Wednesday, 7 November 2018

अवनी नावाचा निसर्गाचा धडा !खरंतर वाघ, जखमी नसताना किंवा नरभक्षक नसताना, अतिशय सुस्वभावी असतात... कधीकधी, वाघाच्या बछड्यांच्या अति जवळ जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर तो हरकत घेतो. ही हरकत गुरगुरण्याच्या स्वरूपात असते, आणि ती पुरेशी प्रभावी नसेल तर घाबरवणाऱ्या डरकाळ्या फोडत थोड्या अंतरापर्यंत पाठलाग करतो. या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर, त्यानंतर झालेल्या कोणत्याही इजेची संपूर्ण जबाबदारी घुसखोरावर असते.... जिम कार्बेट


नरभक्षक वाघाने कथित हल्ले केल्याच्या शेकडो खोट्या अफवा आमच्याकडे येत होत्या, त्यामुळे अगणित मैल चालावे लागे, पण याची अपेक्षा होतीच, कारण प्रस्थापित नरभक्षक असलेल्या त्या भागामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या सावलीवर सुद्धा शंका घेत असे, आणि रात्री ऐकू आलेला प्रत्येक आवाज नरभक्षक वाघाचा असल्याचे सांगितले जाई. ....जिम कार्बेट


तर, वन्यजीवाची आवड असणाऱ्यांना वरील नावाची  वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, पण पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये इमारतीच्या आवारांमध्ये अखेरच्या उरलेल्या काही झाडांवर कधीतरी दिसलेली चिमणी किंवा बुलबुल (याचेही दर्शन दुर्लभ झाले आहे), यांचा अपवाद वगळता ज्यांचा वन्यजीवाशी फारसा संबंध आलेला नाही, तसेच ज्यांचा वन्यजीवाशी केवळ वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्या यांच्यापुरते मर्यादित आहे, आणि आता ते असा विचार करत असतील ती अवनी ऊर्फ टी1 हा एखादा परग्रहावरील प्राणी आहे, त्यामुळेच तिला इतकी प्रसिद्धी मिळाली असेल! (खेदाने मृत्यूनंतरच, जे आपल्या देशात नेहमीचेच आहे, उदा. निर्भया प्रकरण). तर अशा सर्व लोकांसाठी,जिम कार्बेट हा या देशाने पाहिलेला कदाचित सर्वोत्तम वाइल्ड लाइफर होता (मला त्यांना कधीही वाघाचा शिकारी म्हणायला आवडत नाही, अगदी नरभक्षक वाघाचे शिकारी असेही नाही), त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिमालयाच्या पर्वतरांगांमधून, म्हणजे गढवाल/कुमाऊँ येथे व्यतीत केले आणि वाघाच्या वर्तनावर अधिकारवाणीने बोलणारे  ते अभ्यासक आहेत आणि त्यांनी वाघ व वन यांच्याबद्दलचे त्यांचे अनुभव चार उत्कृष्ट पुस्तकांमध्ये शब्दबद्ध केले आहेत, दुर्दैवाने ही पुस्तके त्यांनी नरभक्षक वाघाला मारण्यासाठी पाठलाग केल्याबद्दल अधिक लोकप्रिय झाली आहेत. आपण भारतीय (पुन्हा एकदा देशभक्तांप्रति आदर दाखवून) इतिहासापासून शिकण्यात नेहमी कमी पडतो, मग तो इथिहास प्राचीन असो अथवा कॉर्बेटच्या काळाइतका म्हणजे केवळ एक शतक जुना असो! एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक झाल्यानंतर त्याचा मागोवा घेण्यासाठी आणि मारण्यासाठी त्यांना बोलावण्यात येई (तेव्हा खूप अधिक वाघ अस्तित्वात होते आणि जंगलेही आतापेक्षा मोठी होती), या कामामध्ये ते प्रवीण होते पण त्यांना कधीही ते काम आवडले नाही! ते कोणत्याही नरभक्षकाचा मागोवा काढून त्याला मारू शकत होते कारण ते शार्प शूटर होते म्हणून किंवा त्यांना शिकार आवडत होती म्हणून नव्हे, तर त्यांनी वाघाबरोबरच जंगलांचा संपूर्ण अभ्यास केला होता, तसेच ते ज्या लोकांमध्ये नरभक्षक वाघ फिरत असत आणि शिकार करत असत त्या लोकांचाही त्यांनी अभ्यास केला होता! अन्यथा वरील दोन अवतरणांमध्ये ते वाघांबद्दलची आत्मीयता तसेच तो नरभक्षक झाल्यानंतर त्याला मारण्याची गरज व्यक्त केली नसती! बरे वाघ हा नरभक्षक का होतो याची कारणेही त्यांनी नमूद केलेली आहेत, आणि आपण  मात्र गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करत आहोत!

