Thursday 13 December 2018

पन्नाशीत प्रवेश करताना !


























"जो मनुष्य शिकणं थांबवतो तोच म्हातारा होतो, मग तो वीस वर्षांचा असेल किंवा ऐंशी वर्षांचा. सतत शिकत राहणारा कुणीही व्यक्ती तरुणच राहतो”… हेन्री फोर्ड.

मी, माझी पन्नास वर्षं पूर्ण करताना हेन्री फोर्डसारख्या माणसाशिवाय आणखी कुणाचं अवतरण वापरू शकलो असतो! ते जगाचा निरोप घेईपर्यंत सतत काहीतरी शिकत, जगाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत तरुणच राहिले. मी गेल्या काही वाढदिवसांपासून आवर्जुन एक गोष्ट करतो ती म्हणजे पुढच्या पिढीसाठी (म्हणजे माझी मुलं, पुतणे आणि भाचे मंडळींसाठी) वय वाढण्याविषयी काहीतरी लिहीतो. एक अर्थानं तो सरलेल्या वर्षांचा आढावाच असतो. मी यंदा पन्नास वर्षं पूर्ण करतोय, त्यामुळे माझ्यासाठीही हा एक  स्वतःचा घेतलेला शोधच होता. असं पाहिलं तर पन्नास हा फक्त एक आकडा आहे, पण आपणच काही आकड्यांना विशेष महत्व देतो उदाहरणार्थ, चित्रपट व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं तर शंभर करोडचा आकडा महत्वाचा ठरतो. आधी चित्रपटगृहात चित्रपटाचे पन्नास आठवडे किंवा सत्तर आठवडे पूर्ण झाल्यावर सिल्व्हर किंवा गोल्डन ज्युबली साजरी व्हायची. त्याचशिवाय आपल्याला क्रिकेटमधलं शतक किंवा हॅटट्रिक (सलग तीन चेंडूंमध्ये गडी बाद करणं) कशी विसरता येईल. फुटबॉलमध्येही गोलच्या बाबतीत अशी हॅटट्रिक होते. खरंच आपलं आयुष्य अशा विशेष आकडेवारीनं भरलेलं आहे. मला असं वाटतं हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि माणूस व ईतर प्राण्यांमधला फरकही. आपल्याला या आकडेवारीला वेगवेगळी विशेषणं लावायला आवडतं. एखाद्या वाघोबानं दहावा वाढदिवस विशेष म्हणून साजरा केल्याचं किंवा एखाद्या ह्त्तीच्या जोडप्यानं लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केल्याचं ऐकलंय का? पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या विशेष टप्प्यांना आकडेवारीत मोजायच्या आपल्या सवयीमुळे आपण जगण्यातली गंमत घालवून बसतो. जसे की नव्याण्णववर बाद होणाऱ्या एखाद्या फलंदाजाच्या व त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला या आकड्याचं महत्व व तो गाठता न आल्यामुळे झालेलं दुःख जाणवेल. काही लोकप्रिय अभिनेत्यांच्या, निर्मात्यांच्या व दिग्दर्शकांच्या  एखाद्या चित्रपटाच्या बाबतीतही असं होतं. हा सिनेमा नव्वद करोडपर्यंत व्यवसाय  करतो पण शंभर करोडचा आकडा मात्र पार करत नाही, त्यामुळेच तो चित्रपट आपटल्याचं मानलं जातं. आपण माणसं खरंच विचित्रं असतो, आपण आपला आनंद किंवा दुःख कुठल्याशा आकडेवारीमध्ये मोजतो  आणि  म्हणूनच आपण जगण्यातली मजा स्वतःच्या हातानेच घालवतो.

