Wednesday, 2 August 2017

पालक होण्याची जबाबदारी !


पालक होण्याची जबाबदारी !

या जगात सगळ्यात महान उपाधींपैकी एक म्हणजे पालक, आई बाबा म्हणुन हाक मारता येणं  हे जगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहेजिम डेमिंट.

जेम्स वॉरन डेमिंट हे अमेरिकन राजकीय नेते आहेत ते दक्षिण कॅलिफोर्नियातून यूएस सिनेट सदस्यही होते. ते रिपब्लिकन पक्षाचे नेते असून हा पक्ष सामाजिक चळवळीत अग्रणी आहे. अमेरिकेतील बहुतेक राजकीय नेत्यांप्रमाणेच ते देखील कौटुंबिक मूल्यांना अतिशय महत्व देतात त्यांचे वरील अवतरण जीवनाच्या याच पैलूविषयी बरेच काही सांगते. जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या देशात कौटुंबिक सुख हीच बाब दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात घडलेल्या किंवा माझ्या जवळपास घडलेल्या काही घटनांमुळे मला पालकांविषयी वरील अवतरण वापरावसं वाटलं. मन्मथ म्हैसकर या भारतीय प्रशासकीय सेवेत असलेल्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलानं केलेल्या आत्महत्येबाबत समाज माध्यमांमध्ये तसंच वृत्तपत्र माध्यमांमध्येही बरीच चर्चा सुरु होती. ते दोघेही माझे स्नेही आहेत, त्यांच्याविषयी मला अतिशय आदर वाटतो. थोडीफार लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळाली असल्याने माझ्या अनेक मित्रांनी मला या विषयावर काही लिहीण्याचा आग्रह केला. खरं तर मन्मथनं अचानक असं आयुष्य संपवणं सर्व वर्गातील अनेक मध्यमवयीन पालकांसाठी एक धक्काच होता, मी सुद्धा याच वर्गाचं प्रतिनिधीत्व करतो. त्याच बरोबरीने नुकतेच नॅशनल डिफेन्स अकॅडेमीच्या जैस्वाल नावाच्या तरुण कॅडेटनं आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं तो देखील मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. विचार करा एनडीए सारखी संस्था जी आपल्या विद्यार्थ्यांना मनानं आणि शरीरानं कणखर बनविण्यासाठी ओळखली जाते तिच्यातील एका तरुण कॅडेटनं आत्महत्या केली. कशामुळे त्यानं आयुष्य संपवायचा टोकाचा निर्णय घेतला असेल? इथे मध्यमवर्गीय कुटुंब म्हणजे मला असं कुटुंब अभिप्रेत आहे की जिथे सांस्कृतीक मूल्ये अजूनही टिकून आहे, िथे चांगले वाईट यांच्या व्याख्या सोप्या स्पष्ट आहेत, पालक सुशिक्षित आहेत, तसेच कुटुंबाची आर्थिक बाजूही चांगली आहे म्हणजे ते लाखो रुपये कमवत नसतील मात्र त्यांची हातातोंडाची गाठ नसते. मग इतक्या चांगल्या वातावरणात वाढलेली ही तरुण मुले त्यांचं आयुष्य इतक्या लवकर संपवायचा निर्णय का घेतात? लेखक असल्यामुळे लोकांना असं वाटतं की तुम्ही कोणत्याही विषयावर लिहू शकता, जे प्रत्यक्षात खरं नसतं. मात्र केवळ लेखक, अभियंता, वन्यजीव प्रेमी किंवा बांधकाम व्यवसायिक म्हणून नाही तर, साधारण मन्मथच्याच वयाच्या दोन तरुण मुलांचा बाप म्हणूनही मला हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा वाटला. मात्र यासंदर्भात स्वतःच्या भावना लिहीण्याऐवजी मी माझ्या भावना यु ट्युब व्हीडिओतून व्यक्त केल्या ज्यामुळे तरुणांशी अधिक चांगल्याप्रकारे संवाद साधता येऊ शकतो असं मला वाटतं. मात्र माझ्यातला लेखक स्वस्थ बसू शकला नाही, म्हणूनच हा लेख प्रपंच. विशेषतः ज्या थोड्याफार किशोरवयीन तरुणांना वाचनाची आवड आहे (बरेच आहेत असे मात्र त्यांची संख्या आमच्या वेळेपेक्षा कमी आहे असे मनापासून वाटते) तसंच ज्या किशोरवयीन मुलांच्या मध्य चाळीशीतल्या पालकांची या आत्महत्येच्या विषयाने झोप उडाली आहे त्यांच्यासाठी हा लेख लिहीला आहे.

