Saturday 13 July 2019

गेम ऑफ थ्रोन, शोध स्वतःमधील सैतानाचा !
























या जगात एका सुंदर आणि मनाला पटणाऱ्या कथेपेक्षा  शक्तिशाली दुसरं काहीही नाही”...टीरियन लॅनिस्टर, गेम ऑफ थ्रोन्स, अखेरचे पर्व!

जॉर्ज आरआर मार्टिन या दिग्गज लेखकानं लिहीलेला हा संवाद किंवा विधानाविषयी कुणाचंच दुमत असू शकत नाही. जीओटी अर्थात गेम ऑफ थ्रोन्सची आठही पुस्तकं (भाग) वाचल्यानंतर व टीव्हीवरील सगळी पर्व पाहिल्यानंतरहे शब्द माझ्या मनात कोरले गेले आहेत. पीटर डिंकलेजनं साकारलेल्या डवार्फ (बुटका)  प्रतिमा व वरील अवतरणासारखी असंख्य वाक्ये मनावरून पुसली  जायला बराच काळ लागेल, किंवा कदाचित कधीच पुसली  जाणारही नाहीत. बॉलिवुडच्या कुणाही चाहत्याला विचारा (मी सुद्धा एक चाहता आहे) तो सुद्धा जीओटीच्या इम्पचं हे विधान शंभर टक्के खरं असल्याचं शपथेवर सांगेल. ही सुद्धा सलीम-जावेदनी सांगिलेल्या गोष्टींसारखीच एक सशक्त कथा आहे, ज्यांच्या लेखणीनं या शतकाच्या महानायकाला अर्थात अमिताभ बच्चन यांना घडवलं. भारतीयांना चांगल्या   कथा  अतिशय आवडतात व ते त्या डोक्यावर घेतात. मग चित्रपट असोत किंवा बुनियादहम लोग सारख्या लोकप्रिय मालिका. रामायण किंवा महाभारतसारख्या मालिकांच्या वेळी रविवारी ओस पडणारे रस्ते आपण कसे विसरू शकतो. या सगळ्या मालिका आपल्या प्रिय दूरदर्शनवर लागायच्यादूरदर्शवरच्या या सगळ्या लोकप्रिय मालिकांचं व चित्रपटांचं  एक समान सूत्र होतं ते म्हणजे त्यांची कथा सशक्त होती. दरम्यानच्या काळात आपल्या या कथेचा सूर कुठेतरी हरवला होता (अर्थात त्यालाही सन्माननीय अपवाद होतेच). मग आपण पाश्चिमात्य कथांनाही डोक्यावर घेतलंय, त्यांच्यावर प्रेम केलंय व जीओटी त्याला अपवाद नाही.

मी आता तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहात नाही. मी गेम ऑफ थ्रोन्स या एचबीओ टीव्ही चॅनलवर प्रसारित झालेल्या मालिकेविषयी बोलतोय, ज्याला कौतुकानं जीओटी असंही म्हटलं जातं. या चित्तथरारक कादंबऱ्या साँग ऑफ फायर अँड आईस, डान्स विथ द ड्रॅगन्स इत्यादी नावांनी लिहील्या असल्या तरीही तुम्ही तिला जॉर्ज आरआर मर्टिन यांची गेम ऑफ थ्रोन्स असंच म्हणू शकता. मी फक्त टीव्ही मालिकेविषयीच बोलत नाहीये तर पुस्तकाविषयीही बोलतोय. या मालिकेची आठ पर्व जवळपास दहा वर्षं प्रक्षेपित झाली, प्रत्येक पर्वात सात ते आठ भाग असायचे. मी पुस्तकाचे आठही भाग वाचले, ज्यात आठ हजाराहूनही अधिक पानं होती. तसंच या मालिकेच्या सगळ्या पर्वाचे सगळे भाग पाहिले ज्यासाठी गेल्या वर्षभरात माझे ऐंशीहून अधिक तास खर्च झाले. त्यातला बराचसा काळ एकाचवेळी जीओटी वाचत व पाहात असताना मी रात्री जागून काढलाय आणि स्वतःची झोपही उडवुन घेतलीये त्या स्वप्नांनी ! 