आपण मनाला या आकडेवारीच्या जंजाळात इतकं गुरफटून टाकलं असतं की रात्री झोपल्यानंतरही आपल्या डोक्यात आकडेवारीच असते व सकाळी उठल्यानंतरही कुठली आकडेवारी पूर्ण करायची आहे हाच विचार असतो. मग तो आपल्या गृहकर्जाचा किंवा कारचा हप्ता असेल किंवा पगारवाढ असेल किंवा आपल्या मुलांची परीक्षेतली टक्केवारी असेल, पेट्रोलचे  प्रति लिटर दर असतील, किंवा समभागांचे खालीवर होणारे दर. त्याचशिवाय फेसबुक किंवा इस्टाग्रामवरच्या आपल्या पोस्टला मिळणाऱ्या लाईकची आकडेवारी कशी विसरता येईल. आपलं आयुष्यच असं झालंय की, आपण जागे असताना (काही जण तर  स्वप्नातही) कुठल्या तरी आकडेवारीविषयीच विचार करत असतो. या सगळ्याचा विचार केल्यानंतर, मी पन्नास वर्षं पूर्ण झाली म्हणून विशेष वाटत असल्याबद्दल स्वतःला दोष देऊ शकत नाही. मला असं वाटतं की मी सामान्य माणसासारखाच विचार करतोय. आपल्याला आजकालच्या वॉट्सऍप किंवा फेसबुकच्या कीबोर्डची एवढी सवय झालेली असते की मी एमएस वर्डमध्ये वरील वाक्य टाईप केल्यानंतर, स्माईली की शोधत होतो! कारण इमोजी व स्माईली वापरताना आपण खरंखुरं हसू किंवा मनापासून हसणं विसरून गेलो आहोत. मी अलिकडेच एक लेख वाचला होता, ज्यामध्ये वाचकांना एखाद्याच्या अपयशमुळे (खरंतर आपल्याला यामुळे नेहमीच हसू येतं) किंवा उपहासानं नाही तर ते शेवटचं मनापासुन खळखळून कधी हसू आलं हे आठवायला सांगितलं होतं. अगदी आपण जे हसतो ते सुद्धा आपल्या हृदयाला स्पर्श करत नाही. कारण फक्त ओठ पसरवणं म्हणजे हसू नाही याची स्वतःला आठवण करून द्यायची वेळ झालीय. मोठं होण्यातली आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे तुम्हाला कितीतरी लोक भेटतात. तुमचं वाचन समृद्ध असेल तर तुम्ही याबाबतीत अधिक सुदैवी असता (मी खरंच वाचनाच्या बाबतीत सुदैवी आहे), कारण पुस्तकातली पात्रं सुद्धा तुम्हाला विविध लोकांना भेटण्याचा अनुभव देतात. तुम्हाला त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन समजून घेता येतो. तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहू शकता. मुलांनो तुम्ही वाचनाची आवड जोपासावी असं मला मनापासून वाटतं, कारण जग तुमच्याकडून सगळं काही काढून घेऊ शकतं पण तुम्हाला वाचनातून मिळालेलं ज्ञान काढून घेऊ शकत नाही. वाचनामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी बसून कितीतरी ठिकाणांना भेट देता येते व