Thursday, 1 June 2017

जागतिक पर्यावरण दिवस! (नाते जोडु निसर्गाशी !)

मला खरोखरच आश्चर्य वाटते की पृथ्वीसारख्या सुंदर ग्रहाचा विध्वंस करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला !” … कर्ट व्हॉनगट ज्यू.

कर्ट हा अमेरिकी लेखक होता तसंच व्यवसायाने यांत्रिक अभियंता होता. तो दुसऱ्या जागतिक महायुद्धातही सहभागी झाला होता. त्यानं आयुष्याचे इतके विविध पैलू पाहिले असल्यामुळे, त्यानं पर्यावरणाविषयी आपल्या भावना अतिशय नेमक्या शब्दात व्यक्त केल्या आहेत! जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं माझे विचार व्यक्त करण्यासाठी त्यानं दिलेला इशारा अतिशय समर्पक आहे, याचं कारण म्हणजे आपण आपल्या पृथ्वीची नासधूस करतोय म्हणा विनाश करतोय किंवा विध्वंस करतोय म्हणा हे सगळं खरंच तर आहे. संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना पर्यावरणाविषयी जागरुक करण्यासाठी तसंच त्याच्या संवर्धनाविषयी किंवा रक्षणाविषयी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १९७४ साली साजरा करण्यात आला, तेव्हापासून या दिवशी पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा चालविल्या जातात. त्यामध्ये सागरी प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर व वन्यजीवनासंदर्भातील गुन्हे अशा विविध समस्यांचा समावेश होतो. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक वेगळीच संकल्पना असते. त्याआधारे मोठमोठ्या जागतिक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक गट, प्रशासन व प्रसिद्ध व्यक्ती विविध कार्यक्रम व संकल्पना राबवतात व पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी जागरुकता निर्माण करतात. जागतिक पर्यावरण दिनामध्ये जगभरातले १४३ देश सहभागी होतात, आपल्या देशात मात्र अजूनही जागतिक पर्यावरण दिवस हा फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे सारखी काहीतरी पाश्चात्य कल्पना आहे ईतकच त्याला महत्व दिलं जातं! कारण जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सगळ्यांना अचानक निसर्गप्रेमाची जाणीव होते आणि जी आणि वायफायच्या कृपेनं ट्विटर, एफबी, वॉट्ससारख्या समाज माध्यमांवर हे प्रेम व्यक्त करणाऱ्या संदेशांचा पाऊस पडू लागतो (यातले बहुतेक संदेश फॉरवर्ड केलेले असतात). मात्र निसर्गाच्या संवर्धनासाठी स्वतःहून कुणी काही केलेलं फारसं दिसून येत नाही, जे खरं तर जास्त महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे, “लोकांना निसर्गाशी जोडणं’. मला असं वाटतं ही संकल्पना निवडून अतिशय योग्य पाऊल उचलण्यात आलंय कारण आजकालच्या स्वार्थी जगात याची अतिशय गरज आहे. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या वाटतात त्यांच्याशीच आपण संबंध जोडतो व आपल्या भौतिक गरजांशी संबंधित बाबींमध्येच आपल्याला रस असतो. म्हणून सर्वप्रथम निसर्गाशी जोडलं जाणं महत्वाचं आहे, तरच आपण त्याच्याविषयी काहीतरी चांगलं करण्याचा विचार करू शकतो! जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेविषयी बोलण्यापूर्वी पर्यावरणाच्या बाबतीत आपल्या स्मार्ट पुणे शहराची व आजूबाजूची काय परिस्थिती आहे ते पाहू.