आता बरेच जण म्हणतील की आपण दररोज आत्महत्येच्या कितीतरी बातम्या वाचतो; तर मग मन्मथ त्या एनडीए कॅडेटच्या बातमीत काय विशेष आहे? मान्य की आपण अशा बातम्या दररोज वाचतो मात्र एवढ्या प्रस्थापित पालकांचा मुलगा किंवा जैयस्वालसारखा मुलगा आत्महत्या करतो तेव्हा आपण पालक, आपल्याही कुटुंबात असं काही दुर्दैवी घडू शकतं या विचारानं पूर्णपणे हादरून जातो. या तरुण मुलाच्या पायाशी सगळी भौतिक सुखं लोळण घेत होती, तसंच अतिशय प्रेम करणारे पालक होते, असं असताना या मुलांनी आयुष्य संपवायचा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न मला सतावतो. दुसरीकडे महाराष्ट्र टाईम्ससारखे वृत्तपत्र गरीब वर्गातल्या ज्या विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत त्यांना समाजामार्फत आर्थिक मदत करण्याचा उपक्रम चालवत आहेया मुलांची पार्श्वभूमी वर नमूद केलेल्या आत्महत्या केलेल्या मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या मुलांपैकी काहींचे पालक वारले आहेत किंवा अपंग असल्याने कमवू शकत नाही. ते अतिशय गरीब असून, त्यापैकी अनेक जण झोपडपट्टीत राहतात. आयुष्यानं या मुलांकडून सगळं काही हिरावून घेतलं आहे, मात्र त्यांच्यात एक गोष्ट जबरदस्त आहे ती म्हणजे जिद्द. या सगळ्या मुलांना जगायचं आहे, ते ज्या गोष्टींना मुकले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळवायच्या आहेत, त्यांना असं काही तरी साध्य करायचं आहे ज्याला आपला उच्चभ्रू समाज यश म्हणतो.

आता जेव्हा आपण यशाची व्याख्या करतो, आमची पिढी अतिशय सुखी होती कारण सगळं काही अगदी सोपं होतं. तुम्हाला फक्त विज्ञान, वाणिज्य, कला, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय या शाखांपैकीच एकाची निवड करायची असायची. बहुतेक किशोरवयीन मुलांना फक्त एक सुरक्षित नोकरी, एक लहान चार चाकी गाडी किंवा 2 बीएचके सदनिका हवी असायची, यशस्वी आयुष्याची एवढीच व्याख्या होती. आमच्याकडे हातात फार पैसा नसायचा, मात्र ते एकप्रकारे चांगलेच होते कारण त्यामुळे इतरांशी तुलना व्हायची नाही, आर्थिकदृष्ट्या सगळे सारखेच होते. बाहेर खाणे ऐकीवातच नव्हते सगळ्यात महत्वाचे म्हणजे इंटरनेट किंवा स्मार्ट फोन नव्हते त्यामुळे आम्ही वाचनात किंवा मित्रांसोबत वेळ घालवू शकायचो. मला अगदी आजही खात्राशीरपणे सांगता येणार नाही की समाज माध्यमं आपल्यासाठी वरदान आहे किंवा शाप. एकीकडे त्यामुळे आपण हजारो मैल दूर असलेल्या लोकांच्या संपर्कात राहू शकतो मात्र दुसरीकडे त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या माणसांपासून दूर जाता. खरतर आमच्या पिढीतल्या लोकांनी जीवनशैली अतिशय झपाट्यानं आणि प्रचंड बदलताना पाहिली आहे. आम्ही लहान असताना अँटेनावाले रेडिओ होते तेव्हापासून ते आज आपल्याला आय फोन 7 पर्यंत विविध साधने उपलब्ध आहेतकौटुंबिक संस्कृतीविषयी बोलायचं, तर आपल्यावर सातच्या आत घरात असेच संस्कार झालेत म्हणजे संध्याकाळ झाली की घरी यायचं असा शिरस्ता होता; आजच्या भाषेतलं नाईट लाईफ वगैरे प्रकार नव्हताहीच आमची पिढी आता मुलं मध्यरात्री घरी येईपर्यंत जागी राहते वाट पाहतही तरुण पिढी आपल्या पालकांचे कॉल घेत नाही, तसंच काळजी करणाऱ्या आई-बापाच्या मेसेजना उत्तर देत नाही. खरंतर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत रात्री बाहेर फिरणारा आपला मुलगा किंवा आपली मुलगी व्यवस्थित आहे किंवा नाही, ते कधी घरी येणार आहेत एवढंच पालकांना जाणून घ्यायचं असतं. या तरुणांना तुम्ही कुठे चाललाय कधी परत येणार आहात यासारखे लहान सहान प्रश्न विचारले तरी ते वैतागतात. त्यातूनच तुम्ही जर त्यांना अभ्यास करा किंवा इंटरनेटवर कमी वेळ घालवा असं सांगितलंत तर मग झालंच; आजूबाजूच्या बहुतेक तथाकथित यशस्वी कुटुंबात जवळपास अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मला माझं बालपण किंवा अगदी महाविद्यालयीन दिवस आठवतात. डिप्लोमासाठी स्थापत्य शाखा निवडण्यापासून ते मी कुठला चित्रपट पाहायचा याविषयी माझ्या वडिलांचा शब्द सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासारखा अंतिम असे. मी माझ्या पिढीची तुलना आजच्या पिढीशी करत नाही, कारण ते सुद्धा या तरूण पिढीला आवडत नाहीदोन्ही पिढ्यातल्या सगळ्यात मोठा फरक म्हणजे आमचा आमच्या पालकांवर विश्वास होता त्यांची केवळ भीतीच वाटायची नाही तर आम्ही त्यांचा आदरही करायचो. माझ्या पालकांचं प्रत्येकवेळी बरोबर नसलं तरीही त्यांना जी काही थोडीफार माहिती आहे त्यानुसार ते माझ्यासाठी नेहमी चांगलाच विचार करतील असा विश्वास होता. हा आदर विश्वास आजच्या पिढीमध्ये त्यांच्या पालकांबद्दल दिसून येत नाही, कारण या मुलांना आपल्यालाच सगळं काही माहिती आहे असं वाटतं

