Saturday 3 November 2018

दिवाळी शोध खऱ्या आनंदाचा!



















आनंद हा कुठल्याही दुकानात किंवा ऑनलाईन  साईटवर मिळत नाही तर तो तुम्हाला तुमच्या स्वत:च्या कृतीतूनच   मिळवावा लागतो.”दलाई लामा.

दिवाळी आली की वर्तमानपत्रे, टी.व्ही.चॅनेल्स,रेडीओ जाहिरातींनी भरून जातात. माझी एक अतिशय आवडती गोष्ट म्हणजे अॅमेझोन, रिलायन्स, अॅपल, बिग बझार आणि अशा अनेक मोठ्या ब्रँडच्या दिवाळीच्या जाहिरात मोहिमांचा अभ्यास करणे! खरोखरच, गेल्या काही दशकांपासूनच दिवाळी संपूर्ण देशभर सर्व थरात धर्म, जात आणि वर्ण यांच्या पलिकडे जाऊन साजरी केली जाते! १२० कोटी  लोकसंख्या असलेल्या या देशात, सर्व लोक एकत्रितपणे साजऱ्या करतात, अशा दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे भारताच्या क्रिकेट टीमचा विजय आणि दिवाळी! आता दिवाळीचे महत्त्व तुमच्या लक्षात आले असेलच आणि मग आपल्यासाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी शॉपिंग करण्याइतका आनंदाचा दुसरा मार्ग कुठला! आनंदाची ही बदललेली संकल्पना हा भारताचा नवीन चेहरा आहे कारण जेव्हा आपण काम करत नसतो किंवा अभ्यास करत नसतो तेव्हा आपण खरेदी करत असतो, आपण मॉलमध्ये जातो, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, अगदी आपण सुट्टीसाठी कुठे गेलो तरीही स्थानिक गोष्टी खरेदी करतो आणि स्थानिक पदार्थ  चापतो. खरेच शॉपिंग मॉल म्हणजे आपल्या रीलॅक्सिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण बनले आहे आणि ऑनलाईन शॉपिंग म्हणजे अगदी आपल्या सोफा कम बेडवरून न उठता रीलॅक्सिंगची गुरुकिल्ली! मला बऱ्याचदा माझ्या लहानपणाच्या दिवाळीची आठवण येते. फक्त दिवाळीतच आम्हाला नवीन कपडे खरेदी करता यायचे आणि इतर मोठ्या गोष्टी (म्हणजे घरातली भांडी) म्हणजे फ्रीज, टी.व्ही. सोफा सेट इ. खरेदी केले जायचे. दिवाळी म्हणजे अशी खरेदी करण्याची आणि ती समारंभपूर्वक घरी आणण्याची वेळ असायची म्हणजे अशा प्रकारे या वस्तू घरी यायच्या की सगळ्या गल्लीला ही खरेदी दिसेल! जरी हल्ली लोक संपूर्ण वर्षभर खरेदी करतच असले तरी काही कुटुंबांसाठी दिवाळी अजून खास सण आहे, कारण तेव्हा आपल्याला शॉपिंगचा आनंद लुटण्याची संधी मिळते आणि मार्केटिंग गुरूंना आपली भारतीयांची ही मनोवृत्ती चांगलीच कळली आहे! आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे दिवाळी बोनस, तरी सध्या अनेक उद्योग ( उदा. रिअल इस्टेट) चांगल्या प्रकारे चालत नसल्यामुळे बोनसची जादू थोडी कमी झालेली दिसते. मला नेहेमी आश्चर्य वाटते की आधुनिक काळात दिवाळीसारख्या सणांचे खरेदी, खाणे आणि सुट्टी घेणे सोडून काही विशेष महत्त्व राहिले आहे का? कारण या गोष्टी सोडून कोणीही दुसरे काही करताना दिसत नाही. हो,सध्या दिवाळी पहाट(सकाळ)चा एक नवीन ट्रेंड आहे. यात संगीताच्या मैफली चढ्या तिकीट दरात आयोजित केल्या जातात आणि लोक नटून थटून त्यासाठी हजेरी लावतात, नंतर फेसबुक आणि इंस्टासारखे सोशल मिडिया दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या सेल्फीजनी भरून जातात. झाले, एवढेच!     

