Monday 13 August 2018

वन्यजीव चित्रपट महोत्सव,नागरीक आणि क्रेडाई !





















काँक्रीटचं शहर काँक्रीटसारखी रुक्ष माणसं तयार करतं! पण समाजाला फुलांसारख्या माणसांची,आकाशासारख्या माणसांची, झऱ्या सारख्या माणसांची, फुलपाखरासारख्या माणसांची, व जंगलासारख्या माणसांचीही गरज असते!”...  मेहमत मुरत इल्दान.

मेहमत मुरत इल्दान, हे आधुनिक तुर्की नाटककार, कादंबरीकार व विचारवंत आहेत. व फार कमी जणांना भारतात हे माहित असेल की त्यांनी मोहनदास करमचंद गांधी या नावाचे नाट्यसुद्धा लिहीले आहे! मानवतेच्या मूर्तीविषयी, राष्ट्रपित्याविषयी नाटक लिहीणाऱ्या व्यक्तीशिवाय मानवतेविषयी जास्त चांगले कोण लिहू शकते! मेहमत यांचे शब्द मला आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यामध्ये अलिकडे झालेला एक कार्यक्रम. पुणे शहर हे कला व संस्कृती संवर्धनाच्या बाबतीत फार सुदैवी आहे. कारण संस्कृती हा या शहराचा कणा आहे. ज्या शहरांनी आपली कला व संस्कृती जिवंत ठेवली, ती वाढण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तीच शहरे समृद्ध झाली. होय, कला व संस्कृतीसाठी जागेचा घटक अतिशय महत्वाचा असतो. इथे जागेचा अर्थ एफएसआयसारखा स्केअर फुटात जागा असा होत नाही, तर जागा म्हणजे  जी शहरातील नागरिकांच्या मनात असेल ती जागा ! आपल्याला असे नागरीक पाहिजे जे कला सादर करू शकतील, कला क्षेत्रात काम करू शकतील असे नागरिक असे नागरीक कलाकारांची दखल घ्यायला उत्सुक असतील त्याचबरोबर पहिल्या दोन वर्गवाऱ्यांमधील नागरिकांना आर्थिक तसंच सक्रीय पाठिंबा देणारे नागरिकही असले पाहिजेत तरच शहरामध्ये संस्कृती वाढेल. सुदैवाने पुण्यामध्ये तिन्ही वर्गवारीतले नागरिक आहेत, म्हणूनच पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे हे सांगायची गरज नाही. मित्रांनो विशेषतः बिल्डर मित्रांनो कृपया लक्षात घ्या, शहराचा हा अतिशय महत्वाचा पैलू आहे व या शहरातल्या संस्कृतीमुळे लोकांना येथे आनंदी व सुरक्षित वाटते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना इथे स्थायिक व्हावेसे वाटते. हेच लोक रिअल इस्टेटसाठी ग्राहक म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर सदनिका खरेदी करणारे आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.

