी विसरतात) या मोर्चांविषयी तितकेच गोंधळेल्या मनस्थितीत आहेत व जे आपल्याला समजत नाही त्याची आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला मराठा समाजाच्या हेतूंविषयी शंका वाटते, हे स्वाभाविक आहे. संपूर्ण यंत्रणाच याला कारणीभूत आहे कारण आरक्षण व्यक्तिला जन्मतः मिळणाऱ्या जातीच्या आधारे दिलं जातं. मी अर्थातच कुणी सामाजिक विश्लेषक नाही मात्र ज्या कारणाने शिक्षणात किंवा सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या संकल्पनेचा समावेश करण्यात आला त्याचा परिणाम काय झाला आहे याचा विचार करायची वेळ आली आहे. कारण या यंत्रणेमुळे एखाद्या जातीला आनंद होत असेल मात्र त्याचवेळी शेकडो इतर जाती नाराज होत असतील तर कुठेतरी काहीतरी अतिशय चुकतंय. कारण केवळ महाराष्ट्रात मराठ्यांच्याच नाही तर गुजरातमध्ये पटेलांच्या, हरियाणात जाटांच्या अशाच मागण्या आहेत, केवळ मराठ्यांनी निदर्शने करण्यासाठी जो मार्ग निवडला तो वेगळा आहे. तामिळनाडूमध्ये आरक्षणाचे प्रमाण ६८% पर्यंत पोहोचले आहे असं म्हणतो. आपले सर्व शासनकर्ते व कायद्याविषयी पूर्णपणे आदर राखून असा प्रश्न विचारावासा वाटतो की कोणत्याही यंत्रणेचा एवढा मोठा भाग आरक्षणाच्या नावाखाली व्यापल्यानंतर त्याला आरक्षण कसे म्हणता येईल? हे एवढ्या प्रचंड वेगाने होत राहिलं तर या ना त्या जातीसाठी मिळुन शेवटी १००% आरक्षण द्यावं लागेल, मग त्यानंतर तथाकथित खुल्या वर्गवारीत कोण राहणार आहे व सरतेशेवटी आरक्षणाचा काय अर्थ आहे राहील?

या मोर्चा प्रकरणाचा एक पैलू म्हणजे बहुसंख्य मराठा कृषी आधारित कामांमध्ये, प्रामुख्याने शेतीमध्ये आहेत. ज्यांच्या शेताला भरपूर पाणीपुरवठा होतो म्हणजे ज्यांची बागायती शेती आहे त्यांचा काही प्रश्न नाही मात्र मोसमी पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती करणाऱ्यांना गेल्या काही वर्षात बेभरशाच्या पावसानं सर्वाधिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला ज्यांच्यामागे त्यांचं कुटुंब आहे, ज्यांचा उदरनिर्वाह चालवायला कुणी नाही. प्रत्येक सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केवळ आश्वासनं दिली, हा कायमस्वरुपी उपाय नाही हे मान्य असलं तरीही. मात्र एकाही सरकारनं लहान शेतकऱ्यांना आरामदायक व स्थिर आयुष्य जगता येईल अशी भक्कम यंत्रणा तयार केली नाही. अशा फसलेल्या कृषी धोरणांमुळे पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी या मोर्चांनी एक व्यासपीठ दिलं.
सत्ताधारी सर्व मोठे नेते या जातीतले असूनही वर्षानुवर्षे काहीच बदललेले नाही, सामान्य मराठा माणसाच्या मनामध्ये अशी भावना जोर धरू लागली की त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी कधीच परिस्थिती बदलणार नाही व कुणीही आपली काळजी करत नाही! आपल्याला जे काही दिसतंय ते प्रत्येक व्यक्तिच्या मनाचं प्रतिबिंब आहे, ज्याला आपण सामान्य माणूस म्हणतो; केवळ मराठ्यांनी सर्वप्रथम निदर्शनं करायला सुरुवात केली. यात सगळ्यात विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे आजकाल कुठेही एखादा मोर्चा किंवा काही हंगामा घडवून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाला पैसे खर्च करावे लागतात, लोकांना बिर्याणीसारखी प्रलोभनं द्यावी लागतात, लोकांना गोळा करायला वाहनं पाठवावी लागतात. मात्र याउलट या मोर्चांमध्ये लाखो लोक स्वतःहून सहकुटुंब येत होते व फक्त शांतपणे चालत होते. म्हणुनच आपण ठोस पावलं उचलून या असंतोषाची दखल घेतलीच पाहिजे.