मी आता एखाद्या टीव्ही मालिकेचा किंवा कादंबरीचा एवढा उदोउदो का करतोय असं वाटून तुम्ही आश्चर्यचकीत वा वैतागला सुद्धा असाल. या वैतागलेल्या लोकांसाठी म्हणून सांगतोय की 80च्या दशकात सुरूवातीला भारतात फक्त दोन गट होते एक ज्यांनी शोले पाहिलाय अशांचा व दुसरा म्हणजे ज्यांनी तो पाहिलेला नाही अशांचा. याचप्रकारे आज आपल्या देशातच नाही तर जगभरात (हॉटस्टार व 4जीचे आभार) दोन गट आहेत एक म्हणजे जीओटी पाहिलेल्यांचा व दुसरा म्हणजे ज्यांनी पाहिलेला नाही अशांचा. काहीजण उपहासानं म्हणतील की एक गट ज्यांना जीओटी आवडते व जे ती पाहतात अशांचा आहे व दुसरा जे जीओटीचा तिरस्कार करतात अशांचा आहे. पण यातूनही मालिका व कादंबरीची लोकप्रियताच दिसून येते. अंदाज अपना अपना या चित्रपटात क्राईम मास्टर गोगो जसं म्हणतो, ये तेजा तेजा क्या है ये तेजा तेजा, तसंच ये जीओटी जीओटी क्या है ये जीओटी जीओटी असं म्हणता येईल.
तर ही गोष्ट आहे सात घराण्यांची व त्यावर सत्ता गाजवणाऱ्या सम्राटांची! या मधील  टारगेरियन्स, लॅनिस्टर्स, बेअरथ्रोन्स व स्टार्क्स या चार प्रमुख घराण्यांन मधल्या सत्तास्पर्धेची काल्पनिक गोष्ट आहे. त्यांच्याशिवाय टायरेल, टार्लिस, ग्रेजॉईज, बोल्टन, फ्रेज अशी इतरही कुटुंब आहेत, मात्र वर सांगितलेली चार कुटुंब प्रमुख आहेतयासर्व घराण्यांमध्ये सगळ्यांवर सत्ता गाजवण्यासाठी युद्ध सुरू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. येथे समुद्राच्या पलिकडे आणखी एक जग आहे, जिथे वेगळी शहरं व वेगळी संस्कृती आहे जी खालासार व वेस्ट्रॉस नावानं ओळखली जातात. त्याचशिवाय एक नाईट किंग (मृतांचा राजा ) व त्याची आर्मी ऑफ डेड सुद्धा आहे ज्यांना संपूर्ण मानव जातीवर विजय मिळवायचाय (म्हणजे  सगळ्या माणसांना  मारून टाकायचंय). जीओटीमध्ये दाखवलेला काळ कदाचित ख्रिस्तपूर्व काहीशे वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा राजे व राण्या राज्य करत असत. तेव्हा राज्य करण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे भीतीचा वापर करणे. या काळात काळ्या जादूचा वापर केला जातो, देवाचं अस्तित्वही आहे पण केवळ प्रार्थना करण्यासाठी. इथे उडते झाडू नाहीत पण ड्रॅगन्स आहेत जे काही मिनिटात संपूर्ण शहर बेचिराख करून टाकू शकतात. इथे लोक मरतात व धर्मगुरू त्यांच्याकडे असलेल्या अफाट शक्तिंनी त्यांना पुन्हा जिवंत  सुद्धा करू शकतात. या अतींद्रिय शक्तिंचा या गुरूंनाही अंदाज लागत नाही किंवा त्या नियंत्रित करता येत नाहीत. या जगांमध्ये वेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्या सगळ्यांचे नियम व संस्कृती वेगळी आहे मात्र दोन्हीकडच्या जगातील सगळ्या घराण्यामध्ये एक गोष्ट मात्र समान आहे ती म्हणजे सत्ता गाजवण्याची कधीही न संपणारी लालसा. व ही सत्ता मिळवण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. किंबहुना या सत्तेच्या लालसेमुळे या पुरूष व महिलांचं काय होतं यावरच या गोष्टी आधारित आहेत व कदाचित म्हणूनच जीओटी इतकी लोकप्रिय झाली. कारण आपल्यातही खोलवर कुठेतरी सत्तेची लालसा दडलेली असते, मात्र लोक काय म्हणतील या भीतीनं आपण तिला डोकं वर काढू देत नाही. पण आपल्या कृतींमधून ती अनेकदा डोकावतेच. आपण जे करू शकत नाही तेच कुणालातरी गोष्टीत करताना पाहायला आपल्याला अतिशय आवडतं. तुम्ही अगदी सलीम जावेदनाही विचारा तेही लोकप्रियतेचे हेच  सूत्र सांगतील.
