Monday 19 March 2018

पुणे नं. १ ?























शहरे कधीच मुक्त नसतात, एखाद्या शहरात कितीही मोकळेपणा दिसत असला तरीही, त्यांच्याशी संबंधित एखादी समस्या सोडविण्याच्या गरजेतून अजुन एक समस्या निर्माण होते. किंबहुना, एक शहर म्हणजे दुसरे काहीही नसून एका समस्येवरील तोडगा ज्यातून आणखी समस्या निर्माण होतात व त्यांच्यासाठी आणखी तोडगे आवश्यक असतात, जोपर्यंत उंच इमारती उभारल्या जात नाहीत, रस्ते रुंद होत नाहीत व पूल बांधले जात नाहीत. लाखो लोक या समस्या-सोडविण्याच्या व समस्या-निर्माण करण्याच्या चक्रात अडकून पडतात.” …  नील शटस्टरमॅन.

नील शटस्टरमॅन हा तरुणांसाठीच्या काल्पनिक विज्ञान कादंबऱ्यांचा अमेरिकी लेखक आहे. त्याला चॅलेंजर डीप या पुस्तकासाठी तरुणांच्या साहित्यासाठीचे नॅशनल बुक अवॉर्ड मिळाले. त्याचे वरील शब्द त्याच्या विज्ञान कादंबरीतील असले तरीही ते नागरी नियोजनाच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतात. मी जेव्हा आपल्या प्रिय पुणे शहराला नागरी सुविधाबाबतच्या पातळीच्या बाबतीत (यावर अजून टिप्पणी करायची आहे) देशातल्या जवळपास 20 राज्यांमधील 23 शहरांमधून पुण्याला पहिला क्रमांक मिळाल्याची बातमी वाचली तेव्हा मला त्याचे वरील शब्द आठवले!  अर्थात हाडाचे पुणेकर विचारतील की आमचा नंबर पहिला आहे हे ठरविण्यासाठी कोणत्याही स्पर्धेची किंवा सर्वेक्षणाची गरज आहे का? त्याचप्रमाणे काहीजण नेहमीप्रमाणे उपहासाने विचारतील (पुणेकरांचा स्थायीभाव), इतर कोणतीही शहरं खरंच स्पर्धेत होती का फक्त पुणे आणि काही खेड्यांचीच स्पर्धा होती? हे पुणे आहे, इथे कशावरही टीका झाल्याशिवाय राहात नाही, अगदी स्पर्धेत पहिले येण्यावरही!  सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे ते सर्वेक्षण किंवा स्पर्धा कसली होती, त्यानंतर आपण प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे याचा निर्णय घेऊ शकतो. जनगृह सेंटर फॉर सिटीझनशिप अँड डेमोक्रसी, बंगलोर या संस्थेने देशातील महत्वाच्या शहरांचे सर्वेक्षण केले. त्याचा निकष होता नागरी प्रशासन व पायाभूत सुविधांच्या बाबतीत शहराचे व्यवस्थापन. हे मागील चार वर्षांपासून केले जात आहे व यामध्ये बराच डेटा गोळा करण्यात आला आहे. त्यानंतर मागील आठवड्यात पुणे, शहराचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात (साध्या शब्दात सांगायचे तर) सर्व शहरांमध्ये सर्वोत्तम असल्याचे जाहीर करण्यात आले. कोणताही उद्योग किंवा संघटनेप्रमाणे किंवा मोठे हॉटेल किंवा रुग्णालयाप्रमाणे, एका शहर चालविण्यासाठी एखादी यंत्रणा आवश्यक असते. पुण्यामध्ये आपण तिला पुणे महानगरपालिका असे म्हणतो. ही संस्था म्हणा किंवा प्राधिकरण म्हणा शहराचा कारभार सुरळीतपणे चालेल याची खात्री करते. ही अतिशय गुंतागुंतीची यंत्रणा आहे कारण त्यातले अनेक घटक केवळ नागरी नियोजनकर्त्यांनाच समजू शकतील. तरीही मला एक गोष्ट आठवतेय, एकदा चित्रपट निर्माता/दिग्दर्शक डेव्हीड धवनला विचारण्यात आले की तो एका चांगल्या चित्रपटाची व्याख्या कशी करतो? त्याने उत्तर दिले, जो चित्रपट तिकीटबारीवर दणक्यात चालतो आणि ज्यातून भरपूर पैसे मिळतात तो चांगला चित्रपट, त्याला आपण व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट म्हणतो. हे अगदी सरळसोट व स्पष्ट आहे. शेवटी कोणताही चित्रपट प्रेक्षकांसाठीच बनवला जातो व तेच त्याचे भवितव्य ठरवितात, तो चांगला असेल तर ते तो पाहण्यासाठी रांगा लावतील व तो नसेल तर रिकाम्या खुर्च्याच त्याचे भवितव्य सांगतील. त्याचप्रमाणे एखादे शहर चांगले आहे किंवा नाही हे केवळ त्या शहरातील नागरिकच ठरवू शकतात. त्या दृष्टिकोनातून पुणे शहर नेमके कुठे आहे हे आता आपण पाहू.