आता चर्चेत असलेल्या अवनी वाघिणीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सज्ज झाले असाल, आणि तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती आहे की ती नरभक्षक झालेली वाघीण होती, म्हणजे तिने हरणे किंवा जंगली म्हैस अशा तिच्या नेहमीच्या भक्ष्यांपेक्षा जास्त माणसे मारायला सुरुवात केली होती, त्यामुळे आपल्या राज्यातील वन्यजीवांची जबाबदारी असलेल्या  वनखात्याला तिच्यापासून लोकांना वाचविणे आवश्यक होते, तिला पकडून किंवा तिला मारून तर यातील त्यांनी दुसरा पर्याय निवडला म्हणजे अवनी वाघिणीला, तिचे जंगलातील नाव टी1 होते, ठार मारले. अवनी आणि टी1 नावाच्या दोन वाघिणी होत्या का हे ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ही माहिती, तर बहुतांश वेळा वाघ किंवा वाघिणीला जिथे जन्म घेतलेला असतो किंवा वावर असतो त्या क्षेत्रातील स्थानिक नाव मिळते किंवा एखादा गाईड ते नाव देतो किंवा स्थानिक लोक त्यांना योग्य वाटेल अशा नावाने संबोधायला सुरुवात करतात (मला वाटते अवनीच्या बाबतीत असेच घडले). पण वनखाते अशा नावांनी प्रत्येक वाघाची नोंद ठेवू शकत नाही कारण प्रत्येक वाघ जैविदृष्ट्या वेगळा असतो त्यामुळे व्याघ्रगणनेनंतर टी1, टी2, टी3, इत्यादी नावे दिली जातात आणि ही नावे वाघांच्या ज्येष्ठक्रमतेनुसार दिले जातात, म्हणजे कान्हा जंगलामध्ये टी1 वाघ असेल आणि ताडोबा जंगलांमध्येही टी1 वाघ असेल, पण दोन्ही वाघ वेगवेगळे असतात!