आपण रोजच पाहतो की येथे इमारतींच्या बांधकामाच्या नावाखाली किंवा रस्ते रुंदीकरणासाठी किंवा नागरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल केली जाते. आपल्या नद्या व झरे प्रदूषित झालेल्या दिसतात, व या शहरात चिमण्यांसारख्या पक्ष्यांचा मागमूसही दिसत नाही. काही दशकांपूर्वी जेव्हा मी या शहरात आलो तेव्हा माझ्या आईला लिहीलेलं पहिलं पत्र मला आठवतंय. मी लिहीलं होतं, आई या शहरात उन्हाळाच नाही”! तो काळ मे महिन्यादरम्यानचा होता, पण आज आपल्याला असं म्हणता येईल का? आपल्याला विकासासाठी झाडं कापावी लागतात हे मान्य मात्र नवी झाडं लावून ती वाढवण्याचं काय? काही वर्षांपूर्वीपर्यंत वातानुकूलन यंत्र ही श्रीमंतांची चैन होती. मात्र आता सतत वाढणाऱ्या तापमानामुळे वन रूम किचन सदनिकांमध्येही सर्रास एसी लावलेला दिसून येतो. त्याशिवाय लाखो वाहनांधल्या धुरामुळे आपल्या भोवतालचं वातावरण कार्बन मोनॉक्साईड व अशाच उष्णता वाढविणाऱ्या वायूंनी भरून जातंसार्वजनिक वाहतूकीचा संबंध थेट पर्यावरणाशी असतो व या शहरामध्ये लोक सार्वजनिक वाहतूक चांगली नसल्यानं वापरत नाहीत. या सेवेमध्ये अनेक कारणांमुळे सुधारणा होत नाही, मात्र मुख्य कारण म्हणजे शासनकर्त्यांना वाहतुक सेवा सक्षम करण्यात व नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यात ईच्छाच कमी आहे आपल्याला इतका वेळ वाचवायचा असतो की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी काही मिनिटं वाट पाहू शकत नाही किंवा चालू शकत नाहीआपण नेमकं इथेच लोकांना निसर्गाशी जोडणं किती महत्वाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. मी जेव्हा पीएमपीएमएल बसची वाट पाहायला तसंच घरून किंवा कार्यालयातू बस स्थानकापर्यंत चालत जायला तयार होतो, तेव्हा मी एकप्रकारे निसर्गाशीच जोडला जातो. असं करून मी प्रदूषण कमी व्हायला हातभार लावून आपल्या पर्यावरणाला मदतच करत असतो.

त्यानंतर झाडं लावून व जगवून पर्यावरणाला प्रत्यक्ष मदत करणं येतं. झाडं जगवण्याविषयी किंवा वृक्षतोड केल्याबद्दल इतरांवर (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांवर) टीका करणारे संदेश टाकणं सोपं असतं, मात्र आपल्यापैकी कितीजण प्रत्यक्ष झाडं लावतात व ती जगवतातमला खात्री आहे की पर्यावरण दिवसाचा संदेश पाठविणाऱ्यांपैकी एक टक्का लोकांनीही असं केलं नसेल, नाहीतर आपल्याला या विषयावर चर्चाच करावी लागली नसती. आम्ही आमच्याकडे एक वेगळी प्रथा सुरु केली आहे, आम्ही आमच्या इमारतींमध्ये सदनिका आरक्षित करणाऱ्या प्रत्येक परिवाराला इमारतीच्या आवारात एक झाडं लावायला लावतो. आम्ही त्या झाडापाशी त्या कुटुंबाच्या नावाचा फलक लावतो व त्यांना ते झाड दत्तक घ्यायला लावतो. म्हणूनच मी अभिमानानं सांगू शकतो की अशा प्रकारे गेल्या दहा वर्षात आम्ही किमान पाचशे झाडं तरी लावली आहेत व ती जगवली आहेत. ही सगळी झाडं स्थानिक जातीची आणि फुलं फळं देणारी आहेत त्यामुळे जैवविविधतेची साखळी पूर्ण होते. आपण फक्त झाडं कमी झाली आहेत हे पाहतो, पण त्यामुळे शहरातल्या व भोवतालच्या संपूर्ण जैवविविधतेचं किती नुकसान झालंय हे आपल्याला दिसत नाही. शहराच्या उपनगरामध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरं, बेडूक व अगदी माकडंही नियमितपणे दिसायची. आता मला सांगा तुम्ही आपल्या या स्मार्ट शहरामध्ये शेवटचं फुलपाखरू किंवा बुलबुलसारखा पक्षी कधी पाहिला होता. शहराच्या काही भागात पूर्वी स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईस फ्लाय कॅचर) नावाचा पक्षीही दिसायचा जो आता अजिबात दिसत नाही. मला आठवतंय पूर्वी पावसाळ्यानंतर बेडकांच्या डराँव डराँवनं आसमंत भरून जायचा, तो कानांना सुखावणारा आवाज आता ऐकू येत नाही. अनेक जण म्हणतील त्यात काय मोठसं; आपलं आयुष्य आनंदायक करण्यासाठी आयटी पार्क, मॉल, बँका, उद्योगधंदे, वसाहती नाहीत का? या सगळ्यांमुळे आपलं आयुष्य नक्कीच सोपं होतं व पुणे गेल्या काही दशकांमध्ये खूप बदललं आहे. मात्र स्वतःला प्रश्न विचारा की आयुष्य केवळ बँका, मॉल व आयटी पार्कमुळे पूर्ण होतं का? झाडे, बेडूक, फुलपाखरं, चिमण्या व इतरही प्रजाती आपल्या आयुष्याचा तितकाच महत्वाचा भाग आहेत व ते नसतील तर जीवनचक्राची साखळीच तुटेल.