सर्वप्रथम आपण चांगल्या गोष्टींवर एक नजर टाकू, पुणेकरांचा खोचकपणा बाजूला ठेवला तर हे शहर वेगानं वाढतंय ही वस्तुस्थिती आहे. पुणे शहर कदाचित देशातील सर्वात मोठं स्थलांतर केंद्र आहे. मुंबई किंवा कोलकात्यामध्ये लाखो लोक प्रामुख्याने देशाच्या ग्रामीण भागातून अन्न व निवाऱ्याच्या शोधात घर सोडुन येतात, मात्र इथे परिस्थिती वेगळी आहेमुंबईतल्या स्थलांतरितांविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावसं वाटतं की त्यातील बहुतेक हे दारिद्र्य रेषेखालील, बिगर-कुशल कामगार वर्गवारीतील व उपजीविकेसाठीही काहीही करण्याची तयारी असलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. पुण्यात मात्र लोक शिक्षणासाठी येतात, ज्ञानार्जन करून एक सुसंस्कृत व्यक्ती होतात, नोकरी करतात. हे बहुतेक पांढरपेशे असतात व त्यांना अथार्जनासाठी काही कौशल्य आवश्यक असते. त्यामुळे पुण्यामध्ये सुशिक्षित, दर्जेदार लोकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. म्हणजे लोकांना असे वाटते की इथे त्यांना त्यांची कारकीर्द घडवता येईल, आदर मिळवता येईल, ज्ञान तसंच अर्थार्जन दोन्हीही करता येईलही पुण्यासाठी मोठी जमेची बाजू आहे कारण या लोकांमुळेच शहर घडते, केवळ इमारती, मॉल किंवा उद्योगांमुळे नाही. हे सुशिक्षित, साक्षर, सुसंस्कृत होण्याची आकांक्षा असलेले लोक पुण्याचे नागरिक आहेत त्यामुळेच पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे. एक लक्षात ठेवा; हा शहराचा कणा आहे कारण कोणत्याही शहराची संस्कृती (म्हणजे त्याचा जीवनाविषयीचा दृष्टीकोन) त्याच्या नागरिकांच्या सुसंस्कृतपणा वरून ठरते व यासंदर्भात पुण्याचे स्थान देशात फार वरचे आहे. माझ्यावर विश्वास ठेवा केवळ महाराष्ट्रातल्या लहान शहारांमधुनच नाही तर मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहारमधल्या सगळ्या तरूण पिढीसाठी स्थायिक होण्यासाठी पुण्याला सर्वाधिक पसंती असते. याचे कारण म्हणजे या सगळ्या भागांमध्ये रोजगारनिर्मिती व नागरी पायाभूत सुविधा अतिशय कमी आहेत तसेच कायदा व सुव्यवस्था (अर्थात संस्कृतीही) ढासळत चालली आहे. अनेक वाचकांना माझे विधान आवडणार नाही मात्र मी गृह बांधणीच्या क्षेत्रात काम करतोय व माझे ग्राहक सर्व क्षेत्रात आहेत. मला माझ्या वरील भागांमधून आलेल्या अनेक तरूणांनी हीच प्रतिक्रिया दिली आहेनागरी नियोजनाच्या बाबतीत असं नेहमीच घडतं की जेथे एका शहराचा फायदा होतो तेथे दुसऱ्या शहराचं नुकसान होतं. त्याप्रमाणे काही दशकांपूर्वी आपल्याकडचे बुद्धिमान लोक अमेरिका व युरोपात जात होते. अगदी आजही देशभरातल्या लोकांना पुण्यात स्थायिक व्हायचं असलं तरीही अनेक पुणेकरांचा ओढा अमेरिकेकडेच असतो. आता पुणेकरांना कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक का व्हायचं असतं असा प्रश्न विचारा? उत्तर सोपं आहे, चांगल्या जीवनशैलीसाठी व चांगल्या जीवनशैलीमध्ये फक्त पैसाच नाही तर (तो अर्थातच एक महत्वाचा घटक आहे), ज्ञानसागरात शोध घेण्याच्या संधी तसेच मनःशांतीचाही समावेश होतो.