मात्र या निदर्शनांसोबतच मराठ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे केवळ आरक्षणाने त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, कारण ज्यांना अनेक वर्षांपासून आरक्षण आहे त्या जातींकडे पाहा. काळ बदलतोय व सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये काही टक्के जागा आरक्षित ठेवून लाखो लोकांचं काय भलं होणार आहे? जग झपाट्याने विकसित होतंय व ब्राह्मण, जैन, सिंधी किंवा शिख लोकांना कधीही कोणतंही आरक्षण मागितलं नाही (किमान आत्तापर्यंत तरी) मात्र त्यांनी स्वतःमध्ये काळानुरूप बदल केले. नवीन क्षेत्र सर करण्याचा प्रयत्न करा, उत्कृष्टतेचा ध्यास घ्या त्यासाठी नवीन क्षितीजं शोधा, बाहेरचं जग कोणत्या भाषेत बोलतंय ते ऐका व ती स्वीकारा, सर्वांगीण विकासाचा हाच मार्ग आहे. अशाप्रकारे केवळ काही कुटुंबांचीच नाही तर संपूर्ण मराठा समाजाची प्रगती होईल. येत्या काही वर्षात ज्या समुदायाला जनतेच्या गरजा कळतील तोच टिकून राहील. माझ्याकडे नोकरीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मी कधीही जात किंवा धर्म विचारत नाही, त्याचा किंवा तिचा कामाविषयीचा दृष्टीकोन किती प्रामाणिक आहे व तो किंवा ती जे काही करत आहे ते किती उत्कृष्टपणे करतात हे पाहतो. याचे कारण म्हणजे केवळ या दोनच गुणांमुळे तुम्ही कोणत्याही स्थितीत टिकून राहाल तर आरक्षणाच्या कुबड्यांमुळे आणखी कमजोर व्हाल व आणखी चांगली कामगिरी करण्याची क्षमता गमवून बसाल! हे बोलणं सोपं आहे हे मान्य आहे मात्र ज्यांनी आपला कुटुंब प्रमुख दुष्काळाच्या वणव्यात होरपळल्याने तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गमावला आहे त्यांना हे समजावणे अवघड आहे. मात्र आपण कायमस्वरुपी उपाययोजनेविषयी बोलत आहोत व कोणत्याही आरक्षणामुळे त्याची खात्री देता येणार नाही!

समाज माध्यमांमध्ये या मोर्चांच्या समर्थनार्थ तसेच विरुद्ध बरंच काही बोललं जातंय, मी इथे जे काही लिहीलंय आहे ते तिथेसुद्धा लिहीलं, लोकांच्या मनात असलेली भीती किंवा शंका समजून घेण्यासाठी तसंच मराठा जनतेने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे वाचकांना समजावे यासाठी. मौन ही सर्वात मोठी शक्ती आहे व प्रत्येक शक्ती जबाबदारीने वापरली पाहिजे, एवढेच मला म्हणावेसे वाटते.

मी समाज माध्यमांवर मांडलेली माझी काही मते खाली देत आहे...

*मराठा मोर्चा ते ब्राह्मण सभा ते ओबीसी मोर्चा... मला समाज माध्यमांवर जाती किंवा धर्माशी संबंधित फॉरवर्ड/पोस्ट सतत मिळत असतात व मी ते वाचत असतो; त्याला माझं हे उत्तर...
समाज माध्यमांवर कोणत्या प्रकारचे संदेश फिरताहेत हे पाहा...मला असं वाटतंय आपण अतिशय चुकीच्या मार्गावर चाललो आहोत ज्यामुळे केवळ राज्याचाच नाही तर देशाचा विनाश होईल. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी व तथाकथित सर्व जातीच्या नेत्यांनी एकत्र येणं व देश हा धर्मापेक्षा व जातीपेक्षा महत्वाचा आहे हे ठरविण्याची वेळ आली आहे. आरक्षण आवश्यकच असेल तर ते उत्पन्नावर आधारित असलं पाहिजे व ते खरोखर अतिशय गरीब लोकांना दिलं पाहिजे ज्यांना पुरेसं अन्न किंवा चांगलं शिक्षण परवडू शकत नाही... नोकरीमध्ये काहीही आरक्षण नसावं मात्र सर्वांना चांगले शिक्षण घेण्याची समान संधी मिळेल याची खात्री करा व मुक्त स्पर्धा असू दे असं झालं तरच अधिक चांगला भारत तयार होण्याची आशा आहे!

देशासमोरची खरी समस्या आरक्षण नाही तर आधुनिक विज्ञानातील संशोधन व विकास, गृहनिर्माण व इतरही अनेक समस्या आहेत; रोजगार सर्वांनाच हवा आहे मात्र कुणीही रोजगार निर्मिती करायला तयार नाही. सर्वात महत्वाच्या समस्या आहेत देशातील निसर्गाला व जैवविविधतेला असलेला धोका. या समस्या सोडविण्यासाठी आपण एकजुटीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे... कधीतरी लोकांना हे समजेल अशी आशा करू मात्र तोपर्यंत कदाचित फार उशीर झाला असेल. तोपर्यंत माळढोकपक्ष्यांसारख्या अनेक प्रजाती व अनेक झाडे नामशेष होतील म्हणजेच कायमची नष्ट होतील. जर कुणाला आरक्षणाची खरी गरज असेल तर ती आहे झाडांना!
येथे प्रत्येक जण आधी मराठा आहे, ब्राह्मण, दलित, बौद्ध किंवा इतर कुठल्यातरी जातीचा आहे... मग भारतीय किंवा माणूस कुठे आहे?