अनेक लोकांना भेटता येतं. अगदी ओशोपासून अनेक तत्वज्ञांनी स्वतःतलं लहान मूल जिवंत ठेवा असं म्हटलंय. मला असं वाटतं वयानं मोठं होण्यातलं खरं यश किंवा मोठं होण्याचा योग्य मार्ग तोच आहे. योगायोगानं अलीकडेच माझ्या वाचण्यात गेम ऑफ थ्रोन्स (जीओटी) नावाची पुस्तकमालिका आलीय. यातील  आठ कादंबऱ्यांमध्ये जवळपास सात हजार पानं आहेत. ही पुस्तकं वाचताना आपली दोनशेहून अधिक पात्रांशी ओळख होते. गेम ऑफ थ्रोन्सचं तत्वज्ञान म्हणजे, तुम्हाला राज्य करायचं असेल तर तुमच्यातलं लहान मूल  मारून  टाका! !” कारण त्या लहान मुलाच्या निष्पापणामुळे तुम्हाला कठोर (म्हणजेच व्यवहार्य) निर्णय घेता येणार नाही व शेवटी तुमच्यातलं ते लहान मूलच शासनकर्ता म्हणून (राजा म्हणून) तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरेल. सकृतदर्शनी गेम ऑफ थ्रोन्सचं तत्वज्ञान विचित्रं, अतिशय कठोर किंवा स्वार्थी वाटतं, पण शांत मनानं विचार केला तर ते खरं असल्याचंही जाणवतं. तुम्ही जेव्हा कशामुळेतरी अस्वस्थ असाल किंवा तुम्हाला वाईट वाटत असेल, तर त्याचं कारण काय आहे किंवा खरंतर कोण आहे असा विचार करा? याचं कारण माझ्यातला मोठा झालेला माणूस आहे का, त्यानं ज्या माणसांना आपलं मानलं त्यांनी त्याला फसवल्यासारखं वाटतंय का, तर अर्थातच नाही. कारण मोठ्या झालेल्या माणसानं आयुष्याचे सगळे टप्पे पाहिले आहेत, ज्यात विश्वासघात व पाठीमागून हल्ला करणे हेच टिकून राहण्याचे मार्ग आहेत. तो अशा हल्ल्यांध्येही टिकला आहे व पन्नास वर्षं जगला आहे. या माणसाला जग वाईटच वागणार आहे हे माहिती असतं, त्याच्या बाबतीत काही चांगलं घडेल असं त्याला वाटत नसतं. अशावेळी तो जगाच्या वागणुकीबद्दल कसा चिडू शकतो किंवा अस्वस्थ होऊ शकतो. खरंतर आपल्यातलं ते लहान  मूलच  भोवतालच्या चांगुलपणाला किंवा वाईटपणाला प्रतिसाद देत असतं, कारण ते मूल जगाकडे अतिशय सरळ दृष्टिकोनातून पाहतं, म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही चांगली किंवा वाईट असते व त्यासाठीची प्रतिक्रियाही तात्काळ दिली जाते. एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे ते मूल मनापासून हसतं तर वाईट गोष्टींमुळे त्याला त्रास होतो व डोळ्यात पाणी येतं. पण लहान मूल वाईट घटनासुद्धा अतिशय लवकर विसरून जातं पण मोठ्यांना तसं जमत नाही. ओशो व गेम ऑफ थ्रोन्सच्या तत्वज्ञानात हाच फरक आहे.