तर पुण्यामध्ये शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत तसेच करिअर करण्याच्या संधी आहेत जिथे तुम्हाला तुम्ही मिळवलेले ज्ञान वापरता येते. त्याशिवाय आयुष्याला एक सांस्कृतिक तडकाही आहे, म्हणजे तुम्ही कमावलेला पैसा खर्च करण्याचे मनोरंजनाचे विविध पर्याय आहेत. औरंगाबाद किंवा नागपूर ही पुण्यापेक्षाही भौगोलिक महत्व अधिक असलेही शहरे पुण्यासारखी का वाढली नाहीत. एक साधी गोष्ट करा एका नव्या पदवीधराला पुण्यापेक्षा थोडं जास्त पॅकेज बाकीच्या शहरांमध्ये देऊन बघा व त्याला या शहरांमधून निवडायला सांगा, तो किंवा ती त्यानंतरही पुण्याचीच निवड करतील. याचे कारण या पिढीला हॅपनिंग आयुष्य हवं आहे जे त्यांना पुण्यात मिळतं तसंच सामाजिक सुरक्षाही मिळते! या हॅपनिंग आयुष्याचं इतकं आकर्षण आहे की माझा सातारा शहराजवळ एक प्रकल्प आहे, जिथे मला स्थानिकांशी चर्चा करायची संधी मिळाली. ते म्हणाले सातारच्या मुलींना तिथेच स्थायिक झालेल्या मुलाशी लग्न करायचं नसतं जे पुण्यापासून फक्त नव्वद किलोमीटरवर आहे. थोडा कमी पगार असला तरी चालेल पण त्यांना पुण्यात नोकरी करणारा मुलगा हवा असतो. त्यांना असं वाटतं स्थानिक मुलाशी लग्न केल्यावर साताऱ्यासारख्या लहान शहरातल्याच जीवनशैलीशी त्यांची गाठ बांधली जाईल जे त्यांना नको असतं. साताऱ्यात सगळं काही आहे, पाणी, हवा, शांतता, परवडणारे दर सगळं काही पुण्याहून चांगलं आहे तरीही लोकांना पुणंच हवं असतं. विचार करा ज्या लहान गावांमध्ये व शहरांमध्ये वरीलपैकी कोणत्याही गोष्टी नसतील त्यांची काय परिस्थिती असेल?

तर पुण्याचा रोजगाराच्या संधी, शिक्षण, संस्कृती व मनोरंजन (हॅपनिंगची माझी व्याख्या) या बाबतीत वरचा क्रमांक लागतो, मात्र ते नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करते का? मला आठवतेय मॉस्को ऑलिम्पिक्समध्ये अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी खेळांवर बहिष्कार टाकला होता, तेव्हा साम्यवादी देशांना शेकडो पदकं मिळाली होती. तसंच लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्सवर रशिया व मित्र राष्ट्रांनी बहिष्कार टाकला होता तेव्हा अमेरिका व मित्र देशांना खोऱ्यांनी पदके मिळाली होती. अर्थात त्यामुळे ऑलिम्पिक पदकाचं महत्व कमी होत नाही, मात्र या विक्रमांच्या दर्जाला आव्हान देता येऊ शकतं. फारशी गंभीर स्पर्धा नसेल तर अर्थातच स्पर्धकांच्या कामगिरीवर विपरीतच परिणाम होतो. अर्थात पुणे याच देशातील शहर आहे, आपल्यापुढेही इतर शहरांसारखीच आव्हानं आहेत त्यामुळे आपल्याला जे काही अव्वलस्थान मिळालं आहे ते कौतुकास्पद आहे. प्रशासकीय संस्था तसेच सरकारचं या प्रथम क्रमांकासाठी अभिनंद केलं पाहिजे! तरीही याचा अर्थ आपण सर्वोत्तम आहोत, आपल्यात कोणतेही दोष नाहीत असा होत नाही, केवळ मूर्खच व्यक्तीच असा विचार करतील, हेच मला दाखवून द्यायचं आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात सर्वोच्च स्थानी असलेली शहरे केवळ नागरिकांच्या अपेक्षांनुसार न बदलल्यामुळे रसातळाला गेली, पुणेही त्याला अपवाद नाही. या दृष्टीकोनातून काय परिस्थिती आहे याचा विचार करू.

तुमची तुमच्या शहराकडून काय अपेक्षा आहे? आपण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? मी विचारला आहे व मला माझे शहर निसर्गप्रेमी असावे असे वाटते. मला माझ्या भोवती भरपूर बुलबुल, मैना, चिमण्या असे पक्षी चिवचिवाट करताना हवे आहेत. अर्थातच त्यासाठी आपल्याला भरपूर झाडी व स्वच्छ पाणवठे आवश्यक आहेत. मला माझ्या शहरातून वाहणारी नदी स्वच्छ हवी आहे तसेच भोवताली भरपूर हिरवळ हवी. काठाला अधेमधे इमारती असतील तर काही हरकत नाही, मात्र लोकांना नदीच्या काठी आरामात फेरफटका मारता यावा असं मला वाटतं. मला वाहनांसाठी पुरेशी जागा असलेले रुंद रस्ते हवे आहेत त्याचशिवाय वक्तशीर चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही हवी आहे म्हणजे मला सतत स्वतःचं वाहन वापरावं लागणार नाही. मला माझं वाहन वापरावं लागतं तर त्यासाठी मला शहरात व भोवताली सुनियोजित पार्किंग व्यवस्था हवी आहे. हो, पार्किंगसाठी पैसे द्यायचीही माझी तयारी आहे कारण मी माझे खाजगी वाहन लावण्यासाठी सार्वजनिक जागेचा वापर करणार आहे. माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा मला पदपथ वापरता यावेत. त्यावर चायनिज खाद्यपदार्थ, वडापाव किंवा इतर साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण नको. रस्ते खड्डेरहित असावेत असे मला वाटते, वर्षभर रस्त्यावर सतत काहीतरी खोदकाम सुरू असलेलं मला पाहायचं नाही. आणखी एक गोष्ट, मला रस्त्याच्या कडेलाही हिरवळ हवी आहे, सगळीकडे काँक्रिटीकरण केलेले नको. मला विविध शहरांच्या सर्व भागात झळकणारे विचीत्र चेहरे असलेले होर्डींग्स (जे अवैध असतात हे मला माहिती आहे) नको आहेत तर मोकळेपणा हवा आहे. धूरकट ढगांनी आच्छादलेलं आकाश नाही तर निरभ्र, चमकत्या ताऱ्यांनी भरलेलं प्रदूषणमुक्त आकाश हवं आहे. मला सार्वजनिक शौचालये स्वच्छ व वापरण्याजोगी हवी  आहेत, म्हणजे शहारातल्या रस्त्यावरून जाताना माझी कुचंबणा होणार नाही. मला शहरातली सार्वजनिक शौचालये सहजपणे वापरता आली पाहिजेत व ती भरपूर हवीत. मला सरकारी शाळांमध्ये (म्हणजेच पुणे महानगरपालिकेच्या शाळा) सुसज्ज शिक्षक वर्ग, सुविधा तसंच व्यवस्थित साफसफाई हवी आहे. म्हणजे माझी घर कामवाली किंवा माझ्या वाहन चालकाच्या मुलांना प्रवेशासाठी खाजगी शाळांचे खेटे खालावे लागणार नाहीत. त्याचवेळी मला असं वाटतं की समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांसाठी शहरामध्ये आरोग्य सेवा सुविधा असल्या पाहिजेत. शहरातली मनोरंजनाची सार्वजनिक ठिकाणं समप्रमाणात विभागलेली असावीत असं मला वाटतं, जिथे नागरिक एकत्र येऊन कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात. शहरातल्या कुणाही नागरिकाला झोपडपट्टी किंवा अवैध इमारतींमध्ये राहावं लागू नये किंबहुना शहरामध्ये कुणीही अवैध बांधकाम करायची हिंमत करू नये असं मला वाटतं! सगळ्यात शेवटी मला इतर शहरांमधल्या माझ्या मित्रांना व कुटुंबियांना माझ्या शहरात बोलावता आलं पाहिजे व त्यांना अभिमानानं हे माझं अव्वल क्रमांकाचं शहर असं म्हणून दाखवता आलं पाहिजे. अशा सगळ्या सेवा मिळवण्यासाठी मी माझा मालमत्ता कर भरायला तयार आहे, पण माझी एक अपेक्षा आहे की कुणाही नागरिकाला (म्हणजेच राजकीय नेते, झोपडपट्टीवासी किंवा तत्सम) मालमत्ता करातून सवलत नसावी.

