Thursday, 18 August 2011

सुरक्षित घर 
 
सुरक्षितता हे काही उपकरण नाही तर ती मनाची एक स्थिती आहे... एलिअनॉर एव्हरेट

गेल्या दशकात केवळ पुण्याचाच नाही तर देशातील बहुतेक सर्व मोठ्या शहरांचा झपाट्याने विकास झाला आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला संपत्तीवरही पडताना दिसतं. घरांच्या मागणीत झालेले बदल पहा आणि विविध प्रकारच्या घरांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. केवळ निवारा हा एकमेव हेतू असलेल्या साध्या घरांनी आता आपले समाधान होत नाही! आता आपल्याला चकचकीत बाथरुम, स्वयंपाकघर, उत्तम प्रकाशनियोजन आणि आधुनिक इलेक्ट्रिक फिटिंग असलेल्या खोल्या असा सर्व सुखसोयींनी युक्त आराम हवा असतो. त्यासोबतच क्लब हाऊस, स्विमिंग पूल, एअर कंडिशनर, उचभ्रू वैशिष्ट्ये आणि आणखी बरच काही हवं असतं! आपल्या नव्या मॉडेलच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी मोठ्या जागा आवश्यक असतात आणि काही अपार्टमेंटमध्ये तर नौकर-चाकरांसाठी खोल्याही आवश्यक असतात!
एवढी संपत्ती आणि आराम असताना त्यासोबतच येणाऱ्या एका घटकाकडे आपण दुर्लक्ष करतोय का? तो घटक म्हणजे आपण अनुभवत असलेल्या आराम अथवा विलासाची सुरक्षितता. संपत्तीसोबतच इतर वाईट घटकही येतात, ज्यांना तुमच्या संपत्तीचा वाटा चुकीच्या मार्गाने मिळवायचा असतो! इथे सुरक्षिततेचा दोन किंवा तीन दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. एक म्हणजे अशा कुठल्याही घटकांकडून ज्यांना आपल्याकडून काही हिसकवायचे किंवा चोरायचे आहे, दुसरे म्हणजे दहशतवादाच्या स्वरुपात आणि तिसरे म्हणजे आग किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या स्वरुपात. घर निवडतांना आपल्यापैकी किती जण या बाबींचा विचार करतात? दुर्दैवाने आपण आपल्या जीवनाचे महत्वाचे निर्णय घेताना अतिशय संकुचित दृष्टिकोनातून विचार करतो आणि आपल्या स्वतःच्या घराचा शोध घेतानाही हे दिसून येते.
पर्यावरणाची सुरक्षितता हा देखील एक घटक आहे, मात्र तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे! मात्र आपल्या कृतीतून सभोवतालच्या पर्यावरणाच्या सुरक्षिततेचे कसलेही नुकसान होणार नाही हे आपण नेहमी आपल्या मनात ठेवले पाहिजे.
पहिल्या तीन आघाड्यांवर विचार केला तर काय चित्र आहे हे पाहू? जेव्हा आपण स्वतःसाठी घर शोधत असतो तेव्हा आपण आपल्या संपत्तीच्या सुरक्षिततेचा सर्वात आधी विचार केला पाहिजे. सर्वप्रथम बिल्डरने काय दिले आहे आणि दुसरे म्हणजे जे दिले आहे त्यात आपण काय सुधारणा करु शकतो? सुरक्षा कॅमेऱ्यांपासून ते हाउस ब्रेकिंग अलार्म पर्यंत अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. पण आपल्या भारतीय मानसिकतेचा विचार करता मी स्वतः संपूर्ण काँप्लेक्ससाठी आत जाण्यासाठी एक आणि बाहेर जाण्यासाठी एक मार्ग, एक साधी इंटरकॉम यंत्रणा आणि प्रवेशाच्या ठिकाणी वॉचमनची खोली अशा नियोजनाला प्राधान्य देतो. हे कदाचित अतिशय साधे वाटेल पण चोरीसाठीचे अलार्म आपल्याकडे फारसे उपयोगाचे नाहीत कारण आपल्याकडे लोक घरातून अनेकवेळा ये-जा करतात. कॅमेऱ्याने २४ तास टेहाळणी करुनही नक्कीच उपयोग होतो, मात्र केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतरची कारवाई करण्यासाठी, घटना रोखण्यासाठी नाही. अर्थात एखादी घटना घडल्यास व्यक्तिची ओळख पटवण्यासाठी त्यांचा सर्वाधिक उपयोग होतो. बहुतेक वेळ घरातील लोक बाहेर असतात किंवा घरात एखादी वृद्ध व्यक्ती असते, अशी जीवनशैली असलेल्या ठिकाणी आपल्या घरांमध्ये नको असलेल्या व्यक्तिंचा प्रवेश रोखणे हे अतिशय महत्वाचे असते. त्यासाठीच कॉम्पेक्स किंवा बिल्डिंगमध्ये प्रवेशासाठी एक आणि बाहेर पडण्यासाठी एक मार्ग असावा. यामुळे कॉप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. या यंत्रणेला २४ तासांच्या वॉचमनची जोड दिली पाहिजे आणि नेमक्या इथेच बऱ्याच सोसायट्या कमी पडतात, कारण त्या सुरक्षा सेवेवरचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतात. बाजारात अनेकप्रकारची सुरक्षा विविध दरांवर उपलब्ध असतात, पण जेवढी स्वस्त तेवढी हलक्या दर्जाची सेवा मिळते आणि