Monday, 30 October 2017

वन्यजीवन सुरक्षीत वन्यप्रेमींमुळेच !

आपण लोकांना वन्य जीवनाविषयी प्रेमाने समजावुन सांगितले तरच त्यांच्या भावनांना स्पर्श केला जाईल. माझ्या वन्य जीवनाविषयी मी नक्कीच सांगेन कारण मानवाला ज्या गोष्टी आवडतात त्याच जतन कराव्याशा वाटतात.”... स्टीव्ह आयर्विन.

क्रोकोडाईल हंटर नावाने ओळखला जाणारा स्टीफन रॉबर्ट आयर्विन हा ऑस्ट्रेलियन प्राणी संग्रहालयाचा व्यवस्थापक, संवर्धक व दूरचित्रवाहिनीवर विविध कार्यक्रमांचा सादरकर्ता होता. त्याने नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरील आपल्या उल्लेखनीय कार्यक्रमांद्वारे जगभरातील सामान्य माणसांना वन्य जीवनाच्या प्रेमात पाडलं. मात्र नियतीची क्रूर थट्टा म्हणजे अशाच एका कार्यक्रमासाठी चित्रण करताना स्टिंग रे माशाच्या दंशामुळे त्याचा मृत्यू झाला! याला वन्य जीवन संवर्धनासाठी खऱ्या अर्थानं जीवन समर्पित करणं म्हणता येईल. स्टीव्ह यांनी मृत्युतुनही वन्य जीवन संवर्धनाच्या कामात मोठं योगदान दिलं म्हणूनच सामान्य माणसाला वन्य जीवनाविषयी जागरुक बनविण्याबाबत त्यांनी केलेलं विधान मला माझ्या लेखाच्या सुरुवातीला द्यावसं वाटलं. काही रिऍलिटी टीव्ही कार्यक्रमांप्रमाणे, ऑक्टोबर आला की भारतात वन्य जीवनाचा नवा हंगाम सुरु होतो. अभयारण्ये पावसाळ्यानंतर पर्यटनासाठी पुन्हा खुली होतात, मी याआधीही लिहीलंय मध्य भारतातील जंगलं पावसाळ्यानंतर पहाण्यासाठी सर्वोत्तम व अगदी ताजीतवानी असतात. खरंतर मला जंगलात जायला कधीच कारण लागत नाही, मात्र जेव्हा तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांसाठी मला माझा खारीचा वाटा उचलायचा असतो तेव्हा ती भेट अधिक सुंदर व अर्थपूर्ण ठरते. आम्ही यावेळी मध्यप्रदेशातल्या पेंच अभयारण्यातल्या गाईड व प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांसाठी 125 हिवाळी कपडे व ताडोबातल्या गाईड तसेच प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांसाठी 175 हिवाळी कपडे वितरित केले. दोन्ही ठिकाणी एका छोटेखानी समारंभात, तिथल्या अधिकाऱ्यांना मदत करणाऱ्या गाईड व प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांना हे स्वेटर्स देण्यात आले!

हे स्वेटर घेताना गाईडच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद व तोंडी आमच्या चमूसाठी कौतुकाचे शब्द होते. मी दोन्ही कार्यक्रमात बोलताना सांगितलं की आम्ही जे काही दिलं ते फार मोठं नाही, मात्र जंगलाचं संरक्षण करण्याचं अतिशय अवघड काम पार पाडताना तुम्ही एकटे नाही ही भावना तुमच्यापर्यंत  या स्वेटर्समधुन पोहोचवावीशी वाटते. हा स्वेटर म्हणजे फक्त एक भेट वस्तु नाही तर ही तुम्हाला तुमचं काम किती महत्वाचं आहे याची व जंगलाबाहेर शहरात सर्व सुखसोयींनी युक्त आयुष्य जगणाऱ्या कुणालातरी त्याची जाणीव आहे व ते तुमच्या कामाचा आदर करतात याची आठवण करून देईल. खरंतर वाघाचं संरक्षण करणं जेवढं अवघड आहे, तितकच अवघड काम एक गाईड म्हणुन जंगलात वाघ दाखवणं आहे. जंगलाला भेट देणाऱ्या बहुतेक पर्यटकांचा हेतू केवळ वाघ पाहणे असतो व वाघ दाखवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं अतिशय कठीण काम आहे. हे कठीण काम गाईडना वर्षभर करावं लागतं. मी नेहमी सांगतो की मध्यप्रदेश, महाराष्ट्र किंवा कर्नाटकसारख्या राज्यातील वन्य पर्यटन वाघाभोवती केंद्रित आहे. पर्यटक जेव्हा जंगलात येतात, त्यासाठी बराचसा पैसा व वेळ (याविषयी सविस्तर बोलेनच) खर्च करतात, तेव्हा त्यांना वाघाची झलक पाहायला मिळाली नाही तर त्यांची जंगलाविषयीची आवड वाढेल कशी? तसंच तुम्हाला जे आवडत नाही त्याचं संवर्धन करण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात

आता थोडसं वाघ दृष्टिस पडण्याविषयी (वाघ दृष्टिस पडणे यासाठी सामान्यपणे सायटिंग असा शब्द वापरला जातो) सांगतो. या खेपेला मी जवळपास अकरा सफारी केल्या, त्यापैकी सात मध्यप्रदेशातील पेंचमध्ये, चार ताडोबामध्ये व एका सफारीत संपूर्ण जंगलाचा फेरफटका असतो म्हणजे पहाटे 6 ते सकाळी 10.30 वाजेपर्यंत व दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. या अकरा सफारींमध्ये मला फक्त वाघाचा एक बछडा रस्ता ओलांडताना दिसला. मला एवढ्या सफारींमध्ये वाघाचं एवढंच दर्शन झालं असं म्हणता येईल.  म्हणजेच वाघाच्या दर्शनासाठी किती वेळ, प्रयत्न व खर्च लागतो याचा विचार करता येईल. सकाळच्या सफारीसाठी पहाटे 4.30 वाजता प्रवेशाद्वारापाशी पोहोचावं लागतं. मी आत्तापर्यंत भरपूर वाघ पाहिले आहेत व मी फक्त वाघ पाहायला जंगलात जात नाही तरीही हा पिवळ्या काळ्या पट्ट्यांचा रुबाबदार प्राणी कधीही पाहिल्यावर आनंदच होतो. मला फक्त वाघांच्या संवर्धनाच्या नावाखाली पर्यटकांचा कसा छळ होतो हे सांगायचं होतं (माझ्या अनेक वनअधिकारी मित्रांना छळ हा शब्द आवडणार नाही). त्यासाठी कुणाला दोष द्यायचा किंवा कुणाची चूक आहे हे मला माहिती नाही. मात्र वनविभाग प्रत्येक सफारीसाठी किती मोठे शुल्क आकारतो, त्याशिवाय जिप्सीचा खर्च, सफारीचे आरक्षण मिळणे, पार्कमध्ये प्रवेश मिळण्यासाठीच्या प्रक्रिया पाहता पाकिस्तानात जाणे अधिक सोपे असेल असे वाटू लागते. उदाहरणार्थ पेंचमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पाहा. तुम्हाला आधी ऑनलाईन आरक्षण करावं लागतं, जे सुरु होताच पूर्ण आरक्षित होतं. त्यानंतर तुम्हाला पहाटे 5 वाजता प्रवेशद्वारापाशी यावं लागतं, जे 6 वाजता उघडतं. तुम्ही ऑनलाईन आरक्षण जरी केलं असलं तरीही पडताळणीच्या प्रक्रियेसाठी जवळपास एक तास लागतो. जवळपास सगळ्या गोष्टींची पडताळणी ऑनलाईन करणे शक्य असताना वनविभागाला कसली पडताळणी करायची असते कुणास ठाऊक. तुम्ही प्रत्येक सदस्याने वैध ओळख पत्र पुरावा सादर करून प्रवेश अर्जाची छापील प्रत घेतल्यानंतरही प्रवेशद्वारापाशी त्याची पुन्हा एकदा तपासणी केली जाते, दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी दुसरा अधिकारी ही ओळखपत्रे पुन्हा एकदा तपासतो.