*कुठल्याशा वृत्तपत्रामध्ये मराठा मोर्चासंदर्भात व्यंगचित्र आलंय; माझं सर्व मराठा व इतर मित्रांना एक आवाहन आहे...

प्रिय मित्रांनो, मी एफबीवरच्या तुमच्या सर्व टिप्पण्या व प्रतिक्रिया वाचतोय! मी ब्राह्मण आहे मात्र त्याआधी मी एक माणूस तसंच भारतीय आहे; तुम्ही जे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे, त्यापासून अशा व्यंगचित्रांमुळे दूर होऊ नका. तुम्ही मोर्चामध्ये दाखवलेल्या शक्तिचं व संयमाचं असंच होईल, गांधीजींचा विचार करा, ते आपल्या उद्दिष्टापासून तसूभरही हलले नाहीत, आपल्या मार्गावर चालत राहिले त्यामुळे त्यांना हवं होतं ते साध्य करता आलं. लोकांना हवंय ते म्हणू द्या किंवा प्रतिक्रिया देऊ द्या, तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावर निर्धाराने चालत राहा त्याचं उद्दिष्ट आम्हाला समजलं आहे. वर एका मित्राने मोर्चामध्ये वापरलेल्या झेड्यांचे बांबू  हत्यार म्हणून वापरू असे नमूद केले; तुम्ही हेच करावं असं लोकांना वाटतं, एक पाऊल चुकीचं पडलं तर मोर्चामुळे साध्य झालेला पूर्ण परिणाम नाहीसा होईल. म्हणूनच विचार करा व कोणत्याही नकारात्मक टिप्पणीला प्रतिक्रिया देऊ नका किंबहुना तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचं महत्व कमी करा.

* अपेक्षेनुसार मराठा मोर्चांच्या यशाचा राजकीय पक्ष एकतर फायदा घेताहेत किंवा शांत राहून त्यावर टीका करताहेत. त्यानंतर अशीही तत्वे आहेत ज्यांना हे मोर्चे अपयशी व्हावेत असे वाटते व असे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मराठा समाजाला चुकीची प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करा म्हणजे ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणे सोपे होईल. त्यामुळेच शहाणपणाने पावले उचला, गरम डोक्याने नाही व उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा... कोणत्याही पक्षाकडे किंवा व्यक्तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. म्हणूनच एकमेकांशी वाद घालणे किंवा प्रतिक्रिया देणे किंवा एखाद्या जातीला किंवा पक्षाला दोष देणे थांबवा. आपल्याच राज्यात पेशवे मराठा होते मात्र ते शाहू महाराजांचे उजवा हात होते, जे मराठा होते. त्यानंतर मोहिते, शिंदे, सुर्वे असे अनेक मराठा, पेशव्यांच्या म्हणजे ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली लढले! अनेक वर्ष मराठा, ब्राह्मण व इतर सर्व जाती ज्यात अगदी मुस्लिमांचाही समावेश होतो, त्या टिकून राहिल्या व त्यांनी एकत्रितपणे लढा दिला त्यासाठी त्यांना कोणत्याही अत्याचार प्रतिबंधक कायद्याची किंवा आरक्षणाची गरज पडली नाही केवळ योग्यता व लढण्याची क्षमता हेच निकष होते...आता एखादा राजकीय पक्ष काय म्हणाला किंवा एखाद्या वृत्तपत्राने काय छापलं यावर आपण प्रतिक्रिया देणार असलो, तर लक्षात ठेवा त्यांना रस असलेल्या गोष्टी व आपली उद्दिष्टे यात फरक आहे. म्हणूनच त्याकडे केवळ दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय आहे...

याच पार्श्वभूमीवर मी टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी वाचली की टॉम हँक अलिकडेच भारतात आला होता व त्याला इथे अतिशय आश्चर्य वाटलं, तो म्हणाला, भारतामध्ये किती विविध प्रकारचे लोक एकत्र रहातात हे पाहून मला आश्चर्य वाटतं! मात्र मला टॉमला सांगावसं वाटतं ती केवळ एकत्र राहाणं आणि एकोप्यानं राहणं यात फरक आहे! मला असं वाटतं केवळ शासनकर्त्यांनीच नाही तर प्रत्येक भारतीयाने एकोप्याचा अर्थ समजून घेणे व त्यात आपापली भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. नाहीतर असं पाहायला गेलं तर तुरुंगातही लोक एकत्र राहतात, नाही का?"...

संजय देशपांडे


Mobile: 09822037109


No comments:

Post a Comment