सरते शेवटी ती आपल्याला जास्त महाग पडते! कॉम्पेक्सच्या नियोजनाकडे बघणेही आवश्यक आहे, ज्या इमारतींना अनेक प्रवेशद्वारे आहेत त्या शक्यतो टाळाव्यात कारण कुणीही व्यक्ती एखादा गुन्हा करुन कुठल्याही मार्गाने सहजपणे बाहेर पडू शकतो. तसेच सुरक्षा रक्षकांना आपली कार धुण्यासारखी वैयक्तिक कामे सांगू नये त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या कामापासून ते विचलित होऊ शकतात. भेट देणाऱ्या कुठल्याही व्यक्तिला ओळख पटवण्यासाठी सुरक्षा द्वारापाशी थांबवण्यात आले तर त्यांना अपमानित वाटू नये. या गोष्टी छोट्या वाटू शकतात पण सर्वात शेवटी अतिशय महाग पडतात.
कॉम्पेक्समधल्या स्विमिंगपूलसारख्या इतर सुविधांचाही अशाच मानसिकतेनेच विचार केला जावा जेणेकरुन मौजेसाठी असलेली ही सुविधा एखाद्या अपघातामुळे दुःखाचे कारण बनणार नाही. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच गॅस जोडणीसारख्या साध्या बाबींची वेळोवेळी योग्य निगा राखणे अतिशय महत्वाचे आहे आणि त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
बिल्डिंगच्या पायऱ्या/लिफ्टच्या लॉबीमध्ये सुरक्षाद्वार असावे जे रात्री उशीरा बंद करता येईल, हा सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. यामुळे बिल्डिंगमध्ये केवळ ज्यांना परवानगी आहे अशाच व्यक्ती जातील याची खात्री करता येऊ शकते. बहुतेक व्यापारी इमारतींमध्ये सर्व्हेलंस कॅमेरा हा उत्तम पर्याय असतो कारण तिथे संध्याकाळनंतर फारशी वर्दळ नसते, निवासी इमारतींच्या बाबतीत मात्र अशी परिस्थिती नसते. आणि काहीही झालं तरी आपला शेजारी हा सर्वोत्तम सुरक्षा रक्षक असतो, त्यामुळे आपण ज्या इमारतीमध्ये राहतो तिथे आजूबाजूला काय चाललं आहे हे डोळे आणि डोकं उघडं ठेवून पहावं. अचानक कुठलाही बदल झाला तर त्याबाबत सतर्क रहावं आणि चौकशी करावी. यामुळे आसपासच्या वाईट घटकांवर बराच वचक बसेल.
हे झालं चोरी किंवा तत्सम घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी मात्र त्याचवेळी आपण नैसर्गिक आपत्ती किंवा आग यासारख्या अपघातांसाठीही तयार राहिलं पाहिजे. व्यावसायिक इमारतींमध्ये आगीची सूचना देणारी घंटा किंवा ऑटो स्प्रिंकलर्स लावणे शक्य आहे. निवासी इमारतींमध्ये म्हणजे १५ मिटरहून उंच इमारतींमध्ये आग विरोधी यंत्रणा असते, त्यामध्ये प्रत्येक मिड लॅडिंगमध्ये पाणी मारण्याचे पाईप्स गुंडाळून ठेवलेले असतात. चार मजल्यांपेक्षा उंच प्रत्येक इमारतीसाठी दोन जिने असतात ज्यावर बहुतेकवेळा नको असलेलं फर्निचर किंवा कुंड्या ठेवलेल्या असतात! यंत्रणा व्यवस्थित काम करते आहे का हे वेळोवेळी तपासणे आवश्यक असते, ज्याकडे अनेक सोसायट्या दुर्लक्ष करतात आणि ज्यावेळी गरज पडते तेव्हा आपल्याला कळतं की यंत्रणा आहे मात्र ती काम करत नाही. या सर्वांच्या देखभालीसाठी मासिक कंत्राटाची रक्कम अतिशय थोडी असते मात्र ती वाचवण्याच्या प्रयत्नात आपले मोठे नुकसान होते.
त्यानंतर विषय येतो नैसर्गिक आपत्तींचा. कुठली नैसर्गिक आपत्ती येईल याचा अंदाज बांधणं कठीण असलं तरी अशा वेळी काय करायचं आणि इमारतीचं नियोजन कसं असावं हे प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. घर खरेदी करतांना याविषयी आणि विकासक कुठल्या बांधकाम प्रक्रियांचे पालन करतो याविषयी प्रश्न विचारु शकतो. उदाहरणार्थ इमारत भूकंप प्रतिकारक्षम आहे का आणि तिची आखणी करतांना संबंधित निकषांचे पालन केले आहे का, तसेच इमारत कुठल्या भूकंप क्षेत्रात मोडते इत्यादी. भूकंप किंवा आगीच्या वेळी लिफ्ट वापरु नये अशा साध्या गोष्टी रहिवाशांना समजावून सांगितल्या पाहिजेत आणि त्याचे प्रात्याक्षिक करुन घेतले पाहिजे. अशा वेळी वीज पुरवठा कसा खंडित करायचा आणि अशा इतर गोष्टींचे मूलभूत ज्ञान आपल्याला असले पाहिजे.  हे ऐकायला कदाचित विनोदी वाटेल पण निसर्गाचा तडाखा बसल्यानंतर जपानने कशी प्रतिक्रिया दिली हे आपण पाहिले तर आपल्याला या गोष्टींचे महत्व लक्षात येईल. सरतेशेवटी एका शहाण्या माणसानं म्हटल्याप्रमाणे सुरक्षितता ही केवळ काही उपकरणांवर नाही तर आपल्या त्या विषयाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!