म्हणूनच मी म्हणतो की आजच्या पिढीला समृद्धीचा शाप आहे, ही समृद्धी अनेक बाबतीत आहे; अगदी करिअरसाठी कोणता मार्ग निवडाचा, कोणते शूज घ्यायचे ते आयुष्यातील सर्व सुखसोयींपर्यंत त्यांच्याकडे प्रत्येक  गोष्टीसाठी असंख्य पर्याय आहेत, जे खरंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या खडतर मेहनतीमुळे मिळाले आहेत. करिअरच्याच संधी पाहा, त्यांना केटरिंग, पर्यटन ते छायाचित्रणापर्यंत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. वैद्यकीय अभियांत्रिकीला अजूनही वलय असलं तरीही वित्तपुरवठा, विपणन व्यवस्थापन यासारख्या पर्यायांनाही वाढती मागणी आहे. आपल्या विषयाशी संबंधित नसलं तरीही मूलभूत विज्ञानात अनेक तरुणांना रसच नसतो, ही केवळ विज्ञानासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्याशिवाय सधन कुटुंबे आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या देशात पाठवू शकतात त्यामुळे त्यांच्यासाठी हा पर्यायसुद्धा खुला असतोमी जेव्हा या तरुणांसाठी एवढे पर्याय खुले असल्याचे पाहतो तेव्हा त्यांना सुदैवी मानावं की दुर्दैवी हे मला समजत नाही, कारण एवढे पर्याय समोर असल्यामुळे एखादी व्यक्ती गोंधळून जाऊ शकते. अशा गोंधळलेल्या व्यक्तिच्या मनातच असुरक्षितता निर्माण होऊन नैराश्य येऊ शकते. नेमक्या याच कारणामुळे ही पिढी ब्लू व्हेलसारख्या खेळांना बळी पडते ज्याविषयी सध्या बरीच चर्चा सुरु आहे. या खेळात खेळाडूला प्रत्येक पातळीवर काही कृती करायला सांगितली जाते सगळ्यात शेवटची कृती असते आत्महत्या करणे. हे अतिशय विचित्र आहे मात्र गोंधळलेल्या मनस्थितीतील व्यक्ती सहजपणे अशा खेळांना बळी पडू शकते. अशा ऑनलाईन गेममुळे किशोरवयीन मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनाही अलिकडे घडल्या आहेत.