तुम्ही जेव्हा म्हणता स्वतःतलं मूल जिवंत ठेवा तेव्हा त्याचा अर्थ मुलाच्या चांगल्या गोष्टी (म्हणजे सवयी) आत्मसात करा, उदाहरणार्थ लहान मूल लहानशा गोष्टीवरही मनापासून हसतं. एखादं रांगणारं मूल पाहा, एखादी उडणारी चिमणी, पंख फडफडणारं फुलपाखरू पाहूनही ते हसतं, त्याचं हसू पाहून तुम्ही क्षणभर सगळ्या चिंता विसरता. तुम्ही एखाद्या मुलावर ओरडलात किंवा त्याचं खेळणं हिसकावून घेतलंत तर ते लगेच रडायला लागेल, मात्र ते काही वेळातच आजूबाजूला असलेल्या दुसऱ्या एखाद्या गोष्टीमुळे हसायला लागेल. म्हणजेच एखादं मूल फार काळ रुसून बसू शकत नाही, आपणही असंच व्हायला पाहिजे. आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं की आपल्यातलं लहान मूल अस्वस्थ होतं, जे स्वाभाविक आहे. पण आपल्यातला मोठा माणूस आपलं मन नेहमी अस्वस्थ ठेवतो, त्या वाईट आठवणी धरून ठेवतो, सोडून देत नाही. या प्रक्रियेत तो मोठा माणुस माझ्यातल्या लहान मुलाला फक्त वाईट गोष्टींचाच विचार करायला लावतो, त्यामुळेच मला भोवतालच्या चांगल्या गोष्टी ऐकूही येत नाहीत व दिसतंही नाहीत व एकप्रकारे माझ्यातलं लहान मूल नष्ट होतं. म्हणूनच मी वॉल्ट डिज्ने, मार्व्हल स्टुडिओ (म्हणजे स्टॅनली), डीसी कॉमिक्स (बॅटमॅन, सुपरमॅन), हॅरी पॉटर, तसंच मला पुस्तकातून भेटलेल्या असंख्य पात्रांचा, हो अगदी गेम ऑफ थ्रोन्सचाही अतिशय ऋणी आहे. नाहीतर मला स्वतःतलं लहान मूल मारून टाकण्याचे दुष्परिणाम  कसे समजले असते? या यादीत आणखी एकाचा समावेश करावा लागेल तो म्हणजे कराटे किड नावाचा सिनेमा. तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की हे काय आहे? तर या सगळ्या चित्रपटांनी किंवा पुस्तकांनी मला शाळा किंवा महाविद्यालयांसारखं शिकवण्याचं काम केलंय. मी अर्थातच माझ्या खऱ्या आयुष्यातल्या शिक्षकांचा, माझ्या पालकांचा तसंच मित्रमंडळींचा ऋणी आहेच. पण वर नमूद केलल्या चित्रपटांमुळे व पुस्तकांमुळे मला आयुष्य ऊमजलं, जे मला कुठल्याही शाळेनं शिकवलं नसतं ते त्यांनी शिकवलं. मार्व्हलनं मला शिकवलं की मोठ्या शक्तिसोबत मोठ्या जबाबदाऱ्याही येतात”. डीसी कॉमिक्सनं मला शिकवलं की, “तुम्ही कोण आहात यापेक्षाही तुम्ही जे आहात त्यातून तुम्ही काय करता, यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं”. डिस्नेनं मला शिकवलं की, “शूर व दयाळू व्हा म्हणजे जादू आपोआप होईल”. हॅरी पॉटरनं मला शिकवलं की, “शत्रूविरुद्ध लढायला धैर्य लागतं पण त्यापेक्षाही कितीतरी धैर्य तुमच्या स्वतःच्या मित्रांविरुद्ध उभं राहायला लागतं” (भगवद्गीताही हेच सांगते). गेम ऑफ थ्रोन्सनं मला शिकवलं की माझ्यातलं मूल मला कमजोर करू शकतं किंवा मला बळ देऊ शकतं, त्या लहान मुलाचा वापर कसा करायचाय हे माझ्यावर अवलंबून आहे. आपल्यातला वयानं मोठा माणूस जगावर राज्य करण्यासाठी लहान मूल बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असताना, ओशो आणि इतर अनेकांनी मला माझ्यातल्या मुलाचा आदर करायला सांगितला.