आता तुम्ही (ज्यांनी जीओटी पाहिलेली किंवा वाचलेली नाही) म्हणाल यात काय असं मोठं आहेलॉर्ड ऑफ द रिंग्ज किंवा अलिकडची हॅरी पॉटर चित्रपटांची मालिका या हॉलिवुडपटांमध्ये आपण हेच पाहिलेलं किंवा वाचलेलं नाही कागॉडफादरमध्ये सत्तेसाठी कुटुंबातली स्पर्धा आपण पाहिली आहे जी या सगळ्यांवर मात करते. अगदी बॉलिवुड किंवा आपल्या हिंदू पुराणांमध्येही रामायण व महाभारतातला साम्राज्यांमधला, कुटुंबातला सत्तासंघर्ष ही याची सर्वोत्तम उदाहरणं आहेत. पण मग जीओटीमध्ये असं काय वेगळं आहे की लाखो लोक त्यासाठी वेडे झालेतहेच एका सशक्त कथेचं यश आहे असं मी म्हणेन. त्यात नवीन काहीच नाही पण मानवी लालसेची जुनीच कथा जेव्हा हजारो पात्रांच्या आधारे अत्यंत थरारकपणे सांगितली जाते तेव्हाच लाखो लोक ती पाहतात व वाचतात आणि डोक्यावर घेतात! जीओटीला रामायण, महाभारत, हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ रिंग्ज, गॉडफादर या सगळ्यांचं मिश्रण म्हणता येईल. मात्र या हजारो लोकप्रिय कथा व जीओटीत एक प्रचंड मोठा फरक आहे. या सगळ्या कथांमध्ये चांगलं व वाईट यातला संघर्ष आहे. मात्र जीओटीमध्ये वाईट, आणखी वाईट आणि सर्वात वाईट यांच्यातला संघर्ष आहे. गोंधळलात? मला असं वाटतं की म्हणूनच आजच्या पिढीला जीओटी भावली, ज्यात काहीच पूर्णपणे चांगलं नाही किंवा काहीच पूर्णपणे वाईट नाही. इथे आयुष्य करड्या व काळ्या अशा दोनच छटांमध्ये दिसतं. जीओटीमध्ये प्रत्येक पात्राची एक काळी बाजू आहे. तो किंवा ती जगण्यासाठी आपलं शस्त्र म्हणून ही बाजू वापरतो एवढंच मी थोडक्यात सांगू शकतो. इथे लोक त्यांचा भाऊ, बहीण, वडील, मुलगा व अगदी त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसीलाही कुटुंब, बदला व शेवटी सगळ्यांचं भलं करण्याच्या नावाखाली मारतात. यातला विनोद म्हणजे तुमच्या एखाद्या कुटुंबप्रमुखानं कुणाही लहान मुलाला ठार मारलं किंवा महिलेचा बलात्कार केला तर त्याचं न्याय, बदला, कुटुंबाचं संरक्षण किंवा शत्रूंमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशा कारणांनी समर्थन केलं जातं मात्रं दुसऱ्या कुटुंबातल्या (म्हणजे शत्रू) एखाद्यानं असं केलं तर ती सगळ्यात भयंकर गोष्ट मानली जाते, त्या माणसाला दुष्ट ठरवलं जातं व तो शिक्षेस पात्र असतो.
