Monday 20 August 2018

सर्वोत्तम शहर,एक जबाबदारीसुद्धा !
































रुक्ष, निष्क्रिय शहरं एक प्रकारे स्वतःच्या विनाशाचं बीजच रोवत असतात. मात्र उत्साहाने सळसळणारी, विविधतेने नटलेली, जोशपूर्ण शहरं स्वतःच्याच नवनिर्मितीची बिजं रुजवत असतात, त्यांच्यात स्वतःच्या समस्या सोडवण्याची व गरजा पूर्ण करण्याची ऊर्जा व क्षमता असते.”… जेन जेकब्ज.

जेन जेकब्ज या अमेरिकी वंशाच्या कॅनडियन लेखिका व कार्यकर्त्या होत्या. समाज, नागरी नियोजन व ऱ्हास हे प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांचं अमेरिकेतील 1950 च्या दशकातील नागरी नूतनीकरण धोरणांवर समर्पकपणे टीका करणारं द डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज (1961) हे पुस्तक अतिशय गाजलं. या पुस्तकाने केवळ नियोजनातील समस्यांचाच उहापोह केला नाही तर त्या काळातील विचारसरणीवरही मोठा प्रभाव टाकला. जेकब्ज त्यांच्या लेखनाशिवाय, स्थानिक परिसर नष्ट करणाऱ्या नागरी-नूतनीकरण प्रकल्पांना ठाम विरोध करण्याकरता तळागाळात केलेल्या कामासाठीही ओळखल्या जातात. बहुतेक लेखक अनेक पुस्तके लिहीतात मात्र त्यातील एखादंच पुस्तक साहित्याच्या इतिहासात त्यांचं नाव कोरून जातं. द डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज या पुस्तकाद्वारे जेन यांनी ही किमया साध्य केली आहे. मी माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये या पुस्तकाचा उल्लेख नागरी नियोजनाचे बायबल, भगवद्गीता किंवा कुराण असा केला आहे. मी जेन यांच्या पुस्तकांची तुलना या धर्मग्रंथांशी केल्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला माफ करा. पण नागरी नियोजनाच्या क्षेत्रासाठी जेन यांचं काम किती महत्वाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी मी ही तुलना केली.

पुण्यानं अलिकडेच राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं. म्हणूनच याविषयी बोलण्यासाठी मला जेन यांचे शब्द अतिशय चपखल वाटले. देशातील 40 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं व जवळपास चौदा निकषांवर या सगळ्या महत्वाच्या शहरांची तुलना करण्यात आली. त्यातूनच पुण्याला राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत पहिलं स्थान मिळालं, ही बातमी वर्तमानपत्रात सगळीकडेच हेडलाईन होती. हे चौदा निकष आहेत, सुरक्षा व सुरक्षितता, वीज पुरवठा, खात्रीशीर पाणीपुरवठा, जमीनीचा मिश्र वापर, अर्थव्यवस्था व रोजगार, प्रशासन, आरोग्य, गृहबांधणी समावेशकता, ओळख व संस्कृती, शिक्षण, सार्वजनिक ठिकाणे, प्रदूषणात घट, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व सर्वात शेवटचे म्हणजे परिवहन व गतिशीलता. या सर्व क्षेत्रांमध्ये शहरात कशाप्रकारे काम करण्यात आलं आहे यावरूनच त्या शहरातल्या नागरिकांचं आयुष्य कशाप्रकारचं आहे हे ठरतं.