सरते शेवटी, कराटे किड! मी कालच एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी निघालो होतो आणि तुम्हा दोघांना लवकर तयार व्हायचा आग्रह करत होतो. मी शूज घालत असताना, टीव्हीवर कराटे किडमधलं शेवटचं मारामारीचं दृश्य सुरू होतं. मी हा चित्रपट किमान दहा वेळा तरी पाहिला असेल, तरीही शूज घालायचं विसरून माझे डोळे टीव्ही स्क्रिनवर खिळले होते. मार्शल आर्ट स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना असतो आणि ड्रे पार्करचा (जेडन स्मिथ, साधारण दहा वर्षांचं पात्रं) गुडघा दुखावला जातो. अंतिम सामना खेळण्यासाठी सक्षम नसल्याचं जाहीर झाल्यानं, तो पलंगावर वेदनेनं विव्हळत असतो. तो त्याचे प्रशिक्षक श्री. हॅन (जॅकी चॅननं हे अप्रतिम पात्रं साकारलंय) यांना त्याची इजा बरी करण्यासाठी चायनीज उपचार पद्धती  वापरायला सांगतो म्हणजे त्याला अंतिम सामन्यात खेळता येईल. जॅकी चॅन त्याला विचारतो, “ड्रे कशासाठी, तू सगळं काही सिद्ध केलंयस. तू ज्या प्रकारे लढ़लास त्याचा तुझ्या परिवाराला अभिमान वाटेल, आणखी एक फेरी जिंकल्यानं काय साध्य होईल?” ड्रे उत्तर देतो, “मला अजूनही त्या दुसऱ्या मार्शल आर्ट शाळेतल्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या मुलाची भीती वाटते आणि आज काहीही झालं तरी, मला मनात भीती घेऊन घरी जायचं नाही!” मला असं वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये एक लहानगा ड्रे आहे ज्याला कशाना कशाचीतरी भीती वाटते, जो आरशात स्वतःचा चेहरा पाहण्याचं टाळतो. तो फक्त मनातल्या भीतीमुळे आपल्यापासून आयुष्यातला सगळा आनंद व मजा हिरावून नेतो. या लहानग्या ड्रेला भीतीला सामोरे जाण्याचे धैर्य देणे हे आपल्यातल्या मोठ्या माणसाचं कर्तव्य आहे, कारण तोच ही भीती घालवू शकतो. पन्नाशीत प्रवेश करणं म्हणजे आता कुणीही तुम्हाला तरूण म्हणणार नाही, तर हा प्रवास आता काका ते आजोबा म्हणायचा आहे, हा विचारच कुणाही माणसाला हादरवून सोडणारा असतो. पण मुलांनो तुम्हाला एक सांगू, आज इथवर वाटचाल करताना मला एक गोष्ट लक्षात आलीय की, माझ्यातला व्यवहार्य मोठा माणूस आणि भावनिक लहान मूल एकाच वेळी गुण्यागोविंदानं नांदू शकले तर मला माझ्या भूतकाळाची लाजही वाटणार नाही आणि भविष्याकडे पाहायची भीतीही वाटणार नाही. मला आत्तापर्यंत जगावर सत्ता गाजवण्यासाठी माझ्यातलं लहान मूल मारायची गरज वाटली नाही. किंबहुना माझ्यातल्या या लहान मुलामुळेच मला समजलं की तुम्ही निष्पापपणा जिवंत ठेवून, तसंच इतरांना आनंद व सुख देऊनच जगावर राज्य करू शकता. आपल्याला मोठ्या माणसाला हे आपल्यातल्या लहान मुलाकडूनच शिकता येऊ शकतं. आणखी एक गोष्ट, तुम्हाला जाणतेपणी किंवा अजाणतेपणी अधिक चांगली व्यक्ती होण्यासाठी मदत केलेल्या प्रत्येक माणसाचे आवर्जुन आभार माना. हा काळ अतिशय कठीण आहे व अतिशय कमी लोक तुम्हाला मोठं होण्याच्या प्रक्रियेत आपणहून मदत करतील. यासाठी तुम्ही जे लोक तुम्हाला आहे तसं स्वीकारतात व तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. मी त्या बाबतीतही अतिशय नशीबवान राहिलो आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगतोय ते माझ्याभोवती असलेल्या अशाच माणसांमुळे. मी तुमच्यासाठी लिहीलेला हा लेख तेही कदाचित वाचत असतील व मनातल्या मनात हसत असतील. खामगावसारख्या एका लहानशा गावतला एक मुलगा, ज्याला ते संज्या, चंकी, पांड्या, देशू अशा वेगवेगळ्या नावानं हाका मारायचे, तो आता त्यांना तत्वज्ञान सुद्धा शिकवतोय याचं त्यांना हसू येत असेल. त्यांना असं हसण्याचा हक्क आहे, कारण त्यांनी जे काही शिकवलं त्यामुळेच आज पन्नाशीचा झालेला हा मुलगा हे सगळं करू शकला. मुलांनो आज तुमच्याकडे पाहताना मी किती वर्षं मागे सोडलीत याची मला जाणीव होतेय. मी माझ्या भूतकाळाबद्दल आनंदी व समाधानी आहे. मित्रांनो आयुष्यानं मला हा महत्वाचा टप्पा ओलांडताना

 तुम्ही सगळ्यांनी  दिलेली ती सर्वोत्तम भेट आहे




No comments:

Post a Comment