आता या प्रस्तावनेचा काय संदर्भ आहे असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी सांगतो, निसर्ग व पर्यावरण संवर्धन हे कला व संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. निसर्गप्रेमी किंवा निसर्गाचा शोध घेणाऱ्या या कलाकारांच्या रूपाने आपल्याला निसर्ग अनेक स्वरूपात भेटीस येतो. निसर्गामध्ये लाखो आश्चर्ये आहेत व ती पाहण्याचे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. आपल्यापैकी सगळ्यांनी कधीना कधी ऍनिमल प्लॅनेट किंवा डिस्कव्हरी चॅनल पाहिले असेल व त्यातल्या वन्य जीवनाचे अद्भुत चित्रण पाहून थक्क झाला असाल, जे निसर्गाचेच एक रूप आहे. मात्र आपण अनेकदा पाहिले असेल की हे माहितीपट भारताबाहेरील जंगलांचे असतात (म्हणजे आफ्रिका, ब्राझील वा ईतर) आपल्याला या जंगलांविषयी आपुलकी वाटत नाही कारण आपल्याला अशाप्रकारचा प्रदेश भोवताली दिसत नाही. आपल्या देशामध्ये अतिशय वैविध्यपूर्ण वन्यजीवन असूनही वन्य जीवन छायाचित्रण अजूनही केवळ मूठभर लोकांसाठीच (म्हणजे थोडक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी) आहे. एखाद्या व्यक्तीची इच्छा असली तरी तिला वन्य छायाचित्रण छंद म्हणून क्वचितच परवडतो किंवा त्यातून अर्थार्जन करता येतं. खरंतर लेह-लडाखचे शून्यच्या खाली जाणाऱ्या तापमानातील वन्यजीव, कच्छच्या रणात 50 अंशाहून अधिक तापमानातील निसर्ग, पूर्वेकडील राज्यांमधील सदाहरित जंगले (नागालँड, अरुणाचल), पावसाने ओथंबलेले पश्चिम घाट, त्याशिवाय आपण मध्य भारतातील कान्हा व्याघ्र अभयारण्यातील हिरवी कुरणं कशी विसरू शकतो, निसर्गाची एवढी विविधता असलेला आपला देश वन्य जीवप्रेमींसाठी खरोखरच वरदान आहे. आपला एकमेव देश आहे जिथे वाघ व सिंह दोन्हीही आहेत, एकाच जंगलात नसले तरी देशात आहेत. बेदी बंधू, नल्ला मुथ्थू व किरण घाडगे यासारख्या काही व्यक्ती हे वन्य जीवन सौंदर्य त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवताहेत व त्याचे महितीपट बनवत आहेत. पण तरीही अनेक भारतीयांना आपल्याकडे किती उत्तम निसर्गसौंदर्य आहे याची जाणीव नाही व जाणीव असली तरीही केवळ काही जणच या स्थळांना भेट देऊ शकतात. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे किंवा तिच्याकडे काय ठेवा आहे हेच माहिती नसेल, तर आपण त्यांना भारतातील अशा जंगलांच्या संवर्धनाविषयी कसे जागरूक करणार आहोत. दुसरीकडे आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत (चीनपेक्षा फार मागे नाही) व ही लोकसंख्या आपल्या समृद्ध वन्य जीवनाला सर्वात मोठा धोका आहे.  आपल्या 120 कोटींहून अधिक लोकसंख्येमुळे आपण सातत्याने प्रत्येक जंगल, तळे, पर्वत, टेकड्यांवर अतिक्रमण करतो आहोत,माणसाने अगदी समुद्रालाही सोडलेले नाही.
जोपर्यंत आपण सामान्य माणसांना या समस्यांविषयी जागरूक करत नाही तोपर्यंत तो याबाबतीत स्वतःहून काहीतरी करेल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो. लोकांना वन्य सौंदर्य अनुभवायला मिळावे तसंच आपण स्वतःचीच संपत्ती कशी नष्ट करत चालले आहोत याची जाणीव होण्यासाठी माहितीपटांशिवाय उत्तम माध्यम कोणते असू शकते. म्हणूनच पुण्यामध्ये नेचर वॉकचे अनुज खरे यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला वन्यजीवन महितीपट महोत्सव वन्यजीवन संवर्धनाच्या दिशेने अतिशय महत्वाचे पाऊल होते, जो शहराच्या संस्कृतीचा अतिशय महत्वाचा भाग आहे.