तर सर्वप्रथम मी या सन्मानाबदद्ल शहरातल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो! शहरात काही समस्या निर्माण झाली (म्हणजे त्यातील सेवांच्या संदर्भात) तर आपण लगेच यंत्रणा, प्रशासकीय संस्था, सरकार किंवा एकमेकांना दोष देतो. म्हणजे सरकार (आपल्या इथे पुण्याचे नगरसेवक असं म्हणावं लागेल) प्रशासनाला दोष देते, प्रशासन राजकारण्यांना (अर्थात उघडपणे नाही) तसेच नागरिकांना (बहुतेकवेळा बांधकाम व्यावसायिकांना) दोष देते, बांधकाम व्यावसायिक भ्रष्टाचार व लाल फितीच्या कारभाराला दोष देतात, स्वयंसेवी संस्था वरील तिघांनाही दोष देतात व बिचारे नागरिक त्यांना या शहरात राहावं लागतंय म्हणून त्यांच्या नशीबाला दोष देतात. मात्र जेव्हा शहराला राहणीमानाच्या क्षमतेबद्दल पहिला क्रमांक मिळतो तेव्हा कुणीही इतरांचे अभिनंदन करत नाही, तर सगळ्यांमध्ये त्याचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू होते, त्यात पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक कुणीच मागे नसतं. खरंतर टीका करणं हा पुणेकरांचा स्थायीभाव आहे, त्यामुळे अनेकांनी लगेच ही गुणांकनाची पद्धत कशी चुकीची आहे, तसंच वर नमूद केलेल्या चौदा निकषांच्या संदर्भात शहरातील त्रुटींवर बोट ठेवत पुण्याला मिळालेला सन्मान कसा चुकीचा आहे अशी टीका करायला सुरूवात केली आहे (मी त्यांना पूर्णपणे दोष देत नाही)काही पुणेकरांनी त्याही पुढे जाऊन टीका केला की पुण्याला पहिला क्रमांक मिळवून देण्यात बांधकाम व्यावसायिकांचाच हात आहे, म्हणजे त्यांना मंदीमुळे विकल्या न गेलेल्या त्यांच्या सदनिका विकता येतील. मला असं वाटतं बांधकाम व्यावसायिकांना राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात अशाप्रकारे हस्तक्षेप करणं शक्य असतं तर त्यांनी इतके दिवस नक्कीच वाट पाहिली नसती! बहुतेक पुणेकरांनी उपहासाने प्रतिक्रिया दिली की, “राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक पहिला असेल तर इतर शहरांची स्थिती काय असेल याचा विचार केलेलाच बरा!”

ही शेवटची प्रतिक्रीया अतिशय महत्वाची आहे त्यातला उपहासाचा भाग काही वेळ बाजूला ठेवू, ज्याप्रमाणे अमेरिकन लोकांना त्यांच्या देशाबाहेर जगात काय चाललं आहे याचं सोयरसुतक नसतं (खरंतर बहुतेक अमेरिकन लोकांना त्यांच्या गावाबाहेर सुद्धा काय चाललं आहे याची महिती नसते), त्याचप्रमाणे पुणेकरांना पुणे शहराच्या पलिकडे काय चाललं आहे याविषयी कल्पना नसते. आता हिंजेवाडी आयटी पार्क, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाकण तसंच तळेगाव औद्योगिक क्षेत्रं यामुळे पुणेकरांना ही ठिकाणंही अस्तित्वात आहेत याची जाणीव झाली आहे, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे. काही महिन्यांपुर्वी गडचिरोली पोलीसांनी (पुणेकरांसाठी सांगतो, गडचिरोली हा महाराष्ट्राच्या पूर्वकडे असलेला एक जिल्हा आहे.) एका मोठ्या