या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना, लोकांना निसर्गाशी जोडणे महत्वाची आहे, कारण इथे लोक फक्त म्हणजे खरंतर तुम्ही आणि मीच व आपणच निसर्गाचं जे नुकसान केलं आहे ते भरून काढू शकतो. त्यासाठी निसर्ग म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, तरच आपण त्याचं संवर्धन करू शकू. निसर्गाची व्याख्या शब्दात करणं अवघड आहे, कारण ते कितीतरी गोष्टींपासून बनलेलं असतं व त्याला अनेक पैलू आहेतथोडक्यात सांगायचं तर निसर्ग पाच तत्वांपासून बनतो ते म्हणजे जल, अग्नि, पृथ्वी, आकाश, वायू व ही पंचतत्वे आपल्याभोवतीच तर असतात. म्हणजेच एका अर्थानं जगातलं सगळं काही निसर्गाचाच एक भाग असतो व त्याच्याशी जोडलेलं असतं. मात्र आपल्यासारखे काही मूर्ख हे नातं विसरतात व निसर्गाशी जोडलं जाण्यासाठी आपल्याला पुन्हा वेगळे प्रयत्न करावे लागतातनिसर्गातल्या या पाच तत्वांचं आपण काय केलं आहे ते पाहा; आपण नदी व समुद्रासारख्या जलस्रोतांना गटाराचं पाणी वा केमीकल मिश्रीत पाणी सोडून प्रदूषित करतो. आपल्या प्रदूषणामुळे माशांसारख्या प्रजातींचं जीवन असह्य करून टाकतो व उरलेले मासे आपण आपल्या खाण्यासाठी मारून टाकतो. आपण पृथ्वीवर शक्य तो सगळा केर-कचरा तयार करतो व येथेच जमिनीवर टाकतो! वेगवेगळ्या प्रजातींची निवासस्थानं आपण नष्ट करतो केवळ आपल्याला आरामात राहता यावं म्हणुन त्यांना नामशेष करतो आणि मग आपलं निसर्गप्रेम दाखवण्यासाठी वाघ वाचवा सारख्या मोहिमा राबवतो. आपण जमीनीवरील मातीचं आच्छादनच काढून टाकतो. तेथे काँक्रिटचे रस्ते बनवतो त्यामुळे मातीसाठी किंवा डबक्यांसाठी जागाच उरत नाही, मग इथे बेडूक कसे जगतील! हवेच्या बाबतीत बोलायचं तर आपण फटाके फोडतो, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सशक्त करण्याऐवजी लाखो वाहनांचं उत्पादन करतो, मोठमोठे उद्योग उभारतो, ज्यातून विषारी वायू सोडले जातात. आपण ज्या हवेत श्वास घेतो ती प्रदूषित करतो. आपण आग मिळविण्यासाठी उपलब्ध कोळसा व खनिज तेलाचे सगळे स्रोत सतत वापरतोय. एक दिवस हे स्रोत संपतील त्यानंतर काय याची काळजीसुद्धा करत नाही! आपण आकाशालाही सोडलेलं नाही, आपल्याला आकाशातले तारे पाहायचे असतील तर शहराच्या बाहेर जावं लागतं, आपल्याला शहराच्या आकाशात फक्त धूर आणि धुकं दिसतं. आपण आपल्या आकाशाची परिस्थिती सगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे मृतप्राय करून ठेवली आहे.