या पार्श्वभूमीवर मी माझ्या टीमला   माझं मनोगत लिहितो  कारण मला वाटते दिवाळी म्हणजे आपल्या आयुष्याचा विचार करण्याची विशेषत: आपल्या उत्सव साजरे करण्याच्या संकल्पनेचा विचार करण्याची वेळ आहे ...

प्रिय संजीवनी टीम,

पुन्हा एकदा नवीन दिवाळी साजरी करायची वेळ आलीये, मात्र मला आवर्जुन सांगावसं वाटतं की यंदाच्या दिवाळीला  एक रुपेरी किनार आहे. म्हणजे बहुतेक वेळा ऑफिसात बॉस लोक जेव्हा आणि जे काही लिहीतात ते आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घडामोडी, धंद्यातली मंदी, तुम्ही तुमच्या कामात कशी सुधारणा केली पाहिजे अशाच गोष्टींविषयी असतं. तुम्ही सगळेजण अर्थातच अनेक वर्षांपासून संजीवनीसोबत काम करत आहात, काही जण तर अगदी स्थापनेपासून आहेत. असे असतानाही मला जर अजून आपल्या कंपनीमध्ये व भोवताली काय घडतंय हे सांगावं लागत असेल, तर सगळ्यात मोठा मूर्ख मीच ठरेन (म्हणजे, काहीवेळा मी करतोही मूर्खपणा ते जाऊ द्या)! खरंतर  हे पगारवाढीचं पत्रं नाही त्यामुळे मी रिअल इस्टेट किंवा आपली कामगिरी याविषयी काही सांगणार नाही. हे दिवाळीचं पत्रं आहे, म्हणुनच मी  दिवाळीचा खरा अर्थ काय आहे याविषयी थोडसं बोलणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की त्यात नवीन काय, दरवर्षी दिवाळी येते आणि तुम्ही आम्हाला पत्रं लिहीता. हे मान्य केलं तरीही दरवर्षी दिवाळी वेगळी असते, खरंतर प्रत्येक दिवस वेगळा असतो. म्हणुनच मी दरवर्षी दिवाळीचा वेगळा अर्थ शोधण्याचा व तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो.

मला तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करणार आहात हे जाणून घ्यायला आवडेल. तुमचं उत्तर अर्थातच कुटुंब व मित्रांसोबत असं उत्तर असेल पण तुमची साजरं करण्याची व्याख्या काय आहे? खरेदी, खाणं-पिणं, प्रवास, कुटुंबियांच्या भेटीगाठी अशीच काहीशी उत्तरं असतील, पण हे सगळं तर वर्षंभरही केलं जाऊ शकतं, नाही का? दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. लक्षात ठेवा अंधार हा आपल्या आजूबाजूला नसतो तर आपल्या मनातच असतो. तुम्हाला मी काय म्हणतोय हे कदाचित आज लक्षात येणार नाही. पण विचार करा तुम्ही एखाद्या खोलीतला अंधार घालवण्यासाठी बाहेरून दिवे लावत नाही तर खोलीच्या आतमध्ये दिवा लावता. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या भोवतालचा अंधःकार नष्ट करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला प्रकाशित करावं लागेल. म्हणजेच मनात कायम आनंदी व सकारात्मक विचार ठेवावे लागतील, असं मला सांगावसं वाटतं.

