Friday 19 January 2018

दुबई, यश आपल्या दृष्टिकोनात !



























अतिशय कार्यक्षम व्यक्तीकडून झालेल्या काही चुका, आळशीपणा किंवा भीतीमुळे निष्क्रिय असलेल्या माणसापेक्षा नक्कीच स्वस्तात पडतात.”… शेख मुहम्मद बिन रशीद अल् मखतुम.
महामहीम शेख मुहम्मद बिन रशीद अल् मखतुम गेल्या अकरा वर्षांपासून दुबईचा राज्यकारभार सांभाळताहेत, ते संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष व पंतप्रधानही आहेत. त्यांच्या अकरा वर्षांच्या शासनकाळात त्यांनी व्यावसायिक व सेवाधिष्ठित सरकारवर भर दिल्यानं दुबईची लोकसंख्या या काळात चौदा दशलक्षांवरून  तीस दशलक्षांवर त्यांच्याच कारकीर्दीत जाऊन पोहोचली. त्यांनी पुढाकार घेतला व शहरात अतिशय सशक्त सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली व त्यामुळे दुबई विमानतळ हे जगातील सर्वात वर्दळीचे विमानतळ झाले आहे. माझा गेल्या तीन वर्षातला हा तिसरा दुबई दौरा आहे. मी वाळवंटातलं हे सुंदर स्वप्नं जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक दौऱ्यात माझा श्री. मखतुम यांच्याविषयीचा आदर वाढतच जातो. म्हणूनच मी त्यांचे वरील अवतरण वापरले. ते त्यांच्या देशाविषयी, राज्याविषयी एवढंच नाही तर जीवनाविषयी त्यांचा दृष्टिकोन दाखवून जाते. मला एक गोष्ट तुमच्या नजरेस आणून द्यावीशी वाटते की दुबईमध्ये इतर आखाती देशांसारखा तेलातून मिळणारा पैसा नाही. तरीही आखाती देशांचा विचार करताना तोंडी सर्वप्रथम नाव येतं ते दुबईचं. आखाती देशांमधील अनेक शासनकर्ते बाह्य जगातील दुबईच्या लोकप्रियतेविषयी खाजगीत जळतात. दुबई अतिशय कष्टाने इतकी नावारुपाला आली आहे. कारण अशी स्वप्न साकारण्यासाठी केवळ पैशांपेक्षाही बऱ्याच काही गोष्टींची आवश्यकता असते. दुबईमध्ये कधीच तिची श्रीमंत बहिण म्हणजेच अबुधाबीएवढा पैसा नव्हता त्यामुळे कतार, मस्कत व सौदी यासारख्या तिच्या शेजाऱ्यांची तर बातच सोडा.
आता दुबईच्या यशामागचं काय रहस्य आहे, तुम्ही श्री. मखतुम यांची अवतरणे पाहिली तर हे तत्वज्ञानच दुबईच्या नेत्रदीपक यशाचा कणा असल्याचं तुम्हाला जाणवेल, मात्र हे तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे का? नाही, दूरदृष्टिइतकीच तिची अंमलबजावणी करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती व अतिशय व्यावसायिक दृष्टिकोनही तितकाच महत्वाचा असतो. दुबईच्या यशाचे कारणही हीच त्रिसूत्री असल्याचं मला जाणवलं. जगात कुठेही जा हा धागा समान असतो. सिंगापूरच्या किंवा जर्मन नागरिकाला विचारा, त्यांनीही असा आमूलाग्र बदल पाहिलेला आहे, मग दुबईचं वेगळेपण कशात आहे? दुबईनं जेवढ्या काळात हा दर्जा मिळवला आहे व त्या शहराची पार्श्वभूमी तसंच संस्कृती पाहता हे वेगळेपण जाणवतं, जे तितकच महत्वाचं आहे. ती अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत केवळ मच्छीमार व मोत्याचा शोध घेणाऱ्या पाणबुड्यांची एक वसाहत होती जे झोपड्यांमध्ये राहायचे. आता हे आखाती देशांमधलं मुख्य व्यापारी केंद्र व जगभरातलं सर्वात मोठं पर्यटनस्थळ झालं आहे. स्थानिकांना त्यांची जगण्याची रीत बदलायला लावून, बाह्य जगातील लोकांना या कोळ्यांच्या वसाहतीवर विश्वास दाखवायला लावणं व त्यांची इथे गुंतणूक करणं ही खरंच मोठी कामगिरी आहे. जे विशेषतः भारत व पाकिस्तानासारख्या संसंस्कृत व सुस्थापित देशांनाही साध्य करता आलेलं नाही. मी जेव्हा आपल्या सरकारी बाबूंनी (म्हणजेच सरकारी अधिकाऱ्यांनी) ब्रिटन, स्पेन, स्विडनसारख्या तथाकथित प्रगत देशांना भेट दिल्याचं वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं (अलिकडच्या काळात दुबईला वारंवार भेट दिल्यानंतर) की आपण दुबईला केवळ एक खरेदीचं केंद्रं म्हणून का मर्यादित ठेवतो, ही खरंतर आपली संकुचित दृष्टी आहे. या शहरानं नगर नियोजनाच्या आघाडीवर थक्क करणारी कामगिरी केली आहे तसंच आपल्या नागरिकांना उत्तम जीवनही देत आहे.