ताडोबाच्या बाबतीत तर ही प्रक्रिया आणखी कडक आहे प्रत्येक सदस्याला त्याचे किंवा तिचे नाव पुकारल्यानंतर हात उंच करावा लागतो. त्याचशिवाय इथली जिप्सी किंवा गाईड वितरित करण्याची प्रक्रियाही गुंतागुंतीची आहे. तसंच गाईडना यासाठी पहाटे 4.30 पासून वाट पाहात बसावी लागते. यातला सगळ्यात वाईट भाग म्हणजे तुम्ही संपूर्ण शुल्क भरून एकाच्या नावे सफारीचे ऑनलाईन आरक्षण केले असले व एका सफारीत सहा लोक जाऊ शकत असले तरीही, सर्व सहा नावांची आरक्षणाच्या वेळीच म्हणजे जवळपास तीन महिने आधी खात्री करावी लागते. आता अशावेळी विद्यार्थ्यांचा गट असेल तर इतक्या लवकर खात्री कशी करता येईल. यावर कडी म्हणजे तुम्हाला कोणत्याही नावात बदल करायचा असेल किंवा ऐनवेळी आणखी एखादे नाव वाढवायचे असेल तर तुम्ही सफारीसाठी भरलेल्या शुल्काव्यतिरिक्त प्रत्येक नावासाठी 1000 रुपये द्यावे लागतात. त्याशिवाय कॅमेऱ्याचे शुल्क असते तसेच गाईडचेही शुल्क असते, त्यामुळे वन्यजीव पर्यटन हे फक्त सुखवस्तू लोकांपुरतेच मर्यादित राहते. यासाठी वनविभागाकडून दिले जाणारे कारण म्हणजे पर्यटन कंपन्या तिकीटांचा काळाबाजार करतात व चढ्या दरांनी विकतात. मात्र प्रामाणिक पर्यटक व शाळांच्या सहली आयोजित करणाऱ्यांचे काय, मूठभर चुकीच्या लोकांमुळे बाकीच्यांनी त्रास का सहन करावा असा प्रश्न मला अधिकाऱ्यांना विचारावासा वाटतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काळा बाजार करणारे व्यवस्थेतून पळवाटा काढतच असतात, जो सफारी आरक्षित करण्यासाठी पैसे द्यायला तयार असतो तो दुसरे नाव घालण्यासाठी 1000 रुपये द्यायला का तयार होणार नाही?- मात्र यामध्ये मध्यम वर्ग भरडला जातो व जंगलाचं सौंदर्य पाहण्यापासून वंचित राहतो ही वस्तुस्थिती आहेत्याशिवाय गेल्या दहा वर्षात प्रवेश शुल्क जवळपास दहा पट वाढविण्यात आले आहे. याचे एक कारण म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वन पर्यटन केवळ जंगलाच्या 20% भागापुरतंच मर्यादित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे जिप्सींचा प्रवेश 80% कमी झाला आहे. प्रवेशाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पन्नाची भरपाई करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रवेश शुल्क वाढवले आहे. मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो की सरकारचे काम काय आहे, पैसे कमावणे किंवा निसर्गाचा हा खजिना देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला उपलब्ध करून देणे? सफारीसाठी लागू होणाऱ्या शुल्कांच्या बाबतीतही असेच आहे, देशातल्या सर्व राष्ट्रीय अभयारण्यांसाठी एकच शुल्क आकारणी यंत्रणा का नाही म्हणजे वन्यजीवन पर्यटकांना त्यांचं पैशांचं नियोजन तसंच सहलींचं आयोजन करणं सोपं होईल. उदाहरणार्थ प्रत्येक अभयारण्यासाठी दिवसभराच्या सफारीचे शुल्क सगळीकडे वेगळे असते. एकाच वर्षात याचे शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. दिवसभराच्या सफारीसाठी प्रति दिवस 75,000 रुपये आकारले जातात, विचार करा किती भारतीयांना हे परवडू शकते. या पार्श्वभूमीवर मला अमेरिकेतील राष्ट्रीय अभयारण्यांविषयी थोडीशी माहिती द्याविशी वाटते. तेथील चार मुख्य राष्ट्रीय अभयारण्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त $80  आकारले जातात म्हणजे या चारही अभयारण्यांमध्ये वर्षभरात कितीही वेळा प्रवेश करण्यासाठी रु. 5600/- आकारले जातात. अमेरिका हा श्रीमंत देश आहे हे मान्य आहे मात्र ते इतर अनेक मार्गांनी पैसे कमावतात, सामान्य नागरिकांना निसर्गाच्या संवर्धनापासून वंचित ठेवत नाहीत. आपल्या पर्यावरण व वन मंत्रालयाने या वस्तुस्थितीची दखल घ्यायची व राज्य वन विभागांना त्यानुसार मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे.