जीएसटी, रेरा, सतत बदलती धोरणं, पेट्रोलचे दर किंवा उत्पन्न व खर्चाचा न बसणारा ताळमेळ या समस्यांपेक्षाही आपल्या भोवतालची नकारात्मकता व आपण या नकारात्मकतेला आपल्या मनात घर करू देतो ही खरी आजची आपली समस्या आहे. आपल्या मनात नकारात्मक विचारांनी एकदा प्रवेश केला की ते एखाद्या संसर्गजन्य रोगासारखे पसरतात, आपल्या भोवतालच्या लोकांनाही त्याची लागण होते. म्हणूनच आपण सगळ्यांनीच आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल अशा एखाद्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे, ज्यामुळे आयुष्य प्रकाशमान होईल आणि यासाठी आपल्याला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल. या वेळात स्वतःला आनंद मिळेल असं काहीतरी करा मग ते एखादा चांगला चित्रपट बघणं असेल, एकांतात गाणं म्हणणं असेल, दुरवर एकटंच चालायला जाणे असेल किंवा टेकडी चढणे ! निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळे आपल्यातच नव्यानं उत्साह संचारतो. थोडक्यात काहीही करा पण स्वतःसाठी थोडा वेळ द्या. एक लक्षात ठेवा आपल्याला आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे ईतरांना खूष करण्याच्या नादात आपण स्वतः दुःखी राहता! पण स्वतःला आनंदी करणं म्हणजे इतरांना दुःखी करणं किंवा त्यांच्या भावनांचा आदर न करणं असा होत नाही! याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आनंदाचा खरा अर्थ समजून घेणं. शेवटी रात्री झोपायला जाताना मात्र आपण आनंदी नसलो तर नक्कीच काहीतरी चुकतंय. उदाहरणार्थ एखाद्या खोलीतला दिवा जुना होऊन बंद पडल्यामुळे तिथे अंधार पसरला तर आपण काय करतो, फक्त तो दिवा बदलून टाकतो. दिवाळीसुद्धा हा आपल्या आतला दिवा बदलायची आणि नव्यानं सुरूवात करायची वेळ असते असं मला व्यक्तिशः वाटतं. खरंतर अंधार व प्रकाश  ही लढाई म्हणजेच वाईटपणा आणि चांगुलपणा यांची लढाई,हाच खरा संघर्ष आहे. याबद्दल (मार्व्हल, डिस्नेच्या माझ्या आवडत्या चित्रपटांचे आभार). ही अंधार व उजेडाची लढाई सतत सुरू असते व उजेडाचं म्हणजेच चांगुलपणाचं प्रतिनिधित्व करणारा सुपरहिरो तुमच्यातच आहे हे ओळखा !

आणखी एक गोष्ट, तुम्ही तुमच्या मनातल्या अंधाराला दूर लोटून ते प्रकाशित केलं (मला विश्वास आहे तुम्ही नक्की कराल) तर तो प्रकाश स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. मनाची कवाडं उघडून तो प्रकाश इतरांपर्यंतही पोहचू द्या जे कदाचित तुमच्याइतके सुदैवी नसतील. कारण एक सुपरहिरो इतरांचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी त्याची ताकद वापरतो व तुमच्या सकारात्मक विचारांच्या प्रकाशाशिवाय तुमच्याकडे दुसरी अधिक मोठी कोणती ताकद असू शकते? म्हणूनच तुम्ही जे काही चांगलं पाहिलं असेल किंवा शिकला असाल ते तुमच्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला सांगा, कदाचित त्यामुळे त्यांना त्यांच्यातला सुपरहिरो सापडेल. तुम्ही स्वतःला कितीही कमनशिबी समजत असला तरीही तुमच्यापेक्षाही कमनशीबी लोक जगात आहेत याची जाणीव ठेवा. तुम्ही फक्त अशा लोकांचा शोध घ्या व तुम्हाला एकदा ते सापडल्यानंतर, तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता याचा विचार करा व तशी कृती करा.

आणखी  एक गोष्ट म्हणजे  या दिवाळीत फटाके  फोडु नका, हा संदेश जास्तीत जास्त पसरवा कारण आपल्याकडे आधीच भोवताली प्रचंड प्रदूषण आहे. आपले विचारही जात, पंथ, धर्म अशा भेदांनी प्रदूषित आहेत, हा सुद्धा एकप्रकारचा अंधःकारच आहे. यात भर म्हणुन आपल्याला अजुन फटाक्यांच्या प्रदूषणाची काय गरज आहे असा प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो. त्याऐवजी या दिवाळीला निसर्गासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा, तुमच्या इमारतीभोवती एखादं झाड लावा, तुमच्या बाल्कनीमध्ये एखादी फुलांची वेल लावा. यामुळे तुम्ही एखाद्या फुलपाखराचं आयुष्य तरी  नक्कीच  उजळवू शकाल. हे करून पाहा, त्यानंतर तुम्ही स्वतःवर आणखी प्रेम करू लागाल, मन प्रकाशानं उजळून जाईल. मित्रांनो मी तुम्हाला, स्वतःचंच नाही तर इतरांचंही जीवन उजळून टाका, याहून आणखी काय शुभेच्छा देऊ? मला असं वाटतं तीच खरी दिवाळी! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


संजय देशपांडे, नितीन महाजन
09822037109


No comments:

Post a Comment