इतक्या तपशीलांबद्दल माफ करा, पण 120 कोटी भारतीयांमध्ये अतिशय कमी संख्येने असलेल्या डाय हार्ड वाइल्ड लाइफरचा आदर ठेवूनही असे म्हणावे लागते की, वन्य जीव संवर्धानाचा विषय येतो तेव्हा सामान्य माणसांमधील जनजागृतीची पातळी ही सामान्यपणे वर दिलेल्या तपशीलांपासून दूर असते! त्यामुळे मला हे प्रकरण वाघिणीच्या नावापासून तपशीलवार मांडणे आवश्यक वाटले. मी स्वतःला वन्यजीवांचा तज्ज्ञ म्हणून नक्कीच समजत नाही, पण मला जंगले, वाघ, जंगलांभोवतीचे स्थानिक लोक आणि हो वनखाते यांच्या अधिक संपर्कात येण्याचे भाग्य लाभले आणि त्यामुळे माझ्या अनेक मित्रांनी मला व्हॉट्सअॅप करून किंवा मेल करून अवनी वाघिणीला मारल्याच्या संपूर्ण प्रकरणावर माझे मत मांडावे असे सुचवले! शिवाय आपल्याकडे अनेक तज्ज्ञ, संवर्धक तसेच वरिष्ठ वन अधिकारी आहेत, तरीही अनेक वेळा एकच प्रसंग चुकीचा किंवा बरोबर, वाईट किंवा चांगला ठरवला जातो, आणि तुम्ही कोणत्या बाजूने आहात त्यानुसार ते ठरते! आणि वन्यजीवाशी संबंधित सर्व बाजूंनी थोडाबहुत संपर्क आल्यानंतर मला वाटते असे काही घडते तेव्हा आपल्याकडे संतुलित भूमिकेची सर्वाधिक उणीव आहे (मी आपल्या राज्यकर्त्यांबदल्ल बोलत आहे, विशेषतः ट्विट करणारे आणि वर्तमानपत्रात झळकणारे मंत्री)!
आता, अवनी वाघिणीबद्दल झालेल्या या सगळ्या गदारोळामागील कारण काय आहे ते पाहूयात; ती विदर्भाच्या जंगलामध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या पूर्वेला, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूला  होती (शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे सर्वाधिक झालेले मृत्यू हे यवतमाळ जिल्ह्यामधीलच आहेत ही एक लक्षणीय बाब). आणखी एक गोष्ट म्हणजे तिच्याबरोबर दोन छावे सुद्धा आहेत, ते जवळपास अकरा महिन्यांचे आहेत आणि यामुळे हा प्रकार अधिकच विवादास्पद झाला आहे, कारण या वयाचे छावे आईविना टिकाव धरू शकत नाहीत आणि त्यांना पकडले नाही तर त्यांच्या आईपाठोपाठ म्हणजे अवनीपाठोपाठ त्यांचा मृत्यूही निश्चित आहे. आता गोष्ट अशी आहे की अवनी वाघीण गेल्या दोन वर्षांपासून नरभक्षक झाली आहे, याचा अर्थ आधी नमूद केल्याप्रमाणे तिने माणसांना स्वतःचे भक्ष्य म्हणून मारण्यास सुरुवात केली आणि हे धोकादायक आहे, विशेषतः ती राखीव जंगलात नसताना. पुन्हा ताडोबा किंवा कान्हा अभयारण्यासारख्या राखीव जंगलांचा अर्थ असा की, या जंगलांमध्ये मानवी हालचालींवर मर्यादा असतात किंवा त्यावर बंदी असते, जेणेकरून येथे वाघ नरभक्षक होण्याची शक्यता कमी असते, तर अवनी ज्या जंगलामध्ये राहत होती त्यामध्ये भोवती मानवी वस्ती आहे, याचा अर्थ तिचा मानवी आयुष्याशी सहज संपर्क येत होता. बरे ती नरभक्षक का झाली हे आपल्याला केवळ तीच सांगू शकते, ते आता शक्य नाही (ते तसेही शक्य नव्हते) पण मुद्दा हा आहे की, वाघाने माणसाला मारायलाच नाही तर खायला सुद्धा सुरुवात केली असल्याचे आपल्याला ठाऊक झाल्यानंतर आपण काय करतो? याबाबतीत सर्वांचा योग्य तो आदर राखून असे म्हणेन की, मी हे वाचणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीइतकाच गंभीर वाइल्ड लाइफर आहे, तरीही कृपया हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की, पुण्या-मुंबईमध्ये तुमच्या इमारतीच्या 10व्या मजल्यावरील घरामध्ये बसून एका निष्पाप वाघाला मारणे हे लाजिरवाणे आहे. अशा प्रकारची मते व्यक्त करणे सोपे आहे, पण कल्पना करा कोणत्याही नागरी भागपासून दूर अशा दुर्गम खेड्यामध्ये तुमचा जमिनीचा लहानसा तुकडा आहे, तिथे मोबाईलचे व्यवस्थित नेटवर्कसुद्धा (अगदी जिओसुद्धा) नाही, वीज नाही, तुम्ही तुमच्या शेतात जे पिकवाल त्यावरच तुमचे आयुष्य अवलंबून आहे, त्यामुळे तुम्हाला घराबाहेर जाऊन तुमच्या शेतावर काम करावे लागते! तुमच्याकडे एखादी काठी किंवा कुऱ्हाडीशिवाय दुसरे हत्यार नाही आणि हो, तुम्हाला तुमची पत्नी किंवा म्हाताऱ्या आई-वडिलांसोबत शेतात जावे लागते. आणि आणखी एक गोष्ट, तुमची लहान मुले शाळेत जातात, ती शाळा तुमच्या शेतातील तुमच्या घरापासून एक ते दोन किलोमीटर दूर आहे आणि तिथे कोणतीही स्कूलबस सेवा नाही, त्यामुळे त्यांना चालत शाळेत जावे लागते. आणखी एक गोष्ट, पुण्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये शौचालय नाही आणि रात्री तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांना रात्रीच्या वेळी निसर्गाची हाक आली तर घराबाहेर काही मीटर अंतरावर शौचालयात किंवा त्याहून दूर उघड्यावर चालत जावे लागते! तर आता कल्पना करा की एक वाघीण तुमच्या घर शेताभोवती फिरत आहे आणि ती माणसांना मारते आणि खाते आता तुमची प्रतिक्रिया काय असेल? मला अचंबा वाटतो, आता अवनीला मारल्याबद्दल सरकारची (म्हणजे वनखात्याची) लाज काढणारे किती लोक प्रत्यक्षात तिथे गेले असते आणि या दहशतीत जगणाऱ्या शेतकऱ्यांसोबत किंवा स्थानिक लोकांसोबत राहिले असते आणि लक्षात घ्या, हे मी म्हणत नाही, याच देशामधील नरभक्षक वाघाच्या दहशतीचे श्री. जिम कॉर्बेट यांनी जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी वर्णन केले होते, फक्त आपण इतिहास विसरतो आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हेही विसरतो!