माझ्या पिढीतील पालकांची अडचण म्हणजे जेव्हा असा एखादा तरुण त्याचे किंवा तिचे आयुष्य संपवतो तेव्हा सगळे पालकांनाच दोष देतात. जणूकाही त्यांनीच मुलांना एवढी टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडलं आहे, अशावेळी सगळी माध्यमं तसंच अगदी जवळच्या व्यक्तिही पालकांनाच बोधामृत पाजत असतात. विचार करा आपलं लाडकं मूल गमावल्याचं दुःख एकीकडे असतं, दुसरीकडे अशी दुर्घटना रोखू शकलो नाही याचं शल्य असतं आणि त्यातच तुम्हाला तुमच्या पाल्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं जात असतं तेव्हा त्या पालकांना किती ताण जाणवत असेल किंवा वेदना होत असतीलसगळे मानसोपचार तज्ञ किंवा माध्यमांमधील तत्वज्ञान पाजळणारे गुरु तुमच्या मुलांशी संवाद साधा, त्यांच्यावर एवढा दबाव टाकू नका की तो किंवा ती आपले आयुष्य संपवून टाकेल असा उपदेश देत असतात. पण मला एक सांगा कोणत्या पालकांना असं वाटेल की यशाच्या मागे धावताना त्यांच्या मुलानं किंवा मुलीनं स्वतःचे आयुष्यच संपवावं, मला खात्री आहे की कुणालाच असं वाटणार नाही. मला असं वाटतं की केवळ पालक नाही तर संपूर्ण समाज व्यवस्थाच मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करायला जबाबदार आहे. तुमच्या भोवताली पाहा, तुम्हाला काय दिसतं प्रत्येक जण आपल्या आयुष्याची दुसऱ्याशी तुलना करत असतो, मग नोकरी अस, शूज असोत, बाईक, घर किंवा सेल फोन, आपल्यापैकी बहुतेक जण ईतरांच्या पुढे जाण्यासाठीच अनेक गोष्टी करत राहतात. ही पिढी भोवताली हेच पाहात आली आहे, ही जीवघेणी स्पर्धा फक्त पालकांपुरतीच नाही तर शाळेत, मित्रांच्या घरी, प्रत्येक ठिकाणी असते, ही मुलं नकळत या तुलनेच्या स्पर्धेचा एक भाग होऊन जातात. या मुलांना समृद्धीचा शाप असल्यानं आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, पराभव अथवा नकार मनानं स्वीकारण्यासाठी ती तयार नसतात. म्हणूनच एखादा खेळ खेळणे, वाचनासारखे छंद जोपासणे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही जेव्हा कोणताही खेळ खेळता तेव्हा तुम्ही कोणत्याही स्पर्धेत पहिलं येणं महत्वाचं नसतं तर तुम्ही पराभवही हसत स्वीकारायला शिकता. त्याचवेळी एखाद्या विजयाची हवा जेव्हा तुम्ही डोक्यात जाऊ देत नाही तेव्हा तुम्ही त्या खेळात प्राविण्य मिळवलं आहे असं मी म्हणेन. केवळ एखादा खेळ खेळल्याने नाही तर त्यामागची खेळ भावना समजून घेतली तर तुम्ही एक चांगली व्यक्ती होता. ही खेळ भावनाच तुम्हाला क्रीडा क्षेत्राशिवाय तुमच्या आयुष्यातही स्थिर किंवा संतुलितपणे जगायला मदत करते. म्हणूनच पालक म्हणून या लहान गोष्टी समजून घ्या, केवळ मुलांशी संवाद साधल्याने तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं हे त्यांना समजणार नाही. खेळासारखे उपक्रम ज्या वातावरणात मुले वाढली आहेत त्यामुळे त्यांना जगण्याचं महत्व समजेल. आपल्या मनात सकारात्मक नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे विचार असतात. माझ्या पिढीतही हे असे नकारात्मक विचार होते, काहीवेळा आपल्यापैकी अनेकांना एखाद्या परिस्थितीत आता सगळं काही संपलं आहे, हे आयुष्य संपवून टाकावं असं वाटलं असेल. मात्र खरी मजा या परिस्थितीतून पुन्हा वर येऊन नकारात्मकता दूर सारण्यात आहे. तरुण पिढीला हे तथ्य समजून सांगणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, फक्त किशोरवयीन मुलांच्या पालकांची नाही.