या गोष्टीत टोकाचा हिंसाचार वा शारीरिक संबंधांच चित्रण (लिखाण) आहे, त्यामुळे पाहताना तर सोडाच पण वाचतानाही अस्वस्थ व्हायला होतंज्यांच्याकडे हॉटस्टार प्रिमियम आहे ते या मालिकेचे सगळे भाग बिनदिक्कत पाहू शकतात मात्र ते वाचणं अधिक भयंकर आहेमी अनेक हिंसक गोष्टी वाचल्या आहेत मात्र जीओटीमध्ये प्रत्येक हिंसेचे कृत्य केल्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी जो निर्लज्ज तर्क दिला जातो त्यामुळे आपण खरोखर बधीर होतो. इथे जिवंत राहणंच फक्त महत्वाचं आहे तरंच तुम्ही सर्वशक्तीशाली होऊ शकाल हे इथलं ब्रीदवाक्य आहे. इथे शेवटपर्यंत प्रत्येक पात्र याच नियमानं जगतं व इतरांना मारतं. मग तो किंवा ती तुमच्या कुटुंबातली आहे किंवा दुसऱ्या हे महत्वाचं नसतं. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत नसेल तर ती तुमची शत्रू, असं इथलं साधं गणित आहे. इथेच तुम्हाला जीओटी धक्का देते. तुम्ही गंभीर वाचक असाल (म्हणजे तुमच्यातला माणूस अजून थोडाफार जिवंत असेल) तर हळूहळू तुम्ही स्वतःच्या आयुष्याची प्रत्येक घटनेशी तुलना करायला लागता. तुम्ही आज जिथे आहात तिथे पोहोचेपर्यंत तुम्ही किती लोकांना मारलंय असा विचार तुमच्या मनात यायला लागतो. मारणं म्हणजे अगदी खून या अर्थानं नाही. सुदैवानं आपण जीओटीच्या युगात राहात नसलो तरीही आपल्या कृतीनं किंवा विचारांनी आपण अनेकांना एकप्रकारे मारतच असतो हे तथ्य मला सांगावसं वाटतं. याचीच तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते; ही भावना तुम्हाला आतून हादरून सोडते. कारण तुमच्या चांगुलपणाच्या मुखवट्याखाली तुम्ही प्रत्यक्षात किती वाईट आहात हे तुम्हाला आत्तापर्यंत कुणी दाखवलेलं नव्हतं, अशा सगळ्या वाचकांसाठी जीओटी एक आरसा बनतो!
 अनेकांना मी काढलेला हा निष्कर्ष किंवा विश्लेषण पटणार नाही पण या कथेचा माझ्यावर असाच परिणाम झाला आहे. मी तुमच्यासमोर एखादं विश्लेषण मांडत नाही तर डिस्ने लँड फिरून आल्यानंतर तुम्ही जसे आपले अनुभव इतरांना सांगता तसा मी फक्त माझे अनुभव सांगतोय. तुम्ही एक निरीक्षण केलं असेल की अलिकडे चांगलं कमी आणि वाईट जास्त यांचं मिश्रण असलेले चित्रपट किंवा कथा अधिक लोकप्रिय होतात. मग मार्व्हलच्या मलिकेतला व्हेनम असेल किंवा अॅव्हेंजर मालिकेतला इन्फिनिटी वॉर किंवा एंड गेम असेल, ज्यामध्ये खलनायक लोकसंख्या निम्म्यानं कमी करून एक चांगलं जग निर्माण करायचा प्रयत्न करतोय. कारण झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पृथ्वी नष्ट होतेय असं त्याला वाटतं (जे खरंतर चुकीचं नाही). तर व्हेनमसारख्या चित्रपटांमध्ये नायक त्याच्यातल्याच खल शक्तिंचाच वापर करून त्याच्यातल्याच अधिक प्रबळ खल शक्तिंवर मात करायचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं जीओटी आजच्या समाजाचंच प्रतिनिधित्व करते. आपण दररोज आपल्यापैकी अनेकांना वाईट गोष्टी करताना व सगळ्यांच्या भल्यासाठी या नावाखाली त्यावर पांघरूण घालताना पाहतो. जे असं करू शकत नाहीत ज्यांना खलप्रवृत्तींसमोर शरणागती पत्करावी लागते व मूक राहावं लागतं कारण शेवटी ते सगळ्यांच्या भल्यासाठी होत असतं. हाच तर्क देत जीओटीमध्ये एकेका पानावर, एकेका प्रकरणात हजारो पात्र येतात व अगदी अनपेक्षित प्रकारे जातात. शेवटी तुम्हाला या प्रकाराची इतकी सवय होते की नंतर तुम्हाला कुठलंच पात्र आवडत नाही किंवा तुम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही. कारण ते पात्र एकतर मरणार आहे किंवा कुणालातरी मारणार आहे याची तुम्हाला खात्री असते.