आपण जेव्हा निसर्गाशी जोडलं जाणं असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपण निसर्गाप्रती स्वतःची जबाबदारी समजून घेणं असा होतो असं मला वाटतं. माझा लेख वाचून लोक विचारतील की निसर्गाशी जोडलं जाणं म्हणजे विकास थांबवणं का? नाही, त्याचा अर्थ असा होतो की निसर्गाला आपल्या विकासाचा एक भाग बनवणं. वाढती मानवी लोकसंख्या हे निसर्गाच्या ऱ्हासाचं एक महत्वाचं कारण आहे, ती नियंत्रित करण्यापासून ते नामशेष होत चाललेल्या प्रजातींना वाचवण्यासारख्या अनेक आघाड्यांवर आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या गरजा आपला हव्यास होऊ देऊ नका, कारण हव्यासामुळे आपण दुसऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतो. आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्ग म्हणजे फक्त माणसंच नाही तर सगळ्याच प्रजातींची मालमत्ता आहे. सर्वात विकसित प्रजाती म्हणून पृथ्वीवरचा निसर्ग सगळ्यांना समान उपभोगता येईल याची खात्री करण्याची जबाबदारी एखाद्या वर्गाच्या मॉनिटरप्रमाणे आपली आहे. हे अजिबात अवघड नाही, आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात जे काही करतो ते अधिक संवेदनशीलपणे केले पाहिजे. मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे असेल, झाडांना पाणी देणे असेल, शीतपेयाची बाटली व्यवस्थित टाकून देणे असेल किंवा नळ बंद करणे; लाखो लोकांनी यासारख्या लहान गोष्टींचे पालन केले तर त्यातूनच पर्यावरण संवर्धाची मोहीम सुरु होईल.

आपण आणखी व्यापक विचार केला पाहिजे, असं एक जग निर्माण केलं पाहिजे जिथे कारखाने व आयटी पार्क असतील पण स्वच्छ नद्या असतील व दाट झाडी असलेली पर्वतराजी असेल. जिथे मुलांना फुलपाखरु पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयात जावं लागणार नाही, तर ते त्यांच्याशी अंगणातच पळापळी खेळू शकतील. महामार्ग बांधले जातील मात्र त्यांच्या दुतर्फा मोठ्या वृक्षांची सावली असेल. असं एक जग असेल ज्यात गगनचुंबी इमारतींच्या जवळच जंगल असेल, बेडकांना डुंबायला, पावसाळ्यात डराँव डराँव करायला भरपूर जागा असेल. या जगामध्ये चमकत्या ताऱ्यांनी आकाश भरलेलं असेल, जे कुठूनही पाहता येईल. स्वच्छ निळ्या आकाशात पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल, वाहनांचा गोंगाट नाही. असं एक जग जेथे प्रत्येक झाडाचा, प्रत्येक चिमणीचा निसर्गावर माणसाइतकाच हक्क असेल! आणि तरच आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा हक्क मिळेल. या कामात प्रत्येकानंच हातभार लावला पाहिजे. मला असं वाटतं हे वास्तव समजून घेणं हीच निसर्गाशी जोडलं जाण्याची पहिली पायरी आहे. तरच आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा खरा अर्थ समजला असं म्हणता येईल. नाहीतर एक वेळ अशी येईल की पर्यावरण दिवस साजरा होईल मात्र पर्यावरण कायमचं नष्ट झालं असेल!संजय देशपांडेMobile: 09822037109

No comments:

Post a Comment