आणि एकदा वाघ नरभक्षक झाला की तो त्याच्या नैसर्गिक स्वभावापेक्षा दसपट अधिक धोकादायक होतो, तो एक अतिशय हुशार प्राणी आहे, भक्ष्याची शिकार करणे हे त्याच्यासाठी जन्मजात असते! वाघ हा हरणासारख्या चपळ आणि गव्यासारख्या (रानरेडा सुद्धा म्हणतात) ताकदवान प्राण्याची शिकार काही क्षणात  करू शकतो तेव्हा माणसासारख्या दंतहीन, अचपळ, शिंग नसलेल्या, (अंधारात) पाहू न शकणाऱ्या आणि सामर्थ्यहीन प्राण्याला त्याचे भक्ष्य होण्यापासून बचाव करण्याची अशी कितीशी संधी असते? तरीही अनेक वन्यजीवप्रेमी (संवर्धक) अवनीला न मारता, तिला बेशुद्ध करून पकडण्याची विनंती करत होते. आता अंधारात म्हणजेच रात्रीच्या वेळेस वाघाला बेशुद्ध करता येत नाही किंवा मारताही येत नाही अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत किंवा पुस्तकातले नियम दाखवले जात आहेत. नियम हे माणसांनी, माणसांसाठी लिहिलेले असतात आणि अवनी माणूस नव्हती त्यामुळे तिला हे नियम माहीत असणे अपेक्षीत नव्हते (तिच्यासाठी चांगले झाले अन्यथा कोणीही तिच्या मृत्यूची दखल घेतली नसती)! वाघ नरभक्षक होतो तेव्हा रात्रीच्या वेळी बाहेर पडावे हे समजण्याइतका तो हुशार असतो, कारण त्याचे भक्ष्य म्हणजे माणूस हा अंधारात सर्वात दुबळा असतो! अवनी नरभक्षक असल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर आणि अगदी न्यायालयानेसुद्धा (नेहमीप्रमाणे या देशातील प्रत्येक वाद न्यायालयात संपतो आणि अवनीसुद्धा त्याला अपवाद नव्हती) अवनीला मारायचे की बेशुद्ध करायचे याचा निर्णय वनखात्यावर सोपवल्यानंतर संपूर्ण वनखाते दोन महिने तिचा शोध घेत होते आणि ते दिवसाउजेडी तिला शोधत असल्यामुळे ती सापडत नव्हती. छावे असलेली वाघीण स्वतःच्या हालचालींबाबत नेहमीच अतिशय सावध असते, अगदी राखीव जंगलांमध्येसुद्धा (ताडोबामधल्या माया आणि तारा या वाघीणी अपवाद आहेत) आणि येथे तर ती नरभक्षक झाली होती, अशा वेळी वाघ किती हुशार होतो ते समजण्यासाठी फक्त कॉर्बेटची पुस्तके पुन्हा वाचा! त्यामुळे व्यक्तिशः मला असे वाटत नाही की वनखात्याने तिला जिवंत पकडण्याचा तसेच बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही, जरी तसे केले असते तरी प्राणीसंग्रहालयामध्ये तिचा निभाव लागणे अवघड होते कारण क्वचितच एखादा नरभक्षक वाघ पकडल्यानंतर पाळीव झाल्याचे उदाहरण आहे. तसेच अशा नरभक्षक वाघाची देखभाल करणे ही नेहमीच जोखीम असते कारण त्याला सतत स्वतःचे भक्ष्य म्हणजे माणसे डोळ्यांसमोर दिसत राहतील आणि असा वाघ सर्वात आधी त्याच्या सर्वात जवळच्या मनुष्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, हा प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना कायमचा धोका असेल! आणि तरीही त्या दोन छाव्यांचा प्रश्न उरला असता, कारण अवनीचा शोध घेण्यासाठीही किती प्रयत्न करावे लागले होते ते आपण सर्वांनी पाहिले होते आणि येथे आपण एकाच वेळी तीन वाघांना बेशुद्ध करण्याबद्दल बोलत आहोत! आणि हे लक्षात घ्या की अकरा महिन्यांचे छावे शिकार करू शकणार नाहीत पण ते कोणत्याही माणसाला नक्कीच गंभीर इजा करू शकतात! त्यामुळे या सर्वांना पकडण्यामध्ये नेहमीच धोका होता आणि याच ठिकाणी वनखाते आणि इतर सर्वांमध्ये संघर्ष होत आहे!