प्रवेशाच्या औपचारिकतांचे चक्रव्यूह भेदून तुम्ही अभयारण्यात येता तेव्हा आतमध्ये वेगळेच नियम लागू होतात. वनविभागाच्या हेतूविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावसं वाटतं की मी सुद्धा एक निस्सीम वन्यप्रेमी आहे, तरीही लोक इथे वन्यजीवन (वाघ व बिबट्या) बघायला येतात व ते ज्यासाठी इथे येतात ते त्यांना पाहायला मिळेल अशी धोरणे आपण तयार केली पाहिजेत. असे केले तरच त्यांचा वन्य जीवनातील रस वाढेल ज्यामुळे ते वन्य जीवन संवर्धनाच्या महत्वाविषयी जागरुक होतील. जंगलात आपलं स्वागत झाल्यानंतर तिथले नियम निराळेच असतात, वेग मर्यादा 20 किमी/तास असते, आता हे कुणी ठरवलं देवाला माहिती. तुम्ही लघुशंका करण्यासाठीही वाहनातून उतरू शकत नाही. हे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आले आहे समजू शकते. मात्र अनेक अभयारण्यांमध्ये प्रसाधनगृहे नाहीत. पेंच अभयारण्यात अलिकट्टामध्ये (मध्य बिंदू) केवळ एकच प्रसाधनगृह आहे. जेव्हा वाघ दृष्टिस पडण्याची शक्यता असते व एखाद्या पर्यटकाला त्याचवेळी लघुशंकेला जायचे असेल तर त्या बिचाऱ्याला वाघ बघण्याची संधी हुकवावी लागते. याचे कारण म्हणजे त्याला शौचालय ज्या ठिकाणी आहे तिथे घाईने जावे लागते. माझ्या ताडोबाच्या अलिकडच्या सहलीत अशाच प्रकारची घटना घडली, खुद्द उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना लघुशंकेला जावयाचे असल्यामुळे त्यांची वाघ बघण्याची संधी हुकली. पर्यटकांना जंगलात कुठेही उतरायची परवानगी द्या असे मी म्हणत नाही मात्र संपूर्ण अभयारण्यात अनेक वनरक्षक राहात असताना त्यांच्या चोक्यांमध्ये आपण पर्यटकांना सुरक्षित प्रसाधनगृहे उपलब्ध करून का देऊ शकत नाही म्हणजे ते आरामदायकपणे सफारीचा आनंद घेऊ शकतील?