तुम्ही आत्तापर्यंत ज्या कथा वाचल्या किंवा पाहिल्या असतील त्यात एखादा नायक किंवा नायिका असते व एक खलनायक असतो. मग ती व्यक्ती असेल किंवा परिस्थती ज्यामुळे नायक-नायिकेचं आयुष्य अवघड होतं आणि शेवटी त्यांचं प्रेम तसंच चांगुलपणा खलनायकाच्या दृष्ट प्रवृत्तीवर मात करतो. आत्तापर्यंतची कोणतीही गोष्ट घ्या, ती याच मार्गावरून चालत आलीय, पण जीओटी याला अपवाद आहे. इथे प्रत्येकजण दुसऱ्याच्या नजरेतून खलनायक आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या पात्राच्या दुष्कृत्यांमुळे हादरून जाता त्याचवेळी खलप्रवृत्तीत त्याहूनही वरचढ ठरणारं पात्र येतं. प्रत्येक घटनेमध्ये एखाद्या साखळी प्रक्रियेसारखा वाईटपणा तुमच्यावर आघात करत राहतो, जसं खऱ्या आयुष्यातही तुम्हाला सतत नैराश्याला तोंड द्यावं लागतं .आणि मग जेव्हा तुम्ही कथेच्या शेवटी पोहोचता तेव्हा हे युद्ध का सुरू झालं व ते कुणी जिंकलं यामुळे काहीच फरक पडत नाही. यातच जीओटीचं यश आहे, म्हणूनच ती लाखो लोकांना आवडली. त्याची खलप्रवृत्ती हाच कथेतला समान धागा आहे व तो पहिल्यांदाच इतक्या उघडपणे दाखवण्यात आला आहे. जीओटीचा चमू यशस्वी झालाय हे टीआरपीच्या आकडेवारीवरून सिद्ध झालंय. द ड्वार्फ (महाभारतातल्या भगवान श्रीकृष्णासारखं वाटणारं हे पात्र आहे; मला माफ करा मी हे पात्रं मध्यवर्ती आहे म्हणून अशी तुलना केलीय, यात कोणत्याही प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा किंवा हिंदुत्वाचा अपमान करण्याचा हेतू नाही) हे पात्र साकारणारा पीटर डिंकलेज सर्वाधिक पैसे मिळवणारा अभिनेता आहे. जीओटीमधला त्याचा प्रत्येक संवाद काही लाख रुपयांचा मोबदला मिळवणारा झालाय . क्रोएशियातल्या झग्रेबमध्ये जिथे जीओटीचं चित्रिकरण झालंय ते आता प्रसिद्ध पर्यटनस्थळ झालंय. यातून लोकांना ही कथा भावल्याचंच दिसून येतं कारण आजच्या युगात वाईटपणाचीच चलती आहे.
सगळ्यात शेवटी जेव्हा मुख्य पात्र जॉन स्नो (म्हणजे तुम्ही म्हणू शकत असाल तर तो कथेचा नायक आहे) याला, आर्मी ऑफ डेडपासून माणसांचं संरक्षण करण्यासाठी उणे अंश तापमान असलेल्या नरकाप्रमाणे भासणाऱ्या द वॉलमध्ये जाण्याची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. तेव्हा तो प्रश्न विचारतो की त्यानं स्वतः आर्मी ऑफ डेडचा नायनाट केला होता तर ती “द वॉल” अजूनही अस्तित्वात आहे कायावर ड्वार्फ उत्तर देतो, “या जगात लावारीस आणि खुनी माणसांना सामावून घेणाऱ्या जागेची नेहमीच गरज असेल”! आयुष्य तुमच्यावर किती निर्दयीपणे आघात करतं हे जीओटीमध्ये अगदी उघडपणे पाहायला मिळतं. एक गोष्ट नक्की, जीओटी वाचल्यानंतर व पाहिल्यानंतर माणूस म्हणून माझ्यात नक्कीच बदल झालाय. पण विनोद म्हणजे हा बदल चांगला की वाईट हे मात्र मला समजलेलं नाही. माझ्यातल्या चांगुलपणामुळे  मला या गोष्टीचा तिरस्कार वाटतोय की माझ्यातल्या वाईटपणामुळे मला ही गोष्ट अतिशय आवडलीय हे मला समजत नाहीये. पण मी स्वतःला जेवढा चांगला समजत होतो तेवढा मी नाही व वाईटपणा हासुद्धा माझाच भाग आहे व तो खरा आहे याची जाणीव व्हायला मला या गोष्टीनं मदत केलीय. तुम्ही आतून नेमके कसे आहात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल (म्हणजे जाणून घ्यायची हिंमत असेल), तर जीओटी आवर्जून वाचा व पाहा. तुम्ही खरे कसे आहात हे जाणून घ्यायची इच्छा नसेल तरीही लाखो लोकांना जीओटीनं का वेड लावलंय हे जाणून घेण्यासाठी तरी तुम्ही ती पाहू शकता (कारण मग 8000 हून अधिक पानं वाचण्यात अर्थ उरणार नाही). कदाचित या प्रक्रियेत तुम्हाला स्वतःचा शोध लागेल कारण अपघात कधीही, कुठेही होत असतात!

संजय देशपांडे 
संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment