Sunday 16 September 2018

सेरेना,सरकार आणि गणेश उत्सव !






















"हे लक्षात ठेवा, अफाट शक्ती सोबत अपार जबाबदारी सुद्धा येते "… स्पायडर-मॅन.

या महाराष्ट्रातील सर्व आदरणीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, (हो कार्यकर्ते सुद्धा) आमचे शासनकर्ते म्हणजेच मायबाप सरकारला सप्रेम नमस्कार,

सर्वप्रथम मला तुम्हा सगळ्यांविषयी अतिशय आदर वाटतो हे मला सांगायचंय, कारण तुम्ही शेतकरी आत्महत्या, महागाई, जातीवर आधारित आरक्षण व इतरही अनेक समाजोउद्धारक मुद्दे उचलून धरता. मला माहितीय सामान्य जनांना तुमच्यातील बऱ्याच जणांची कामाची पद्धत आवडत नाही व अनेकांना तुमच्या कार्यकर्त्यांची भीतीही वाटते. पण आपल्या देशातली नेत्याची व्याख्या पाहिली तर त्यात आवश्यकच असते ना ? तर सांगायचा मुद्दा म्हणजे, तुम्ही मला ओळखत नसाल म्हणून मी आधी स्वतःची ओळख करून देतो. मी पुण्यातला एक अभियंता आहे. मी आज तुम्हाला उद्देशून हा लेख लिहीण्याचं कारण म्हणजे माननीय न्यायालयानं आपल्या शहरात डीजे बंदी (स्पीकरच्या भिंतींवर बंदी) व नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती विसर्जन करण्याविरुद्ध दिलेल्या आदेशाविरुद्ध आपल्या बहुतेक लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेविषयीची बातमी. तुमची भूमिका वेगळी असेल तर कृपया मला माफ करा, पण जे काही वर्तमानपत्रात याविषयी छापून आलंय त्यामुळे जनतेच्या मनात (तुमच्या बहुतेक मतदारांच्या मनात) तुमची प्रतिमा फार काही चांगली होणार नाही. संसदेत सुद्धा  खासदार म्हणूनही तुम्ही फक्त पाचशे पंचेचाळीस खासदारांपैकी काही मूठभर नसून शिवाजी महाराजांसारख्या महान राज्यकर्त्याच्या राज्याचं प्रतिनिधीत्व करता. म्हणूनच मला हा लेख लिहावासा वाटला कारण लाखो नागरिकांच्या मनात या राज्याची प्रतिमा, शिवरायांचं राज्य अशीच आहे. आजकालच्या काळातही खादार, आमदार, नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य हे त्यांच्या मतदारसंघाचे राजेच असतात व त्यांचे मतदार म्हणजे त्यांची प्रजा असते. एक लक्षात ठेवा शिवाजी महारांचा आदर फक्त त्यांचं शौर्य किंवा मुघलांविरुद्ध लढण्यासाठी केला जात नसे तर त्यांचा आदर निःपक्षपाती निवाडा व न्यायासाठीही केला जात असे.

मी तुम्हा सर्व आदरणीय मतदारांच्या राजांची लाउड स्पीकरच्या भिंती तसंच नैसर्गिक जलस्रोतात मूर्तीविसर्जनावर बंदीबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविषयी प्रतिक्रिया वाचली. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत कर्कश्श आवाजात स्पीकर वाजावेत याला तुमचा पाठिंबा आहे. कारण न्यायालयाच्या या निर्णयामुळे या बिचाऱ्या संगीत साधनांच्या मालकांचं खूप नुकसान होईल व त्याचा फटका त्यांच्या कुटुंबांनाही बसेल म्हणून तुम्ही अशी भूमिका घेतली असे कळते . तुम्ही तुमच्या मतदारसंघाचे राजे असल्यानं सरकारच्या अशा धोरणांमुळे कोणत्याही वर्गाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतोय का हा विचार करण्याची जबाबदारी तुमची नक्कीच आहे, तसंच न्यायालयानंही याचा विचार करणं आवश्यक आहे. मात्र माननीय न्यायालयानं मिरवणुकीत लाउडस्पीकरच्या भिंतींवर बंदी घालताना समाजाच्या भल्याचा व्यापक दृष्टीकोनातून विचार केला आहे. यासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या इतर कार्यक्रमांवर बोट ठेवलंय. विविध संगीत महोत्सवात तसंच कार्यक्रमांमध्ये लाउड स्पीकरचा वापर केला जातो व पोलीस तसंच न्यायालयं अशा वापराला परवानगी देतात. आता हे विधान एखाद्या नागरिकानं केलं असतं तर मी त्यावर टिप्पणी केली नसती, पण तुम्ही तुमच्या प्रजेचे राजे आहात. एक गोष्ट कृपया लक्षात घ्या की एका चुकीच्या कृतीचं समर्थन दुसऱ्या चुकीच्या कृतीनं करता येत नाही. कोणत्याही सांस्कृतिक किंवा धार्मिक हेतूनंही लाउड स्पीकरचा लोकांना त्रास होईल असा वापर करणं चुकीचंच आहे. म्हणून कुणाही अधिकाऱ्यांनी अशी परवानगी दिली तर तुम्ही लोकांना त्याविरुद्ध न्यायालयात जायला सांगू शकता. त्याचशिवाय लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही स्वतः त्याविरुद्ध याचिका दाखल करू शकतायामुळे लोक एक चुकीची परवानगी दिलीय तर मग दुसरी चुकीची परवानगी द्यायला काय हरकत आहे असा विचार न करता कायद्याचा अधिक आदर करतील.

लाउडस्पीकरच्या भिंतीवर आपल्या देशातल्याच न्यायालयानं बंदी घातलीय. विचार करा शिवाजी महाराज केवळ एखाद्या घटकाच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या हिताचा निर्णय घेणाऱ्या स्वतःच्याच न्यायव्यवस्थेविरुद्ध कधीतरी बोलले असते का? प्रिय लोकप्रतिनिधींनो (राजांनो), सामान्य माणसाला आधीच वायू, ध्वनी, जल व इतरही अनेक प्रदूषणांना सामोरं जावं लागतंय. या लाउडस्पीकरच्या भिंतींमुळे होणाऱ्या कर्कश्श आवाजामुळे म्हाताऱ्या लोकांना व लहान मुलांना त्रास होतो, डीजे यंत्रणेच्या मालकांप्रमाणे ही सुद्धा तुमचीच माणसं (प्रजा) आहेत. हे सगळे लोक शांतपणे जगता यावं म्हणून तुमच्याकडेच पाहतात. म्हणूनच त्यांनी ध्वनी प्रदूषणासाठी तुमच्याकडे नाही तर कुणाकडे दाद मागायची. तुम्ही सगळे राजे आहात त्यामुळे तुम्ही शब्द टाकला तर सरकार या डीजेवाल्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी नक्कीच विचार करेल. कारण सरकार देशातील असंख्य घटकांचा जसे की शेतकरी, विचार करू शकते तर मग या डीजेवाल्यांचा विचार का करणार नाही. मात्र या डीजे यंत्रणेमुळे जे प्रचंड ध्वनी प्रदूषण होतं त्यामुळे हजारो लोकांच्या आरोग्यावर किती घातक परिणाम होतो याचा विचार करा व हे सगळे लोकही तुमचीच प्रजा आहेत.

त्याशिवाय माननीय न्यायालयानं तलाव, नद्या किंवा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणपतीच्या मूर्ती विसर्जन करायला बंदी घातली आहे. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांची भूमिका आमच्याच शहरातल्या जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यापासून आम्हाला कोण रोखतं हे पाहू अशी आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याच शहरातल्या किंवा प्रभागातल्या तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये विसर्जन करण्यापासून तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही. पण तुम्हाला आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांविषयी एक धडा होता आठवतंय का. त्यामध्ये त्यानं त्यांच्या सरदारांना तसंच किल्लेदारांना त्यांच्या परिसरातील झाडं तोडू नका व जैव विविधता जपा असा आदेश दिला होता. याचसाठी ते जनतेचा राजा म्हणून ओळखले जात, असा त्यात उल्लेख होता. कृपया एक लक्षात घ्या तुमच्या शहरात एखादा तलाव किंवा नदी असेल तर त्या तलावातले किंवा नदीतले मासे, साप, कीटक हेसुद्धा तुमचीच प्रजा आहेत. म्हणूनच गणपती विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे या सगळ्या प्रजाती नष्ट होणार असतील तर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्या कुणाकडे दाद मागतील?

राजा हा माणसांसाठीच नाही तर त्याच्या अधिकार क्षेत्रातल्या प्रत्येक प्रजातीसाठी देवासारखा असतो. राजा त्याच्या राज्यातल्या प्रत्येकाच्या अगदी मुंगीच्या आयुष्यासाठीही जबाबदार असतो. आता तुम्हीच विचार करा आपण तलाव व नद्यांमध्ये विसर्जनाला परवानगी देऊन काय साध्य करणार आहोत. खरंतर तुम्ही कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जनाला परवानगी न देऊन तसंच मिरवणुकीतलं ध्वनी प्रदूषण कमी करून संपूर्ण राज्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण करू शकता. तुमच्या मतदारसंघातले लोक तुम्हाला अतिशय मान देतात, तुम्ही चांगले आहात म्हणूनच त्यांनी तुम्हाला निवडून दिलंय. म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. त्याचशिवाय रस्त्यावर घातल्या जाणाऱ्या गणपती मंडपांमुळे आधीच खोळंबलेल्या रस्त्यावर आणखी वाहतूक कोंडी होते, पदपथ अडवले जातात. आपण गणशोत्सव कशाप्रकारे साजरा करतो, लोकांना आनंद देण्यासाठी का त्यांना त्रास व्हावा यासाठी, याविषयी गांभिर्यानं विचार करायची वेळ आली आहे.

मला माहितीय बहुतेक नगरसेवक ,आमदार व खासदार क्रीडाप्रेमी आहेत. रशियात अलिकडेच झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सगळ्यांनी तेथील जपानी चाहत्यांचं अतिशय कौतुक केलं. त्यांच्या संघाच्या सामन्यानंतर त्यांनी प्रेक्षागरात झालेला सगळा कचरा गोळा केला मगच स्टेडीअम सोडले. त्याचप्रमाणे तुम्ही सगळे आपापल्या प्रभागात प्रदूषण-थांबवा मोहीम सुरू करू शकत नाही का? असा पुढाकार घेण्यासाठी जग निश्चितच तुमचं कौतुक करेल. अर्थात डीजे मालकांचीही वेगळी काळजी घ्या एवढंच एक प्रजा म्हणून (नागरिक म्हणून) माझं तुमच्याकडे मागणं आहे.

मला या निमित्तानी आणखी एक उदाहरण तुम्हाला द्यावसं वाटतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलिकडेच टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सची पंचांशी खडाजंगी झाली, कारण त्यांनी तिच्याविरुद्ध काही निर्णय दिला. तिनं पंचांसाठी अपशब्द वापरले ज्यासाठी तिला दंड झाला. माध्यमांमध्ये याविषयी बरीच चर्चा सुरू होती म्हणून तुम्हीही याविषयी ऐकलं असेल. अनेक प्रसिद्ध खेळाडु सेरेनाच्या बाजूनं व विरुद्धही बोलले. सेरेनाचं म्हणणं होतं ती महिला असल्यामुळे पंचांनी इतकी कठोर भूमिका घेतली. पंच पुरूष खेळाडूंच्या बाबतीत अशा अनेक घटनांकडे दुर्लक्ष करतात. हा मुद्दा खरा असला तरीही, सेरेनानं जे केलं त्याचं समर्थन करता येत नाही हे एक क्रीडाप्रेमी म्हणून तुम्हीही मान्य कराल. खरंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेनानं पंचांचा आदर करून एक आदर्श निर्माण करायला हवा. पंचाचीही चूक होऊ शकते कारण ते सुद्धा माणूसच आहेत. सेरेनानं खिलाडूवृत्तीनं चुकीचा निर्णय स्वीकारला असता आणि सामन्यानंतर पंचांच्या निकृष्ट कामगिरीविषयी तक्रार केली असती तर अधिक योग्य झालं असतंयाचं कारण म्हणजे ती नंबर एकची  खेळाडू आहे व लाखो तरूण खेळाडू तिच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. स्पायडर मॅनच्या चित्रपटातही हेच सांगण्यात आलंय की राजा होणे किंवा अव्वल होणे ही मोठी शक्ती असली तरी तिच्यासोबत मोठी जबाबदारीही असते. कारण लाखो लोकांचं भविष्य तुमच्यावर अवलंबून असतं. लोकप्रतिनिधी म्हणूनही तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही आज प्रदूषणाविरुद्ध जी भूमिका घेणार आहात त्याचेच तरुण पिढी भविष्यात अनुकरण करणार आहे.

म्हणूनच लोकप्रिनिधींनो तुम्हाला सामाजिक समस्या तसंच सामान्य माणसाच्या समस्यांकडे अतिशय संवेदनशीलपणे पाहावं लागणार आहे. प्रदूषण ही केवळ माणसांसाठीच नाही तर चिमण्या, फुलपाखरं यासारख्या प्रत्येक प्रजातीसाठी मोठी समस्या आहे, यामुळेच या प्रजाती शहरांमधुन नामशेष होत चालल्या आहेत. तुम्ही वाचलं असेल की आपल्याला कधीकाळी हिरव्यागार असलेल्या पुण्यामध्ये आजकाल मैना, बुलबुल, चिमण्या यासारखे पक्षी पाहायला सुद्धा मिळत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे ध्वनी व वायू प्रदूषण. या प्रजाती कर्कश्श आवाजात तसंच आपल्या वाहनांमधून निघालेल्या विषारी वायूंनी भरलेल्या हवेत जगू शकत नाहीत. मुळा-मुठा नदी तसंच शहरातल्या तलावांमधल्या माशांसहीत अनेक प्रजातींचीही अशीच परिस्थिती आहे. आपण आपले सगळे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित केले आहेत. आपण या पाण्यातले बहुतेक मासे व कीटक नष्ट केले आहेतमाझं शहरातले सगळे आमदार, खासदार व नगरसेवकांना आवाहन आहे की, त्यांनी एकत्र येऊन एक तरी गणेशोत्सव निसर्गाप्रती  आदर्शपणे साजरा करून दाखवावा. जगाला दाखवून द्यावं की तुम्हाला तुमच्या शहराची (म्हणजेच तुमच्या प्रजेचीही) खरंच काळजी आहे, एवढंच मला सांगायचं आहे. देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचा मोठा नावलौकिक आहे. म्हणूनच प्रदूषणरहित विसर्जन मिरवणूक काढून हा नावलौकिक आणखी वाढवू. मी काही चुकीचं बोललो असेन तर मला माफ करा. तुमची प्रजा म्हणून जे काही सांगावसं वाटलं ते मी लिहीलं, मला जनतेचे राजे म्हणून तुमच्याबद्दल आदर वाटतोच. गणपती बाप्पा मोरया!


संजय देशपांडे
09822037109



No comments:

Post a Comment