खेळाशिवाय तुम्ही अनेक गोष्टी मुलांसोबत करू शकता, शक्य असेल तेव्हा मुलांना सहज फेरफटका मारायला घेऊन जा. तुम्ही प्रत्येक वेळी त्याला एखाद्या मॉलमध्ये घेऊन जावं किंवा की काही वस्तू खरेदी करून द्यावी असं मी म्हणत नाही कारण तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही तुम्ही मुलांसाठी जीवनाची मुल्ये खरेदी करू शकत नाहीतर तुमच्या वागण्यातुनच ही मूल्यं त्यांच्यात रुजवावी लागतील तसंच त्यांना काही मूल्ये आपणहून शिकावी लागतील, उदाहरणार्थ तुम्ही मुलांना पाण्यात ढकलू शकता मात्र पाण्यात तरंगायचं असेल तर त्यालाच हातपाय मारावे लागतील. त्याचवेळी मुलांनीसुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की आज त्यांचे पालक जे काही आहेत ते केवळ काही नशीबामुळे नाही तर त्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. तुम्ही सुद्धा स्वतःहून काही साध्य केलंत तर त्याला खऱ्या अर्थानं यश म्हणता येईल, मग ते कितीही लहान असले तरी ते तुमचे स्वतःचे असेल, त्यानंतर हे आयुष्य किती सुंदर वाटते ते पाहा. मला तरुण पिढीला (माझ्या मुलांसकट) एवढंच सांगावसं वाटतं की आयुष्य ही एक जबाबदारी आहे, एक अनमोल भेट आहे, तुम्हाला तुमच्या पालकांनी जन्म दिल्यानं तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही मैत्रिणीनं मैत्री तोडली किंवा अपयशाची भीती यासारख्या कारणांमुळे आयुष्य संपवायचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही एक नाही तर तीन आयुष्य संपवत असता, ती म्हणजे तुमचं स्वतःचं आणि दोन तुमच्या पालकांची. अनेक वर्षांपूर्वी मला "शोले", या प्रसिद्ध चित्रपटातला एक संवाद आठवतोय ज्यात के हनगल यांना त्यांच्या मुलाचा, सचिनचा मृतदेह घेऊन जावा लागतो, त्यावेळी ते म्हणतात, जानते हो दुनिया में सबसे बडा बोझ क्या है? बुढे बाप के कंधे पे जवान बेटे की अर्थी म्हणजे म्हाताऱ्या  वडिलांसाठी आपल्या तरुण मुलाचा मृतदेह घेऊन जाणं सगळ्यात मोठे ओझे असते! मित्रांनो कधीतरी तुम्हीसुद्धा  आई-वडिलांच्या भूमिकेत पोहोचाल, तुमच्या पालकांनी तुम्हाला जे दिलं ते तुमच्या पुढील पिढीला द्यायची जबाबदारी तुमच्यावर असेल, पण त्यासाठी आधी तुम्हाला जगावं लागेल, मोठे व्हावे लागेल!

प्रिय तरुणांनो लक्षात ठेवा तुमच्या पालकांसाठी तुमचे गुण, तुमचं करिअर, तुमचं यश, नोकरीत सर्वोच्च स्थान या सगळ्या गोष्टी गौण आहेत, तुमच्या आयुष्यापुढे त्याचं काहीही मोल नाहीतुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला  तुमच्या पालकांकडून किंवा शिक्षकांकडून तुमच्या मनातील भीतीशी लढण्यासाठी पुरेसा पाठिंबा मिळत नाही तर स्वतःची काहीतरी आधारव्यवस्था निर्माण करा. यासाठी खेळ, वाचन, नृत्य, हसणे, रडणे, धावणे, मित्र जोडणे, स्वतःशी बोलणे किंवा इतरही कितीतरी पर्याय आहेत. निसर्गाशी एकरूप व्हा कारण त्याच्यासारखा दुसरा उत्तम गुरु नाही, काहीही करा पण आत्महत्या करू नका एवढंच मला म्हणायचं आहेअसं म्हणतात की तारुण्य हा तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ असतो, पण तो अनुभवण्यासाठी तुम्हाला मोठं व्हावं लागेल आणि जगावं लागेल. तुमचे पालक ज्या समाजाचा एक घटक आहेत त्याचं तुम्ही देणं लागता व तुम्ही  स्वतः पालक होऊनच त्याची सर्वोत्तम परतफेड करू शकता!


संजय देशपांडे

Mobile: 09822037109
No comments:

Post a Comment