मी पुन्हा सांगतो, मी अवनी किंवा इतर कोणत्याही प्राण्याला किंवा अगदी एखाद्या सापालासुद्धा मारण्याचे समर्थन करत नाही पण तुम्ही कोणत्या बाजूने आहात त्यावरून चूक किंवा बरोबर हे ठरते आणि दुर्दैवाने या जगावर मनुष्यांचे राज्य आहे, वाघांचे नाही, हे कटू वास्तव आहे त्याला वनखातेसुद्धा अपवाद नाही!तिथे असलेल्या परिस्थीतीत  खाकी कपड्यांतील लोकांनी (वन खात्याच्या तसेच पोलीस विभागाच्या गणवेषाचा रंग) अवनीची दहशत थांबवण्यासाठी काहीतरी केले नसते तर जमावाने त्यांना चोपून काढले असते! आणि त्याशिवाय कॉर्बेटच्या दुसऱ्या अवतरणानुसार, दहशतीतून गंभीर अफवा पसरतात, विशेषतः जेव्हा शेकडो चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हजारो माणसे राहात असलेल्या भागामध्ये तीन नरभक्षक वाघ फिरत असताना काय गोँधळ निर्माण झाला असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही!

आता कोणी शफत अली नावाचा शार्प शूटर (शिकारी) आणि त्याचा मुलगा असगर यांच्या जंगल खात्याने केलेल्या नियुक्तीवरून झालेल्या विवादाकडे येऊ!बरे,आपल्यापैकी किती जण नरभक्षक वाघिणीला, जिने किमान तेरा लोकांना नक्की मारले आहे, तितक्याच लोकांना जखमी केले आहे आणि मानवी वसाहतीमधील अनेक पाळीव प्राणी मारले आहेत, आणि हो बहुतांश रात्रीच्या वेळेस फिरते, तिला मारण्याचे काम अंगावर घेऊ शकतात! माफ करा, वाघिणीला मारणे तर सोडा पण तिला जिवंतपणी इंजेक्शन मारून पकडण्याचा प्रयत्न करण्याचे आणि बेशुद्ध करण्याचे किती लोकांनी स्वीकारले असते!माझ्या माहितीनुसार हे बेशुद्धीचे इंजेक्शन किमान वीस मीटर अंतरावरून मारावे लागते हे अंतर वाघीण काही सेकंदात पार करू शकते, काही मिनिटेही नाही, आश्चर्यकारक आहे, नाही? तुम्ही वनखात्यासाठी काम करणारे पशूवैद्यक असलात तरी हे काम करण्यासाठी किती जण कुशल असतात, तसेच तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला किती वेळा अशा रागावलेल्या नरभक्षक वाघिणीवर इंजेक्शन मारण्याचे कौशल्य वापरण्याची संधी मिळते, माझ्या वन्यजीवप्रेमी मित्रांनो तुम्ही हे कराल का, मी तर याचा प्रयत्न करण्याचे स्वप्नसुद्धा पाहणार नाही असे मी स्वतःबद्दल नक्की म्हणू शकतो! तिला रात्री शोधण्याबद्दल आणि मारण्याबद्दल बोलताना मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे, संपूर्ण वन खाते माहिती घेत काही महिने तो भाग पिंजून काढत होते. आणि तुम्ही ज्या नरभक्षक वाघिणीचा अटोकाटपणे शोध घेत आहात, ती वाघीण सूर्यास्तानंतर दिसल्याची बातमी तुम्हाला मिळाली तर मोहिमेचे प्रमुख म्हणून तुम्ही काय कराल? माहिती आणणाऱ्याला सकाळी होईपर्यंत वाघिणीवर पाळत ठेवायला सांगाल की सकाळी सूर्य उगवेपर्यंत डार्टगन घेऊन तिचा पाठलाग करत राहाल? मी उपहासात्मक बोलत असेल तर मला माफ करा, पण अशा वेळेस मोहिमेचे प्रमुख म्हणून तुमची किंवा माझी मुख्य कार्यवाही कोणती असली असती हे जाणून घेण्यास मी खरेच उत्सुक आहे!