माझ्या भेटीदरम्यान मी विविध क्षेत्रातल्या माझ्या अनेक मित्रांना भेटलो जे गेल्या काही दशकांपासून दुबईमध्ये राहताहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादात एक बाब सामाईक होती ती म्हणजे हे शहर नागरिकांसाठी अतिशय उत्तम आहे. शेख यांनी आपल्या नागरिकांसाठी प्रत्येक चांगलीच नव्हे तर उत्तम गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, अर्थात ते ज्या पद्धतीनं करण्यात आलं त्याविषयी कुणी प्रश्न उपस्थित करू शकेल (दुबईमध्ये परदेशी नागरिक म्हणून तुम्हाला असं करणं परवडत नाही). मात्र कोणत्याही भारतीयाला विचारा, आपल्याकडेही असाच एखादा शासनकर्ता हवा असल्याचंच सगळे म्हणतील. अर्थात समाज माध्यमांवर सगळेजण आपले विद्यमान पंतप्रधान श्री. मोदींची यथेच्छ हेटाळणी करण्यात धन्यता मानतात ही गोष्ट सोडा. मला मान्य आहे की आपण लोकशाही देश आहोत व आपल्या मर्यादा आहेत मात्र श्री. मखतुम आपल्या एका अवतरणात स्वतःच म्हणाले आहेत की तुम्ही लोकांना प्रेमानं जिंकू शकता बळानं नाही. विशेषतः जग एवढ्या झपाट्यानं बदलत असताना व इंटरनेट तसंच समाज माध्यमं अतिशय शक्तिशाली झालेली असताना जवळपास ३० लक्ष लोकसंख्येला खुश ठेवणं हे सोपं काम नाही. त्यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत, अगदी अलिकडच्या काळात म्हणजे 1 जाने 2018 रोजी घेतलेला निर्णय म्हणजे प्रत्येक खरेदीवर दुबई सरकारने 5% मूल्यवर्धित कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचशिवाय अगदी लहानात लहान व्यापाऱ्यांसाठी पुस्तक पालन सक्तिचे करण्यात आले आहे व त्यांचे उल्लंघन करणाऱ्यास भरपूर दंडही (जवळपास 25 हजार दिऱ्हाम) केला जाणार आहे. कायद्याचं पालन करायच्या बाबतीत दुबईचा हात कुणी धरू शकणार नाही, म्हणूनच दुबई तिच्याएवढ्या आकाराच्या शहरांच्या तुलनेत जगातील सर्वात कमी गुन्हेगारी असलेलं शहर आहे. विनोदानं दुबईलाफाईन सिटी म्हणतात, याचाच अर्थ असा की तुम्ही केलेल्या कोणत्याही चुकीसाठी हे शहर मोठे दंड (फाईन) आकारते. असं म्हटलं जातंय की दुबईला निधीची अतिशय टंचाई जाणवत होती (अर्थात कुणीही हे उघडपणे मान्य करणार नाही) त्यामुळेच त्यांनी मूल्यवर्धित कर लागू करायचा निर्णय घेण्यात आला. अर्थात या कराच्या अंमलबजावणीमुळे दुबई वाचते किंवा परिस्थिती आणखी चिघळते हे येता काळच ठरवेल. मात्र यामुळे दुबई हे जगातलं पहिल्या क्रमांकाचं शहर बनविण्याच्या श्री. मखतुम यांच्या योजनेवर काहीही परिणाम झालेला नाही. तुम्ही भोवताली सुरू असलेल्या विकासकामांवर एक नजर टाकली तर तुम्हाला हा मोहीमेवर निघालेला माणूस आहे हे जाणवेल.
मी नेहमी जंगलात का जातो, तसंच काही जंगलांमध्ये वारंवार का जातो याचं माझ्या अनेक मित्रांना नेहमी कुतूहल वाटतं; माझं उत्तर असतं की जंगल हे सतत बदलत असतं व तुम्ही कितीही वेळा तिथे गेलात तरी तुम्हाला ते कधीच सारखं दिसणार नाही. मला आता दुबईच्या बाबतीतही तसंच वाटतं, प्रत्येकवेळी हे शहर रहिवाशांना तसंच येणाऱ्या पाहुण्यांना वेगळं दिसतं, त्याचं रुपडं बदललेलं असतं (अर्थातच सकारात्मक पद्धतीनं हे वेगळं सांगायची गरज नाही). त्याच्याशी संबंधित प्रत्येकालाच काहीतरी चांगलं देऊ करण्याचा प्रयत्न असतो व यावेळी त्याला अपवाद नव्हता. मी माझा बहुतेक वेळ मित्रांसोबत शहरात भटकंती करण्यात घालवला. ते मला केवळ लोकप्रिय पर्यटन स्थळीच नाही तर सगळीकडे घेऊन गेले, त्यातली काही ठिकाणं अशी होती जिथे स्थानिकही जात नसतील! मी उदाहरणादाखल तीन ठिकाणं सांगतो, मिरॅकल गार्डन, दुबई कॅनल डेव्हलपमेंट आणि आणखी एक खाजगी घरांची वसाहत होती स्प्रिंग्ज. यातून तुम्हाला एका आदर्श शहरानं आपल्या नागरिकांना काय दिलं पाहिजे हे समजेल.
नावाप्रमाणे मिरॅकल गार्डन हे वाळवंटातला एक चमत्कार आहे. मी अनेक उद्यानं पाहिली आहेत जी नैसर्गिक तसंच मानवनिर्मित होती. मात्र शेकडो हेक्टर पसरलेल्या रेतीवर उद्यान उभारणं व दहा अंश ते पन्नास अंश एवढी तफावत असलेल्या प्रतिकूल हवामानात ते टिकवणं हे खरोखर अतिशय विशेष आहे. हे उद्यान जवळपास आठ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेलं आहे, ज्यामध्ये लाखो फुले फुललेली आहेत, हे जगातल्या सर्वात मोठ्या पुष्पउद्यानांपैकी एक आहे. मोठ्या आकाराच्या अमिरात बोईंग विमानासारखी अनेक शिल्पं आहेत जी वेलींनी सजविण्यात आली आहेत. या उद्यानाचं चार वर्षांपूर्वी उद्घाटन झाल्यापासून पर्यटक या ठिकाणाला आवर्जुन भेट देतात. आपल्या पुणे शहरातही अनेक उद्याने आहेत मात्र ती पर्यटकांसमोर सादर करणं, त्यांची देखभाल करणं तसंच त्यांचं विपणन, या तिन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरतो हे कटू सत्य आहे, ज्याला पु लं देशपांडे उद्यानासारखे काही अपवाद आहेत. मिरॅकल गार्डनसारखी ठिकाणं शहराला चेहरा देतात व पर्यटकांना काहीतरी वेगळं अनुभवल्याचं समाधान देतात. शासनकर्त्यांनी शहरासाठी हेच केलं पाहिजे म्हणजे स्वप्न पाहणं व ती साकार करणं.
त्यानंतर दुबईमध्ये आणखी एक आश्चर्य अगदी अलिकडेच अस्तित्वात आलं ते म्हणजे दुबईतला पाण्याचा कालवा. हा एक कृत्रिम कालवा आहे जो 2 ऑक्टोबर 2013 साली अस्तित्वात आला व 9 नोव्हेंबर 2016 रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पामध्ये एक शॉपिंग सेंटर, चार हॉटेल, 450 उपहारगृह, आलिशान घरं, पादचाऱ्यांसाठी रस्ते व सायकल स्वारांसाठी मार्ग यांचा समावेश आहे. हा तीन किलोमीटरचा प्रकल्प आहे जो पर्शियन गल्फमधील बिझनेस बेपासून (व्यावसायिक जिल्हा) सुरू होतो त्यानंतर तो सफा पार्क, व जुमैरापर्यंत जातो जी दुबईची उपनगरं आहेत. या कालव्याची रुंदी 80 मीटर ते 120 मीटरपर्यंत आहे. तो सहा मीटर खोल असून त्यावर आठ मीटर उंचीचे पूल आहेत. त्यामुळे एकूण 80,000 चौरस मीटरच्या क्षेत्रात नवीन सार्वजनिक ठिकाणे व सुविधा निर्माण झाल्या आहेत ज्यामध्ये बोटींसाठी खाजगी धक्के व प्रवेशद्वारापाशी व्यापारी केंद्र उभारण्यात आलं आहे. ही सगळी आकडेवारी जरा बाजूला ठेवा, वाळवंटात फेरफटका मारत असताना, ऍमस्टरडॅमसारख्या कालव्यांच्या शहरात फिरत असल्यासारखं वाटावं अशी कल्पना तरी कुणी करू शकलं असतं का? ही कल्पना प्रत्यक्षात साकार झालीय, आणि सुदैवानं मला इथे फेरफटका मारता आला, हा प्रकल्प खरंच अतिशय अद्भूत आहे आणि आता तो दुबईचं आणखी एक वैशिष्ट्य झालाय. या कालव्याच्या कडेने फेरफटका मारताना मला किती बारिकसारिक तपशीलांचा विचार करण्यात आला आहे हे जाणवलं. या पदपथावर बसण्यासाठी ठिकठिकाणी जागा आहेत तसंच चालणाऱ्यांना त्यांचे सेल फोन चार्ज करता यावेत यासाठी बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबही आहेत. संध्याकाळी संगीत वाजवलं जातं व प्रत्येक विद्युत खांबावर स्पिकर आहेत, ते अर्थातच बोससारख्या कंपनीचे आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या स्पिकरकडे पाहिल्यानंतर मला पुण्यातल्या रस्त्यावर बसविलेले एलईडी दिवे चोरून नेल्याची बातमी आठवली. इथे दुबईमध्ये बोसच्या स्पिकरचं सोडाच पण इतर कुठल्याही बाबतीत असं करायचा विचार कुणी करत. आपल्याकडेही अशी संस्कृती रुजवण्याची गरज आहे कारण ही सार्वजनिक मालमत्ता आहे व शहराला तिचा उपयोग व्हावा यासाठी तिची देखभाल करणे आवश्यक आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, पुणेकरांना (अर्थातच भारतीयांनाही) कधीतरी याची जाणीव होईल अशी आशा करतो. दुबई कालवा हा फक्त एक उत्तम पर्यटक आकर्षण ठरणार नाही तर त्यामुळे रिअल इस्टेट बाजारपेठेलाही काही प्रमाणात चालना मिळेल. त्याचशिवाय दुबईच्या नागरिकांना विरंगुळ्यासाठी ही अतिशय उत्तम सुविधा आहे. त्या कालव्याच्या काठाने तयार करण्यात आलेला सुंदर पदपथ व विकास काम पाहून मला आपल्याला नदी सुशोभिकरणाच्या नावाखाली दाखवण्यात आलेली स्वप्न आठवली, मुळा-मुठा नद्यांमध्ये पुलावरून कचरा फेकणारे नागरिक आठवले. मी जेव्हा दुबई कालव्यासारखी विकास कामं पाहतो तेव्हा कदाचित आपली अशी स्वप्न पाहायचीही लायकी नसल्याचं मला वाटतं.
त्यानंतर मी भेट दिलेलं तिसरं ठिकाण म्हणजे बंगले व घरांची वसाहत तसंच खाजगी विकास. या आघाडीवर आपल्याकडेही त्याच उत्तम दर्जाचं काम करणारे बरेच विकसक आहेत मात्र इथे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकाम झालं ते विशेष आहे. स्प्रिंग्ज, हा प्रकल्प जवळपास चार हजार बंगले व व्हिलांचा आहे. यामध्ये एका  समूहात तिनशे/चारशे बंगले आहेत. मुख्य पैलू म्हणजे प्रत्येक समूहाचं स्वतःचं एक तळं आहे. यातल्या सर्वात मोठ्या तळ्याचा परीघ जवळपास दोन किलोमीटरचा आहे, यातूनच तुम्हाला या विकासकामाची व्याप्ती कळू शकेल. अशाप्रकारच्या विकासकामामुळे या बंगल्यांच्या परिसरात जैव विविधता आहे, तुम्हाला इथे चिमण्या, पोपट, मैना व अगदी हुपूही दिसतात (गवतातून कीटक खाणारा पक्षी)हा विकासाचा अतिशय महत्वाचा पैलू आहे कारण एका बाजूला आपल्या पुणे शहरात चिमण्यांसारखे नेहमी दिसणारे पक्षी, जलाशय हळूहळू दिसेनासे होऊ लागले आहेत आणि इथे भर वाळवंटात श्री. मखतुम संपूर्ण जीवनचक्र विकसित करण्याचा प्रयत्न करताहेत. एक लक्षात ठेवा तुम्ही फक्त काँक्रिट व पोलादातून शहर विकसित करू शकत नाही, तर एक शहर त्यातल्या जीवनामुळे विकसित होतं व आपल्या नियोजकांनी नेमकं हेच समजून घ्यायची गरज आहे.
आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे तो म्हणजे तिथली एकत्रित परिवहन यंत्रणा आरटीए म्हणजेच रस्ते व परिवहन प्राधिकरण जी मेट्रो, स्थानिक बस व टॅक्सींचे दळणवळण नियंत्रित करते. हा खरोखरच स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. दुबई फक्त खरेदी किंवा व्यापार केंद्र नाही तर वरील तीन ठिकाणे ही दुबई आपल्या नागरिकांना काय देते याची फक्त एक झलक आहे. तुम्ही नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून शहराचा विकास केला तर ते पर्यटकांसाठीही प्रेक्षणीय ठरतं. नगर नियोजनाचं हे साधं सत्य आहे जे समजून घेण्यास आपले नियोजन वारंवार अपयशी ठरले आहेत. श्री. मखतुम् यांचा शहराविषयीचा दृष्टिकोन कसा आहे याविषयी आणखी काही सांगावसं वाटतं. या माणसाकडे किती संपत्ती आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरीही हा माणूस शहरात व आसपास अगदी सामान्य माणसासारखा एकटा फिरतो, म्हणजे अगदी अरेबियन नाईट्स मधला बगदादचा हरून अल् रशिद वाटावा असा. ते लोकांना भेटतात, त्यांच्या शहराविषयीच्या अपेक्षा जाणून घेतात, (एवढंच नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी गैरहजर आढळून आले तर त्यांना कामावरून कमीही करतात). ते राजा आहेत व ते म्हणतील तीच पूर्व दिशा हे मान्य असलं तरीही, केवळ उत्तमच नाही तर सर्वोत्तम निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास वाखणण्याजोगा आहे. जे ज्याप्रकारे काम करतात त्याविषयी शंका घेतली जाऊ शकते मात्र त्यांच्या उद्देशाबद्दल नाही, म्हणूनच दुबईचे नागरिक त्यांच्या राजाचा आदर करतात व त्याच्यावर प्रेम करतात. अर्थातच लोकांना दुबईमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याकरता निवासी प्रवेशपत्र दोन वर्षांवरून दहा वर्षांपर्यंत वाढविण्याचा तसंच व्यवसायातील सुलभता वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो. तरीही मखतुम यांनी त्यांच्या अवतरणात म्हटल्याप्रमाणे, जोपर्यंत तुही काम करत नाही तोपर्यंत चुका होत नाहीत, ते स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तसंच त्या दुरूस्त करायलाही तयार आहेत.
मी दुबईहून काय घेऊन परतलो तर श्री. मखतुम यांची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची तळमळ व केवळ सर्वोत्तमाचा ध्यास असं म्हणावं लागेल. आपण, विकसनशील , गरीब देश आहोत हे मान्य आहे, मात्र काही दशकांपूर्वी दुबईही तशीच होती. मी एकटा माझा संपूर्ण देश बदलू शकत नाही तरीही मी माझ्या कामाचे ठिकाण किंवा माझा भोवताल नक्कीच बदलू शकतो. मी पुण्याला येताना हीच तळमळ घेऊन आलो जिच्यासाठी कोणतेही सीमाशुल्क भरावे लागत नाही. प्रिय श्री. मखतुम माझ्या मनात हे तळमळीचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी मनापासून आभार, दुबईमध्ये तेलाचे सर्वाधिक साठे नसले तरीही तळमळ ठासून भरलीय यात शंका नाही!

संजय देशपांडे
Mobile: 09822037109



No comments:

Post a Comment