आणखी एक समस्या म्हणजे चालक तसेच गाईडवर लादलेले नियम (खरतर निर्बंध हा शब्द योग्य होईल). मला पेंचमध्ये समजलं की जंगलातील रस्त्यांवर तिठा किंवा चौक असल्याशिवाय दुपदरी रस्त्यावरही तुम्ही यू टर्न घेऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या जिप्सीच्या मागे एखादा वाघ असेल किंवा एखादा छायाचित्र काढण्यासारखा प्रसंग घडत असेल व तुम्ही प्राण्यापासून सुरक्षित अंतरावर असला तरीही तिठा किंवा चौक येईपर्यंत तुम्हाला मागे फिरता येत नाही, सरळच जावं लागतं त्यानंतरच मागे वळता येतं, हे विचित्र वाटत नाही का? आता ताजी घडामोड म्हणजे सर्व गाईडना त्यांच्या मोबाईलमध्ये जीपीएस देण्यात आला आहे ज्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल, त्याचशिवाय जिथे वाघ दिसत असेल तिथे तुम्ही पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही असं मला काही गाईडनी सांगितलं. त्यानंतर सतत मार्ग बदलणं तसंच जिथे नियमितपणे वाघ दिसत असेल ते मार्ग बंद करणे असे अनेक खेळ वन विभाग किंवा अभयारण्याचे व्यवस्थापन खेळत असते. त्यानंतर पावसाळ्यात अभयारण्ये बंद का ठेवायची, ताडोबाच्या मुख्य रस्त्याचे उदाहरण घ्या जो अतिशय उत्तम डांबरी रस्ता आहे. पर्यटकांना हा रस्ता वापरू द्यायला काय हरकत आहे. हा रस्ता गेल्या पावसाळ्यापर्यंत सुरू होता, केवळ याच मोसमात तो अचानक बंद करण्यात आला. विचार करा गाईडच्या मनात दंड होण्याचे किंवा बंदी लागण्याचे भय असताना ते पर्यटकांना मोकळ्या मनानं जंगलाचं सौंदर्य कसे दाखवू शकतील, जे त्यांचे मुख्य काम आहे. मी वेगाने वाहने चालवण्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही मात्र जिप्सी चालकांनाही जंगलात वाहन चालवताना त्यांची जबाबदारी समजते. त्याचशिवाय भूतकाळातील सांख्यिकी पाहा व पर्यटक वाहनामुळे वन्य प्राण्यांना अपघात झाल्याची एकतरी घटना आहे का? कारण असा अपघात झाल्यास आपली ती जंगलातली अखेरची फेरी असेल हे वाहन चालक जाणतो व ते त्याला परवडणार नाही. असे असताना जीपीएससारख्या साधनांनी चालकांच्या मनावरचा ताण का वाढवायचा, आपण एक अभयारण्य चालवतोय की तुरूंग? अशा सर्व गोष्टींमुळे केवळ पर्यटनाचेच नाही तर हजारो लोकांच्या जीवनचक्राचे नुकसान होते, जे पूर्णपणे पर्यटकांवरच अवलंबून असतात. या पावसाळ्यात अभयारण्य बंद असल्यामुळे जिप्सी चालकांना उपजीविकेसाठी अक्षरशः रस्त्यावर उतरावे लागले. हे केवळ एक उदाहरण आहे, सफारीच्या परवान्यांची संख्या कमी केल्यामुळे तसेच प्रवेश शुल्क अतिशय जास्त असल्यामुळे दोन किंवा तीन पेक्षा अधिक सफारींसाठी केवळ उच्चभ्रू पर्यटकच येतात. त्यामुळे सर्व राष्ट्रीय अभयारण्यांच्या भोवतालची मध्यम किंवा स्वस्त हॉटेल संपुष्टात आली आहेत. केवळ उंची हॉटेल जोरात चालली आहेत जी बहुतेक लोकांना परवडत नाहीत. किंबहुना आपण आपली सर्व अभयारण्ये जास्तीत जास्त काळ खुली ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते. आपल्या पर्यटनामुळे जंगलात व भोवताली राहणाऱ्या लोकांना चांगली उपजीविका मिळाली नाही तर ते शिकाऱ्यांच्या प्रलोभनांना सहज बळी पडतील.

राष्ट्रीय अभयारण्यांचे वरील पैलू पाहता, माझ्या मनात एक प्रश्न येतो आपण कोणत्या दिशेने प्रवास करतोय. कारण एवढे पैसे देऊनही आपण राष्ट्रीय अभयारण्यांना भेट देणं पर्यटकांसाठी एवढं अवघड करणार असू तर यापुढे वाघ किंवा कोणतेही वन्य प्राणी प्राणीसंग्रहालयात पाहणे काय वाईट आहे. वनविभागाच्या वन्य जीवन संवर्धनाच्या हेतूविषयी कुणीही शंका घेत नाही, मात्र ते ज्या प्रकारे केले जात आहे त्यात अडचण आहे. आपण या देशातल्या प्रत्येक व्यक्तिला जंगलांचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे. तर तो किंवा ती वन्यजीवन संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यासाठी आपण वन्य जीवन प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून दिले पाहिजे, तरच त्यांना संवर्धनाचे महत्व समजू शकेल. मी नमूद केल्याप्रमाणे माझ्या अकरा सफारींमध्ये मला एकदाही वाघ दिसला नाही, मात्र तरीही माझं जंगलांवर प्रेम आहे. मात्र या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला बराच वेळ व पैसा खर्च करावा लागला आहे व पूर्वी मी बरेच वाघ पाहिले आहेतमी जंगलांच्या या अनुभवातून शिकलोय की वन्यजीवप्रेमी असणं म्हणजे केवळ अभयारण्यांना भेट देणं, छायाचित्रं घेणं, एफबीवर अपलोड करणं व लाईक्स मिळवणं नाही. तुम्ही जंगलांच्या संवर्धनासाठी काय करता यातूनच तुम्ही वन्यजीवप्रेमी आहात का हे ठरतं. मी माझे विचार या लेखातून लिहीतोय, म्हणजे कुणीतरी कुठेतरी विचारप्रवृत्त होईल व कृती करेल. या देशातील सामान्य वन्यजीवप्रेमी व वन्यजीवनासाठी हीच अखेरची आशा आहे!


संजय देशपांडे
Mobile: 09822037109