तर मला असे वाटते की वरील सर्व परिच्छेदांवरून तुम्हाला असे वाटू शकेल की अवनीला बंदुकीने मारल्यामुळे मी खुप आनंदी आणि समाधानी आहे, तर नाही, पण हाच प्रश्न संबंधित वन अधिकाऱ्याला विचारा आणि ते काय उत्तर देतात ते बघा! तीसुद्धा माणसे आहे आणि इतर सर्व प्राण्यांसह, त्यात माणूससुद्धा येतो, वाघांचे संरक्षण करणे हे त्यांचे काम होते, आहे आणि असेल!लक्षात घ्या, नरभक्षक झालेली आणि मारलेली अवनी ही पहिली वाघीण नव्हती, याकडे पाहण्याचा महत्त्वाचा पैलू असा की, अशा प्रकारे मरण पावलेली ती अखेरची वाघीण असेल आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत असा माझा प्रत्येकाला प्रश्न आहे, केवळ काही वन्यजीवप्रेमींना नाही!एकेकाळी वाघांनी समृद्ध असलेल्या या देशामध्ये काही दशकांपूर्वी केवळ बाराशे वाघ शिल्लक राहिले होते; प्रत्येकाच्या प्रयत्नांनी आज हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे, तरीही फक्त गेल्या एका वर्षामध्ये जवळपास पन्नासहून अधिक वाघ आपल्या देशामध्ये मरण पावले आहेत, त्यासाठी आपण काय केले आहे? आज अवनीसाठी ओरड होत आहे, कारण ज्या खात्याने (वन) तिचे संरक्षण करणे अपेक्षित होते, त्याच खात्याने तिला गोळी मारली, तरीही याच वनखात्यामुळे ती दोन छाव्यांना जन्म देईपर्यंत जिवंत राहू शकली, आपण हे विसरत नाही का?या देशामध्ये महामार्गांवरून वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली वाघ मरतात, जंगलातून जाणाऱ्या आणि रूळांवर कोणतेही अटकाव नसल्यामुळे रेल्वेच्या खाली सापडून वाघ मरतात, शेताभोवती घातलेल्या कुंपणामधून जाणाऱ्या विजेचा धक्का बसून वाघ मरतात, शिकारीमुळे वाघ मरतात, उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधात दिवसाढवळ्या एखाद्या गावात यावे लागल्यामुळे जमावाच्या तावडीत सापडून वाघ मरतात, आपण आपल्या गरजांसाठी (मी हाव हा शब्द वापरणे टाळत आहे) वाघांच्या घरांवर दररोज अतिक्रमण करत असल्यामुळे त्यांची अधिवासक्षेत्रावरून दुसऱ्या वाघांशी लढाई होऊन वाघ मरतात आणि तरीही त्याबद्दल कोणीही काहीही करत नाही!पण केवळ आज आपण एक वाघ मारला, तेसुद्धा पुणे किंवा मुंबईतील नसलेल्या दुसऱ्या काही माणसांच्या समूहाच्या दबावामुळे आणि आपण संपूर्ण व्यवस्थेला वाघाचे मारेकरी अशा रंगात रंगवत आहोत, खरंच काहीतरी गंभीर चूक होत नाही का येथे? आणि जर ती चुकीची कृती असेल तर केवळ वनखातेच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकजण वाघाचा मारेकरी आहे आणि अखेरीस आपण एक दिवस केवळ वाघच नव्हे तर प्रत्येक प्राणीजात मारून टाकू, त्यासाठी आपण बंदूकही वापरणार नाही, तर आपण त्यांचे जे भाग्य लिहीत आहोत त्यामुळे ते आपोआप मरून जातील!

अवनी, माझी इतकीच इच्छा आहे की तुझा मृत्यू व्यर्थ जाऊ नये, कारण तुझ्या इतक्या प्रसिद्ध मृत्यूनंतरही ही केवळ एका सरकारी विभागाची चूक नाही तर वाघाचे किंवा चिमणीचेही संरक्षण कसे करावे हे माहित नसलेल्या संपूर्ण मानवी समाजाची चूक आहे हे आम्ही मनुष्य काही शिकणार नसू, तर खरोखर आपण वाघांच्याच नाहीतर चिमणीच्या सुद्धा सहवासाच्या योग्यतेचे नाही आहोत, हे कठोर वास्तव आहे, आता देवच वाघांना वाचवो !

संजय देशपांडे
smd156812@gmail.comNo comments:

Post a Comment