आता तुम्ही विचाराल की क्रेडाईची (विकसकांची संघटना) वन्य जीवन माहितीपट महोत्सवातील भूमिका काय आहे? बांधकाम व्यावसायिकच धडाक्याने काँक्रीटची जंगले उभारून निसर्ग नष्ट करण्यामध्ये पुढे नसतात का? या महोत्सवात महान वन्यजीव माहितीपट निर्माता नल्ला मुथ्थू रणथंबोरमधली वाघीण मछलीवरील माहितीपट बनवतानाचे अनुभव सांगत असताना; त्यांच्या पाठीमागे वाघाचे छायाचित्र (योगायोग म्हणजे हे मीच काढलेलं छायाचित्रं होतं) असलेला कापडी फलक लावला होता, त्यावरचे क्रेडाई पुणेचे प्रतीक चिन्ह पाहून अनेकांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. वन्यजीवप्रेमी व क्रेडाई एकत्र आल्यामुळे माहितीपट महोत्सव अधिक औत्सुक्याचा विषय झाला. महोत्सवात दाखवण्यात आलेल्या बहुतेक माहितीपटांमध्ये काही अपवाद वगळता बहुतेकांमध्ये विशिष्ट प्रजाती किंवा अभयारण्याच्या एखाद्या भागाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिकांची (कोणत्याही अभयारण्याच्या आत व भोवती राहणारे स्थानिक लोक) भूमिका किती महत्वाची आहे हे दाखवण्यात आले. मी आधी म्हटल्याप्रमाणे बहुतेक ठिकाणी लोकांची गरज किंवा हाव आपल्या देशातील वन्य जीवनासाठी मोठा धोका झाली आहे. जोपर्यंत आपण स्थानिकांना संवर्धनातील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देत नाही व त्यांना त्यांची हाव नियंत्रणात ठेवायला लावत नाही तसंच त्यांच्या गरजा दुसऱ्या मार्गाने पूर्ण करायला लावत नाही तोपर्यंत वन्य जीवनाचे भविष्य अतिशय भयाण आहे. हे खरे असेल तर पुणे शहरात किंवा भोवताली वन्य जीवन म्हणजेच जैवविविधतेचे संवर्धन करण्याविषयी काय, ती कुणाची जबाबदारी आहे? या शहरातील पक्षी, फुलपाखरे, झाडे, फुले, नद्या, डोंगर व अगदी प्रत्येक कीटकाचे रक्षण करायची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे व बांधकाम व्यावसायिकही (क्रेडाईचे सदस्य) याच शहराचे नागरिक आहेत. म्हणून आपल्याला भोवताली हिरवंगार शहर, पक्ष्यांचा किलबिलाट हवा असेल तर बांधकाम व्यावसायिकांना नागरिकांसाठी घरे बांधताना त्यांना इतर प्रजातींच्या घरांचही संरक्षण करायचं आहे याची जाणीव ठेवावी लागेल. म्हणूनच असा प्रयत्न करणाऱ्या लोकांना सहकार्य करणे त्या दिशेने पहिली पायरी होती जे या महितीपट महोत्सवाद्वारे वन्य जीवन संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पुणे हे वन्य जीवन संवर्धनाविषयी जागरुकतेसाठी ओळखले जाते. अधिकाधिक लोक विशेषतः तरुण लोक आपले समृद्ध वन्यजीवन जाणून घेण्यासाठी देशाच्या विविध भागात भटकंती करत आहेत. अगदी पुणे जिल्ह्यातही अनेक प्रजातींचा समृद्ध वारसा आहे. देशातल्या कोणत्याही अभयारण्याला भेट द्या, तुम्हाला तिथे हमखास पुण्याचे लोक भेटतील. या ठिकाणचे लोक पुणेकरांच्या उत्साहासाठी तसेच वन्य जीवनाविषयी त्यांच्या जागरुकतेविषयी त्यांचा आदर करतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हीच आजची शहरातील पिढी रिअल इस्टेटची भविष्यातली ग्राहक आहे व वन्य जीवन संवर्धनाशी संबंधित होण्यामागचा क्रेडाईचा व्यावसायिक हेतू मी लपवून ठेवत नाही,आणि त्यामध्ये काहीही चुकीचे नाही असे मला वाटतेएखादी कंपनी (म्हणजे बांधकाम व्यावसायिक) घोड्यांच्या डर्बी रेसला प्रायोजित करू शकतो किंवा त्यांच्या प्रकल्पाच्या प्रसिद्धीसाठी एखाद्या बॉलिवुड अभिनेत्याला ब्रँड दूत म्हणून नियुक्त करू शकते, तर मग वन्य जीवन संवर्धनाला पाठिंबा देऊन तोच आपला मार्केटिंगचा  कणा बनवायला काय हरकत आहे? लक्षात ठेवा कोणतीही संवर्धनाची कृती चिरस्थायीही असली पाहिजे. त्याकरता राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी पैसे