नक्षलवादविरोधी मोहीमेत तीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. मी या मोहिमेनंतर त्यात सहभागी असलेल्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांचं अभिनंदन करणारं एक पत्रं लिहीलं. त्यांचे प्रमुख डॉ. हरी बालाजी व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख या दोन्ही तरूण आयपीएस अधिकाऱ्यांनी मला धन्यवादपर पत्र पाठवलं. त्यात त्यांनी जे लिहीलं होतं ते अतिशय महत्वाचं होतं, पुण्या-मुंबईतल्या लोकांना गडचिरोली याच राज्यात व देशात आहे हे महिती असल्याचं पाहून अतिशय उत्साह व आनंद वाटला. आपण आपल्या शहरावर टीका करतो, पण आपल्याभोवती काय परिस्थिती आहे हे आपण पाहू म्हणजे आपल्याला ही जीवनशैली मिळाल्याबद्दल आपण किती सुदैवी आहोत याची जाणीव होईल. त्यासाठी आपल्या राज्याबाहेरच्या कशाला आपल्या राज्यातल्याच इतर शहरांशी तुलना करू. मी विदर्भातल्या एका अतिशय लहान गावातून आलोय. माझ्या कामामुळे मला राज्यभरात फिरण्याची व राज्यातल्या इतर शहरांमध्ये पायाभूत सुविधा व एकूणच जीवनाची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याची संधी मिळाली.
 सर्वप्रथम पुण्याला मिळालेला सन्मान योग्यच आहे कारण पुण्यामध्ये जशी राजकीय परिस्थिती आहे, नोकरशाही (लाल फित) आहे तसंच नागरिकांचा दृष्टिकोन आहे इतर शहरातही तशीच परिस्थिती आहे. पुण्याशी (म्हणजे पुणे महानगरपालिकेशी) स्पर्धा करणाऱ्या इतर सगळ्या शहरांमध्येही महानगरपालिका आहे, निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासकीय व्यवस्था आहे, त्यांनाही राजकीय हस्तक्षेप, जीएसटीसारख्या घटकांमुळे महसूलात आलेली तूट, चुकीची कर रचना किंवा निःश्चलनीकरणामुळे आलेली मंदी यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या इतर शहरांनाही पुण्यासारखंच लोकांनी मालमत्ता कर वेळेत न भरणे, अतिक्रमणे, अवैध बांधकामे (म्हणजे झोपडपट्या), अर्थसंकल्पातील तुटपुंज्या तरतुदी व इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तरीही या शहरांच्या तुलनेत नागरिक म्हणून पुण्यामध्ये आपल्या कितीतरी अधिक चांगल्या सेवा (म्हणजेच जीवन शैली) मिळतात ही वस्तुस्थिती आहे. फक्त इतर शहरांची परिस्थिती अतिशय वाईट असल्यामुळे आपल्याला पहिला क्रमांक मिळालाय असं नाही. तर यात इतरही अनेक बाबी आहेत ज्याविषयी कुणीही कधीच बोलत नाही. म्हणूनच आपल्याला ज्यांच्यामुळे पहिला क्रमांक मिळाला आहे त्यांचं मला अभिनंदन करावसं वाटतं. शहराची प्रशासकीय संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेचं हे मोठं यश आहे त्याचप्रमाणे शहराला हा सन्मान मिळवून देण्यात एमएसईडीसीएल (मला अजूनही एमएसईबी म्हणायला आवडतं), जलसिंचन विभाग, पोलीस विभाग यांचंही मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक संघटना, खाजगी क्षेत्रं व स्वयंसेवी संघटनांचं योगदानही आपापल्या परीनं मोठं आहे.

तुम्ही वर नमूद केलेले चौदा निकष पाहिले तर त्यापैकी प्रत्येकाचा शहरातील जीवनावर परिणाम होतो, मात्र त्यातही पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सुरक्षा/सुरक्षितता व शिक्षण हे सर्वात महत्वाचे आहेत. कोणत्याही शहरात हे चारही घटक व्यवस्थित असतील तर सर्व इतर घटक विशेषतः रोजगार येणारच.

आता अनेक पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक, रहदारी याचं काय असा प्रश्न पडेल? आपल्याला जेव्हा शिक्षणासाठी व नोकरीसाठी सगळीकडे फिरावं लागतं तेव्हाच आपल्याला वाहतुकीची गरज पडते. हे शहर किमान लोकांना सगळीकडे फिरण्यासाठी एक निमित्त तर देते, इतर शहरात तर रोजगारच नाही किंवा शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत ज्यासाठी नागरिकांना रोज ईतका प्रवास करावा लागतो. बऱ्याच जणांना माझा हा दृष्टिकोन आवडणार नाही आणि अर्थातच मी शहरातल्या वाहतुकीच्या भयंकर कोंडीचं समर्थन करत नाही, पण किमान या रहदारीच्या मागचं कारण तरी स्वीकारू की या शहरात नागरिकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे शहर बहुसंख्य नागरिकांना जगण्यासाठी फक्त एक कारण देत नाही तर ते कारण पूर्ण करायला संधीपण देते! पुण्यातल्या पाणीपुरवठ्याविषयी बोलायचं तर तो शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे असं म्हणता येईल, अर्थात मी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोताविषयी बोलतोय वितरणाविषयी नाही. आपलं सुदैव आहे की एकाच शहरासाठी जवळपास पाच धरणं आहेत. तुम्ही इतिहासाची पानं उलटून पाहा, ज्या शहराला वापरण्यायोग्य मुबलक पाणी मिळालं त्यांचीच भरभराट झाल्याचं दिसून येईल. विदर्भासारख्या प्रदेशातून आलेल्या माझ्यासारख्या माणसाशिवाय पाण्याचं महत्व कुणाला जाणवू शकेल. अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणी पुरवठा हीच एक समस्या आहे. वीज पुरवठ्याच्या बाबतीत, एमएसईडीसीएलच्या पुणे परिमंडळातून (प्रदेशातून) सर्वाधिक महसूल मिळतो. बहुतेक गावांमध्ये व शहरांमध्ये वीज कपातीची समस्या असताना पुण्याला मात्र चोवीस तास वीज पुरवठा होतो, म्हणूनच ते सर्वप्रकारच्या उद्योगांचे आवडते ठिकाण आहे.
 सुरक्षा व सुरक्षिततेविषयी बोलायचं तर याबाबतीतही अनेकजण टिका करतील की शहरात अजिबात कायदा व सुव्यवस्था नाही. मात्र तुम्ही आपल्या राज्यातल्या इतर गावांना व शहरांना भेट दिलीय का? विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुद्धा पुरुषांचा व स्त्रियांचा विभाग वेगळा असतो! तसंच बहुतेक शहरांमध्ये स्त्रिया रात्री उशीराचा सिनेमाचा खेळ पाहायला जाऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे रात्र जीवन पाहा. काही घटनांचा अपवाद वगळता हे महानगरांपैकी नक्कीच सर्वात सुरक्षित शहर आहे. याचे योग्य ते श्रेय पुणे पोलीसांना तसंच शहराच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीला (म्हणजेच नागरिकांना) दिलं पाहिजे, जी प्रत्येक पाहुण्याला आदरानं व प्रेमानं आपलसं करते. शिक्षण क्षेत्रात सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, डी वाय पाटील, एमआयटी, व्हीआयटी यासारख्या खाजगी संस्था तसंच सीओईपी, फर्ग्युसन कॉलेज, एसपी कॉलेज, एमईएस कॉलेज यासारख्या अनेक दर्जेदार सरकारी महाविद्यालयांमुळे हे निश्चितच पूर्वेचं ऑक्सफर्ड आहे. या सगळ्या शैक्षणिक संस्था सर्व प्रकारच्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवतात, त्यामुळेच इथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याच कारणाने पुणे रहाण्यासाठी अधिक योग्य आहे, ज्यामुळे देशभरातून लोक इथे येऊन स्थायिक होतात. मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे पाणी, वीज, सुरक्षा व शिक्षण हे मुख्य घटक असतील तर बाकीच्या गोष्टी आपोआप येतीलच, त्यानंतर तुम्हाला फक्त शहराच्या वाढीचं नियंत्रण करावं लागेल. मला असं वाटतं आपण इथून पुढे या वाढीचं योग्य नियंत्रण करण्यावरच लक्षं केंद्रित केलं पाहिजे. कारण चांगलं शहर असणं हा एक प्रकारे शापही आहे, त्यामुळे सगळेच जण या शहराकडे आकर्षित होतात, याचाच परिणाम वाहतुकीची कोंडी, लाखो अवैध बांधकामांच्या स्वरूपात आपण अनुभवतोच आहोत.

वरील परिच्छेदाचा शेवटचा भाग काळजी करण्यासारखा आहे, देशातील राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांमध्ये अव्वल क्रमांक पटकावणं ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे, मात्र त्यामुळे आपण परिपूर्ण झालो असं होत नाही हे आपण स्वतःला बजावलं पाहिजे. हा सन्मान आपल्या प्रवासातला मैलाचा दगड आहे असं मानलं पाहिजे. हा सन्मान शहरातल्या अनेक उद्योगांसाठी (रिअल इस्टेटसाठीही) नक्कीच वरदान ठरेल, मात्र कोणतंही बिरूद (म्हणजेच सन्मान) जबाबदारीशिवाय मिळत नाही. आता आपल्यावर शहरातल्या नागरी पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. वर्गात एखादा विद्यार्थी पहिला आल्यानंतर त्याचे किंवा तिचे शिक्षक तसंच पालक आणखी मार्कांची अपेक्षा करतात. आता आपण पहिल्या क्रमांकाचे शहर ठरल्यामुळे आपल्याविषयीच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आपण त्या पूर्ण करण्यात अपयशी ठरलो तर आगामी काही वर्षात हा सन्मान इतर कोणत्या शहराला दिला जाईल. तोपर्यंत तरी या यशात आनंद मानूया आणि आगामी आव्हानांना तोंड द्यायला सज्ज होऊ. लक्षात ठेवा कोणतंही शहर त्यातल्या इमारती, उड्डाणपूल किंवा उद्योगांमुळे सर्वोत्तम होत नाही, तर शहरातील नागरिकांमुळे, त्यांच्या शहराविषयीच्या दृष्टिकोनामुळे सर्वोत्तम होते. म्हणूनच आपल्या शहराला मिळालेला हा सन्मान टिकवून ठेवणं आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती करणं ही आपल्या सगळ्यांचीजबाबदारी आहे.


संजय देशपांडे
Mobile: 09822037109



No comments:

Post a Comment