आता वर लिहीलेलं वाचल्यानंतर, तुम्हाला प्रश्न पडेल की हा दिवास्वप्न पाहतोय का किंवा मी माझे आदर्श शहर या विषयावर निबंध लिहीतोय ? तर मला तुम्हाला सांगावसं वाटतं की हा फक्त माझ्या स्वप्नाचा एक भाग आहे, मला शहराकडून ज्या गोष्टींची अपेक्षा आहे त्यांची यादी अजून संपलेली नाही. वरील यादी पाहिल्यानंतर, मी सरकारकडून काही चंद्र- सूर्य मागतोय का? आपण आरामशीरपणा किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे शहर असू तर मी शहराविषयी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता का होऊ नये? हेच या प्रथम क्रमांकावर टीका करण्याचं मुख्य कारण आहे, आपण तुलना तरी कुणाशी करतोय? पुण्यामध्ये देशातल्या इतर शहरांपेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत हे मान्य आहे, मात्र त्यामुळे हे आदर्श शहर होणार नाही ही वस्तुस्थिती आपण शासनकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे व स्वीकारली पाहिजे. अनेक गोष्टी व्हायला हव्यात पण प्रत्यक्षात शहरात संतुलित व समान पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत गोष्टी आपण साध्य करू शकलो नाहीत हे कटू सत्य आहे. आपण चांगले आहोत म्हणून या शहराची वाढ होतेय असे नाही तर जे पर्याय उपलब्ध आहेत त्यात आपण चांगले आहोत. हीसुद्धा कौतुकास्पद बाब आहे मात्र आपण सर्वोत्तमाचा ध्यास ठेवला नाही तर आपला ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही, इतिहासातही अनेक उत्तम शहरांचं असं झालेलं आहे. पुण्याची संस्कृती व ज्ञान हे शहराचे बलस्थान आहे हे विसरून चालणार नाही; ज्या शहरांनी आपले बलस्थान जपून ठेवले केवळ तीच शहरे टिकलीसगळ्यात शेवटी पहिल्या क्रमांकाचं शहर ठरल्याबद्दल थोडसं बोलू व त्याविषयी आनंद व्यक्त करू. आपल्याला हे बिरूद साजरं करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. मात्र आमीर खान त्याच्या दिल चाहता है या चित्रपटामध्ये म्हणतो की पर्फेक्शन को इंप्रूव्ह करना मुश्किल होता है!” तसंच आपणही स्वतःला सर्वोत्तम मानू लागलो तर आपली सुधारणा तिथेच थांबेल. आपल्या शहराचे राज्यकर्ते तसंच नागरिकांविषयीही हेच म्हणावसं वाटतं; तोपर्यंत आपण प्रथम क्रमांकाचं शहर असल्याचा आनंद साजरा करूच यात !

संजय देशपांडे
Mobile: 09822037109



No comments:

Post a Comment