आवश्यक असतात, तुम्ही ज्या कारणा साठी पैसे खर्च करता त्यावरून तुमचा जगण्याचा दृष्टिकोन काय आहे हे लोकांना समजतं. आणि जर रिअल इस्टेट वन्यजीवन संवर्धन चळवळीसाठी पैसे खर्च करत आहे तर मी म्हणेन की या चळवळीतील आपल्या भूमिकेविषयी जागरुक होणं हे या माहितीपट महोत्सवाचं फलित आहे. हे त्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आहे. वन्यजीवन माहितीपट महोत्सवासारखे कार्यक्रम आपल्या शहराचा एक अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे शहरातले बांधकाम व्यावसायिक नाही तर दुसरं कोण त्यामध्ये योगदान देणार?
त्याचवेळी क्रेडाईच्या सदस्यांचे ग्राहक कोण आहेत हे विसरून चालणार नाही. याच शहरातले नागरिक त्यांचे ग्राहक आहेत व त्यांनाच वन्य माहितीपट महोत्सवात दाखवलेले माहितीपट पाहायचे आहेत. अर्थात महितीपटातली चित्तधरारक दृश्य पाहून, आश्चर्यचकित होऊन क्रेडाईचे या माहितीपट महोत्सवाला पाठिंबा देण्यासाठी आभार मानून नागरीकांची जबाबदारी संपत नाही. अहो तुमची जबाबदारी त्याहूनही मोठी आहे. मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे तांत्रिक ज्ञान असलेला चांगला बांधकाम व्यावसायिक असेल व तो तुम्हाला तुमच्या पैशांचा मोबदला देणारे घर बांधुन देणार असला, तरी या शहरातल्या बिचाऱ्या चिमण्या, मैना, बुलबुल किंवा फुलपाखरांना सेवा देण्यासाठी क्रेडाईचा सदस्य असलेला कुणीही बांधकाम व्यावसायिक नाही. तुम्हाला आणि मलाच त्यांचं घर बांधायचं आहे. तुम्ही जसं तुमचं घर घेताना त्यासाठी चोखंदळपणे चांगल्या व आधुनिक सुखसोयींची निवड करता, त्याचप्रमाणे तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला त्याने किंवा त्याच्या कंपनीने शहरात किंवा शहराभोवती वन्य जीवन संवर्धनासाठी काय केलं आहे हे विचारा? मला असं वाटतं असं केलंत तरच तुम्हाला स्वतःला जबाबदार पुणेकर म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. त्यानंतरच क्रेडाईचा वन्य जीवन माहितीपट महोत्सवातील सहभाग सार्थकी लागला असं मी म्हणेन.  किमान प्रत्येक बांधकाम व्यावसायिक क्रेडाईचा सदस्य तरी झाला पाहिजे. कारण ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती जंगलात जाऊन वन्य जीवन संवर्धनासाठी काही करू शकेलच असे नाही, पण तो किंवा ती किमान त्याबाबत जागरूक होऊन या संवर्धनात हातभार लावू शकतात.  त्याचप्रमाणे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला वन्य जीवनासाठी प्रत्यक्षरित्या काहीतरी करणे शक्य नाही पण तो जर क्रेडाईचा सदस्य असेल तर अप्रत्यक्षपणे त्याचा या कामाला हातभार लागेल. कारण ही संघटना नेचर वॉकसारख्या संस्था तसंच वन विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवते. ही वन्य जीवन संवर्धनाच्या दिशेने सुरूवात असेल. त्याशिवाय तुम्ही तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला त्याची कंपनी वन्य जीवन संवर्धनासाठी वैयक्तिकपणे काय करू शकते याविषयी मार्गदर्शन करू शकता पण त्यासाठी आधी तुम्ही त्यातली तुमची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. असं झालं तरच माणसाव्यतिरिक्त इतर प्रजातीही जगण्याची काही शक्यता आहे. नाहीतर पृथ्वीवर फक्त माणूस आणि काँक्रीटची जंगलंच उरतील, ज्यामध्ये जीवन तर असेल पण त्याचं काहीही मोल नसेल. मात्र वन्य जीवन महितीपट महोत्सवाचा फलक व त्यावरचं क्रेडाईचं नाव पाहून, मला व अनेकांना  सगळं काही संपलेलं नाही नक्कीच वाटलं. वन्यजीव प्रेमी म्हणून वन्य जीवन संवर्धनाची आशा जिवंत राहणं याहून अधिक मी काय मागू शकलो असतो!

संजय देशपांडे
Mobile: 09822037109


No comments:

Post a Comment